Saturday, April 11, 2020

जोतीरावांना चुकुन लागली दाढी, दुरूस्तीला ६५ वर्षे : फुले पुतळ्यासाठी ४४ वर्षे संघर्ष - प्रा. हरी नरके










महात्मा फुले म्हटले की फेटा किंवा फुले पगडी आणि दाढी हे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. महात्मा फुल्यांना दाढी नव्हती. ती एका चित्रकाराच्या चुकीनं लागली.

आपल्या भारतीय समाजात एखादी गोष्ट रुजायला फार काळ जाऊ द्यावा लागतो आणि जर रुजलेली गोष्ट चुकीची असेल तर ती गोष्ट दुरूस्त करायलाही फार झटावं लागतं.
एका चित्रकाराच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळं महात्मा फुल्यांना दाढी चिकटली आणि ती काढायला ६५ वर्षे लागली.

त्याचं असं झालं.....

जोतीराव १८९० च्या २८ नोव्हेंबरला गेले. त्यानंतर त्यांची छोटी चरित्रं अनेकांनी लिहिली. मात्र त्यांचं विस्तृत आणि सप्रमाण चरित्र लिहिण्याचा संकल्प सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी सोडला. ते विदर्भातले चिखलीचे. ते महाराष्ट्रभर फिरले. त्यावेळी हयात असलेल्या सर्व फुलेवाद्यांना ते प्रत्यक्ष भेटले. त्यांच्याकडून फुल्यांच्या आठवणी लिहून घेतल्या. चरित्राचे दस्तावेज जमा केले. पाटलांनी खूपच मेहनत घेतली.

१९२७ साली जोतीरावांची जन्मशताब्दी होती. त्यावर्षात हे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा निर्धार होता.
पुस्तकाची छपाई पुण्याच्या छापखान्यात चालू होती. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जोतीरावांचा फोटो छापण्यासाठी ते फोटोची शोधाशोध करू लागले. त्यांना मिळालेले सर्वच फोटो हे कॉपिंगवरून  कॉपिंग केलेले असल्यानं त्यात अस्पष्टपणा आलेला होता.

जोतीरावांना आपला भाऊ मानणार्‍या एका महिलेकडं अस्सल फोटो असल्याचं पाटलांना समजलं. तिच्याकडं फोटो होता, पण तो देव्हार्‍यात ठेवलेला होता. तिनं एक दिवसासाठी पाटलांना तो दिला. त्या फोटोला अनेक वर्षे गंध, हळदकुंक लावल्यानं आणि दुधानं धुतल्यानं ओघळ आलेले होते. त्याकाळात स्वयंपाक चुलीवर केला जायचा त्या धुरानंही तो फोटो काळपट पडलेला होता. पाटलांनी फोटो मुखपृष्ठकाराला दिला. त्यावरून चित्र काढताना जोतीरावांच्या चेहर्‍यावरचे पाण्याचे ओघळ म्हणजे दाढी असावी असा चित्रकाराचा गैरसमज झाला.
फुल्यांनी तरूणपणात दाढी राखलेली होती परंतु पुढे त्यांनी ती काढून टाकली. ते मोठे व्यापारी, कंत्राटदार, पुण्याचे आयुक्त आणि पुणे कमर्शियल अ‍ॅंड कॉट्रॅंक्टीग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते अतिशय टापटीपीनं राहायचे. मात्र त्याकाळात आजच्यासारखी कटिंग सलून्स नसायची. दर चार दिवसांनी केस कापणारे नाभिक घरोघर जावून केस कापायचे.

जोतीरावांच्या चेहर्‍यावर दोन दिवसाचे खुंट वाढलेले होते. चित्रकारानं पठ्ठ्यानं त्याची रितसर दाढीच बनवून टाकली.

पंढरीनाथ पाटलांची बहीण गावी वारल्याची त्यांना तार आल्यानं पाटील गावी चिखलीला गेले.
इकडं मुखपृष्ठ छापून तयार झालं. पुस्तकाची बांधणीही झाली. पाटलांना पुस्तक थेट प्रकाशन समारंभातच बघायला मिळालं.

चित्रकाराची ती चुक ६५ रूजली. ती दुरूस्त करताना माझ्या नाकी नऊ आले. दरम्यान त्या चित्रावरून अनेकांनी तैलचित्रे तयार केली होती. महाराष्ट्र शासनानं सुद्धा असंच एक बटबटीत तैलचित्र करून घेऊन सर्वत्र लावलेलं होतं. तेही अनेक ठिकाणी रूजलं होतं. हे सारं दुरूस्त करणं सोपं काम नव्हतं. १९८९ पासून प्रक्रिया सुरू करून तिची पुर्तता व्हायला १९९३ साल उजाडावं लागलं. पाटलांनी जमवलेल्या त्या आठवणींचं संकलन केलेलं पुस्तक मी १९९३ साली "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेलं आहे.

