Monday, March 11, 2013
Thursday, March 7, 2013
बाईमाणुस....
"असे म्हणतात की,ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती!
माझी आई म्हणते,चार भिंतींचे घर मी एकटी चालवते!"
भारत हा गार्गी मैत्रेयीचा देश असल्याचे अभिमानाने सांगितले जाते.आपल्या काही राज्यांमध्ये पुर्वी मातृसत्ताक पद्धती होती असेही सांगितले जाते.इ.स.पुर्व ३७५ मध्ये मनुस्मृतीचा जन्म झाला.ते केवळ धार्मिक पुस्तक नव्हते तर ते एक प्रकारचे संविधानच होते.मनु तिसर्या अध्यायातील ५६व्या श्लोकात स्त्रियांची पुजा करायला सांगतो आणि पुढे नवव्या अध्यायाच्या तिसर्या श्लोकात मात्र स्त्रियांना स्वातंत्र्य नसते असेही सांगतो.पुजेचा अर्थ आणि अधिकार स्पष्ट करताना मनुस्मृतीच्या भाष्यकारांनी लेणे नेसणे, नटणे मुरडणे यांचे स्वातंत्र्य असे स्पष्टपणे सांगितले आहे.त्यात सत्ता,संपत्ती,प्रतिष्ठा,मालकीहक्क आदी समाविष्ट नाहीत हेही स्पष्ट केले आहे. भारताचा इतिहास चिकित्सकपणे तपासला असता भारतातील काही राज्ये "मातृपुजक" होती "मातृसत्ताक" नव्हेत हे दिसुन येते.
स्त्रीपुरुष विषमता हा संपुर्ण जगभरचा प्रश्न आहे.भारतीय संस्कृतीने त्यात खुप गुंतागुंत आणि जटीलता यांची भर घातलेली आहे.म्हणायला देवी आणि वागवायला दासी असा दुटप्पी व्यवहार सर्रास आढळतो.नवर्याने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार करायची नसते अशी म्हणच आपल्याकडे प्रचलीत होती.बायकोला मारहाण करणे हा आपला खाजगा मामला आहे,त्यात इतरांनी पडु नये असे नवरे म्हणत आणि शेजारीपाजारीही ते मान्य करीत.वास्तविक पाहता लग्न ही सामाजिक मान्यतेने घडणारी गोष्ट आहे. {म्हणुन तर वाजतगाजत,डामडौलात आणि दुष्काळातही अफाट संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करीत लग्ने लावली जातात आणि "भास्कराच्या" प्रकाशात माफ्याही मागितल्या जातात} या विवाहातुन झालेल्या पोराबाळांच्या वाढदिवसाला लोक आपल्या नातेवाईकांना-मित्रांना बोलावतात.त्यामुळे पत्नीला मारहा्ण हा हिंसाचाराचा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा मुद्दा आहे.त्यात समाज आणि सरकार{पोलीस} यांनी हस्तक्षेप करणे अपरिहार्य आणि आवश्यकच आहे.
नेहमी एक युक्तीवाद केला जातो की सासुच सुनेला छळते, ननंद-भावजयाच भांडतात.पुरुष बिचारे उगीच बदनाम होतात. खरे तर सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा सारे घरातील पुरुषाच्या नावे असते.तो जिच्या ताब्यात तिला समाजात प्रतिष्ठा असा लोकव्यवहार असल्याने सासु आणि सुन यांच्यात त्यासाठी रस्सीखेच चालते.म्हणजे भांडण जरी बायकांचे असले तरी भांडणाचा मुद्देमाल पुरुष असतो आणि जोवर स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व असत नाहीत तोवर ही भांडणे हा मालकीहक्काचे राजकारण असते हे समजुन घेतले पाहिजे.स्त्री-पुरुष नाते हे परस्परविरोधी नसुन परस्परपुरक आहे.दोघे मिळुन जग बनते. नवनिर्मितीसाठी दोघांचीही गरज असते.आज स्त्री भृणहत्येच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केले आहे. मुलींना जन्मच नाकारला जात आहे. त्यामुळे समाजस्वास्थ बिघडेल, मुलांना लग्नासाठी पुढे मुलीच मिळणार नाहीत अशा पुरुषकेंद्री पद्धतीने न बघता मुलत: स्त्रियांच्या जन्म घेण्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन यातुन होत आहे,ते थांबले पाहिजे,अशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे.मुख्य प्रश्न मानसिकता बदलण्याचा आहे. स्त्री आणि पुरुष अशा दोघांचीही मानसिकता बदलली पाहिजे.एकाच गोष्टीकडे हितसंबंध बदलले की कसे बघितले जाते त्याचे अनेक नमुने आपल्यापुढे असतात.उदा. एखादी आई मुलाबद्दल म्हणते,"माझा मुलगा पार वाया गेला, बायल्या झाला.बायकोच्या तालावर नाचतो" आणि तीच आई जावयाचे कौतुक करताना म्हणते, "कसा सोन्यासारखा जावई मिळालाय, माझ्या मुलीच्या शब्दाबाहेर नाही!"
ब्रिटीशकाळात आपल्या पारंपरिक दृष्टीकोनात मुलभुत बदल होऊ लागला. सतीबंदीचा कायदा{१८२९}, विधवेच्या पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा{१८५४},विवाह नोंदणी कायदा{१८७१},संमती वयाचा [शारदा] कायदा{१९२९}, पोटगीचा कायदा{१९४०} करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई, महर्षि कर्वे, आगरकर,रानडे,रमाबाई, गांधीजी, लोहिया आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातुन आपला दृष्टीकोण हळुहळू बदलू लागला.संविधानाने दोघांनाही समान अधिकार दिले.राज्यघटनेला मान्यता देणार्या याच खासदारांनी स्त्रियांना अधिकार देणार्या हिंदु कोड बिलाला मात्र विरोध केला.बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे हा कायदा तुकड्यातुकड्याने अंशत: पास करण्यात आला.
स्त्री शिक्षणात आपण बरीच मोठी झेप घेतली असली तरी आजही सर्वच समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची साक्षरता आणि शैक्षणिक गळती अधिक आहे.इ.पहिली ते दहावीपर्यंत खुल्या गटातील ६१%मुलगे आणि ६५% मुलींची गळती आहे.तर अनुसुचित जातींमध्ये हेच प्रमाण ७४%आणि ७१% असे आहे. १९६१ साली खुल्या गटातील ३४%पुरुष आणि १३% स्त्रिया साक्षर होत्या तर अनुसुचित जातींमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १७% आणि३% असे होते. २००१ साली खुल्या गटातील ७५%पुरुष आणि ५४% महिला साक्षर होत्या.अनु.जातीतील ६७%पुरुष आणि ४२% स्त्रिया साक्षर होत्या.
स्त्रिया आर्थिक बाबतीत स्वावलंबी झाल्या की त्या अधिक सक्षम होतात हे खरेच आहे.घर चालवण्यात त्यांचाच पुढाकार असला तरी घरांची मालकी मात्र पुरुषांच्या नावे असते.जमीन कसतात बायका पण सातबाराला मालक म्हणुन पुरुषाचे नाव असते. हे चित्र बदलले पाहिजे. देशाच्या सर्वोच्च पदांवर महिलांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले आणि ईंदिरा गांधी यांचा वारसा सांगणार्या मुली आज कुठेच मागे नाहीत."मुलगा म्हणजे वंशाचा दिवा", "मुलीलाच माना मुलगा" हे सारे आपण सोडले पाहिजे.मुलगा आणि मुलगी हे दोघेही माणुस आहेत.मानवप्राण्याने प्राणीविश्वातुन मानसात यायला हवे.प्राणी कधीही बलात्कार करीत नाहीत,माद्यांना मारुन टाकीत नाहीत.त्यामुळे विकृत पुरुषांना पशू म्हणायचे सोडुन दिले पाहिजे.दोघांनीही पुरुषप्रधान मानसिकता सोडुन समतावादी झाले पाहिजे.तरच आपण सुखी, संवादी आणि संपन्न होवू. त्यासाठी कडक कायदे, समाजाचे मानसिकता परिवर्तन आणि स्त्रीहक्काची चळवळ यासाठी पावले उचलावीच लागतील.
........................................................................................................................................................................
Wednesday, March 6, 2013
मराठीच्या विकासासाठी कडवे बना!
Sakal,Pune, Today..05 Feb.2013
--मनीष कांबळे - manishvkamble@gamil.com
Tuesday, March 05, 2013 AT 04:00 AM (IST)
Tags: dr. hari narake, interview, pune
भाषेची विविधता हे मराठीचे वैभव असून, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याला प्रमाणभाषेचे लेबल लावून मिटवून टाकणे, हा वेडेपणा आहे. या भेदाचा दोष धुरिणांकडे जातो. त्यांनी आतातरी सुधारले पाहिजे; नाहीतर फार उशीर झालेला असेल. दलित साहित्यामुळे मराठीची पताका जगात फडकली.
एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करून काय साध्य होणार?
याबाबत तातडीने चार-पाच गोष्टी केल्या पाहिजेत. मराठीतील 52 बोलीभाषांचे शब्द, म्हणींचा ठेवा संकलित केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन व फेलोशिप दिली पाहिजे. बोलीभाषा संपन्न झाली, तरच मराठी समृद्ध होईल. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे किमान शंभर भाषांमध्ये मराठी साहित्य जाईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बायबल दोन हजार भाषांमध्ये गेले आहे; तर आपले मौलिक ग्रंथ, संतसाहित्य, मोठ्या लेखकांचे साहित्य विविध भाषांमध्ये अनुवादित झाले पाहिजे. मराठीत आतापर्यंत एक लाख ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यातील एक हजार ग्रंथ तरी वीस ते पन्नास रुपये एवढ्या रास्त किमतीत उपलब्ध झाले पाहिजेत. मराठीतील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके रास्त किमतीत उपलब्ध झाल्यास त्यावर उड्या पडतील. फुले-आंबेडकरांचे साहित्य अशा पद्धतीने उपलब्ध केल्यावर, एक-दोन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. राज्यात छोटी-मोठी सुमारे अडीचशे साहित्य संमेलने होतात. त्यांनाही राज्य सरकारने निधी देऊन ताकद दिली पाहिजे. राज्यात वर्षाला बाराशे ते दीड हजार मराठी शाळा बंद पडतात. या पार्श्वभूमीवर मराठीला प्रतिष्ठा मिळवून देणे, मराठी भाषा रोजगारनिर्मितीशी जोडून घेणे, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मराठीभाषकांनी विमानतळावर मराठी का बोलू नये? किती मराठी घरांमध्ये मराठीचा सन्मान हा पुस्तकांच्या, लेखकांच्या छायाचित्रांच्या रूपाने करण्यात येतो? अन्य राज्यांत तेथील लेखकांना जो सन्मान मिळतो; तो मराठीतील साहित्यिकांना का मिळत नाही? हे सर्व साध्य करण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलली पाहिजे. अन्य सर्व भाषांमध्ये राष्ट्रगीत आहे. विश्वगीत असलेली मराठी ही एकमेव भाषा आहे; मग आपण न्यूनगंड का बाळगायचा? आपण 364 दिवस मराठी व अन्य भाषेला एक दिवस, असे केले; तर बघा काय होते ते. मराठी आपला श्वास आहे. ओळखपत्र आहे; मग हे ओळखपत्र एक दिवसच का बाळगायचे?
बोलीभाषांना गावंढळ म्हणून हिणवल्याने मराठी भाषेचे नुकसान झाले आहे का?
कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. प्रमाणभाषा असावी की नाही, याबाबत दुमत आहे. मात्र, प्रमाणभाषा म्हणजे प्रतिष्ठित भाषा नव्हे. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, असा भेद करून आपण त्यांच्या लेखनस्वातंत्र्यावर बंदी घालतो. हिणवल्यावर संबंधितांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होऊन त्यांचे व्यक्त होणे थांबले. गावंढळपणाच्या नावाखाली हा भाषिक दहशतवाद आहे. भाषेची विविधता हे मराठीचे वैभव असून, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याला प्रमाणभाषेचे लेबल लावून मिटवून टाकणे, हा वेडेपणा आहे. या भेदाचा दोष धुरिणांकडे जातो. त्यांनी आतातरी सुधारले पाहिजे; नाहीतर फार उशीर झालेला असेल. दलित साहित्यामुळे मराठीची पताका जगात फडकली, तसेच बोलीभाषेतील साहित्य खूप सकस आहे.
कला शाखा वगळता उच्च शिक्षणात मराठी भाषा व साहित्याचा संबंध तुटत असल्यामुळे विद्यार्थी मराठीपासून दूर जातात...
