Wednesday, June 26, 2019

राजर्षी शाहू महाराजांची जयंती सुरू करणारे विलासराव देशमुख-






१९९९ सालची गोष्ट. विलासराव देशमुख नुकतेच मुख्यमंत्री झालेले होते. आधी ते शिक्षणमंत्री असताना त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेले असल्यानं चांगला परिचय होता. माझ्या अर्जावर त्यांनी एक नजर टाकली आणि ते म्हणाले, "कसं शक्यय? अहो, आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनातर्फे होतच नाहीये? यशवंतराव चव्हाणसाहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य नाही वाटत. ज्याअर्थी त्यांनी शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू केलेली नाहीये त्याअर्थी त्याच्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असेल. गंभीर अडचण असेल. शाहूजयंती सुरू केली तर जोरदार टिका होण्याची भिती असेल. मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणताय हरी?"

मी म्हणालो, "सर, मला असं वाटत नाही. राहून गेलं असणार. वेळ मिळाला नसणार. तसंही शाहूंना त्यांच्या जातीच्या भिंती नसल्यानं ते दुर्लक्षितच आहेत. त्यांना जात वाली नाहीये.  तुम्ही जयंती सुरू करा. टिका होणार नाही, हा कदाचित स्वागत मात्र होणार नाही. तुम्ही माझ्या अर्जावर मंजुरी द्या. मी जी.आर.निघेल असा पाठपुरावा करतो."
ते सावधपणे म्हणाले, " थोडं थांबा. मी याबाबतचा अहवाल मागवतो. मग बघू."

त्यांनी त्यांचे उपसचिव श्री.भूषण गगराणी यांना बोलावलं. शाहू जयंती शासनातर्फे ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवर सुरू करण्याच्या माझ्या अर्जाबाबत सविस्तर अहवाल द्यायला सांगितलं.

गगराणींचा अनुकूल अहवाल आला. त्यानुसार २५ जुलैला रात्री उशीरा जी.आर. आला. २६ ला तो मंत्रालयातही कुठे पोचला नव्हता मग जयंती कशी होणार? जी.आर. काढणार्‍या बाईंनी खोडसाळपणा करून फक्त त्या वर्षांपुरता जी.आर. काढलेला होता. मला पुन्हा सी.एम.ना भेटावं लागलं. पुन्हा सगळी उस्तवारी करावी लागली. दरवर्षी शाहू जयंती करण्यात यावी असा नवा शासनादेश निघेपर्यंत पाठपुरावा करावा लागला.

पुढे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित करावा म्हणून केलेल्या खटपटीला यश आलं. याकाळात दरवर्षी मी शाहूंवर लोकराज्यमध्ये लेख लिहित असे.
महाराजांवर ५०० व्याख्यानं द्यायचं मी ठरवलं. ५०० वं व्याख्यान कोल्हापूर दरबारात झालं.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्रामुळे शाहू महाराजांची जयंती २६ जुलैला नसून २६ जूनला असल्याचं कळलं. आमचे मित्र खांडेकर यांच्यामुळं त्याबाबतचा अस्सल पुरावा शोधता आला. शासन दरबारी पुन्हा प्रयत्न करून २६ जुलै ऎवजी २६ जूनचा जी.आर. काढता आला.

माझे मंत्रालयातील मित्र शुद्धोधन आहेर यांनी मंत्रालयात शाहू जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला. माझेच व्याख्यान ठेवले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी शाहूंबद्दल आकस असलेले होते. जी.आर. असल्यानं त्यांचा नाईलाज होता. पण तरीही डुख धरून आहेर यांच्या पदोन्नतीत खोडा घालण्यात आला. त्यांच्यावरील हा अन्याय दूर व्हायला पुढे दहा वर्षे प्रयत्न करावे लागले. हा अन्याय झाला नसता तर आज ते सहसचिव असते.

दिलीप वळसेपाटील उच्च शिक्षण मंत्री असताना शासनानं शाहूंची भाषणे, पत्रं, शासनादेश प्रकाशित करावेत म्हणून शाहू साहित्य समिती स्थापनेत यश आलं. त्यावेळी संचालक असलेल्या डॉ. एस.एन. पठाण यांनी या कामात खूप सहकार्य केलं.

आज दिवंगत विलासराव देशमुख, सनदी अधिकारी भूषण गगराणी, शुद्धोधन आहेर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. एस.एन. पठाण आदींचं हे सारं काम आता विस्मरणातच
जाणार!

-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक





व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक -प्रा.हरी नरके
जन्म - २५  जून १९३१ - मृत्यू - २७ नोव्हेंबर २००८

लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री सोमनाथ चतर्जी म्हणतात, "पंतप्रधान व्ही.पी.सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते. त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, " मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत."

गुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.

प्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती.माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.

संसदेत मी त्यावर म्हणालो, "प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे."

"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या " असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती.मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च जातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.

अडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.

व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.

सत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसारमाध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.

-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.

-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे डॉ. बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.
कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्ष भेटुन १९ वर्षांपुर्वी दिले. त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे. त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.
आम्हाला खुप आनंद झाला.
श्री. सुशिलकुमार शिंदे, मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ठ आय.ए.एस.अधिकारी डॉ. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, डॉ. बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिकृत चरित्रकार आण्णासाहेब लठ्ठे, धनंजय कीर,रमेश जाधव,जयसिंगराव पवार, य.दि.फडके, कृ.गो.सूर्यवंशी, आदींनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खांडेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.
पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन त्यानुसार आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.
या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे. तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, कणबरकरसर, विजय चोरमारे, श्रीराम पचिंद्रे, यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ॠणनिर्देश केला पाहिजे.
-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार!









‘अभिजात मराठी’ला निवडणूक पावणार! मुंबईत २४ संघटनांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सकारात्मक
‘मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’ या उपक्रमांतर्गत एकत्र येत २४ संघटनांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासह महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमात मराठीच्या सक्तीसाठी सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे दिले.
मराठीच्या हितासाठी गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने संघटना एकत्र आल्याने आणि त्यांनी मराठीचा विषय राज्य सरकारच्याही दृष्टीने अस्मितेचा केल्याने शासकीय पातळीवर हालचाल सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून ‘अभिजात’ भाषेचा उपहार मिळवून त्याचा राजकीय लाभ उचलण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही साहित्यिक, कलावंतांनी एकत्र येत विद्यमान सरकारच्या विरोधात कौल देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. मराठीच्या विषयावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे काही घडू नये, यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे. सोमवारच्या आंदोलनानंतरही ही बाब ठळकपणे जाणवली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाला घ्यायला विशेष वाहने आझाद मैदानात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चेसाठी दिलेल्या २० मिनिटांच्या कालावधीपेक्षा अधिक वेळ चर्चा करून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण आणि मराठी भाषा भवन स्थापनेसह ‘अभिजात मराठी’च्या विषयावर जातीने लक्ष घालण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. ‘अभिजात मराठी’चा विषय सध्या केंद्राकडे प्रलंबित आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोच, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे आपले दिल्लीतील वजन वापरून मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी ‘अभिजात मराठी’चा प्रलंबित विषय मार्गी लावतील, याचे संकेत शिष्टमंडळासोबतच्या चर्चेतही मिळाले.
दर्जा मिळाल्यास..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास केंद्राकडून ३०० कोटींची रक्कम राज्याला भाषा संवर्धनासाठी मिळेल. या कामी सध्या राज्याकडून केवळ २५ कोटींची तरतूद होते. राज्यानेही केंद्राइतकीच निधीची तरतूद केली तर एकूण ६०० कोटी रुपयांतून मराठीच्या विकासासोबतच या भाषेत नोकरीच्या संधी निर्माण करता येतील.
होणार काय ? : ‘अभिजात मराठी’च्या विषयासोबतच मराठी भाषा शाळांचे सक्षमीकरण, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य, मराठी भाषा कायदा व प्राधिकरणाची स्थापनेबाबत थेट वटहुकूम काढण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला आहे. यावरून मराठीच्या विषयावर शासन गंभीर झाले आहे, हे स्पष्ट होत असून निवडणुकीपूर्वी ‘अभिजात मराठी’ची भेट महाराष्ट्राला मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
..तर नकारात्मक संदेश जाईल
मुख्यमंत्र्यांशी फारच सकारात्मक चर्चा झाली. ‘अभिजात मराठी’सह सर्वच विषयांवर त्यांनी तत्काळ पावले उचलण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या या ग्वाहीबाबत आम्ही आशावादी आहोत; परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र मराठी भाषेच्या शासकीय धोरणाबाबत नकारात्मक संदेश जाईल.
– लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन
सद्य:स्थिती अनुकूल कशी?
मराठी भाषा कशी अभिजात आहे, हा सांगणारा मसुदाच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने तयार केला आहे आणि साहित्य अकादमीच्या केंद्रवर्ती समितीवर मराठी भाषेसाठी समन्वयक म्हणून पठारे सध्या कार्यरत आहेत. केंद्राकडून हिरवा झेंडा मिळताच पठारे यांच्या प्रयत्नाने हा विषय तत्काळ मार्गी लागू शकतो.
‘अभिजात मराठी’चा विषय निर्णायकी वळणावर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘मी ते करून आणतो’, असे काल आमच्यासमोर पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यामुळे लवकरच ही आनंदवार्ता आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा करूयात.
– कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ
शफी पठाण First Published on June 26, 2019 1:24 am Web Title: Abhijat Marathi Movement Of 24 Organizations Abn 97 लोकसत्ता,पुणे, बुधवार, दि. २६ जून २०१९,पृ.१, लोकसत्ता टीम | June 26, 2019 01:24 am https://www.loksatta.com/nagpur-news/abhijat-marathi-movement-of-24-organizations-abn-97-1919159/

