Sunday, February 10, 2019

आता कुठे राहिलीय जातियता?







वय वर्षे ४ ते १४ [ १८९४ ते १९०४] याकाळात भिमराव सातार्‍यात राहत होते. एकदा ते भावंडांसह वडलांना भेटायला जात असताना गाडीवानाने त्यांची जात कळताच त्यांना गाडीतून खाली उतरवले.

त्यांना प्यायला कोणीही पाणी दिले नाही. ह्या घटनेने कोवळ्या भिमरावाच्या काळजाला दिलेल्या डागण्या ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत. मनावरचे हे चरे आठवले की भिमराव कायम जखमी व्हायचे. या घटनेला आज सव्वाशे वर्षे उलटून गेलीयत.

त्या दहा वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्‍याच्या सदर बाजार या कॅंटोनमेंट परिसरातील भाड्याच्या घरात राहात होते. त्या घराला भेट द्यायला काल गेलो होतो.

तिथे राहणार्‍या कुटुंबाकडे डॉ. बाबासाहेबांची चौकशी करण्यासाठी घराच्या उघड्या असलेल्या फाटकातून आत गेलो. ऎसपैस अंगण होते. पडवीत एक तरूण बसला होता. मी अंगणात उभं राहून त्याच्याकडे चौकशी केली. डॉ. बाबासाहेब हे नाव ऎकताच तो भडकला.

तो तरूण मुलगा चक्क चवताळून अंगावरच आला. शिविगाळ करू लागला. त्याचे नेमके काय बिघडलेय तेच मला कळेना. त्याच्या मदतीला नंतर त्याचे आजोबाही धावून आले. त्यांनी आधी मला अंगणातून हुसकावून लावले. गेटच्या बाहेर काढले. मी सार्वजनिक रस्त्यावर येऊन त्या घराकडे बघितलेलेही त्यांना खपत नव्हते. घराच्या अंगणातच काय मी सार्वजनिक रस्त्यावरही उभे राहता कामा नये असा त्यांचा तोरा होता. सगळेच अजब.

कुठून येतो एव्हढा जातीय विखार?

त्यांचा आरडाओरडा ऎकून काही शेजारी गोळा झाले. त्यांनी मला सांगितले या खानदानी मंडळींना डॉ. बाबासाहेबांच्या नावाची नफरत आहे. संपुर्ण ॲलर्जी. या घरात सव्वाशे वर्षांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहात होते हा त्यांना आजही अपमान वाटतो. ते नाव ऎकले की त्यांचा संताप संताप होतो. ते पिसाळतातच. त्या घराची व जागेची बाजारभावाने होणारी किंमत रूपये एक कोटींपेक्षा अधिक असून ती अदा करून हे घर सरकारने "राज्य संरक्षित स्मारक" घोषित केलेले आहे. तशी कायदेशीर प्रक्रियाही पुर्ण झालेली आहे. तरीही हे सरंजामदार सदर स्मारक/घर बळकाऊन बसलेत. सरकारचा निर्णय ते मानायला तयार नाहीत. हे घर सातारच्या सदर बाजार परिसरात, पारशी अग्यारीसमोर आहे.

आता कुठे राहिलीय जातियता? असा साळसूद प्रश्न काही उच्चभ्रू सहजपणे विचारतात.

प्रा.हरी नरके, दि. १० फेब्रुवारी २०१९





No comments:

Post a Comment