Monday, June 10, 2019

गिरिश कार्नाड, विजय तेंडूलकर, ज्ञानपीठ, मराठी विनोद आणि बरंच काही



गिरिश कार्नाड यांच्या जाण्याने सगळेच हळहळत आहेत. अशावेळी त्यांच्याविषयी लिहायला काही सुचत नाही.
तरिही काही नोंदी करायला हव्यात-

१. अहमदनगरला यशवंतराव गडाख यांनी  अ.भा.मराठी साहित्य संमेलन घेतले असताना त्याला कार्नाडांना निमंत्रित केलेले होते. सन्मित्र अरूण शेवते यांच्यामुळे ते आले. त्यांचे भाषण अतिशय मौलिक होते, त्यातला एक मुद्दा महत्वाचा होता. ते म्हणाले, मराठीत श्रेष्ठ दर्जाचा विनोद आहे. त्या तोडीचा विनोद माझ्या कन्नड किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेत नाही.

२. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, " मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद असला तरी माझ्यापेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ असलेल्या विजय तेंडूलकरांना तो मिळायला हवा होता."

मनाचा एव्हढा मोठेपणा विरळाच. त्यावेळी ज्ञानपीठ बैठकीत तेंडुलकरांचे नाव अनेकांनी लावून धरलेले असताना एका खत्रूड मराठी साहित्यिकाने विरोध केल्याने तेंडुलकरांचे नाव बाजूल ठेवले गेले होते, व कन्नड प्रतिनिधीने कार्नाड यांचे नाव सुचवताच त्याला सार्वत्रिक पाठींबा मिळालेला होता.

३. त्यांच्या तुघलक मध्ये त्यांनी राजकारणाची जी अंतस्थ उकल आहे ती बघता एव्हढे मौलिक राजकीय नाटक भारतीय नाट्यसृष्ठीला प्रथमच मिळालेले असावे. त्याचा मराठी अनुवाद विजय तेंडुलकरांनी करावा हाही एक अपुर्व योग.

लेखक, अभिनेता, तत्वज्ञ, चित्रपट कलावंत,नाटककार म्हणून असलेली त्यांची कामगिरी जागतिक पातळीवरची होती.




-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

No comments:

Post a Comment