Saturday, September 29, 2018

निमित्त- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती









निमित्त- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती - प्रा. हरी नरके

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते एकमेकांचे स्पर्धक होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा एका कर्तव्यभावनेपोटी हे लिहित आहे.

१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.
२. ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नाही.

३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो. अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट गांधी अ‍ॅंड काँग्रेस हॅव डन टू दि अनटचेबल्स" या महाग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नक्कीच नाही.

४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात.

बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]


५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे.

यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.


२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.


६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते.


त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.


७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले.


त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला." पहिला भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, मला मातृभूमी नाही तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना महाग पडली. बाबासाहेब आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]


८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.

मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ.जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले.

ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे.

काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.

९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?


१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले.


नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे  झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.


११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.


पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]


गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी.
त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.


दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "
बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे." 

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.
या दोघा महामानवांना वंदन.

-प्रा.हरी नरके, २९ सप्टेंबर, २०१८

Friday, September 28, 2018

मंटो







सआदत हसन मंटो हा काळाच्या खूपखूप पुढचा लेखक होता. तो अकाली गेला. ११ मे १९१२ ला जन्मलेला हा गुणी लेखक वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी १८ जानेवारी १९५५ ला गेला. तो बंडखोर आणि सामाजिक वास्तवाचं प्रखर चित्रण करणारा कथाकार असल्यानं त्याच्यावर अश्लिल लेखणाबद्दल ब्रिटीश भारतात ३ आणि नवनिर्मित पाकीस्तानात ३ असे सहा खटले भरले गेले. आज त्याच्या या कथा वाचताना त्यात चिमूटभरही काही आक्षेपार्ह असल्याचं दिसत नाही. मात्र सनातन्यांनी ह्या प्रतिभावंत लेखकाला कोर्ट कचेर्‍यांमध्ये अडकवून टाकलं. मनस्ताप दिला.


मंटोसारखा बेडर, निर्भय माणूस फाळणीतील रक्तपात, धार्मिक कत्तली बघून घाबरला आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक करून बसला. तो मुंबईतील आगीतून उठून लाहोरच्या फुपाट्यात जाऊन पडला. स्वातंत्र्यानंतर त्याचं पाकीस्तानला निघून जाणं त्याला संपवणारं ठरलं. धर्मांध मुल्लामौलवींचं वर्चस्व असलेल्या पाकीस्तानला मंटोचं मोठेपण कळणं केवळ अशक्य होतं. पाकीस्तान म्हणजे सनातनी आणि पागल अशा धर्मांध लोकांचं महागटार.

मंटोला बहुधा डेथ विश असावी. तो मृत्यूसाठी आतूर असावा. भसाभसा सिगारेटी फुंकणं, रात्रंदिवस दारू ढोसणं याच त्याच्या जीवनशैलीमुळं तो फार लवकर गेला. त्याच्या हयातीत तर त्याचं मोठेपण त्याच्या देशाला कळलंच नाही. जेव्हा पाश्चात्य जगानं मंटोला डोक्यावर घेतलं तेव्हा कुठे  ५७ वर्षांनी २०१२ साली पाकीस्तान सरकारनं त्याला पहिला मरणोत्तर गुणवत्ता सन्मान प्रदान केला. त्याच्यावर पोस्ट स्टॅंप काढला.


मंटोचं लेखक म्हणून आयुष्य अवघं २१ वर्षे होतं. त्याच्या हयातीत त्याची २६ पुस्तकं प्रकाशित झाली होती. हा वेग मोठा असण्याचं कारण त्यानं दुसरा कामधंदा न करता निव्वळ लेखणावर उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं. जे आजही अवघड आहे, तेव्हातर होतंच आणि पाकीस्तानात तर अशक्यच. त्यासाठी सुमार असंही त्यानं बरंच खरडलं. त्याच्या स्वभावातले आणखी २ विरोधाभास म्हणजे तो दुसर्‍यांच्या लेखणावर कडवट आणि अवास्तव टिका करायचा पण त्याच्या लेखणावर कुणी टिका केली तर ती त्याला सहन व्हायची नाही. जिव्हारी लागायची. तो भडकायचा. दुसरं म्हणजे मुलंबाळं उपाशी आहेत, मुलगी आजारी आहे आणि औषध आणायला पैसे नाहीत यानं परेशान असलेला मंटो करतो काय तर दारू ढोसत बसतो. त्याचंही तत्वज्ञान ऎकवतो. समर्थन करतो. ही बुझदिलीच होती त्याची.


असला पलायनवादी माणूस लेखक म्हणून मात्र तगडा होता. बंडखोर होता. वेश्या, वेडे, फाळणीत पोळलेले लोक यांच्यावरच्या त्याच्या कथा दाहक आहेत. प्रचंड अस्वस्थ करणार्‍या आहेत. मानवी जीवनातली विसंगती, दांभिकता आणि अनिश्चितता यावरचं मंटोचं भाष्य आरपार भिडणारं आहे. "टोबा टेक सिंग" ही एका वेड्याच्या जीवनावरची त्याची कथा सुन्न करणारी आणि डोळ्यातून पाणी काढणारी आहे. "खोल दो" सारख्या कथेतनं त्यानं पुरूषांच्या हैवानियतवर केलेलं सुचक भाष्य झिणझिण्या आणणारं आहे.
समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून निग्रो आणि दलित साहित्यानं जी श्रेष्ठ वैश्विक कामगिरी केली त्यातला मंटो हा आघाडीचा लेखक मानला जायला हवा.

"मोगले आझम" सारखा भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेला अव्वल दर्जाचा चित्रपट काढणार्‍या लेखक -दिग्दर्शक के. असिफ यांच्या एका स्क्रिप्टवर आपला अभिप्राय देताना मंटो त्यांना सांगतो, मी अभिप्राय देण्याचेही पैसे घेतो. असिफ त्याला पैसे देतात तेव्हा ते घेऊन हा गडी त्यांना काय सांगतो तर तुमची स्क्रीप्ट तद्दन बकवास आहे.

"थंडा गोस्त" ह्या मंटोच्या तगड्या कथेवर पाकीस्तानात अश्लिलतेचा खटला भरला जातो. आपल्या साक्षीच्या दरम्यान प्रख्यात कवी फैज अहमद फैज कोर्टाला सांगतात की मंटोची ही कथा अश्लिल नाही. मात्र वाड्मयीन गुणवत्ता पाहता ही कथा सामान्य दर्जाची आहे. तर मंटो त्यांच्यावर भडकतो.

मंटोनं अठरा महिने ऑल इंडीया रेडीओवर उर्दू विभागात नोकरी केली. त्याकाळात त्यानं सादर केलेल्या कलाकृतींचे पाच खंड प्रकाशित झालेत. अर्थातच मनस्वी स्वभावाच्या मंटोचं वरिष्ठांशी पटणं शक्य नव्हतं. आधी तो सिनेसृष्टीत काम करीत होता. तिथेच तो परततो. एका बॅरिस्टर घराण्यातला हा उच्चशिक्षित युवक डाव्या विचारांनी प्रभावित होतो आणि प्रागतिक प्रवाहात येतो. त्याचे वडील न्यायाधिश होते. मंटोचा जन्म लुधियानाचा आणि त्याचा मृत्यू झाला लाहोरला. त्याचं करियर बहरलं ते मुंबईत. श्याम, अशोक कुमार, जद्दन बाई, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर, नौशाद हे त्याचे समकालीन. सखे सोबती.

अशा या रसरशीत, बंडखोर आणि हाडामासाच्या चक्रम लेखकावर, मनस्वी कलावंतावर, प्रचंड मेहनत करून नंदीता दास या गुणी अभिनेत्रीनं "मंटो" हा चरित्रपट निर्माण केलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने गांधी, आंबेडकर, भाग मिल्खा भाग, दंगल, असे काही दर्जेदार बायोपिक दिलेले आहेत. त्याचा आलेख आणखी उंचावणारा हा एक महान चित्रपट आहे.


मंटो हा चित्रपट कलात्मक असूनही अजिबात दुर्बोध नाही. २ तास हा सिनेमा आपल्यावर असं गारूड करतो की आपण मंटोला कडकडून भेटतोय असं वाटत राहातं. मंटोला आदर्श किंवा लार्जर दॅन लाईफ न बनवता नंदीताने जसा होता तसा पेश केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेला मंटो हा त्याच्या आजवरच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ठ रोल आहे. कदाचित ऑल टाईम बेस्ट भुमिका. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नंदीताचं आहे. नंदीता ही सत्यजित रे यांच्या मालिकेतली जागतिक गुणवत्तेची प्रतिभावंत दिग्दर्शक आहे हे या चित्रपटातून सिद्ध होतं. भारतीय चित्रपटानं जागतिक उंची गाठल्याचा हा अनुभव केवळ अविस्मरणीय आहे.

भारतीय संहिता, अभिनय, छायाचित्रण, पार्श्वसंगित, दिग्दर्शन, चित्रभाषा किती उत्कृष्ठ असू शकते हे पाहण्यासाठी तरी हा सिनेमा प्रत्येक सिनेरसिकाने पहायला हवा. विशेषत: सामान्य प्रेक्षक, दर्जेदार काही पाहणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि दलित, ग्रामीण साहित्यप्रेमी यांनी तरी एक अजरामर भारतीय कलाकृती म्हणून हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.


असे चित्रपट वारंवार बनत नसतात. ते पंचवीसतीस वर्षातून एखादाच अप्रतिम चित्रपट या कॅटॅगिरीतले असतात. सलाम मंटो. सलाम नंदीता. सलाम नवाजुद्दीन.

-प्रा. हरी नरके, २८ सप्टेंबर २०१८
......................................

मंटोची काही पुस्तकं मुंबईच्या अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याचा एक निवडक कथांचा खंड नागपूरच्या विजय प्रकाशनाने काढलेला आहे.
त्याने लिहिलेल्या व्यक्तीचित्रांचे पुस्तक मुंबईच्या लोकवाड्मय गृह ने प्रसिद्ध केलेले आहे. त्याची कादंबरी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनानं छापलेली आहे.
ही सर्व पुस्तकं, पुस्तक पेठ कोथरूड,पुणे, किंवा अक्षरधारामध्ये मिळतील.

विकीपिडीयात मंटोच्या उर्दू, हिंदी, इंग्रजी पुस्तकांची माहिती दिलेली आहे. त्याची ११ पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत.



Tuesday, September 25, 2018

गणपती आणि इस्लाम खतरे में -










भारतीय संस्कृती ही मूलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे संमिश्र आणि सहिष्णू संस्कृती आहे. तिच्यावर कोणत्याही धर्मातील सनातन्यांनी हल्ला केला तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, पारशी, ज्यू, जैन, बौद्ध या सर्वच धर्मांमध्ये जसा प्रागतिक विचार मानणारे आधुनिक लोक असतात तसेच कट्टरपंथी, अधू मानसिकतेचे आणि सनातनी वृत्तीचे लोकही आहेत. त्या त्या धर्मातल्या प्रागतिकांनी त्याविरुद्ध आवाज टाकायला हवा. लढायला हवे. संघर्ष करायला हवा.

एमआयएमचे आमदार श्री. वारिस  पठाण त्यांच्या मतदार संघातील गणपती मंडळाला भेट द्यायला गेलेले असताना तिथे भाषणात गणपतीबद्दल बोलले, गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर मुस्लीम सनातन्यांनी त्यावर गहजब माजवला आणि मग आमदारांनी जाहीरपणे माफी मागितली. हे अनुचित घडत असताना जर प्रागतिक मुस्लीम गप्प बसणार असतील तर ते दुर्दैवी आहे. यातनं मुस्लीम समाजाला ब्रॅंड करणार्‍यांनाच बळ मिळेल. मुस्लीम समाजाची स्पेस आणखी कमी होईल. चार्वाक ते चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर ते तुकाराम, फुले-शाहू- आंबेडकर,रानडे ते गांधी अशांनी झुंज केली, बंडखोरी केली म्हणूनच हिंदू समाजातला प्रागतिक प्रवाह मोठा झाला. टिकला. त्याला खिळ घालण्याचे प्रयत्न चालू असताना तुम्हाला तुमच्या समाजातल्या असहिष्णूतेबद्दल बोलावे लागेल. अहो, मौलाना अबूल कलाम आझाद उपनिषदांच्या योगदानावर लिहित होते. शेवटी भारत हा एकधर्मिय नाहीये. तो बहुसांस्कृतिक आहे.

इस्लाममध्ये जे जे सांगितलेय ते पवित्र आहेच, त्याबद्दल वादच नाही. प्रश्न आपल्या शेजारी राहणार्‍या इतर धर्माच्या लोकांच्या भावनांना आपण काही किंमत द्यायची की नाही हा आहे? देशाचा परिसर, माती, निसर्ग, सहजीवन, कला, शिक्षण, संगित, व्यवहार आणि कालानुरूपता या गोष्टी समजून घ्यायच्या की नाही?


१. श्री. हमीद दलवाई यांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिलेली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात कोकणातल्या मुस्लीमांनी "मुस्लीम लिग" या पक्षाच्या शाखेची स्थापना करायचा निर्णय घेतला. ते सगळे दलवाईंच्या वडीलांना भेटले. त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी सर्वांनी त्यांना गळ घातली. मुस्लीम लिगच्या कोकण शाखेचे उद्घाटन चिपळूणच्या मारूतीला नारळ फोडून झाले.

२. अल्लाशिवाय मी कोणालाही मानणार नाही हे विधान तारतम्याने घ्यायचे की ते सतत ताणत बसायचे? बरं मग, अजमेर दर्गा, दिल्ली निजामुद्दीन, हाजी अली, मंगळूर पीर दर्गा, खेड शिवापूर दर्गा अशा शेकडो ठिकाणी असलेल्या पीराला सगळे मुसलमान भजतात, हे बंद केले गेलेय का? मुळात करायचे का? सुफी योगदान नाकारायचे का? कबीर, साई हे सारेच बाद करायचे काय?

३. संत शेख महमद, जैतून बी हे वारकरी परंपरा मानणारे, मग त्यांना मुस्लीम समाजातून बहिष्कृत करायचे काय?

४. इस्लाममध्ये व्याज घेणे हराम असताना मुस्लीम को ऑपरेटिव्ह बॅंका कशा चालतात हो?

५. दारू प्यायला मनाई असताना दारू पिणारे कसे चालतात हो?

६. इस्लाम म्हणजे शांती, मग अतिरेकी, तालीबानी, अंडर वर्ल्डच्या टोळ्यांना, गुन्हेगारांना कसा काय थारा मिळतो हो?

७. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे चित्र असायचे तर गुलाम हैदरच्या [टिपूचे वडील] शंकर पार्वतीचे ही आपली मिलिजुली विरासत आहे.

यादी खूप मोठी करता येईल.
हिंदूंची सर्वात लोकप्रिय भजनं मुस्लीम गीतकारांनी लिहिलीयत, संगीतबद्ध केलीयत नी गायलीही आहेत. आणि उलटेही झालेले आहे. मोहरम, पीराचा उरूस यात हिंदूही पुढाकार घेतात. हे टिकवायला हवे. संवाद बंद झाला तर अंतर वाढेल. धार्मिक सलोखा लयाला जाईल.

व्यवहार म्हणून गैर गोष्टी खपवून घेतल्या जातात, मग शेजारधर्म म्हणून इतर धर्मियांच्या बाबतीत सहिष्णू राहायचे की नाही? प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या काळात नमाज लाऊड स्पिकरवरून पढली जायची काय? गणपती, नवरात्र आदीतले डीजे गैरच. पण नमाजचे भोंगेही अनावश्यकच. तुमचा धर्म हा तुमचा घरगुती मामला आहे. तो रस्त्यावर आणायची गरज नाही. राज्यघटनेने विवेकाचे आणि धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दुसर्‍याच्या विवेकबुद्धीवर जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही.


एका शासकीय प्रशिक्षण संस्थेत माझ्या एका उच्चपदस्थ मित्राने मुस्लीम समाजाचे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, निवारा, कुटुंब नियोजन आणि सच्चर कमिटीचा अहवाल यावर सर्वदूर प्रबोधन करण्यासाठी २०० कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला मुस्लीम समाजातील हजारो स्त्रिया व तरूणांनी  प्रतिसाद दिला. त्यातल्या एका कार्यक्रमाला मंत्रालयातले एक अतिवरिष्ठ मुस्लीम अधिकारी उपस्थित होते. ते वक्त्यांचे आभार मानताना म्हणाले, "कुराणात सगळे काही सांगितलेले आहे. या कार्यक्रमाची गरजच नाही. सामाजिक- शैक्षणिक प्रबोधन हे कुराणाच्या विरोधात आहे. बंद करा हा कार्यक्रम."

आम्ही ज्यांनी ज्यांनी या २०० कार्यक्रमांच्या आयोजनात पदरमोड केलेली होती, त्यांना सर्वांना समारोप कार्यक्रमात बोलू दिले गेले नाही. कारण देण्यात आले, आम्हाला नॉन मुस्लीम चालत नाहीत.

अशाच प्रकारचे उपक्रम ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध यांच्यासाठीही आयोजित केलेले होते. त्यातल्या एका कार्यक्रमाला एक अतिवरिष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी भारतीय संत साहित्यावर पीएच.डी. केलेली होती. एका नॉन ख्रिश्चन वक्त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण त्यांना फार आवडले. त्यांनी त्यांच्या समाजाच्या एका मोठ्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले. मात्र ऎनवेळी तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता हे सांगा असे ते वक्त्यांना म्हणाले. वक्ता म्हणाला, "मी भारतीय संविधान मानतो. जात-धर्म हे माझ्यासाठी दुय्यम आहेत. ते मी कोणालाच सांगत नाही. पाळतही नाही. तुम्ही मला दिलेल्या विषयाशी त्यांचा काहीच संबंध नाही." तर धर्मगुरू म्हणाले, "मला आमच्या सर्वोच्च धर्मगुरूंकडून तुमच्या नावाला संमती घेताना तुमचा जात -धर्म सांगावे लागेल."

धर्मगुरूंनी अगदी ऎनवेळी निमंत्रण रद्द केले.

अगदी प्रेषित महंमद पैगंबरांच्या आधीपासून अफगाणिस्थानात असलेली Bamiyan बामियानची जागतिक वारसा हा दर्जा असलेली विशालकाय बुद्ध मुर्ती तालिबानी अतिरेक्यांनी २००१ मध्ये तोडली. हा पिसाटपणा निषेधार्हच होता.
मलाला युसुफझई या मुलीने तिच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेय की मी आधी स्वात खोर्‍यातली मुलगी आहे आणि नंतर मुस्लीम आहे.

मुस्लीम समाजातल्या या कट्टर पंथियांच्या वागण्यामुळेच त्याची प्रतिक्रिया म्हणून सामान्य हिंदूही दुरावत गेला आणि आजची सनातनी हिंदूंची चलती वाढली. त्याविरूद्ध आम्ही संघर्ष करीत असताना तुम्ही मुस्लीम समाजातले प्रागतिक लोक तुमच्यातल्या सनातन्यांविरूद्ध बोलणार की मौन धारण करणार?
-प्रा.हरी नरके, २६ सप्टेंबर, २०१८

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष-









महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष- प्रा.हरी नरके

पुणे हे पुतळ्यांचे शहर आहे. जगातील सर्वाधिक पुतळे पुण्यात आहेत असे सांगितले जाते. असतील.
मला कायम इतिहासात रमायला आवडत नाही. पुतळ्यांची तर आता शहरात एव्हढी गर्दी झालीय की त्यांचे कौतुक उरलेले नाही.पण काही घटना ऎतिहासिक असतात. त्यांची माहिती नव्या पिढीला व्हायला हवी. १९२० साली लोकमान्य टिळक गेले. त्यांचा पुतळा त्यावेळच्या रे मार्केटमध्ये [ आताची महात्मा फुले मंडई ] बसवण्यात आला. तिथेच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचाही अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. केशवराव जेधे तेव्हा पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या पार्श्वभुमीवर त्यांनी पुणे न.पा.कडे एक ठराव पाठवला.

महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा अशी त्यांनी मागणी केली. पुण्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा हलकल्लोळ माजला. पुणे न.पा. तेव्हा टिळक गटाच्या ताब्यात होती. डेक्कनवरचा आपटे रोड ज्यांच्या नावाने आहे ते न.पा. अध्यक्ष होते.

जेधे, जवळकर हे तरूण, आक्रमक आणि लढाऊ नेते होते. त्याकाळात सनातन्यांनी महात्मा फुल्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी अत्यंत किळसवाणा मजकूर असलेल्या चोपड्या प्रकाशित केल्या. नानाप्रकारे महात्मा फुल्यांची बदनामी करण्यात आली. असे हे कृतघ्न लोक. श्री. गणपतराव नलावडे व श्री. वि.म.फुले यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन या चोपड्या छापण्यात आल्या होत्या. त्या धादांत खोट्या होत्या. विकृत होत्या. त्यावर लेखक म्हणून या दोघांची नावे असली तरी त्यांचे असली लेखक "वेगळेच" होते. साधे पत्रही धड लिहिता न येणारे हे दोघे. तिसरे असेच एक घाऊक लेखक म्हणजे चिं.ग.ओक होत. हे मात्र खरेच लेखक होते. हिंदू महासभेचे मामाराव दाते या कामात पुढे होते.

श्री. नलावडे यांच्यामते फुले वाईट होते,  का तर ते कोट घालत होते. ब्रिटीश लोक कोट घालायचे. म्हणून फुले ब्रिटीशधार्जिणे.
आता खुद्द स्वा.सावरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री हे तिघेही कोट घालायचे. पण कोटावरून फुल्यांवर फुली मारताना नलावड्यांना हे सुचले नाही. असे हे सनातनी अंधभक्त.

त्यांचा महात्मा फुले यांच्या बदनामीसाठी जातीयवाद्यांनी वापर करून घेतला. त्या बदल्यात वि.म.फुल्यांना पुण्याचे नगरसेवक केले गेले. नलावड्यांना तर महापौरपद दिले गेले. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ. क्षणिक फायद्यासाठी आपण काय करतोय हे त्यांच्या डोक्यात कसे आले नसेल? श्री. विश्वनाथ महादेव फुले हे जोतीरावांचे नातू होते असे रेटून खोटे लिहिले जातेय, सांगितले जातेय. हा बनाव आहे. त्यांचे आडनाव फुले असले तरी त्यांचा जोतीरावांशी नातू वगैरे असला संबंध नव्हता.
ते फुल्यांचे भ्रष्ट, सामाजिक परिवर्तनाला विरोध करणारे भाऊबंद होते. महात्मा फुल्यांच्या वडीलांची जमीन त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन वि.म.फुलेंच्या आजोबांनी हडप केलेली होती. त्यामुळे ते घराणे आणि जोतीराव यांच्या घराण्यामध्ये भाऊबंदकीचे वाद - वैर होते. शिवाय जोतीरावांना मूळबाळ नसल्याने वि.म.फुल्यांचा जोतीरावांच्या इस्टेटीवर डोळा होता. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी यशवंतला दत्तक घेतल्याने या भाऊबंदांचा डाव उधळला गेला.म्हणुन ते जोतिरावांवर भडकलेले होते.
ते घराणे सनातन्यांचे हस्तक होते. अंधश्रद्धाळू आणि कडवे जातीयवादी होते. ते कडक अस्पृश्यता पाळीत असत. अंगात येणे, गंडेदोरे, ताईत, कोंबडे, बकरे बळी देणे हे त्यांचे उद्योग महात्मा फुल्यांना पटणेच शक्य नव्हते.

श्री.वि.म. उर्फ बाबूराव फुल्यांचे नाव सनातन्यांनी सदाशिव पेठेतील म.सा.प. समोरील एका चौकाला दिलेले आहे. महात्मा जोतिराव फुल्यांच्या पुतळ्याला सातत्याने ४४ वर्षे विरोध करणारे सनातनी या वि.म.फुलेंचे नाव मात्र एका चौकाला तात्काळ देतात यातच सगळे आले. ही महात्मा फुल्यांच्या बदनामीबद्दलची बक्षिसी होती.
वि.म.फुल्यांच्या या चोपड्यांची तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांना समग्र पुणेकर माळी समाजाने सनातन्यांचे बगलबच्चे म्हणून जातीबहिष्कृत केलेले होते.
जाती बहिष्कार ही चुकीचीच कृती आहे. पण अशा संग्रामांमध्ये लोक विवेकबुद्धी कुठे वापरतात?

आपण जोतीरावांबद्दल खोटे लिहिले असे पुढे कबूल करून त्यांनी १९२५ साली माळी समाजाची जाहीर माफीही मागितली होती. त्यांच्या मुलानेच मला व य.दि.ना ही माहिती सांगितली. त्याची नोंद मी माझ्या पुस्तकात केलेली आहे. आपल्या नावाचा वापर करून हे चोपडे लिहण्यात आले असेही त्यांनी स्पष्ट केले.
ह्या पुस्तकाचा समाचार मी माझ्या "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन " या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच घेतलेला आहे. ख्यातनाम संशोधक डॉ. य.दि.फडके सरांनी माझ्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत माझ्या मतांना दुजोरा दिलेला आहे.

महात्मा फुल्यांच्या बदनामीची तीव्र प्रतिक्रिया आली. बहुजन समाजातील हमालांनी महात्मा फुले मंडईतील विष्णूशास्त्रींचा पुतळा हटवा अशी मागणी  केली. तो पुतळा तिथनं काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आणून बसवावा लागला. दरम्यान आचार्य अत्र्यांनी रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव दिलेले होते.

जेधे जवळकरांनी या पुस्तिकांना "देशाचे दुश्मन" हे छोटे पुस्तक लिहून जशास तसे उत्तर दिले. जेधे जवळकरांवर बदनामीचा खटला भरण्यात आला. या चोपड्यांबद्दल नलावडे आणि वि.म. फुले यांच्यावरही बदनामीचे खटले टाकले गेले. ब्रिटीश न्यायाधिशांनी जेधे जवळकरांना दोषी ठरवले. तुरूंगात पाठवले. मात्र तशाच कामांबद्दल नलावडे व वि.म.फुले यांना मुक्त केले गेले. हा ब्रिटीश न्यायाधिशांचा पक्षपात वरच्या न्यायालयात बॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केला आणि वरिष्ठ न्यायालयाने जेधे जवळकरांना मुक्त केले.

महात्मा फुल्यांचा पुतळा पुण्याऎवजी कोल्हापूरला बसवा असा सल्ला नगरपालिकेतल्या सनातन्यांनी दिला होता. महात्मा फुले पुतळ्यासाठी सातत्याने ४४ वर्षे संघर्ष झाला. अखेर ३१ मे १९६९ ला श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे म.न.पा.च्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला. पण त्याचा खर्चही म.न.पा.ने केला नाही. माळीनगरच्या साखर कारखान्याने हा पुतळा मनपाला भेट दिला होता.

सध्या हे पुस्तक पुन्हा पुढे आणण्याचे कारस्थान भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील एक आरोपी, मनुपुत्र श्री. संभाजी भिडे आणि बॉम्ब बनवण्याचा ज्यांच्यावर आरोप आहे ते सनातन संस्थेचे कट्टर लोक करीत आहेत. एरवी हिंदू सगळे एक असे कोकलणारे हे जातीयवादी लोक कसे दांभिक असतात बघा, महात्मा फुल्यांची बदनामी करताना फुले हिंदूच होते हे मात्र हे लोक सोयिस्करपणे विसरतात. तर असा यांचा सिलेक्टीव्ह हिंदूजनविचार!

हे लोक आगीशी खेळत आहेत. याची प्रतिक्रिया येणार आणि पुन्हा जातीय चिखलफेक होणार. सोबतकार ग.वा.बेहरे आणि हिंदुत्ववादी बाळ गांगल यांनी ३० वर्षांपुर्वी महात्मा फुल्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली होती. ती त्यांच्या अंगलट आली होती. हाच खेळ पुन्हापुन्हा खेळण्याची सनातन्यांची  चिकाटी विलक्षणच म्हटली पाहिजे.
मात्र यातनं जातीय दुही वाढते. सामाजिक सलोखा नष्ट होतो. एकात्मतेचा विचार मागे जातो हे मनुपुत्र श्री. संभाजी भिडे आणि सनातनचे व हिंदू जनजागरणचे लोक लक्षात घेतील काय?

-प्रा.हरी नरके, २५ सप्टेंबर २०१८

Monday, September 24, 2018

सत्यशोधक समाजाचा १४५ वा वर्धापन दिन-






पुरोहिताला लग्नाला बोलवा न बोलवा, दक्षिणा मात्र द्या - पुणे न्यायालय

महात्मा जोतिराव फुले आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
ही आधुनिक भारतातली ग्रामीण भागापर्यंत पोहचलेली पहिली सामाजिक, शैक्षणिक चळवळ होती. "सर्वसाक्षी जगत्पती, नकोच त्याला मध्यस्थी!" हे या समाजाचे ब्रीद होते. निर्मिक आणि माणूस यांच्यामध्ये दलाल किंवा मध्यस्थ नको हे मुख्य सूत्र होते.

सत्यशोधक समाजात कबीराचे दोहे म्हटले जात. त्यांच्या बीजक या क्रांतिकारी ग्रंथातला विचार सत्यशोधक प्रमाण मानित असत. संत तुकाराम आणि वारकरी समाज हा या संघटनेचा कणा होता. स्थापनेनंतर अवघ्या तीन महिन्यात पुण्यात सत्यशोधक पद्धतीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. बायकांचे अधिकार स्थापन करण्याची प्रतिज्ञा या लग्नात वधूवर घेत असत. कमी खर्चात, साध्या पद्धतीने आणि हुंडा न देता घेता ही लग्नं होत. भटजीला न बोलावता नातेवाईक व मित्र हे लग्न लावत असत. २५ डिसेंबर १८७३ ला पहिलं सत्यशोधक लग्न लागलं. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.

पुण्यातला पुरोहितवर्ग संतापला. त्यांनी विवाहसोहळा उधळण्याची धमकी दिली. पोलीसांच्या बंदोबस्तात हे लग्न लागलं. सत्यशोधक लग्नांची चळवळ वणव्यासारखी राज्यात पसरू लागली. ओतूरच्या बाळाजी कुशाजी डुंबरे पाटील या मराठयाने आपल्या २ मुलींची लग्नं या पद्धतीनं लावली म्हणून ओतूरचे रामचंद्र सदाशिव जोशी व इतर ग्रामभटजी कोर्टात गेले. आमची दक्षिणा बुडाली, आमचा धार्मिक हक्क धोक्यात आला, कोर्टाने आम्हाला सहा रूपये भरपाई मिळवून द्यावी असा दावा करण्यात आला. [ केस नंबर ८३१/१८८४, जुन्नर कोर्ट, महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र सरकार, मुंबई, २०१३, पृ. ४१९-२० ] न्यायाधिशांनी आठ आणे भरपाई म्हणून मंजूर केले. यात जोतिरावांसोबत आणखी नऊ जणांवर हा खटला भरलेला होता. त्यात सत्यशोधक समाजाच्या बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदीवासी सदस्यांचा समावेश होता.

यातला विरोधाभास म्हणजे भटजींची भाषा धर्म बुडाल्याची होती पण ते भरपाई मात्र रूपयांमध्ये मागत होते!

फुल्यांनी या निकालाला आव्हान दिले. पुण्याच्या जिल्हा न्यायालयाने लग्नाला भटजीला बोलवा अगर न बोलवा पण दक्षिणा मात्र घरपोच करा असा निकाल दिला.
त्याविरूद्ध फुले उच्च न्यायालयात गेले आणि जिंकलेही. ५ जानेवारी १८९० ला हा निकाल लागला. भटजीला लग्नाला न बोलावल्यास दक्षिणा देण्याची गरज नाही असा उच्च न्यायालयाचा निकाल होता. न्या. का. त्रिं. तेलंग आणि न्या. सर विल्यम सार्जंट यांनी हा निकाल दिलेला होता. सत्यशोधक लग्नं आणि हा जोशी वतनाचा विषय पुढे खूप गाजला.

५३ वर्षे त्यावर वाद झडले. तो मुद्दा मुंबई विधीमंडळासमोरही आला. भटजीला लग्नाला न बोलावता दक्षिणा द्यायची असेल तर मग जे लोक आपल्या घरी आपल्या हाताने आपली दाढी करतात त्यांनी दाढीचे पैसे नाव्ह्याच्या घरी पोचवावेत अशी भुमिका सत्यशोधकांनी विधीमंडळात घेतल्यावर ३ ऑगष्ट १९२६ ला जोशी वतन कायद्याने रद्द झाले.

