Wednesday, August 2, 2017

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली-- डॉ. रखमाबाई जनार्दन सावे


नाही चिरा नाही पणती....
ब्रिटीश काळात भारतीय महिलांच्या आरोग्याचं चित्र काय होतं?

एका बकरीचं बाळंतपण हॉस्पीटलमध्ये करण्यात आलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्या गेल्या.  का?

एकदा देवीची महाभयंकर साथ आल्यानं हजारो महिला आजारी पडल्या. त्यांना औषधं कोण आणि कशी द्यायचं माहित आहे?

आजारी महिलेला पडद्याआड बसवलं जायचं. पुरूष डॉक्टर दुसर्‍या पडद्यामागे असायचा. त्याच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. आजारी बाई पडद्याआडून आपला एक हात बाहेर काढायची. पडद्याआडून पुरूष डॉक्टर तो हात तपासायचा आणि इंजेक्शन द्यायचा. या कामावर देखरेख करायला चार हिजडे नेमलेले असायचे.

बाळंतपणात लाखो महिला मरायच्या. डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी महिलांनी दवाखाण्यात येऊन बाळंत व्हावे म्हणून परोपरीनं  लोकांना विनवलं. पण हॉस्पीटलमध्ये  भुतबाधा होईल अशा अंधश्रद्धेमुळे एकही गरोदर महिला बाळंतपण करायला तयार नसायची.
त्या काळात बाळंत झालेल्या महिलेला 40 दिवस हॉस्पीटलमध्ये  देखरेख आणि औषधोपचार यांच्यासाठी ठेवलं जायचं.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी हॉस्पीटलमध्ये पहिलं बाळंतपण कसं केलं असेल?

तर त्यांनी एका बकरीचं बाळंतपण या हॉस्पीटलमध्ये केलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्यावर महिलांची भीती कमी झाली. काही पारशी बायकांची अतिशय निगुतीनं बाळंतपणं त्यांनी केल्यावर मग हळूहळू हिंदू, मुस्लीम आणि इतर समाजातल्या गरोदर महिला या हॉस्पीटलमध्ये येऊ लागल्या.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे   [ जन्म 22 नोव्हेंबर 1864, मृत्यू 25 डिसेंबर 1955]
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली--

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग आणि त्यांचं वैद्यकिय शिक्षण मोलाचंच. दु:खाची गोष्ट अशी की डॉक्टर होऊन परदेशातून भारतात परत येतानाच डॉ. आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात येऊन एकही पेशंट त्या तपासू शकल्या नाहीत. 3 महिन्यातच वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं. [डॉ. आनंदीबाई जोशी, जन्म 31 मार्च 1865- निधन 27 फेब्रुवारी 1887]

1889 मध्ये इंग्लंडला जाऊन वैद्यक शास्त्रातील एम.डी. ही पदवी घेऊन 1894 मध्ये भारतात आलेल्या मुळच्या मुंबईच्या असलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये आणि सुरत व काठेवाडमध्ये आयुष्यभर रूग्णसेवा केली. असंख्य अडचणींना तोंड देत वैद्यकिय शिक्षण घेऊन  त्या ज्ञानाचा उपयोग भारतीयांना आयुष्यभर करून देणार्‍या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना आपण सारे का बरं विसरलो?

त्या आयुष्यभर प्रॅक्टीस करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असूनही सरकार आणि समाज यांच्यालेखी नाही चिरा नाही पणती....

अगदी महिला चळवळीलासुद्धा त्यांचा विसर का पडावा ?

"डा.रखमाबाई :एक आर्त" नावाचं एक मौलिक पुस्तक त्यांच्यावर निघालं आणि त्याचीही फक्त पहिली आवृत्ती 1982 साली प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या पुढच्या आवृत्त्या निघाल्या नाहीत. असं का?
डा. रखमाबाईंच्या एक नातेवाईक प्रा. मोहिनी वर्दे यांनी खुप मेहनत घेऊन हे संदर्भ पुस्तक लिहिलं. 222+16+[10 आर्टप्लेटसचं] पृष्ठांचं हे पुस्तक. किंमत रूपये 24 मात्र. पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
प्रकाशकांना, वैद्यक विश्वाला किंवा स्त्रीमुक्ती चळवळीला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी असं का वाटलं नाही? आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या किती महिलांनी आणि पुरूषांनी हे पुस्तक वाचलंय? हे पुस्तक आज फारसं कु्ठंच का मिळत नाही?

सुमारे दिडशे वर्षांपुर्वी मुंबईत जन्माला आलेल्या आणि 91 वर्षांचं दिर्घायुष्य लाभलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना सरकार आणि समाज म्हणून आपण चक्क विसरून गेलो.

रखमाबाईंचा बालविवाह झालेला होता. वयात आल्यावर त्यांनी मला उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून मी नांदायला जाणार नाही अशी भुमिका घेतली.
नवरा दादाजी न्यायालयात गेला. रखमाबाई केस हरल्या.

उच्च न्यायालयात अपिल करण्यात  आल्यावरही त्या परत हरल्या.
न्यायालयाने त्यांना नांदायला जा नाहीतर न्यायालयाची बेआदबी केली म्हणून तुरूंगात जा असा कडक पवित्रा घेतला. त्या तुरूंगात जायला तयार झाल्या.

पुढे न्यायालयाबाहेर तडजोड झाली.

त्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या.

स्त्रीहक्कांच्या इतिहासात हा खटला जगभर गाजला. आणि तरिही आजची स्त्री चळवळ  आणि वैद्यकविश्व  डॉ. रखमाबाई जनार्दन सावेंना विसरून गेले.....

भारतात ज्यांच्यामागे त्यांची जात उभी नसते त्यांना कोणीच वाली नसतं का?

पाचकळशी [माळी] समाजानं डॉ. रखमाबाई नवर्‍याकडं नांदायला गेल्या नाहीत म्हणून त्यांना माळी जातीतून बहिष्कृत केलं.

डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे डॉ. रखमाबाईचे सावत्र पिता. त्यांचे जन्मदाते वडील जनार्दन सावे हे डॉ. रखमाबाई लहान असतानाच वारल्यानं त्यांच्या आईनं डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला. डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांनी वैद्यक शास्त्रावर 6 मौलिक ग्रंथ लिहिलेले आहेत.
- प्रा.हरी नरके
................................