Friday, September 28, 2018

मंटो







सआदत हसन मंटो हा काळाच्या खूपखूप पुढचा लेखक होता. तो अकाली गेला. ११ मे १९१२ ला जन्मलेला हा गुणी लेखक वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी १८ जानेवारी १९५५ ला गेला. तो बंडखोर आणि सामाजिक वास्तवाचं प्रखर चित्रण करणारा कथाकार असल्यानं त्याच्यावर अश्लिल लेखणाबद्दल ब्रिटीश भारतात ३ आणि नवनिर्मित पाकीस्तानात ३ असे सहा खटले भरले गेले. आज त्याच्या या कथा वाचताना त्यात चिमूटभरही काही आक्षेपार्ह असल्याचं दिसत नाही. मात्र सनातन्यांनी ह्या प्रतिभावंत लेखकाला कोर्ट कचेर्‍यांमध्ये अडकवून टाकलं. मनस्ताप दिला.


मंटोसारखा बेडर, निर्भय माणूस फाळणीतील रक्तपात, धार्मिक कत्तली बघून घाबरला आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक करून बसला. तो मुंबईतील आगीतून उठून लाहोरच्या फुपाट्यात जाऊन पडला. स्वातंत्र्यानंतर त्याचं पाकीस्तानला निघून जाणं त्याला संपवणारं ठरलं. धर्मांध मुल्लामौलवींचं वर्चस्व असलेल्या पाकीस्तानला मंटोचं मोठेपण कळणं केवळ अशक्य होतं. पाकीस्तान म्हणजे सनातनी आणि पागल अशा धर्मांध लोकांचं महागटार.

मंटोला बहुधा डेथ विश असावी. तो मृत्यूसाठी आतूर असावा. भसाभसा सिगारेटी फुंकणं, रात्रंदिवस दारू ढोसणं याच त्याच्या जीवनशैलीमुळं तो फार लवकर गेला. त्याच्या हयातीत तर त्याचं मोठेपण त्याच्या देशाला कळलंच नाही. जेव्हा पाश्चात्य जगानं मंटोला डोक्यावर घेतलं तेव्हा कुठे  ५७ वर्षांनी २०१२ साली पाकीस्तान सरकारनं त्याला पहिला मरणोत्तर गुणवत्ता सन्मान प्रदान केला. त्याच्यावर पोस्ट स्टॅंप काढला.


मंटोचं लेखक म्हणून आयुष्य अवघं २१ वर्षे होतं. त्याच्या हयातीत त्याची २६ पुस्तकं प्रकाशित झाली होती. हा वेग मोठा असण्याचं कारण त्यानं दुसरा कामधंदा न करता निव्वळ लेखणावर उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं. जे आजही अवघड आहे, तेव्हातर होतंच आणि पाकीस्तानात तर अशक्यच. त्यासाठी सुमार असंही त्यानं बरंच खरडलं. त्याच्या स्वभावातले आणखी २ विरोधाभास म्हणजे तो दुसर्‍यांच्या लेखणावर कडवट आणि अवास्तव टिका करायचा पण त्याच्या लेखणावर कुणी टिका केली तर ती त्याला सहन व्हायची नाही. जिव्हारी लागायची. तो भडकायचा. दुसरं म्हणजे मुलंबाळं उपाशी आहेत, मुलगी आजारी आहे आणि औषध आणायला पैसे नाहीत यानं परेशान असलेला मंटो करतो काय तर दारू ढोसत बसतो. त्याचंही तत्वज्ञान ऎकवतो. समर्थन करतो. ही बुझदिलीच होती त्याची.


असला पलायनवादी माणूस लेखक म्हणून मात्र तगडा होता. बंडखोर होता. वेश्या, वेडे, फाळणीत पोळलेले लोक यांच्यावरच्या त्याच्या कथा दाहक आहेत. प्रचंड अस्वस्थ करणार्‍या आहेत. मानवी जीवनातली विसंगती, दांभिकता आणि अनिश्चितता यावरचं मंटोचं भाष्य आरपार भिडणारं आहे. "टोबा टेक सिंग" ही एका वेड्याच्या जीवनावरची त्याची कथा सुन्न करणारी आणि डोळ्यातून पाणी काढणारी आहे. "खोल दो" सारख्या कथेतनं त्यानं पुरूषांच्या हैवानियतवर केलेलं सुचक भाष्य झिणझिण्या आणणारं आहे.
समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून निग्रो आणि दलित साहित्यानं जी श्रेष्ठ वैश्विक कामगिरी केली त्यातला मंटो हा आघाडीचा लेखक मानला जायला हवा.

