Sunday, July 22, 2018

जोतीबाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास-



निमित्त वारी-
जोतीबाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास - प्रा.हरी नरके

"एकदा आळंदीचे वारीस आम्ही काही मंडळी जात होतो. महात्मा जोतीराव फुले यांच्या व्याख्यानासाठी मारूतराव नवले, भाऊ पाटील डुंबरे, बिरमल व मी असे चौघेजण आम्ही महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत चाललो होतो. थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढे आम्ही बोलत बोलत चाललो होतो. इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीहून परत येत होता.

म्हातारा पुण्याकडे चालला होता. दुपारची वेळ होती. अतिशय भूक व तहान लागल्यामुळे तो धापा टाकीत चालला होता. कसे तरी दिघीस जावे असा त्याचा विचार होता. पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्या जवळ गेलो. आमच्या सोबतचे दुसरे वारकरी हसून त्याला म्हणाले, "वारकरीबुवा, तुम्ही आता म्हातारे झालात, आता वारी कशाला करता? जा वैकुंठाला."

तो गृहस्थ त्या म्हातार्‍याची चेष्टा करीत होता. म्हातारा तर बेशुद्ध पडलेला होता. तो बिचारा काय बोलणार?

महात्माजीस त्याची दया आली. त्यांनी त्याला मांडीवर घेतले. आम्हाला पाणी आणायला पिटाळले. नवले व मी पळत गेलो. दूर एक विहीर दिसली.
तेथे गेलो. विहीरीवर व आमच्याजवळही पाणी काढायला भांडे नव्हते. नवल्यांच्या पागोटीला माझे उपरणे बांधून ते विहीरीत सोडले. व ते पाण्यात भिजवून पळत घेऊन गेलो. ते पिळून थोडे पाणी म्हातार्‍याच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाजले.

थोड्या वेळाने म्हातारा शुद्धीवर आला. महात्माजींनी त्याला शिदोरीतून थोडी भाकरी काढून दिली. म्हातारा गहिवरला.

महात्माजीस म्हणाला, "बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास."

म्हातारा महात्माजींच्या पाया पडू लागला. 

महात्माजी म्हणाले, "वारकरी बाबा, मी जी तुमची अल्प सेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून, उद्या मलाही तुमच्यासारखे म्हातारे व्हायचे आहे, तेव्हा ती मी माझ्याचसाठी केली आहे."

बरोबरचे गृहस्थ व इतर जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करीत निघून गेले. आम्ही महातार्‍याला रस्त्याने लावून दिले आणि आपल्या उद्योगाला पुढे निघून गेलो."
- तात्यासाहेब धोंडीबा रोडे, [लेखक महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी व सहकारी होते.]
संदर्भ- आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993, पृ. 74, 75
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment