Tuesday, January 30, 2018

शेतकरी गांधीजी--प्रा.हरी नरके

महात्मा गांधी माणसांमध्ये जसे रमत तसेच ते पुस्तकांमध्येही रमत असत.पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेला त्यांनी भेट दिली तेव्हा तिथली प्राचीन हस्तलिखितं बघून ते हरखून गेले. पाली, अवेस्ता, अरेबिक, महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत आदी भाषांमधली हजारो प्राचीन हस्तलिखितं बघताना ते त्यांची तन्मयतेनं माहिती घेत होते. जाताना त्यांनी संस्थेच्या शेरेबुकात संस्थेच्या या मौलिक कार्याचा गौरव केला.
विशेष म्हणजे गांधीजींनी या शेरे पुस्तकात आपला व्यवसाय " शेतकरी" असा लिहिलेला आहे.
गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. कट्टर धार्मिक हिंदू होते.
ते बदलले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे.
दुसर्‍या गोलमेज परिषदेला लंडनला जाण्यापुर्वी त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली.
गांधीजी हे मुळात राजकारणातले चाणक्य. त्यामुळे त्यांनी जाणीवपुर्वक बराच वेळ बाबासाहेबांकडे दुर्लक्ष केलं. भेटीची नियोजित वेळ संपली तसे बाबासाहेब जायला निघाले. तेव्हा कुठे गांधीजींनी "तुम्ही कधी आलात?" असं बाबासाहेबांना विचारलं.
दोघांच्यात अतिशय कडवट चर्चा झाली.
तोवर गांधीजी बाबासाहेबांना ’ब्राह्मण’ समजत होते.
"तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरीजनांसाठी काम करतोय," असं गांधीजी म्हणाले.
बाबासाहेब त्यावर ताडकन म्हणाले, "केवळ आधी जन्माला आलो या भांडवलावर बरेच लोक अशा गमजा मारीत असतात. महात्मा येतात नी जातात. लोकांच्या जीवनात मात्र काहीही परिवर्तन होत नाही. धूळ तेव्हढी हलते. गांधीजी मी या देशात उपरा आहे. मला मातृभुमी नाही."
त्यावर गांधीजी हादरले.
बाबासाहेब स्वत: दलित समाजातले आहेत हे त्यांना तेव्हा कळलं.
रात्री ते आपले सचिव महादेवभाई देसाई यांना तसं म्हणालेही.
महादेवभाईंच्या डायरीत हे सारं त्यांनी लिहून ठेवलंय.
त्यानंतर मात्र गांधीजींच्या मनातली अढी गेली.
1932 साली त्या दोघांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला.
1942 साली बाबासाहेबांनी "गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले?" हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी या दोघांवर टिकेचे आसूड ओढले.
मात्र गांधीजींनी हा राग मनात ठेवला नाही.
पुण्यातल्या बॅ. बाबासाहेब जयकरांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा घटना परिषदेत आणले.
देशाचे कायदा मंत्री केले.
घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी या संधीचं सोनं केलं. भारताला एक महान संविधान दिले.
आज ते दोघे हयात असते तर जो कडवटपणा या दोघांच्या अनुयायांमध्ये दिसतो तो दिसला नसता असं मला प्रामाणिकपणानं वाटतं.
त्यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. पण मतभेद म्हणजे वैर नव्हे. गांधी- आंबेडकर एकमेकांचे विरोधक होते पण दोघेही आत्मपरीक्षण करणारे होते. त्यामुळे ते मोठे होत गेले. असामान्य नेते बनले.
"ज्यांच्यासाठी करिशी यात्रा,
तेच परतले भिऊन तमाला,
नकोस परतू तुही परंतु,
चाल एकला तू चाल"

गांधी म्हटलं की अर्धवट माहितीच्या आधारावर काही लोक पिसाळून उठतात.
आपण हे ठरवलं पाहिजे की आपल्याला जवळचा कोण?
घटनाविरोधी नथूराम की घटना लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवणारे गांधीजी?
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment