Friday, October 25, 2019

सारेच पोल तोंडावर का आपटले? पोलखोल





सारेच पोल तोंडावर का आपटले? पोलखोल - प्रा.हरी नरके

निवडणूकपुर्व आणि निवडणूकोत्तर पोल विविध संस्था वर्षानुवर्षे करीत आलेल्या आहेत. हे एक शास्त्र आहे. जर का प्रातिनिधिक नमुना घेतला गेला तर हे अंदाज निकालांशी बरेच जुळतात असा आजवरचा अनुभव आहे.

एखाद्या दुसर्‍या संस्थेची पाहणी चुकणं किंवा काहींचे थोडेफार अंदाज चुकणं हेही समजून घेता येते.
या निवडणूकीत मात्र सगळ्याच संस्था तोंडावर पडल्या. या पोलचा पोलखोल कुणीतरी करायला हवा.

का माती खाल्ली असेल या सर्वांनी? आपली विश्वासार्हता धोक्यात येईल हे माहित असताना ज्याप्रमाणे बहुतेक वाहिन्या या सत्ताधार्‍यांच्या आश्रित किंवा बटीक असल्याप्रमाणे वागत आहेत, तोच पॅटर्न या पोलवाल्यांनी वापरला नाही ना?
की यांनी पाहण्या केल्याच नाहीत, सत्ताधार्‍यांकडून जी अर्थपुर्ण आकडेवारी पॅकेजसह देण्यात आली तीच यांनी प्रसारित केली?

काल मतमोजणीच्या वेळी सकाळी जेव्हा कल हाती येत होते तेव्हा बहुतेक वाहिन्यांवरचे पत्रकार सत्ताधारी पक्षांचे पगारी कार्यकर्ते असल्याप्रमाणे चेकाळलेले होते. मात्र महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने यांची थोबाडं रंगवल्यानंतर ते सारेच सुतकात गेले.
हे या राज्यात पुर्वी कधीच घडले नव्हते.

ह्या लोकांना नसली तरी त्यांच्या मालकांना ईडीची भिती असणारच.

गेले काही महिने २४ तास बातम्यांची चॅनल बघणं आणि मोदीशाहीतील नेत्यांची भाषणं ऎकणं यात फरक राहिलेला नाही.
त्यापेक्षा जास्त करमणूक थुकरट मालिकांद्वारे होते असा अनुभव वारंवार येतोय.

पत्रकारितेची विश्वासार्हता आज तळाला पोचलेली असताना पोलवाल्यांचे हे पतन वेदनादायी आहे.

- प्रा.हरी नरके, २४ ऑक्टोबर २०१९

Tuesday, October 22, 2019

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?- प्रा.हरी नरके
आज बहुजन समाज शिकून सवरून महत्वाच्या पदांवर पोचलाय. काहींचे पगार इतके मुबलक आहेत की त्या पैशांचं काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो.

शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार अशा बहुजनांची राज्यातली संख्या किमान १ कोटी असावी.

हा समाज शिकला सवरला पण पुस्तकांकडे वळला नाही. यातल्या ९९% लोकांच्या घरी एकही पुस्तक आढळणार नाही. ही माणसं मॉलमध्ये जाऊन भरमसाठ खरेदी करतील पण एकही दिवाळी अंक विकत घेणार नाहीत.

उथळ, भंपक, कंगालीकरण आणि सुमारीकरण असलेल्या हिन्दी मराठी टिव्ही कार्यक्रमात संपुर्ण बुडालेला हा समाज नाटकं बघायला मात्र कधीही फिरकत नाही.
बहुजनांचा ज्ञाननिर्मितीशी असा उभा दावा का?

सत्ताधारी झाले, श्रीमंत झाले, शिक्षण संस्थांचे मालक झाले, अधिकारी बनले पण हे बहुजन वाचनाकडे का वळले नसावेत?

व्हॉटसॲपवर २४ तास रमणारा हा स्त्रीपुरूष जमाव झुंडीत लवकर शिरतो, मग त्याला ग्रंथसंग्रहाचे वावडे का?
१% पेक्षा जास्त बहुजन वाचन-लेखन, संशोधन, ओपनियन मेकींग यांच्या फंदात पडत नाहीत. बहुजन प्राध्यापक,शिक्षक, अधिकारी,पत्रकार वाचन, वैचारिक चर्चा,व्यासंग, सर्जन/निर्मितीच्या क्षेत्रात दिसतात असा आरोप मी करणार नाही.

