Thursday, August 23, 2018

भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी पहिली गायिका गौहर जान-


ज्याकाळात सरकारी नोकरांचा महिन्याचा पगार 5 रूपये होता तेव्हा तिला एका संस्थानिकाने गाण्याच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असताना दिलेली बिदागी होती एक लाख रूपये.
स्वत: महात्मा गांधी तिला भेटले आणि त्यांनी तिला स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी जमवण्यासाठी तिचा कार्यक्रम मागितला, तिने एका अटीवर हा कार्यक्रम दिला, स्वत: गांधीजींनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे.
तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी लोटली. तब्बल 24 हजारांचा निधी जमा झाला. अचानक उद्भवलेल्या एका तातडीच्या कामामुळे गांधीजी या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. ती चिडली, तिनं निम्मेच पैसे गांधीजींच्या दूताकडे दिले.

एका राजाने तिला कार्यक्रमाला बोलावले, तिने एकटीसाठी आख्खी रेल्वेगाडी बूक करायला लावली. तिला एकटीला घेऊन अकरा डब्यांची ही स्वतंत्र रेल्वेगाडी कार्यक्रमाला गेली. तिचा ताफा 120 लोकांचा असायचा.

तिनं आपल्या लाडक्या मांजराच्या बारशाला 22 हजार रूपयांची पार्टी दिली होती. तिला उंची राहणीमानाची आवड होती. तिचा हात सढळ होता. तिने लाखो रूपये कमावले आणि उधळलेही. शेवटी तिला दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते.

गवर्नर जनरलची घोडागाडी कलकत्याच्या रस्त्यावरून जाताना इतरांना त्या रस्त्यावरून घोडागाडी न्यायला बंदी होती. फक्त उच्च ब्रिटीश अधिकारी आणि संस्थानिक यांनाच या शहरात घोडागाडीतून फिरण्याची परवानगी होती. ती मुद्दाम घोडागाडीतून फिरायची. त्यासाठी तिला एका वेळी एक हजार रूपये दंड केला जायचा. ती दररोज हा दंड भरायची.

तिच्या अंगावर हजारो रूपयांचे हिर्‍याचे दागिने असायचे. तिचे राहणीमान अतिशय भपकेबाज होते. ती अतिशय चोखंदळ होती. ती आत्मप्रतिष्ठा जपणारी होती.

भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी प्रथम गायिका हा सन्मान गौहर जानला लाभला. ती भारताची पहिली गानकोकीळा ठरली. तिच्या गाण्यांच्या 600 ध्वनीमुद्रीका निघाल्या. प्रत्येक ध्वनीमुद्रीकेच्या शेवटी ती ठसक्यात म्हणायची, "गौहर जान म्हणतात मला!" बालगंधर्वांसह अनेकांनी तिच्या चाली उचलल्या. तिचे सहीसही अनुकरण करणारे शेकडो कलावंत होते. तिच्या एका कृपादृष्ठीसाठी राजे, महाराजे, संस्थानिक, सावकार, व्यापारी आणि ब्रिटीश अधिकारी जिव टाकत होते.

ती भारतातली सर्वाधिक लोकप्रिय गायिका होती. तिच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करीत असत. तिला जगभरच्या दहा भाषा येत होत्या. ती त्यातली तज्ज्ञ मानली जात असे. ती त्या सर्व भाषांमधली गाणी गात असे. तिचा व्यासंग अफाट होता. ती पहिली भारतीय मॉडेल होय. तिची छायाचित्रे आर्मेनियातल्या आगपेटीच्या वेष्ठनावर झळकली होती.

तिची आई रुक्मिणी ही तवायफ होती. ती ख्यातनाम कवयित्री होती. तिचा मलिका जान या नावाने एक कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. ती आयकर भरणारी श्रीमंत भारतीय नागरिक होती. आधी तिने अनेकदा गरिबीचे चटकेही सोसले होते. ती उत्तम गायिका आणि नर्तिकाही होती. तिने अनेक विवाह केले. ती प्रतिष्ठीत तवायफ होती.

तिची मुलगी गौहरजान जन्माने ज्यू होती असा समज आहे. तिचे जन्म नाव एलिन होते. तिचा जन्म 26 जून 1873 चा. ती 18 जानेवारी 1930 ला अकाली गेली.
तिचे जन्मदाते पिता ख्रिश्चन होते. तिची आई रुख्मिणी ही हिंदू होती. तिने रॉबर्ट विल्यम येवर्डशी विवाह केला होता. तिच्या आईने पुढे एका मुस्लीमासोबत दुसरे लग्न केले. त्याने या दोघींचे धर्मांतर करवले. गौहर जान बालपणीच मुस्लीम बनली.

तिचा पहिला प्रियकर अमृत नायक हा गुजराती होता. त्याने शेक्सपियरची सर्व नाटके उर्दूत आणली. तो त्या काळातला प्रचंड लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक होता. त्याच्यासाठी गौहर जान कलकत्ता सोडून मुंबईत आली. पण महिनाभरातच रंगमंचावर प्रयोग सादर करत असताना त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गौहर जान बेघर झाली. तिच्यावर फिदा असलेले असंख्य संस्थानिक होते. ते तिला दरबारची गायिका बनवित. ती अनेकांकडे राहिली.
ती देशातली सर्वात नामवंत तवायफ होती.

ती मुक्तपणे जगली. मस्तीत जगली. ती लहरी होती. विक्षिप्त होती. पण ती कलावंत म्हणून महान होती. संगीताशी ती एकनिष्ठ होती.

ती एका संस्थानिकाकडे असताना तिचे गाणे ऎकायला दस्तुरखुद्द व्हाईसरॉय लार्ड आयुर्विन आले. ते तिच्या गाण्यावर बेहद्द खुष झाले. त्यांनी तिची पदके बघताना तिच्या छातीला हात लावला. ती बावरली. मात्र ते संस्थानिक तिच्यावरच खवळले. व्हाईसरॉय लार्ड आयुर्विनचं ते भर दरबारात काहीच करू शकत नव्हते.

तिचा काहीच दोष नसताना तिलाच दोषी ठरवण्यात आले.

तिची दरबारातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली.

तिला अनेकांनी फसवले. अडकवले. तिला कोर्ट कचेर्‍यात गुंतवले. निर्धन केले. ती खूप रडली. हादरली. चंचल बनली. तिला नैराश्याने घेरले.

तिला पुढे गरिबीचे खूपखूप चटकेही सोसावे लागले.

खुद्द तिच्या जन्मदात्या बापाने कोर्टात साक्ष द्यायचे तिच्याकडे नऊ हजार रूपये मागितले.

शेवटी ती म्हैसूर दरबारची राजगायिका होती. तिला 500 रूपये महिना वेतन होते. त्यात तिचे भागत नव्हते. ती खूपच खर्चिक बनलेली होती.

ती गेली तेव्हा एकटी होती. अश्रू गाळायाला तिच्याजवळ कोणीही नव्हते. तिची कबरसुद्धा बांधायला कोणी कोणी नव्हते.

तिने भारपूर इस्टेट मागे ठेवली असेल या समजुतीने ती गेल्यावर अनेकजण तिच्या इस्टेटीच्या मालकीसाठी तिच्यावर हक्क सांगायला पुढे आले.

जाताना तिच्या तोंडी गालिब होता.
"कसम जनाजे पे आनेकी मेरी खाते हैं गालिब
हमेशा खाते थे जो मेरी जान की कसम आगे!

जे आता माझ्या अंत्ययात्रेला अग्रभागी आहेत, तेच पूर्वी माझ्या जिवावर ऊठले होते.

अफाट परिश्रम आणि संशोधनातून विक्रम संपत यांनी साकारलेले तिचे इंग्रजी चरित्र चटका लावून जाते. अनुवादक सुजाता देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद इतका सरस आहे की हे मूळ पुस्तकच मराठी आहे असे वाटते. सुजाताला त्यासाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेला आहे. ह्या महत्वाच्या पुस्तकाकडे मराठी वाचकांचे दुर्लक्ष झालेले आहे.

राजहंस प्रकाशनाची ही देखणी निर्मिती तुम्ही अवश्य संग्रही बाळगायला हवी.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment