Sunday, May 24, 2015

अभिजाततेच्या दर्जानंतर ३५० विद्यापीठांत मराठी

http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/24052015/0/1/
दिव्यमराठी, नाशिक, रविवार, दि.२४ मे, २०१५,पृ.४
Published on 24 May-2015

अभिजाततेच्या दर्जानंतर ३५० विद्यापीठांत मराठी
पीयूष नाशिककर | नाशिक
मराठीभाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याचा मार्ग माेकळा झाला असून, केंद्राकडून तशी घाेषणाही या मे अखेरीस हाेण्याची शक्यता अाहे. पण, असा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नक्की भाषेसाठी काय करायचे अाहे. शासनस्तरावर काय केले जाते, अशा काही प्रश्नांवर मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी काही मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश...
मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांची माहिती
.........................................
{ अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे हाेणार?
-जी भाषा राेजगार देते ती टिकते. उदा. इंग्रजी, मराठीचेही तसेच हाेणार अाहे. मुळातच अभिजाततेच्या दर्जानंतर ती ३००-३५० विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल. साहित्य, ग्रंथ, प्रकाशक या विश्वाला माेठा हातभार लागेल. मराठी शिकणे, शिकवणे, प्रकाशित करणे, भाषांतर करणे या प्रक्रियांना प्राेत्साहन मिळेल. राज्यातील ५२ बाेलीभाषांचा प्रामुख्याने अभ्यास हाेईल. या सगळ्यामुळे ती ज्ञानभाषा म्हणून विकसित हाेईल. साधे उदाहरण म्हणजे इकडे अापण फ्रेंच, जर्मन अशा फाॅरेन लँग्वेज शिकत असताे. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यावर इतर लाेक फाॅरेन लँग्वेज म्हणून तिच्याकडे बघतील.
{मग अाता काेणत्या कारणाने घाेषणेला विलंब हाेताेय?
-मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत केंद्र पातळीवर सर्व काम पूर्ण झाले अाहे. पण, दुसऱ्या एका भाषेचे अभिजाततेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हा विलंब हाेत अाहे. मात्र, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा अाणि संबंधित इतरांनी न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून मराठीचा मार्ग माेकळा करण्याची विनंती केली अाहे. हा निर्णय या महिनाअखेरीस सकारात्मक मिळणार असून, अभिजात मराठी असे अधिकृतपणे शिक्कामाेर्तब हाेईल, अशी सगळ्यांनाच अाशा अाहे.
{मराठी अभिजात हाेऊ शकते, हे काेण ठरवतं?
-एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेत अनेक लाेकं काम करत असतात. त्यात महत्त्वाचे असतात ते १२ भाषांचे तज्ज्ञ. हे जागतिक भाषांवर काम करणारे लाेक असतात. ते जाे अहवाल केंद्राकडे सादर करतील, त्यानुसार केंद्र निर्णय घेत असते. हे लाेक प्रचंड सखाेल तपासणी करूनच अहवाल सादर करतात. मराठी भाषेबद्दल या १२ तज्ज्ञांनी सकारात्मक अहवाल सादर केल्यानंतरच अभिजाततेचा मार्ग माेकळा झाला अाहे.
{केंद्राकडून किती निधी मिळेल?
-अभिजाततेच्या दर्जानंतर केंद्राकडून दरवर्षी ५०० काेटी रुपये मिळतील. सध्या महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी केवळ २५ काेटी रुपयांची तरतूद केलेली अाहे. ही रक्कम अतिशय ताेकडी अाहे. अाता त्यात तब्बल २० पटीने वाढ हाेणार अाहे. हे पैसे टप्प्याटप्प्यानेच मिळणार अाहेत. पण, ते कधी मिळतील तर अाधी अापण काय काम केले ते दाखवावे लागणार. मग केंद्राकडून ते पैसे मिळणार. सध्याची तरतूद ५०० काेटींची अाहे. यात वाढच हाेणार अाहे अाणि विशेष म्हणजे ते अनंत काळापर्यंत मिळणार अाहेत.
{या पैशांचा विनीयाेग कसा अपेक्षित अाहे?
-पाच प्रकारची कामे त्यात प्रामुख्याने अपेक्षित अाहे. त्यात बाेलीभाषांचे संशाेधन, संपादन अाणि संकलन हे महत्त्वाचं काम मानलं गेलं अाहे. अार्ष, अभिजात जे काही ग्रंथ अाहेत ते अापल्याकडे एक लाखाच्या जवळपास अाहेत. अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता मिळालेली पुस्तके अशा निदान १०० कलाकृती जगातील १०० भाषांमध्ये पाेहाेचवणं यात अपेक्षित अाहे. तेही रास्त किमतीला. अाता अापल्याकडे गाथा सप्तशती अाहे. तिची किंमतच १००० रुपये अाहे. त्यामुळे फार लाेक ती घेत नाहीत. पण, तिची किंमत १०० पर्यंत अाणली तर ती िकतीतरी लाेकांपर्यंत पाेहाेचेल अाणि पर्यायाने मराठीचा प्रचार, प्रसार हाेईल. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे िवद्यार्थी, संस्था, अभ्यासक मराठी भाषा, वाचन संस्कृतीचा अभ्यास करणार अाहेत त्यांना शिष्यवृत्ती देणे, यातून संशाेधन पुढे यावं असा उद्देश अाहे. शाळेपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत मराठीची ताकद लक्षात अाणून देणे. शिक्षक पालकांनाच मराठीचं काही खरं वाटत नाही. म्हणून मराठी भाषेसाठी नवीन तंत्र, इतर अभिजात भाषांनी काय केले, साहित्य संमेलने, काेशनिर्मिती यासाठी प्रयत्न करणे अाणि साहित्य संस्था, व्यक्तींना बळ देणं, मराठीकडे लाेकांचा अाेढा वाढेल, अशा वाचनविषयक स्पर्धा अाणि उपक्रम राबविणे अपेक्षित अाहे.
{महाराष्ट्र शासनस्तरावर याचं काम कसं चालेल?
-खरंतर शासकीय बाबूंच्या हातात हे काम दिलं तर काही खरं नाही. हे लाेकं निर्णय स्वत:च्या हातात ठेवतात अाणि राजकारण्यांचा कल ज्या कृतीने मत मिळेल त्या कृतीकडे असताे. अार्थिकतेबाबत अापण बाेलायला नकाे. अापल्याला काेणत्या भाषेचा द्वेष नाही. पण, उच्च पातळीवरचे सगळे जे नाेकरशहा अाहेत, ते मराठीच्या विराेधात अाणि इंग्रजीचे पुरस्कर्ते अाहेत. त्यामुळे शासनाने मराठी भाषाप्रेमी, सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी, ज्येेष्ठ साहित्यिक, पत्रकार, संशाेधक, अभ्यासक यांच्याकडे हे काम दिले, तरच अभिजाततेचे खरे काम हाेईल असे वाटते. देशातील इतर ज्या अभिजात भाषा अाहेत त्यांचे काम असेच चालते.
{महाराष्ट्र शासनाचं मराठीविषयक धाेरण अाणि अभिजात भाषेचा दर्जा याचा संबंध कसा अाहे?
-मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा अनंतकाळापर्यंतचा अाहे. मराठीविषयक धाेरणाची अभिजातता ही खूप पुढची गाेष्ट अाहे. धाेरणाला २५ वर्षांची मर्यादा अाहे. त्यात ठरलेल्या गाेष्टीच पूर्ण करायच्या अाहेत. हे धाेरण प्रत्यक्षात अाणण्यासाठी, पुढे नेण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिशादर्शक ठरेल, असे म्हणता येइल. तमिळ, तेलगू, कन्नडमध्ये या संदर्भातील उत्तम काम अापल्याला बघायला मिळते. 

Friday, May 15, 2015

मराठीला अभिजात दर्जा ही काळ्या दगडावरची रेघमराठीला अभिजात दर्जा ही काळ्या दगडावरची रेघ
  • हरी नरके
मुंबई, दि. 14 :  मराठी दोन हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे शेकडो पुरावे शिलालेख, हस्तलिखिते अशा विविध स्वरूपांत उपलब्ध आहेत.  त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तब्बल 52 बोलीभाषा असलेली मराठी यापुढेही संपन्न होत जाणार असून, ती उद्याच्या काळातही श्रेष्ठ व समृद्ध भाषा असणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी आज येथे केले.
मराठी भाषा विभाग, शासकीय मुद्रणालय व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजिलेल्या ग्रंथप्रदर्शन व साहित्यिक उपक्रमात ‘अभिजातच्या उंबरठ्यावर मराठी’ या विषयावर श्री. नरके बोलत होते. मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गावडे, अवर सचिव वृषाली सावंत आदी यावेळी उपस्थित होते.  
ज्या भाषेत जाणिवा विकसित करणारे श्रेष्ठ साहित्य उपलब्ध असते, ती भाषा अभिजात असते. या निकषानुसार मराठीत जागतिक दर्जाचे विपुल साहित्य निर्माण झाले आहे, असे सांगून श्री. नरके म्हणाले की, मराठीत एक लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध असून, कोशवाङमय निर्मितीत ती जगातील दुस-या क्रमांकाची भाषा आहे.
ते पुढे म्हणाले की, मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली नसून, ती महाराष्ट्री प्राकृत भाषा आहे. ही बाब राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मराठ्यासंबंधी चार उदगार’ या पुस्तकातून, तसेच ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या साहित्यातून सिद्ध केली आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश व मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून, ती मराठी हीच एक भाषा आहे. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी 1932 मध्ये लिहिलेल्या ‘मराठी साहित्याचा इतिहास’ या पुस्तकात त्याचा दाखला आहे.  
मराठीच्या प्राचीनतेचे उदाहऱण देताना श्री. नरके म्हणाले की, जुन्नरजवळ नाणेघाटात सापडलेल्या 2232 वर्षांपूर्वीच्या ब्राम्हीलिपीतील शिलालेखात मराठी अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठांवरील गावांतील नागरिकांनीच रचला आहे. महाराष्ट्रात घरोघरी सांगितली जाणारी कावळा-चिमणीच्या शेणामेणाच्या घराची गोष्ट आठशे वर्षांपूर्वीच्या लीळाचरित्रात समाविष्ट आहे. अहमदाबादजवळील लोथल या गावात साडेचार हजार वर्षांपूर्वीचे बंदर सापडले. तिथे सापडलेल्या सुरईवरसुद्धा ही कथा चित्ररूपात कोरलेली आहे. तामिळमधील 2600 वर्षांपूर्वीच्या संगम साहित्यातही कावेरी नदीवर धरण बांधणारे गवंडी मराठीत बोलत असतात, असा उल्लेख सापडतो. श्रीलंकेतील ‘दीपवंश’ व ‘महावंशप्राचीन ग्रंथांतही मराठीचा उल्लेख आहे.
श्री. नरके पुढे म्हणाले की, जगभरातील विद्वानांना मराठी भाषेतील साहित्याने मोहिनी घातली आहे. जगप्रसिद्ध लेखक गॅब्रियल गार्सिया मार्खेझ यांनी त्यांच्या साहित्यातील ‘जादुई वास्तववादा’ची प्रेरणा 1200 वर्षांपूर्वीच्या हरिभद्र या मराठी लेखकाच्या ‘समरादित्याची कथा’ या पुस्तकापासून घेतल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. या प्राचीन भाषेचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. सर्व भाषांचा आदर करताना मराठीचा आग्रह धरला पाहिजे. संशोधन, लोकव्यवहारासह सगळ्यांच क्षेत्रांत मराठीचा वापर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सौजन्य: श्री.हर्षवर्धन पवार, मंत्रालय.

Sunday, May 3, 2015

महाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे.

बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले असंख्य लोक आहेत. त्यांना या पुरस्काराचा आनंद झालेला आहे.
बाबासाहेंबांच्या विचारधारेचे पारंपरिक विरोधक असलेले या निर्णयावर नाराज आहेत. त्यात प्रामुख्याने समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी मंडळींचा समावेश आहे.

याशिवाय गेली काही वर्षे ज्या संघटना बाबासाहेबांच्या इतिहास लेखनावर संघटितपणे आणि आक्रमकपणे तुटून पडत आलेल्या आहेत त्या ब्रिगेडी आणि बामसेफींनी जोरदार मोर्चेबांधणी करून विरोधाची राळ उडवून दिलेली आहे.

अशावेळी सामान्य माणूस भांबावलेल्या स्थितीत असतो.

हा निर्णय चूक की बरोबर हे ठरविताना खालील प्रश्नांच्या प्रकाशात चर्चा झाली तर ती उपयुक्त ठरू शकेल.

हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे. पहिल्या पुरस्काराच्या वेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शासनाने हा पुरस्कार आपल्याला देण्याचा  निर्णय घेतला होता, मात्र आपण पु.ल.देशपांडे यांचे नाव सुचवले असे वक्तव्य केल्यावरून गदारोळ झाला होता.

मानकरी महाराष्ट्रभूषणचे--
वर्ष,
१९९६,  पु. ल. देशपांडे, साहित्य
 १९९७,  लता मंगेशकर, कला, संगीत
 १९९९,  विजय भटकर, विज्ञान
 २००१,  सचिन तेंडुलकर, क्रीडा
 २००३,  अभय बंग आणि राणी बंग, समाजसेवा
२००५,  रघुनाथ माशेळकर, विज्ञान.
 २००६,  रतन टाटा, उद्योग,
 २००७,  रा. कृ. पाटील, समाजसेवा
 २००८,  मंगेश पाडगावकर, साहित्य
२००९,  सुलोचना लाटकर, कला, सिनेमा
 २०११,  अनिल काकोडकर, विज्ञान.
..................................

२००२,  भीमसेन जोशी, कला, संगीत
२००४,  बाबा आमटे, समाजसेवा
२००८,  नानासाहेब धर्माधिकारी, समाजसेवा.
२०१०,  जयंत नारळीकर, विज्ञान.
 ..................................


अशा विविध क्षेत्रातील 16 मान्यवरांना आजवर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

******

१.  हा पुरस्कार कोणाला द्यायचा याचा निर्णय एक निवड समिती घेते. या समितीत यावर्षी खालील आठ मान्यवरांचा समावेश होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री,  विनोद तावडे, अध्यक्ष.
सदस्य: वासुदेव कामत, उज्वल निकम, मंगल कांबळे, दिलीप वेंगसरकर, राजीव खांडेकर, सांस्कृतिक सचिव वल्सा नायर आणि संचालक अजय आंबेकर.

२.  या समितीने एकमताने हा निर्णय घेतला. पुरस्कारासाठी बाबासाहेबांचे नाव कोणी सुचवले आणि त्याला कोणी अनुमोदन दिले ही बैठकीतील माहिती उघड झाली तर संघटित व आक्रमक विरोधकांचा दुटप्पी व्यवहार उघडा पडेल.

३.  पुरस्कार कोणालाही दिला तरी तो निर्णय सर्वांना मान्य होईलच अशी शक्यता नाही. त्यामुळे पुरस्कार यांच्याऎवजी ह्यांना का दिला नाही अशी टिका होणारच. यावर उपाय म्हणजे एकदम १२ कोटी मराठी लोकांना तो देऊन टाकायचा.म्हणजे वादच नको.

४.  लोकशाही पद्धतीने समितीने एकमताने घेतलेला निर्णय मानायचा की नाही? निर्णयाचे सर्वाधिकार बाहेरील व्यक्ती किंवा संघटनांना द्यायचे काय? त्यांनी ज्यांना आपल्या संघटनांचे "+++  भुषण"  पुरस्कार दिलेले आहेत, त्यांनीच बाबासाहेबांचे नाव महाराष्ट्र भूषण साठी सुचवले असेल आणि त्याला अनुमोदनही बहुजन सदस्यानेच दिलेले असेल तरीही बाहेर गदारॊळ केला जात असेल तर पडद्यामागील आणि उघडपणे चाललेले राजकारण व संगनमत लोकांसमोर कोण मांडणार?

५.  बाबासाहेब पुरंदरे यांनी गेल्या ७० वर्षात मिशनरी वृत्तीने शिवचरित्र घरोघरी पोचवले, लोकप्रिय केले हे त्यांचे कार्य अमान्य करता येईल का? ते इतिहासकार अथवा इतिहास संशोधक असल्याचा त्यांनी कधीही दावा केलेला नाही. ते शिवचरित्राचे कथन करतात. ’जाणता राजा’ च्या प्रयोगातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत ते पोचवले आहे.

६.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात काही उणीवा, त्रुटी किंवा दोष असतील आणि त्याबाबत कोणाचे मतभेद असतील तर ते मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. माझेही त्यांच्या इतिहास लेखन पद्धतीबाबत मतभेद आहेत. ते राहतील. पण बाबासाहेबांशी चर्चा होऊ शकते. मतभेद मांडता येतात. विरोधकांपैकी ज्या संघटित आणि आक्रमक संघटना आहेत त्यांचा सर्वच ब्राह्मण इतिहासकारांना विरोध आहे. त्यांना अगदी नरहर कुरूंदकर, त्र्यं.शं. शेजवलकर, सेतूमाधवराव पगडी, न.र. फाटक, ग.ह. खरे, गजानन भास्कर मेहेंदळे, य. दि. फडके हेही चालत नाहीत. त्यामुळे "आम्ही सांगू तोच इतिहास" असा अट्टाहास असणारांचे समाधान कसे करायचे?अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? त्यांच्याशी चर्चाच शक्य नाही. त्यांना एकतर सर्वांनी आपले अनुयायी व्हायला हवेय नाहीतर थेट शत्रूच. कायम इतरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे, त्यांच्या भुमिकांचे विपर्यास आणि विकृतीकरण करीत त्यांची बदनामी करायची हा यांचा खाक्या. असहमतीला, मतभेदाला जागाच नसते त्यांच्याकडे.  ते नेहमी इतरांच्या हेतूंवरच थेट संशय घेतात. "तेथे पाहिजे फक्त आमच्या जातीचा" असाच त्यांचा आम्हाला आलेला एव्हढ्या वर्षांचा अनुभव आहे. सबब ज्यांना दुरून डोंगर साजरे आहेत त्यांनी आपण कोणामागे फरफटत जात आहोत याचे भान ठेवायचे की नाही?

