Thursday, September 19, 2019

विचारवंत घडताना- राजन सुमन खान







विचारवंत घडताना- राजन सुमन खान

मी ज्या वयाचा आहे, त्यात आपल्या डोळ्यादेखत एखादा माणूस विचारवंत म्हणून घडत जातो, असं मी पाहिलेलं एकमेव माणूस म्हणजे हरी नरके. आपल्या आधीच्या पिढीचे अनेक विचारवंत आधीपासून आपल्याला उपलब्ध असतात, कारण ते आपल्या आधी जन्माला आलेले असतात आणि त्यांची घडण होऊन ते आपल्याला आयते मिळालेले असतात. आपण त्यांना ऐकत, वाचत वाढत असतो. हरिभाऊचं माझ्याबाबतीत तसं झालं नाही. आम्ही दोघं साधारण एका वयाचे. हरिभाऊला मी त्यांच्या कोवळ्या शैक्षणिक आयुष्यापासून पाहत आलोय. एकाच गावात एकमेकांच्या आसपास राहत आलो आम्ही दोघं, त्यामुळं त्यांचे वाढीचे बारकेसारके संदर्भही माझ्या आयुष्यात येत राहिले. एका माणसाच्या नावाला आकारउकार कसा येत जातो, हे मला हरिभाऊंच्या बाबतीत दिसत राहिलं.
हा माणूस मला पहिल्यांदा दिसला तेव्हा, हा भविष्यातला मोठा विचारवंत आहे, हे काही जाणवलं नव्हतं, ते शक्य नव्हतं, पण हा एक अभ्यासू मुलगा आहे, ही माझी हरिभाऊंची माझ्या मनावरची पहिली प्रतिमा आजही आठवते. अभ्यासू म्हणताना त्या प्रतिमेला गांभीर्य होतं, पण त्यात जडजंबाळ किंवा सुतकी गांभीर्य नव्हतं, तर एक साधेपणा होता आणि एक सहजता होती. एक गोष्ट मोठी होती तेव्हाही, ती अशी की, तारुण्य असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात थिल्लरपणा अजिबात नव्हता. एक सौम्यसं गांभीर्य आणि विचारशीलता त्या वयातही त्यांच्या प्रतिमेत होती. पण ते गांभीर्य म्हणून जगण्याची रसिकता आणि आयुष्याच्या सगळ्या रंगांमध्ये रस घेण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती, असं नव्हतं.
त्यावेळी जाणवलेले हरिभाऊ आज ठळक दिसतात. आज त्यांच्या नावाला विचारवंत हे वलय आहे. पण विचारवंत म्हणून जी एक साचेबद्ध प्रतिमा असते, त्यात ते अजिबात बसत नाहीत. विचारवंतांचा अभ्यास खोल असावा लागतो, तो हरिभाऊंचा निश्चित आहे, पण विचारवंत हा जड असावा लागतो, त्यानं लोकांशी अनाकलनीय आणि डोक्यावरून जाणाऱ्या भाषेत बोलावं लागतं आणि थोर ठरावं लागतं, त्यानं आयुष्यात अभ्यासाचा ठरलेला कुठला तरी एक विषय सोडून जगण्याच्या दुसऱ्या विषयांमध्ये रस घ्यायचा नसतो, त्यानं विनोद ऐकायचे नसतात आणि विनोद करायचे नसतात, त्यानं लोकांमध्ये सहज वावरायचं नसतं, चेहरा कायम मख्ख ठेवायचा असतो, तोंडानं हसण्याचं माप एकदाच ठरवून ठेवायचं असतं आणि आयुष्यभर तेवढ्याच मापाचं हसायचं असतं, हे असलं काही हरिभाऊंकडं अजिबात नाही. हा विचारवंतांची पारंपारिक प्रतिमा मोडणारा विचारवंत आहे. हा लोकांमधला विचारवंत आहे. त्यांची बोलण्याची, लिहिण्याची भाषा सहज, साधी, सोपी आहे, लोकांची आहे, पण विचारवंत असण्याला जो दांडगा अभ्यास लागतो तो त्यांचा आहे आणि लोकांना नवी दृष्टी द्यावी लागते, ती ताकद त्यांच्यात आहे.
या सगळ्या खुणा त्यांच्या कोवळ्या वयात मी पाहत होतो दुरून. मी काही त्यांच्या वर्तुळातला नव्हतो, तेही माझ्या वर्तुळातले नव्हते, पण त्यांची माझी काही वर्तुळं एकमेकांत मिसळण्याच्या काही जागा होत्या. पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या काही चळवळी, काही स्वयंसेवी, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था, काही साहित्यिक-सामाजिक उपक्रम, पु. ल. देशपांडे, निळू फुले ही आमची वर्तुळं एकमेकांत मिसळण्याची ठिकाणं होती आणि त्यातून मला त्यांच्या जगण्यावागण्याचे संदर्भ मिळत होते. हा माणूस आजही प्रत्येक गोष्टीचा प्रचंड अभ्यास करतो, खूप वाचत असतो, ही त्यांची सवय हे त्यांच्या कोवळ्या वयातलंही वैशिष्ट्य होतं. त्या वयातही हा माणूस त्यावेळच्या अनेक दिग्गजांमध्ये ऊठबस करतो आणि अभ्यासू चर्चा करतो, ते लोक या माणसाचं नाव फार गांभीर्यानं आणि आपुलकीनं घेतात, हे मी पाहत आलो होतो.
त्या काळात हरिभाऊंच्या जगण्याची खाजगी गोष्ट मला माहीत नव्हती. ती नंतर कळत गेली. अवाढव्य गरिबी आणि भुकेचा जोरदार संघर्ष हे हरिभाऊंचं आयुष्य होतं. पण तेव्हाची आणि आजचीही मोठी गोष्ट अशी की, ती गरिबी आणि ती भूक हरिभाऊनं कधी जगण्याचं, मोठं होण्याचं भांडवल म्हणून वापरली नाही. त्या संघर्षाच्या काळात या माणसानं अभ्यासाचा नाद सोडला नाही आणि केवळ प्रचंड अभ्यासाच्या जिवावर मोठा झाला. अभ्यासाच्या बळावरच त्यानं आपल्या हक्काचं जे आहे ते मिळवलं, त्यासाठी गरिबी आणि भुकेचा मुद्दा त्यानं कधीच पुढं केला नाही. एक लखलखीत वैचारिक श्रीमंतीचं आयुष्य हा माणूस जगला.
हरिभाऊ सतत होतेच आसपास, त्यांचं मोठं होणंही कळत होतं, पण हा माणूस माझ्या आयुष्यात जास्त ठळक कधी झाला, हे मला आज आठवत नाही. तो कायमच आपल्या आयुष्यात ठळक होता असं आज वाटत राहतं. त्यांचं अक्षर मानवकडून दर पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या माणूस संमेलनाला नियमित येणं आठवतं. तिथं सर्वांमध्ये मिसळून राहणं, स्वतःचं वेगळेपण न दाखवणं, कसलाही भाव न खाणं, महत्वाचं म्हणजे समोर बोलणारा भारी माणूस असो की साधा, प्रत्येकाचं बोलणं मन लावून ऐकणं आणि सतत प्रत्येकाच्या बोलण्याची टिपणं काढत राहणं, (अशी कुणाच्याही बोलण्याची नेकीनं टिपणं काढत राहणारा हा मी पाहिलेला एकमेव विचारवंत.) हे मला हरिभाऊंचं जास्त आठवतं.
आज मात्र या माणसाचं न् माझं जगण्याचं वर्तुळ एक आहे आणि मित्र म्हणावा एवढा हा माणूस जवळचा वाटतो.
आज वक्ते संपलेल्या काळातला हरिभाऊ हा माणूस राज्यातला महत्वाचा, लोकप्रिय आणि दुर्मिळ अभ्यासू वक्ता आहे. अनेक चळवळींमध्ये या माणसाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. लेखन चालू असतं. वाचन (विचारवंत असूनही) अजूनही जबर चालू असतं. टीव्ही मालिकांसाठी पण हा माणूस सहभाग देतो. अभिजात मराठीसाठी झटतो. लोकोपयोगी उपक्रमांमध्ये सामील असतो. खूप प्रवास करतो. पाहुणा म्हणून बोलावलं तर कसलेच नखरे करत नाही. दर्जेदार विनोदही करतो. दिग्गज माणसांच्या असंख्य आणि साक्षात अनुभवलेल्या आठवणी त्याच्याकडं आहेत. कितीही बोलला तरी कंटाळवाणं होत नाही आणि संदर्भहीन, मुद्देहीन कधी बोलत नाही. आणि हाक कधीही मारा, हा सतत कार्यरत असलेला हा माणूस वेळ नाही असं कधीच म्हणत नाही. जिथं गरज खरी, तिथं आमचा हरी, अशी आमच्यात म्हण आहे.
त्याच्या आणि माझ्यात जुळणारा 'भाव' म्हणजे, आमचा बाप महात्मा फुले आहे. त्या अर्थानं हरिभाऊ माझा भाऊ आहे.
या खऱ्या मोठ्या माणसाशी अक्षर मानवचा पुढचा संवाद सहवास होतोय.
|| अक्षर मानव संवाद सहवास : तेरा ||
अतिथी : डॉ. हरी नरके
समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो. या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे यांच्याशी झाले.
आता तेरावा संवाद सहवास होतोय सामाजिक-वैचारिक क्षेत्रांत ज्यांचं मोठं काम आहे अशा डॉ. हरी नरके यांच्याशी.
निवांत, शांत ठिकाणी (आयोजनाच्या दृष्टीनं, व्यवस्थेवर ताण येऊ नये आणि सभेच्या गोंधळापेक्षा नीट संवाद व्हावा म्हणून) फक्त मोजक्या माणसांनी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे.
सर्वांना मुक्त प्रवेश. राहणं-जेवणं विनाशुल्क.
दिनांक : १२, १३ ऑक्टोबर २०१९
स्थळ : इंदापूर, जि. पुणे
नावनोंदणी संपर्क -
सतीश इंदापूरकर : ९६२३११४३९३
शैलेश काटे : ९८९०२५७८७२

No comments:

Post a Comment