Friday, February 28, 2014

मराठी अभिजातच


 प्रा.हरी नरके,
समन्वयक - अभिजात मराठी भाषा समिती, महा.शासन.
...........................................................
दहा वर्षांपुर्वी केंद्र सरकारने तंमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली.त्यामुळे मराठीचे काय झाले हा प्रश्न विचारला जाऊ लागला. "अभिजात मराठी समितीला मायमराठीचे प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेले नाही," "केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचे अभिजातपण स्वीकारले नाही" अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या.खरेतर आमच्या समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचिनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हें.२०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपुर्ण खात्री आहे.
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम,  महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, सानेगुरूजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडॆकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे,लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी,नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर,यांच्या मराठीचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
.....................................................................
या विश्वात खूप जैवविविधता आहे.माणूस हा विचारशील प्राणी आहे. अर्थातच प्रत्येक माणूस आपल्या भाषेतून विचार करतो.भाषा ही माणसांची अस्मिता नी एकप्रकारचे ओळखपत्र असते.आपापल्या मायबोलीचा प्रत्येकाला अभिमान असतो.माणूस भाषेच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करतो. साहित्य, विचार, तत्वज्ञान यांच्याद्वारे संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे वाहून नेण्याच्रे मोलाचे काम होत असते.संशोधक असं सांगतात की लक्षावधी वर्षांच्या मानवी प्रवासात सुमारे ७० हजार वर्षांपुर्वी माणसाने भाषा पहिल्यांदा जन्माला घातली.पुढे जगभरात हजारो भाषा निर्माण झाल्या. आज जगभरात प्रंचंड मोठी भाषक विविधता असून तिचे जतन करण्याची गरज आहे. जगात आज छोट्यामोठ्या २० हजार भाषा असून त्यातल्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्‍या भाषांची संख्या सुमारे २००० आहे.त्यातल्या ३०% भाषा एकट्या भारतात आहेत. १९०७ साली ग्रियरसनच्या नेतृत्वाखाली पहिले भारतीय भाषा सर्व्हेक्षण झाले.२०१३ साली गणेश देवी यांच्या पुढाकाराने नवे सर्व्हेक्षण सुरू झालेले आहे.
दहा वर्षांपुर्वी केंद्र सरकारने तंमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली.त्यामुळे मराठीचे काय झाले हा प्रश्न विचारला जाऊ लागला. "अभिजात मराठी समितीला मायमराठीचे प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेले नाही," "केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचे अभिजातपण स्वीकारले नाही" अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या.खरेतर आमच्या समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचिनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हें.२०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपुर्ण खात्री आहे.
गरज आहे ती मराठी माणसांनी आपला ऎतिहासिक न्यूनगंड आणि भाषक करंटेपणा झटकून मराठीचे ला‘बिंग आणि मार्केटिंग करण्याची.बारा कोटी लेकरं एकमुखानं मराठीच्या बाजुनं बोलू लागली तर मराठीला यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.अर्थात मराठी माणसांची अभिरूची इतकी संपन्न आहे की मराठीला वेगळ्या विरोधकांची गरजच नाही.अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.मराठी ही ज्ञानभाषा आणि महानुभवांची धर्मभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या सातवाहन आणि मराठे यांचे राज्य भारतभर तर होतेच पण  पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठीभाषेची  पताका फडकत होती. मराठी बोलणारे लोक आज देशाच्या ३६ ही राज्य आणि प्रदेशात व जगातल्या १०० देशांमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे अडीच हजार पुस्तके प्रकाशित होतात. कोश वांग्मयाच्या बाबतीत मराठी जगातली दुसरी समृद्ध भाषा आहे. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे पन्नास साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल व पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे अडीचशे कोटींपर्यंत आहे.बालभारती ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असून  ती दरवर्षी १९ कोटी पुस्तके छापते. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. लोकराज्य हे भारतातले नंबर एकचे मासिक आहे.
अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची  भाषा किंवा उच्चवर्णियांची तथा उच्च कुलीणांची भाषा असा भ्रम आपण आजवर जोपासत आलो आहोत. अभिजाततेचा सर्वाधिक महत्वाचा निकष आहे, भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता. भाषेचे वय सांगणारे लिखित दस्तावेज दीड हजार वर्षांचे असावेत,भाषिक आणि वाड्मयीन परंपरा स्वतंत्र आणि स्वयंभू असावी, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात  खंड असला तरी त्यात नाते असावे हे उर्वरित निकषही मराठी पूर्ण करते.
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही.ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ सालीच राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिलेले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल.रा.पांगारकर, शं.गो.तुळपुळे, अ‘न फेल्डहाऊस,वि.भि.कोलते आदींनी मराठीचे वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत.ज्ञानेश्वरी,लिळाचरित्र,विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असे आम्ही अडाणीपणाने सांगतो. एव्हढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकेल? ’गाथा सप्तसती’ हा दोन हजार वर्षांपुर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे.एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे...प्रत्येक मराठी घरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लीळाचरित्रात आलेली असली तरी त्यापूर्वी किमान हजार वर्षे ती लोकपरंपरेत होती.तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असे मराठी लोकांबद्दलचे वर्णन सापडते. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे.२२२० वर्षापूर्वींच्या ब्राह्मी लिपीतील या शिलालेखात   "महारठीनो" असा उल्लेख आहे.
विनयपिटक या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात तसेच दिपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील सिंहली ग्रंथात महारट्ठचा उल्लेख सापडतो.लिहले. दुसर्‍या शतकात वररूचीने ‘प्राकृतप्रकाश’ हा व्याकरण ग्रंथ लिहला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना मराठीचे नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषेमध्ये लिहिला. तो मूळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. त्यात तो मराठीचा मुक्तहस्ते वापर करतो. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. ७व्या शतकातले  हरिभद्र आणि उद्योत्तन सुरी हे मराठीचे अभिजात साहित्यकार आहेत. संस्कृत कवी शुद्रक, महाकवी कालीदास यांनीही मराठीचा वापर केलेला आहे. महाभारतात असंख्य मराठी शब्द आहेत. यज्ञमंडपात मराठीतून बोलायला बंदी घालण्यात आलेली होती याचाच अर्थ हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत, हे स्पष्ट आहे.
हॉर्वड विद्यापीठातील मिखाईल विट्झेल यांनी ‘ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स’ या ग्रंथात संस्कृत ही वैदिकपूर्व बोलीभाषेतून जन्माला आली असल्याचे दाखवले आहे. मराठी, अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या तीन वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची ती तीन वेगवेगळी नावे असल्याचे शेकडो पुरावे आहेत.मराठी{महारठी, महाराष्ट्री} चा जन्मही अशाच एका वैदीकपुर्व बोलीतून झालेला आहे.यावरून मराठीची आई आणि संस्कृतची आजी ह्या बहीणी होत्या असे दिसते. मराठीने संस्कृतकडून जरूर घेतले पण दामदुप्पट परतही केले.आजच्या मराठीवर इतर प्राकृत भाषा, पर्शियन आणि द्राविडीभाषा यांचा प्रभाव आहे. तथापि मराठीचे अस्सल जे आहे ते जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. म्हणूनच संत एकनाथ विचारतात, " संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली?"
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम,  महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, सानेगुरूजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडॆकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे,लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी,नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर,यांच्या मराठीचे श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
.................................