सत्यशोधकांची लढाई ब्राह्मणांविरूद्ध नव्हती. त्यांची लढाई सांस्कृतिक-धार्मिक वर्चस्वाविरूद्ध, गुलामीविरूद्ध होती. त्यांच्यासोबत भिडे, चिपळूणकर, गोवंडे, भवाळकर, जोशी, वाळवेकर, भांडारकर, मांडे असे कितीतरी ब्राह्मण शेवटपर्यंत होते. फुल्यांनी आपल्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून भांडारकरांची सही घेतली होती तर मृत्यूच्या आधी लिहिलेल्या कवितेत त्यांनी वाळवेकरांचे विशेष आभार मानले होते. एका ब्राह्मण मातापित्यांचा, [विधवेचा] मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. त्याला आपला वारस नेमले होते. दासप्रथा मानणार्‍या ब्राह्मणांची आणि त्यांच्या बहुजन अनुयायांचीसुद्धा सावली आपल्या प्रेतावर पडू देऊ नये असे त्यांनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिले होते.

सत्यशोधक चळवळीने वास्तूशांत, नामकरण, दशक्रिया यांना सत्यशोधक पर्यायही दिले होते. वास्तूशांत करताना ज्या मजूरांनी बांधकाम केले त्यांचा सत्कार करावा, त्यांना गोडाधोडाचे जेवन द्यावे असे फुले सांगत होते. सामान्य लोक पोकळीत जगू शकत नाहीत. त्यांना पर्यायी संस्कृती, उपक्रम, कार्यक्रम द्यावे लागतात, ते सत्यशोधक समाजाने दिले होते म्हणूनच तो लोकप्रिय झाला होता. स्त्री-पुरूषसमता, ज्ञान व कौशल्यांची निर्मिती, प्रचार, प्रसार, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप हा सत्यशोधक चळवळीचा पंचसुत्री कार्यक्रम होता. प्रवृतीविरोधी असलेली ही चळवळ ब्राह्मण्यांऎवजी व्यक्तीद्वेषी, ब्राह्मणविरोधी बनवणार्‍या बहुजन राजकारण्यांनी पुरोहितांशी मागच्या बाजूने युती करून सत्यशोधक चळवळ संपवली.

बहुजनांच्या हातात सत्ता आल्यावर इथल्या बहुजन राज्यकर्त्यांनीच पुरोहितांशी हातमिळवणी करून हे सगळे सत्यशोधक पर्याय नष्ट केले. तोंडाने फुल्यांचे नामस्मरण करीत त्यांनी फुल्यांना हायजॅक केले होते. हा पहिला युतीचा किंवा आघाडीच्या राजकारणातला धार्मिक-सांस्कृतिक धडा होता.

गणपती उत्सवाच्या काळात फुल्यांनी गणपतीबाबत लिहिलेले अखंड संदर्भापासून सोडून काही क्रांतिकारी लोक फे.बु.वर टाकत होते आणि पाहा फुले कसे गणपतीच्या विरोधात होते, ह्याची दवंडी पिटत होते. यामुळे काय साध्य होणार? तर फुल्यांना मानणारे ओबीसी, बहुजन, अनु. जातींचे जे लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत ते महात्मा फुल्यांवर फुली मारणार! हेच तुम्हाला हवेय काय? तुमची विवेकबुद्धी काय माती खायला गेलीय का? तुमचा हा भंपक क्रांतिवाद जरा काबूत ठेवला तर सत्यशोधक चळवळीवर उपकार होतील.

आपल्या कृतीचा परिणाम न बघता, लिहिणारे, बोलणारे, लोकांपासून फटकून राहून, अतिरेकी क्रांतिकारी भुमिका घेणारे हे बामसेफी, ब्रिगेडी लोक आज परिवर्तनाचे खरे स्पीडब्रेकर बनलेले आहेत. ते व्यक्तीगत, संघटनात्मक स्वार्थासाठी महात्मा फुल्यांचा गैरवापर करीत आहेत. दुसरीकडे हे एकांडे लोक जागतिक क्रांती करायला निघतात पण यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियही नसतात.


वर्षभर आम्ही प्रबोधनाचे कोणते कार्यक्रम देतो? कोणते पर्याय या सामान्य लोकांना देतो? प्रत्यक्षात आम्ही काहीच करणार नाही पण ओबीसी कसे प्रतिगामी आहेत याची मात्र चवीनं चर्चा करणार! तुम्ही त्यांना प्रतिगामी छावणीत ढकलत असता याची तुम्हाला जाणीव तरी असते काय?

भटजी ज्या सामान्यांनी नाकारला होता, त्यांच्याच वंशजांचे आज भटजींशिवाय पानही हालत नाही. कारण भटजी सातत्याने काम करणार,सगळी खरीखोटी हत्यारं वापरणार,  आणि आम्ही मात्र १००% निष्क्रीय राहणार. तोंडाने फक्त फुले-शाहू-आंबेडकरांचा नामजप करायचा, वातावरण ब्राह्मणविरोधी करायचे आणि सनातन्यांशी हातमिळवणी करून स्वत:ची राजकीय सत्ता शाबूत ठेवायची असा फुलेद्रोह या बहुजन राज्यकर्त्यांनी केल्यामुळेच सत्यशोधक चळवळीचा आज र्‍हास झालेला आहे. अर्धवट किंवा अर्धसत्य मांडणी करून हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अतिरेकी क्रांतिकारक या चळवळीचे अधिकच नुकसान करीत आहेत.
-प्रा.हरी नरके, २४ सप्टेंबर २०१८

Sunday, September 23, 2018

नेमाडे - कसबे वाद आणि चाहत्यांची गोची









नेमाडे - कसबे वाद आणि चाहत्यांची गोची - प्रा.हरी नरके

साहित्यिक वाद महाराष्ट्राला नवे नाहीत. त्यातून वैचारिक-साहित्यिक मंथन व्हावे अशी अपेक्षा असते.  वादविवाद आणि चिकित्सा यातून विचार घासून पुसून घेतले जातात. त्यात वार आणि प्रहार असले तरी त्याला एक वैचारिक-वाड्मयीन दर्जा असतो. आपसातले मतभेद मांडायलाच हवेत. साहित्यकृतीच्या सामर्थ्य आणि मर्यादा यांच्यावर घमासान वाद व्हायलाच हवा. त्यातून लेखकाला योग्य मार्गदर्शन मिळते. विचारकलहाला कशाला घाबरता असे आगरकर म्हणत असत. मराठी माणूस हा मूलत:च कलहप्रिय आहे. बाराशे वर्षांपुर्वी उद्योतन सुरी यांनी मराठी माणूस हा "कळवंड करणारा" असतो असे त्याचे अचूक वर्णन केलेले आहे. "भांडखोरपणा" हे मराठी माणसाचे "सार्वकालिक ओळखपत्र" आहे.


सध्या महाराष्ट्रात दुष्काळी वातावरण असले तरी कसबे-नेमाडे वादाच्या रणभेरी घुमत आहेत. हे दोघेही बलदंड योद्धे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत.


या दोघांनाही मानणारा युवकांचा एक मोठा वर्ग आहे. तो त्यांच्यावर अमाप प्रेम करतो.  तो सध्या त्यांच्यातील या वादाने व्यथित आहे. दोघेही आपलेच, आपलेच दात नी आपलेच ओठ, कोणाची बाजू घ्यायची याने तो संभ्रमित झालेला आहे.


प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचे गारूड गेले ४० वर्षे ज्याच्या मनावरून उतरलेले नाही असा मी एक छोटा वाचक आहे. कोसला ते हिंदू, टिकास्वयंवर, देखणी आणि त्यांच्या भाषणांची व मुलाखतींची पुस्तकं, तुकाराम, साने गुरूजींवरील समीक्षापर पुस्तकं, हे सारं नेमाडपंथी साहित्य एकदाच नाही तर अनेकदा मी वाचलेलं आहे. हे केवळ मराठीतलंच नाही तर अखिल भारतीय पातळीवरचं, जागतिक पातळीवरचे श्रेष्ठ साहित्य आहे आणि म्हणूनचे नेमाडे हे जागतिक पातळीवरील महान साहित्यकार आहेत असं माझं मत आहे. मात्र त्यांच्या देशीवाद, जातीप्रश्न यांच्या मांडणीबाबत माझे काही आक्षेप - मतभेद आहेत.



प्रा. रावसाहेब कसबे यांचेही प्रत्येक पुस्तक मी काळजीपुर्वक वाचलेले आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान, झोत, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार, भक्ती आणि धम्म, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, मानव आणि धर्मचिंतन, हिंदुराष्ट्रवाद," हे त्यांचे सारेच ग्रंथ मी बारकाईने वाचलेले आहेत. पुन्हापुन्हा वाचत असतो. परिवर्तनवादी चळवळीचे महान भाष्यकार, वक्ते आणि विचारवंत म्हणून रावसाहेब मला नितांत आदरणीय आहेत. त्यांचे "देशीवाद, समाज आणि साहित्य" हे पुस्तक वाचताना मात्र मला खूप त्रास झाला.


व्यक्तीश: या दोघांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या दोघांनीही मला आजवर उत्तम मार्गदर्शन आणि प्रेम दिलेले आहे. मी या दोघांनाही स्वकीय तत्वज्ञ आणि मार्गदर्शक मानतो.


अशा परिस्थितीत त्यांच्यातील वादावर लिहायला मी अपात्र माणूस आहे. कारण एकतर मी या दोघांच्याही लेखणावर अमाप प्रेम करीत असल्याने त्यांच्याबाबतीत पक्षपाती असण्याची दाट शक्यता आहे. किमान त्यांच्याबाबतीत तटस्थ राहणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
त्यामुळे त्यांच्यातील वादात न पडण्याचे मी ठरवले होते. आजही खरंतर माझं तेच मत आहे. या दोन मोठ्या माणसांच्या वादात न्यायाधीश, किमान ज्युरी होण्याची आपली लायकी नाही हे मला पुरेपूर माहित आहे.


त्यामुळे जेव्हा मी श्री. अशोक बाबर यांचे "देशीवादाचे दुश्मन" हे पुस्तक वाचले तेव्हा रावसाहेबांच्या किंवा बाबर यांच्या पुस्तकांचे समग्र परिक्षण करणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे
आहे याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली.
हे या पुस्तकांचे परीक्षण नसून फक्त काही धावती निरिक्षणे आहेत. ही माझी व्यक्तीगत निरिक्षणे असल्याने ती सर्वांना पटायलाच हवीत असे नाही. माझ्या या लेखणातला धोका असाय की हे दोघेही माझ्यावर नाराज होऊ शकतात. न घरका ना घाटका असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही लिहिले पाहिजे.