"मोगले आझम" सारखा भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेला अव्वल दर्जाचा चित्रपट काढणार्‍या लेखक -दिग्दर्शक के. असिफ यांच्या एका स्क्रिप्टवर आपला अभिप्राय देताना मंटो त्यांना सांगतो, मी अभिप्राय देण्याचेही पैसे घेतो. असिफ त्याला पैसे देतात तेव्हा ते घेऊन हा गडी त्यांना काय सांगतो तर तुमची स्क्रीप्ट तद्दन बकवास आहे.

"थंडा गोस्त" ह्या मंटोच्या तगड्या कथेवर पाकीस्तानात अश्लिलतेचा खटला भरला जातो. आपल्या साक्षीच्या दरम्यान प्रख्यात कवी फैज अहमद फैज कोर्टाला सांगतात की मंटोची ही कथा अश्लिल नाही. मात्र वाड्मयीन गुणवत्ता पाहता ही कथा सामान्य दर्जाची आहे. तर मंटो त्यांच्यावर भडकतो.

मंटोनं अठरा महिने ऑल इंडीया रेडीओवर उर्दू विभागात नोकरी केली. त्याकाळात त्यानं सादर केलेल्या कलाकृतींचे पाच खंड प्रकाशित झालेत. अर्थातच मनस्वी स्वभावाच्या मंटोचं वरिष्ठांशी पटणं शक्य नव्हतं. आधी तो सिनेसृष्टीत काम करीत होता. तिथेच तो परततो. एका बॅरिस्टर घराण्यातला हा उच्चशिक्षित युवक डाव्या विचारांनी प्रभावित होतो आणि प्रागतिक प्रवाहात येतो. त्याचे वडील न्यायाधिश होते. मंटोचा जन्म लुधियानाचा आणि त्याचा मृत्यू झाला लाहोरला. त्याचं करियर बहरलं ते मुंबईत. श्याम, अशोक कुमार, जद्दन बाई, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर, नौशाद हे त्याचे समकालीन. सखे सोबती.

अशा या रसरशीत, बंडखोर आणि हाडामासाच्या चक्रम लेखकावर, मनस्वी कलावंतावर, प्रचंड मेहनत करून नंदीता दास या गुणी अभिनेत्रीनं "मंटो" हा चरित्रपट निर्माण केलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने गांधी, आंबेडकर, भाग मिल्खा भाग, दंगल, असे काही दर्जेदार बायोपिक दिलेले आहेत. त्याचा आलेख आणखी उंचावणारा हा एक महान चित्रपट आहे.


मंटो हा चित्रपट कलात्मक असूनही अजिबात दुर्बोध नाही. २ तास हा सिनेमा आपल्यावर असं गारूड करतो की आपण मंटोला कडकडून भेटतोय असं वाटत राहातं. मंटोला आदर्श किंवा लार्जर दॅन लाईफ न बनवता नंदीताने जसा होता तसा पेश केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेला मंटो हा त्याच्या आजवरच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ठ रोल आहे. कदाचित ऑल टाईम बेस्ट भुमिका. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नंदीताचं आहे. नंदीता ही सत्यजित रे यांच्या मालिकेतली जागतिक गुणवत्तेची प्रतिभावंत दिग्दर्शक आहे हे या चित्रपटातून सिद्ध होतं. भारतीय चित्रपटानं जागतिक उंची गाठल्याचा हा अनुभव केवळ अविस्मरणीय आहे.

भारतीय संहिता, अभिनय, छायाचित्रण, पार्श्वसंगित, दिग्दर्शन, चित्रभाषा किती उत्कृष्ठ असू शकते हे पाहण्यासाठी तरी हा सिनेमा प्रत्येक सिनेरसिकाने पहायला हवा. विशेषत: सामान्य प्रेक्षक, दर्जेदार काही पाहणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि दलित, ग्रामीण साहित्यप्रेमी यांनी तरी एक अजरामर भारतीय कलाकृती म्हणून हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.


असे चित्रपट वारंवार बनत नसतात. ते पंचवीसतीस वर्षातून एखादाच अप्रतिम चित्रपट या कॅटॅगिरीतले असतात. सलाम मंटो. सलाम नंदीता. सलाम नवाजुद्दीन.

-प्रा. हरी नरके, २८ सप्टेंबर २०१८
......................................

मंटोची काही पुस्तकं मुंबईच्या अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याचा एक निवडक कथांचा खंड नागपूरच्या विजय प्रकाशनाने काढलेला आहे.
त्याने लिहिलेल्या व्यक्तीचित्रांचे पुस्तक मुंबईच्या लोकवाड्मय गृह ने प्रसिद्ध केलेले आहे. त्याची कादंबरी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनानं छापलेली आहे.
ही सर्व पुस्तकं, पुस्तक पेठ कोथरूड,पुणे, किंवा अक्षरधारामध्ये मिळतील.

विकीपिडीयात मंटोच्या उर्दू, हिंदी, इंग्रजी पुस्तकांची माहिती दिलेली आहे. त्याची ११ पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत.



No comments:

Post a Comment