Monday, June 24, 2019

मराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्री












मराठीला २ महिन्यात अभिजात दर्जा मिळणार: मुख्यमंत्र्यांचे सुचक विधान-
मायमराठीसाठी साहित्यिकांचा एल्गार- प्रा.हरी नरके
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्षे होत आलीत, आणि तरिही मराठीच्या भल्यासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमींना रस्त्यावर उतरायची वेळ येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या साठ वर्षात प्रथमच विविध २५ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आणि साहित्यिक आज मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटले.
माजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोत्तापल्ले, अ. भा. म. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतुकराव ठालेपाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, विदर्भ साहित्य संघाचे रवींद्र शोभणे, मराठी अभ्यास परिषदेचे प्रा. दीपक पवार, चित्रपट महामंडळाच्या वर्षा उसगावकर, द.म.सा.परिषदेचे विजय चोरमारे, ग्रंथालीचे दिनकर गांगल,खासदार भालचंद्र मुणगेकर आणि अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा.हरी नरके आदींच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ ते ५ असे धरणे आंदोलन करण्यात आले. मराठीचे गोमटे व्हावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी, कवी, साहित्यिक यांचा यात पुढाकार होता.
यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी असे आश्वासन दिले की मराठीच्या अभिजात दर्जाची सर्व पुर्तता झालेली आहे. हा दर्जा मिळवण्याचे काम तुम्ही माझ्यावर सोपवा, मी ते लवकरच करून दाखवतो. त्यांनी पुढे असेही सुचित केले की येत्या २  महिन्यातच मी हा दर्जा मिळवून देतो.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय २००९ सालीच घेण्यात आलेला होता. पण इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळा हा निर्णय जुमानत नव्हत्या.त्यासाठी शिक्षेची तरतुद करणारा कायदा आपण १ महिन्यात वटहुकुमाद्वारे करू असेही ते म्हणाले.
मुंबईत मराठी भवन व्हावे यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही ते म्हणाले.
-प्रा.हरी नरके, २४ जून २०१९

Saturday, June 22, 2019

मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची २०० चरित्रं






डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठीत दखल घ्यावीत अशी २०० चरित्रं आजवर प्रकाशित झालेली आहेत.
त्यांच्या जीवनकार्यातील असंख्य ऎतिहासिक प्रसंगांबाबत या अभ्यासकांमध्ये/चरित्रकारांमध्ये नेमके काय मतभेद आहेत, 
याची आपल्याला कितपत माहिती आहे?
तुम्ही यातली किती वाचलीयत? निदान किती पाहिलीयत?
यातली किमान २० चरित्रं संग्रही असलेले फेबुवर कितीजण आहेत?
आपण एखाद्या घटनेबाबत किती खात्रीलायकरित्या बोलत असतो ना? 
वरिल २०० चरित्रांपैकी किमान ५ चरित्रकारांची नावे प्रतिक्रियेत लिहा.
यातल्या ९५ चरित्रांचा तौलनिक अभ्यास करून सन्मित्र प्रा. राजाभाऊ वि. भैलुमे यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. 
त्यात आवश्यक त्या दुरूस्त्या करून डॉ. भैलुमे यांनी सदर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.
-प्रा.हरी नरके, २२ जून २०१९

जावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता!