१. नेमाडे यांच्याबद्दल श्री. विद्याधर पुंडलिक यांनी असे लिहिले आहे की, नेमाडे हे मुटके मारणारे पट्टीचे पोहणारे आहेत. म्हणजे असे लोक पोहण्यात पटाईत असल्याने ते अशा पद्धतीने विहीरीत मुटके मारतात की काठावर उभे असणारांच्या अंगावर भरपूर पाणी उडते. नेमाडे त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे अनेकदा वादग्रस्त ठरत असतात. ते सतत प्रकाशझोतात असतात. त्यांची मतं अतिशय टोकदार असतात. विवाद्य असतात. ते एक अत्यंत निर्भय आणि संपुर्ण स्वतंत्र तत्वचिंतन असलेले श्रेष्ठ विचारवंत तसेच निर्मितीशील साहित्यकार आहेत. आजतरी मला त्यांच्या तोडीचा दुसरा भारतीय पातळीवरचा श्रेष्ठ साहित्यिक दिसत नाही. नेमाडेंना नीट समजून न घेता केवळ त्यांच्या देशीवादी मांडणीला शिव्याशाप देणारांनी, त्यांना जातीयवादी म्हणणारांनी आजवर महात्मा गांधींनाही असेच दूर लोटले, परिणामी गोडसेवादी बोडक्यावर बसले. सनातन की नेमाडे, गोडशे की गांधी यात निवड करावी लागेल.पण ज्यांना ते स्वत: सोडता इतर सारेच प्रतिगामी वाटतात अशा संशयवाद्यांचा विजय असो! ते थोरच आहेत.


२. प्रा. रावसाहेब कसब्यांनी अफाट वाचन, चिंतन आणि संशोधनाद्वारे मौलिक लेखण केलेले आहे.
त्यांचा नेमाडे यांच्यावरचा ग्रंथ मात्र त्यांच्या आजवरच्या कामगिरीला साजेसा नाही असे मला खेदाने म्हणावे लागते. या पुस्तकात अनेक ठिकाणी रावसाहेबांनी नेमाडॆंवर जे व्यक्तीगत शेरे आणि ताशेरे मारलेले आहेत त्याची काहीच गरज नव्हती. अपशब्द आणि मानहानीकारक मजकूर तर अगदीच आक्षेपार्ह आहे. नेमाडेंना ते कुणीतरी भुरटा आणि प्रतिगामी समजतात हीच मुळात फार मोठी वेदनादायक बाब आहे. रावसाहेबांनी व्यक्तीगत आकसाने प्रेरित होऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे असे सतत वाटत राहते. तो त्यांनी लिहिला नसता तर अधिक बरे झाले असते. त्याला "देशाचे दुश्मन" या दिनकरराव जवळकरांच्या पुस्तकाच्या धाटणीचे "देशीवादाचे दुश्मन" हे पुस्तक लिहून श्री. अशोक बाबर आणि श्री. सुशील धसकटे यांनी उत्तर दिलेले आहे.


३. आरपीआयच्या दोन गटांमध्ये ज्याप्रकारच्या उखाळ्या पाखाळ्या चाललेल्या असतात, त्या नळावरच्या भांडणाची कळा या पुस्तकाला आलेली आहे. श्री. अशोक बाबर आणि सुशील धसकटे यांनी रावसाहेबांना दिलेले उत्तर म्हणजे नळावर एकमेकांच्या झिंज्या धरणे किंवा भर चौकात एकमेकांची गचांडी धरण्याच्या पातळीवरील कामगिरी आहे. श्री.बाबर यांनी अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचा आवाका फार मोठा आहे. पण ते टोकाचे नेमाडे समर्थक आहेत. कट्टर भक्त. नेमाडे हे सर्वांगपरिपुर्ण साहित्यिक आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे शेरास सव्वाशेर म्हणुन त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी रावसाहेबांवर केलेले हेत्वारोप आणि मारलेले असभ्य ताशेरे यांच्यामुळे ह्या पुस्तकाचा दर्जा घसरलेला आहे.


४. रावसाहेब आणि बाबर या दोघांनाही "षडयंत्र [ कॉंन्स्पीरशी ] थिएरी" प्राणप्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे एकच आरोप ते दोघेही एकमेकांवर करीत आहेत. दोघेही हेत्वारोपांचा परस्परांवर तुफान मारा करतात. "तू हिंदुत्ववादी आहेस," "तू जातीयवादी आहेस," "तू प्रतिगाम्यांचा हस्तक आहेस," "तू सरंजामी मानसिकता मानणारा आहेस," असे आरोप दोघांनी एकमेकांवर केलेले आहेत.


५. या दोघांना जे लोक जवळून ओळखतात त्यांना माहित आहे की ह्या दोघांचेही एकमेकांवरचे आरोप बिनबुडाचे आहेत. निराधार आणि असत्य आहेत.


६. या दोघांनाही खूप मानसन्मान मिळालेले आहेत. आणखी मिळोत. ते दोघेही नितांत सन्मानणीय आहेत. पण ते एकमेकांचे स्पर्धक आणि अतिहितचिंतक असणार. त्यामुळे हे प्रहार आपापली टेरीटरी सांभाळण्यासाठी केलेले असू शकतात. इगो आणि प्रसिद्धीचा झोत कोणावर कमी आणि कोणावर जास्त याच्या इसाळातूनही हे भांडण चालू असणार. मेरी कमीजसे  तेरी कमीज ज्यादा सफेद क्यों? हा मुद्दाच जास्त प्रभावी दिसतो.


७. हे दोघेही वैचारिकदृष्ट्या फुले-शिंदे-शाहू-गांधी-आंबेडकरांना मानणारे आहेत, एकाच छावणीतले आहेत. दोघेही परिवर्तनवादी आहेत. मतभेद असलेच तर ते तपशीलांचे असू शकतात. स्वभावांचे असू शकतात. फारसे गंभीर असे विचारसरणीचे- तात्विक म्हणता येतील असे मतभेद मला तरी दिसत नाहीत. शैली, मांडणी, अन्वेषण, छावणी यांचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या दोघांच्याही काही चुका झालेल्या असू शकतात. मांडणी सदोष असू शकते. मात्र त्या दोघांपैकी कोणीही आजवर "चुकीच्या बाजूला" उभे राहिलेले नाहीत.

८. परिवर्तनवादी छावणीपुढे आज अनेक गंभीर आव्हानं उभी आहेत. प्रतिगामी शक्ती रोरावत चालल्या आहेत. अशावेळेला आपण सार्‍यांनीच एकत्र यायची गरज आहे. अन्यथा परिवर्तनवाद्यांचे अस्तित्वच संपेल अशी भिती आहे. आपल्या भुमिका परस्परपूरक असताना जर एकत्र येता येत नसेल तर निदान एकमेकांना खाऊ का गिळू या वृत्तीने लक्ष्य तरी करायला नको असे माझ्यासारख्या एका छोट्या आणि गरिब माणसाला वाटते.
तुर्तास इतकेच-

-प्रा.हरी नरके, २३ सप्टेंबर २०१८

Friday, September 21, 2018

आमच्या आंतरजातीय लग्नाची गोष्ट-



    






माझी आई अतिशय तापट स्वभावाची होती. आईला जेव्हा मी जातीबाहेरच्या मुलीशी लग्न करणार आहे असं सांगितलं तेव्हा ती जाम भडकली. तिनं खूप आदळआपट केली. तू झालास तेव्हाच मी तुझ्या नरडीला नख लावून टाकायला हवं होतं. तू जातीबाहेर लग्न केलंस तर तू आम्हाला मेलास, ... वगैरे हिंदी, मराठी, कन्नड, तेलगू या सगळ्या सिनेमांमधले संवाद तिने म्हणून टाकले. आपल्या जातीत मुलींचा काय दुष्काळ पडलाय का? तुला हवी तशी मुलगी आणून उभी करते, तू पसंद कर, असा तिने आदेश दिला. तू जातीबाहेर लग्न केलंस तर आपले नातेवाईक-सोयरेधायरे काय म्हणतील? आपल्याला त्यांनी वाळीत टाकलं तर तुझ्या लहान भावाबहिणींची लग्नं कशी होणार?


एकुण तिचा आंतरजातीय विवाहाला ठाम विरोध होता.
मी लग्न करणार तर ते जातीबाहेरच्याच मुलीशी, मात्र मी पळून जाऊन लग्न करणार नाही. लग्न झालं तर ते तुझ्या उपस्थितीतच होईल, असा शब्द मी तिला दिल्यावर ती निर्धास्त झाली.


मधे काही वर्षं गेली. दरम्यान मी तिला माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी नेत असे. अनेकदा ती तिकडे मुक्काम करील अशी व्यवस्था करीत असे. त्यांना माझ्या घरी राहायला बोलवित असे. त्यांच्या आईवडीलांनाही माझ्याकडे राहायला बोलवित असे. आईसोबत ते राहतील अशी व्यवस्था करीत असे. मी शाळेत असल्यापासून सामाजिक चळवळीत क्रियाशील असल्याने घरी नानाविध जातीधर्माच्या लोकांचा कायम राबता असायचा. आईचीही त्यांच्याशी दोस्ती होत असे. माणसं एकत्र आली, एकत्र प्रवास केला, मुक्कामाला राहिली की जातीपातीचे गैरसमज गळून पडतात.


माझी आईही अशीच हळूहळू निवळत गेली. तिची जातीपातीची जळमटं निघून गेली. माझा करीन तर जातीबाहेरच्याच मुलीशी लग्न करीन नाहीतर अविवाहीत राहीन हा निर्धार कायम असल्याचं बघून आईनं माझ्यासाठी जातीबाहेरची एक मुलगी पसंत केली. मी अतितात्काळ, अगदी निमुटपणे होकार दिला. मी याबाबतीत आत्यंतिक आज्ञाधारक मुलगा होतो. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, तू म्हणशील तिच्याशी मी लग्न करतो असं मी म्हटल्यावर ती एकदम खूष झाली. मीही खूष होतो कारण आईची आणि माझी पसंत एकच होती. अर्थात हा केवळ योगायोग नव्हता तर त्यामागे काही वर्षांची मेहनत होती. चिकाटी आणि विश्वास होता.


प्रख्यात चित्रकार आणि सन्मित्र संजय पवार यांनी एक कलात्मक डिझाईन असलेली निमंत्रणपत्रिका तयार केली. आमच्या दोघांच्या सहीचं ते साधंसं पत्र होतं. आम्ही १ मे १९८६ ला आंतरजातीय विवाह करतोय. शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला तुम्ही आप्तेष्ठ, मित्रांनी नक्की यावे असा त्यात मजकूर होता.


आंतरजातीय विवाह करतोय ही पत्रात स्पष्ट नोंद करण्यामागे २ कारणं होती. एकतर आमचे काही जवळचे नातेवाईक फार बेरकी होते. तुम्ही अशा जातीबाहेरच्या लग्नाला कशाला गेलात असं जर कुणी नंतर त्यांना विचारलं असतं तर ते सरळ असं सांगून मोकळे झाले असते की लग्न जातीबाहेर होतंय हे आम्हाला माहितच नव्हतं. दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाहशिवाय जातीनिर्मुलन शक्य नाही हा फुले-शाहू- गांधी-आंबेडकर यांचा विचार आम्हाला पटलेला होता. मग ताकाला जाऊन भांडं का लपवा?


