Tuesday, March 7, 2017

सहीसाठी पैसे मागणारी गायिका

[छायाचित्रात डावीकडून शांताबाई शेळके, भारतरत्न लता मंगेशकर, डा.वि.दा.कराड,
मागील रांगेत लता मंगेशकर यांच्यामागे अंशत: दिसणारा आणि काही प्रमाणात झाकलेला तो चेहरा माझाच आहे, शेजारी आहेत प्रा. सुरेश द्वादशीवार]
.....................................................................
आवडत्या लेखक/लेखिकांची पुस्तके शक्यतोवर प्रकाशन समारंभातच विकत घ्यायची मला सवय आहे.
पुस्तकाची ती प्रत जपून ठेवताना मी एक करतो, त्या पुस्तकावर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लेखकांच्या/मान्यवरांच्या सह्या घेऊन ठेवतो.
माझ्याकडे असे शेकडो ग्रंथ आहेत.
आळंदीच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात मी त्यावेळी म.सा.प.चा पुणे जिल्हा प्रतिनिधी व अ.भा.म.सा.महामंडळावरही प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याने प्रमुख पदाधिकारी होतो.
उद्घाटन समारंभामात आम्ही "पसायदान" ही स्मरणिका प्रकाशित केली.
पहिल्या प्रतीवर मी मंचावरील संमेलनाध्यक्ष शांताबाई शेळके, पुर्वाध्यक्ष नारायण सुर्वे आणि इतर अनेक लेखकांच्या सह्या घेतल्या.
संमेलनाच्या उद्घाटक एक नामवंत गायिका होत्या. देशातील सर्वाधिक लोकप्रिय गायिका असा त्यांचा लौकिक आहे. मलाही त्यांची गाणी आवडतात. त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देण्यात आलेला आहे.त्यांनी भलीमोठी रक्कम मानधन आकारूनच आमचा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम स्विकारलेला होता. त्यात त्यांच्या भावाचा गाण्याचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला नको असतानाही घ्यायला लावला होता.
साहित्य संमेलनाचे त्यांना निमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्यांचा जवळून परिचय झाला होता. अनेकवार भेटीगाठी झाल्या होत्या.
मी त्यांना सही मागताच त्यांनी माझ्याकडे व पुस्तकाकडे पाहून परत इतरत्र पाहायला सुरूवात केली.
शांताबाई त्यांना माझ्याबद्दल सांगू लागल्या. शांताबाईंनी अजिजीने सांगुनही त्यांनी सही केली नाही.
त्या म्हणाल्या, "मी पैसे घेतल्याशिवाय पुस्तकावर सही करणार नाही."
त्यांनी मागितलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेरची होती. त्यांनी सही केली नाही याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.
अतिशय वाईट वाटून मी माझ्या जागेवर जाऊन बसलो. शांताबाईही नाराज झाल्या.
उद्घाटन कार्यक्रम संपल्यावर शांताबाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, " असू दे. असतो एकेकाचा स्वभाव. ती माझी अतिशय जवळची मैत्रिण आहे. तिच्याकडे गडगंज संपत्ती आहे. काय करणार आहे माहित नाही त्या अफाट संपत्तीचं? पण जिला माणसांची आणि ग्रंथांची किंमत नाही ती माझ्या दृष्टीने ****!"
प्रकाशन समारंभाला उपस्थित असूनही पुस्तकावर फक्त एका मान्यवराची सही नसलेलं एव्हढं एकच पुस्तक माझ्याकडं आहे. बाकी सर्व पुस्तकं मात्र अनेकांच्या सह्यांची आहेत.
त्यांनी त्यांच्या सहीसाठी माझ्याकडे मागितलेली ती मोठी रक्कम मी त्यांना आता देऊ शकतो. माझी जास्त नसली तरी तेव्हढी ऎपत आज नक्कीच आहे.
काही किरकोळ शंका मात्र आहेत.
त्या राज्यसभेवर 6 वर्षे असताना दरवर्षी मतदारसंघाच्या विकासासाठीचा खासदारांना देण्यात येणारा दोनअडीच कोटी रूपयांचा निधी त्यांनी स्वत:च्या खाजगी मालकीच्या दवाखान्याला दिल्याचे सांगितले जाते.
त्यांनी सदर दवाखान्याची कोट्यावधी रूपयांची मोक्याची जागाही सरकारकडून फुकटच घेतलेली आहे.
या दवाखान्यात सामान्य पेशंटची लूट करण्यात येते असा आरोप केला जातो.
बाईंनी स्वत:च्या आईचे नाव इंदूरच्या रसिकांना नाट्यगृहाला द्यायला सांगितले. इंदूरकरांनी त्यांच्या शब्दावर विसंबून ते दिले. मात्र आजही बाईंनी त्यांना कबूल केलेली कवडीही दिलेली नाही. आजही ते नाट्यगृह सुविधांविना अपुरेच राहिलेले आहे. आपल्या घरासमोर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुल बांधल्यास आपण देश सोडू अशी धमकी देऊन त्यांनी पुलाचे काम रोखले. दुबईत मात्र त्यांच्या घरासमोर रातोरात ओव्हरब्रिज उभा राहिला. बाईंनी त्याविरूद्ध ब्र शब्द उच्चारलेला नाही.
वरील सर्व आरोपातील खर्‍याखोट्याची शहानिशा मी करू शकलेलो नाही. आणि तसेही "भारतरत्न" असे कसे करतील?
मला त्यांच्याविषयी आजही अपार आदर आहे. आज त्यांची सही घेण्याची मला इच्छा उरलेली नाही.
....................

No comments:

Post a Comment