Tuesday, February 18, 2014

महात्मा फुले यांच्या कवितेच्या ओळी.

वानवडी,पुणे, "महात्मा फुले सभागृह" उद्या मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या सभागृहातील महात्मा फुले यांच्या कवितेच्या ओळी...

मनाचे तळ शोधणारे चित्रपट

http://kalamnaama.com/manache-tal-shodhanare-chitrapat/...
Home > चंदेरी > मनाचे तळ शोधणारे चित्रपट
मनाचे तळ शोधणारे चित्रपट
By कलमनामा on February 2, 2014, feature size
जगभरात दरवर्षी अनेक चित्रपट महोत्सव होतात. त्यातल्या काहींचं स्थान फार प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं असतं. अशाच वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवात अवघ्या १२ वर्षांत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने स्थान पटकावलेलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता राज्य सरकारच्या अधिकृत महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. जगातला हा असा एकमेव चित्रपट महोत्सव आहे की ज्यात मराठी चित्रपटांचंही परीक्षण जागतिक पातळीवरील अमराठी परीक्षक करतात. यावर्षीच्या महोत्सवात सर्वात गाजलेला चित्रपट होता करमाळ्याच्या नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’. लोकमान्यता आणि आंतरराष्ट्रीय विद्वत्मान्यता असा मेळ फारसा कधीही जुळून येत नाही. मात्र इथे तो सुवर्णयोग जुळून आला आणि जागतिक परीक्षकांनी दिलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे महत्त्वाचे चार पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वोत्तम पावती मिळालेला पाचवा पुरस्कार असे सगळे पुरस्कार जिंकणारा ‘फँड्री’ एकमेव चित्रपट ठरावा.

