Showing posts with label ओबीसींचे राजकीय आरक्षण. Show all posts
Showing posts with label ओबीसींचे राजकीय आरक्षण. Show all posts

Sunday, December 12, 2021

राजकीय आरक्षण पुन्हा एकदा गेल्याने ओबीसी संकटात-- प्रा. हरी नरके

सर्वोच्च न्यायालयाच्या विकास किसन गवळी निकालाने [४/३/२०२१रोजी] रद्द केलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ओबीसींचे २७% आरक्षण राज्य सरकारने वटहुकुम क्र. ३/२०२१ द्वारे पुनरप्रस्थापित केले होते. राहूल रमेश वाघ [धुळे] यांच्या याचिकेवर ६ डिसेंबरला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारचा हा अध्यादेश स्थगित केलेला आहे. त्यामुळे सध्या चालु असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुका व दोनेक महिन्यात येणार्‍या पुणे, मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या मिनी विधानसभा मानल्या जाणार्‍या महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी राजकीय आरक्षण असणार नाही. मंगळवारी नुकताच राज्य निवडणुक आयोगाने तसा आदेशही लागू केलेला आहे. ओबीसींचे पंचायत राज्यातील हे राजकिय आरक्षण अशारितीने पुन्हा संकटात का सापडले आहे?


श्री. वाघ यांच्या याचिकेवरचा हा ताजा निकाल सहा पृष्ठांचा असून त्यात सर्वोच्च न्यायालयाने हा वटकुहुम स्थगित करण्यामागची कायदेविषयक भुमिका स्पष्ट केलेली आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे- ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यात १९९४ साली प्रथमच देण्यात हे ओबीसींचे राजकिय आरक्षण कृष्णमुर्ती [२०१०] निकालाने वैध ठरवण्यात आले होते. मागास प्रवर्गाला घटनेच्या २४३ व्या कलमात दुरुस्ती करुन हे आरक्षण देण्याचे श्रेय राजीव गांधी व नरसिंहराव यांचे आहे. महाराष्ट्रात हे आरक्षण ५६००० ओबीसी व भटक्यांना मिळू लागले होते ते शरद पवार व छगन भुजबळ यांच्यामुळे. संपुर्ण देशात या आरक्षणाचे लाभार्थी ११ लाख इतके असुन ते सगळेच सर्वोच्च न्यायलयाच्या एका फटक्यात पदं गमावून बसलेत. त्यात त्यांचा दोष काहीच नाही. ओबीसी आरक्षण वैध असताना आरक्षित पदं कशी काय गेली? तर पाच न्यायाधिशांच्या घटनापिठाने २०१० साली ह्या आरक्षणाची अंमलबजावणी करताना तीन कसोट्यांचे पालन करणे बंधनकारक ठरवले होते. त्याचीच आठवण गवळी व वाघ निकालपत्रात न्यायमुर्ती ए.एम. खानविलकर व न्या. सी. टी. रविकुमार यांनी राज्य सरकारला करुन दिलेली आहे. यातली पहिली कसोटी म्हणजे या समाजघटकाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगार, आरोग्य विषयक मागासलेपण सिद्ध करणारी आकडेवारी जमा करुन त्यानुसार मागासवर्ग आयोगाकडून शिफारशी घेणे. दुसरी ओबीसी-भटक्यांचे प्रतिनिधित्व सिद्ध करणे व तिसरी कसोटी म्हणजे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व हे समाज घटक या सर्वांची आरक्षणे एकत्र केली तर ती संख्या ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही याची दक्षता घेणे. राज्य व केंद्राने ही अनुभवजन्य आकडेवारी जमवायची होती त्यात हे दोघेही कुचकामी ठरलेत. 


मविआ सरकारचा सदर अध्यादेश ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन करीत असला तरी मागास प्रवर्गाला सरसकट २७ % आरक्षण तो देतो आणि त्यासाठी मागासपण व प्रतिनिधित्व सिद्ध करणारी [आकडेवारी] माहिती आयोगाकडून घेत नाही. इंपिरिकल डेटा जमा करण्याचे हे काम राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाकडे २९ जून २०२१ ला सोपवले असले तरी त्याचा अहवाल येईपर्यंत हा वटहुकुम काढायला नको होता असे न्यायालय म्हणते. थोडक्यात डेटा नाही तर आरक्षण नाही अशी न्यायालयाची कडक भुमिका आहे. ठाकरे सरकार हा डेटा तीन पद्धतीने मिळवू शकते.


