Thursday, May 16, 2013

'रिंगणा'तल्या संपन्न अनुभवाचे 45 दिवस

 (प्रमिती नरके)


Sunday, April 14, 2013 AT 02:30 AM (IST)
"बर्टोल्ट ब्रेख्तचं वैचारिक नाटक बसवण्याच्या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळालं. "आंतररूप ते बाह्यरूप' या पद्धतीनं ग्रुशाची भूमिका मी सादर केली. कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही काहीतरी नवं गवसल्यासारखं वाटलं...'' ललित कला केंद्रातल्या विद्यार्थिनीनं शब्दबद्ध केलेला हा अनुभव... 

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. "ललित'च्या नाट्य विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण भोळे यांचं गेल्या पाच वर्षांपासूनचं स्वप्न होतं, की "व्ही लान्झी हे "बर्टोल्ट ब्रेख्त' लिखित जर्मन नाटक सादर करावं. हे स्वप्न या वर्षी साकारलं जाणार असल्याची सूचना लागली होती. या नाटकाचं "रिंगण" हे मराठी रूपांतर "द कॉकेशिअन चॉक सर्कल' या एरिक बेंटलीच्या इंग्रजी भाषांतरावरून सरांनी स्वत: केलं. या नाटकाच्या ऑडिशनसाठी "इसापनीती'मधली एक गोष्ट तात्पर्य पटवून देण्यासाठी सादर करायची, असं जाहीर झालं. याआधी जितकी नाटकं आम्ही बसवली, पाहिली, ऐकली, त्या वेळी कधीच ऑडिशन झाली नव्हती. ही ऑडिशन संगीत आणि नृत्याच्या विद्यार्थ्यांनाही खुली होती. प्रत्येकानं आपापल्या परीनं वेगवेगळे घटक वापरून गोष्टी सादर केल्या. त्यातून पहिल्याच दिवशी आम्ही शिकलो, की कोणत्याही गोष्टीचं एकच एक तात्पर्य नसतं, तर त्याला इतरही अनेक पैलू असतात. त्यामुळं नकळत विचारांची दिशा बदलली. वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून नाटकाकडं पाहण्याची वाटचाल सुरू झाली. पहिल्या आठवड्यात वेगवेगळे गट करून चिऊ-काऊची गोष्ट, लाकूडतोड्याची गोष्ट अशा लहानपणीच्या गोष्टी आजच्या काळाशी, समाजाशी जोडत, त्यातला राजकीय संदेश समोर यावा, अशा रीतीनं सादर केल्या. दुसऱ्या आठवडयात एमए च्या विद्यार्थ्यांनी ब्रेख्तच्या "एपिक थिएटर'विषयी आपापले शोधनिबंध सादर केले. त्यावरून आपण करत असलेल्या इम्प्रोवायजेशन्सचा नाटकाला कसा फायदा होणार आहे, याची कल्पना आली. यानिमित्तानं ब्रेख्तच्या कथक रंगभूमीचा, डाव्या विचारसरणीचा अभ्यास झाला. ऍक्‍टर-नॅरेटर संकल्पना,(अभिनेता-निवेदक) एलिअनेशन इफेक्‍ट, प्रेक्षकांना गुंतवून न ठेवता "हे' नाटक चालू आहे, ही जाणीव करवून देणं', 'स्थळ-काळ-वेळ बदल' या सर्व ब्रेख्तियन वैशिष्ट्यांशी परिचय झाला.

वेगवेगळ्या चाली, देहबोली, आवाज शोधून काढत प्रत्येकानं स्वत:साठी वेगळं असं "कॅरिकेचर' तयार केलं. माझ्यासाठी हे खूप नवीन असल्यामुळं यावर प्रेम जडलं होतं. तेव्हाच यातलं मुख्य पात्र "ग्रुशा" ही भूमिका मी करणार असल्याचं कळल्यावर प्रचंड आनंद झाला. हे पात्र नाटकातल्या इतर पात्रांपेक्षा वेगळं म्हणजेच वास्तववादी होतं. त्यामुळं शरीराच्या, आवाजाच्या विविध लकबी वापरण्यासाठी इतरांएवढा वाव नव्हता; परंतु ही एक मोठी जबाबदारी होती. याआधी उत्तरा बावकर, भक्ती बर्वे या नामवंत अभिनेत्रींनी "ग्रुशा' साकारली होती. सरांच्या मार्गदर्शनाखाली पात्रांचा अभ्यास करत असताना दोन पद्धती समोर होत्या. एक म्हणजे "बाह्य ते आंतररूप प्रवास' आणि दुसरी म्हणजे "स्टेनिसलावस्की पद्धती'नुसार "आं तररूप ते बाह्यरूप' असा उलटा प्रवास. सरांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करायला सांगितला. त्यानुसार नाटकाचं मुख्य उद्दिष्ट, प्रत्येक दृश्‍यामागचं उद्दिष्ट व त्यामागचं उद्दिष्ट आणि त्यात येणारे अडसर अशा पद्धतीनं "ग्रुशा" शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला.

यादरम्यान सरांनी आम्हाला काफ्काची न्यायाविषयी भाष्य करणारी एक प्रतीकात्मक कथा सांगितली. नाटकातील "अजदक' या पात्राचे न्यायाविषयीचे विचार हे वरवर पाहता मूर्खपणाचे वाटत असले, तरी ते अतार्किक नसून त्यामागचा ब्रेख्तचा राजकीय दृष्टिकोन समोर येण्यास या गोष्टीमुळं अधिक मदत झाली. या गोष्टीचा नाटकात अंतर्भाव केल्यामुळं न्यायाचा दरवाजा व त्याविषयी दोन विचारवंतांचे (ब्रेख्त व काफ्का) दोन वेगळे विचार प्रेक्षकांसमोर मांडले गेले.

अल्लड, मनमौजी जीवन जगणारी दासी ग्रुशा आपल्या सैनिक प्रियकराबरोबर उर्वरित आयुष्य सुखात घालवण्याचं स्वप्न रंगवत असतानाच राज्यात युद्धपरिस्थिती निर्माण होते. शत्रूच्या तावडीतून गव्हर्नरच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती प्रतिकूल परिस्थितींवर मात करत त्याला घेऊन पळून जाते व त्याचा सांभाळ करते. युद्ध संपल्यावर अचानक त्याची फरार झालेली खरी आई उगवते आणि संपत्तीच्या वारसासाठी त्याच्यावर हक्क सांगू लागते. न्यायाधीश अजदक याचा निकाल देण्यासाठी विक्षिप्त अशी, रिंगणातून मुलाच्या खेचाखेचीची, परीक्षा घ्यायला सांगतो. मुलाच्या प्रेमापोटी ग्रुशा त्याचा त्याग करते; पण शेवटी अनपेक्षितपणे तिला मुलाचा ताबा मिळतो. अजदकने दिलेले न्याय-निवाडे हे एका वेगळ्याच दिशेनं विचार करायला लावतात. असं हे छोटी उपकथानकं असलेलं गुंतागुंतीचं नाटक.

प्रयोगाला बारा दिवस उरलेले असताना सरांनी धक्काच दिला. नाटकातला तुटका पूल पार करण्याचा प्रसंग ग्रुशा दोरीवरून चालून करेल, असं त्यांनी सांगितलं. मला वाटलं, सर चेष्टा करत आहेत; पण दुसऱ्या दिवशी खरंच प्रॉपर्टीज्‌मधून एक लांबलचक दोरखंड बाहेर निघाला. साधारण दहा फूट उंचीवर दोन खांबांना तो बांधला गेला आणि सुरू झाली "तारेवरची कसरत'! नाटकाच्या तालमीव्यतिरिक्त ही दोरावरून चालण्याचीही तालीम सुरू झाली. पहिल्याच प्रयत्नापासून आपण करू शकू, असा आत्मविश्‍वास वाटू लागला. रंगीत तालमीपर्यंत तर, आपण यात तरबेज झालो आहोत, असं वाटू लागलं होतं. पहिल्या प्रयोगाला खचाखच गर्दी झालेली असताना दोरीवरून काही पावलं चालून गेल्यावर अचानक पाय घसरला आणि प्रेक्षकांमधून "स्स्‌ऽऽऽ' असा स्वर ऐकू आला. मी दोन्ही हातांनी दोरीला लटकत होते. माझं हृदय इतक्‍या वेगानं धडधडत होतं, की मला वाटलं, ते छाती फोडून बाहेर उडीच मारेल की काय! आपण साऱ्या सीनचा विचका केला, ही जाणीव टोचत होती आणि मी हातानंच दोरीला लोंबकळत पुढं पुढं जाऊ लागले. अर्धा रस्ता पार झाला आणि हातांतला जीव संपला, त्यासरशी ग्रुशा दोन हजार फूट दरीमध्ये पडली! पण या भूलचुकीकडं प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलं आणि प्रयोग पूर्णत्वास गेला. तालमीत एकदाही न पडता प्रयोगात मात्र फजिती झाल्यानं माझा आत्मविश्‍वास खूपच खच्ची झाला होता. मात्र सर, रूपालीताई आणि माझे सर्व सहकलाकार यांच्या पांठिब्यामुळं पुढचे दोन्ही प्रयोग दणक्‍यात पार पडले आणि विशेषत: या सीनला प्रचंड टाळ्या पडल्या.

हे नाटक "ललित'च्या अंगणमंचात सादर झालं. तिन्ही प्रयोग हाऊसफुल होते. काही प्रेक्षक तर तिन्ही प्रयोगांना आले होते. मकरंद साठे यांनी "नाटकात 46 जण वेगवेगळे न वाटता सर्व जण एकात्म दिसत होते. प्रत्येकाला आपण काय आणि कशासाठी करतोय, याची स्पष्ट जाणीव असल्याचं दिसलं,' अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली. या यशाचं पूर्ण श्रेय भोळेसरांना जातं. त्यांनी सुरवातीपासूनच आमच्या मनावर हे बिंबवलं, की "नाटकाचा प्रयोग महत्त्वाचा नसतो, तर प्रोसेस महत्त्वाची असते.' त्या प्रक्रियेतून केवळ नट म्हणूनच नव्हे; तर माणूस म्हणूनही आम्हाला खूप काही नव्यानं गवसलं.

सरांनी प्रत्येक विद्यार्थी-नटाला, लेखकाचं म्हणणं काय आहे, याची जाणीव करून दिली. प्रत्येकाचं त्याबद्दल स्वतःचं मत तयार होत गेलं व त्यातून या नाटकाचा प्रयोगाविष्कार साकार झाला. दत्तप्रसाद रानडे यांनी संगीत, निरंजन गोखले यांनी प्रकाशयोजना तर परिमल फडके यांनी नृत्यदिग्दर्शन जीव ओतून केलं. नाटकाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग असलेल्या रूपाली भोळे म्हणजे आमची लाडकी रूपालीताईच बनली. 45 दिवसांचा ही शैक्षणिक अनुभव...! पण तरीही जणू काही "पिकनिक'च वाटावी, असा हा अनुभव होता, एवढं खरं.