Sunday, October 22, 2017

तुम्ही समुद्रातच उडी मारली असती-

सर, एक वाईट बातमी आहे. तुमच्या मुंबईच्या बहिणीला अपघात झालाय. त्यांची तब्बेत गंभीर आहे. तुम्हाला मुंबईला घेऊन जायला आमचं हेलीकॉप्टर आलेलं आहे. तुम्हाला तातडीनं निघायला हवं.
अरे बापरे. काय सांगताय? ती माझी एकुलती एक आणि लाडकी बहीण आहे. तुम्हाला ही बातमी कशी आणि कधी कळली?
2 तासापुर्वी दिल्लीच्या आमच्या मुख्यालयातून आम्हाला मेसेज आला. कुणीतरी तुमच्या दिल्ली ऑफिसला कळवलं. त्यांनी तो निरोप आमच्या कार्यालयाला दिला.
अरे, पण तुम्हाला दोन तासांपुर्वी कळलेली बातमी तुम्ही मला लगेच का सांगितली नाहीत?
सर, आपण, दूर समुद्रात आहोत. हेलीकॉप्टर इथे पोचायला दोन तास लागतात. बातमी कळल्याबरोबर आम्ही वरिष्ठांच्या अनुमतीनं तुमच्यासाठी हेलीकॉप्टरची व्यवस्था केली.
हेलीकॉप्टर यायच्या आधी तुम्हाला बातमी सांगितली असती तर तुम्ही समुद्रातच उडी मारली असती.
ओ, थॅंक्स.
मी मुंबईला पोचलो आणि तिथून टॅक्सी करून त्वरीत पुण्याच्या रुबी हॉस्पीटलला आलोय. आता मधुची तब्बेत कशीय? डॅाक्टर काय म्हणताहेत? विजय मला विचारत होता.
चला आपण डॅाक्टरांनाच विचारू या.
सिरियस हेड ईंज्युरी आहे. त्या सध्या कोमात आहेत. सर्व ट्रीटमेंट चालूय. 48 ते 72 तास आपल्याला वेट करावं लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल. लेट्स होप फॉर गुड.
मधुचा भाऊ विजय माझे आभार मानत होता. तो टाइम्स ऑफ इंडीयाच्या दिल्ली कार्यालयात पॉलिटिकल एडीटर होता.
संरक्षण मंत्र्यांनी देशातल्या आम्हा निवडक पत्रकारांना एक सिक्रेट मिशन दाखवण्यासाठी समुद्रात नेलं होतं.
हा अपघात नेमका झाला कसा?
खरंतर मलाही नीट माहित नाही. काल रात्री 2 वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, अपुर्व आणि मधुला लोणावळ्याजवळ गंभीर अपघात झालाय असा मला पोलीस कंट्रोल रूमचा फोन आला होता. पोलीस त्यांना घेऊन ससूनला निघालेत. माझा ड्रायव्हर नेमका आज गावी गेलाय. तू तुझी स्कूटर घेऊन लगेच आलास तर आपण ससूनला जाऊ.
मी येतो. मला पिंपरीहून तुझ्याकडे पोचायला अर्धा तास लागेल. तू तयार राहा.
मरणाची थंडी होती. गडबडीत मी स्वेटर घालायला विसरलो. स्कूटरवर गार वारा भनान लागत होता. नाकाडोळ्यातून पाणी येत होतं.
मी अर्ध्या तासात तिच्या बंगल्यावर पोचलो. ती तयारच होती. आम्ही ससूनला गेलो. अपुर्वला किरकोळ जखमा होत्या. मधू मात्र कोमात होती. ससूनचा व्हेंटीलेअर नेहमीप्रमाणेच बंद होता.
आम्ही त्यांना ससूनमधून रूबीला शिफ्ट करायचं ठरवलं. अ‍ॅंब्युलन्स तयारच होती. व्हीआयपी केस असल्यानं पोलीस अधिकारी जातीनं राबत होते. अपुर्व मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला. तो त्यांचा ओएसडी होता. पुर्वी सामाजिक चळवळीतून आलेला, नव्या दमाचा लेखक पण सध्या राजकारणात सक्रीय असलेला.
आयसीयुमध्ये डॅाक्टर साठे भेटल्या. त्या माझ्या ओळखीच्या होत्या. त्यांनी तातडीनं ट्रीटमेंट सुरू केली.
काही वेळानं आम्ही तिघं बाहेर आलो. अपुर्वनं सिगारेट पेटवली.
अपुर्व, अपघात कसा झाला? आम्ही विचारलं.
आम्ही तुझ्याकडून जेवून निघालो तेव्हा रात्रीचे 12 वाजलेले. आमचा दोघांचा डोळा लागला होता. हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकवर आमची वेगात असलेली कार धडकली असावी. सुदैवानं ड्रायव्हर शुद्धीत होता. त्यानं गाडीतल्या वायरलेसवरून पोलीस कंट्रोलला कळवून अ‍ॅंब्युलन्स मागवली. एव्हढ्या रात्री कोणाला कळवणार? म्हणून तुलाच फोन केला. बरं झालं, तुम्ही दोघं लगेच आलात, अपुर्व म्हणाला.
तो ट्रॉमामध्ये होता. बर्‍याच वेळानं तो सावरला. मला म्हणाला, हरी, प्लीज एक काम कर. वर्षावर फोन करून सीएमना कळव.
मी म्हटलं, अरे इतक्या रात्री ते झोपलेले असतील. झोपमोड केली म्हणुन चिडतील.
नाही चिडणार. अरे एव्हढे दिवस त्यांच्यासाठी मिडीया आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट करतोय. रात्रंदिवस राबतोय. तू बिनधास्त फोन कर.
मी घाबरत घाबरत पीसीओवरून वर्षा बंगल्यावर फोन केला. पहिल्याच रिंगला उचलला गेला.
जयहिंद, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून ड्युटी ऑफिसर कामठे बोलतोय.
मी काम सांगितलं. ते म्हणाले, सर, सीएम झोपलेत. पण बघतो.
स्वत: सीएम दोनच मिनिटात लाईनवर आले. अपुर्वला अपघात झालाय? कसाय तो?
सर, तो बराय. पण त्याच्यासोबतची महिला पत्रकार मधु गंभीर जखमी आहे.
काही काळजी करू नका. दहा मिनिटात पुण्याचे जिल्हाधिकारी तिथे पोचतील. डॅाक्टरांना सांगा, पैशांची चिंता करू नका. बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट द्या.
खरंच 10 मिनिटात कलेक्टर आले. ते मला ओळखत होते. त्यांनी आल्याआल्या सुत्रं हातात घेतली. पोलीस अधिकार्‍यांना सांगून सिक्युरिटी वाढवली. अपुर्वने दिलेल्या सर्व फोननंबरवर निरोप पोचवले.
तासाभरात एका इंग्रजी आणि एका हिंदी पेपरचे संपादकही दस्तुरखुद्द पोचले. सकाळी सीएमचे पुतणे भेटायला आले. संध्याकळी साहेब येतील असा त्यांनी निरोप दिला.
36 तासांनी मधू शुद्धीवर आली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.एव्हाना मधुचे इतर नातेवाईकही पोचले होते. अपुर्वची पत्नीही आली.
वर्तमानपत्रात या अपघाताच्या मिठमसाला लावलेल्या उलटसुलट बातम्या यायला लागल्या तेव्हा अपुर्वची पत्नी रडायला लागली.
तरी मी त्याला सांगत होते, तिच्या नादाला लागू नकोस. पण तो ऎकेल तर ना? ती माझ्यापेक्षा जास्त तरूण आहे ना!
माझ्या माहितीप्रमाणे अपुर्व चांगला माणूस होता. निदान माझ्या मैत्रिणीचं तरी तसं खात्रीलायक म्हणणं होतं. ती महिला चळवळीत सक्रीय होती.
मंत्रालय वार्ताहर संघाचे सदस्य मात्र मला भेटून खोदूनखोदून माहिती विचारीत होते. मी माझ्याकडच्या अपुर्व माहितीच्या आधारे किल्ला लढवत होतो.
अपुर्वही स्व:ता दूर राहून सगळ्या तोफेच्या तोंडी मलाच देत होता.
सलग 48 तास मी झोपलो नव्हतो. आंघोळ नाही, झोप नाही, धड जेवनही नाही यामुळं खुप थकवा आलेला होता. एके दिवशी रुबी हॉस्पिटलवर पोलीसांची धावपळ वाढली. अपुर्वला भेटायला विरोधी पक्षातले सर्वोच्च नेते आलेले.
ते म्हणाले, " अरे काय हे अपुर्व? सीएमसोबत राहतोस नी चुकीच्या ठिकाणी धडका मारतोस. तुझा सीएम बघ, सावज टप्प्यात आल्याशिवाय कधीच चाप दाबत  नाही. धडक कधी आणि कुठे मारायची ते त्याच्याकडून शिकून घे. अरे, व्यंगचित्रात काय किंवा चित्रात काय ब्रश चुकीच्या ठिकाणी सटकला तर चित्राची माती होते. अचुक नेम महत्वाचा. तुझा सीएम तसा भला माणूस आहे. पण दिल्लीला असलेलं मैद्याचं पोतं त्याला या खुर्चीवर जास्त दिवस टिकू देणार नाही बघ." मी त्या ग्लॅमर असलेल्या, करिष्मा असलेल्या विरोधी पक्षातल्या सर्वोच्च राजकीय नेत्यांच्या शेजारी उभा राहून त्यांचं हे बोलणं ऎकत होतो.
फार भारावून गेलो होतो. अपुर्वमुळं ते इतक्या जवळून आपल्याला बघायला मिळाले. एकुण अपुर्व हा तंतोतंत भला माणूस म्हणायचा.
मधुचा भाऊ नी मुंबईच्या हिंदी पेपरचे संपादक मात्र मला एका बाजूला घेऊन सांगत होते, हरी, अपुर्व चांगला माणूस नाहीय. लबाड आहे. सीएमची सगळी टेबलाखालची डिल्स तोच सांभाळतो. पेट्या आणि खोकी यांची रसद मिडीया आणि राजकीय नेत्यांना पोचवतो. त्यानं मधुला जाळ्यात पकडलंय. ती लहान आहे. तिला याची, त्याच्या बोलण्याची, चित्रांची, कवितांची भुरळ पडलीय. तू याच्यापासून दूर राहा.
मला कळत नव्हतं, कोणाचं खरं मानावं?
मधु-अपुर्वसोबत मी आठ दिवस हॉस्पीटलमध्येच होतो.
माझी महिला चळवळीतली मैत्रिण मात्र येऊन जाऊन असायची.
त्या दोघांना डिस्चार्ज मिळाला. अपुर्वची बायको, माझ्याशी शेकहॅंड करीत म्हणाली, हरी, तू खुप धावपळ केलीस. थॅंक्स. मुंबैला आलास तर आमच्या घरी चेंबूरला नक्की ये.
माझ्या कामात मी ते निमंत्रण विसरूनही गेलो.
मुंबईचे पत्रकार मात्र हा अपघातच होता की मधुला मारण्याचा प्लॅन होता, मधू गरोदर आहे काय? याचा छडा लावण्यासाठी अधून मधून
मला फोन करायचे. मी मला माहित असलेल्या गोष्टी त्यांना सांगत त्यांच्याशी वाद घालायचो.
वाटायचं, एखाद्या सज्जन माणसाला किती छळतात हे पत्रकार!
एकदा मंत्रालयात गेलो असताना, सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाशेजारी अपुर्वच्या नावाचा बोर्ड दिसला. त्याच्या तब्बेतीची चौकशी करावी म्हणून आत गेलो.
पीए म्हणाला, बसा, विचारतो.
त्यानं इंटरकॉंमवरून मी भेटायला आल्याची माहिती अपुर्वला दिली.
मला म्हणाला, साह्यबांनी तुम्हाला बसायला सांगितलय.
मी अर्धा तास बसलो तरी आतनं बोलावणं येईना.
आत कसली मिटींग चालूय का?
नाही. साहेब एकटेच बसलेत. साह्यबांना लोणावळ्याला अपघात झाला तेव्हा नरकेसर, तुम्हीच हॉस्पीटलमध्ये सगळी धावपळ करीत होता ना? मी ओळखलं तुम्हाला. जा तुम्ही आत, मात्र मी सांगितलं, असं सांगू नका.
मी दरवाजावर टकटक केलं. परवानगी विचारून आत गेलो.
अपुर्वच्या कपाळावर आठ्या होत्या. तो नाराजीनं म्हणाला, काय काम होतं?
मी म्हटलं, इकडे आलो होतो, तुमचा बोर्ड बघितला. म्हटलं, तब्बेतीचं विचारावं, म्हणून सहजच आलोतो.
कामाचं बोला हो, कामाशिवाय कोणीही असं येत नसतं.
मी म्हटलं खरंच काही काम नव्हतं.
तो म्हणाला, ठीकय. निघा मग. मी खुप बिझी आहे.
-प्रा.हरी नरके
काही व्यक्तींची नावं बदललेली आहेत. बाकी पात्रे,घटना,प्रसंग,प्रवृत्ती काल्पनिक वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.

Thursday, October 19, 2017

निखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून-

ऋतुरंगच्या दिवाळी अंकात "आमचं सहजीवन" या सदरात निखिल वागळेंचा सुकून हा लेख आहे.
अक्षरच्या दिवाळी अंकात त्यांनी "माझ्या खिशातला राजीनामा" हा लेख लिहिलेला आहे.
आय.बी.एन.लोकमत ही वाहीनी सुरू करण्यापासून ती नावारूपाला आणण्यात वागळेंचा मोठा वाटा. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आले आणि पाच दिवसात या वाहिनीची मालकी असलेला माध्यमसमुह मुकेश अंबानींनी विकत घेतला. त्यानंतर राजदीप सरदेसाई आणि निखिल वागळेंना आपली पदे सोडावी लागली. त्याबाबत पडद्यावर झळकणार्‍या या माणसांच्या बाबतीत पडद्यामागे नेमके काय घडले याचे वागळेव्हर्जन या लेखात वाचायला मिळते.
इलेक्ट्रॉनिक वाहीन्यांचं हे कॉर्पोरेट जग नेमकं कसं चालतं? तिथल्या पत्रकारांना खरंच काही स्वातंत्र्य असतं का? पैशांच्या जोरावर मालकलोक्स टेबलावरून नी टेबलाखालून कायकाय व्यवहार करतात? तिथल्या संपादकांना कोणत्या तडजोडी कराव्या लागतात? असे आणि इतर अनेक प्रश्न आपल्या मनात कायम असतात. त्यातल्या काहींची उत्तरं या लेखात मिळतील.
वागळे हे माध्यमांमधले अमिताभसारखे अ‍ॅंग्रीयंगमन. तशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मानणारा आणि त्यांचा तिरस्कार करणारा असा दोन्ही बाजूंना मोठाच जनसमुदाय आहे. पत्रकारांमध्ये त्यांना रोलमॉडेल मानणारे अनेक तरूण आहेत. ते यशस्वी व्यवस्थापक आहेत. मराठीतले नामवंत वक्ते आहेत. वागळेंकडे जबरदस्त जिगर आहे. कल्पकता नी प्रतिभा आहे. त्यांच्याकडे अशा जमेच्या बाजू खुपच आहेत. त्या अर्थानं वागळे दणकट पत्रकार आहेत.
बघा फक्त आयबीएन लोकमत ही त्यांची घोषणा, ही टॅगलाईन भारी वाटत असली तरी इतरांकडेही काही चांगलं असू शकतं हेच ते विसरून गेले होते काय? एका मोठ्या पत्रकाराचं सामर्थ्य हीच त्याची मर्यादा बनली होती काय?
वागळेंना आपण तिरसट असल्याचा अभिमान आहे असं ते या लेखात सुचित करतात.
वागळे अ‍ॅन्कर म्हणून आधी भारी होते, पण नंतर ते न्यायधिश बनू लागले. अनेकांशी ते खुनशीपणानं वागू लागले.
वागळेंना मी किमान 40 वर्षे जवळून ओळखतो. ते दिनांक साप्ताहिकात काम करीत होते तेव्हापासूनचा हा परिचय आहे. त्यांचा महानगरचा सुवर्णकाळ आणि कर्जबाजारी होण्याचा काळ असे दोन्ही मी पाहिलेत. आय.बी.एन. लोकमत वाहिनी सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातून मी त्यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम केला होता. त्यानंतर शेकडो वेळा त्यांच्यासोबत चर्चेत मी सहभागी झालोय. आमचे मित्र असणारे वागळे आणि वाहिनीचे संपादक असलेले वागळे या दोन संपुर्ण वेगळ्या व्यक्ती असत. नंतरनंतर आजचा सवालमध्ये सतत प्रचंड आरडाओरडा करणे, प्रसंगी दादागिरी करणे, संतापल्याचा उत्तम अभिनय करणे, समोरच्याला अनेकदा बोलूच न देणे असले पत्रकारीतेत न बसणारे हातखंडे ते वापरू लागले. स्वत:ची एक दहशत निर्माण करण्यावर त्यांचा भर राहिला. टी.आर.पी.साठी आपण काहीही तडजोडी केल्या नाहीत, मालकांचे दबाव कायम झुगारले असं वागळे लेखात सांगत असले नी त्यांच्यावरचे सारे आरोप ते नाकारीत असले तरी अनेकदा ते श्रेष्ठ तडजोडी करीत असत हे गुपित जवळच्यांना माहित आहे. शिवसेना, ठाकरे, राणे, भु्जबळ ह्यांचे आणि वागळेंचे अतिव "सलोख्याचे" संबंध राहिलेत हे सारा महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्र स्वच्छ करण्याचं पेटंट एकहाती घेतलेल्या सनातनी छावणीतल्या एका बाईंना वागळे इतकं फुटेज देत की वागळे आता जरा दमानी घ्या असं म्हणायची पाळी आली होती. 
इतरांना कायम झोडपणारे, कस्पटासमान तुच्छ मानणारे वागळे सत्ताधारी जात संघटनांशी मात्र कसं नमून वागायचे, त्यांच्याशी जुळवून घ्यायचे त्याचे पुरावे देता येतील.
वागळे धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांना सामाजिक दृष्टी आहे. ते टीमकडून अनेक चांगले उपक्रम नी प्रसंगी उद्योगही यशस्वीपणे करून घ्यायचे. त्यांचा सवाल आणि ग्रेट भेट हे कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय होते. सामाजिक चळवळीतील लोकांना वागळेंचा आधार वाटतो.
पण या वागळ्यांच्या आवडी-नावडी कमालीच्या टोकदार प्रसंगी अतिरेकी असतात.
आयबीएनचे बस्तान उत्तम बसल्यानंतर वागळेंची देहबोली कमालीची बदलली. उग्र झाली. भाषा भडक नी अरेरावीची झाली. त्यांच्या वागण्यात बेदरकारपणा येत गेला. हे यश डोक्यात जाणे नव्हते काय? वागळेंना न आवडणारी दुसरी बाजू म्हणून काही असू शकते हेच ते नाकारू लागले होते. आपली खुर्ची त्यांना चढली, आपण म्हणजेच मिडीया, आपण म्हणजेच देश या अर्णवी वळणाकडे ते झुकू लागले. वागळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती काय?
अण्णा हजारे आणि वागळे ही उत्तुंग माणसं आहेत. पण त्यांना दोघांना ते एकटे सोडून बाकी सारे जग भ्रष्टच आहे याची खात्रीच वाटत असते.
वागळेंचे सल्लागार आणि प्रतिभावंत नाटककार विजय तेंडूलकर यांनी डॉ. य.दि.फडके, अरूण साधू व मी वसईला भाऊ पाध्ये यांना आम्ही भेटायला गेलेलो असताना वागळेंच्या स्वभावाचे नेमके आकलन मांडले होते. आज तेंडूलकर, फडके आणि साधू तिघेही आपल्यात नाहीत. अशावेळी ते त्यांचे खाजगीतले बोलणे इथे लिहिणे उचित होणार नाही.वागळेंच्या सवाल कार्यक्रमात प्रेक्षकांच्या एसेमेसची टक्केवारी सांगितली जात असे. टक्केवारीचा हा प्रकार म्हणजे एक निखळ विनोदी कार्यक्रम असे. वागळेंचे मत ज्या बाजूचे असेल त्याच मतांचे एसेमेस जास्त येत असत हा केवळ योगायोग असणार. नेमके किती एसेमेस आले ते मात्र कधीही सांगितले जात नसे. टक्केवारी फसवी असू शकते. अगम्य असू शकते. हेही प्रकरण ही बुवाबाजी होती की वस्तुस्थिती हे केवळ वागळेच जाणोत.
वागळ्यांच्या महानगर आणि आयबीएन लोकमतवर अनेक हिंसक हल्ले झाले, त्याचे पुढे काय झाले? त्याचा निकाल लागेपर्यंत वागळेंनी त्याचा पाठपुरावा केला काय? या हल्ल्यांचा खप वाढवण्यासाठी, टी.आर.पी.साठी, आपण किती लढाऊ पत्रकार आहोत ह्याची आक्रमकपणे जाहीरात करण्यासाठी उपयोग करून घेण्यात आला काय?
प्रश्न अनेक आहेत.
वागळेंचे हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. विशेषत: त्यांच्या पत्नीवरचा मीना कर्णिक यांच्यावरचा सुकून हा लेख जास्त महत्वाचा आहे. काही प्रमाणात आत्मपरीक्षण करणाराही आहे. सर्वांनी हे दोन्ही लेख अवश्य वाचावेत.
-प्रा. हरी नरके

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं?


आम्हाला शाळेत गोखलेसर गीता शिकवायचे.एकदा ते म्हणाले, मुलांनो सांगा, संजय उवाच नं सुरू होणारी गीता संजयानं आपलं प्रतिकूल मत देताच का संपली?
आम्हाला कोणालाच उत्तर देता आलं नाही.

सर म्हणाले, गीता कुठे संपते? संजय म्हणाला, "तर धृतराष्ट्रा, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ती बाजू [पांडवांची बाजू] जिंकणार असं माझं मत आहे."