[१] मनमोहन सिंग सरकारने २०११ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या लोकसभेतील ठरावानुसार ओबीसींची सामाजिक-आर्थिक- जात जनगणना २०११ केली होती. ही स्वातंत्र्यानंतर प्रथमच होत होती. त्या ठरावामागे छगन भुजबळ यांनी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्यामार्फत सर्वपक्षीय १०० खासदार उभे केले होते. हा डेटा जमवला पण तोवर २०१४ साली मोदी सरकार आले. गेली सात वर्षे हा डेटा मोदी राज्यांना देत नाहीयेत. आजवर १८ राज्यांनी तो मागितला त्यात भाजपची सत्ता असलेलीही राज्ये आहेत पण मोदी सरकार सर्वांनाच नकार घंटा वाजवित आहे. ही आकडेवारी ही राष्ट्रीय संपत्ती असून ती जमवण्यासाठी भारत सरकारचे पाच हजार कोटी रुपये खर्ची पडलेले आहेत. उद्धव ठाकरे व अजित पवार पंतप्रधान मोदींना दिल्लीत जाऊन भेटले व डेटाची लेखी मागणी केली. या आधी राज्यात देवेंद्र फडणविस सरकार असताना त्यांनी स्वत: १ ऑगष्ट २०१९ रोजी भारत सरकारला पत्र लिहून हा डॆटा मागितला होता. त्यांच्या काळात अशी वीस पत्रे लिहिली गेली पण मोदींनी या पत्रांना केराची टोपली दाखवली.


२] राज्यांनी मागूनही मोदी सरकार हा तयार ओबीसी डेटा देत नाही. २०२१ च्या नव्या जनगणनेतही तो जमवणार नाही असे लोकसभेला त्यांनी सांगितले आहे. म्हणजे डॆटा अभावी ओबीसी आरक्षण कायमचे जावे यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. कारण मोदी सरकार सामाजिक न्यायविरोधी आहे. डेटा द्या अशी विनंती करून राज्यं थकली. सर्वोच्च न्यायालयात मविआ सरकारने तशी याचिकाही दाखल केली. त्याच्यावर मोदी सरकार वेळकाढूपणा करीत बसलेय.  सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला तसा आदेश द्यावा ही राज्याची मागणी न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान ओबीसी डेटा नाही तर आरक्षण नाही असा निकाल याच न्यायालयाने दिलेला आहे. मला भारतीय न्यायसंस्थेविषयी आदर आहे. न्यायसंस्था नि:पक्षपाती असायला हवी असे राज्यघटना सांगते. जातीचे भांडवल पाठीशी असणाऱ्यांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाला मोदी सरकारने दिलेल्या १०%  [ EWS ] आरक्षणाची गेल्या ३ वर्षात सुनावणी घेतली गेलेली नाही. नरसिंहराव सरकारने दिलेले हेच आरक्षण १६/११/१९९२ ला नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने रद्द केलेले होते. आत्ताही गुजरात व मद्रास हायकोर्टानी हे आरक्षण रद्द केलेले आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही. हा न्यायालयाचा अधिकार असला तरी केवळ न्याय होणे पूरेसे नाही, तर तो झालाय असे जनतेला वाटले पाहिजे. मराठा व ओबीसी आरक्षणाचे निकाल तातडीने येतात. पण आर्थिक दुर्बलांना दिलेल्या या १०% आरक्षणाची छाननी अद्याप होत नाही हे अनाकलणीय आहे.