लग्न करायचं ठरलं तेव्हा ते कोणत्या पद्धतीनं करावं याबाबत स्पष्टता होती. सत्यशोधक पद्धतीनं लग्न करून त्याची नोंदणी करायची असा आमचा निर्णय झालेला होता. तेव्हा मी साडॆसतरा नळी येथील वस्तीत राहत होतो. आजुबाजूला झोपडपट्टी आणि आमचंही घर कच्च्या विटांचं {भेंड्यांचं} वर गवताचं छप्पर. नळ नाही. संडास - बाथरूम नाही. संगिता मुंबईची. तिला याची सवय नसल्यानं या सगळ्याचा त्रास होणार. मग पहिली गोष्ट केली म्हणजे पिंपरीला अजमेरा कॉलनीत वन रुम किचनचा फ्लॅट बूक केला.


लग्न अजिबात खर्चिक असू नये पण ठरवून आंतरजातीय करतोय तर गपचूप किंवा पळून जाऊन केलं असं होऊ नये म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावं असं ठरवलं होतं. पुण्याच्या हॉटेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रित पार पडला. श्रेयस हॉटेलचाही एक मजेदार किस्सा झाला. आमचे एक मित्र, मार्गदर्शक आणि नेते असं म्हणाले की, " लग्न साडेसतरा नळीवरच करायचं. अवघ्या १० ते १५ लोकांनाच बोलवायचं आणि आलेल्यांना फार फार तर चहा फक्त द्यायचा. बाकी काहीही खर्च करायचा नाही."


मला हे पटत नव्हतं. आलेल्यांना जेवन द्यावं. माझा गोतावळा प्रचंड असल्यानं निदान १०० लोकांना निमंत्रित करावं असं मला वाटत होतं. नेते मानायलाच तयार नव्हते. शेवटी मी भाईंकडे { पु.ल.देशपांडे यांच्याकडे} गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, " हरी, तू अजिबात काळजी करू नकोस. लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही. तो आयुष्यतला आनंदसोहळा असतो. तो खर्चिक असू नये हे ठिक आहे. पण आलेल्यांना तुला जेवन द्यायचंय तर अवश्य दे. एकतर आपण पुणेकर आधीच आतिथ्यासाठी "जगप्रसिद्ध " आहोत. त्यात आणखी भर नको. मी बघतो या नेत्यांकडे."


भाईंनी नेत्यांना फोन केला. बोलवून घेतलं. भेटीत त्यांना भाई म्हणाले, " हरी - संगिता लग्न करतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. काही मंडळी लग्नात त्यांनी जेवन देऊ नये, हॉल घेऊ नये, घरीच लग्न करावं, फक्त चहाच द्यावा असला हेकटपणा करीत असल्याचं माझ्या कानावर आलंय. तुम्ही जरा बघा, ही कोण मंडळी आहेत ते. नी त्यांना सांगा, समजवा. गरज पडली तर मीही त्यांना भेटायला येतो. तुमच्यावर ही जबाबदारी मी सोपवू ना?"


नेते सटपटले. म्हणाले, " मी करतो व्यवस्था. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हीच लग्नाला येताय नी तुमची इच्छा आहे म्हटल्यावर काहीच अडचण नाही भाई."


भाई म्हणाले, "ही हरी - संगिताची इच्छा आहे, नी लग्न त्यांचं आहे, तेव्हा, तुम्ही लागा कामाला."


लग्नाला ज्येष्ठ विचारवंत गं.बा. सरदार, पु.ल. नी सुनिता देशपांडे, निळू फुले, बाबा आढाव, विद्या बाळ, भाई वैद्य, लक्ष्मण माने, प्रा. ग.प्र. प्रधान, सय्यद भाई, पन्नालाल सुराणा, लक्ष्मण गायकवाड, सदा डुंबरे, अरूण खोरे, साधना व डॉ. नरेश दधिच, संजय पवार, सुनिल तांबे, ह.मो.मराठे, डॉ. सत्यरंजन साठे, डॉ. अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, डॉ. निलम गोर्‍हे, जयदेव गायकवाड, विनय हर्डीकर, उज्वला मेहेंदळे, अनिल आणि स्वरूप खोपकर, प्रा.शशि भावे, टेल्कोतले अधिकारी, मित्र आणि इतर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. जवळचे नातेवाईक, मित्र आणि सामाजिक चळवळीतले सहकारी असे सगळे मिळून सुमारे १०० लोकं असतील.


नोंदणी अधिकारी श्री. अंबर पवारही मित्रच असल्यानं त्यांनी नोंदणी फीही घेतली नाही आणि लग्नाचं नोंदणी प्रमाणपत्रही मोफत घरपोच केलं.


माझ्या लग्नात सन्मित्र अ‍ॅड. उपेंद्र खरेनं खूप मेहनत केली. मित्रवर्य डॉ. मंदार परांजपेनं त्याची कार आम्हाला घरी सोडायला दिलेली. रफिक शेख या मित्रानं व्हिडीओ शुटींग केलेले. विद्या कुलकर्णीनं फोटो काढलेले. संजय पवारनं रोजनिशीच्या पानाची सुंदर नी कलात्मक लग्नपत्रिका बनवलेली.


लग्नात मी तर प्रचंड गांगरून गेलेलो. माझे फोटो इतके बावळट आलेत की बघितले की आपण असे का वागत होतो? असा प्रश्न पडतो. पुर्वानुभव नसल्यानं बहुधा असं होत असावं. खरेदी अशी काही केलीच नव्हती पिंपरीचा फ्लॅट सोडला तर!


माझी आई, भाऊ, मामा, मावशा, नी सगळेच जवळचे नातेवाईक डेक्कन जिमखान्यावरच्या  श्रेयस हॉटेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच जेवले. कदाचित कोणत्याही हॉटॆलात जाण्याचा त्यांचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असावा.


मुलीकडचे लोक अगदी पाहुण्यासारखे आले. जेवले नी गेले. मुलीच्या लग्नाची काहीही तोशिष आपल्याला पडली नाही, काडीचाही खर्च करावा लागला नाही याचा तरी त्यांना अनंद झाला की नाही, माहित नाही. कायम स्वत:वरची जबाबदारी दुसर्‍यावर झटकून जगणारे आप्पलपोटे लोक.


लग्नानंतर कितीतरी वर्षे घरात टि.व्ही. नव्हता. लेखक असलो तरी लिहिण्याचे टेबल नव्हते. कृष्णधवल पोर्टेबल टि.व्ही. आला तोच पाचेक वर्षांनी. फ्रीज नी फोन यायला तब्बल १२ वर्षे लागली. घरात सोफा नी डायनिंग टेबल यायला तर २० वर्षे लागली. पुस्तकं मात्र घरभरून होती.


काही लोक दागिने मोडून खातात तर काही गरिबी! आम्हाला तसे काहीच करायचे नव्हते. नाही.

आमचा प्रवास झकास झाला तो परस्पर विश्वासानं, सोबतीनं. साथीनं. दिवस कसे भुर्कन उडून गेले.

संकटे आली, हल्ले झाले, अजुनही होतात, होतीलही.
परिवर्तनाची भुमिका घ्यायची म्हटलं, की प्रस्थापित व्यवस्थेतल्या ज्यांचे हितसंबंध धोक्यात येतात ते अंगावर येणारच.


आम्हाला गोलगोल सर्वप्रिय किंवा अजातशत्रू व्हायची आकांक्षा नाही.
समाजातल्या ज्या घटकांची मानसिकता मुलत:च लुटीची, भिकेवर पोसलेली, गुन्हेगारीवृत्तीची आणि दरोडे घालायची असते त्यांच्याशी मैत्री कशाला?
ते आपल्या विरोधात असणे हेच सन्मानाचं नाही का?


१ मे २०१८ ला म्हणता म्हणता ३२ वर्षे होऊन गेली.....
दिवस किती भुरकन गेले. कालपरवा लग्न झालं असंच वाटतय...
"नांदा सौख्यभरे" हे तुम्हा आप्तेष्ठांचे आशिर्वाद जगणं सुखाचं करून गेले.


- प्रा.हरी नरके, २१ सप्टेंबर २०१८

Thursday, September 20, 2018

निमित्त- दया पवार स्मृतीदिन आणि बलुतंची चाळीशी-


दया पवार एक कथा सांगायचे. बहुधा हरी शंकर परसाईंची. एका महानगरातील एका गृहनिर्माण सोसायटीत दोन कुटुंबं शेजारी शेजारी राहात असतात.
सुशिक्षित. आधुनिक. उच्चभ्रू. दोन्ही घरातले पुरूष एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदांवर काम करीत असतात. बायकाही नोकरी करणार्‍या, नियमितपणे क्लबमध्ये जाणार्‍या वगैरे असतात.
त्यातल्या एका कुटुंबातल्या तरूणावर दुसर्‍या कुटुंबातली युवती प्रेम करीत असते. ते दोघेही उच्चशिक्षित इंजिनियर असतात, आय.टी. कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर असतात. एकमेकांना खूप आवडत, जपत असतात. दोघे अगदी अनुरूप, परफेक्ट मॅच वगैरे असतात. ते लग्नाच्या आणाभाका घेतात. संपुर्ण आयुष्य एकत्र काढायचा निर्धार करतात.

मुलगा आपल्या वडीलांना तसे सांगतो. ते भडकतात. त्यांची जात काय, आपली जात काय याचं तरी भान ठेव असं मुलाला खडसावतात. आजवर जातीपातीचं काहीही नसलेले वडील, एरवी आम्ही जातपात काही मानत नाही असे सदैव सांगणारे, जातीय अस्मितेचे देव्हारे आत्ताच कसे काय माजवायला लागले याचे मुलाला कोडे पडते.
मुलगा त्यांचं अजिबात ऎकायला तयार नसतो.

सामाजिकदृष्ट्या मुलगा वरच्या थरातला तर मुलगी खालच्या मानल्या गेलेल्या समाजातली असते.
दोन्ही कुटुंबातल्या पालकांना हे प्रेम, हे लग्न अजिबातच मान्य नसतं.

शेवटी मुलाचे वडील मुलाला एक तोडगा सुचवतात.
हे बघ, धर्मशास्त्र सांगतं, तुमचं लग्न होऊ शकत नाही. पण एक मार्ग आहे. तू तिला पत्नीचा दर्जा देऊ शकत नसलास तरी तू तिला ठेऊ शकतोस.
मुलगा संतापतो.
आम्ही लग्नच करणार असं वडलांना ठणकावतो.

वडील म्हणतात, " मग ठीक आहे. तसेच असेल तर तू तिला पळवून ने. [ त्यासाठी आपल्या भागातल्या आमदाराची मदत तू घे, असं ते त्याला सांगतात किंवा नाही, ते मला आता आठवत नाही. ] आपद्धर्म म्हणून अशा विवाहाला धर्मशास्त्राची मान्यता आहे."

- प्रा.हरी नरके

Wednesday, September 19, 2018

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र


आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता आहे?

कोल्हापूरची मेघा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णीच्या हत्त्येची घटनाही फार जुनी झालेली नाही. गेल्या पाचदहा वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या हत्यांना रानटी, जातीयवादातून केलेल्या निर्घृण हत्त्या म्हणण्याऎवजी ऑनर किलिंग म्हणणे हा तर मुर्खपणाचा कळस आहे.

