Thursday, September 26, 2019

माझ्या भाषणांची ५० वर्षे- प्रा.हरी नरके




















२ आक्टोबर १९६९ ला मी पहिले जाहीर भाषण केले होते. त्याला या आठवड्यात ५० वर्षे पुर्ण होतील. तेव्हा मी इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा बोललो होतो. पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या माझ्या शाळा क्रमांक ५३ मध्ये हा मोठा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला शाळेतले सगळे शिक्षक, सुमारे आठशे विद्यार्थी आणि शंभरेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

भाषणाच्या शेवटी झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाची झिंग गेल्या ५० वर्षात किंचितही कमी झालेली नाही. भाषणांचे गारूड उतरायलाच तयार नाही. तेव्हापासून माझं प्रत्येक भाषण मी मनापासून एंजॉय करतो.
गेल्या ५० वर्षात मी किमान विसेक हजार भाषणं दिलीत. त्यात वर्गात घेतलेल्या लेक्चर्सचा समावेश केलेला नाही. माझा पाठांतरावर विश्वास नाही. मुद्दे काढणे, ते लक्षात ठेवणं, उत्स्फुर्तपणे बोलणं हीच माझी आवडती पद्धती. एकाच विषयावर एकापेक्षा जास्त भाषणं केली तरी ती दरवेळी वेगवेगळी असतात. भाषणांच्या पाठांतराचे कार्यक्रम सादर करणे, हुकमी कॅसेट बनवणं हा प्रकार मला आवडत नाही.

इयत्ता दहावीपर्यंत शालेय भाषणे, विविध स्पर्धांमधली भाषणे, निवडणुकीतली भाषणे, धार्मिक विषयावरील प्रवचने- भाषणे, सामाजिक चळवळीतील भाषणे यावर भर होता. याकाळात मी रजनीश, [ ओशो ] रावसाहेब कसबे, नरहर कुरूंदकर, पु.ल. देशपांडे, नरेंद्र दाभोळकर आदींची शेकडो भाषणं ऎकली. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, नाथ पै यांच्या भाषणांच्या ध्वनीफिती ऎकण्यातनं माझी वाढ झाली. ज्यांचं अनुकरण फार मोठ्या प्रमाणात केलं जातं, अशा धंदेवाईक वक्त्यांना, वक्तृत्वाच्या व्यावसायिक मठांना मी कधीही प्रमाण मानलं नाही.

प्रामुख्याने दहावीनंतर जाहीर भाषणांची निमंत्रणे वाढत गेली, त्यालाही आता ४० वर्षे झाली.  "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर [१९८९] गेल्या तीस वर्षात तर निमंत्रणांचा भडीमार सुरू झाला. दरवर्षी जेव्हढी निमंत्रणे स्विकारता येतात त्याच्या किमान पाचपट निमंत्रणे नाकारावी लागतात. लोक नाराज होतात. रागावतात. कधीकधी खुन्नसही ठेवतात.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३६ जिल्हे भाषणांच्या निमित्ताने फिरता आले. गावोगाव जिव्हाळ्याची- सोयरे म्हणता येतील अशी हजारो घरं जोडता आली. अमाप प्रेम मिळालं. भाषणांच्या निमित्ताने वाचन, अभ्यास, चिंतन, चर्चा करता आल्या, त्यातनं जगण्याला बर्‍यापैकी आकार येत गेला. सुरूवात केली होती तेव्हा सोबतीला फारसं काही नव्हतं. आज मी जे काही आहे ती सारी पुण्याई भाषणांची आहे. देशविदेश, ३६ राज्ये आणि केंद्रशाषित प्रदेश पाहता आले. या पन्नास वर्षात भाषणं ऎकणं, भाषणं करणं हेच माझं पहिलं प्रेम राहिलं.

एक तोटा मात्र झाला. जे व्यक्त करायचं असतं ते बोलून करता येतं. लिहायला उर्जाच शिल्लक राहत नाही. लिहायचा जाम कंटाळा येतो.

भाषणं वाहून जातात, पुस्तकं जास्त टिकतात, असं जाणकार म्हणतात.

गोविंद तळवलकर यांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. ते म्हणायचे भाषणं बंद कर. त्यांचं मी ऎकलं नाही म्हणून ते संतापलेही. म.टा.मध्ये माझं तोंडभरून कौतुक करणार्‍या त्यांनी भाषणांमुळे माझी सालटंही काढली. आज वाटतं, त्यांचं ऎकायला हवं होतं. किमान भाषणं आणि पुस्तकं यांचा समतोल राखायला हवा होता.

प्रा. हरी नरके, २६ सप्टेंबर २०१९

No comments:

Post a Comment