कुठे चुकले? काय चुकले?

हे असे का?

कोणी सांगेल ?

प्रा.हरी नरके, २२/१०/२०१९

Sunday, October 20, 2019

अंतर्नादच्या २५ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन -









मराठीला दिवाळी अंकांची ११० वर्षांची समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी ५०० दिवाळी अंक निघत असत. औद्योगिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कंबरडे मोडल्याने व्यापारी व उद्योगपतींनी दिवाळी अंकांना जाहीराती देणे बंद केले किंवा आधीच्या तुलनेत ते एकदम अवघ्या २५% वर आणले. परिणामी गेल्या ५ वर्षात सुमारे २५० दिवाळी अंक बंद पडले. यावर्षी निवडणुका आणि राज्यातील काही भागात दुष्काळ तर उर्वरित भागात महापूर आल्याने आणखी बर्‍याच दिवाळी अंकांची आरेतील झाडांप्रमाणेच कत्तल होणार असे समजते.

मराठीतील सर्व दिवाळी अंकांमधले सर्वश्रेष्ठ तीन अंक निवडले तर जो दिवाळी अंक गेली २५ वर्षे पहिल्या ३ अंकांमध्ये असतोच तो म्हणजे अंतर्नाद.

भानू काळे व वर्षा काळे यांनी अतिशय मेहनतीने, निगुतीने आणि साक्षेपाने प्रकाशित केलेला हा २५ वा अंक बहुधा शेवटचाच असण्याची शक्यता आहे. यापुढे तो आजच्या स्वरूपात निघणार नाही. तथापि तो इ फॉर्ममध्ये किंवा अन्य स्वरूपात कदाचित निघेल अशी आशा आहे.

मराठीची ११० वर्षांची दिवाळी अंकांची ही परंपरा मराठी माणसांच्या भाषक अनास्थेमुळे आता लवकरच मोडीत निघण्याच्या दिशेने चाललेली आहे.

आज पुण्यात अंतर्नाद या दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा.हरी नरके यांच्या हस्ते झाले. गेले २ दिवस पुण्यात सलग आणि धोधो पाऊस पडत असल्याने कार्यक्रमाला सभागृह रिकामेच असेल अशी भिती होती. तथापि अंतर्नादवर प्रेम करणार्‍या साहित्यिक आणि वाचकांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली होती. ७०% खुर्च्या भरलेल्या होत्या. स्वत:चे भाषण नसूनही मोठमोठे साहित्यिक केवळ ऎकायला आलेले होते हा चमत्कारच होय.

अंतर्नादचा हा २५ वा दिवाळी अंक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तप्रसाद दाभोळकर होते. यावेळी व्याकरणकार यास्मिन शेख आणि विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांचे सत्कार करण्यात आले. २३ वर्षे अंतर्नाद हे मासिक चालवून २ वर्षांपुर्वी ते बंद करावे लागले. मात्र ही २ वर्षे ते दिवाळीत प्रसिद्ध होत असे.
या कार्यक्रमाला मिलिंद बोकील, मेघना पेठे, उमा व विरूपाक्ष कुलकर्णी, राजन खान, सुहास व साधना बहुळकर, विनय हर्डीकर, अनंत सामंत, विजय पाडळकर, एम के सी एल चे विवेक सावंत, विनया खडपेकर, विलास पाटील, सनदी अधिकारी बापू करंदीकर, मिलिंद जोशी, सुधीर जोगळेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यानंतर चंद्रशेखर महामुनी यांचा "त्या सुरांच्या गंधकोशी" हा दर्जेदार कवितांचा, भावगीतं आणि चित्रगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रा. हरी नरके, २०/१०/२०१९

Saturday, October 19, 2019

प्रिय सर - प्रा.हरी नरके


प्रिय सर - प्रा.हरी नरके

...लेखिकाबाई पुण्यातल्या मंडईजवळ राहायच्या. त्यांचं घर शोधण्यात खूप वेळ गेला. रस्ता इतका अरूंद की सरांची अ‍ॅंबॅसिडर अडकून पडली.

एका सायकल दुकानदाराने मदत केली. दुपारची वेळ. उन्हाळ्याचे दिवस.

आम्ही लेखिकाबाईंच्या घरी गेलो. यदिसरांची आणि बाईंची जुनी ओळख होती. सरांनी त्यांना मंडळाने त्यांची गौरववृतीसाठी निवड केल्याचे सांगितले. पुरस्काराची रक्कम, पुरस्कारात कायकाय देतो हे सगळं सांगितलं. बाई म्हणाल्या, "मला विचार करावा लागेल." सर म्हणाले, "काहीच हरकत नाही. तुम्ही विचार करा, आठवड्याभराने आमचा मंडळाचा माणूस येईल त्याच्याकडे निर्णय सांगा." लेखिकाबाईंनी साधं पाणीही विचारलं नाही. पुणेरी बाणा!

आम्ही रामभाऊंकडे निघालो.

सर म्हणाले, "बघितलस, बाईंना पुर्वसुचना देऊन भेटलो, तरी बाईंनी कसे आढेवेढे घेतले. या पुणेकरांचं एक विशेष वाटतं, उन्हातान्हात घरी आलेल्याला साधं पाणीसुद्धा विचारत नाहीत. मला तहान लागली होती, पण असं पाणी कसं मागणार ना?"

राम नगरकर लोकमान्यनगरमध्ये राहायचे. राधाबाईंनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. पाणी दिलं. "चहा घेणार, सरबत चालेल की कोल्ड्रींक मागवू?" असं सरांना विचारलं. एव्हाना संध्याकाळची चहाची वेळ झालेलीच होती. सर म्हणाले, "कशाला त्रास घेता? असू द्या." राधाबाई म्हणाल्या, "साहेब, हवं की नको ते नाही विचारलेलं मी.  तुम्हाला यातलं काय चालेल ते मी विचारलंय, काहीतरी तर घ्यावंच लागेल."

आम्ही चहा चालेल असं सांगितलं. राधाबाईंनी केलेला चहा फक्कड होता. मी यदि सरांची राधाबाईंना ओळख करून दिली. रामभाऊंची चौकशी केली तर ते शूटींगसाठी कोल्हापूरला गेल्याचं राधाबाईंनी सांगितलं.
मला म्हणाल्या, "काय काम काढलंस बाबा आज?"

सरांनी पुरस्काराची माहिती दिली. संमती विचारली. राधाबाई मला म्हणाल्या," हे साहेब काय विचारत्यात बाबा?"

मी म्हणलं, "सर विचारतात संमती म्हणजे पुरस्कार घेणार की नाय ते रामभाऊंना विचारून कळवा."
राधाबाई म्हणाल्या, "या बया, आन हे काय, असं बक्षिसाला कुणी नाय म्हणत असतं व्हय?"
"काय विचारायची बिचारायची गरज नाय. म्या सांगते ते व्हय म्हणत्याल. कायतरी सोंगं आपली."

लेखनातून-  " ऋतुरंग " दिवाळी २०१९,

संपुर्ण लेख वाचण्यासाठी ऋतुरंग दिवाळी २०१९ पाहावा. अंक सर्वत्र उपलब्ध. " नमस्कार "  या विषयावरील ५२ लेखांची मेजवानी

अंकासाठी संपर्क- अरूण शेवते, मोबा. ९८ ९२ ४३८ ५७४

इमेल - shevatearun@gmail.com 

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

Friday, October 18, 2019

सरकारने शिवरायांचा इतिहास का वगळला?- प्रा.हरी नरके






इयत्ता ४ थीचे बालभारतीचे पुस्तक छ. शिवरायांच्या इतिहासाचे असून ते अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय झाल्याची सध्या सर्व माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावर कडाडून टिका झाल्यावर इ. ६ वीच्या पुस्तकात शिवराय असतील असा साळसुद खुलासा करण्यात आला. मग हे आधीच का केले नाही? सहावीचे पुस्तक आल्यावर मग इ. ४ थीचे पुस्तक रद्द का केले नाही? आता ही पश्चातबुद्धी का? दुसरीकडे हे नवे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे असल्याचे व त्याचा बालभारतीशी संबंध नसल्याचे सांगितले जातेय. खरेखोटे एक ते "विनोदविरच" जाणोत. शिक्षणात चातुर्वर्ण्य आणण्याचा हा सांघिक कट असल्याचा आरोप राज्य शासनावर होत आहे.