१८ एप्रिल १८८४ ला जोतीरावांनी काढलेल्या त्यांच्या या फोटोची काचेची एक फूट बाय एक फूट अशी मोठ्ठी निगेटिव्ह मिळाली. त्यावरची धूळ झटकून त्यावर बरीच तांत्रिक मेहनत करावी लागली. पुण्याचे सत्यशोधक गोपीनाथराव पालकर यांच्या वाड्यात त्यांच्या वडलांच्याकडे एकुण सुमारे २०० निगेटिव्हज होत्या.
फोटोग्राफर विजय व सरोजा परूळकर यांच्याकडून तांत्रिक प्रक्रिया करून घेण्यात यश आलं.

डॅा. बाबा आढाव यांचं प्रमुख मार्गदर्शन मिळालं. छायाचित्रकार प्रा. गजानन शेपाळ आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक सय्यद यांचे तांत्रिक सहकार्य मिळवून मला हे छायाचित्र एकदाचं शासनातर्फे प्रकाशित करता आलं. अर्थात मंत्रालयातल्या काही सनातनी बांबूनी बरेच अडथळे आणायचा आणि या कामाला कोलदांडा घालायचा प्रयत्न केला. श्री छगन भुजबळ यांच्यामुळे त्या आघाडीवर यश मिळवता आले. यापुढं तरी हेच अधिकृत कृष्णधवल छायाचित्र सर्वत्र लावलं जाईल याची आपण दक्षता घ्यायला हवी.

पुणे हे पुतळ्यांचे शहर आहे. जगातील सर्वाधिक पुतळे पुण्यात आहेत असे सांगितले जाते. असतील. पण ते जसं पुतळ्यांचं, विद्येचं, संस्कृतीचं केंद्र आहे तसंच तो सनातन्यांचाही अड्डा आहे.

मला इतिहासात रमायला फारसं आवडत नाही. पण काही ऎतिहासिक घटना अशा असतात की त्यांची माहिती नव्या पिढीला व्हायलाच हवी. १९२० साली लोकमान्य टिळक गेले. त्यांचा पुतळा पुण्याच्या रे मार्केटमध्ये [ आताची महात्मा फुले मंडई ] बसवण्यात आला. तिथेच सनातन्यांचे शंकराचार्य असलेल्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचाही अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. सत्यशोधक केशवराव जेधे तेव्हा पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या दोन पुतळ्यांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी पुणे नगरपालिकेकडे एक ठराव पाठवला.

महात्मा फुले पुणे नगरपालिकेचे आयुक्त होते, त्यांचा पुतळा नगरपालिकेने उभारावा अशी त्यांनी त्यात मागणी केली. सनातनी पुण्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा हलकल्लोळ माजला. पुणे न.पा. तेव्हा टिळक गटाच्या ताब्यात होती. डेक्कन जिमखाण्यावरचा आपटे रोड ज्यांच्या नावाने आहे ते आपटे न.पा. अध्यक्ष होते.

जेधे, जवळकर हे तरूण, आक्रमक आणि लढाऊ नेते होते. त्याकाळात सनातन्यांनी महात्मा फुल्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी अत्यंत किळसवाणा मजकूर असलेल्या चोपड्या प्रकाशित केल्या. नानाप्रकारे महात्मा फुल्यांची बदनामी करण्यात आली. असे हे कृतघ्न लोक. श्री. गणपतराव नलावडे व श्री. वि. म. फुले यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन या चोपड्या छापण्यात आल्या होत्या. त्या धादांत खोट्या होत्या. विकृत होत्या. त्यावर लेखक म्हणून या बहुजनातल्या दोघांची नावे असली तरी त्यांचे असली लेखक "सदाशिव पेठेतले" होते. साधे पत्रही धड लिहिता न येणारे हे दोघे. ते काय डोंबलाचे पुस्तकं लिहिणार? तिसरे असेच एक घाऊक लेखक म्हणजे चिं. ग. ओक होत. हे मात्र खरेच लेखक होते. हिंदू महासभेचे मामाराव दाते या कामात पुढे होते. नासक्या आंब्याच्या रेशीमकिड्यांचे हे पुर्वज. यांचेच वारसदार म्हणजे बाळ गांगल आणि दंगलबाज किडेगुरूजी.

गणपतराव नलावडे यांच्यामते महात्मा फुले वाईट होते,  का तर ते कोट घालत होते. ब्रिटीश लोक कोट घालायचे. म्हणून फुले ब्रिटीशधार्जिणे. म्हणून वाईट! कालच्या माझ्या पोस्ट वर यांनी शाखेमध्ये केस भादरावेत तसे मेंदू भादरलेला एक किडा लिहितो, " पण तो फुले ख्रिस्ती होता ना?" किती भयानक विष भरलेय यांनी बहुजनांच्या मेंदूत.

आता खुद्द स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि हेडगेवार हे सगळेच कोट घालायचे. पण कोटावरून फुल्यांवर फुली मारताना नलावड्यांना हे सुचले नाही. असे हे विकृत सनातनी.

महात्मा फुले यांच्या बदनामीसाठी जातीयवाद्यांनी त्यांचा वापर करून घेतला. त्या बदल्यात वि. म. फुल्यांना पुण्याचे नगरसेवक केले गेले. नलावड्यांना तर महापौरपद दिले गेले. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ. क्षणिक फायद्यासाठी आपण काय करतोय हे त्यांच्या डोक्यात कसे आले नसेल? श्री. विश्वनाथ महादेव फुले हे जोतीरावांचे नातू होते असे रेटून खोटे लिहिले गेले, सांगितले गेले. हा बनाव होता. त्यांचेही आडनाव फुले असले तरी त्यांचा जोतीरावांशी नातू वगैरे असला काहीही संबंध नव्हता.

ते चुलतनिलत घराण्यातले होते. त्यांचे पुर्वज कायम महात्मा फुले यांच्या विरोधी छावणीत राहिलेले. थोडक्यात ते महात्मा फुल्यांचे भ्रष्ट असे सामाजिक परिवर्तनाला विरोध करणारे भाऊबंद होते. महात्मा फुल्यांच्या वडीलांची जमीन त्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन वि. म. फुलेंच्या आजोबांनी हडप केलेली होती. त्यामुळे ते घराणे आणि जोतीराव यांच्या घराण्यामध्ये भाऊबंदकीचे वाद - वैर होते. शिवाय जोतीरावांना मूळबाळ नसल्याने वि. म. फुल्यांचा जोतीरावांच्या इस्टेटीवर डोळा होता. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी यशवंतला दत्तक घेतल्याने या भाऊबंदांचा डाव उधळला गेला. म्हणुन ते जोतिरावांवर जळत होते. ते घराणे सनातन्यांचे हस्तक होते. अंधश्रद्धाळू आणि कडवे जातीयवादी होते. ते कडक अस्पृश्यता पाळीत असत. अंगात येणे, गंडेदोरे, ताईत, कोंबडे, बकरे बळी देणे हे त्यांचे उद्योग महात्मा फुल्यांना पटणेच शक्य नव्हते.

 सनातन्यांनी बक्षीस म्हणून वि.म. उर्फ बाबूराव फुल्यांचे नाव सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेसमोरील चौकाला दिलेले आहे. महात्मा जोतीराव फुल्यांच्या पुतळ्याला सातत्याने ४४ वर्षे विरोध करणारे सनातनी या वि. म. फुलेंचे नाव मात्र एका चौकाला तात्काळ देतात यातच सगळे आले. ही महात्मा फुल्यांच्या बदनामीबद्दलची बक्षिसी होती.

वि. म. फुल्यांच्या या चोपड्यांची तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांना सनातन्यांचे बगलबच्चे म्हणून समस्त माळी समाजाने जातीबहिष्कृत केलेले होते.

{ माझ्यामते जाती बहिष्कार ही चुकीचीच कृती होती } पण सामान्य माणसांचा तो आक्रोश होता.

पुढे काही वर्षांनी आपल्या नावावर जोतीरावांबद्दल खोटेनाटे लिहून छापले गेले होते अशी कबुली देऊन त्यांनी माळी समाजाची जाहीर माफीही मागितली होती. त्यांच्या मुलानेच मला व य.दि.फडके यांना ही माहिती सांगितली. त्याची नोंद मी माझ्या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच केलेली आहे. आपल्या नावाचा वापर करून हे चोपडे लिहण्यात आले असे त्यांनी जाहीरपणे सांगितल्यामुळे सनातन्यांचे बिंग फुटले. ह्या बदनामीकारक पुस्तिकेचा खरपूस समाचार मी माझ्या "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन " या पुस्तकात ३० वर्षांपुर्वीच घेतलेला आहे. ख्यातनाम संशोधक डॉ. य.दि.फडके यांनी माझ्या या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत माझ्या मतांना दुजोराही दिलेला आहे.

