Tuesday, May 28, 2019

फेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक, इद्वान इल्शेषक

एक आटपाट नगर होतं.
तिथं अनेक इद्वान राहात होते. विशेषत: त्यातले पत्रकार, फेसबुके, ट्विटरे, इलेक्ट्रॉनिक आणि प्राध्यापकी इद्वान लईच भारी होते.
राजाचा एका लढाईत दारूण पराभव झाला.
झालं, त्यानं या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू असं राजानं वचन दिलं.
इद्वानांनी २ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं हत्तींचं दळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला.घोडदळ पुढं पाह्यजेल होतं.

पुढच्या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा हरला.

झालं, त्यानं पुन्हा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं सगळ्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द  राजानं दिला.
इद्वानांनी ३ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं घोडदळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला. त्यानं पायदळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.

तिसर्‍या लढाईत राजानं तसं केलं. तरीही राजा परत हरला.

झालं, त्यानं परत एकदा या इद्वानांची बैठक बोलावली. झालेल्या पराभवाची मिमांसा करायला राजानं त्यांना विनवलं. त्यातून आपण आत्मपरीक्षण करू व झालेल्या चुका दुरूस्त करू असा शब्द  राजानं दिला.

इद्वानांनी ४ आठवडे वैचारिक खल केला. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की राजानं यावेळी पायदळ पुढं ठेवल्यानं त्याचा पराभव झाला. त्यानं उंटांचं दळ पुढं ठेवायला पाह्यजेल होतं.

तेव्हा चवथ्या लढाईवर जाण्यापुर्वीच राजानं या इद्वानांची बैठक बोलावली. काय केल्यानं आपल्याला यश मिळेल ते सांगा, कोणते डावपेच मी वापरू ते सांगा, मी तसं करतो, असं राजा म्हणाला.

त्यावर समदे इद्वान राजाला म्हणाले, आम्ही पत्रकार हावोत. आम्ही फेसबुके, ट्विटरे हावोत. इलेक्ट्रॉनिक हावोत. आम्ही इद्वान इल्शेषक असल्यानं घटना घडून गेल्यानंतर ती तशी का घडली याची चिकित्सा करीत असतो. मार्गदर्शन करीत असतो.
घटना घडायच्या आधी आम्ही तिच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही.
-प्रा.हरी नरके, २८ मे २०१९ 

No comments:

Post a Comment