Wednesday, February 20, 2019

जिगरबाज किर्ती-









रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.

त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.

वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.

आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.

मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?

किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.

चहाची टपरी चालवतेय. काल संगमेश्वरला शिवजयंतीला माझं भाषण ऎकायला आली होती.

पोरगी खरंच जिगरबाज आहे.

प्रा. हरी नरके,२० फेब्रुवारी २०१९

No comments:

Post a Comment