Sunday, February 18, 2018

महात्मा फुले आणि शिवराय -
महात्मा फुले यांनी रायगडवरची शिवसमाधी शोधली, पुण्यात शिवजयंती केली, हे खोटेच आहे असा निकाल सुणावणारी एक पोस्ट सध्या प्रा. राकेश पाटील यांच्या नावाने काही मंडळी फेबुवर फिरवित आहेत. त्यात म्हटले आहे की "मी हरी नरकेंनाही विचारलं, परंतू ते उत्तर द्यायचं टाळत आहेत."
याबाबत मला पाटलांनी भेटून माझ्याशी चर्चा केलेली नाही वा मला पत्र लिहून विचारणाही केलेली नाही. त्यामुळे मी टाळाटाळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते खोटे बोलत आहेत.

प्रा. पाटील असेही म्हणतात, "एकाही पुस्तकात, पत्रात, शासकीय दस्तऐवजात, गॅझेटियरमध्ये, आत्मचरित्रात, रोजनिशीत अथवा सत्यशोधक समाजाच्या कोणत्याही कागदपत्रात म. फुले यांनी प्रत्यक्ष रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे कुठेही लिखित स्वरूपात मुळी आढळलेच नाही."
खरंतर याबद्दलचे अनेक लेखी, अस्सल पुरावे उपलब्ध आहेत.
1. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, 1927,
2. संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ,कोल्हापूर,1933,
3. संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,
4. संपा. प्रा.हरी नरके-प्रा.य.दि.फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,
या ग्रंथांमध्ये महात्मा फुले यांनी रायगडवरची शिवसमाधी शोधली, पुण्यात शिवजयंती केली, याबाबतचे अनेक अस्सल पुरावे दिलेले आहेत.
ते जिज्ञासूंनी वाचावेत.

भारतात 1806 मध्ये ग्रंथछपाई सुरू झाल्यानंतर मराठी भाषेतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र 1869 ला लिहिणारे आणि ते स्वखर्चाने छापून प्रकाशित करणारे लेखक कोण? तर महात्मा जोतीराव फुले.
पण ही माहिती हे प्रा. पाटील दडवतात.

लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर यांना कोल्हापूरचे शिवाजी महाराज आणि दिवाण रा.ब.बर्वे प्रकरणी लेखन केल्याबद्दल जेव्हा तुरूंगवास भोगावा लागला तेव्हा त्यांना त्याकाळात रूपये दहा हजार [ म्हणजे आजचे रूपये सुमारे दहा कोटी ] चा जामीन देण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष रामशेट बापूशेट उरवणे यांना पाठवले असे दि. 3 आक्टोबर 1882 च्या केसरीत कोणी लिहिले आहे?
तर खुद्द लोकमान्य टिळक यांनी.
पण हेही सत्य हे प्रा. पाटील दडवतात.

पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिलेले फुलेचरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
आजवर प्रा. गं.बा.सरदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, धनंजय कीर, प्रा.स.गं.मालशे, प्रा. य.दि. फडके यांच्यासह सर्व अभ्यासक ते प्रमाण मानतात.
माधवराव बागल यांचे वडील हंटरचे संपादक, सत्यशोधक खंडेराव बागल हे महात्मा फुले यांचे घनिष्ट मित्र होते.
भास्करराव जाधव यांनी महात्मा फुल्यांशी अनेकदा गप्पा मारलेल्या होत्या.
इतिहासकार कृ.अ.केळुस्कर हे फुल्यांचे सहकारी होते.
या सर्वांशी माधवराव बागलांचे घनिष्ठ संबंध होते.
वि.द.घाटे, महर्षि वि.रा.शिंदे आदींनी बागलांच्या लेखनाला मान्यता दिलेली आहे.
महात्मा फुले यांचे पहिले बृहद चरित्र 1927 साली लिहिणारे सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील,
सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ 1933 साली काढणारे सत्यशोधक माधवराव बागल यांनी याबाबत दिलेली सर्व माहिती प्रा. राकेश पाटील
मोडीत काढतात.
महात्मा फुले यांच्या आप्त, स्वकीय, सहकारी, कार्यकर्ते, समकालीन यांनी लिहिलेल्या "आम्ही पाहिलेले फुले " या इतिहास ग्रंथातील आठवणी हा महात्मा फुले विषयक इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. पण हे पुस्तक तर या पाटलांना माहितही नाही.