मग काय झालं?

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर केलं.
" लेका, मीठ खातोस कौरवांचं नी विजय चिंततोस पांडवांना?"
त्याचा दुसरा भयंकर गुन्हा म्हणजे धृतराष्ट्रानं संजयाला ड्युटी काय सांगितली होती, तर तिकडे रणांगणावर काय चाललंय ते तेव्हढं सांगायचं. हा लेकाचा स्वत:ची मतं सांगायला लागला. तेव्हा गीता संपताना काय धडा शिकवते मुलांनो? आपण नोकरीत असताना, आपल्या मालकानं विचारलेलं नसताना, आपलं मत सांगू नये, अनाहुत सल्ला देऊ नये, खरं असलं तरी मालकाविरूद्ध बोलू नये! मात्र लगे हात उदात्तीकरण करीत राहावं."

गीतेच्या या शिकवणुकीचा फायदा आजचे सगळेच लोक्स अगदी कौरव पांडवही घेत असतात.

राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान मोलाचंच आहे. पण त्याचा दामदुप्पट परतावाही त्यांना जनतेनं एकहाती 50 वर्षे सत्ता देऊन केलेला आहे. मुद्दा एव्हढाच आहे की यशाचे मानकरी आपण असलात तर दुर्गतीचे अपश्रेयही तुम्हालाच घ्यावे लागेल ना? तुमच्या यांव केलं नी त्यांव केलं ह्या मार्केटिंगचा उबग आलाय. 80 टक्के समाजकारण नी 20% राजकारण हा तुमचा दावा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही 24 बाय 365 केलंत ते  फक्त 200 टक्के राजकारण. तुमची दुसरी बाजूही कळू द्या ना जनतेला!
नरूभाऊ दाभोळकरांची अमाणूस हत्त्या झाली. तुम्ही पुण्यावर लादलेला पोळ गुन्ह्याचा तपास करायचं सोडून प्लॅंचेट लावत बसला होता. सलग 15 वर्षे गृहखाते तुमच्या हातात असूनही गुन्हेगार तुम्ही शोधलेच नाहीत. परिणामी आणखी तीन हत्त्या झाल्या.

मालक, कोणाकोणाची जात सार्वजनिक व्यासपीठावर उद्धरतात, प्राचीन साहित्य नी संशोधन संस्था जाळणारांचं औरंगाबादच्या अ.भा.म.साहित्य संमेलनात जाहीर समर्थन करतात, एखाद्याचं इतिहासलेखन पटत नसेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्काराचे आपल्या चंपकांमार्फत वाभाडॆ काढतात, केव्हढी ही सहिष्णुता! केव्हढं हे निकोप अभिव्यक्तीचं प्रेम.

टिकाकार आणि विरोधकांकडे बघायची मालकांची दृष्टी इतकी व्यापक की अग्रलेख लिहिला म्हणून कुमार केतकरांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या जिवलग स्वपक्षीयांना ह्यांनी शब्दानं किरकोळ विरोध करीत पण कृतीनं मात्र पक्षात बढती दिली, यालाच म्हणतात लेखन स्वातंत्र्याबद्दलचा आदर!

एका शाळकरी मुलीनं एका नेत्याबद्दल फेसबुकवर काय लिहिलं तर यांच्याच राज्यात तिला ताबडतोब अटक करण्यात आली, तिच्या मदतीसाठी यांनी सेल काढला होता काय? ती स्वजातीय-स्वचाकरीतली असती तर विचार केलाही असता म्हणा.

एक संपुर्ण समाज दंगली घडवून जाळून किंवा कापून मारा असं पुस्तक लिहिणारांचे सत्कार हे मालक स्विकारतात आणि त्यांनीच आजवर खरा इतिहास महाराष्ट्राला शिकवला असा ताम्रपटही त्यांना  बहाल करतात, किती ही वैचारिक सहिष्णुता!

हजारो निरपराध्यांचं धार्मिक हत्त्याकांड करणारांना यांनी आपली सत्ता वापरून संरक्षण पुरवलं असा आरोप यांच्यावर अनेकदा झालाय. त्याची गुरूदक्षिणा ते खातायत.

यांची सेक्युलरनिष्ठा इतकी पक्की की निवडणुकीचे निकालही लागले नव्हते तर हे सच्च्या "सेक्युलरांना!" सत्तेसाठी पाठींबा देऊन मोकळे झाले.

अशा साक्षात दंतकथाच असलेल्या इतिहासपुरूषांचं जे उदात्तीकरण करणार नाहीत ते केवळ B/W चित्रण करणारेच म्हटले पाहिजेत. हाच आवाज आहे अवघ्या महाराष्ट्राचा!
- प्रा.हरी नरके

Wednesday, October 18, 2017

दारू नी जुगारात सगळं गेलं-


खोपोलीला एसटी बस चहाला थांबली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यात अमाप खड्डे असल्यानं बहुतेक पॅसेंजरांची हाडं एव्हाना खिळखिळी झालेली होती. ते 1991 मधले दिवाळीचे दिवस होते. थकलेले प्रवासी खाली उतरले. दिवाळीच्या सुट्ट्या चालू असल्यानं गाडीला बरीच गर्दी होती. चहा पिताना माझ्या लक्षात आलं, समोरचा एक माणूस पुन्हापुन्हा माझ्याकडे बघत होता. मलाही त्याचा चेहरा परिचयाचा वाटत होता. पण नाव काही आठवत नव्हतं. त्याच्या चेहर्‍यावर दाढीचे खुंट वाढलेले होते. डोक्यावरचे केस अनेक महिने कापलेले नसावेत. त्याला तेलही लावलेले नसणार. मळलेला पायजमा, अंगातला शर्ट बर्‍याच ठिकाणी फाटलेला. एकूण अवतार कळकट्ट होता. त्यानं माझ्याजवळ येऊन थेट विचारलं, " काय मग ओळखलं का मला? अरे हरी, मी अण्णा. मुंढव्याच्या शाळेत आपण एका वर्गात होतो." आणि मला त्याची ओळख पटली. हा अण्णा एका बागायतदार कुटुंबातला होता. श्रीमंत असामी. त्याचं आजचं हे दारिद्र्य आणि आजार्‍यासारखा दीनवाणा चेहरा बघून मला कळवळायला झालं.
त्याच्या पेरूच्या बागांमध्ये आम्ही शनिवारी दुपारी शाळा सुटली की जाऊन पोटभर पेरू खायचो. त्याच्या फुलांच्याही बागा होत्या. तेव्हा मोगरा, गुलाब, झेंडू, तेरडा, गुलछडी तोडायच्या कामावर त्याच्याकडे अनेक मजूर असायचे. मीसुद्धा एखाद्या रविवारी सकाळी त्याच्या शेतात जाऊन रोजानं मोगरा तोडायचो. अनेक मुलं, बायका तिकडं काम करीत असत. दररोज किमान  चारपाच पोती मोगरा नी ही फुलं टेंपो किंवा ट्रकनं पुण्याच्या मार्केटला पाठवली जायची. मला मोगर्‍याचा तो घणदाट सुगंध फार आवडायचा. टोपलीभर मोगरा तोडला की त्याचे वीस पैसे मिळायचे. एकेकाळचा हा लक्षाधीश मित्र आज वीसेक वर्षांनी भेटला तो अशा विपन्नावस्थेत.
आमच्या दोघांच्या चहाचे पैसे मी दिले आणि आम्ही दोघेही बसमध्ये येऊन बसलो. त्याला ही गरीबी कशी काय आली हे मला त्याला विचारायचं होतं. पण तो मलाच कायकाय विचारत होता. त्यात हा प्रश्न विचारायचं जमतच नव्हतं.
मध्ये थोडी सापट सापडताच मी त्याला विचारलं, इकडं कुठं गेला होतास?
तो म्हणाला, आजारी असल्यानं ट्रीटमेंटसाठी टाटा हास्पीटलला गेलो होतो. मी चरकलो. इतक्या तरूण वयात त्याला कॅन्सर झाला असणार. खुपच वाईट वाटलं. माझ्याशी बोलत असताना
तो सारखा एस.टी.च्या सामान ठेवलेल्या जागेकडे बघायचा. त्या सामानाकडे, विशेषत: एका फाटक्या पोत्याकडं तो अधूनमधून बघतोय हे माझ्या लक्षात आलं. त्या पोत्याला बराच चिखल लागलेला दिसत होता. बोचकं चांगलं मोठं होतं. त्यात कायय एव्हढं? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, माझे काही कपडे, औषधं आणि दिवाळीसाठी मुलांना घेतलेले फटाके नी थोडासा खाऊ आहे.
अण्णा, तुझी आर्थिक परिस्थिती तर चांगली होती रे, मग असं अचानक काय झालं?
तो, म्हणाला, काय विचारू नकोस. दारू नी जुगारात सगळं गेलं.
पुणे स्टेशनला एस.टी. पोचल्यावर आम्ही एसटीतनं उतरलो. त्यानं ते कळकट्ट बोचकं घेतलं नी तो मला हळू आवाजात म्हणाला, तू कुठं राहतोस. मी म्हटलं, कोथरूडला. तो म्हणाला मला खराडीला जायचंय. थोडं उलटं पडेल पण मी तुला सोडतो. मला काय कळेना, हा फाटका माणुस रिक्षानं जाणार आणि तेही मला कोथरूडला सोडुन त्याला परत पुणे स्टेशनला यावं लागणार. कारण नसताना रिक्षाचा खर्च वाढणार. मी म्हटलं, अरे नको. मला डायरेक्ट बस आहे. तू त्रास घेऊ नकोस अण्णा.
तू कसा जाणारेस? बसनं की रिक्षानं?
तो म्हणाला, पार्कींगमध्ये माझा ड्रायव्हर गाडी घेऊन आलेला असेल.
मी चकीत झालो. ड्रायव्हर, गाडी, मी ऎकतच राहिलो.
म्हटलं, लेका चेष्टा करतोस काय रे? तो म्हणाला, चल तुला गाडीत बसल्यावर सगळं खरं सांगतो.
त्याची टोयोटा घेऊन त्याचा ड्रायव्हर समोरच आला. आम्ही दोघं बसलो. ते पोतं अण्णानं जपून शेजारच्या सीटवर ठेवलं. मी म्हटलं, हे काय हिंदी सिनेमासारखं चाललंय तुझं?
तो म्हणाला, मी आजारीबिजारी काही नाहीये. दारूला मी शिवतही नाही नी जुगाराचा तर प्रश्नच नाही.
अरे, आपली सगळं फुलं आपण डायरेक्ट बॉम्बे मार्केटला पाठवतो. मी महिन्यातून एकदा वसुलीला जातो. टोटल कलेक्षन सातआठ लाखाचं अस्तंय. फाटके कपडे, वाढवलेली दाढी,केस, चिखलाचं पोतं हे बोचकं हे सारं नाटक करावं लागतंय बाबा. मागे एकदा टोयोटानं पैसे घेऊन येताना घाटात एका टोळीनं अडवून लुटलं. तेव्हापासून मी एसटीनंच मुंबईला जातोयेतो. पोत्यामुळं नी या फाटक्या मळक्या कपड्यांमुळं कोणालापण डाऊट येत नाही.
मला सांग, मी तुला हे सांगेपर्यंत तुला तरी डाऊट आला होता का? की अण्णा सात लाख रूपये या बोचक्यातून घेऊन चाललाय म्हणून?
मी म्हणलं, लगा पण माझी फिरकी घ्यायची काय गरज होती?
तो हसला नी म्हणला, बाबा, आजुबाजुचे पॅसेंजर ऎकत असतात आपलं बोलणं. फुगीरी लय म्हागात पडतीया. गरिबीनं राह्यलं की सेफ अस्तंय. येडा बनके पेढा खानेका. क्या? आणि त्यानं त्याच्या फाटक्या पायजम्याच्या खिशातनं पिस्तूल काढून माझ्या हातात दिलं. ते भलतंच वजनदार होतं.
-प्रा. हरी नरके

सांगण्यासारखं एव्हढंच आहे-

दिवाळी अंकाबद्दल -
"या दिवाळी अंकाचा कागद उत्तम आहे. छपाई मोहरेदार आहे. सजावट आणि इतर निर्मितीमुल्यं दर्जेदार आहेत. तसं या दिवाळी अंकाबद्दल सांगण्यासारखं एव्हढंच आहे." एका मोठ्या दैनिकाचे संपादक टेल्कोच्या कलासागर दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. गंमत म्हणजे त्यांनी मारलेला हा टोला लक्षात न आल्यानं आमच्या अधिकार्‍यांनी त्यावर जोरदार टाळ्या वाजवल्या.
टेल्कोच्या वतीनं दरवर्षी दिवाळी अंक काढला जायचा. त्याचा प्रकाशन सोहळा भपक्यात साजरा केला जायचा. मोठमोठ्या लेखक,संपादक, नेत्यांना प्रकाशन समारंभाला निमंत्रित केलं जायचं. आमचे काही उत्साही अधिकारी आणि कामगार यांच्या हौशी लेखनाचा त्या अंकात समावेश असायचा. पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला पु.ल. आलेले. नेहमीप्रमाणेच त्यांचं भाषण अप्रतिम झालं. या उपक्रमाचं कौतुक करून ते बोलले ते जे. आर.डी. टाटा, टाटा संस्कृती, लिलाताई आणि सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल. मी तेव्हा टेल्को होस्टेलमध्ये राहत होतो. पुलंनी आपल्या भाषणात स्वरूपाताई नी माझा अतिशय गौरवानं उल्लेख केलेला. त्यामुळे मॅनेजमेंटमधल्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा आमच्याकडे बघायचा दृष्टीकोन 180 कोनात बदलला.
हा अंक पहिलटकरणीच्या बाळंतपणासारख्या कौतुक सोहळ्यात तयार व्हायचा. एखादा चांगला लेख, दोनचार बरे आणि उरलेले कचरा असे साहित्य त्यात असायचे. त्याचं कारण संपादक चौकडीचं मुळात साहित्यभान शाळकरी होतं. एखादा बरा वाचक आणि उरलेले केवळ अधिकारी असल्यानं संपादक बनलेले असायचे. ते चतुर असल्यानं त्यांना आमची आठवण प्रकाशनाला मोठा लेखक,संपादक,अभिनेता बोलवतानाच यायची. बाकी आमच्यासारख्या इतरांना संपादकीय टिमचे दरवाजे कायम बंद असायचे.
आमचे एक एच.आर. मॅनेजर अतिशय चापलूस होते.त्यांची एक सवय होती. दरवेळी प्रस्तावना करताना ते एक किस्सा सांगायचे. म्हणजे ते प्रमुख पाहुण्यांना सांगायचे बघा, तुम्ही आमच्या कामगारात प्रचंड लोकप्रिय आहात. कालपरवाच एका कामगाराला तुमचं पुस्तक मशीनवर वाचताना सुपरवायझरनं पकडलं. एरवी आम्ही त्याला मेमो दिला असता पण तो तुमचं पुस्तक वाचतासल्यानं आम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही. प्रमुख वक्ते जाम खुष व्हायचे.
अर्थात दरवेळी चालून जाणारी ही खेळी एकदा त्यांना चांगलीच भोवली. माधव गडकर्‍यांना त्यांनी हा हातखंडा किस्सा सांगितल्यावर माधवराव म्हणाले, अरे वा, काय सांगताय? मला त्या कामगाराला भेटायचंय.
धावाधाव करून युनिफॉर्ममधला एक कामगार हजर केला गेला. माधवराव चहा घेताघेता त्याच्याशी अतिशय आपुलकीनं बोलले. कामगार, अधिकारी खुष झाले. माधवराव गाडीत बसले. नी माधवरावांनी त्याला जवळ बोलावलं. म्हणाले, आभारीए. या एकदा लोकसत्तेत. बाय द वे माझ्या त्या पुस्तकाचं नाव काय होतं?
कामगार गडबडला. तोवर तो पढवलेला कामगार माधव गडकर्‍यांच्या पुस्तकाचं नाव विसरून गेला होता. तो नेटानं म्हणाला, "एकच प्याला!" माधवराव हसले. म्हणाले, छानय. चालू द्या तुमचं! एकच प्यालाचे लेखक राम गणेश गडकरी 1920 ला स्वर्गात गेले बरं का!"
एकदा तर आणखीच गम्मत झाली. हा किस्सा कार्यक्रमात सांगून झाला. प्रमुख वक्ते काही खुष झालेले दिसले नाहीत. त्याचं कारण एच.आर. साहेबांना नंतर कळलं. वक्ते आपल्या  भाषणात म्हणाले, तुमचे कामगार माझं पुस्तक वाचतात म्हणजे थोरच असले पाहिजेत. फक्त बारीक अडचण एव्हढीच आहे की माझं एकही पुस्तक प्रसिद्ध झालेलं नाही."
टेल्कोत लिलाताई मुळगावकरांमुळे दर महिन्याला रक्तदान शिबीर व्हायचं. आमचे शेकडो कामगार दर चारसहा महिन्यांनी रक्तदान करायचे. पुल गंमतीनं लिलाताईंना रक्तपिपासू बाई म्हणायचे. लिलाताईंनी आमच्यात रक्तदान संस्कृती रूजवली.
माझ्याकडं नियमित रक्तदान केल्यानं पुण्यातल्या तिन्ही रक्तपेढ्यांची कार्डं होती. नात्यात, ओळखीत कोणालाही रक्ताची गरज पडली की आम्ही धावून जायचो.
एकदा माझ्या वहीनींचा फार मोठा अपघात झाला. खुप रक्त गेलं होतं. शिवाजीनगरच्या हर्डीकर हॉस्पीटलमध्ये त्यांना भरती केलेलं होतं. रक्त भरावं लागेल असं डॅाक्टरांनी सांगितलं. आमच्या नातेवाईकात तोवर रक्तदानाबद्दल प्रचंड भिती होती. मी म्हणलं, तुम्ही माझ्यावर सोडा. पण वहिनींच्या रक्तगटाचं दोन रक्तपेढ्यात शॉर्टेज होतं. के.ई.एम.वाले म्हणाले, रक्त मिळेल पण तुम्ही कार्ड असलं तरी रक्तदान करा नी ही बाटली घेऊन जा.
मी दिवसभर पहिली पाळी करून मग हडपसरवरून सायकलनं के.ई.एम.ला गेलो. रक्तदान केलं. त्यांनी दिलेला चहा प्यायलो पण घाई असल्यानं बिस्कीटं खिशात ठेवली नंतर खाऊ म्हणून. सायकल मारत हर्डीकरला पोचलो. सायकल लावताना थोडंसं गरगरल्यासारखं वाटायला लागलं. रक्ताची बाटली डॅाक्टरांच्या हातात देताना मी कोसळलो. मला तिथंच अ‍ॅडमिट करावं लागलं. शुद्धीवर आल्यावर मी डॅाक्टरांना विचारलं, ती रक्ताची बाटली माझ्या हातून पडून फुटली काहो? ते म्हणाले, " नाही. बाटली माझ्या हातात दिल्यावरच तू पडलास. काय झालं होतं? काही आजार आहे का? चक्कर का आली? तुझी शुद्धच गेली होती. जेवला नव्हतास का?"
मी सगळा प्रकार सांगितल्यावर ते म्हणाले, " रक्तदान केल्यावर असं सायकलींग करू नये बाबा. थोडक्यात वाचलास. दवाखाण्यात होतास म्हणून आम्ही इमर्जन्शी ट्रीटमेंट देऊ शकलो. रस्त्यात पडला असतास आणि मागून येणार्‍या एखाद्या वाहनाखाली......"
- प्रा. हरी नरके

प्रमोद मांडे- एक समर्पित संशोधक


टेल्कोच्या नोकरीतनं मला जी अतिशय अस्सल बावन्नकशी आणि अव्वल प्रतिभावंत माणसं मिळाली त्यात प्रमोदचं स्थान पहिलं होतं. प्रमोदचं जाणं माझ्यासाठी आरपार दु:खद आहे.
प्रमोद 24 तास 365 दिवस गडकिल्ल्यांमध्ये, आकाश दर्शनात आणि इतिहास संशोधनात रमलेला असायचा. आम्ही 21 वर्षे टेल्कोत एकत्र काढली. प्रमोद भीडभाड न ठेवणारा नी अतिशय स्पष्टवक्ता होता. कमालीचा मनस्वी. एखाद्याला स्विकारलं तर त्याच्यावर जीव ऒवाळून टाकायचा. चिडला तर मात्र मग खैर नाही. कोणतीही गोष्ट हात राखून करणं त्याला साफ नामंजूर होतं. आम्ही कंपनीत आठ तासाच्या काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकत्र गप्पा मारत असू. वाचन, गप्पा, अखंड भ्रमंती हे जगणे. जेवायला जातायेताना तर आम्ही हमखास बरोबर असू. आम्ही दोघेही मुळचे वेल्डर कम गॅस कटर. त्यामुळंच बहुधा इतिहास नी वर्तमान हा भविष्याशी जोडायचा छंद दोघांनाही होता. तो आधी सोमवारात 15 ऑगष्ट चौकात एका खोलीत राहायचा.मी खुपदा त्याच्या घरी जायचो.
प्रमोद पहिल्यांदा शिवसैनिक होता. त्याच्या अतिव आग्रहाखातर मी एकदा त्याच्याबरोबर दसर्‍याला शिवाजी पार्कवरच्या शिवसेनेच्या मेळाव्यातले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऎकायला सुद्धा गेलो होतो. छत्रपती शिवाजी राजे नी बाळासाहेब हे त्याचे विक पॉईंट.
तो अजमेरा कॉलनीत राहायला आला तेव्हा माझ्या अगदी शेजारच्याच इमारतीत राहायचा. तो नियमितपणे घरी सामना घ्यायचा. एकदा त्याच्या घरी गेलो असताना सामना दिसला नाही. मी म्हटलं कारे बंद केलास की काय सामना? म्हणाला,हो रे. दोन दोन पेपर परवडत नाहीत.
म्हटलं, दोन दोन कशाला घ्यायला हवेत?
तो म्हणला, अरे बाबा, आजकाल सामनातल्या बातम्या खर्‍या की खोट्या ते शोधायला दुसरा पेपर घ्यावा लागतो ना, त्यापेक्षा डायरेक्ट दुसराच घेतलेला काय वाईट?
प्रमोद तसा अतिशय फटकळ. शिवसेनेच्या गारूडातून लवकरच तो बाहेर पडला. शिवरायांच्या प्रेमात मात्र कायम आकंठ बुडालेला राहिला.
18 डिसेंबर 2016 ला त्याच्या वाढदिवसाला मी त्याच्या फेसबुकवर लिहिलं. त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला किती मनापासून आनंद झाला. तो त्यानं व्यक्तही केला. तो मला "माझा प्राचीन काळापासूनचा मित्र " असं म्हणायचा.
मी लिहिलं होतं, 
"प्रमोद मांडेसर,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
जीवेत शरद: शतम!
एक जबरदस्त उत्साही आणि समर्पित माणूस आहेत मांडेसर. लय भारी.
मी त्यांना गेली 38 वर्षे ओळखतो.
तुमच्या बरोबर टेल्कोत शेकडो वेळा मारलेल्या गप्पा आज आठवतात.
सर, तुमच्या स्कुटरवर मागे बसून म.सा.प. निवडणुकीत केलेला प्रचार,प्रवास आठवतो.
करपे वाडा, 15 ऑगष्ट चौक ते अजमेरा कॉलनी येथील त्यांच्या घरी झालेल्या असंख्य भेटी स्मरतात.
बालगंधर्व कला दालनातील त्यांची शहीदांवरील प्रदर्शनं, अभ्यासपुर्ण भाषणं, जोरकस युक्तीवाद यांचा मला लाभ झालाय.
माझ्या अनेक कार्यक्रमांना, भाषणांना आवर्जून उपस्थित राहून त्यांनी दिलेली दाद मला बळ देऊन गेलीय.
किल्ले, ट्रेकिंग, शिवराय, सह्याद्री, तारांगण आदींचे चालतेबोलते विद्यापिठ म्हणजे मांडे सर. त्यांचे लेखन संदर्भमुल्य असलेले भरिव लेखन आहे.
त्यांच्याबरोबर एका साध्याश: ट्रेकला मला यायचंय, अशी इच्छा मी व्यक्त केल्यावर त्यांनी मला ट्रेकला नेले. पावसाळा, अमावस्येची भीषण रात्र, सह्याद्री, जमीन निसरडी आणि माझा पहिला ट्रेक सरांसोबत. लिंगाणा!
केवळ अविस्मरणीय.
चालताना साधारणपणे अडीच हजार वेळा घसरून आपटलो.
पुढची सहा महिने दररोज रात्री झोपलो की लिंगाण्यावरून मी खाली दरीत पडतोय अशी स्वप्नं मला पडत होती.
माझा आयुष्यातला तो पहिला ट्रेक
आणि अर्थातच शेवटचा. [ गंमत सोडा ]
मित्रा, यशवंत झालास, किर्तीवंत झालास. आणखी मोठा हो.
असा मित्र मला मिळाला, ज्याचा मला अभिमान वाटतो."
तेव्हा माहित नव्हतं, हा गडी आपल्याला असं मध्येच सोडून जाणार आहे.
मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. माझा मतदारसंघ खुप मोठा होता. प्रमोद अनेकदा त्याची स्कूटर काढायचा आणि मग त्याच्यासोबत मी प्रचाराला जायचो. मतदारांना भेटून तो ह्याला मत द्यायचं बरं का असं आग्रहानं सांगायचा. त्याचे शेकडो फॅन्स होते. एक माजी खासदार त्याचे चाहते होते. ते पहिलवान होते. स्टार्चचं धोतर, टोपी, कोल्हापुरी चपला, गंधाचा टिळा असा जोरदार मामला. या प्रचारादरम्यान त्यांची अचानक भेट झाली. प्रमोदनं त्यांची माझी ओळख करून दिली. निवडणुक म्हणताच ते म्हणाले, " तुम्ही एक काम करा. मतदारांची मला एक लिस्ट द्या. आपुण त्यांना उचलून डायरेक्ट आमच्या साखर कारखाण्याच्या गेस्ट हाऊसवर नायतर एखाद्या रिसॉर्टवर नेऊन ठेऊ. नरकेसर, काय काळजी करायची नाय. मांडेसाहेबांचे तुम्ही मित्र म्हणल्यावर म्या समदं इलेक्शान हातात घेतो मायला. आपल्याला लई अनुबाव हाय."
प्रमोद म्हणाला, " नाय नाय, तुम्ही यात पडू नका. हे वेगळं प्रकरण आहे. अशानं मामला बिघडून जाईल सगळा." ते नाराज झाले. म्हणाले, " काय राव. परचेसिंग नाय, टेंडर नाय, बजेट नाय असल्या फुसक्या इलेक्षणला तुम्ही लोकांनी उभारलाच कशाला?"
तो माझ्या भाषणांना आवर्जून यायचा. शिवाजी मराठामधल्या एका भाषणात मी शिवरायांच्या काही पत्रांवर बोललो होतो. महाराजांच्या एका पत्रात त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला कसे खडसावले होते त्याचा महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे त्याची चर्चा केली होती.
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" असं महाराज सुनावतात हे संदर्भासहीत मी स्पष्ट केलं.
कार्यक्रम संपल्यावर प्रमोद मला म्हणाला, हरी, तू दिलेला संदर्भ बरोबर आहे. पण तुमच्याबाबतीत तुम्ही केवळ ब्राह्मण आहात म्हणून मी कसलीही सवलत देणार नाही, मुलाहिजा, पर्वा करणार नाही असं महाराज का म्हणतात? कारण त्याकाळात सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मण म्हणून विशेष वागणूक मिळत असणार असं तुला वाटत नाही का?"
त्याचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायचं. तो जातीपातीच्या भावनेला मूठमाती दिलेला फार मोठ्या जिंदादिल मनाचा माणूस होता. वक्ता नी इतिहासकार होता.
प्रमोदनं लिहिलेली सगळीच पुस्तकं महत्वाची आहेत-
1. स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका,
2. गडकिल्ले महाराष्ट्राचे,
3. स्वातंत्र्य संग्रामातील समिधा,
4. स्वातंत्र्य संग्रामातील अंगार,
5. सह्याद्रीतील रत्न भांडार,
6. 111 क्रांतिकारकांचे संक्षिप्त जीवन.
प्रमोदचं वक्तृत्व अमोघ होतं. त्यानं हजारो भाषणं दिली.
अभ्यासकांची,ट्रेकर्सची, गडकिल्ले प्रेमींची पिढी घडवली. त्याला उत्तम स्मरणशक्ती लाभलेली होती. अर्थात सतत किल्ल्यांवर फिरण्यात आणि सह्याद्रीच्या भटकंतीत त्याच्या शरीराची खुप आबाळ झाली. तो बेदरकार असायचा. गडकिल्ले हाच श्वास होता.
माझी मुलगी प्रमिती लहान असताना एकदा प्रमोदसोबत सिंहगडावरील एका मोहिमेत सहभागी झाली होती. प्रमोदनं दाखवलेला किल्ला, रात्री घडवलेलं तारांगण दर्शन, त्याचं चित्रशैलीतलं इतिहास कथन यानं ती इतकी भारावून गेली की तिला त्या कार्यक्रमाच्या आठवणी एव्हढी वर्षे उलटून गेली तरी आजही लख्ख आहेत.
प्रमोद, लगा, तू फार मोठ्या ट्रेकला एकटाच पुढं निघून गेलास हे काय तू बरोबर केलेलं नाय गड्या! हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाय!
- प्रा.हरी नरके

Sunday, October 15, 2017

चांदोबा

शाळेशेजारच्या कटींग सलूनमध्ये सकाळ,प्रभात,केसरी ही वर्तमानपत्रं यायची. पहिली दुसरीत असताना मी मोठ्यानं वाचायचो. ते काका स्वत: निरक्षर होते, पण गिर्‍हाईकांसाठी ते पेपर घ्यायचे.मी मोठ्यानं वाचत असल्यानं त्यांनाही बातम्या समजायच्या.एखाद्या दिवशी मी गेलो नाही तर ते चौकशी करायचे. एकदा ते म्हणाले, असं करू, तू दररोज येऊन दुपारच्या सुट्टीत मला पेपर वाचून दाखवायचा त्याच्या बदल्यात मी तु्झ्या कटींगचे पैसे घेणार नाही. हे अगदी भारी जमलं. कटींगच्या वाचलेल्या पैशातून मी चांदोबा घ्यायचो. एका रद्दीच्या दुकानात जुने चांदोबा वजनावर मिळायचे. तिथे काही जुनी पुस्तकंही मिळायची.राजपुत्र ठकसेन, हिमपरी आणि सात बुटके, शेपटीचा शाप, विक्रम आणि वेताळ असली तेव्हा विकत घेतलेली पुस्तकं छान कव्हर घालून त्यावर नाव, सही करून ठेवलेली. दीपावलीचा पहिला दिवाळी अंक तिथेच मी विकत घेतला. आजही तो जपून ठेवलेला आहे. ग्रंथालयांना पुस्तकदुकानात सवलत मिळते म्हणून चौथीत असताना मी घरातल्या ग्रंथसंग्रहाला अभिनव ग्रंथालय असं नाव दिलं. त्याचा एक रबरी शिक्का बनवून घेतला. त्यातून खरेदी केलेला पहिला समग्र लेखक म्हणजे राम गणेश गडकरी. नारायण पेठेतल्या रम्यकथा प्रकाशनाच्या मेहेंदळेंनी तेव्हा आगावू नोंदणी केल्यास हा संच निम्म्या किंमतीत दिला होता.
तर हा गडकरी संच खरेदी करायचा म्हणून नेहमीच्या दोन नोकर्‍यांव्यतिरिक्त जादा काम काय करता येईल याचा शोध चालू होता. आजुबाजूच्या शेतांच्या बांधावर मस्त गवत वाढलेलं असायचं. एकदा माझी मावशी आमच्याकडं आलेली असताना तिला म्हणलं, येतेस का आपण गवताचे भारे कापून नेऊन बाजारात विकूया. भरपूर कमाई होईल.ती आली. तिचा भारा मोठा असल्यानं त्याचे बारा आणे आले. माझा अगदीच लिंबूटिंबू असल्यानं चार आणे आले. आता हे पैसे साठवायचे आणि नारायण पेठेत जाऊन गडकरी समग्र संच घ्यायचा. घरी गाडग्या मडक्यांची उतरंड असायची.त्यात कडधान्यं आणि इतर कायकाय ठेवलेलं असायचं. मी त्यातल्या मधल्या गाडग्यात पैसे साठवायचो.
तर घरी आल्यावर आईला मोठ्या कौतुकानं सांगितलं, गवताचे पैसे आल्याचं. तिला गडकरी कोण हे काय माहित नव्हतं,पण पुस्तकं लिहितो म्हणजे असेल कोणीतरी मोठा माणूस. तिला ते चार आण्याचं नाणं दाखवावं म्हणून चड्डीच्या दोन्ही खिशात शोधलं. शर्टाचा खिसा उलटा करून बघितला. चार आणे काही सापडेनात.मला खूप रडू यायला लागलं. मावशी म्हणाली, जाऊ दे,रडू नकोस. हे माझ्याकडचे घे. पण मला माझ्याच कमाईचे चार आणे हवे होते. मी परतपरत शोधत राहिलो.
परत पैसे हरवल्याचा प्रचंड संताप आला.विनोदी प्रकार म्हणजे, चार आणे ते काय पण मी त्यासाठी वेडापिसा होऊन घराच्या भिंतीवर स्वत:चं डोकं आपटलं. चांगलंच टेंगूळ आलं. पण एक फायदा झाला. डोकं आपटतच डोक्यावरची टोपी खाली पडली आणि चार आण्याचं नाणं खानकन आवाज करीत टोपीतून बाहेर आलं.
सापडले, सापडले, माझे चार आणे सापडले, म्हणून किती उड्या मारल्या असतील त्याची गणतीच नाही.
पहिलीत असताना बालभारतीचं पुस्तक नव्वद पैशांना मिळायचं.आईनं एक रूपया दिला होता. उरलेले 10 पैसे जपून आण म्हणुन बजावलं होतं.
मी ते 10 पैसे खुप जपून ठेवले होते.
शेवटचा तास खेळाचा होता. शाळेच्या वाळूच्या ढिगावर आम्ही पोरांनी एव्हढ्या उड्या मारल्या, कायकाय खेळ केले की तास संपल्यावर लक्षात आलं आपले 10 पैसे गायब झालेत. वाळूत खुप शोधलं, पण उपयोग झाला नाही. त्यादिवशी खुप रडलो. आईनंही खुप मारलं.
पैसे हरवल्याची आठवण कायम राहावी यासाठी स्वत:ला शिक्षा करायची म्हणून खेळात माझं मन रमेनासं झालं.
तिथून पुढं इतर मुलं खेळत असायची तेव्हा मी वाचत बसायचो. 1969 साली त्या दिवशी खेळणं जे बंद झालं ते कायमचं. त्यानंतर मी कधीही कसलाही खेळ खेळलो नाही. मला कोणताही खेळ येत नाही. अगदी गोट्या, विटीदांडू, लंगडी, कबड्डी, खोखो, क्रिकेट कोणताही नाही.
-प्रा.हरी नरके 

पु.लं.नी मिळवून दिलं कार्ड-

माझ्या शालेय जीवनात मला लाभलेल्या चार शिक्षकांनी मला घडवलं. मुंढव्याच्या मनपा शाळेतले ल.रा. वाडेकर, पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयातल्या सौ.सुचेता श्रीकांत निंबवीकर, सौ.मालती माधव भाटे आणि कृ.पं. देशपांडे या चौघांचा माझं वाचनवेड वाढवण्यात फार मोठा वाटा आहे.
निंबवीकरबाई आम्हाला हिंदी शिकवायच्या. त्यांच्या घरी प्रेमचंद आणि इतर हिंदी लेखकांची मोठी ग्रंथसंपदा होती. त्या ती पुस्तकं मला वाचायला द्यायच्या. त्यांच्यामुळेच शाळेत असतानाच माझा आख्खा प्रेमचंद वाचून झाला होता.
भाटेबाई ईंग्रजीच्या तर देशपांडेसर मराठीचे. या भाषा शिक्षकांनी मला या तिन्ही भाषांची अपार गोडी लावली. यांनी सार्‍यांनी मला आपल्या पोटच्या मुलांसारखंच वाढवलं. मायेनं शिकवलं. संस्कार केले. खर्‍या अर्थानं माणूस म्हणून घडवलं.
भाटेबाई विश्रामबाग वाड्यातील शासकीय ग्रंथालयाच्या सदस्य होत्या. या ग्रंथालयात लाखो पुस्तकं आहेत आणि त्याचं सदस्यत्व मोफत मिळतं. त्यामुळे त्याला हजारोंची प्रतिक्षासुची असते. भाटेबाई त्यांचं कार्ड मला देत असत. या ग्रंथालयात बसून वाचण्याची उत्तम सोय होती. दररोज संध्याकाळी शाळा सुटली की मी तिथं जाऊन वाचत बसायचो. नोट्स काढायचो.
तिथले मुख्य ग्रंथपाल श्रीकृष्ण उजळंबकर हे स्वत: मोठे लेखक होते. ते नेहमी मला बघायचे. मी कोणती पुस्तकं वाचतोय त्याची विचारपूस करायचे. मला त्यांनी सभासदत्व द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. ते म्हणाले, आपण विद्यार्थ्यांना सभासदत्व देत नाही. पण मी खास बाब म्हणून तुला नक्की देईन. दोन महिन्यांनी मला भेट.
नंतर वार्षिक परीक्षेच्या गडबडीत त्यांना भेटता आलं नाही. मी त्यांना जेव्हा भेटायला आणि चौकशीला गेलो तोवर ते निवृत्त झाल्याचं मला सांगण्यात आलं. नव्या आलेल्या संचालकांना मी भेटलो. त्यांनी मला हुसकावून लावलं. माझं काहीएक ऎकुणच घेतलं नाही.
एकदा पु.ल.देशपांडे यांच्या भेटीत मी हा विषय त्यांच्या कानावर घातला. ते म्हणाले, त्यांना कायकाय कागदपत्रे हवीत त्याची माहिती घे नी मला सांग. तिकडे नोकरीचं प्रमाणपत्र हवं होतं. मी सकाळी कबरस्थानात आणि रात्रपाळीला एका पोल्ट्रीत काम करायचो. पण तिथले मॅनेजर म्हणाले, तू बालकामगार असल्यानं आम्ही अडचणीत येऊ. प्रमाणपत्र देता येणार नाही.
मी पु.लं. ना ही अडचण सांगितली. त्यांनी त्यांचे मित्र सुप्रसिद्ध उद्योगपती नंदा नारळकर यांना फोन केला. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काम केलेलं असल्यानं नारळकर मला ओळखत होते. शिवाजीनगरचं महाराष्ट्र बॅंकेचं मुख्यालय आणि बालगंधर्व पुल ही बांधकामं केलेले नारळकर. त्यांनी त्वरीत तसं प्रमाणपत्र मला दिलं. पण नवे ग्रंथपाल म्हणाले, पार्टटाईम काम याला मी नोकरी मानत नाही. तुला सभासदत्व मिळणार नाही. चल निघ.
एकुणात खडूस माणुस. कार्पोरेशनमध्ये जकात कारकून व्हायच्या ऎवजी ग्रंथपाल झालेले असणार. मी फारच हिरमुसलो.
मात्र दररोज संध्याकाळी नियमितपणे त्या ग्रंथालयात बसून वाचन करीतच होतो. रात्री आठ वाजता ग्रंथालय बंद होत असे. तिथून शेवटी बाहेर पडणारे आम्ही दोघे असायचो. एक तिथले शिपाई सोनावणे आणि दुसरा मी. सोनावणे मांजरीला राहायचे तर मी साडेसतरा नळीवर हडपसरला. आम्ही दोघे सोबत गप्पा मारत मारत जायचो. सायकलने घरी पोचायला रात्रीचे 9:30 व्हायचे.
अलिकडेच सोनावणेंची भेट झाली. ते आता पार थकलेत पण त्यांनी मला बरोबर ओळखलं. मी कसली कसली जाडजाड पुस्तकं वाचायचो ते त्यांनी सोबत असलेल्या माणसांना सांगितलं.
सभासदत्व मिळवण्यासाठी मी केलेले उद्योग सोनावणेंच्या भाषेत पराक्रम त्यांनी मीठ मसाला लावून सगळ्यांना ऎकवला.

मी परत पु.लं.कडे गेलो. मग पुलंनी थेट राज्याच्या ग्रंथालय संचालक पुराणिकांना फोन केला. उत्तम वाचणार्‍या विद्यार्थ्यांना तुम्ही सभासदत्व देत नसाल तर मग ग्रंथालयाचा काय उपयोग? असं भाईंनी त्यांना सुनावलं.
पुराणिक भाईंना खुप मानत होते. त्यांनी तातडीनं सुत्रं फिरवली.
त्याच दिवशी सोनावणे मला सदाशिव पेठेतल्या माझ्या शाळेत येऊन भेटले. म्हणाले, आमच्या साह्यबांनी तुला ताबडतोब बोलावलंय. जेवत असशील तर हात धुवायला ग्रंथालयात घेऊन ये म्हणालेत. त्यांच्या **** बुडबुडे आलेत.
सोनावणेंसोबत मी लगेच गेलो. त्या साहेबांनी आधी मला खुर्चीत बसवलं. चहा मागवला. नविन कोरं सभासद कार्ड बनवून माझ्या हातात दिलं.
मला म्हणाले, अरे तुझी पुलंशी एव्हढी दोस्ती आहे हे तू मला आधी का सांगितलं नाहीस? मला आमच्या डायरेक्टरसाहेबांनी किती झापलं माहिती आहे काय?
मी म्हणालो, अहो, तुम्ही माझं ऎकुणच घेत नव्हतात. मी तुम्हाला म्हणालो होतो की उजळंबकरसाहेब मला सभासदत्व देणार होते. पण तुम्ही मला हुसकलत. शिवाय माझं नोकरीचं सर्टीफिकेट पण तुम्ही फेकुन दिलंत.
ते म्हणाले, थोडक्यात वाचलो बाबा. नाहीतर तुझ्यामुळे माझी बदली पार भंडार्‍याला झाली असती.
त्यानंतर नेहमी ते माझी विचारपूस करायचे. आधीमधी चहाही द्यायचे. एकुण शासकीय ग्रंथालयात माझा वट वाढला होता.
मात्र ही केवळ पुस्तक वाचण्याच्या गोडीनं घडवलेली किमया होती.
मुदलात पु.लं.ची नी माझी भेट पुस्तकांनीच तर घडवली होती!
- प्रा.हरी नरके

{छायाचित्रात दिसत आहेत- सौ.सुचेता निंबवीकर आणि त्यांचे पती श्री. श्रीकांत निंबवीकर }Saturday, October 14, 2017

