Sunday, June 10, 2018

नाटक! आणि घरात!!- प्रमिती नरके, म.टा.संवाद



पुण्यातील काही तरुण रंगकर्मींनी नुकताच पुण्यात 'रीड मी इन 5D झोन' या नाटकाचा एक अफलातून प्रयोग केला. बंगल्यात मोजक्याच प्रेक्षकांसमोर व्हारांडा, परसदार, गच्ची, घरातली एखादी खोली यांनाच स्टेज करून, वेगवेगळ्या पातळ्यांवर सादर झालेल्या या नाविण्यपूर्ण प्रयोगाविषयी...
......................
'…शेवटी नाटक जिवंत राहिलं पाहिजे', असं अनेक रंगकर्मींना म्हणताना आपण ऐकलं असेल. परंतु एखादी कला, एखादं माध्यम किंवा एखादी जीवनशैली टिकून राहण्यासाठी बदलत्या काळाच्या गरजांनुसार रूढ अर्थाने प्रचलित असणाऱ्या त्याच्या अस्तित्वामध्ये सातत्याने काही बदल घडवणं, आणखी पैलू पडताळून पाहणं आणि शक्यता शोधणं आवश्यक आहे, असं आम्हाला - थिएटर फ्लेमिंगो आणि बडे मुछवाले - मंडळींना वाटतं. आजपर्यंत नाटक करत असताना विषय, मांडणी, फॉर्म, अभिनय शैली या सगळ्याचा वरील संदर्भात विचार करत असतानाच 'How about performing space?' असा एक विचार मनात आला... आणि विनायक कोळवणकर या आमच्या कन्सेप्ट डिझायनर आणि एडिटरने लगेच कामाला सुरुवात केली. आमचा मित्र आणि 'बडे मुछवाले' संस्थेचा संस्थापक अभिनव काफरे याच्या घरी, सिंहगड रोड, पुणे इथे एका दुमजली रो-हाऊसमध्ये, या घराचाच रंगमंच म्हणून वापर करता येईल का असा विचार सुरू झाला.

मग सिंहगड रोडवरची ती सन सिटी सोसायटी, तिथे राहणाऱ्या लोकांचं सोशिओ-इकोनॉमिकल स्टेटस, राहणीमान, जाणिवा काय असतील इथून प्रवास सुरू झाला. या सगळ्याचा अभ्यास करून विनायकने वीस-पंचवीस लहान लहान गोष्टी डेव्हलप केल्या. त्यातल्या निवडक चार गोष्टींमधून मग नाटकाचं कथानक उभं राहिलं. संवाद लिखाणाचं काम अक्षय संतने केलं. त्यानंतर अॅक्टर्स 'इन' झाले.

अॅक्टर म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे सगळं फारच मजेशीर आणि सोपं वाटलं. ना खोटं वय प्ले करायचं होतं, ना कुठला 'कॅरेक्टर रिसर्च' नावाचा घाट घालायचा होता. वाचनाला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की जितकं जास्त नैसर्गिक पद्धतीने बोलता येईल, तसंच आणि तेवढंच बोलायचं-वागायचं. माझ्या पात्राचं नाव जसप्रीत होतं. ही दिल्लीची पंजाबी मुलगी शिक्षणासाठी गेली काही वर्षं पुण्यात स्थायिक असलेली. हिंदी ही माझी जिव्हाळ्याची भाषा असल्यामुळे तोडकं-मोडकं मराठी बोलणारं हे पात्र साकारताना मला फारच जास्त मज्जा आली. पहिला सीन घडतो हॉलमध्ये. त्या घराच्या हॉलची आम्ही अॅक्टर्सनी स्वत:च आमच्या 'बॅचलर्स फ्लॅट'ची लिव्हिंग रूम बनवली. अभिनव नाटकाचं नेपथ्य सांभाळत होता. त्याने आम्हाला हवी तशी त्याच्या घरातल्या फर्निचरची फेरफार - अॅडीशन - सबस्ट्रॅक्शन करू दिली. भिंतीवर ती टिपिकल फेअरी लाइटसची माळ आणि रेड बोर्डवर जसप्रीत आणि नंदिनीच्या आप्तेष्टांचे फोटोग्राफ्स आले. सगळ्यात भन्नाट पार्ट होता या नाटकाचं मंचन आणि आवाज. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी डोक्यात होती की आपण आपल्या घरात ज्या आवाजात बोलतो, जसे वावरतो तसंच सगळं करायचं होतं. वरकरणी पाहता जरी हे सोपं वाटत असलं, तरी आजवर शिकलेल्या, केलेल्या नाटकाच्या सगळ्या नियमांची पाटी स्वच्छ कोरी करून नवीन धडे गिरवायचे होते. 'माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल का, माझी पाठ दिसतेय का, माझा अभिनय पोहोचतोय का' हे मुद्देच गायब झाले होते. नवीन चॅलेंज असं होतं की, 'मी फूटभर अंतरावरून 'प्रमिती' न वाटता खरी 'जसप्रीत' वाटतेय का, हे माझं घर वाटतंय का?' अॅक्टरसाठी अवघड गोष्ट असते की अभिनयाच्या मोहाला आवर घालणं आणि तेच आम्हाला एक हजार टक्के करायचं होतं. एक मिनीटसं एक्स्प्रेशन जरी कमी-जास्त झालं तरी ते दिसणार होतं सहज. सो आता 'टू अॅक्ट' विसरून 'टू बी'चा प्रवास सुरू झाला. या फक्त असण्याच्या प्रक्रियेमध्ये साहजिकच संवादांची लीलया मोडतोड झाली. दिग्दर्शकाने तशी पूर्ण मुभा देऊनच ठेवलेली होती. घरातला वावरही प्रत्येक तालमीत वेगळा होऊ लागला आणि डेलीबरेटली तो शेवटपर्यंत कधीच 'ब्लॉक' नाही झाला.