त्यासाठी, मराठी कुटुंबांमध्ये मराठीबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे. आपल्या साहित्याचे घरात सामुदायिक वाचन झाले पाहिजे. मराठी साहित्याविषयी प्रेम, जिव्हाळ्याचे वातावरण प्रत्येक कुटुंबामध्ये असले पाहिजे. जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आदी दिग्गज साहित्यिकांची मोठी फळी क्वचितच अन्य भाषेमध्ये असेल. प्रत्येक घरात त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्या घरात फक्त माणसे राहतात, त्याला मी गोठा म्हणेन; तर जेथे माणसांबरोबर पुस्तके राहतात, त्यालाच मी घर म्हणेन. जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा मराठीत आल्या पाहिजेत, एवढी मराठी सक्षम झाली पाहिजे.
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांनाही मराठीचे जतन करण्यासाठी अडचणी येत आहेत...
महाराष्ट्राबाहेरील 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाते. हे काम पाचशे विद्यापीठांमध्ये होऊ शकते. विविध राज्यांमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. जेथे महानुभाव आहेत, तेथे मराठी भाषा आहे. सातवाहन, राष्ट्रकूट तसेच पेशव्यांचे राज्य ज्या ठिकाणी होते; तेथे मराठी भाषा असून, त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. तेथील संस्थांना मदत केली पाहिजे. भाषासंवर्धनासाठी राज्यात 70 टक्के, तर राज्याबाहेरील संस्थांना 30 टक्के, या प्रमाणानुसार मदत केली पाहिजे. महाराष्ट्राबाहेरील मराठी संमेलनाला गावेच्या गावे येतात. तेथे मराठीविषयी फार प्रेम व आस्था दिसते. लंडनमधील मराठीभाषकांमध्येही ही भावना दिसली.
राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा मराठीसह हिंदी व उर्दू भाषेतूनही घेण्याचा आग्रह होऊ लागला आहे...
जो निकष दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आहे; तो आपणही पाळला पाहिजे. तेथे त्यांची भाषा न येणाऱ्यांना कोणी नोकरीही देत नाही. तसे केले नाही, तर आपण आपल्या हाताने मराठी संपवू. मराठीच्या संवर्धनासाठी दक्षिणेच्या राज्यांतील नागरिकांप्रमाणे कडवेपणा आपल्यात आला पाहिजे. त्यांचे अनुकरण आपण केले पाहिजे. पण, अन्य भाषकांबद्दल आकस, द्वेष नको. —
Interview of Prof. Hari Narke, Sakal, Today,PUNE 5FEB2013.
महिलांचे मानवी अधिकार
८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि १० मार्चला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुद केल्याचा बोलबाला आहे.दिल्लीतील महिला अत्याचार प्रकरणानंतर तरुणाईने जो उठाव केला त्यामुळे अलिकडे महिलांच्या प्रश्नांकडे विशेष संवेदनशीलतेने पाहिले जातेय हि चांगली गोष्ट आहे.या जनरेट्यामुळे समाजाच्या विवेकबुद्धीला झडझडून जाग आली आणि आपल्या मानसिकतेमध्ये परिवर्तन झाले तर पुढील काळात आशेला फार मोठा वाव असेल.भारतीय मानसिकता फार मजेदार आहे. आपण स्रियांना देवता मानतो आणि साध्या मानवी अधिकरांपासुनही वंचित ठेवतो.घटनाकार डा.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवरुन करायचे असते." हा मापदंड लावला तर आपल्या देशाचा क्रमांक जगात ११५ वा लागतो. आपले शेजारी नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान आणि श्रीलंका आपल्या कितीतरी पुढे आहेत.
आपली विद्येची देवता सरस्वती असली तरी तमाम घरांतील सरस्वत्यांना मात्र आपल्याकडे हजारो वर्षे शिक्षण बंद होते ही विसंगती आपल्याला बोचत नाही. सावित्रीबाई , जोतीराव, कर्वे,आगरकर, रानडे, आंबेडकर,गांधी, लोहिया यांनी यावर कोरडे ओढले आणि प्रत्यक्ष काम सुरु केले तेव्हा कुठे आजच्या महिला शिकु शकल्या.तथापि आजही सगळ्या जातीधर्मांचा विचार करता प्रत्येक ठिकाणी तेथील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण कमीच भरते. असा पक्षपात का? आपली संपत्तीची देवता लक्ष्मी! पण घरातील लक्ष्मीच्या नावे संपत्ती किती असते? जमिनीवर राबायला स्त्रियाच पुढे असतात. नेशनल सेंपल सर्व्हेच्या अहवालानुसार शेतमजुरी कारणार्या स्त्रिया ६१% असुन पुरुष ३९% आहेत. ९९% जमिनींची मालकी पुरुषांकडे असुन अवघी १% जमिन स्त्रियांच्या नावे आहे. ९३% घरांची मालकी पुरुषांकडे असुन ७% घरे स्त्रिया आणि पुरुष अश्या दोघांच्या नावावर आहेत.त्यातही बर्याचदा घरासाठी दोघांच्या पगारावर कर्ज घेतलेले असल्याने घरावर दोघांची नावे लागलेली असतात.पण तिथेही अनेकदा पहिले नाव पुरुषाचे आणि नंतर बाईचे असा क्रम असतो. शेयर मार्केट, उद्योग, व्यापार, दुकाने, होटेल इथेही मालकीहक्कात बायका किती असतात? ही दांभिकता जोवर जाणार नाही तोवर खर्या अर्थाने समता प्रस्थापित होणार नाही.
महिला अत्याचार विषयक कायद्यांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव या अधिवेशनात मार्गी लागेल.बलात्काराला फाशीची शिक्षा दिली जावी असे म्हणणारा एक मोठा वर्ग असला तरी त्यामुळे बलात्कारानंतर त्या स्त्रीला मारुन टाकले जाण्याची शक्यता वाढेल अशीही भिती व्यक्त केली जात आहे.त्यात नक्कीच तथ्य आहे. विवाहाअंतर्गत {पती-पत्नी} शरिरसंबंधांनाही बलात्काराच्या तरतुदी लागु केल्या जाव्यात अशी मागणी काही महिला संघटना करीत आहेत.पतीने आपल्यावर बळजबरी केली अशी पत्नीने तक्रार केली तर पतीवर सदर गुन्हा दाखल केला जावा असे त्यांचे म्हणणे आहे. पतीपत्नीचे नाते परस्पर विश्वास आणि एकमेकांविषयीच्या प्रेमावर आधारलेले असते. विवाह करताना परस्पर शरिरसंबंधाना मान्यता दिलेली असते. त्यात शृंगार, अनुनय आणि परस्परांची ओढ असल्याशिवाय ते बंध घट्ट होत नाहीत. ज्यात बळजबरी असेल तर त्यात आनंद कसा असणार? पतीपत्नी संबंधातही संमती हवीच. एकमेकांची मने सांभाळायला हवीत. बळजबरी झाली तर घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे.शेवटी स्त्रियाही माणसेच आहेत.त्यांनाही मोह आहेत. त्याही खलनशील आहेत. अश्या स्थितीत पतीपत्नी नात्याला बलात्काराचा कायदा लागू करुन आपण नातेसंबंधात कायमची दहशत निर्माण केल्याने स्त्रियांच्या मानवी अधिकारांना बळकटी मिळेल की आजही ज्या देशात स्त्रियांना सर्व प्रकारचे मानवी उघडपणे अधिकार नाकारले जातात त्या देशातील स्त्रीद्वेष्ट्यांच्या हातात कोलीत दिले जाईल याचाही विचार व्हायला हवा. असा कायदा पाश्चात्त्य देशांमध्ये आहे म्हणुन आपल्याकडेही आणा असा केला जाणारा युक्तीवाद मला तरी गैरलागु वाटतो.तिकडे विवाहसंस्था पुर्णपणे मोडकळीला आलेली आहे.कुटुंबभावनेचा बोजवारा उडालेला आहे.चंगळवाद,व्यक्तीवाद आणि कोरडा व्यवहार यांनी मानवी नात्याचे व्यापारीकरण करुन टाकलेले आहे.बाजाराच्या ताब्यात सगळे काही गेले की मग फक्त नफातोटा तेव्हढा उरतो. भारतात हे आणुन आपण नेमके काय साधणार? याचाही साधकबाधक विचार व्ह्यायला हवा.माथेफिरु व्यक्तीवादासाठी नात्यांची वीण उधळुन लावल्याने स्त्रियांची मुक्ती होईल की गुलामीत वाढ होईल?
