Thursday, October 19, 2017

निखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून-

ऋतुरंगच्या दिवाळी अंकात "आमचं सहजीवन" या सदरात निखिल वागळेंचा सुकून हा लेख आहे.
अक्षरच्या दिवाळी अंकात त्यांनी "माझ्या खिशातला राजीनामा" हा लेख लिहिलेला आहे.
आय.बी.एन.लोकमत ही वाहीनी सुरू करण्यापासून ती नावारूपाला आणण्यात वागळेंचा मोठा वाटा. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आले आणि पाच दिवसात या वाहिनीची मालकी असलेला माध्यमसमुह मुकेश अंबानींनी विकत घेतला. त्यानंतर राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळेंना आपली पदे सोडावी लागली. त्याबाबत पडद्यावर झळकणार्‍या या माणसांच्या बाबतीत पडद्यामागे नेमके काय घडले याचे वागळेव्हर्जन या लेखात वाचायला मिळते.
इलेक्ट्रॉनिक वाहीन्यांचं हे कॉर्पोरेट जग नेमकं कसं चालतं? तिथल्या पत्रकारांना खरंच काही स्वातंत्र्य असतं का? पैशांच्या जोरावर मालकलोक्स टेबलावरून नी टेबलाखालून कायकाय व्यवहार करतात? तिथल्या संपादकांना कोणत्या तडजोडी कराव्या लागतात? असे आणि इतर अनेक प्रश्न आपल्या मनात कायम असतात. त्यातल्या काहींची उत्तरं या लेखात मिळतील.
वागळे हे माध्यमांमधले अमिताभसारखे अ‍ॅंग्रीयंगमन. तशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मानणारा आणि त्यांचा तिरस्कार करणारा असा दोन्ही बाजूंना मोठाच जनसमुदाय आहे. पत्रकारांमध्ये त्यांना रोलमॉडेल मानणारे अनेक तरूण आहेत. ते यशस्वी व्यवस्थापक आहेत. मराठीतले नामवंत वक्ते आहेत. वागळेंकडे जबरदस्त जिगर आहे. कल्पकता नी प्रतिभा आहे. त्यांच्याकडे अशा जमेच्या बाजू खुपच आहेत. त्या अर्थानं वागळे दणकट पत्रकार आहेत.
बघा फक्त आयबीएन लोकमत ही त्यांची घोषणा, ही टॅगलाईन भारी वाटत असली तरी इतरांकडेही काही चांगलं असू शकतं हेच ते विसरून गेले होते काय? एका मोठ्या पत्रकाराचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा बनली होती काय?
वागळेंना आपण तिरसट असल्याचा अभिमान आहे असं ते या लेखात सुचित करतात.
वागळे अ‍ॅन्कर म्हणून आधी भारी होते, पण नंतर ते न्यायधिश बनू लागले. अनेकांशी ते खुनशीपणानं वागू लागले.
वागळेंना मी किमान 40 वर्षे जवळून ओळखतो. ते दिनांक साप्ताहिकात काम करीत होते तेव्हापासूनचा हा परिचय आहे. त्यांचा महानगरचा सुवर्णकाळ आणि कर्जबाजारी होण्याचा काळ असे दोन्ही मी पाहिलेत. आय.बी.एन. लोकमत वाहिनी सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून मी त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम केला होता. त्यानंतर शेकडो वेळा त्यांच्यासोबत चर्चेत मी सहभागी झालोय. आमचे मित्र असणारे वागळे आणि वाहिनीचे संपादक असलेले वागळे या दोन संपुर्ण वेगळ्या व्यक्ती असत. नंतरनंतर आजचा सवालमध्ये सतत प्रचंड आरडाओरडा करणे, प्रसंगी दादागिरी करणे, संतापल्याचा उत्तम अभिनय करणे, समोरच्याला अनेकदा बोलूच न देणे असले पत्रकारीतेत न बसणारे हातखंडे ते वापरू लागले. स्वत:ची एक दहशत निर्माण करण्यावर त्यांचा भर राहिला. टी.आर.पी.साठी आपण काहीही तडजोडी केल्या नाहीत, मालकांचे दबाव कायम झुगारले असं वागळे लेखात सांगत असले नी त्यांच्यावरचे सारे आरोप ते नाकारीत असले तरी अनेकदा ते श्रेष्ठ तडजोडी करीत असत हे गुपित जवळच्यांना माहित आहे. शिवसेना, ठाकरे, राणे, भु्जबळ ह्यांचे आणि वागळेंचे अतिव "सलोख्याचे" संबंध राहिलेत हे सारा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्र स्वच्छ करण्याचं पेटंट एकहाती घेतलेल्या सनातनी छावणीतल्या एका बाईंना वागळे इतकं फुटेज देत की वागळे आता जरा दमानी घ्या असं म्हणायची पाळी आली होती. 
इतरांना कायम झोडपणारे, कस्पटासमान तुच्छ मानणारे वागळे सत्ताधारी जात संघटनांशी मात्र कसं नमून वागायचे, त्यांच्याशी जुळवून घ्यायचे त्याचे पुरावे देता येतील.
वागळे धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांना सामाजिक दृष्टी आहे. ते टीमकडून अनेक चांगले उपक्रम नी प्रसंगी उद्योगही यशस्वीपणे करून घ्यायचे. त्यांचा सवाल आणि ग्रेट भेट हे कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय होते. सामाजिक चळवळीतील लोकांना वागळेंचा आधार वाटतो.
पण या वागळ्यांच्या आवडी-नावडी कमालीच्या टोकदार प्रसंगी अतिरेकी असतात.
आयबीएनचे बस्तान उत्तम बसल्यानंतर वागळेंची देहबोली कमालीची बदलली. उग्र झाली. भाषा भडक नी अरेरावीची झाली. त्यांच्या वागण्यात बेदरकारपणा येत गेला. हे यश डोक्यात जाणे नव्हते काय? वागळेंना न आवडणारी दुसरी बाजू म्हणून काही असू शकते हेच ते नाकारू लागले होते. आपली खुर्ची त्यांना चढली, आपण म्हणजेच मिडीया, आपण म्हणजेच देश या अर्णवी वळणाकडे ते झुकू लागले. वागळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती काय?
अण्णा हजारे आणि वागळे ही उत्तुंग माणसं आहेत. पण त्यांना दोघांना ते एकटे सोडून बाकी सारे जग भ्रष्टच आहे याची खात्रीच वाटत असते.
वागळेंचे सल्लागार आणि प्रतिभावंत नाटककार विजय तेंडूलकर यांनी डॉ. य.दि.फडके, अरूण साधू व मी वसईला भाऊ पाध्ये यांना आम्ही भेटायला गेलेलो असताना वागळेंच्या स्वभावाचे नेमके आकलन मांडले होते. आज तेंडूलकर, फडके आणि साधू तिघेही आपल्यात नाहीत. अशावेळी ते त्यांचे खाजगीतले बोलणे इथे लिहिणे उचित होणार नाही.वागळेंच्या सवाल कार्यक्रमात प्रेक्षकांच्या एसेमेसची टक्केवारी सांगितली जात असे. टक्केवारीचा हा प्रकार म्हणजे एक निखळ विनोदी कार्यक्रम असे. वागळेंचे मत ज्या बाजूचे असेल त्याच मतांचे एसेमेस जास्त येत असत हा केवळ योगायोग असणार. नेमके किती एसेमेस आले ते मात्र कधीही सांगितले जात नसे. टक्केवारी फसवी असू शकते. अगम्य असू शकते. हेही प्रकरण ही बुवाबाजी होती की वस्तुस्थिती हे केवळ वागळेच जाणोत.
वागळ्यांच्या महानगर आणि आयबीएन लोकमतवर अनेक हिंसक हल्ले झाले, त्याचे पुढे काय झाले? त्याचा निकाल लागेपर्यंत वागळेंनी त्याचा पाठपुरावा केला काय? या हल्ल्यांचा खप वाढवण्यासाठी, टी.आर.पी.साठी, आपण किती लढाऊ पत्रकार आहोत ह्याची आक्रमकपणे जाहीरात करण्यासाठी उपयोग करून घेण्यात आला काय?
प्रश्न अनेक आहेत.
वागळेंचे हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. विशेषत: त्यांच्या पत्नीवरचा मीना कर्णिक यांच्यावरचा सुकून हा लेख जास्त महत्वाचा आहे. काही प्रमाणात आत्मपरीक्षण करणाराही आहे. सर्वांनी हे दोन्ही लेख अवश्य वाचावेत.
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment