Monday, April 2, 2018

डॉक्टर उच्च कुळातला आणि देखणाच असावा- डॉ.आनंदीबाई जोशी




एखादी व्यक्ती कितीही बुद्धीमान आणि कर्तबगार असली तरी ती ज्या काळात जन्मते, वाढते त्या काळाचा प्रभाव तिच्यावर असतो. त्या काळातील विचारधारा आणि समजुती यांचा पगडा असतो. त्या संस्कार आणि दबावातून मुक्त होणं ही सोपी गोष्ट नसते.
फक्त मोजक्या समाजक्रांतिकारकांनाच काळाच्या पुढचं दिसत असतं.

डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी लहान वयात अमेरिकेला जाऊन तिथल्या पेनसिल्व्हानिया महिला वैद्यकीय महाविद्यालयाची 2 वर्षीय पदविका [ डिप्लोमा ]
मिळवणं ही ऎतिहासिक गोष्ट होती.

त्यांच्या आद्य चरित्रकार कॅरोलिना डाल यांनी 1888 साली म्हणजे आनंदीबाईंच्या मृत्यूला 1 वर्ष व्हायच्या आत आनंदीबाईंचे चरित्र इंग्रजीत लिहून प्रसिद्ध केले होते.
[The Life of Dr. Anandibai Joshi, Carolina Dall, 1888] त्यात त्यांनी Diploma असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

त्यासाठी डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी लिहिलेला शोधनिबंध वाचताना आनंदीबाईंच्या विचारांचा परिचय होतो.
त्या भारताबद्दल अतिशय कडवट बनल्या होत्या.
अमेरिकेला जाण्यापुर्वी त्यांनी कलकत्त्याजवळील श्रीरामपूरला एक भाषण केले होते.
त्यात त्यांनी भारताइतका रानटी देश जगात दुसरा नाही, अशी जाहीर टिका केलेली होती.

त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता, " Obstetrics among the Aryan Hindus "
त्या ब्राह्मण स्त्रियांबद्दल लिहितात. ब्राह्मणांच्यात काय शिकवलं व आचरलं जातं यावर त्या प्रकाश टाकतात.
इतर भारतीय स्त्रियांच्या आरोग्याबद्दल मात्र त्या अवाक्षरही लिहित नाहीत. त्यांनी आपल्या विषयाला नाव हिंदू दिलं असलं तर तरी त्यांनी स्वत:ला एकाच जातीपुरतं मर्यादित केलेलं होतं.
हा शोधनिबंध अतिशय ढोबळ व त्रोटक आहे. वर्णनपर आणि परिचयात्मक आहे.
यात विश्लेषक व चिकित्सक वृत्तीचा संपुर्ण अभाव असल्याचं व आनंदीबाईंची मतं एकांगी असल्याचा अभिप्राय त्यांचे चरित्रकार व्यक्त करतात. त्यांनी खरं तर "Obstetrics among the Brahmins" असं शीर्षक दिलं असतं तर शोभून दिसलं असतं असं त्यांच्या चरित्रकार अंजली किर्तने म्हणतात. [पृ.323]

"डॉक्टर हा दिसायला सुंदर असावा. तो उच्च कुळातलाच असायला हवा.
मनुने घालून दिलेली नियमावली, त्यांची शास्त्रवचने बरोबरच आहेत.ती मोडणं हे पाप आहे.
बालविवाहाची प्रथा योग्यच आहे.
गरोदर स्त्रियांनी वारंवार प्रार्थना कराव्यात, गर्भपाताची शक्यता दिसत असेल तर वैद्यकीय उपचार घेण्याऎवजी प्रार्थना कराव्यात असं त्या पुन्हापुन्हा सांगतात. बाळंतिन अडली आणि शस्त्रक्रियेची वेळ आली तर काय करावं याचं उत्तर देताना त्या लिहितात, मानवी प्रयत्न आणि प्रार्थना कराव्यात.
आई जर तापट, भावनाप्रधान आणि स्वार्थी असेल तर मुलंही तशीच जन्मतात. त्या केवळ शारिरिक अनुवांशिकतेबद्दल बोलत नाहीत. माणसाचा स्वभाव अनुवांशिक असतो असं त्या सांगतात.
मुलाला स्तन्य देताना मुलाची आई ज्या जातीची असेल त्याच जातीची दाई असायला हवी."

ही  मतं त्यांच्या शोधनिबंधातली आहेत.
स्वत: आनंदीबाई दिसायला सुंदर नव्हत्या, सामान्य होत्या असं त्यांच्या तिन्ही महिला चरित्रकारांनी नोंदवलेलं आहे.
तरी डॉक्टर हा दिसायला सुंदरच असावा असं मत आनंदीबाईंनी नोंदवावं याची गंमत वाटते.
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment