Wednesday, August 1, 2018

मग माझा एक डोळा फोडा -





आजकालचे पहिलवान गुणवान, व्यवहारी आणि चतुर असतात.
पण ही जुन्या काळातली गोष्ट आहे. तरी ती आपल्या समकालीन मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारी आहे.

तर एक होता पैलवान. एकदम जंक्शान. जिथं जायचा तिथून जिंकूनच यायचा. पठ्ठ्या असा की प्रत्येक मैदान त्याच्या विजयाची गाणी गात होतं.
राजानं त्याला निमंत्रित केलं. देशोदेशीच्या पैलवानांना बोलावलं. जंगी कुस्त्या झाल्या. आपला पैलवान सर्वात अजिंक्य ठरला.

राजा खूश झाला. पैलवानाला म्हणाला, " मी तुझ्यावर निहायत खूशाय, माग तुला जे मागायचं असेल ते! जे जे मागशील ते ते सारं तुला मिळेल. सांग काय काय हवंय तुला?"

पैलवानानं कागद घेतला, बोरू घेतला आणि यादी करायला सुरूवात केली.
तालीम हवी. राहायला राजमहाल हवा. पाच हजार एकर जमीन हवी. शंभर बैल, दोनशे गाया, तीनशे म्हशी हव्यात.
दहा किलो सोनं हवं..... यादी काही संपतच नव्हती.

राजा उभं राहून राहून वैतागला.
पैलवानाला म्हणाला, "माझा शब्द गेलेला असल्यानं तू मागशील ते तुला नक्कीच मिळेल. पण आता माझी एक नविन अट आहे."
पैलवान घाबरला. म्हणाला, "अट? ती अन कसली?"

" अट अशीय की जेव्हढं मी तुला देणार त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्‍याला मी देणार."
पैलवान म्हणाला, "असंय काय?"

त्यानं सगळी यादी फाडून टाकली आणि राजाला म्हणाला, "असं असेल तर मग माझा एक डोळा फोडा महाराज!"
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment