Tuesday, August 14, 2018

सर्वाधिक प्रेम आणि सर्वाधिक द्वेषाचे धनी-



डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधींच्या काळजात कोरले गेलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याइतके प्रेम फार कमी लोकांना लाभले असेल. त्यांच्या शब्दाखातर आपला जीवही द्यायला लक्षावधी लोक तयार आहेत. पण दुसरीकडे त्यांचा अपार द्वेष करणार्‍याही झुंडी या देशात प्रशिक्षित केल्या गेलेल्या आहेत हे लक्षात घ्या. सर्वाधिक प्रेम आणि सर्वाधिक द्वेष अशा दुहेरी कातरीत सापडलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विभुतीपूजा अमान्य होती. कोणाचेही विचार तपासल्याशिवाय घेऊ नका असे ते नेहमी बजावत असत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "...." असे कॅंपेन सोशल मिडीयावरून चालवणारे कोणी टोळीवाले काहीबाही सांगत असतील, तर त्याची खालीलप्रमाणे तपासणी करून घेतली पाहिजे.

1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्या संदर्भात म्हणाले होते?
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधी म्हणाले होते?

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोठे म्हणाले होते?
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते विधान कोठे छापले गेलेय? छापणार्‍याची विश्वासार्हता काय? त्याचा हेतू काय?

5. त्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्यत्र कायकाय म्हणालेले आहेत?

6. त्यांनी 100 वेळा एखाद्या गोष्टीचा गौरव केला असेल आणि एखाद्या प्रसंगी रागापोटी, अतिव प्रेमपोटी ते चिडून काही म्हणाले असतील ते एक तात्कालीक विधान सुटे करून घ्यायचे की त्या 101 विधानांचा एकत्रित विचार करायचा?

7. समजा आपण आपल्या जवळच्या मित्राचे शंभर वेळा कौतुक केले नी एखाद्या प्रसंगी क्षणिक रागानं "गेलास खड्यात" असं म्हटलं तर तो मित्र खरंच खड्ड्यात जावा असं आपल्याला अभिप्रेत असतं का?

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 24*365 सदैव द्वेष करणारे, त्यांचा कायम तिरस्कार करणारे टोळीवाले जेव्हा बाबासाहेबांबद्दल पुळका आल्यासारखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  "म्हणाले होते," असे सांगतात तेव्हा त्यांचा हेतूच मुलत: विकृत असतो.

बाबासाहेबांच्या नावाचा अशाप्रकारे वापर करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे.

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देव करू नका. ते महापुरूष होते. द्रष्टे होते. तेही हाडामासाचे एक माणूसच होते. त्यांची विधाने सुटी करून, संदर्भ सोडून तुमच्या तोंडावर फेकली जाणार असतील तर आंधळेपणाने ती स्विकारू नका. ती तपासा. सांगणाराचा हेतू पाहा.

सदर विधान त्यांच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य हिस्सा आहे का? ते वाक्य त्यांच्या विचारसरणीचा, वैचारिक निष्ठांचा अपरिहार्य गाभा आहे की ते केवळ तात्कालीक अपवादभूत विधान  आहे हेही तपासा. त्या विधानाची वैचारिक छावणी तपासा. चिकित्सेचे काम कठोरपणे करा. काटेकोर छाननी केल्याशिवाय बाबासाहेबांचे कोणतेही विधान घेऊ नका. आंबेडकरवादात न  बसणारे विधान फेटाळून लावा.

10. जर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक वाक्य सुट्या सुट्या पद्धतीने घ्यायला लागलो, ते वेदवाक्य आहे असे समजून बाबा वाक्य प्रमाणं मानायला लागलो तर त्यांच्याच नावाचा गैरवापर करून आपल्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला जाईल. विवेकाच्या कसोटीवर कोणताही आणि कोणाचाही विचार तपासून घेणं हेच खरं स्वातंत्र्य!
-प्रा.हरी नरके
[ लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, त्यांच्या साहित्याच्या खंडांचे संपादक आहेत.]

No comments:

Post a Comment