Saturday, March 18, 2017

नवे योगीपर्व धर्मसंसदेचे --श्रीमान अजय सिंग उर्फ योगी आदित्यनाथ यांची निवड युपीच्या मुख्यमंत्रीपदी झाली आहे.
बहुसंख्य लोकशाहीवादी या निवडीने संतप्त आहेत तर धर्मवादी तिचे स्वागत करीत आहेत. यापुढे धर्मसंसद हीच लोकसंसद. युपीत भाजपाला 325 जागा मिळाल्यात. त्यांनी अव्वल लोकशाहीचे सकारात्मक, प्रामाणिक आणि पारदर्शी पालन करून ही निवड केलेली आहे, आपण तिच्याविरूद्ध ब्र  उच्चाराल तर याद राखा.

या निवडीमुळे देशातली धर्मसंसद अधिक मजबूत होणार आहे. उत्तरप्रदेश हे देशातले सर्वात मोठे राज्य आहे. एव्हढे मोठे की तो जर स्वतंत्र देश मानला तर जगातील 233 देशातला तो आठव्या क्रमांकाचा देश असेल. आदित्यनाथ यांच्या मते प्रत्येक हिंदूने किमान दहा मुले जन्माला घातली पाहिजेत. हे टार्गेट ठेवून त्यांनी ही पाच वर्षे काम केले तर युपी लवकरच जगातला किमान चौथ्या क्रमांकाचा देश बनेल.

युपीने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिलेत. 2019 सालचा पंतप्रधानही देण्याची महत्वाकांक्षा युपीला बाळगता येईल. सलग पाचव्यांदा खासदार झालेला नेता सहाव्यांदा खासदार होऊन पीएम बनू शकतो.तसेही मोदी जरी गुजरातचे असले तरी निवडून युपीतूनच आलेत.

ज्या देशात 600 पैकी 100 जिल्हे असे आहेत की ज्यात मुस्लीमांना वगळून निवडणु्काच जिंकता येत नाहीत.  उ.प्र.मध्ये त्यातले सर्वाधिक जिल्हे असूनही एकही मुस्लीम उमेदवार न देता भाजपाने लोकसभेला 73 आणि आता विधानसभेत 325 आमदार निवडून आणण्याचा हा राजकीय चमत्कार कसा घडवला? हे एक कोडेच आहे. त्या यशाचे खरे शिल्पकार योगीच आहेत. त्यामुळे हे धर्मसंसदेचे नवे योगीपर्व आहे.

ते हिंदु-मुस्लीम धृवीकरणावर आधारित वादग्रस्त राजकारण करतात, त्यांनी धर्म परिवर्तन विरोधात मोहीम सुरू केली, ते घरवापसी अभियानाचे प्रणेते आहेत,
ते गोवंश संरक्षक आहेत आणि म्हणूनच त्यांना युपीचे मुख्यमंत्री करण्यात आलेय.

त्यांनी जातीय दंगली घडवल्या, त्यांनी मुस्लीमांना टार्गेट केले, ते मसिद पाडण्याचे कट्टर समर्थक आहेत असे आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत. आता एकतर ते सर्व गुन्हे मागे तरी घेतले जातील किंवा त्यांना रितसर क्लीनचिट तरी मिळेल. लोकशाही जिंदाबाद!

योगी सतत वादग्रस्त आणि झंजावाती वक्तव्ये करतात आणि प्रकाशझोतात राहतात.
लव जिहाद प्रकरणी ते गरजले, एका हिंदू मुलींचे धर्म परिवर्तन केले तर आम्ही १०० मुस्लिम मुलींचे धर्मपरिवर्तन करू [आगस्ट २०१४]

दादरी तथाकथित मांस प्रकरणात ते वदले, अखलाक पाकिस्तानात गेला होता त्यानंतर त्याच्या वर्तणूकीत फरक पडला.
देशांतील सर्व मशिदीत गणेशमूर्ती स्थापन करू अशीही त्यांची संघगर्जना आहे. ते म्हणतात, मक्केमध्ये जर बिगरमुस्लिम जाऊ शकत नाही, वॅटिकन सिटीत बिगरख्रिश्चनांना प्रवेश वर्जित आहे, मग आमच्याकडेच सर्वांना प्रवेश कशाला?  [फेब्रुवारी २०१५]

हरिद्वारमधील 'हर की पौडी' येथे बिगरहिंदूंना प्रवेशबंदी घालावी. [आगस्ट २०१५]

योगाला विरोध करणा-यांनी भारत सोडून जावे. सुर्यनमस्कार न घालणा-यांनी समुद्रात उडी मारून जीव द्यायला पाहीजे. यापुढे सांगितले जाईल योगीला विरोध करणारांनी पाकीस्थानात जावे.

अशी धर्मवादी, प्रक्षोभक, वादग्रस्त आणि एकांगी विचारधारा असणारा नेता "लोकशाहीच्या" आधारे देशातल्या सर्वात मोठया धर्मसंसदेच्या प्रयोगभुमीचा स्वामी [ सीएम ] बनतोय. काय बोलणार? लोकशाही जिंदाबाद!

No comments:

Post a Comment