अशाच प्रकारे पुढचे किचनमध्ये, बॅकयार्डमध्ये, जिन्याने वर जाऊन बेडरूममध्ये आणि शेवटी गच्चीवर असे सगळे प्रसंग उभे राहिले.

आणखी एक गंमत अशी की हे सगळं रीयल टाइममध्ये घडत होतं. त्यामुळे पहिल्या सीनमधल्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ तिसऱ्या सीनमध्ये किंवा चौथ्या सीनचा धागा घेऊन शेवटचा सीन घडायचा असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालं. त्यात जेव्हा प्रेक्षक 'इन' झाले तेव्हा तर आणखीनच मजा. बऱ्याचदा असं होई की एक-दोन प्रेक्षक तिसऱ्याच सीनमध्ये रमलेत आणि पुढे रीयल टाइमनुसार चौथा सीन सुरू झालाय. ही सगळी गंमत बाहेरून बघताना विनायक, अभिनव आणि मधुराची पण धांदल उडत असणार. मधुरा संपूर्ण नाटकाचं व्यवस्थापन पाहत होती.

तालमींपासून ते प्रयोगांदरम्यान अजूनही काही गोष्टी बदलत होत्या. त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्यासमोर लावलेलं एक भलं मोठ्ठं पेंटिंग. सहा बाय नऊच्या पिवळ्या रंगवलेल्या कॅनव्हासवर काही चित्रं, काही गोष्टी रंगवलेल्या, अडकवलेल्या आणि चिकटवलेल्या होत्या. त्यात एक चप्पल, एक अंडं, तीन-चार पक्ष्यांच्या नक्षी असलेल्या फ्रुट-फोर्कच्या रंगीत काड्या, तारेनं बनवलेलं घरटं, चावी, कात्री, कबुतराचं पीस, पेनाचं टोपण, आणखी काही अशाच गोष्टी होत्या. रोज गेल्यावर त्यात काहीतरी बदल झालेला असायचा. रसास्वादाच्या दृष्टीने त्यातून प्रत्येकजण आपला आपला अर्थ घेऊन जात असणार. एक दिवस तर चक्क त्या जागी एक राजा-राणी शृंगार करत बसलेत असं पेंटिंग होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अनामिका आणि सचिन - ज्यांचा तिथे सीन घडायचा - त्यांना खूप भरभरून चिडवलं. पण गमतीचा भाग वगळता, खरंच या प्रोसेस दरम्यान दिग्दर्शकाने अशा काही गोष्टी पेरल्या होत्या की ज्यामुळे त्या दिवशीच्या प्रयोगाला एक वेगळीच दिशा प्राप्त होई. एका प्रयोगात तर सीनमध्ये भांडण सुरू असताना खुद्द विनायक दारुड्याचा अवतार करून आमच्यात आला. याची काहीच पूर्वकल्पना नसणारे आम्ही गोंधळून, गलका करून त्या तमाशा करणाऱ्या पात्राला हाकलून लावलं. हे सगळं इतक्या वेगात आणि अविश्वसनीय पद्धतीने घडलं की प्रेक्षकांना तो तालीम केलेला नाटकाचाच भाग असल्यासारखं वाटलं. एका प्रयोगात अचानक दिवे गेले आणि आम्ही मोबाइलचे टॉर्च ऑन करून सीन केला. पाच मिनिटांत लाइटस आले तेव्हा पुन्हा बंद केला आणि सीन सुरू राहिला अगदी तसाच, जसं आपल्या घरात दिवे गेल्यावर जगणं सुरू राहतं तसं. प्रेक्षकांना तोही प्लॅन्ड एलिमेंट वाटला. एका प्रसंगात अचानक वरून पाणी पडतं आणि अनेकदा त्याचे शिंतोडे प्रेक्षकांच्या अंगावर उडत. याचीही सगळ्यांना गंमत वाटे. मुळात आमचा, इथे खरंच हे प्रसंग घडत आहेत असं भासवण्याचा हेतू साध्य होई.

प्रेक्षकांना बसायला आम्ही कुठलीच वेगळी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे अनेकदा आमच्या मागे, पुढे, शेजारी कुठेही प्रेक्षक बसलेले किंवा उभे असत. त्यानुसार ठरलेल्या (पण कधीच पक्क्या न ठरलेल्या) गोष्टी बदलत जात. याला आम्ही 'Read me in 5D zone' असं नाव देण्यामागची कल्पना हीच होती की आपण सिनेमागृहात 3D, 4D सिनेमे पाहतो. पण त्याहीपुढे जाऊन प्रेक्षकांना जेव्हा गंध, स्पर्श आणि स्वत: मूव्ह होत प्रसंग अनुभवण्याचा डायमेंशन मिळतो, तेव्हा ते आम्हाला कसं वाचतील...…

नाटकाचा सूत्रधार - अक्षय - प्रेक्षकांना बाजूच्या चौकातल्या एका हॉटेलमध्ये भेटायचा. तिथे तुम्ही आता कशा प्रकारे गोष्टी अनुभवणार आहात याबद्दल त्यांना एक हलकीशी कल्पना दिली जायची आणि मग त्यांना घेऊन तो घरात म्हणजेच आमच्या 'रंगमंचीय अवकाशात' प्रवेश करे. इथून पुढचा खेळ प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या जागी उभं राहून, बसून, झोपून पाहण्याची गंमत अनुभवता येई. बऱ्याचदा प्रेक्षकांना आपण चोरून बाजूच्या घरात डोकावून पाहतोय की काय असा थ्रिलिंग फील येई, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही एक प्रकारे या फॉर्मला मिळालेली पावतीच होती.

या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आम्ही प्रयोगासाठी बोलावलं होतं. सर्वांनी या नावीन्यपूर्ण प्रयोगाचं स्वागत आणि कौतुक केलं. चांगले-वाईट मुद्दे सांगितले. निसटलेले क्षण मिळवून दिले, त्यानुसार आम्ही प्रयोग-दरप्रयोग बदल करत गेलो. त्यामध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मोहीत टाकळकर, उमेश कुलकर्णी असे अनेक मान्यवर होते. एक 'गोड रंगाचे' नाट्य-सिने दिग्दर्शक असं म्हणाले की- 'आमच्या काळात आम्ही नाटक करायचो, तेव्हा अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत आमची देहबोली आणि आवाज पोहोचतोय की नाही हे बघायचो. तुम्ही आताची पोरं असं खुसुरपुसुर नाटक करताय, पण करा. तुम्हाला काय कोणी स्पर्धक नाही. तुम्ही करत राहा.' मुळात आजच्या प्रेक्षकालाच त्या तथाकथित 'शेवटच्या' रांगेत बसून नाटक बघायचंय का, हा आमचा मुद्दा आहे. रूढ पद्धतीने नाटक करण्यावर आमचं मुळातच प्रेम आहे. हा सगळा घाट जो घातला गेला तो 'अॅमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्स'च्या प्ले-पॉझ-प्ले खेळणाऱ्या, नवीन जाणिवा, नवीन हुशारीने जगणाऱ्या प्रेक्षकाची नाटकाकडे ओढ निर्माण व्हावी, किंवा टिकून राहावी (जिवंत रहावी) यासाठी! त्यासाठी यातील विषयही तसेच आजच्या जाणिवेचे, बदलत्या पिढीच्या रोजच्या जगण्यातलेच तरीही दुर्लक्षिले जाणारे असे निवडले आणि आमची अशीच इच्छा आहे की हा एवढा प्रचंड रिस्पॉन्स बघता, लवकरात लवकर असे अजून अनेक प्रयोग व्हावेत आणि आम्हाला यातही स्पर्धा निर्माण होऊन आणखी नवीन काहीतरी शोधण्याचं बळ मिळावं! - प्रमिती नरके
Jun 10, 2018, 10:34AM IST Maharashtra Times
म.टा.संवाद, रविवार, दि. 10 जून 2018, पृ. 3
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/drama-and-the-house/articleshow/64515067.cms

No comments:

Post a Comment