जावेद अख्तर यांच्यासाठी तो खडतर काळ होता. त्या परिस्थितीत त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याकडून मदत घ्यायचं ठरवलं. फोन केला आणि वेळ घेऊन भेटीसाठी गेले. त्यादिवशी साहिर यांनी जावेद यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं आणि विचारलं, ‘तरुण मित्रा, निराश का आहेस ?’ जावेद म्हणाले, ‘अडचणीत आहे. जवळचे पैसे संपत आलेत. मला काही काम दिलंत तर उपकार होतील.’ जावेद अख्तर सांगतात की, साहिर यांची एक खास सवय होती. ते जेव्हा बेचैन असत, तेव्हा पँटच्या मागच्या खिशातून कंगवा काढून केस विंचरायला लागत. त्यावेळीही त्यांनी तसेच केले. थोडा वेळ विचार केला आणि आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘नक्कीच. फकिराकडं काय आहे आणि काय करू शकतो ते बघतो आधी.’ आणि जवळच्या टेबलाकडं निर्देश करुन म्हणाले, ‘मीही वाईट दिवस बघितलेत मित्रा, तूर्तास हे राहूदे. बघूया काय करता येईल’ जावेद अख्तर यांनी बघितलं तर टेबलावर दोनशे रुपये ठेवले होते. ते पैसे जावेद यांच्या हातातही देऊ शकले असते, परंतु ती त्या माणसाची संवेदनशीलता होती, की समोरच्याला पैसे घेताना वाईट वाटू नये. पैसे देतानाही साहिर यांनी जावेद यांच्या डोळ्यात पाहणं टाळलं होतं. साहिर यांच्यासोबत जावेद यांचे उठणेबसणे वाढले. त्रिशूल, दीवार, काला पत्थर यासारख्या चित्रपटांची कथा सलीम-जावेद यांची होती, तर गाणी साहिर यांची. त्यामुळं भेटणं, चर्चा नित्याच्या होत्या. यादरम्यान गंमतीनं जावेद अधुनमधून म्हणायचे, ‘साहिरसाब, तुमचे दोनशे रुपये माझ्याकडं आहेत. देऊ शकतो, पण देणार नाही.’ साहिर हसायचे. बैठकीतली मंडळी विचारायची की, ‘कसले दोनशे रुपये?‘, तेव्हा साहिर म्हणायचे, ‘ते यांनाच विचारा’ हे असं अनेक वर्षं चालत राहिलं. २५ ऑक्टोबर १९८०ला रात्री साहिर लुधियानवी यांचं हृदयविकारानं निधन झालं. जावेद यांना बातमी ऐकून धक्का बसला. तातडीनं ते अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. रात्रभर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. जुहू दफनभूमीत दफनविधीची तयारी करण्यात आली. भल्या सकाळी मुस्लिम रीतिरिवाजानुसार त्यांचा दफनविधी झाला. सोबत आलेले लोक थोड्या वेळानं निघून गेले. परंतु जावेद अख्तर खूप वेळ तिथं बसून राहिले. बऱ्याच वेळानं ते उठले आणि डबडबल्या डोळ्यांनी तिथून निघाले. जुहू कब्रस्तानातून बाहेर पडून समोर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांना कुणीतरी हाक मारली. जावेद यांनी वळून पाहिलं तर साहिर यांचे एक जिवलग मित्र अशफाकसाहेब होते. अशफाक गडबडीनं येत होते. त्यांनी नाइट सूट परिधान केला होता. त्यांना सकाळीसकाळी बातमी कळली होती आणि तसेच ते घरातून निघाले होते. आल्याआल्या ते जावेद यांना म्हणाले, ‘तुमच्याकडं थोडे पैसे आहेत का ? त्या कबर बनवणाऱ्याला द्यायचे आहेत, मी गडबडीनं पैसे न घेताच आलो.’ जावेद यांनी खिशातून पाकिट काढलं आणि विचारलं, ‘किती रुपये द्यायचे आहेत?’ ते म्हणाले, ‘दोनशे रुपये !’ ….. एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ही पोस्ट हिंदीमध्ये आढळली, वाचून मी भारावून गेलो आणि त्यातील बारीक-सारीक तपशील टाळून तिचा अनुवाद केला. अवतीभवतीच्या राजकारणाच्या धबडग्यात हे काहीतरी मौलिक आहे, असं मला वाटलं म्हणून मला ती अनुवाद करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावीशी वाटली. त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या. ‘नया ज्ञानोदय’ नियतकालिकात गुलजार यांची अशीच एक गोष्ट प्रसिद्ध झाल्याचे आणि तिचा तपशील वेगळा असल्याचे कुणी निदर्शनास आणून दिले. गुलजार यांच्या ‘देवडी’ पुस्तकात ती असल्याचे कुणी नोंदवले. दोनशे नव्हे, शंभर रुपयांची ही गोष्ट आहे आणि ते शंभर रुपये कबर खोदणाराला नव्हे, तर रिक्षावाल्याला दिले आहेत, असेही कुणी सांगितले. सुजाण वाचकांनी वेगवेगळे संदर्भ आणि तपशीलातील फरक मांडला. जावेद यांच्या तोंडूनच टीव्हीवर हा किस्सा ऐकला असल्याचे एकाने नोंदवले. जावेद यांचा किस्सा. तो दुसऱ्याच कुणीतरी फेसबुकवर टाकलेला. तो आवडला म्हणून तिसऱ्यानेच त्याचा अनुवाद केलेला. त्यात गुलजार यांच्या कथेची साक्ष काढून तपशीलातला मोठा फरक असल्याचे पुढे अनेकजणांनी निदर्शनास आणून दिलेलं. त्यामुळं आपली फसगत झाल्यासारखं वाटत होतं. सोशल मीडियावरच्या उथळ गोष्टींना आपणही बळी पडल्यासारखं वाटत होतं. पण नेमकी घटना काय याचीही उत्कंठा होती. अर्थात जावेदजी किंवा गुलजारजी, ही दोघंही सहज उपलब्ध असणारी माणसं नसल्यामुळं जरा कठिणच वाटत होतं. पण फार वाट पाहावी लागली नाही. ….. महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा संवाद’ कार्यक्रमासाठी यंदा जावेद अख्तर यांना बोलावलं होतं. त्यानिमित्तानं त्यांची बऱ्यापैकी निवांत भेट झाली. गप्पाही झाल्या. थोडं इकडचं तिकडचं झाल्यावर मी थेट या किस्स्याचा विषय काढला. हे खरं आहे का विचारल्यावर म्हणाले, ‘खरं आहे.’ गुलजारजींनी लिहिलेल्या गोष्टीचा संदर्भ देऊन म्हटलं की त्यांनी वेगळा तपशील दिलाय आणि शंभर रुपयांचा उल्लेख आहे. त्यावर मिश्किलपणे जावेदजी म्हणाले, ‘शंभर रुपयांनी काय फरक पडतो?’ मी म्हटलं, ‘अहो, शंभर की दोनशे रुपये हा प्रश्न नाही. तुम्ही ते पैसे रिक्षावाल्याला दिले, असं लिहिलंय गुलजारजींनी. आणि इथं तर कबर खोदणाऱ्याला दिल्याचा उल्लेख आहे.’ म्हणाले, ‘गुलजार आणि मी एकदा फ्रँकफुर्टमध्ये एकत्र असताना त्यांना हा किस्सा सांगितला होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, मी लिहू का हे? तर म्हटलं लिहा. त्यांनी त्यावर कशी गोष्ट लिहावी हा त्यांचा प्रश्न. त्यावेळी रिक्षा वगैरेतून कुणी येण्याचा प्रश्नही नव्हता.’ जावेदजींनी पुन्हा एकदा सांगितलं, मी दोनशे रुपये दिले आणि कबर खोदणारासाठी दिले हेच खरं ! June 22, 2018 Post by Vijay Chormare-

Friday, June 21, 2019

आता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग -


"काय गं लकसीमी, आज लईच उशीर झाला तुला? आता तुह्यावाली मालकीन बोंब मारील बग. तुमी कामवाल्या बाया सदानकदा उसीरा येता म्हून."

"तिला काय कारानच लाग्तं बग. नस्लं तरी उकरू उकरू काडीती."

"व्हय ना. काय करू? लेकरं आडून बसली. म्हनली आजपसून आपल्या डिसवर बाबासाह्येब मालिका लाव. आमच्याकडं त्ये चायनल दिसत नाय ना. मंग मी त्यान्ला शेजारणीकडं पाठविती. तिची झोपडी पन आमच्यासरखीच बारकी हाय. पोरान्ला लई दाटीवाटी बसाया लागतंया. पोरं म्हनत्यात आपल्यात त्ये चायनल लाव. आता त्या डिसवाल्याकडं जाऊन आल्ये. त्यो म्हणला, इस्मारट काय त्यो फोन पाह्यजे त्यासाठी. ३०० रुपये देत होते मेल्याला तरी नायच म्हन्ला बग त्यो. आता ह्ये इस्मारट फोन काय भानगड आस्तीया? इस्टार परवाहा ह्ये चायनल नवं हायका?"

"मला पन त्यात्लं काय समजत नाय बग."
"तुज्यावाल्या टिवीला लागती का गं बाबासाह्येब मालिका?"
" हौ ना. माजा नवरा, पोरं आन मी बगताव ना."

"मी कुलकरणीसाह्यबाकडं काम करतीना. तर त्यांच्यावाल्या बंगल्यात आजी आजोबा, पोरं सम्दी बघत्यात बग."

"माह्यावाल्या भोसलीनबाई मराटा हायती. त्या आंदी संबाजी बगायच्या. गेल्या आटवड्यापासून त्यापन बाबासाह्यब बगत्याती. मंग म्या म्हन्लं आपून पन बगावं. आमी सम्दीच बगताव बग. लई ग्वाड हाय बग त्यं बारकं पोरगं. किती वाइटवक्टं वागायचे ना पह्यल्यावालं लोकं आप्ल्यासंगं."

इतक्यात बस आली. आम्ही सगळेच बसमध्ये बसलो.
आज सकाळी बसस्टॉपवर घडलेला एक प्रसंग-
-प्रा.हरी नरके, २१ जून २०१९

Wednesday, June 19, 2019

वेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास्टरपीस












"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड १ ते २२ वाचणे ही अभ्यासकांसाठी अविस्मरणीय मेजवानी असते. विद्वत्ता, विज्डम, संशोधन, लेखन यांचे जागतिक मानदंड म्हणजे हे ग्रंथ होत. ज्यांना आपला भारतीय समाज आणि १८९१ ते १९५६ चा काळ याबद्दलचे दस्तऎवज वाचायचे असतील त्यांनी हे ग्रंथ वाचायलाच हवेत.

तथापि काही कारणांनी ज्यांना हे सगळे ग्रंथ वाचता येणे शक्य नसेल त्यांनी त्यातले किमान पाच ग्रंथ तरी वाचायलाच हवेत.
त्यातला मास्टरपीस म्हणजे वेटींग फॉर व्हिसा.

एक विलक्षण ग्रंथ.

हे पुस्तक वाचून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, जे लोक हेलावणार नाहीत ती माणसेच नव्हेत.
हे बाबासाहेबांचे संक्षिप्त आत्मचरित्र आहे. अतिशय चटका लावणारे, गलबलून सोडणारे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड क्र.१२ मध्ये आम्ही ते छापलेले आहे. [पाहा- पृ. क्रमांक ६५९ ते ६९२] न्य़ुयार्कच्या कोलंबिया विद्यापीठाने हे पुस्तक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू  यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी", हा मराठी अनुवाद प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे, यांनी केला आहे. त्या मराठी अनुवादात " प्रवेश परवान्याच्या प्रतीक्षेत " सदर ग्रंथ समाविष्ट आहे. साकेत प्रकाशन, औरंगाबाद, यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला असून त्याची तिसरी आवृत्ती-२०१५, ही अवघ्या रू.१७५/- ला सर्वत्र उपलब्ध आहे.
ह्या पुस्तकाचे हस्तलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात ते आजही आहे. त्यांनी हे पुस्तक १९ मार्च १९९० ला प्रकाशित केले. राज्य शासनाने बाबासाहेबांचा हा १२ वा खंड १४ एप्रिल १९९३ ला प्रकाशित केलेला असून सुमारे ८०० पृष्ठांचे रॉयल आक्टोव्ह आकारातील हे पुस्तक अवघ्या ९५ रूपयांना सर्व शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध आहे.
हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचले नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होते. पण ते सून्न करते. कायमचे अस्वस्थ करते. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात.

ह्या आठवणींनी बाबासाहेब व्याकूळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीने ५० वर्षांनंतरही त्यांचे डोळे पानावत असत. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता.

अवघ्या ३० पृष्ठांचे हे लेखन जागतिक साहित्यातले श्रेष्ठ लेखन आहे.

मंडळी, मग बाबासाहेबांचे हे आत्मकथन वाचणार ना?

-प्रा.हरी नरके, १९ जून २०१९

#वेटींगफॉरव्हिसा

Tuesday, June 18, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून









डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वसंत मून-प्रा.हरी नरके
भारतरत्न आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे समाजक्रांतीच्या विचारांचा वैश्विक ठेवा. त्यांच्या लेखन आणि भाषणांचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्याशिवाय त्यांच्या सोर्स मटेरियलचे/चरित्रपर मजकूराचे आणखी २ खंड प्रकाशित केलेत ते वेगळेच.

हे क्रांतिकारी साहित्य शासनामार्फत प्रकाशित करण्याचे काम अतिशय मेहनतीचे, जिकीरीचे आणि जोखमीचे काम होते. स्मृतीशेष वसंत मून हे तहसीलदार होते. त्यांनी शासनाकडे डेप्युटेशनवर [प्रतिनियुक्ती] येऊन आयुष्यभर हे काम केले. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्यासोबत दहा वर्षे काम करण्याची सुवर्णसंधी मला लाभली. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. ते अतिशय कडक स्वभावाचे व शिस्तीचे आणि कामात संपूर्ण झोकून देणारे होते.

त्यांनी बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषण मालिकेतले खंड १ ते १६ प्रकाशित केले. त्यांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मला बाबासाहेबांच्या लेखन, भाषणे, पत्रव्यवहार आणि छायाचित्रांचे खंड १७ ते २२ चे  एकुण ११ ग्रंथ प्रकाशित करता आले. हा माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. माझी टेल्कोची अधिकारपदावरची नोकरी सोडून मी शासनाची ही जबाबदारी स्विकारली होती आणि ती पुर्ण केली याचा मला अभिमान आहे.

वसंत मून यांनी आपले संपुर्ण आयुष्य बाबसाहेबांवरील संशोधनाला वाहून घेतलेले होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तोवर ते फक्त बाबासाहेबांवर काम करीत होते. पुराव्याशिवाय एकही वाक्य लिहायचे अथवा छापायचे नाही हे त्यांचे ब्रीद होते.

बाबासाहेबांची आजवर शेकडो चरित्रे प्रकाशित झालेली आहेत. त्यातले सर्वात प्रदीर्घ म्हणजे १ ते १२ खंडांचे चरित्र लिहिणारे चां.भ.खैरमोडे हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यांनी मिशनरी वृत्तीने हे काम केले.
बाबासाहेबांचे संपुर्ण अधिकृत, संशोधित, अद्ययावत आणि विश्वासार्ह चरित्र तुम्हाला वाचायचे असेल तर ते वसंत मून यांनी लिहिलेले आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थेने म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली यांनी ते प्रकाशित केलेले आहे. १९९१ सालचा हा ग्रंथ १८६ पृष्ठांचा आहे. त्याचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झालेले आहेत.

बाबासाहेबांच्या शालेय शिक्षणाबाबत काही कार्यकर्त्यांना पुरेशी माहिती नसते. तर काहींचा संभ्रम असतो.
सुभेदार रामजींनी सातार्‍यातल्या सदर बाजार भागात ते राहत असताना भिवाला वयाच्या ६ व्या वर्षी घराजवळच्या कॅंप स्कूलमध्ये घातले. ही लोकल बोर्डाची शाळा होती. तिथे भिवाचे मराठी पहिली ते तिसरीचे शिक्षण झाले.

त्यानंतर इयत्ता चौथीत म्हणजे इंग्रजी पहिलीत त्यांना सातारा हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. [ आत्ताचे प्रतापसिंह महाराज हायस्कूल] येथे त्यांना ७.११.१९०० रोजी प्रवेश देण्यात आला.

प्रा.हरी नरके, १८ जून २०१९
#आंबेडकर #वसंतमून

Monday, June 17, 2019

मालिकेला १ महिना पुर्ण







डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा - मालिकेला १ महिना पुर्ण

बौद्ध पौर्णिमेला १८ मे २०१९ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने महिनाभरात कोट्यावधींची मनं  जिंकली.
जिथंजिथं मराठी माणसं राहतात तिथंतिथं आज या मालिकेची चर्चा आहे.

परवा आरजे संग्राम सांगत होता, त्याला लंडनमधल्या लोकांनी या मालिकेबद्दल विचारलं आणि आम्ही ती लंडनमध्ये आवर्जून बघतो असं सांगितलं.

माझा मुलगा त्याच्या आईला आजवर मम्मी म्हणायचा, तो आता बये म्हणतो असं दोन प्राध्यापक मित्रं सांगत होते. माझ्या मुलाने भिवाचा ड्रेस मला हवा असा हट्ट धरलाय असं एक पत्रकार म्हणत होता.

या मालिकेवर प्रेम करणार्‍या सर्व प्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार. सकारात्मक सुचना करणारांचे आम्ही कृतज्ञ आहोत. सर्व कलाकारांना तसेच क्रियेटिव्ह टीम आणि स्टार प्रवाह वाहिनीला धन्यवाद.

- प्रा.हरी नरके, १७ जून २०१९

#Bhimraya #Ambedkar #babasaheb #DrBabasaheAmbedkarSeriel #StarPravah #DashamiCreations #DrBabasahebAmbedkar #NinadVaidya #ajaymayekar #NitinVaidya #ShilpaKamble #chinmaykelkar #milindadhikari #ChinmayeeSumeet #PoojaNayak #NarendraMudholkar #AparnaPadgaonkar #AkshaySPatil #AbhijeetPrakashKhade #DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah #बाबासाहेबस्टारप्रवाहवर #JaiBhim #Ambedkar #Bhimrao

पोराचं ढुंगण जळालं





आठ वर्षाचा एक मुलगा देवळात गेला. त्याला गावकर्‍यानं नागडा करून मारला. वर्ध्याच्या आग ओकणार्‍या उन्हात तापल्या फरशीवर त्याचे कपडे काढून त्याला भाजला. पोराचं ढुंगण जळालं. या गावकर्‍यानं त्या पोराचे हातपाय बांधून त्याला चोपलं.

हा मुलगा कोणत्या जातीचा [ सामाजिक गटाचा ] आहे हे विचारू किंवा सांगू नका, नाहीतर फेसबुकवरचे हुच्च बुद्धीजिवी तुमच्यावर नाराज होतील आणि कशाला जातीयवाद करताय म्हणून तुम्हालाच उल्टं टांगतील.

#आत्ताकुठेराहिलीयजातीयता? #भारतमाताकीजय!

जिगरबाज किर्तीला पुरस्कार








२० फेब्रुवारी २०१९ रोजी मी जिगरबाज किर्ती अशी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती.
ती वाचून अनेकांनी किर्तीच्या शिक्षणाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र किर्तीने मला तुमच्या शुभेच्छा हव्यात, आशीर्वाद हवेत, आर्थिक मदत नको, अशी भुमिका घेतली.
कोल्हापूरच्या स्वयंसिद्धाच्या तारा दिवेकर यांनी किर्तीला तिच्या जिद्दीला पुरस्कार द्यायचे ठरवले.
परवा तो कार्यक्रम झाला.