मित्राचे वडील- बाळासाहेब

माझं प्राथमिक शिक्षण पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या शाळेत झालं. शाळेच्या शेजारी सेटलमेंट कॅंप आहे. ब्रिटीशांनी सतत गुन्हे करणार्‍या जातींना या सेटलमेंट कॅंपमध्ये बंदिस्त केलं होतं. तिथं त्यांच्यावर दररोज पोलीसांकडं हजेरी देण्याची सक्ती केलेली होती. अशाच एका सेटलमेंट कॅंपच्या संचालक म्हणून सुप्रसिद्ध लेखिका मालतीताई बेडेकर यांनी काम केलेलं होतं. त्या अनुभवावर आधारित कादंबरी त्यांनी 1950 साली लिहिली. "बळी". ती मराठीतली एक अतिशय महत्वाची कादंबरी आहे.
माझ्या शाळेला लागून हा कॅंप असल्यानं यातलीच 70-80 टक्के मुलं माझ्या वर्गात होती. पिढ्यानपिढ्या खिसे कापणं, दारू गाळणं, समोरच्याशी कमालीचं गोड बोलून त्याला हातोहात फसवणं यात ही मंडळी पटाईत असतात. गुन्हेगारीशास्त्रातले जणू पीएच.डी. झालेले तज्ञच.
त्याकाळात पीएमटी बसस्टॉपवर यांच्यापासून सावध राहा अशा सदरात खिसेकापूंचे फोटो लावलेले असायचे. एकदा बस यायला वेळ होता. सहज चाळा म्हणून मी ती नावं वाचत होतो. तर त्यात माझ्याशेजारी बसणार्‍या एका मुलाच्या आईवडीलांचे फोटो बघितले आणि मी हादरलोच.
माझी आई सांगायची, माणसानं एकवेळ उपाशी राहावं पण चोरी करू नये. कसल्याही कामाची लाज वाटू देऊ नये. त्यात कमीपणा नाही. कष्टाचं, मेहनतीचं कमवून खावं. कामानं माणूस मरत नसतो. मात्र चोरीत आणि लबाडीत इज्जत नाही. माणसानं जगायचं तर इज्जतअब्रूनं जगावं."
त्यामुळेच वयाच्या पाचव्या वर्षापासून मी कबरस्थानात बागकाम आणि साफसफाईचं काम करायचो.
तर मी ते फोटो बघून ठरवलं, उद्यापासून त्याला आपल्याशेजारी बसू द्यायचं नाही.
दुसर्‍या दिवशी तो आला नी नेहमीप्रमाणं माझ्याशेजारी बसला. मी त्याला त्याच्या आईवडीलांचे खिसेकापू म्हणून फोटो बघितल्याचं सांगितलं. त्यावर तो फुशारकीनं म्हणाला, तू नीट बघितलं नाहीस. त्यात माझ्या दोन भावांचे आणि तीन बहिणींचेसुद्धा फोटो आहेत. हे तो मला अशा पद्धतीनं सांगत होता की जणू त्याच्या भावाबहिणींनी ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल्स मिळवल्याबद्दल त्यांचे फोटो छापलेले होते. सहा महिन्यांपुर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला त्याच्या आईवडीलांकडे बघून ते अट्टल खिसेकापू असतील अशी शंकासुद्धा आली नव्हती.
दरम्यान भटक्याविमुक्तांच्या नेत्यांचं लेखन वाचनात आलं. अनिल अवचटांचं माणसं वाचलं. कोणीही माणूस जन्मानं गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे या विचारांनी खुप प्रभावीत झालो.
पुढे मीही या चळवळीशी जोडला गेलो. अनेक आंदोलनं, मोर्चे, यात्रा, परिषदा यांच्या आयोजनात पुढाकार घेतला. नेत्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना समाज मान्यता मिळावी, पुरस्कार मिळावेत म्हणून त्यांची वकीलीही केली. पण हे फार पुढचं झालं.

त्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला त्यानं वर्गातल्या आम्हा सर्वांना घरी बोलावलेलं. मी येत नाही, म्हणून त्यानं खुप आग्रहही केलेला. एकदा बघू तर खरं खिसेकापू कसे दिसतात म्हणून शेवटचं एकदा जावं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. त्याचे वडील बाळासाहेब आमच्याशी खुप चांगलं वागले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बटाटेवडे खायला दिले. सरबत दिलं. एकुण डिट्टो भलीच माणसं म्हणायची!
मी थोडी भीड चेपल्यावर त्यांना विचारलं, ते असला घाणेरडा धंदा कशाला करतात? ते म्हणाले, हे बघ, मला पाच मुली, तीन मुलं. एव्हढं मोठं घर चालवायचं तर दुसरा कोणता धंदा करणार? आजकाल चांगल्या नोकर्‍या तरी कुठं मिळतात? तसा मी सरकारी नोकरीत होतो. पण लई पिट्ट्या पडायचा. लईच काम करावं लागायचं. मरायचा ना माणूस असल्या कष्टांनी. म्हणून सोडली नोकरी.
आता आम्हाला ना रानात शेत आहे ना गावात घर आहे. चोर्‍या करणं चांगलं नाही. पण त्याच्याशिवाय दुसरा शॉर्टकट तरी कुठंय? आता हे एक वाडवडीलांच्या कृपेनं मिळालेलं सरकारी घर आहे म्हणा. पण आता मुलींची लग्नं करायची तर खर्चाची सोय करायला नको? तसंही आमच्यात कोणीही सराईत खिसेकापू असल्याशिवाय मुलगा किंवा मुलगी देतच नाहीत. प्रॅक्टीकलच करून दाखवावं लागतं ना."
ते बोलण्यात अतिशय लाघवी आणि चतुर. दिसायचे अगदी डिट्टो ऋषीमुनीच. मी त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली तर ते पदवीधर होते. त्यांना उत्तम अभिनय येत असणार. समोरच्या माणसावर एकदम छाप पाडायचे. "लहानपणी म्हणले, वडीलांबरोबर घरोघर ज्योतिष सांगायला जायचो. अंगणात वाळत घातलेले कपडे, राहणीमान, भाषा यावरून हेरायचं आणि अंदाजानं बोलत राहायचं. एकदोन बाण तरी नेमके लागतातच. लई मजबुती कमाई. बोलबच्चनगिरीचं ट्रेनिंग मात्र पाह्यजे. बेस्ट धंदा. पण लई फिराया लागायचं. पाय मोडून जायचं काम."

अलिकडेच एका कार्यक्रमात 40 वर्षांनी तो मित्र भेटला. म्हणाला, वडीलांची नुक्तीच पंच्याहत्तरी झाली. त्यांनी एव्हढ्यांचे खिसे कापले पण कोणालाही डाऊट नाय. मी मात्र आपला एस.टी.त कंडक्टर आहे. माझं त्यांच्याशी पटत नाय. बाकी माझे भाऊ बहिणी आईवडीलांचाच वारसा चालवतात.
आता मी सेटलमेंट कॅंपमध्ये राहत नाही. केशवनगरला राहतो. मला दोन मुलं आहेत. ये एकदा घरी.
पुढं बोलताना म्हणाला, " पुढं मग वडलांना आमच्यातलेच एक समाजसेवक भेटले. ते म्हणले, एव्हढं कष्ट करूने माण्सानं. शहरातल्या लोकांनी लै पाप केल्यालं अस्तंय. त्यांनी तरी कुठं इमानदारीनं कमावलेलं अस्तंय? त्यांचं मन त्यांना खात अस्तंय. आपून माण्साचा बारीक आभ्यास करायचा. गोड बोलून आज्जाद गळा कापायचा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची टॅक्ट मातर जमायला पाह्यजे. त्ये एरागबाळाचं कामच नाय. आता रिस्क कोणत्या धंद्यात नसते? आपून त्यांना पुण्य करायचा चान्स द्यायचा. एकदम गोरगरीब असल्याचं मस्त नाटाक करायचं. गरीब माणूस म्हणलं, की शिकल्याली माण्सं लई हालत्यात. आपुण फाट्का शर्टच घालून जायचं. समाजसेवक असल्याची मजबूत बतावणी करायची. मायंदाळ कमाई होतीया. बख्खळ पुरस्कारबी मिळत्यात. मंग, पोलीसांची काय टाप हाय हात लावायची? सोंग मातर आज्जाद जमलं पाह्यजे."
त्यांनी माझ्या धाकट्या बहिणीला वकीलच केलंय. ती त्यांच्याच धंद्यातली एक्सपर्ट हाये. अगदी लेडी डॉनच! नेहमी पेपरात नाव अस्तंय त्या बापलेकीचं."
तो पुढं असंही म्हणाला, " त्यांचं ते ज्ञान माझ्या उपयोगाचं नव्हतं. त्यांचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. मी पुन्हा त्या घरी गेलो नाही."
मला आठवलं, पिंपरी चिंचवडच्या महापौर पदावर याच समाजातले एक सद्गृहस्थ निवडले गेले होते. आता या मागास समाजाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. एकदा त्यांच्या घरी त्यांना भेटायला एका पत्रकारमित्रासोबत गेलो असताना घरातून कुजलेल्या गुळाचा आणि नवसागराचा वास येत असल्याचा भास झाला. त्यांच्या चहालाही कसलातरी वास येत होता. जरा नीट बघितल्यावर लक्षात आलं की महापौर महोदयांच्या स्वयंपाकघरात मोठी हातभट्टी लावलेली होती.
मी त्यांना म्हटलं, अहो महापौर, आता तरी हे बंद करा. तुमच्या पदाला शोभत नाही. तर ते अभिमानानं म्हणाले, मी उद्या पंतप्रधान जरी झालो ना तरी बापजाद्यांचा दारू गाळण्याचा धंदा आपण सोडणार नाही. पदावर असल्यामुळं पोलीसांची रेड पडू शकत नाही.
माझे मित्र सुरेश खोपडेसाहेब पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असताना त्यांनी या दारू गाळणार्‍या मंडळींनी हा धंदा सोडावा नी पर्यायी दुसरं सन्मानजनक काम करून जगावं असा प्रकल्प हाती घेतला. त्याला दारूण अपयश आलं, कारण हातभट्टीच्या,खिसे कापण्याच्या, या धंद्यात कष्ट कमी, कमाई मजबूत.
"साह्येब, मानसन्मान काय चुलीत घालायचाय का? आपल्याला कष्टबिष्ट सांगू नका. मेहनतीचं काम आपल्या शंभर पिढ्यांनी केलं नाही. भिक मागणं, खिसे कापणं, चोर्‍या करणं, दरोडे घालणं यात आपण मास्टर हावोत. आपल्याला कामधंदा जमणार नाही. दिवसभर घाम गाळून कमाई जेव्हढी होते तेव्हढी तर आमचं लहान मुलसुद्धा पंधरा मिन्टात कमावतं. पैसे कमावण्याचा शॉर्टकट हाताशी असताना असली मेहनतीची अवदसा हवी कशाला?" असं काही लोक त्यांना डायरेक्ट विचारायचे.
मुंढव्याच्या शाळेतले एक शिक्षक गेल्या वर्षी सांगत होते, नरकेसर, काही म्हणा, आपण तर हात जोडले बाबा. कितीही प्रयत्न करा. तळमळीनं सांगा. एखाददुसरा अपवाद वगळता या लोकांचं येरे माझ्या मागल्याच चालूय. कुणाला ओळख सांगताना मी मुंढव्याचा आहे म्हटलं की, बसमधला शेजारचा तो माणूस आधी सरकून, जपून बसतो. आपलं पाकीट आधी तपासतो. सतत त्याचं लक्ष त्याच्या पाकीटावर असतं. अगदी लहानलहान मुलंसुद्धा किती सराईत खिसेकापू असावीत?"
ते म्हणाले, "एक अधिकारी तक्रार घेऊन आले. म्हणाले, तुमच्या शाळेतल्या मुलानं माझं पाकीट हातोहात मारलं."
विचारा कसं काय?
" मी माझ्या मोटरसायकलवरून चाललो होतो. रस्त्यात एक लहान शाळकरी मुलगा लिफ्ट मागत होता. खुप उन होतं. बसचा पत्ता नव्हता. मी माणुसकी दाखवायला गेलो. त्याला मागं बसवलं. शाळेजवळ आल्यावर तो उतरला. पुढं एका हॉटेलात मी चहा प्यायला गेलो. पैसे द्यायला पाकीट बघितलं तर पाकीट गुल झालेलं. आजच माझा पगार झाला होता हो."
शिक्षक म्हणाले, त्याला मी वर्गांवरून फिरवलं. त्या भल्या माणसानं त्या मुलाला एका वर्गात बसलेलं बरोबर ओळखलं. चेक केलं तर त्या पाचवीच्या मुलाच्या दप्तरात ते पैशांनी भरलेलं पाकीट सापडलं. आता बोला."
"त्याच्या पालकांना बोलावून समज दिली तर ते पालक उलटं म्हणाले, " पण त्यानं याला लिफ्ट दिलीच कशाला? पहिलं कळायला नको?"
-प्रा.हरी नरके