प्रत्यक्षात यामागे असलेले जातीय वर्चस्वाचे राजकारण वेगळेच आहे.

मागे १५ वर्षांपुर्वी जेम्स लेन ह्या अमेरिकन लेखकाने छ. शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांची बदनामी करणारा मजकूर असलेले पुस्तक लिहिले होते. त्याचा सर्वदूर झालेला धिक्कार योग्य, आवश्यक आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारांना चपराक देणारा होता.
पुढे लालमहालातील दादोजी कोंडदेव यांच्या शिल्पाचा वाद गाजला.
ते शिल्प रातोरात कापूनही काढण्यात आले.

२००७ ची गोष्टय.

प्रा.वसंत पुरके हे तेव्हा आघाडी सरकारचे शिक्षणमंत्री होते. ३१ जुलै २००७ रोजी पुण्यात एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली. ते म्हणले, " छ. शिवराय-दादोजी" यांच्याबद्दल एक तज्ञ समिती नेमण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. नरकेसर, तुम्ही त्या समितीचे अध्यक्षपद स्विकारावे."

मी त्यांचे आभार मानून नम्रपणे नकार दिला. मी त्यांना म्हणालो, " प्रा. जयसिंगराव पवार, प्रमोद मांडे, गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर, आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, राजा दिक्षित, गणेश राऊत, संजय सोनवणी अशा ज्येष्ठ इतिहासकारांना आपण समितीवर घ्या. यातल्या ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्षपद द्या."
ते म्हणाले, " तुम्हाला या समितीचे किमान सदस्य तरी व्हावेच लागेल."

यथावकाश समिती स्थापनेचा शासनादेश आला. मला धक्काच बसला. कारण मी सुचवलेली काही मान्यवरांची नावं त्यात होती पण समितीची रचना चक्क जातीय निकषावर केलेली होती. छ. शिवरायांच्या जातीचे अध्यक्ष आणि ७० टक्के सदस्य व दादोजींच्या जातीचे ३० टक्के सदस्य. या शासकीय समितीवर सरकारने इतिहासतज्ञ म्हणून चक्क एका आक्रमक आणि वादग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते घेतलेले होते.

झाले, त्यानुसार समितीचा निर्णयही आला.

समितीच्या बैठकीची कार्यवृत्ते वाचल्यावर समजले की दादोजींच्या जातवाल्यांनी समितीवर बहिष्कार घातलेला होता.

आलेल्या निर्णयाबद्दल त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले.

पुढे त्याप्रमाणे ४ थीचे इतिहासाचे पुस्तक बदलण्यात आले.

मात्र आता त्यात पुढे कधीही बदल करायचा नाही असाही विधीमंडळाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
पुढे काही वर्षांनी बालभारतीच्या इतिहास समितीवर काम करताना प्रा. सदानंद मोरे, आ.ह. साळुखे, संभाजी भगत, गोविंद पानसरे यांना या इतिहासात सकारात्मक भर घालायची होती, पण त्यावर सरकारची बंदी असल्याचे सांगण्यात आले.

आणि ज्या ४ थीच्या पुस्तकाला अजिबात हात लावायचा नाही असे सांगण्यात येत होते ते संपुर्ण पुस्तकच युती सरकारने आता रद्द केल्याचे माध्यमांतून समजतेय.

इतिहासाचे संशोधनाच्या नव्या प्रकाशात फेरलेखन करायलाच हवे. मात्र ते पुराव्यांवर आधारित असावे. तटस्थ आणि सत्यप्रिय भुमिकेतून ते व्हायला हवे. असत्यलेखन आणि सत्यापलाप यासाठी प्रसिद्ध असणारी संघटना आणि त्यांची भक्तमंडळी इतिहासाचं काय करतात ते आपण बघतच आलो आहोत.