मोदी २०११ च्या सा-आ-जा- जनगणेचा हाच डॆटा रोहिणी आयोगाला देतात. त्याद्वारे ओबीसीचे तुकडे पाडले जातात. रोहिणी आयोगाचे पहिले पदसिद्ध सदस्य जनगणना आयुक्त सुरेश जोशी हे आहेत. त्यांच्या ताब्यात हा ओबीसी डॆटा आहे. त्यामुळे रोहिणी आयोगाल ही माहिती दिलीच नाही हा भाजपाचा दावा फोल ठरतो. ह्या ओबीसी डेटाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या अरविंद पनगारिया समितीवर मोदींनी ५ वर्षात एकही सभासद नेमला नाही. दररोज अठरा तास काम करणार्‍या पंतप्रधानांना त्यासाठी अद्याप वेळ मिळलेला नाही. त्यामुळे समितीची एकही बैठक झाली नाही. असे याच सरकारने संसदेला सांगितलेय. त्यामुळे या दीड टक्का चुका दुरुस्त केल्या गेलेल्या नाहीत. नेहमीच्या दशवार्षिक जनगणनेत १० टक्के पर्यंतच्या चुका असल्या तरी ती आकडेवारी प्रमाण मानली जाते पण ओबीसीच्या या आकडेवारीत अवघ्या दीड टक्के चुका असुनही ती आकडेवारी मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वापरायला अयोग्य असल्याचे मोदी सरकार सांगते. त्यांचे हे वागणे ढोंगीपणाचे आहे. 


तिसरा मार्ग म्हणजे राज्य सरकारने स्वत: राज्य मागासवर्ग आयोगामर्फत हा इंपिरिकल डेटा जमवणे. या सरकारने त्याकामातले मोलाचे नऊ महिने वाया घालवलेले आहेत. यामागे राज्य सरकारमधील निव्वळ समन्वयाचा अभाव आहे कि राजकिय इच्छाशक्तीचा? गेले पाच महिने आयोगाला ह्या कामासाठी आवश्यक तो निधी,यंत्रणा, कार्यालय व कर्मचारी का दिले गेले नाहीत याचे उत्तर ठाकरे-पवार सरकारमधील विजय वडॆट्टीवार, एकनाथ शिंदे व हसन मुश्रीफ या तीन मंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे.


ओबीसींवरील हे संकट मानवनिर्मित असून ते उद्भवण्यामागे " युथ फॉर इक्वालिटी," "सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन", श्री. गवळी, श्री. वाघ हे लोक असले तरी त्यांचे सुत्रधार मात्र आरक्षणमुक्त भारतवाले रा. स्व. संघ, भाजपा, मोदी व फडणवीस आहेत. त्यांना मुळात राज्यघटनेतला सामाजिक न्यायाचा अजेंडाच मान्य नाही. त्यामुळे आम्ही दिले होते पण न्यायालयाने काढून घेतले असा देखावा करता यावा असे "गेम" संगनमताने केले जात आहेत का? या निकालाचे दुसरे अपश्रेय मविआ सरकारचेही आहेच. उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधील बहुजन कल्याण खाते, ग्रामीण विकास खाते, नगरविकास खाते आणि विधी व न्याय खाते या चौघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. एक दुसर्‍याकडे बोट दाखवित नामानिराळे राहत आहेत. तुमचा खेळ होतो पण दुबळे, असंघटित इतर मागासवर्गीय व भटके विमुक्त यांचा घटनात्मक हक्क हिरावला जातो याचे सोयरसुतक त्यांना नाही.


हा अध्यादेश काढण्याचा हट्ट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा होता. त्यांचा हा बदसल्ला मविआ सरकारने मान्य का केला? त्यामुळे हे सरकार तोंडघशी पडले आहे. आज भाजपची सत्ता जाऊन २ वर्षे झाली तरी अधिकारी फडणविसांचेच हुकुम ऎकतात. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत २ सर्वपक्षीय बैठका घेतल्या होत्या. त्या दोन्हीही फडणविसांनी खिशात घातल्या. तिन्ही सरकारी पक्ष आणि बाकीचे छोटेमोठे पक्ष फडणविसांच्या हो ला हो भरीत होते. विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी बैठका घेतल्या. या वटहुकूमांचे शब्दांकन वकील देवेंद्र फडणवीस यांचे आहे. 


मविआ सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी नाफडे वकील यांची नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाला राज्य सरकारची बाजू ते प्रभावीपणे मांडू शकले नाहीत. त्यांना या विषयाची माहिती देणारे मंत्रालयातले संबंधित खात्यांचे अधिकारी व या वकिलांचा अर्धवट युक्तीवाद यांची शिक्षा मागास समाजाला भोगावी लागत आहे.  

आरक्षणमुक्त भारताचे स्वप्न उरी बाळगणारे संघ-भाजपावाले सराईत खोटारडे नी दुटप्पी आहेत. अध्यादेश काढायला राज्य सरकारला फडणविस भाग पाडणार आणि तो फेटाळला गेला की लगेच त्या अध्यादेशाची होळी करीत "ओबीसी के सम्मानमे भाजपा मैदानमे" म्हणत ठाकरे सरकारविरुद्द आंदोलनही करणार. ही सगळी केविलवाणी नौटंकी ओबीसी मतपेढीसाठी चालू असल्याचे सुबुद्धजनांना कळून चुकलेय.

 

हा अध्यादेश अपुरा असल्याने तो न्यायालयात टिकणार नाही हे मी मिडियासमोर बोललो होतो, वर्तमानपत्रात तसे लिहिलेही होते. 

एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ व विजय वडेट्टीवार यांचे ओबीसींचे आरक्षण वाचवण्याचे काम निष्प्रभ ठरलेले आहे. त्यांनी राज्य मागास वर्ग आयोगाला ना निधी दिला, ना जागा दिली, ना कर्मचारी दिले, परिणामी इंपिरिकल डेटाचे काम गेली ५ महिने ठप्प आहे. शेजारच्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश व बिहार सारख्या ओबीसी जनगणनेत पुढे असलेल्या इतर राज्यांकडून मविआ सरकारने पाहिजे तर प्रशिक्षण घ्यावे.

मागास वर्ग आयोग स्वायत्त आहे. अर्धन्यायिक आहे. त्याला सरकारचे मंत्री वा अधिकारी आदेश देऊ शकत नाही याचे त्यांना भान नाही असे पत्रव्यवहारावरुन दिसते. आयोगाला याकामासाठी जो निधी द्यायचा आहे, त्यातले ७५ टक्के सरकारी कर्मचार्‍यांच्या मानधनापोटी खर्ची पडणार आहेत. न्यायालयाने वॉर्डनिहाय २८ हजार ग्रामपंचायतींचा सखोल सर्व्हे करायला सांगितला असताना थातुरमातुर पाहणी करुन तसा अहवाल सरकारला पाठवा असे आयोगाला सांगितले जाते. असा अहवाल न्यायलयात टिकणार नाही व सरकार पुन्हा तोंडघशी पडेल. हा तात्पुरत्या मलमपट्टीचा खेळ राज्य सरकारने बंद करावा. ओबीसी त्याची शिक्षा भोगत आहेत. ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींचे आरक्षण पुन्हा एकदा गेलेले आहे. हे अजाणता होते की संगनमताने? 

मराठा आरक्षणाच्या समन्वयासाठी जशी अशोक चव्हाण समिती आहे तशी एक समिती स्थापन करुन या चारही खात्यांची ओबीसी इंपिरिकल डेटाची कामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घ्यावीत. विद्युतवेगाने काम करीत जानेवारी २०२२ पर्यंत हा इंपिरिकल डॆटा जमवावा. तरच हे आरक्षण फेरप्रस्थापित होईल. बुद्धीभेदाच्या आणि नौटंकीच्या खेळात पटाईत असलेले मोदी-फडणवीस ओबीसी आरक्षण घालवण्याचे स्वत:चे कारस्थान दडवून राज्यसरकारच्या अपयशाचा पाढा वाचीत ओबीसींची सहानुभुती मिळवतील आणि ओबीसी मतपॆढी स्वत:कडे खेचून घेतील.

- प्रा. हरी नरके,

[लेखक राज्य मागास वर्ग आयोग व केंद्रीय नियोजन आयोगाच्या सल्लागार गटाचे यांचे माजी सदस्य आहेत. ]

Thursday, June 17, 2021

ओबीसींचे अतिरिक्त नव्हे तर सगळेच राजकीय आरक्षण गेलेय- प्रा. हरी नरके

 विकास किसन गवळी वि. महाराष्ट्र सरकार या निकालपत्राचा माध्यमांनी लावलेला अर्थ चुकीचा आहे. यामागे त्यांचे अज्ञान आहे की कटकारस्थान याचा शोध घ्यावा लागेल.

१] हा निकाल फक्त ५ जिल्हा परिषदांनाच लागु आहे काय?

उ- नाही हा निकाल महाराष्ट्रातील सर्व म्हणजे ३६ जिल्हे, [३४ जिल्हा परिषदा] २७ महानगर पालिका, ३६४ नगर परिषदा,नगर पंचायती, नगर पालिका, तालुका पंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना लागू आहे. गेले २५ वर्षे मिळणारे महाराष्ट्रातील सर्व राजकीय आरक्षण या निकालाने संपलेले आहे. यापुढे एकाही व्यक्तीला ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळणार नाहीये. या निकालाचा फटका सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना बसणार आहे.

२] हा निकाल संपुर्ण देशाला लागू आहे काय?

उ- होय. या निकालामुळे संपुर्ण देशातील,सर्व ओबीसींचे राजकीय आरक्षण संपलेले आहे. देशातील सुमारे ८ ते ९ लाख ओबीसी लोकप्रतिनिधींचे राजकीय आरक्षण या निकालामुळे संपलेले आहे.

३] सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के कायमचे बंद केले आहे काय?

उ- नाही. या निकालाने ओबीसींना दिलेले [ ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीद्वारे आलेले ] राजकीय आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण १०० टक्के, कायमचे बंद केलेले नाही. तर त्याची अंलबजावणी ३ अटींची पुर्तता होईपर्यंत संपुर्ण थांबवलेली आहे. ह्या अटी म्हणजे, ओबीसींची लोकसंख्या, त्यांचे मागासलेपण व त्यांचे प्रतिनिधित्व यांचा इंपिरिकल डेटा जमा केल्याशिवाय हे आरक्षण पुन्हा सुरु करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत अनु. जाती,जमाती व ओबीसी [विमुक्त भटके व विमाप्र यांच्यासह] यांचे राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाता कामा नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. याचा अर्थ फक्त ५० टक्क्यांवरचे आरक्षण गेले असे प्रिंट मिडीया व सर्व चॅनेलवाले सांगत आहेत. जे की चुकीचे, दिशाभूल करणारे व ओबीसींच्या अज्ञानावर, दु:खावर मिठ चोळणारे आहे. ५० टक्क्याच्या वरचे आरक्षण तर कायमचेच गेलेले आहे, ते आता कधीही मिळणार नाहीये. परंतु त्याच्या आतलेसुद्धा ओबीसी आरक्षण तीन अटींची पुर्तता करीपर्यंत गेलेले आहे. 

४] या तीन अटींची पुर्तता कशी व कधी होणार?

उ- केंद्र सरकारने [ मनमोहन सिंग सरकारने] २०११ सालच्या २ ऑक्टोबर पासून नेहमीपेक्षा वेगळी एक जनगणना केलेली आहे. तिचे नाव " सामाजिक-आर्थिक व जाती जणगणना २०११" असे आहे. ती रजिस्ट्रार जनरल यांच्यामार्फत केलेली नाही. त्यामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना व ही जणगणना यात गल्लत करू नये. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची आकडेवारी मोदी सरकारकडे गेली सात वर्षे पडून आहे. त्यांनी ती फक्त रोहिणी आयोगाला दिली होती. त्याच्या आधारे ओबीसीचे चार तुकडे करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. हा ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा कटच आहे,.

मोदी सरकारने ही माहिती महाराष्ट्र सरकारला दिली तर ओबीसीचे राजकीय आरक्षण ताबडतोब परत सुरु करता येईल. आता ओबीसींचे भवितव्य सुरक्षित करणे वा संपवणे हे मोदी सरकारच्या हाती आहे.

-प्रा. हरी नरके, १७/६/२०२१

Monday, May 31, 2021

ओबीसी व विजाभजच्या राजकीय आरक्षणावर कुर्‍हाड- प्रा. हरी नरके

 

प्रश्न १- ओबीसींना हे आरक्षण कुणी दिले होते ? कधी? हे आरक्षण फकत ओबीसींना होते काय?

उत्तर- ओबीसींचे पंचायत राज्यातील २७ टक्के राजकीय आरक्षण मंडल आयोगाची व घटना दुरुस्ती ७३ व ७४ यांची अंमलबजावणी करण्यासाठी १९९४ साली आले. श्री छगन भुजबळ व ओबीसी चळवळीच्या मागणीवरून हे आरक्षण श्री शरद पवार यांनी दिले होते.  हे २७ टक्के आरक्शण राज्यातील सर्व भटके विमुक्त,[अ,ब,क,ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना एकत्रित मिळून होते. शिक्षण आणि शासकीय नोकर्‍या यात भटके विमुक्त, [अ,ब,क,ड] यांना ११ टक्के, विमाप्र यांना २ टक्के व ओबीसी यांना १९ टक्के असे स्वतंत्र आरक्षण असले तरी राजकीय आरक्शण मात्र या तिघांनाही एकत्रित असे दिलेले आहे व ते ३२ टक्के नसून २७ टक्केच आहे. त्यामुळे निवडणुकीत विजाभज, विमाप्र व ओबीसी यांना एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते. त्यांना वेगळे वेगळे आरक्शण मिळत नाही. त्याच्यावर कुर्‍हाड तीन महिन्यांपुर्वी ४ मार्चला [२०२१] बसली असली तरी तमाम लाभार्भी व समाज, जाती, वर्ग सारेच गप्प आहेत. गाढ झोपेत आहेत बिचारे. डोक्यावरचे छप्पर गेले तरी निद्रेत असलेले हे सगळे  समाज राजकीय दृष्ट्या किती मागासलेले आहेत ते दिसतेच आहे.


प्रश्न २- हे आरक्षण कुठेकु्ठे होते? आहे?

उ- राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंयती, ३६४ पंचायत समित्या, नगर परिषदा, नगर पालिका, ३४ जिल्हा परिषदा व २७ मनपा यात हे आरक्षण होते.यात सर्व मिळून सुमारे २ लाख ५० हजार जागा आहेत. त्यातल्या २७ टक्के म्हणजे सुमारे ५६ हजार जागा ओबीसीला मिळतात.


प्रश्न ३- आजवर याचा लाभ किती ओबीसींना झाला?

उ- सुमारे ३ लाख ओबीसी स्त्रीपुरूषांना याचा लाभ झाला.


प्रश्न ४- हे आरक्षण कमी का गेले? 

उ-  विकास किसन गवळी यांनी सर्वोच्च न्यायलयात जाऊन या आरक्षणाला आव्हान दिले. ते सुप्रिम कोर्टाने मान्य केले आणि ह्या आरक्षणाची अंमलबजावणी थांबवली.


प्रश्न ५- गेले तर गेले, काय फरक पडतो?  या आरक्षणाची मुळात गरजच काय?

उ- मुळात देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरी देशाच्या राजसत्तेत तमाम भटके विमुक्त, [ अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना ४ टक्के सुद्धा प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आपला भारतीय समाज जातीपातींनी बनलेला आहे. आपली सामाजिक जाणीव ही मुलत: जातजाणीव आहे. त्यामुळे जो तो समाज स्वत:पुरते बघतो. ज्यांच्या हाती राजसत्ता त्यांच्या हाती देशाच्या तिजोरीच्या चाव्या. त्यामुळे त्यांचाच विकास. रोजगार, आरोग्य, शिक्शण आणि प्रशासन यात तेच. माध्यमात तेच.  परिणामी जे राजसत्तेत गैरहजर त्यांचा आवाज उमटतच नाही. इंग्रजी राजवट आपण का घालवली? तर ती परकी होती. गोरे गेले पण आले ते काळे कोण होते? आहेत?  मूठभर त्र्यवर्णिक सत्तेत आले. आरक्षणामुळे थोडी जागृती अनुसुचित जाती, जमातींची झाली. पण त्यांनाही त्यांचा हक्काचा वाटा मिळालेला नाहीच. मंडल आयोगामुळे व ७३/७४ व्या घटना दुरुस्तीमुळे भटके विमुक्त, [अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांना आत्ता कुठे मिळू लागले नाहीतर ते काढूनही घेतले गेले. 

या आरक्षणाचा फायदा असा झाला की तमाम भटके विमुक्त, [अ, ब, क, ड] व विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी यांचे राजकीय प्रशिक्शण होऊ लागले. राजसत्ता काय असते ते यांना कळू लागले. त्यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा जाग्या होऊ लागल्या. ते चक्क विधान सभा व लोकसभेला उमेदवारी [ तिकीटं] मागू लागले. त्यामुळे मालक लोकांची राजसत्तेवरची व गावगाड्यावरची पकड ढिली होऊ लागली. 


 अनु.जाती,जमाती, अल्पसंख्याक व हे घटक मिळून पंचायत राज्यात राजकारणाची नवी समिकरणं बनु लागली. हे काळ्या इंग्रजांना कसे खपावे?

हे आरक्षण गेल्याने यापुढे विजाभज, विमाप्र,  ओबीसी यांचे राजकीय प्रशिक्षण, जागृती आणि प्रतिनिधित्व जाणार. पुन्हा एकदा सगळी राजसत्ता मालक लोकांच्या हातात एकवटणार. अनु. जाती, जमातीही पुन्हा मागे फेकल्या जाणार. थोडक्यात या घटकांचा राजकीय अंत होणार. 


प्रश्न ६ - याचिकाकर्ते स्वत: कथित ओबीसी असताना त्यांनी असा पायावर दगड का पाडून घेतला असेल बरे?

उ- लहान मुलांना सुद्धा आपला स्वार्थ, { फायदा}  कळतो. पण मानसिक गुलाम असलेल्या ओबीसींना त्यांच्या स्वत:च्या हाताने मालक लोक घर जाळायला लावतात आणि हे दीडशहाणे अविचार करून बसतात. जे आत्मनाशाला, आत्महत्त्येला उत्सुक असतात त्यांना त्यांचे मालक ऑपरेट करीत असतात. ओबीसी हा स्वत:च्या धडावर परक्याचे डोके आणि तेही मेंदूविहीन वागवत असतात, असा आजवरचा इतिहास आहे,  अनुभव आहे. याचिकाकर्ते आपण ओबीसी असल्याचे सांगत असले तरी ते उच्चवर्णीय असल्याचे त्यांना ओळखणारे सांगतात. त्यांचे वडील आमदार होते.


प्रश्न ७- सुप्रिम कोर्टाचा निकाल विरोधात का गेला?

उ - स्वत:ला निवडणुक प्रचारापुरते ओबीसी म्हणवणार्‍या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २०१० ते २०१४ याकाळात मनमोहन सिंग सरकारने केलेल्या शैक्शणिक, आर्थिक, सामाजिक जनगणनेचे आकडे गेले सात वर्षे रेशीमबागेच्या आदेशावरून दाबून ठेवलेत नी २०१४ ते २०१९ याकाळात मुख्यमंत्री असलेल्या फडणविसांनी ओबीसी, भटकेविमुक्त, विमाप्र यांची जनगणना केली नाही म्हणून हा निकाल विरोधात गेला. हे पाप मोदी-फडणविसांचे आहे.  ही वाटचाल आरक्षणमुक्त, विषमतावादी हिंदुराष्ट्राकडे सुरु आहे. 


प्रश्न ८- आता पुढे काय?

उ- मविआ सरकारने ताबडतोब ओबीसी आयोग नेमुन ओबीसी, विजाभज, विमाप्र यांची जणगणना करावी व यांचे २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा द्यावे.


प्रश्न ९- सुप्रिम कोर्टाने कोणत्या तीन अटी घातलेल्या आहेत?


12. Be that as it may, it is indisputable that the triple test/conditions required to be complied by the State before reserving seats in the local bodies for OBCs has not been done so far. To wit, (1) to set up a dedicated Commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into the nature and implications of the backwardness qua local bodies, within the State; (2) to specify the proportion of reservation required to be provisioned local body wise in light of recommendations of the Commission, so as not to fall foul of overbreadth; and (3) in any case such reservation shall not exceed aggregate of 50 per cent of the total seats reserved in favour of SCs/STs/OBCs taken together. In a given local body, the space for providing such reservation in favour of OBCs may be available at the time of issuing election programme (notifications). However, that could be notified only upon fulfilling the aforementioned preconditions. Admittedly, the first step of establishing dedicated Commission to undertake rigorous empirical inquiry itself remains a mirage. To put it differently, it will not be open to respondents to justify the reservation for OBCs without fulfilling the triple test, referred to above.


१. राज्याने ओबीसी आयोग नेमून ओबीसींची जणगणना करावी.त्यांची लोकसंख्या, मागसपण आणि राजकीय प्रतिनिधित्व शोधावे. 

२. आयोगाने शिफारस केलेले प्रतिनिधित्व जास्त असल्यामुळे संविधानाने [सर्वोच्च न्यायालयाने] आखून दिलेली मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

आणि 

३.कोणत्याही परिस्थितीत अनु. जाती, जमाती व हे समाज घटक [ओबीसी, भटकेविमुक्त व विमाप्र] यांना सर्वांना मिळून दिलेले एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाता कामा नये.


प्रश्न १०- हा निकाल तर ठाकरे-पवार सरकारच्या काळात आला मग याला फडणविस जबाबदार कसे?

उ- हा निकाल जरी तीन महिन्यांपुर्वी आला व त्यावरची पुनर्विचार याचिका जरी दोन दिवसापुर्वी फ़ेटाळली गेली तरी हा निकाल ज्या कृष्णमुर्ती निकालावर आधारित आहे तो निकाल फडणविसांच्या काळातला आहे. फडणविसांना हे माहित होते की ओबीसी, विजाभज, विमाप्र यांची जनगणना केल्याशिवाय हे आरक्षण टिकनार नाही, तरिही त्यांनी जनगणना केली नाही. कारण त्यांचा रिमोट ज्यांच्या हाती होता तेच सामाजिक न्यायाच्या विरोधी, विषमतावादी, जातीयवादी, उच्च जातीवर्णवादी आहेत. चोराच्या उलट्या बोंबा म्हणून ओबीसींचा पुळका दाखवत असले तरी हे लोक  आरक्शणविरोधी आहेत.

- प्रा. हरी नरके,

३१ मे २०२१

Saturday, March 6, 2021

विदर्भातील पाच जिल्ह्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले-

 आरक्षणाची मर्यादा ५०% च्या वर गेल्याने विदर्भातील पाच जिल्ह्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले- प्रा. हरी नरके


विदर्भातील वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर व गोंदीया या पाच जिल्ह्यातील पंचायत राज्यातील आरक्शणाची मर्यादा १ ते ९ टक्क्यांनी ओलांडली गेल्याने ते ताबडतोब रद्द करून तेथे खुल्या जागांमधून निवडणुक घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने परवा दिले.

१. वाशिम,( ५ ते ६ टक्के ज्यादा,)  २. भंडारा (१ ते २ टक्के,)  ३. अकोला (८ ते ९ टक्के,)  ४.नागपूर व ५. गोंदीया  (६ ते ८ टक्के,)  

इतर मागास वर्गियांना पंचायत राज्यात १९९४ पासून घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आलेले २७ टक्के राजकीय आरक्षण आणि आधीपासूनचे अनु.जाती/जमातींचे आरक्षण हे मिळून जर ५० टक्यांच्या वर जात असेल तर ते ताबडतोब रद्द करण्यात आल्याचे हा निकाल सांगतो.

न्यायालय म्हणते आरक्षण देण्याची तरतुद घटनेत असली तरी तो मुलभूत हक्क नाही. सरकारला ते देता येते याचा अर्थ दिलेच पाहिजे असे बंधन नाही. तशी तरतूद आहे म्हणजे तो हक्क बनत नाही.

१९९४ पासून गेल्या २७ वर्षात पंचायत राज्यातील या आरक्षणाचे सुमारे ५ लाख ओबीसी लाभार्थी असले तरी ओबीसी आरक्षण जेव्हा धोक्यात येते तेव्हा यातला एकही जण लढायला पुढे येत नाही. अशा स्वार्थी आणि आप्पलपोट्या लोकांसाठी आपण का लढावे असा प्रश्न मला अनेकदा पडतो. जे मुर्दाडच आहेत ते जिवंत असले काय आणि नसले काय? काय फरक पडतो?


( विकास किसनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार व इतर रिट पिटीशन सिव्हील ९८०/२०१९ व इतर

निकाल दि. ४ मार्च, २०२१ बेंच- न्या. ए.एम.खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. अजय रस्तोगी ) 


-प्रा. हरी नरके,

०६/०३/२०२१