नागराज मंजूळेंनी सैराट या मराठी चित्रपटाचा शेवट तेलंगणा राज्यात हैदराबादला झालेला दाखवलेला आहे. असे आणखी किती सैराट आपल्या आजूबाजूला घडणारेत?

कथासाहित्याचा जन्म भारतात झालेला आहे. पुराणकथा तर अतिशय रंजक, प्रभावी आणि खोलवर संस्कार करणार्‍या असतात. पुराणातील वांगी [वाणगी] पुराणातच ठिक आहेत असे आपण म्हणत असलो तरी त्यांचा प्रभाव अबोध मनावर पिढ्यानुपिढ्या टिकून राहतो. जाती व्यवस्थेचे पाईक तर सर्वच जातीजमातींमध्ये आहेत. जातीसाठी खावी माती ही वृत्ती सर्वांच्याच हाडीमाशी भिनलेली आहे.


फार पुर्वी पुराणातली मुरलीचरित्र नावाची कथा वाचनात आली होती. जुने किर्तनकार ती कथा सांगत असत.
पैठणला एक अस्पृश्य समाजातला बुद्धीमान मुलगा राहत असतो. तो एका संस्कृत पंडीताच्या घरी गोठा स्वच्छ करण्याचे काम करीत असे. पंडित म्हणत असलेले मंत्र, श्लोक गायाबैलांचे शेण काढताना, गोठा झाडताना त्याच्या कानावर पडत असत. तो मुलगा एकपाठी होता. एकदा ऎकलेला शब्द तो कधीच विसरत नसे. अल्पावधीत त्याला असंख्य मंत्र आणि श्लोक यांचे ज्ञान झाले. तो ते घडाघडा म्हणत असे.


एके दिवशी त्याने आपला गाव सोडला. तो पायी चालत पार नाशिकला गेला. तिथे गोदातीरावर आंघोळ करीत असताना तो म्हणत असलेले मंत्र शेजारच्या भटजींच्या कानावर पडले. त्याचे त्या लहान वयातले स्वच्छ आणि लयदार उच्चार ऎकून भटजी प्रभावित झाले.
त्यांनी त्याची आपुलकीनं विचारपूस केली.

मुलाने घाबरून जाऊन आपली जात चोरली. कुल,गोत्र सारंच बनवून सांगितलं. आपण पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न अशा महामहोपाध्यायांच्या घराण्यातले असल्याचे त्याने खोटेच सांगितले. आपले आईवडील महापुरात वाहून गेल्याचेही पुढे सांगितले. भटजी त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्याला जेवायला घातले.
त्याच्या पु्ढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलगा गुणी होता. बुद्धीमान आणि कर्तबगार होता. म्हणताम्हणता त्याने नाव काढले.

अल्पावधीतच तो मुलगा सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. भटजींनी त्याला आपला घरजावईच करून घेतले.

त्याची पत्नी सुशील होती. तिचे पतीवर प्रेम होते.

मला एकदा माझे सासर बघायचे आहे, मला गावी घेऊन चला असा ती हट्ट करी. तो काहीतरी सबबी सांगून वेळ मारून नेई.

एकदा मात्र त्याची पत्नी हट्टाला पेटली. तिने अन्नपाणी वर्ज्य केले. त्याचा अगदीच नाईलाज झाला.
ते दोघे त्याच्या गावी निघाले.

तो चिंतित होता. आता आपले भांडे फुटणार या भितीने घाबरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. गुन्हा कबूल करावा तर बायको अंतरेल अशी भिती वाटत होती.

घनदाट जंगलातून जात असताना त्याने एका विहीरीत बायकोला ढकलून दिले आणि तो नाशिकला परत आला.

तुमची मुलगी विहीरीत पाणी पिताना पाय घसरून पडली आणि बुडाली असे त्याने सासू-सासर्‍यांना खोटेच सांगितले.

त्यांनी अपार शोक केला.
असेच दिवस जात होते.

एके दिवशी त्याची बायको साक्षात सुखरूप हजर झाली. तिला बघून तिच्या आईवडीलांना अपार आनंद झाला. तिचा नवरा मात्र खूप घाबरला.
त्याच्या पत्नीने मात्र त्याला सावरून घेतले. माझा पाय घसरून मीच विहीरीत पडले. यांना पोहता येत नसले तरी यांनी मला वाचवायचे खूप प्रयत्न केले वगैरे कथा तिने तयार करून सांगितली.

त्याचा जीव भांड्यात पडला. तिने आपल्याला वाचवले या जाणीवेने तो भारावून गेला. विहिरीत उगवलेल्या एका पिंपळाला आपण लटकून राहिलो आणि काही दिवसांनी तिकडून जात असलेल्या सैनिकांच्या टोळीने आपल्याला कसे वाचवले याची चित्तथरारक कथा तिने त्यांना सांगितली.

रात्री एकांतात असताना त्याने तिचे पाय धरले. मी चुकलो म्हणून तिची क्षमा मागितली.
तिने नवर्‍याला माफ केले. पावसाने झोडपले आणि नवर्‍याने मारले तर तक्रार करू नये असे तिचे संस्कार सांगत होते. ती पतिव्रता असल्याने तिच्या पतीला तिच्या हत्त्येचा गुन्हा माफ वगैरे होता.

आपण तिची हत्त्या करण्याचा प्रयत्न केला तरी तिने उदार मनाने आपल्याला माफ केल्याचे बघून त्याचे डोळे पाणावले. तिला आता सगळे खरेखरे सांगून टाकावे असे त्याला वाटले. त्याला बायकोबद्दल पुर्ण विश्वास वाटू लागला. आपण जात चोरल्याचे त्याने त्याभरात तिला सांगून टाकले.

ती अंथरूणातून ताडकन उठली.

म्हणाली, "माझी हत्त्या तुम्हाला माफ आहे. पण तुम्ही जात चोरलीत हे मात्र कधीच क्षम्य नाही."

तिने नवर्‍याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळून मारले. संपवून टाकले.
पुढे तिथे उगवलेल्या बांबूंच्या मुरलीतून ही कथा चिरस्थाई झाली.

-प्रा. हरी नरके, १९ सप्टेंबर २०१८

Tuesday, September 18, 2018

बदलत्या ग्रामीण नातेसंबंधांचे पिळवटून टाकणारे चित्रण-



महानगरी जीवनावर मराठीत गेल्या अर्धशतकात फार ताकदीनं लिहिलं गेलंय. त्याचकाळातल्या ग्रामीण जीवनावरच्या धग, बनगरवाडी, माणूस अशांनी झपाटून टाकलेलं होतं. मात्र अलिकडच्या काळात नवं, ताकदीचं, आरपार हलवणारं कमी हाती लागत होतं. इडापिडा टळो, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आगळ, पोटमारा, जू, आलोक यांनी अस्वस्थ केलं होतं. नव्या लेखकांच्या या श्रेष्ठ कथा, कादंबर्‍या सुन्न करतात. त्यात आता मिलिंद जाधव यांच्या हक्कसोडची दमदार भर पडलेली आहे.

आपलं समकालीन ग्रामीण जीवन प्रचंड वेगानं बदलतंय. भौतिक सुबत्ता येतेय. तंत्रज्ञान प्रत्येक हातात पोचलंय. जागतिकीकरणाचे भलेबुरे परिणाम दिसु लागलेत. हातात पैसा आला की बाजारमूल्यं माणसाच्या मानगुटीवर स्वार होतात. तुमचं सगळं जगणंच कब्ज्यात घेतात. आतड्याची, रक्ताची नाती परकी होतात. हाव वाढली की माणसांचे इसम आणि इसमाचे जिन्नस बनतात. आता जगण्याची जुनी परिमाणं कालबाह्य झाली. मोडीत निघालीत.

जाधवांची हक्कसोड आकारानं बारीक चणीची कादंबरी आहे. अवघ्या ९२ पृष्ठांची. पण वेगवान. आरपार भिडणारी. अतिशय परिणामकारक. पार भोवंडून टाकणारी.
आपल्या समाजात लिंगभाव, जात आणि वर्ग ही भेदभावाची, शोषणाची केंद्रं मानली जातात. माय, बहीण, मुलगी म्हणजे मायेचा सागर. पण आता तो आपला भूतकाळ होतोय.
हा सागर केव्हाच आटलाय. लेकीबाळी कोण कोण्हाच्या राहिलेल्या नाहीत असा अनुभव घेणारा महिपत आपल्या पोटात खड्डा पाडतो. खेड्यातल्या जमिनींना सोन्याचा भाव येऊ लागला आणि पुर्वी इतर हक्कात असलेल्या बहिणी भावाइतक्याच जमिनीच्या मालक झाल्या. हे कायद्याचं पाऊल योग्यच होतं. आवश्यकही होतं.

सत्ता, पैसा आणि मालमत्ता ताब्यात आली की पुरूषसत्ताक मानसिकता जशी बेमुर्वतखोर, शोषक बनते तशी आजवर अपार सोसलेली स्त्री होणार नाही असा एक भाबडा आशावाद होता.
हक्कसोड वाचताना त्याचा पार चोळामोळा होतो.

३० वर्षांपुर्वी कोल्हापूरच्या विषमता निर्मुलन शिबिरात बोलताना मी म्हणालो होतो, "स्त्रिया सरकारी नोकरीत आल्या की भ्रष्टाचार कमी होईल." अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा.लीला पाटील [ना.सी.फडके यांच्या कन्या] खो खो हसल्या आणि मला म्हणाल्या, "तू भाबडा आहेस. आजचा उपेक्षित उद्या जेव्हा सत्तेवर येतो, मग ती स्त्री असो, गरिब असो की जातीनं हलका मानला गेलेला असो, तेव्हा तोही सत्तेच्या भल्याबुर्‍या गुणधर्मांनी वेढला जातो. त्यात झिंगतो. बाळा त्यात स्त्री, पुरूष, जात, वर्ग असला फरक राहत नसतो."

जाधवांनी ही कादंबरी "काडी काडी जमवून हौसेनं विनलेलं आपलं घरटं, आपल्याच पिलांच्या स्वार्थी हातांनी विस्कटलेलं पाहणं ज्यांच्या नशिबी आलंय अशा हरेक मातापित्यांना " अर्पण केलीय.

तुकोबा म्हणतात, आईबाप कसे असतात तर, " ऎशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रिती." पण मुलं कशी असतात तर, "जग हे दिल्या घेतल्याचे." या उक्तींचा होरपळून सोडणारा अनुभव मिलिंद जाधव हक्कसोडमधून वाचकाला देतात.

लोकवाड्मय गृहाची दर्जेदार निर्मिती, सतीश भावसारांचे अप्रतिम मुखपृष्ठ आणि मिलिंद जाधवांची दाहक अनुभव देणारी, भावकल्लोळांचा झंजावात निर्माण करीत वाचकांना एकप्रकारे चांगल्या अर्थाने छळणारी, दमवणारी आणि प्रचंड अस्वस्थ करणारी कादंबरी. मराठीत नवं काहीच लिहिलं जात नाही अशी तक्रार यापुढे तुम्हाला करता येणार नाही.
मिलिंद जाधव हे एक मराठीतलं आश्वासक नाव बनतं आहे.