फेसबुकच्या पोस्टचा असाही उपयोग झाल्याचे बघून आनंद वाटतो.
अभिनंदन, किर्ती.
...................................
जिगरबाज किर्ती- प्रा.हरी नरके
रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.
त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.
वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.
आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.
मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?
किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.
चहाची टपरी चालवतेय. काल संगमेश्वरला शिवजयंतीला माझं भाषण ऎकायला आली होती.
पोरगी खरंच जिगरबाज आहे.
प्रा. हरी नरके,२० फेब्रुवारी २०१९

खैरमोडे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र अधिकृत - यशवंत भीमराव आंबेडकर





खैरमोडे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र अधिकृत - यशवंत भीमराव आंबेडकर
अठरा प्रकरणांच्या या चरित्र लेखनात साधार आणि साद्यंत वर्णनाकडे लेखकाचा कल असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे चरित्र मराठीमध्ये तरी अधिकृत मानले जावयास अडचण पडू नये असे वाटते.

 डॉक्टरसाहेबांनी पुढे आपल्या आयुष्यात जे महत्कार्य केले त्याची बीजरूप कल्पना या पुस्तकातील विविध माहितीवरून चांगल्याप्रकारे येते...असे हे माहितीपुर्ण, उद्बोधक आणि साधार पुस्तक अत्यंत परिश्रमपुर्वक उत्तम प्रकारे लिहिल्याबद्दल कोणीही श्री चां.भ.खैरमोडे यांना धन्यवाद देईल."

-यशवंत भीमराव आंबेडकर, प्रकाशक,भारतभूषण प्रिटींग प्रेस, गोकुळदास पस्ता लेन, दादर, मुंबई १४

विविधवृत्त, ६ जुलै १९५२, मुंबई

पाहा- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, चरित्र खंड-१ला, प्रताप प्रकाशन, गिरगाव, मुंबई, तिसरी आवृत्ती-१४ एप्रिल १९७८, पृ. ३०६,

Saturday, June 15, 2019

आजपासून पूजा बंद

आजपासून पूजा बंद- प्रा.हरी नरके पन्नास वर्षे संसार केल्यानंतर, नातवंडांची लग्न झाल्यानंतर माझ्या आत्याला तिच्या नवर्‍यानं सोडलं. कारण काय तर बायको मला आवडत नाय. आत्या तिच्या माहेरी म्हणजे आमच्याकडं येऊन राहू लागली. वटसावित्री पौर्णिमेला हाच नवरा सात जन्म मिळो अशी प्रार्थना करीत तिनं वडाला फेर्‍या मारल्या. त्याची मनोभावे पूजा केली. मी तिला विचारलं," अगं आत्या, त्यानं तुला सोडलं. मग कशाला हवा हाच नवरा सात जन्मं?" ती म्हणाली, " त्यानं त्याचा धर्म सोडला. म्हणून आपण आपला सोडू नये बाळा." पुढच्या वर्षी ती पुन्हा पुजेला निघाली. मी तिला म्हटलं, " अगं, त्यानं तुला सोडून दुसरी बायको केली. आता तिही सात जन्मं हाच नवरा मागणार. तुही मागणार. याचा अर्थ तुला पुढची सात जन्मं हीच सवत मिळणार. बघ बाई!" आत्यानं ताडकन हातातलं पुजेचं ताट खाली ठेवलं. म्हणाली, " मला सवत नको. आजपासून पूजा बंद." - कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" या आत्मकथनातून - प्रा.हरी नरके, १६ जून २०१९

Monday, June 10, 2019

गिरिश कार्नाड, विजय तेंडूलकर, ज्ञानपीठ, मराठी विनोद आणि बरंच काही



गिरिश कार्नाड यांच्या जाण्याने सगळेच हळहळत आहेत. अशावेळी त्यांच्याविषयी लिहायला काही सुचत नाही.
तरिही काही नोंदी करायला हव्यात-

१. अहमदनगरला यशवंतराव गडाख यांनी  अ.भा.मराठी साहित्य संमेलन घेतले असताना त्याला कार्नाडांना निमंत्रित केलेले होते. सन्मित्र अरूण शेवते यांच्यामुळे ते आले. त्यांचे भाषण अतिशय मौलिक होते, त्यातला एक मुद्दा महत्वाचा होता. ते म्हणाले, मराठीत श्रेष्ठ दर्जाचा विनोद आहे. त्या तोडीचा विनोद माझ्या कन्नड किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेत नाही.

२. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, " मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद असला तरी माझ्यापेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ असलेल्या विजय तेंडूलकरांना तो मिळायला हवा होता."

मनाचा एव्हढा मोठेपणा विरळाच. त्यावेळी ज्ञानपीठ बैठकीत तेंडुलकरांचे नाव अनेकांनी लावून धरलेले असताना एका खत्रूड मराठी साहित्यिकाने विरोध केल्याने तेंडुलकरांचे नाव बाजूल ठेवले गेले होते, व कन्नड प्रतिनिधीने कार्नाड यांचे नाव सुचवताच त्याला सार्वत्रिक पाठींबा मिळालेला होता.

३. त्यांच्या तुघलक मध्ये त्यांनी राजकारणाची जी अंतस्थ उकल आहे ती बघता एव्हढे मौलिक राजकीय नाटक भारतीय नाट्यसृष्ठीला प्रथमच मिळालेले असावे. त्याचा मराठी अनुवाद विजय तेंडुलकरांनी करावा हाही एक अपुर्व योग.

लेखक, अभिनेता, तत्वज्ञ, चित्रपट कलावंत,नाटककार म्हणून असलेली त्यांची कामगिरी जागतिक पातळीवरची होती.




-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण?




तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? -प्रा.हरी नरके
"आमची घरची खूप गरिबी होती. जगन्नाथ शंकरशेट यांच्या शाळेत माझ्या मोफत शिक्षणाची सोय झाली होती. या शाळेत केशवराव नावाचे एक शिक्षक होते. ते ब्राह्मण होते. मला मोफत शिक्षण मिळत असे याचे त्यांना वैशम्य वाटे. " मोफत शिक्षण फक्त ब्राह्मण मुलांनाच मिळावे, इतरांना नाही" असे ते म्हणत असत. मी आजारी पडल्याने माझा पहिल्या पाचातला नंबर खाली गेला. तेव्हा ते म्हणाले, " फी भर नाही तर शाळा सोड."
दुसर्‍या दिवशी माझे वडील त्यांना भेटले. खुप गयावया करून ते म्हणाले, " माझा मुलगा हुशार आहे, त्याला पुढे शिकू द्या,मी तुमच्या पाया पडतो."
केशवराव फार कठोर होते. ते म्हणाले, "जमणार नाही. तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? चालते व्हा. कसलातरी धंदा शिका."
माझ्या वडीलांच्या डोळ्यात आसवे आली. पण केशवराव नरम झाले नाहीत.
वडील मला घेऊन हेडमास्तरांना भेटले. ते थोर मनाचे होते. त्यांनी केशवरावांना बोलवून घेतले आणि सांगितले, " मी या मुलाच्या वर्गावर अनेकदा गेलो आहे. वर्गातला तो सर्वात हुशार मुलगा आहे. आजारपणामुळे तो या महिन्यात मागे पडला. त्याला वर्गात बसू द्या. शिकू द्या.हा माझा आदेश आहे." तेव्हा त्यांचा निरूपाय झाला.
ते थोर मनाचे मुख्याध्यापक म्हणजे कृष्णशास्त्री गोडबोले.."
-गुरुवर्य कृष्णराव अर्जून केळूसकर, आत्मचरित्र आणि चरित्र, [ लेखनकाळ- १९३४] संपादक, धनंजय कीर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९६१, दुसरी आवृत्ती २०१४, पृ. २८/२९
-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

Sunday, June 9, 2019

किरांनी चरित्रलेखनासाठी बाबासाहेबांकडे मागितली होती परवानगी-






"आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
मला आपले चरित्र लिहायचे आहे. कृपया मला परवानगी मिळावी.