आज देशात मुलींच्या संख्येत प्रचंड घट होतेय.स्त्री भृणहत्येच्या समस्येने आपण चिंतीत आहोत.काही टोकाची हादरवुन टाकणारी उदाहरणे समोर आलेली आहेत.डांग जिल्ह्यात स्वरुप नावाच्या एका स्त्रिला आठ सख्ख्या भावांशी लग्न करावे लागले कारण त्या समाजात मुलीच नाहीत. राजस्थानातील बारमेरच्या राठोड या गावात मुलगे ६०० आहेत आणि मुली अवघ्या २ आहेत. मुलीला जन्मच नाकारला जातोय. महाराष्ट्रातील प्रगत जिल्हे असणार्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर,नगर, नाशिक पट्ट्यात मुलींची संख्या बीड नी जळगावचा अपवाद वगळता सर्वात कमी आहे.याउलट मागस भाग असलेल्या गोंदीया,गडचिरोली, चंद्रपुर,नंदुरबार मध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षणाने आणि आर्थिक प्रगतीने माणसे सुधारण्याऎवजी रानटी का बनतात? ती स्त्रीविरोधी का बनतात? ज्या २२ महानगरात सोनोग्राफी मशिन्स सर्वाधिक आहेत तिथे मुलींचे कत्तलखाने उघडले गेले आहेत.
स्त्री अत्याचारांच्या समस्येवर कठोर भुमिका घेतली जायला हवी. महिलांचे सर्व मानवी अधिकार त्यांना मिळायलाच हवेत.पुरुषी आणि भारतीय स्त्रिच्याही मानसिकतेत परिवर्तन व्हायला हवे. त्यासाठी जनजागरण,लोकशिक्षण आणि कायदे असा गोफ विनायला हवा. आज "रमा सावित्री घरोघरी! जोतीभीमाचा शोध जारी!" अशीच घोषणा देण्याची गरज आहे.
Friday, March 1, 2013
समृद्ध आणि शाश्वत मराठी भाषा
{दिव्य मराठी, दि.२६ फ़ेब्रुवारी २०१३} |
अमृतातेही पैजा जिंकणार्या आणि भाषामाजी भाषा साजरी असणार्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला आहे. आजवर तामिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्या खंडासह जोडलेले/असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता येते. मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा अडथळा आहे. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे आणि तिचे वय एक हजार वर्षांपेक्षा कमी आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आली आहे. प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झाला आहे. या वेगवेगळ्या भाषा नसून, ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठीतले आद्यग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व र्शीमंत झाल्यानंतरचे र्शेष्ठ ग्रंथ आहेत. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वष्रे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे. पाणिनीच्या समकालीन वररुची (कात्यायन) याने लिहिलेला 'प्राकृत प्रकाश' हा व्याकरण ग्रंथ ख्यातनाम आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे 80 ग्रंथांमध्ये मराठी भाषा - त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे आवश्यक नियुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक) यांचा समावेश आहे. रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, असे त्यात म्हटले आहे. 'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.' मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची भाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या लोकभाषांमधून ती तयार झाली आहे. अशाच दुसर्या एका लोकभाषेतून संस्कृत जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम झाला आहे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या al145सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वष्रे अस्तित्वात असली पाहिजे. महारठ्ठी-मरहठ्ठी- र्महाटी-मराठी असा उच्चारभ्रमाचा प्रवास 'महाराष्ट्री हे महारठ्ठी'चे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. 'महाराष्ट्रार्शया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलत: ही भाषा महाराष्ट्राचीच, हे नि:संशय. शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते व साम्य आहे, हे अनेक उदाहरणांवरून व व्युत्पत्त्यांवरून सिद्ध होते. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. ज्ञानेश्वरीत मराठी भाषेला 'र्महाठी' या शब्दाबरोबरच 'देशी' हा शब्दही वापरलेला आहे. किंबहुना मराठीचे 'देशी' हेच नाव अधिक रूढ होते. अपभ्रंश भाषेचे साहित्यांतर्गत नाव 'देसी' असेच आहे, अपभ्रंश नव्हे. या देसीचा विकास होऊन जी भाषा निर्माण झाली ती देशी किंवा मराठी. ती अपभ्रंशाच्या 'नागर' या प्रकारापासून निघाली. पुढे वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्तयार्शय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो. वात्स्यायन, वररुची व दंडी यांनी केलेले महाराष्ट्राचे उल्लेख प्रसिद्धच आहेत. राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो. शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्यांच्या संशोधनातून मराठीबाबत एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार आहे. (साभार - लोकराज्य,फ़ेब्रुवारी२०१३) |