हक्कसोड, मिलिंद जाधव, लोकवाड्मय गृह, मुंबई, पहिली आवृत्ती- २०१८,पृष्ठे ९२, किंमत रूपये १००/-
लेखकाचा भ्रमणध्वनी-७३८५५ ९९६००, प्रकाशकांचा दूरध्वनी-०२२- २४३७६०४२/२४३६२४७४, इमेल lokvangmaya@gmail.com lokvangmayagriha@gmail.com

-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेवाले चिपळूणकर गेले --




श्री वि वि चिपळूणकरसर राज्याचे शिक्षण संचालक असताना मी १९७८ साली त्यांना प्रथम भेटलो.
तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. आमच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे मी "पुणे दर्शन" नावाचा प्रबंध लिहिला होता.
त्यासाठी मी सहा महिने प्रवास, संशोधन केलेले होते. सरांनी त्यांच्या लेटरहेडवर पानभरून कौतुक करणारे पत्र मला पाठवले.
राज्याच्या शिक्षण संचालकाने एका शालेय विद्यार्थ्याचे एव्हढे कौतुक करण्याचा हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

१९७९ साली मी टेल्कोच्या वसतीगृहात राहात होतो. तिथे एक गटई कामगार [चर्मकार] चप्पल दुरूस्तीचे काम करीत असे. त्याचा मुलगा तिथेच खेळत असे. त्याला शाळेत का घालत नाही? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, "गुर्जी म्हनूलाले, गावाकडनं पोराच्या जल्माचा दाखला आणा म्हणुनश्यानी. गावाला गेल्तो तर तलाठी म्हण्ला, सोधायला येळ लागल. पुन्यांदा ये. आता म्या हाव अमदपूरचा. त्या तिकूडल्या मराटवाड्यातला. दाकल्यासाटी खर्च करायची आप्ली ऎपत नाय बगा."

गुरूवारी आम्हाला साप्ताहिक सुट्टी असायची. मी स्वत: मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो. पण ते म्हणाले, " जन्मदाखला आणला तरच प्रवेश मिळेल."

मी सेंट्रल बिल्डींगमध्ये जाऊन शिक्षणसंचालक असलेल्या चिपळूणकरांना भेटलो. त्यांनी सर्वच शाळांसाठी परिपत्रक काढले. ज्यांचे पालक निरक्षर असतील, स्थलांतरीत असतील अशा मुलांसाठी जन्मदाखल्याची अट शिथिल करण्यात येत आहे."
तो चर्मकार मुलगा शिकू लागला. पुढे इंजिनियर झाला. सध्या तो टेल्कोत [ टाटा मोटर्समध्ये] अधिकारी आहे.

सरांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी गुणवत्ता अभियान सुरू केले. मी त्यात अनेकदा व्याख्याने देत असे.
सरांनी नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी त्यांची जयंती सुरू केली. कित्येकदा आम्ही सोबत जात असू.
पुढे सावित्रीबाईंचे भव्य स्मारक उभे करण्याच्या कामाची माझी प्रेरणा चिपळूणकरसरच होते.
सरांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली. हजारो गरिब,होतकरू, गरजू मुलींच्या शिक्षणाला त्यातनं चालना मिळाली.

एकदा एका मदरशात सरांसोबत कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे संयोजकांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या सभेत चक्क "दत्ताचा" फोटो लावलेला होता. भगवान दत्ता पालक योजना असा त्यांचा समज होता.

आम्ही खूप हसलो. सरांनी तिथे मला सावित्रीबाईंवर बोलायला लावले.
सरांमुळेच मी सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले. त्याचा इंग्रजी अनुवाद दिल्लीच्या एन.सी.ए.आर.टी.ने प्रकाशित केला.

मी त्यांना गंमतीने म्हणायचो, "सर, तुम्ही चिपळूणकर असूनही सावित्रीबाईंचा वारसा कसा सांगता?"
सर हसायचे आणि म्हणायचे, " अरे मी, विष्णूशास्त्रींच्या छावणीतला नाही बाबा. माझा वारसा त्यांच्या वडीलांचा म्हणजे जोतीरावांचे मित्र असलेल्या कृष्णशास्त्रींचा आहे. बेटेसे बाप सवाई होता.
सावित्रीबाईंना शाळा चालवायला आपल्या वाड्यातली जागा देणार्‍या शनिवार पेठेतल्या अण्णासाहेब चिपळूणकरांचा माझा वारसा आहे.  सावित्रीबाई न होत्या तर माझी आई ना शिकती. माझी आई ना शिकती तर मी कसला इथवर येतो? हे सारे त्यांचे उपकार आहेत."

आज सकाळी सरांचे दु:खद निधन झाले. विनम्र आदरांजली.
-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

मराठी साहित्य संस्कृती- दर्जा-निकोपपणा

मराठी साहित्य संस्कृतीच्या दर्जाबद्दल,  निकोपपणाबद्दल सध्या फेसबुकवर चर्चा चालू आहे. त्यातनं सहज आठवलं. १९९० च्या दशकात मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा सदस्य असताना महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व व्यासंगी समीक्षक आणि मृदूभाषी असलेले प्रा. सुधीर रसाळसर होते. ते सभेचे कामकाज अतिशय उत्तम चालवायचे. बैठकीतले वातावरण कायम खेळीमेळीचे राहिल असे बघायचे.

दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी आदी साहित्य प्रवाहांचे नेतृत्व करणार्‍यां आणि महामंडळाबाहेर असलेल्यांना महामंडळात सामावून घेण्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करावी असा विषय मी आणला. त्याला काही प्रस्थापित दुढ्ढाचार्यांनी कडाडून विरोध केला.

रसाळसरांनी सर्वांना बोलू दिले. ते नि:पक्षपाती आणि तटस्थ होते. अतिशय मुत्सद्दीपणानं त्यांनी त्यातनं मार्ग काढला आणि घटनादुरूस्तीसाठी एक उपसमिती नेमली.
या घटनादुरूस्ती उपसमितीत ज्यांनी घटनादुरूस्तीला स्पष्ट विरोध केलेला होता त्यांनाच स्थान मिळाले हा निव्वळ योगायोग असणार.
त्या समितीत मला स्थान देण्याचा प्रश्नच त्यांच्यापुढे आला नसणार.
मला त्यांचा हा नि:पक्षपातीपणा आणि मुत्सद्दीपणा फार म्हणजे फारच आवडला.
-प्रा. हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

नामांतर आंदोलन-

काल हैदराबाद मुक्ती लढ्याचा स्मृतीदिन झाला. त्यानिमित्ताने सन्मित्र सुनिल तांबे यांनी टाकलेल्या पोस्टवरील चर्चेत मी व्यक्त केलेली प्रतिक्रिया-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामुळे सुनिलची आणि माझी पहिली भेट आणि पुढे मैत्री  झाली.

१. नामांतराची मागणी करणारा पहिला ठराव १९७४ चा होता. तो औरंगाबादच्या श्री. मच्छिंद्र वाहूळ यांचा होता. तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नामांतराची मागणी मराठवाडेतरांची होती, पुण्यामुंबईकडची ही मागणी होती हा आक्षेप निराधार होता. आहे. नामांतर लढ्यात हजारो मराठवाडाकर तुरूंगात आलेले होते. श्री. अंकुश भालेकर, Ankush Bhalekar, प्रा.एच.एम.देसरडा, श्री. बापूराव नाईक, श्री.सुभाष लोमटे, श्री. शांताराम पंदेरे, असे कितीतरी अग्रभागी होते. मी स्वत: हे प्रत्यक्ष बघितलेले आहे. आम्ही सारे तुरूंगाच्या एकाच बराकीत होतो.

नामांतर आंदोलनाची चाळीशी आणि नामांतराची पंचविशी उलटल्यानंतरही काही " बोलत्या/लिहित्या लोकांना " विद्यापीठाचे हे नामांतर मान्य नसल्यानेच ह्या लंगड्या सबबी पुढं केल्या जात असाव्यात. "नाजूक पैलू" वगैरे असतेच तर नांदेडच्या प्रस्तावित "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा" विद्यापीठातील "मराठवाडा" शब्दालाही श्रॉफ-भालेरावांनी विरोध केला असता.

२. मराठवाडा हे प्रदेशवाचक नाव कायमच राहणार होते. त्यात बदल करायचा नव्हता. दैनिक मराठवाडा, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा कृषी विद्यापीठ, अशी नावात मराठवाडा हा शब्द असलेली असंख्य उदाहरणं होती. त्यातही बदल करायचा प्रश्न नव्हता.

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाल्याने मराठवाड्याची अस्मिता कशी काय नष्ट होत होती? समजा श्रॉफ-भालेरावांचा नामांतरविरोध वैचारिक होता तर हजारोंची घरं जाळणं, अनेकांच्या क्रूर हत्या करणं, दलित वस्त्या बेचिराख करणं, हे सारे मराठवाडा शब्दाची/अस्मितेची उंची वाढवणारे होते का? ह्या अत्याचाराच्या निषेधात सारा महाराष्ट्र एकवटला. त्यात पुणे-मुंबईकरही होते. तर त्यांनाच मागणी करणारे म्हणून रंगवले जायला लागले. ह्या इतिहासलेखणातल्या नेहमीच्या क्लुप्त्या आहेत.


नामांतर ठराव विद्यापीठाच्या सिनेटने मंजूर करून सरकारकडे पाठवला होता. विधीमंडळाने तो एकमताने २७ जुलै १९७८ रोजी संमत केला. त्या दिवसापासून हजारो निरपराध दलितांवर अत्याचार करणार्‍या गुंडावरच्या सर्व केसेस श्री. गोविंदभाई श्रॉफ यांनी सरकारला मागे घ्यायला लावल्या. यावरून ते नेमके कोणाच्या पाठीशी होते? याबाबत अधिक बोललेच पाहिजे काय?


श्री. गोविंदभाई श्रॉफ यांचा राज्य सरकारने पहिलीपासून इंग्रजी शिकवायलाही विरोध होता. "गोविंदभाई, तुम्ही, इंग्रजीला विरोध करता मग तुमच्या कुटुंबातली मुलं इंग्रजी माध्यामात कशी घालता? तुमच्या संस्थेत पहिलीपासून इंग्रजी कसं शिकवता?" असं मी त्यांना औरंगाबादच्या एका सभेत समोरासमोर थेट विचारलं होतं. ते उत्तर देऊ शकले नाहीत. तर अशी होती त्यांची तत्वनिष्ठा वगैरे!


४. श्रॉफ-भालेरावांच्या आडनावाच्या शिळ्या कढीला आणखी किती काळ उत आणायचा ? अनेक बाबतीत श्रॉफ-भालेराव महान होतेच. पण म्हणून त्यांची सगळी मतं आम्ही निमूटपणे मान्य करायची काय?

- प्रा. हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८