Showing posts with label बुद्धीझम. Show all posts
Showing posts with label बुद्धीझम. Show all posts

Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Thursday, July 2, 2020

प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी, उभारला भव्य बुद्धविहार









हिंगोलीच्या पिंपळदरीत उभारला भव्य बुद्धविहार, प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी

मराठवाड्यातील हिंगोलीच्या बर्‍याच गावांना विद्यापीठाच्या नामांतरविरोधी दंगलीची झळ बसलेली होती. त्यातून सावरण्यासाठी कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी संघटना उभारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.


यावेळी २००३ साली सर्व तरूणांना प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान ऎकवण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाने तरूण इतके भारावुन गेले की विहारासाठी उत्स्फुर्तपणे वर्गणी जमू लागली. तरूणांनी केलेल्या श्रमदानातून व स्वत:च्या वर्गणीतून अतिशय भव्य बुद्धविहार उभा राहिला. असा बुद्धविहार की ज्याची किर्ती जगातल्या १६ देशात पोचलेली आहे.

या उपक्रमाला सर्व स्थानिक नागरिक व जयाजीराव पाईकराव, साहेबराव कांबळे, न्या.एम.एल.भगत व इतरांचा हातभार लागला. गावातील गरिब महिला शांताबाई महादू खिल्लारे यांनी आपले मंगळसुत्र विकुन विहाराच्या बांधकामाला देणगी दिली.

Thursday, May 7, 2020

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके








गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके

१* १९०८ जाने. - भीमरावांचा मॅट्रीक परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार झाला. त्यावेळी कृ. अ. केळुसकर [ कुणबी ] लिखित बुद्ध चरित्र भीमरावांना भेट मिळाले.
हे पुस्तक वाचून आपण बुद्धाकडे वळलो. प्रेरित आणि प्रभावित झालो असे बाबासाहेब " बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या प्रस्तावनेत म्हणतात. " I read this book with great interest and was greatly impressed and mooved by it.
२* २७ मे १९२४ बार्शी- नामांतर की धर्मांतर या विषयावर बाबासाहेबांचे भाषण.
३* १३ सप्टें. १९३३- बाबासाहेब लंडनवरून सुभेदार विश्राम गंगाराम सुभेदार यांना पत्र लिहितात. त्यात ते म्हणतात, " माझा कल बुद्धधर्माकडे आहे."
४* १९३४, दादर, मुंबई, बाबासाहेबांनी बांधलेल्या बंगल्याला राजगृह हे बौद्ध नाव दिले.
५* १३ ऑक्टोबर १९३५ - येवला परिषद. बाबासाहेबांची घोषणा, " मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही."


६* १२/१३ जाने. १९३६- पुणे, अहिल्याश्रम- धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
७* ३०, ३१ मे व १जून जाने. १९३६- मुंबई, दादर, धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
८* २४ सप्टें. १९४४ - मद्रास येथे रॅशनॅलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सभेत ब्रिटीश सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून बोलताना ते म्हणाले, "बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म " यात बुद्धीवादी बौद्ध धर्मच श्रेष्ठ आहे."
९* ८ जुलै १९४५, मुंबई, पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिला " प्रज्ञा, शील, करूणा " हे ब्रिदवाक्य दिले.

१०* २० जून १९४६-  सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून बुद्ध भवन व आनंदभवन अशी सभागृहाची नामकरणे केली.
११* २ मे १९५०- दिल्लीतील बुद्ध जयंती समारंभामध्ये बाबासाहेबांचे भाषण, " बुद्धधर्म हा नीतिधर्म आहे."
१२* ५ मे १९५० मुंबई, जनता पत्राला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले, "आपण बौद्ध धर्म स्विकारणार आहोत."

१३* २६ मे १९५० - कॅण्डी, येथे पत्रकार परिषदेत आपण बौद्ध समारंभ व विधींचा अभ्यास करण्यासाठी येथे आल्याचा उल्लेख केला. जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांचे भाषण.
१४* मे १९५०- महाबोधी सोसायटीच्या बुद्ध जयंती विशेषांकात बाबासाहेबांनी लेख लिहून बुद्ध धम्माचे भवितव्य उज्वल असल्याचे नमूद केले.
१५* ६ जून १९५०, कोलंबो, श्रीलंका, जागतिक प्रतिनिधींसमोर बाबासाहेबांचे " भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि र्‍हास" यावर भाषण

१६* जुलै १९५१, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध संघाची स्थापना केली. " बौद्ध उपासना पाठ" ही पुस्तिका प्रकाशित केली.
१७* नोव्हेंबर १९५१, "बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या लेखनाला प्रारंभ केला. फेब्रुवारी १९५६ ला पुर्ण करून त्याच्या ८० प्रती विद्वानांना अभिप्रायार्थ पाठवल्या.

१८* १६ मे १९५४, बाबासाहेब रंगून, ब्रह्मदेशातील बुद्ध जयंती समारंभाला उपस्थित.
१९* २८ ऑक्टोबर १९५४ - मुंबई पुरंदरे स्टेडीयम, जाहीर सभेत बाबासाहेब म्हणाले, "बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे आपले तीन गुरू आहेत."

२०* १९५४, बाबासाहेबांनी "दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीया" ची स्थापना केली. ४ मे १९५५ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

२१* २५ डिसेंबर १९५४, देहूरोड, बुद्ध मुर्तीची बाबासाहेबांच्या हस्ते विहारात स्थापना.
२२* १९५५, जनता पेपरचे " प्रबुद्ध भारत" असे नामकरण केले.

२३* १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
२४* २० नोव्हेंबर १९५६, नेपाळ, काठमांडूला बाबासाहेबांचे जागतिक बौध्द परिषदेत भाषण.
२५* २५ नोव्हेंबर १९५६, सारनाथ, जिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र परिवर्तन सुत्त कथन केले तिथे बसून बाबासाहेबांचे आयुष्यातील शेवटचे भाषण, "चलो बुद्ध की ओर" ची जगाला हाक दिली.

-प्रा. हरी नरके, बौद्ध पौर्णिमा, ०७/०५/२०२०
.................................................

Saturday, October 19, 2019

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८

Sunday, September 16, 2018

आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी बुद्धीझमवर लिहिले २२ ग्रंथ


आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/







१. बुद्ध, धर्म आणि संघ,
२. बुद्धलीलासारसंग्रह,
३. लघुपाठ,
४. निवेदन, [मराठी, गुजराती, इंग्रजीत प्रकाशित],

५. खुलासा,
६. जातक कथा संग्रह, भाग-१,
७. जातक कथा संग्रह, भाग-२
८. जातक कथा संग्रह, भाग-३

९. समाधिमार्ग,
१०. बौद्ध संघाचा परिचय,
११. हिंदी संस्कृती आणि अहिंसा,
१२. भगवान बुद्ध, [१४ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित],

१३. पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म,
१४. बोधीसत्व नाटक,
१५. विसुद्धीमग्गा,
१६. सुत्तनिपात,

१७. बोधीचर्यावतार,
१८. धर्मचक्रप्रवर्तन,
१९. अभिधर्म,
२०. धम्मपद,

२१. अभिधम्मत्थसंग हो,
२२. अठ्ठकथेचे सिंहलीमधून मराठीत भाषांतर

त्यांचे १४ ग्रंथ गुजराती भाषेत प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या भगवान बुद्ध, या चरित्रग्रंथाचे १४ प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर प्रकाशित झालेले असून
त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, मल्याळम, तामीळ, तेलगु, कन्नड, सिंहली, आदी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

-प्रा. हरी नरके, १६ सप्टेंबर, २०१८