शक्तिशाली दलित संवेदना, समकाल आणि सखोल जीवनदर्शन यावरील श्रेष्ठ चित्रपट प्रेक्षकांनीही उचलून धरावा असं बहुधा पहिल्यांदाच होत असावं. आता हा चित्रपट तिकिटबारीवरही यशस्वी होवो हीच शुभेच्छा. मंजुळे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोमनाथ अवघडे या यातल्या नायकाची भूमिका करणार्या अभिनेत्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. करमाळ्याजवळील केम या लहानशा खेड्यात ज्याचे वडील हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा घरात जन्मलेल्या आणि स्वतःही हलगी वाजवणार्या या मुलाने हा पुरस्कार मिळवला. तो अवघ्या चौदा वर्षांचा आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला पोलंडचा ‘पपुजा’ हा चित्रपट जोना कोस-क्राऊज आणि क्रायझ्सतोफ क्राऊज यांनी दिग्दर्शित केलेला होता. जिप्सी या भटक्याविमुक्त जमातीतील एका प्रतिभावंत कवयित्रीची ही सत्यकथा काळजाचा ठाव घेणारी होती. महाकवी तुकारामांच्या वाट्याला जे आलं तेच जगभरच्या प्रतिभावंतांच्या वाट्याला येत असतं. या अंधश्रद्ध, अभावग्रस्त भटक्या समाजाने तिला कविता लिहिते या गुन्ह्यासाठी जातिबहिष्कृत केल्यानंतर तिची झालेली ससेहोलपट, तिला सोसावा लागलेला तुरुंगवास आणि तिची विराट तडफड जगभरातील सगळ्या संवेदनशील माणसांची प्रातिनिधिक कहाणी बनते. १९१० साली जन्मलेली पपुजा १९८७ साली गेली. तिचं हे प्रदीर्घ आणि असामान्य जीवनचरित्र केवळ एक वृत्तचित्र न बनता एका श्रेष्ठ कलाकृतीच्या पातळीवर घेऊन जाण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. २०१३ सालचा हा चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. चित्रपटातील जिप्सी समाजाची भटकंती, संगीतमय जगणं, व्यसनं, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, निरक्षरता आणि कुपोषण यांचं संयत चित्रण मनाला आरपार भावणारं. अशा आदिवासीसदृश्य समाजात ही मुलगी जन्माला येते, तरीही अक्षरांचा ध्यास घेते, तिचा एका प्रौढाशी बालविवाह करून दिला जातो, ती पुढे एक प्रतिभावंत कवयित्री बनते. महायुद्धातील हिटलरी छळाला तिला सामोरं जावं लागतं. समाज तिला बहिष्कृत करतो. तिला मदत करणार्या जर्सी फिकोवस्की या संशोधकाने जिप्सींवर लिहिलेल्या समाजशास्त्रीय ग्रंथामुळे जिप्सींमधील अडाणीपणामुळे उठलेलं वादळ, त्यापोटी त्याला आणि पपुजाला सोसावा लागणारा छळ सारंच वेदनादायी. ताकदीच्या दिग्दर्शकांनी कथा, पटकथा, संवाद, छायचित्रण, जिप्सी संगीत, सशक्त व्यक्तिचित्रण आणि तगडा अभिनय यातून एक जागतिक कलाकृती साकार केलेली आहे. कोणाही संवेदनशील माणसाने चुकवू नये असा हा चित्रपट आहे.

या आठ दिवस चाललेल्या महोत्सवात ९ ते १६ जानेवारीच्या काळात ४८ देशांतील २१३ चित्रपटांचे अकरा चित्रपटगृहातून ३०० शो करण्यात आले. दहा हजार प्रेक्षकांनी रांगा लावून हे चित्रपट पाहिले. हा तरुणांचा महोत्सव होता. महोत्सवाच्या प्रेक्षकांचं सरासरी वय १९ वर्षं होतं.

जागतिक स्पर्धेतील १४ चित्रपट, ग्लोबल सिनेमा या गटातील ८२ चित्रपट, जगातील नामवंत दिग्दर्शकांच्या गौरवार्थ दाखवण्यात आलेले (जगभरातील) ३६ आणि ११ (भारतीय) तसंच एनएफडीसीचे पाच अभिजात चित्रपट, नॅशनल अर्काइव्जमधील पाच जुन्या महान कलाकृती, चौदा मराठी चित्रपट, विविध देशांची वैशिष्ट्यं दाखवणारे ३८ विशेष चित्रपट आणि इतर आठ असे एकूण २१३ चित्रपट ही पुणेकरांसाठी अविस्मरणीय मेजवानी होती. आठवडाभर रंगलेल्या ‘पिफ’चा समारोप मराठमोळ्या वातावरणात चित्रपट आणि कलावंतांचा गौरव करत झाला. ‘फँड्री’ आणि ‘पपुजा’ ही नावं जाहीर होताच सभागृहात अक्षरशः टाळ्यांचा पाऊस बरसला. चित्रपटाच्या टीमने ‘फँड्री’च्या नावाने चांगभलं अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.समारोपानंतर ‘पपुजा’ पुन्हा दाखवण्यात आला. मुळची भारतीय असलेली जिप्सी ही जमात आणि त्यातली पपुजा आज जरी पोलंडमध्ये उपेक्षाच्या गर्तेत असली तरी या चित्रपटामुळे आता ती कधीही विसरली जाऊ शकणार नाही.

उत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणखी एक पुरस्कार इटलीच्या मिरको लोकॅटल्ली यांना ‘फॉरेन बॉडीज’ या चित्रपटासाठी देण्यात आला. कॅन्सरग्रस्त बालकाचा चिंतित पिता आणि दवाखान्यातील अरब पेशंटचा मित्र यांची आगळीवेगळी कहाणी म्हणजे ‘फॉरेन बॉडीज’. जागतिक चित्रपट स्पर्धा विभागातील विशेष पुरस्कार जागतिकीकरणाचे चीनवर झालेले परिणाम टिपणार्या ‘अ टच ऑफ सीन’ या चित्रपटासाठी झिया झँग-की यांना देण्यात आला. तसंच ‘हाऊस विथ टुरेट’लाही गौरवण्यात आलं.

जर्मनीच्या सिबेल बर्नर यांना ‘रोझी’ या चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी चित्रपटात प्रथमच काम केलं होतं. एका मनस्वी म्हातारीचा हा रोल त्यांनी अफलातून सादर केला होता. एक व्यक्ती आणि वल्ली म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारी ही वृद्धा बर्नर यांनी ज्या पद्धतीने उभी केली त्याला खरंच तोड नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी ‘नाईट ट्रेन टू लिस्बन’ या जर्मनीच्या चित्रपटाची निवड केली.

सरहद्द गांधी म्हणजे भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनावरील अमेरिकेच्या टेरी मक्लुहान यांनी २० वर्षं अपार मेहनत करून बनवलेल्या डॉक्युमेंट्रीने या महोत्सवाला फार मोठी उंची प्राप्त करून दिली. एखादं वृत्तचित्र चित्रपटापेक्षाही किती जबरदस्त असू शकतं त्याचा चालताबोलता पुरावा म्हणजे ही ९२ मिनिटांची डॉक्युमेंट्री होय. अशी महान डॉक्युमेंट्री मी आयुष्यात कधीही पाहिलेली नव्हती. अहिंसेच्या या पठाणी पुजार्याची ही कहाणी नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनीही अवश्य बघावी.

भारतीय चित्रपट जागतिक पातळीवर तसूभरही कमी नाही याचा प्रत्यय देणारे दोन महान भारतीय चित्रपट म्हणून जोय मथ्यू यांच्या मल्याळम् भाषेतील ‘शटर’ आणि खुशवंत सिंग यांच्या भारत पाक फाळणीवर आधारित कादंबरीवरून तयार केलेल्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या चित्रपटांचा खास उल्लेख करावा लागेल. मानवी जीवनातील अमाणूस क्रौर्य, अपार करुणा, असीम प्रेम, झुंडीचं मानसशास्त्र आणि धर्मांधता यांचा सुन्न करणारा अनुभव म्हणजे पामेला रूक्स यांचा ‘ट्रेन टू पाकिस्तान.’

एका रात्रीची श्वास रोखून धरायला लावणारी कहाणी म्हणजे ‘शटर.’ जगण्यातली समज वाढवणारी ही कलाकृती. मानवी नात्याची यातली उकल खरंच फार विलक्षण आहे.

चित्रपटाची भाषा जगाला कशी जोडते याचा अनुभव या महोत्सवाने दिला. जगभरचा माणूस भले भाषा, संस्कृती, विचारधारा, धर्म, पर्यावरण, आर्थिक स्थिती यानुसार वेगवेगळा असेल पण माणूस म्हणून त्याचा पिंड मूलतः एकच आहे. जगभर भली माणसं आहेत. कळवळ्याची माणसं आहेत. तशीच दुष्ट आणि क्रूर माणसंही सगळीकडेच आहेत. जगभरचे कलावंत या माणसाचा न संपणारा शोध आपल्या कलाकृतींमधून कसा घेत आहेत त्याचा पुण्यात बसून जगभर मारलेला आजच्या जगाचा फेरफटका या महोत्सवाने घडवलाच, पण जगण्याची समज उंचावली. माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला. मानवी प्रतिभेची शिखरं बघता आली. आयोजक डॉ. जब्बार पटेल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना विशेषतः समर नखाते आणि मित्रांना खूप खूप धन्यवाद.

प्रा. हरी नरके