७.  ज्या गोविंद पानसरे यांचा आता सोयिस्कर हवाला दिला जात आहे,  त्यांनी या संघटनांवर केलेली टिका जगप्रसिद्ध आहे, ती  विसरली का जातेय?

८.  यांना जन्माने ब्राह्मण असल्याने डा. नरेंद्र दाभोळकरही चालत नव्हते. कोणीकोणीच चालत नाहीत. अगदी दुसर्‍या जातीचे बहुजनही चालत नाहीत. तेथे ब्राह्मण कसा चालेल? हे इतिहास लेखनाचे एकजातीयकरण महाराष्ट्राच्या भल्याचे आहे काय?

९.  जेम्स लेनचे लेखन निषेधार्यच होते. बदनामीकारकच होते. त्याला जी काय शिक्षा करायची ती करा. आमचा पाठींबा आहे. पण तितकाच भांडारकर संस्थेवरचा हल्लाही अनुचित होता. चोराला सोडून इतरांना ठोकल्याने न्याय होतो काय? वहीम किंवा संशय हाच पुरावा असतो काय? हे ज्यांच्यावर आक्षेप घेतील त्या सर्वांना चौकशी न करताच फासावर लटकावयचे काय?

१०.  विचारधारा म्हणून ज्यांचा बाबासाहेबांच्या नावाला विरोध आहे, त्यांचा या विरोधी संघटनांच्या दहशतवादी, हल्लेखोर, विशिष्ट समाजाच्या सामुदायिकपणे कत्तलींचे आवाहन करणार्‍या वर्तनाला पाठिंबा आहे असे समजायचे काय? वैचारिक विरोध करणे आणि पत्रकारांच्या घरावर हल्ले करणे यात फरक असतो किंवा नाही? याचाही खुलासा झालेला बरा.

११.  यापुढे पुरस्कार देताना राज्य सरकारने या अशा सर्वच संघटनांचे "ना हरकत प्रमाणपत्र" घेणे बंधनकारक असल्याचा नियम करायचा का?

१२. बालभारतीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचे फेरलेखन करताना त्यावेळच्या सरकारने [ शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी] छ.शिवजी महाराज यांच्या जातीचे ६ जण आणि दादोजी कोंडदेव यांच्या जातीचे ३ जण अशा ९ सदस्यांची समिती नेमून जो निर्णय घेतला, तीच लोकशाही पद्धत यापुढे आदर्श मानायची काय?ज्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने तक्रार केली होती त्याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना इतिहासकार म्हणून बालभारतीच्या या समितीवर नियुक्त करून राष्ट्रपुरूष शिवाजी महाराजांना एका जातीत बंदीस्त करणारे कोण आहेत?

१३.  जे लोक इतिहासकार कृ.अ. केळूस्करांना वेगळा न्याय आणि राम गणेश गडकरींना वेगळा न्याय लावतात त्यांची री ओढता येईल काय?

१४.  ज्यांच्या लेखी रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील केवळ त्यांच्या जन्मामुळे/ जातीमुळे टिकामुक्त असतात पण मेहेंदळे, बेडेकर, बहुलकर मात्र संपूर्ण बाद असतात, त्यांना  "व्हेटोचा" अधिकार द्यायचा काय?  मग तटस्थ आणि प्रांजळ इतिहास लिहिता येईल काय?

  १५.  आजवरचा अनुभव पाहता ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज केवळ एका जातीत बंदिस्त करायचे आहेत, त्यांच्या भुमिका उचलून धरताना समाजवादी, मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी इतिहासाचे असे जातीय विकृतीकरण करणारांच्यापासून सावध राहायला नको काय?  हिटलरी भुमिका मग ती कोणत्याही छावणीची असो ती मान्य करायची काय? त्यामुळे "आगीतून फुफाट्यात" हेच होणार नाही काय?

१६..  प्रश्न आणखी बरेच आहेत.

पुन्हा कधीतरी,,,,,