म्हणे महात्मा फुले समग्र वांड्मयात महात्मा फुले यांनी याबाबत का लिहीले नाही?
"महात्मा फुले समग्र वांड्मय" हे जोतीरावांचे आत्मचरित्र नाही. त्यात हा उल्लेख कसा येईल?
मात्र त्यात असलेला महात्मा फुले लिखित शिवछत्रपतींचा पोवाडा पाटलांच्या नजरेला दिसत नाही.
शेकडो समकालीन सत्यशोधकांच्या अस्सल आठवणी पाटील बघतही नाही, का तर त्या त्यांना गैरसोयीच्या आहेत.
उद्या तुम्ही असेही म्हणाल की महात्मा फुले यांच्या या कामांचा खुद्द शिवराय लिखित पुरावा कुठेय?

प्रा. पाटील म्हणतात "मी तीनचार महिन्यांपासून शोधतोय. तरी पुरावे सापडले नाहीत."

अहो, पाटील, महात्मा फुले विषयक अस्सल साधने वाचायची/शोधायची बात सोडा, नुसती चाळायलासुद्धा दोनतीन वर्षे अपुरी पडतात.
मी गेली 40 वर्षे याबाबत वाचन करतोय.
माझे याबाबतचे पहिले पुस्तक प्रकाशित होऊनही आता 30 वर्षे झाली.
माझे आजवर चाळीसेक ग्रंथ प्रकाशित झाले, तरी अद्याप माझे शोधकार्य चालूच आहे. सतत काम करूनही हे काम संपत नाही. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असते.
तुम्ही तीनचार महिन्यातच सगळा फडश्या पाडलात सुद्धा? भले शाब्बास. सुपरमॅनच दिसताय तुम्ही.
फुल्यांबाबत असा पुरावाच नसल्याचा अंतिम निष्कर्ष मात्र तुम्हाला झटपट काढता आला.
की तुमचा निष्कर्ष आधीच तयार होता, तुम्ही शोधाचा फक्त आव आणला?

ज्यांना अस्सल ऎतिहासिक पुरावे मान्यच करायचे नसतात, ज्यांना बनावट आणि खोटाच इतिहास प्रचलित करायचा असतो अशा कोणीतरी हितसंबंधियाने प्रा.पाटील हे नाव घेऊन हा मजकूर लिहिलेला असावा किंवा हे बाहुले उभे केलेले असावे असा माझा कयास आहे.
निदान माझ्या तरी पाहण्यात या नावाचा कोणीही इतिहास अभ्यासक नाही.
इतर अनेक अभ्यसकांनी पुढे आणलेले अस्सल ऎतिहासिक पुरावेही न पाहताच नाकारायचे, या हिनकस मानसिकतेमुळेच समाजात ज्ञानाचे व इतिहासाचे राजकारण माजले आहे.
सदैव काल्पनिक शिखंडी उभे करून त्यांच्या काठीने परस्पर वार करण्यात जे कसबी लोक वाकबगार आहेत अशांना आपण भाव देण्याचे कारण नाही.

माझ्या मित्रयादीत मुंबईचे Rakesh Patil राकेश पाटील आहेत. पण ते प्राध्यापक नाहीत तर इंजिनियर आहेत.
त्यांच्याकडे मी चौकशी केली. त्यांनी सदर पोस्ट लिहिलेली नाही.
या मजकुरात माझा दोनदा उल्लेख असूनही या प्रा. पाटलांनी ही पोस्ट मला टॅग केलेली नाही किंवा मला पाठवलेलीही नाही.
माझ्याशी प्रत्यक्ष भेटून वा पत्राद्वारे संपर्क न करता माझे नाव गोऊन फेबु प्रचार सुरू करणे हे संशोधनाच्या रितीला धरून नाही. माझ्यावर आरोप करायचा पण मला मात्र अंधारात ठेवायचे हे नैतिकतेत कसे बसते?
या असत्यकथन व सत्यापलाप करणार्‍या प्रसिद्धीलोलुप वृत्तीचा मी निषेध करतो.
फेबुवरच्या मी तपासलेल्या कोणाही प्रा. राकेश पाटलांनी अशी पोस्ट त्यांच्या भिंतीवर टाकलेली मला आढळली नाही.

ही पोस्ट आनंदाच्या उकळ्या फुटून पुन्हा पुन्हा फेबुवर फिरवणारे बोरूबहाद्दर प्रा.राकेश पाटील यांचे नावही धड नीट लिहित नाहीत. त्यातही चुका असतात. " प्रा.राकेश पाटीललधा" असे त्यात लिहिलेले असते.
तेव्हा संशोधनाची शिस्त आणि नैतिकता न पाळता केलेले हे लेखन फारशे गंभीरपणे घेण्याच्या पात्रतेचे नाही.
अफवांचे मळे पिकवणारे आणि द्वेषाच्या जळाऊ लाकडांच्या वखारी चालवणारे हे वैचारिक स्कूल कोणाचे असावे ते सुज्ञांना सांगणे न लगे.
- प्रा.हरी नरके