आघाडी सरकारने इतिहास लेखनाला जातीय वळण दिले. युतीचे सरकार त्याच्या पुढचे पाऊल उचलित आहे.
नंबर एकवर कोण या दोन जातींच्या वर्चस्ववादी लढाईत इतिहासाचे काय होणार ते स्पष्टच आहे.

इतिहासाचा हत्त्यार म्हणून वापर करणारी आणि सोयीचा इतिहास तेव्हढाच सांगणारी, स्वकियांचे,विषमतेचे सदैव गौरवीकरण, उदात्तीकरण करणारी मात्र विरोधी विचारांचे विकृतीकरण करणारी आणि वर्चस्ववादी, जातवर्णवादी मंडळी आता ह्या इतिहासाचे काय वाटोळे करतील ते दिसतेच आहे.

-प्रा.हरी नरके, १८ ऑक्टोबर २०१९


Tuesday, October 1, 2019

आधुनिक भारताचे निर्माते : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर











महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. या दोन्ही छावण्यांमध्ये एकमेकांबद्दल अढी आहे. आकस आहे. द्वेषही आहे.
खरंतर आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसांच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते राष्ट्रीय नेते होते. आधुनिक भारताचे निर्माते होते. द्रष्टे होते. योद्धा होते. दोघेही सेक्युलर होते. लोकशाहीवादी होते. ते एकमेकांचे स्पर्धकही होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. एक मात्र नक्की की बाबासाहेबांमुळे सनातनी गांधीजी प्रागतिक बनत गेले आणि गांधीजींमुळे बाबासाहेब केवळ अस्पृश्यांचे नेते न राहता संपुर्ण भारताचे नेते बनले.
त्यांच्यातली कटूता, विखार आता आणखी किती वर्षे कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.

ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नक्कीच नाही.

त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो.
अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही.
विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी " रानडे, गांधी आणि जीना " या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट गांधी अ‍ॅंड काँग्रेस हॅव डन टू दि अनटचेबल्स" या ग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. गांधीजींचे चतुर, मुत्सद्दी आणि राजकीय संतपणाचे वागणेच त्याला कारणीभूत होते.
हे लेखन वाचून दोघे कट्टर वैरी होते असा भ्रम होऊ शकतो. पण जे दोघांचे समग्र साहित्य आणि जीवनचरित्र वाचतील ते मान्य करतील की त्यांच्यात कायमच कटूता होती का? तर नक्कीच नाही. मित्रभावाचे अस्तर त्यांच्या नात्याला होते. त्यांच्यातले लव्ह- हेटचे हे नाते समजायला मोठे कठीण होते.

"मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
[अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब एका अग्रलेखात म्हणतात. बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. बाबासाहेबांच्या साहित्याच्या एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]
दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]
दि. १३ फेब्रुवारी १९३३ चे बाबासाहेबांचे पत्र उपलब्ध आहे. त्याची सुरूवातच मुळी "डियर महात्माजी " अशी आहे.

महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना आणि गांधीजींना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे.
यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.
२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.

गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते.

त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.

गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई देसाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला." पहिल्या भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, " गांधीजी, मला मातृभूमी नाही" तेव्हा गांधीजी चरकले. आंबेडकरांना समजून घेण्यात आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. तेव्हा गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना पुढे फार महाग पडली. बाबासाहेब त्यांच्यापसून आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]

डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत. आरक्षण द्यायला गांधीजी आधी तयार नव्हते. मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघ मागितले. कम्युनल अवॉर्ड घोषित झाल्यावर गांधीजींचे डोळे उघडले. त्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसले. शेवटी पुणे करारात गांधीजींनी आरक्षण तर दिलेच पण दुप्पट जागाही दिल्या. हे जर आधीच दिले असते तर दोघांमध्ये एव्हढी कटुता आली नसती.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.
मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ. एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने घटना सभेवर बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले.
ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदेमंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.

बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?

बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले. नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे सनातनी गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे  झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.

दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले. पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]

गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी.
त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "
बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.
या दोघा महामानवांना वंदन. लोकशाही जीवनमुल्ये वाचवणे हीच या दोघांना खरी आदरांजली असेल.

- प्रा.हरी नरके, २ ऑक्टोबर २०१९