मी मुंबई म्युनिसिपाल्टीत शिक्षण विभागात काम करतो. मी सामान्य भंडारी कुटुंबातून आलो असून माझे शिक्षण अवघे मॅट्रीक आहे. माझे पुस्तक लिहून झाल्यावर आपण ते मला वाचून त्यात काही चुका, उणीवा किंवा कमतरता असल्यास त्या दुरूस्त्या करून द्या. त्यानंतरच मी आपले चरित्र प्रकाशित करीन."
असे पत्र धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिले होते. पुणे आकाशवाणीतील अधिकारी आयु. जाधव हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या मार्फत किरांनी हे पत्र बाबासाहेबांकडे पोचवले.
बाबासाहेबांनी त्यांना त्वरित उत्तर पाठवले.

" मी सार्वजनिक जीवनात वावरतो. त्यामुळे माझे चरित्र लिहिण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. तुम्ही अवश्य लिहा. मी लोकशाहीवादी आहे. मला कोणत्याही प्रकारची सेनसॉरशीप मान्य नाही. त्यामुळे तुमचे पुस्तक हस्तलिखित स्वरूपात मी आधी वाचणे म्हणजे म्हणजे तुमच्या विचारांना कात्री लावणे होय. ते मी करणार नाही. तुमचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मी नक्की वाचीन. त्यात काही चुकीचे असेल तर तशी जाहीर प्रतिक्रिया देईन."

यावरून बाबासाहेबांचा मनाचा मोठेपणा, मोकळेपणा, उदारता आणि लोकशाहीनिष्ठा यावर प्रकाश पडतो. गरिब भंडारी कुटुंबात जन्मलेले, अवघे मॅट्रीक झालेले, म्युनिसिपाल्टीत लेखनिकाचे काम करणारे कीर पुढे जागतिक किर्तीचे चरित्रकार झाले.

त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत २० पुस्तकं लिहिली. त्यांच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या. महात्मा फुले, राजर्षि शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सीताराम केशव बोले ही त्यांची चरित्रे खूप गाजली.

"Dr. Ambedkar: Life and Mission " हा ग्रंथ लिहिण्यापुर्वी किरांनी बाबासाहेबांच्या अनेक गाठीभेटी घेतल्या. प्रत्येक महत्वाच्या तपशीलांची त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली. बाबासाहेब व त्यांचे अनेक निकटवर्तीय यांच्याकडून माहिती, कागदपत्रे घेऊन किरांनी हे इंग्रजी चरित्र लिहिले. त्यासाठी कागदपत्रांचा व दस्तऎवजांचा शोध घेण्यासाठी किरांनी वर्षानुवर्षे काम केले. हा ग्रंथ १९५४ मध्ये  प्रकाशित झाला.

बाबासाहेबांनी तो ग्रंथ वाचला. बाबासाहेबांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. उलट त्यांना किरांची ही धडपड बरी वाटली असावी असे किरांनीच मला आमच्या प्रत्यक्ष भेटीत सांगितले. "कृतज्ञ मी कृतार्थ मी" हे किरांचे आत्मचरित्र आहे. त्यात या आशयाचा मजकूर आलेला आहे.

त्यानंतर त्या चरित्राचे मराठी भाषांतर करण्याऎवजी किरांनी आणखी मेहनत घेऊन बाबासाहेबांचे नविन माहितीसह बृहद मराठी चरित्र लिहिले. त्यांच्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी चरित्राच्या [प्रथमावृत्ती १९६६ ] आजवर ४ आवृत्त्या निघाल्या आणि पुढे त्याची ९ पुनर्मुद्रणेही प्रकाशित झाली. या ग्रंथाला अनेक पुरस्कार मिळाले. त्याची बहुतेक सर्व भारतीय भाषांध्ये भाषांतरे प्रकाशित झालेली आहेत.

किरांना डी.लिट. आणि पद्मभुषण हे सन्मान लाभले.

म्हातारपणी लेखन वाचनाने त्यांचे डोळे बिघडले तर ते लिहावाचायला मोठे भिंग वापरत असत. आयुष्यभर चाळीतल्या एका खोलीत राहून किरांनी व्रतस्थपणे ज्ञाननिष्ठा जपली. २३ एप्रिल १९१३ ला जन्मलेले कीर १२ मे १९८४ ला गेले.

बाबासाहेबांना महात्मा फुल्यांचे चरित्र लिहायचे होते.मात्र त्यांच्या प्रचंड व्यस्ततेत ते जमले नाही. तुम्हाला वेळ मिळाला नाही तर मी महात्मा फुल्यांचे चरित्र लिहिन असा शब्द किरांनी बाबासाहेबांना दिला व तो पाळला.
त्यांच्या विचारांवर सावरकरांचा प्रभाव होता. त्यांच्या लेखणातून तो दिसतो अशी त्यांच्यावर टिकाही झाली. मात्र महात्मा फुले, राजर्षि शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सीताराम केशव बोले यांच्या चरित्र लेखनासाठी किरांनी उपसलेल्या कष्टांना तोड नाही. घरात लेखनविषयक कोणतीही पार्श्वभुमी नसताना किरांनी मराठी व इंग्रजीतून लिहिलेली चरित्रे विद्वतमान्य आणि वाचकप्रिय ठरली.

-प्रा.हरी नरके, ९ जून २०१९

Saturday, June 8, 2019

आंबेडकर गुरूजींमुळेच बाबासाहेबांचे आडनाव बदलले - मा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर






बाबासाहेबांचे शिक्षक आंबेडकरगुरूजी यांच्यामुळेच बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव मिळाले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज येथे जाहीरपणे सांगितले. ते एबीपी माझा या वाहिनीच्या "माझा कट्टा" या कार्यक्रमात बोलत होते.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा" ही मालिका आपण बघता का? या मालिकेत जे दाखवले आहे ते बाबासाहेबांचे आडनाव आंबेडकरगुरूजींनी बदलले हे खरे आहे काय? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी वरिलप्रमाणे स्पष्ट निर्वाळा दिला व मालिकेत नावाबाबत जे दाखवले आहे ते बरोबर आहे असे सांगितले.

भीमाबाईंना तुमच्या पोटी महापुरूष जन्माला येईल असे स्वप्नात दिसल्याचे जे या मालिकेत दाखवले आहे ते बरोबर आहे काय? असेही त्यांना पुढे विचारण्यात आले. त्यावर त्या मिथककथा आहेत आणि मालिकेत त्या आल्या तर त्यांना आक्षेप घेण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले.

धनंजय कीर लिखित बाबासाहेबांचे चरित्र प्रमाणित आहे. या मालिकेमुळे सर्वसामान्यांना फारशा माहित नसलेल्या अनेक गोष्टी कळत आहेत असेही ते पुढे म्हणाले.

-प्रा.हरी नरके, ८ जून २०१९

Friday, June 7, 2019

आंबावडेकरचे आंबेडकर आडनाव कसे झाले याचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात








" आमचे आडनाव ’आंबेडकर ’ नव्हते. आमचे खरे आडनाव होते ’आंबावडेकर.’ आंबावडे या नावाचे खेड तालुक्यात दापोलीजवळ पाच मैलावर एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने ओळखीत असत. या आंबावडेकर आडनवाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते.ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत.पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते.......

......... मला सांगायला अभिमान वाटतो की, त्या प्रेमाच्या भाजीभाकरीची गोडी काही अविट असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखरच आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की, तुझे ’आंबावडेकर” आडनाव आडनीड आहे. त्यापेक्षा ’आंबेडकर” हे माझे नाव छान आहे. तेच तू यापुढे लाव. आणि कॅटलागमध्ये त्यांनी तशी नोंदही करून टाकली. "
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पाहा- संदर्भ- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड १, चांगदेव भवानराव खैरमोडे, सुगावा प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती १९५२, सातवी आवृत्ती २०१३, पृ. ४९

-प्रा.हरी नरके, ०७ जून २०१९

डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसे मिळाले?






 डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव कसे मिळाले?- मूळ लेख - अशोक अडसूळ, दिव्य मराठी, दि. २६ डिसेंबर २०१६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले.

डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव सुद्धा याच शाळेत मिळाले. प्रेमाने स्वतःच्या शिदोरीतील घास देणारे कृष्णाजी केशव आंबेडकर सारखे शिक्षकही येथेच त्यांना भेटले. त्यांचे आडनावही त्यांच्या आंबेड या गावावरून तयार झाले होते. ते आडनाव सुटसुटीत वाटल्याने त्यांनी बाबासाहेबांना पण सुचवले. तो पर्याय योग्य वाटल्याने शाळेतील दाखल खारीज रजिस्टर मध्ये १९१४ क्रमांकावर तसे नोंदवण्यात आले. शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांचे काही शिक्षण घरीच घेतले होते. त्यामुळे बाबासाहेब शाळेच्या त्या रजिस्टरमध्ये मोडी लिपीमधील स्वाक्षरी करू शकले. लहानपणी त्यांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने प्राणपणाने जपून व लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत तयार केलेली आहे. आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत.

कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आज कार्यरत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या पणजोबाचा सामाजिक वसा आंबेडकर कुटुंब आजही पुढं नेत आहे. त्याबरोबरच गुरू-शिष्याच्या साताऱ्यातील ‘त्या’ ऐतिहासिक आठवणींचा अनमोल ठेवाही या कुटुंबाने मौखिक पद्धतीने दर पिढीगणिक अभिमानाने जपला आहे.

कृष्णाजी गुरुजींची आज तिसरी पिढी पुणे, सातारा आणि मुंबईत विखुरली आहे. त्यातील थोरली पाती मुंबईत आहेत. राजीव आंबेडकर आयडीबीआयमधून निवृत्त झाले. ॲड. संजय आणि ॲड. विनायक यांची मुंबईत ‘आंबेडकर असोसिएट्स’ ही लाॅ फर्म आहे. मुंबईतील आंबेडकर कुटुंब दरवर्षी काही आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. महालक्ष्मी ट्रस्टवर ॲड. विनायक आंबेडकर काम करतात. गरजूंना वैद्यकीय मदत निधीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. मुंबई लघुवाद न्यायालयाच्या बार रूममध्ये बाबासाहेबांचे १२ फुटी तैलचित्र अड. विनायक आंबेडकरांनी लावले आहे.

कृष्णाजी गुरुजी ७९ वर्षे जगले. हयात आंबेडकर कुटुंबातील कुणीही गुरुजींना पाहिलेले नाही; पण त्यांच्या आठवणी मौखिक परंपरेने या कुटुंबानं कायम जिंवत ठेवल्या आहेत. आंबेडकर कुटुंबाकडे कृष्णाजी गुरुजींचा छायाचित्रं आणि पत्रांचा जो ऐतिहासिक ठेवा होता, तो त्यांनी पुण्यातील सिम्बाॅयसिस वस्तुसंग्रहास दान करून टाकला.

कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी मूळचे रत्नागिरी जवळील ‘वांद्री’ गावचे. त्यांना पेशव्यांनी ‘आंबेड’ गावाचे वतन दिल्याने त्यांना ‘आंबेडकर’ आडनाव पडले. आंबेडकर कुटुंब देवरुखे ब्राह्मण. त्यांचा दृष्टिकोन विशाल होता.
- Posted by Page Admin of Dr. Babasaheb Ambedkar
............................
मूळ लेख - अशोक अडसूळ, दि. दिव्य मराठी, दि. २६ डिसेंबर २०१६   लिंक-
https://divyamarathi.bhaskar.com/…/MAH-MUM-ambedkars-teache…

ओबीसी चळवळ मेलेली आहे, तिला काहीही भवितव्य नाही- प्रा.हरी नरके


ख्यातनाम साहित्यिक आणि माझे सन्मित्र श्री संजय सोनवणी म्हणतात, इतर मागास वर्गीय [ओबीसी] हा समाज निर्माणकर्ता समाज आहे.

हातांमध्ये नवनिर्मितीची जादू आणि डोक्यांमध्ये सर्जनशिलता असलेला निर्माणकर्ता समाज. बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणतात, देशात या वर्गाची लोकसंख्या ५२ टक्के आहे.

नॅशनल सॅंपल सर्व्हे ऑफीसच्या मते ह्या वर्गाची लोकसंख्या ४१ टक्के आहे. कोणतीही संख्या प्रमाण मानली तरी ही फार मोठी संख्या आहे हे मान्यच करावे लागेल. मंडल आयोगाचा हा अहवाल १९८० ते १९९० पर्यंत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने सडवला. त्यानंतर आलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो १३ ऑगष्ट १९९० रोजी लागू केला. त्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. त्यांना सत्ता गमवावी लागली. ते माध्यमं आणि बुद्धीजिवी यांच्या हेटाळणीचा कायमचा विषय बनले. हा वर्ग त्यांच्याविषयी कायम तुच्छतेनं बोलतो, लिहितो. ज्यांच्या भल्यासाठी त्यांनी काम केलं त्या ओबीसी वर्गाला तरी व्हीपी सिंगांची आठवण आहे काय? अजिबात नाही.

भाजपाच्या अडवानींनी रथयात्रा काढून मंडल आणि कमंडल वाद निर्माण केला. अडवानी आणि संघपरिवार ओबीसीविरोधी होते. आहेत. त्यात त्यांची सरसी झाली.

ओबीसींची पिछेहाट झाली.

भाजपाला तेव्हापासून चांगले दिवस सुरू झाले.

अडवानींना मात्र त्याची सजा मिळाली. ते आज अडगळीत गेलेत ते स्वत:च्या करणीनेच.

ओबीसी आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारा भाजपा हुशार निघाला, त्याने नवओबीसी नरेंद्र मोदींचा चेहरा वापरला. मोदीही फक्त निवडणुकीपुरते पिछडे असतात. एरवी तेही प्रस्थापितांचे प्रवक्ते असतात.

१९८० ते २०१९ सुमारे ४० वर्षे होऊनही अद्याप ओबीसींची ओळख निर्माण होऊ शकलेली नाही. सशक्त ओबीसी छावणी निर्माण होऊ शकलेली नाही. ओबीसी व्होटबॅंक मात्र सर्वांना हवीय. तथापि ओबीसींचा विकास व्हावा अशी कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाची इच्छा दिसत नाही. ओबीसींचा अजेंडा ना काँग्रेस- राष्ट्रवादीला हवाय ना सेना भाजपाला हवाय. ओबीसींची मतं मात्र सगळ्यांना हवीयत.

ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय त्यांची नेमकी संख्या कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय त्यांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा या मूलभूत गोष्टींसाठी निधी देता येणार नाही, म्हणून २ आक्टोबर २०११ ला त्यांची जनगणना सुरू करण्यात आली. मात्र नवओबीसी असलेल्या मोदींनी गेल्या ५ वर्षात ती लोकसंख्या घोषित केलेली नाही. ते करणारही नाहीत. उलट ओबीसींची विभागणी ३ गटात करण्यासाठी त्यांनी न्या. रोहिणी आयोग नेमलाय.

गेल्या ४० वर्षात ओबीसी छावणी तयार होऊ शकलेली नाही. जात, धर्म, वर्ग, भाषा, संस्कृती, प्रदेश, लिंगभावाची ओळख हीच खरी भारतीय ओळख असते. ओबीसीतील सर्व जातींच्या आपापल्या संघटना आहेत. त्या फक्त वधूवर संशोधन, जातीचे मेळावे, जात पंचायती यासाठी सक्रीय असतात, मात्र ओबीसींच्या प्रश्नावर त्या संपुर्ण उदासिन असतात. ओबीसींच्या कृतीकार्यक्रमात गैरहजर असतात.

ओबीसींचे शिक्षणहक्क डावलले गेले, त्यांच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या, त्यांचे आरक्षण पळवले गेले, उद्या ते नष्टही केले गेले तरी या जात संघटना लढणार नाहीत.

इतक्या मुर्दाड आणि निष्क्रीय संघटनांचे भवितव्य काय असणार? शून्य.

ओबीसींच्या बॅनरखाली तयार झालेल्या बहुतेक सगळ्या संघटना एखादीचा अपवाद वगळता श्रेयासाठी कागदबाजी करणार्‍या निव्वळ  भुरट्या संघटना होत. परप्रकाशित आणि मृत.

ओबीसींमध्ये तीनप्रकारचे लोक आहेत. एक- अतिशय गरिब. आपापल्या रोजीरोटीत अडकलेले. पिचलेले. दबलेले. त्यांनी लढावे अशी अपेक्षाच नाही.

दुसरे तमाम नवमध्यमवर्गीय, बुद्धीजिवी. हे अत्यंत दांभिक आणि भुरटे लोक. त्यातले ओबीसी पत्रकार, उच्चपदस्थ अधिकारी, साहित्यिक, बुद्धीजिवी, फेसबुके, ट्विटरे ह्यातले एखादा - दुसरा अपवाद सोडता आपापली ओळख दडवण्यासाठीच अटोकाट प्रयत्नशील असतात. बहुधा त्यांना आपण ओबीसी असल्याची लाज वाटत असणार. त्यांना उच्चवर्णियात घुसायचे असते. तिथे त्यांना कुत्रेही विचारत नाही हा भाग वेगळा. हे सगळे कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ असतात.

ओबीसींच्या प्रश्नावर काही लिहिले तर त्यावर प्रतिक्रिया द्यायचे सोडा, त्याला लाईक करायलाही हे भेकडभावले घाबरत असतात. असल्या नेभळट, भित्र्या आणि आप्पलपोट्यांसाठी इतरांनी
काय म्हणून तळमळावे?

तिसरे राजकारणी.

पंचायत राज्यातल्या आरक्षणाचा लाभ गेल्या २५ वर्षात सुमारे ५ लाख छोट्यामोठ्या राजकारण्यांना झाला.  पण यातला एखादा अपवाद सोडता बाकी सगळे आपापल्या पक्षीय मालकांचे सालगडी असल्याने मालक [हायकमांड] नाराज होऊ नयेत यासाठी ते पक्षश्रेष्ठींपुढे लाचार बनलेले असतात. ते उघडपणे लढू शकत नसले तरी खाजगीतही त्यांनी ओबीसी लढ्याला पाठींबा देऊ नये हे अनाकलनीय आहे. असल्या बांडगुळांचा ओबीसींना काहीही उपयोग नाही.

ज्यांची लढण्यासाठी कसलीही किंमत मोजायची तयारी नसते मात्र व्यक्तीगत अन्याय झाल्यावर त्यांना अपण ओबीसी असल्याचे आठवते त्या बिनकण्याच्या अपृष्ठवंशिय ओबीसींना यापुढे अजिबात भविष्य असल्याचे मला तरी दिसत नाही. त्यांच्यासाठी लिहिणे, बोलणे, लढणे म्हणजे वेळ वाया घालवणे होय. ह्या व्यवहारिकदृष्ट्या मुर्ख ठरणार्‍या कृतींपसून यापुढे दूरच राहिलेले बरे.

प्रा.हरी नरके, ०७ जून २०१९

Thursday, June 6, 2019

आरक्षण : खुला गट : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि आपण -




काल सागर दामोदर सारडा प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत मोठा निकाल दिलेला आहे.
केंद्र व राज्य सरकारांनी लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला दिलेल्या १० % आरक्षणाच्या जागांसाठी अनु. जाती/जमाती/विजाभज/ इमाव/विमाप्र हे पात्र नाहीत असे सर्वोच्च न्यायालय या निकालात म्हणते.

हा निकाल ६५% समाजघटकांवर अन्याय करणारा असल्याने केंद्र सरकारने या निकालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे फेरविचार याचिका दाखल करायला हवी.

याचा अर्थ अनु. जाती/जमाती/विजाभज/ इमाव/विमाप्र मधील लोक गरिब नसतात असा सर्वोच्च न्यायालय घेत असून वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे.

बिझनेस स्टॅंडर्ड आणि इकॉनॉमिक टाइम्स यांचे सर्वेक्षण सांगते की देशातील गरिब वर्गात अनु. जाती/जमाती/विजाभज/ इमाव/विमाप्र यांचा भरणा सर्वाधिक आहे.

आर्थिक निकषांवरील कमकुवत गटाची प्रमाणपत्रे मिळवणे सोपे असते. तलाठी/मालक आणि तहसीलदार यांच्याकडून मिळवलेले प्रमाणपत्र त्यासाठी पुरेसे असते तर अनु. जाती/जमाती/विजाभज/ इमाव/विमाप्र यांचे प्रमाणपत्र मिळवणे, त्याची पडताळणी करून घेणे हे वेळखाऊ आणि किचकट तसेच खर्चिक असते.

या वर्गासाठी जरी जात/जमातवार आरक्षण असले तरी यामुळेच ते निष्फळ ठरते.

-प्रा.हरी नरके, ६ जून २०१९

Wednesday, June 5, 2019

वर्तमानपत्रांचा खप, मालकांचा सामाजिक स्तर आणि वाचक-



भारतीय समाजात जात, वर्ग आणि लिंगभाव यांच्या आधारे बहुतेक सामाजिक भुमिका ठरतात. त्यात अर्थातच धर्म, भाषा, संस्कृती व प्रांत या विविधता आणि विचारसरणी यांचा महत्वाचा वाटा असतो.

या दृष्टीने राज्यातील वर्तमानपत्रांवर एक नजर टाकली तर काय चित्र दिसते? वाचक सर्वस्तरिय, बहुवर्गिय आणि बहुजातीय असलेल्या या वर्तमानपत्रांची मालकी मात्र मर्यादित गटांमध्येच विभागलेली आढळते.
लोकमत या वर्तमानपत्राने नुकताच असा दावा केला आहे की त्यांचा खप सर्वाधिक आहे.

चर्चेसाठी हा दावा व त्यांनी दिलेली खपाची आकडेवारी खरी मानली तर राज्यातील सर्वाधिक खपाची १० वर्तमानपत्रे पुढीलप्रमाणे - [चूकभूल देणे-घेणे]

१. लोकमत, मालक : दर्डा, सामाजिक गट- वैश्य
२. सकाळ, मालक :पवार, सामाजिक गट : मराठा
३. पुण्यनगरी, मालक : शिंगटे, सामाजिक गट : मराठा
४. पुढारी, मालक : जाधव, सामाजिक गट : मराठा
५. लोकसत्ता, मालक : गोयंका, सामाजिक गट- वैश्य

६. म.टा., मालक : जैन, सामाजिक गट- वैश्य
७. टाइम्स ऑफ इंडीया, मालक : जैन, सामाजिक गट- वैश्य
८. दिव्य मराठी, मालक : आगरवाल, सामाजिक गट- वैश्य
९. सामना, मालक : देसाई, सामाजिक गट : मराठा
१०. नवभारत, मालक : माहेश्वरी, सामाजिक गट- वैश्य

-प्रा. हरी नरके, ०५ जून, २०१९

Saturday, June 1, 2019

भुरटे सरकारी इतिहासकार, राष्ट्रमातेची बदनामी आणि सतिप्रथा











भुरट्या सरकारी इतिहासकार श्रीमती श्यामा घोणसे यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली.

खरंतर ज्या बाईंचा इतिहासाचा काडीमात्र अभ्यास नाही त्या श्यामा घोणसे यांना विद्यापीठाने गरळ ओकणार्‍या भाषणासाठी बोलावलेच कसे? हे विद्यापीठ आहे की समरसतेचा अड्डा?

शिक्षणमंत्री विनोद तावडॆंनी तर या महामातेला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख नेमलेले आहे.

त्यांची मुक्ताफळे अशी की " अहिल्यामातेच्या कुटुंबातील सर्व पुरूष व्यसनी होते, सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी नाही तर समर्थ रामदास यांनी बंद केली."

माझा त्यांना सवाल आहे की काय महायोद्धा मल्हारराव होळकर व्यसनी होते?

संत रामदासांनी जर सती प्रथा बंद केली होती तर त्यांच्यासमोर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतळाबाई सती कश्या काय गेल्या होत्या?

थोरले माधवराव पेशवे [माधवराव बाळाजी भट पेशवे] यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई कशा काय सती गेल्या होत्या?

संपुर्ण भारतातल्या १८ व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक असणार्‍या अहिल्यामातेला त्यांनी आज दुषणे लावलीत.

उद्या ह्या बाई म्हणतील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी सुरू केली नसून ती भलत्याच कुणीतरी सुरू केलेली होती.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या या समरतेच्या भुरट्या सरकारी इतिहासकारांना त्यांची जागा आत्ताच दाखवली नाही तर हे लोक सगळाच इतिहास बदलून टाकतील.

ही प्रवृत्ती घातक आहे.

-प्रा.हरी नरके, १ जून २०१९