महात्मा फुल्यांच्या बदनामीची महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया आली. बहुजन समाजातील हमालांनी महात्मा फुले मंडईतील विष्णूशास्त्रींचा पुतळा हटवा अशी मागणी  केली. आंदोलन पेटले. शेवटी सनातन्यांना माघार घ्यावी लागली. तो पुतळा तिथनं काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आणून बसवावा लागला. दरम्यान आचार्य अत्र्यांनी रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव दिलेले होते.

जेधे जवळकरांनी या बदनामीकारक चोपड्यांना "देशाचे दुश्मन" हे छोटे पुस्तक लिहून जशास तसे उत्तर दिले. जेधे जवळकरांवर बदनामीचा खटला भरण्यात आला. या चोपड्यांबद्दल नलावडे आणि वि.म. फुले यांच्यावरही बदनामीचे खटले टाकले गेले. ब्रिटीश न्यायाधिशांनी जेधे जवळकरांना दोषी ठरवले. तुरूंगात पाठवले. मात्र तशाच कामांबद्दल नलावडे व वि. म. फुले यांना मुक्त केले गेले. हा ब्रिटीश न्यायाधिशांचा पक्षपात वरच्या न्यायालयात बॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केला आणि वरिष्ठ न्यायालयाने जेधे जवळकरांना निर्दोष मुक्त केले.

महात्मा फुल्यांचा पुतळा पुण्याऎवजी कोल्हापूरला बसवावा असा सल्ला नगरपालिकेतल्या टिळक पक्षीय सनातन्यांनी दिला होता. पुढे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे सातत्याने संघर्ष झाला. अखेर ३१ मे १९६९ ला यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे म.न.पा.च्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुर्णकृती पुतळा बसवण्यात आला. पण त्याचा खर्चही म.न.पा.ने केला नाही. माळीनगरच्या साखर कारखान्याने हा पुतळा मनपाला भेट दिला होता. हरिभाऊ गिरमे, एल. टी.कुदळे आदींचा त्यात पुढाकार होता.

ह्या बदनामीकारक पुस्तिका सध्या पुन्हा समाजमध्यमांवर पुढे आणण्याचे कारस्थान मनुपुत्र संभाजी भिडे आणि दाभोळकर- पानसर्‍यांच्या हत्येतले सनातन संस्थेचे आरोपी करीत आहेत. एरवी हिंदू सगळे एक असे कोकलणारे हे जातीयवादी लोक कसे दांभिक असतात बघा, महात्मा फुल्यांची बदनामी करताना फुले हिंदूच होते हे मात्र हे लोक सोयिस्करपणे विसरतात. तर असा असतो यांचा सिलेक्टीव्ह हिंदूजनविचार!

हे लोक आगीशी खेळत आहेत. याची प्रतिक्रिया येणार आणि पुन्हा जातीय चिखलफेक होणार. सोबतकार ग.वा.बेहरे आणि हिंदुत्ववादी बाळ गांगल यांनी ३० वर्षांपुर्वी महात्मा फुल्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली होती. ती त्यांच्या अंगलट आली होती. हाच खेळ पुन्हापुन्हा खेळण्याची सनातनी रेशीमकिड्यांची चिकाटी विलक्षणच म्हटली पाहिजे.

मात्र यातनं जातीय दुही वाढते. सामाजिक सलोखा नष्ट होतो. एकात्मतेचा विचार मागे जातो हे मनुपुत्र श्री. संभाजी भिडे, सनातनचे आणि हिंदू जनजागरणवाले लोक लक्षात घेतील काय?

मित्रहो, आज जयंतीदिनी महात्मा फुल्यांना अभिवादन करून मोकळे होऊ नका. ह्या जातियवादी रेशीमकिड्यांना रोखण्याच्या कामात तुमचा काय सहभाग असणार आहे तेही सांग आणि मुख्य म्हणजे कामाला लागा. तरच तुमच्या या अभिवादनाला काही अर्थ असेल.

- प्रा. हरी नरके, ११ एप्रिल २०२०

संदर्भासाठी पाहा:
** *  प्रा हरी नरके, महात्मा फुले - यांची बदनामी, एक सत्यशोधन, सुगावा प्रकाशन, पुणे, मार्च १९८९

** * पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

*** संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९ 

No comments:

Post a Comment