Friday, November 18, 2016

देशासाठी आम्ही गेले दहा दिवस फक्त चेक किंवा कार्डच स्विकारतोय..


श्रीमान रविशकुमार आणि Sunjay Awate संजय आवटे जी :-

मी सत्य प्रतिज्ञेवर सांगतो की, गेल्या दहा दिवसांत माझे कुठलेही काम, व्यवहार अडले नाहीत. मी गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही. मी अथवा माझे कुटुंबीय कुठल्या रांगेतही उभे राहिलो नाही. आम्ही बॅंकांचे दरवाजेही झिजविले नाहीत. आणि झिजविणारही नाही. उगाच कशाला ओढून ताणून खोटं बोलायचं?
गेले दहा दिवस

1. दररोज सकाळी मी दुध घ्यायला गेलो की दुधवाला माझ्याकडून चेक घेतो.

2. अंडीवाल्याकडे स्वायपिंग मशिन असल्याने तो कार्डवर अंडी देतो.

3. आमचा भाजीवाला तर गेली अडीच वर्षे फक्त  on line भाजी देतो. तो रोख रक्कम घेण्याच्या सक्त विरोधात आहे.

4. प्रवासासाठी रिक्षा असो की पीएमटी दोघेही कार्डमनीच मागतात. त्यांना Cash चा स्पर्श अगदी वर्ज्य आहे. मित्र गावावरून आला.सांगत होता, पुणे रेल्वे स्टेशनवर उतरलो तर,सगळ्या हमालांच्या हातात बोर्ड होते, आजपासून हमाली cash मध्ये चालणार नाही. सर्व Bank ची कार्डे स्विकारली जातील. माझ्या एका विद्यार्थ्याच्या पी.एन.बी. ब्यांकेच्या खात्यातले 38 रुपये कोणीतरी परस्पर पळवल्याचा त्याला मेसेज आला. त्याने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली. आश्चर्य म्हणजे पोलीसांनी अवघ्या 17 मिनिटात नायजेरियन चाचाला बेड्या ठोकल्या. विद्यार्थ्याचे पैसे त्याच्या खात्यावर ताबडतोब जमा करण्यात आले. मला सांगा, पोलीसांमध्ये आलेली ही तत्परता म्हणजे क्रांती नाही काय? नोटा बंद केल्या म्हणूनच ती येऊ शकली ना?

5. क्यांटीनचा चहा उधारीवरच मिळतो. वर्षाखेरीस त्याला थेट पगारातूनच पैसे Deduct करून द्यावे लागतात. बायकोने घरातील रद्दी विकली. 4 किलोचे 28 रूपये आले. सायकलवर येणारा खरेदीदार म्हणाला, ताई, आर.बी.आय.च्या गाईडलाइन्सनुसार गेले दहा दिवस मी रोखीचे व्यवहार बंद केलेत. डी.डी. देतो. चालेल ना? एव्हढ्यात बाहेर बोहारीन आली, मुलीने तिला पाचसहा जुने कपडे दिले. ती म्हणाली, No भांडी, नो Cash. सारे व्यवहार on line ने करतो आम्ही. तुमचे रूपये चौदा मी तुमच्या खात्यावर Transfer करीन. ही क्रांतीच आहे. राजेहो, आहात कुठे?

6. पिठाच्या गिरणीत गेलो की तो म्हणतो, sir, हा घ्या माझा Bank अकाउंट नंबर. आरटीजीएसने पैसे ट्रान्सफर करा. चप्पल दुरुस्त करायला गेलो तर फुटपाथवरचा कारागीर म्हणाला, सर, देशासाठी सैनिक सीमेवर लढताहेत. आपण एव्हढाही त्याग करू शकत नाही? माझे आठ रूपये झालेत, कोणत्याही ब्यांकेचा डी.डी.चालेल. ब्यांकेचे डी.डी.चे कमिशन त्यातूनच कापून घ्या. उर्वरित रकमेचा डी.डी. आणून द्या. पुढची अडीच वर्षे अजिबात चिंता करू नका.

7. किराणावाला, पेपरवाला, मदतनीस मावशी, आमचे हे सगळेच लोक गेली अडीच वर्षे चेकद्वारा किंवा कार्डद्वाराच पैसे स्विकारतात.रू. 500 आणि 1000 च्या नोटांनाच काय सगळ्याच नोटांना ते "महज एक कागजका टुकडा" समजतात.

8. आमचा वा‘चमन, पोस्टमन, मनपाचे पाणीवाले, सफाईवाले सगळे आपणहून म्हणाले साहेब काही चिंता करु नका. आम्ही दिवाळीची पोस्त घेतो, पण फक्त चेक स्विकारतो.

9. मेडीकलवाले काका, आमचे कौटुंबिक वैद्य [Family Doctor] आणि फळवाले इतकेच काय अगदी इस्त्रीवाले सुद्धा "देशभक्त" असल्याने फक्त आणि फक्त चेक/कार्डच स्विकारू लागलेत गेल्या दहा दिवसात.

10. मला सांगा अडचण आहेच कुठे? 

अहो, आमच्या सोसायटीचे चेयरमन सकाळी सांगत होते, काल रात्री तळमजल्यावरील कर्वेकाकांचे घर चोरांनी फोडले, काका जागे झाले तर चोर म्हणाले, "आवाज करायचा नाय, गडबड चालणार नाही. "देशासाठी" आम्ही गेले दहा दिवस फक्त चेक किंवा कार्डच स्विकारतोय. सगळा व्यवहार on line चालूय. आम्हाला cash चालत नाय. काय समजले? सीमेवर सैनिक एव्हढा त्रास झेलताहेत आणि........."

*** उलट माझ्याकडचे चिल्लर पैसे, माझ्याकडच्या रू.10, 20, 50 आणि 100 च्या शिल्लक नोटांचे काय करायचे, त्या कुठे आणि कशा खपवायच्या यावर माझ्या एका विद्यार्थ्याला पीएच.डी.करायला सांगावी असा मी विचार करतोय. आपला काय सल्ला आहे?

काहीही दाखवता राव. म्हणे रांगेत 55 गेले. मुळात कडमडतात कशाला रांगेत? देशासाठी 50 दिवस चेक/कार्ड/ डी.डी./on line/उधारी असे कितीतरी मार्ग असताना जायचे कशाला रांगेत?

देशासाठी 10 किंवा 50 दिवसच काय पण पुढची आणखी अडीच वर्षे असेच निश्चिंत जगायचे मी ठरवलेय.शेवटी मी हाडाचा देशभक्त आहे ना? Any Objection?
.......................