Friday, October 13, 2017

दिवाळी-


दिवाळीत भाताचं पिक भरात आलेलं असायचं. पाखरं तुटुन पडायची साळीवर. मालक फार खडूस होते. थोडा जरी उशीर झाला तरी दिवसाचा पगार कापायचे. त्यामुळं आई पहाटे लवकरच उठून उजाडायच्या आत राखणीला जायची. आम्ही भावंडं सकाळी उठलो की तिथं शेतावर जायचो. मोठा भाऊ पाखरं हाकलायचा गोफणीनं. आई बांधावर तीन दगडांची चूल मांडून पाणी तापवायची. दिवाळी म्हणजे मजा. अगदी चैन. आई स्वत: वर्षातले ते चारपाच दिवस आम्हाला शेताच्या बांधावर लाईफबॉय साबण लावून आंघोळ घालायची. घरात वर्षातून एकदाच लाईफबॉय साबण यायचा तो दिवाळीत.एरवी वर्षभर नदीत नाहीतर विहीरीवर आपली आपण आंघोळ करायची. साबण ना कपड्याला असायचा ना आंघोळीला. कपडे फारच मळले तर रिठ्यानं धुवायचे. शेताच्या बांधावर रिठ्याची झाडं असायची.
कथा कादंबर्‍यांत वाचायचो दिवाळीत उटणं, सुगंधी तेलं, मोती साबण असलं बरंच कायकाय भारी असायचं म्हणे लोकांकडे. फराळ हा शब्दही फक्त पुस्तकात वाचलेला. आमच्याकडं दिवाळी म्हणजे दोनचार दिवस चहासोबत शंकरपाळी. वर्षभर बिन दुधाचा कोरा चहा असायचा गुळाचा. दिवाळीत मात्र दुधाचा चहा मिळायचा. दोनचार वर्षातून कधीतरी आई करंज्याही करायची दिवाळीला. मोतीचुराचे लाडू मात्र आठ दहा वर्षात एकदाच केलेले आठवतात. लाडू चिवडा वगैरे लाड आपल्या गरिबाकरता नसतात असं आई सांगायची. ती सगळी पैसेवाल्यांची  थेरं असं ती म्हणायची. मी ज्या कबरस्थानात काम करायचो तिथं जर दिवाळीत अचानक एखादं प्रेत आलं तर मात्र खड्डा खोदायच्या मजुरीचे दोनतीन रूपये मिळायचे. मग आई त्याचा रवा विकत आणायची आणि रव्याचे लाडू करायची.
तुळशीचं लग्न झालं की संपली दिवाळी. मी खुप लहान असताना तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच माझे वडील गेले. त्याआधी बरेच महिने ते आजारी होते. पण खाजगी दवाखाण्यात नेण्याजोगी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि ससूणला नेलं की तिथले डॉक्टर औषधाचा डोस देऊन मारून टाकतात अशी आईला कुणीतरी भिती घातलेली होती. त्यामुळं औषधपाण्याविनाच ते गेले.
आमच्या झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या खोलीत हातानं बनवलेला आकाशकंदील मात्र दरवर्षी नवा असायचा. तो बनवण्यात दोनतीन आठवडे सहज जायचे. रंगीत कागद विकत आणून बनवलेले ते आकाशकंदील वर्षवर्ष जपून ठेवायचो. त्यात संध्याकाळी पणती लावली की इतकं भारी दिसायचं. मातीचा किल्ला आणि त्यावरचे शिपाईसुद्धा हातानं बनवायचो. किल्ले फार जोरदार बनवायचो. एकदम हुबेहुब.
अंगणात 5 पणत्या लावल्या की रोषणाईच रोषणाई.

कधी गावी गेलो की माझी चुलती म्हणायची, चल रे हरी चहाला घरी. साखरेचा करते बाबा चहा तुला.
आमची शहरात खुप मजा असते असंही ती चुलतभावांना सांगायची. आरं, यांना काय बाबा, रोज रोज वराणभात मिळतो. महिन्या दोनमहिन्याला तेलच्याबी असत्यात. यांची लईच मज्या अस्तेय बाबा शेरात. मी म्हणायचो, नाही काकू. आमच्याकडं पण मिलो अस्तोय. हुलग्याच्या घुगर्‍या, शेंगोळी आणि हुलग्याच्याच भाकरी असतात. माडगंही असतंय. सकाळ,दुपार, संध्याकाळ तिन्हीत्रिकाळ हुलगे! ती म्हणायची, हे बघ, 2 वेळचं पोटाला मिळतंय ना? मंग बास झालं.

फटाके मला कधीच आवडले नाहीत. 2 वेळचं खायला मिळतंय हीच सगळ्यात मोठी चैन होती.
फटाके उडवणं म्हणजे पैशांचा धूर करणं. एक राजा नोटा जाळून त्यावर चहा करायचा म्हणे. फटाके वाजवणं हा मला तसलाच वेडपटपणा वाटायचा.
आयुष्यात एकदाही मला फटाका वाजवावासा वाटला नाही. कधी मित्रांनी आग्रह केला तरी मी फटाक्यांना हातही लावत नाही. उलट तो घाणेरडा आवाज ऎकला की माझं डोकं उठतं. होय, मला फटाक्यांचा तिरस्कार वाटतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानचिटुकली मुलं काम करतात. मध्यंतरी कारखाण्याला आग लागून शंभरेक बालकामगार मुलं जळून मेली. तरी लोकांना फटाके हवेतच.
फटाक्यांच्या त्या आवाजामुळं दिवाळीला आजकाल शहरात राहावसंच वाटत नाही. दूर कुठंतरी जंगलात किंवा खेड्यापाड्यात निघून जावं. एकाही दिवाळीला पुण्यात थांबायचं नाही असा मी नियमच केलेला.
पण आजकाल खेड्यातसुद्धा फटाक्यांची ती घाण पोचलीय.

मला अलिकडं दिवाळी हा सणच वाटत नाही.
ते एक भयंकर संकट वाटतं. त्या आवाजानं डोकं सटकतं.
काही लोक दागिने मोडून खातात तसे काही लोक गरीबी मोडून खातात.
त्यामुळेच मला लहाणपणचे हे अनुभव लिहावेसे वाटत नाहीत.
-प्रा. हरी नरके 

Thursday, October 12, 2017

और चाभी खो जाय-प्रसिद्ध विचारवंत आणि माझे गुरू डॉ. य.दि.फडके हे हिंदी मसाला, मारधाड सिनेमे अतिशय आवडीनं बघायचे. ते मुळात एक रहस्यकथालेखक होते हे अनेकांना माहित नसेल. शाळेत असताना मलाही असल्या हिंदी सिनेमांची प्रचंड आवड होती. अनेकदा परवडत नसूनही अनंत, श्रीनाथ, अलंकार, अपोलो, लक्ष्मीनारायण, नटराज, राहुल,गुंजन,सोनमर्ग, वैभव अशा थिएटर्समध्ये जाऊन सिनेमे टाकायचो. काहीकाही सिनेमे तर लागोपाठ दोनतीन वेळा बघायचो. त्याकाळात अमिताभ खुपच आवडायचा. त्याचे दिवार, जंजीर, त्रिशूल, कभी कभी, मजबूर, शोले, आनंद, अभिमान, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अ‍ॅंथनी, परवरीश असले रग्गड सिनेमे तेव्हा पाहिलेले. आत्ता त्यातले काही फुक्कट दाखवले तरी बघण्याच्या लायकीचे वाटत नाहीत हा भाग वेगळा.
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मालकांच्या गाई चारायला नेल्या की मजुरीचा 1 रूपया मिळायचा. गाई कुरणात सोडल्या की त्या तिकडे रमायच्या. दिवार बघायचा मोह न आवरल्यानं काम सोडून म्हणजे गाई कुरणात सोडून पार श्रीनाथला सायकलवर गेलो आणि सिनेमाला बसलो. आणि दिवारमधला तो फेमस डायलॉग आला. "पीटर अभी ये ताला तुम्हारी जेब से चाभी निकालकर ही खोलुंगा!"
आणि का कुणास ठाऊक मला माझ्या सायकलच्या चावीची आठवण आली. सगळे खिसे चासपून झाले. चावी काही सापडेना. मी जाम अस्वस्थ झालो. चावी कशी काय हरवली? आता घरी कसं जाणार? तिकडे गाईंनी कायकाय उद्योग केले असतील माहित नाही. पडद्यावर सिनेमात अंधार पडला की मी हळूच खुर्चीवरून खाली उतरून चावी खुर्चीखाली तर पडली नाही ना हे हातानं तपासायचो. असं अनेकदा करूनही चावी काही सापडेना. मी शोधणं काही थांबवीना. सिनेमातलं पार लक्षच उडालं.
शेवटी सिनेमा संपल्यावर पार्कींगमध्ये धावत जाऊन आधी सायकल तपासली तर काय, चावी सायकलच्या कुलुपातच राहिलेली.
चावी शोधण्यात सिनेमा गेला याचा खुप राग आलेला.
कुरणात जाऊन बघतो तो गाईंचा पत्ता नाही. जाम टरकलो. गाई हरवल्या तर आपली नोकरी जाणार, मालक कदाचित पोलीसातही देतील.
इकडेतिकडे शोधल्यावर एका गुराख्यानं सांगितलं, तुझ्या गाई शेजारच्या शेतात शिरल्या होत्या म्हणून त्या शेतमालकानं कोंडवाड्यात नेल्यात गाई. धावतपळत कोंडवाड्यात गेलो. तिथल्या माणसानं सांगितलेला दंड भरणं मला शक्यच नव्हतं.
खुप गवावया केली. हातापाया पडलो.
तो म्हणाला, गाई चरत असताना तुझं लक्ष कुठं होतं?
म्हणलो, मी सिनेमाला गेल्तो.
तो म्हनला, कोन्त्या?
दिवार.
काय बोलतोस? कोन्त्या थेटरला?
श्रीनाथ.
आयला, मी पण होतो श्रीनाथला.
अरे माझ्या शेजारी तुझ्यासारखंच दिसणारं कोणतरी एडपट बसलं होतं. पडद्यावर अंधार पडला की ते बेनं खाली उतरायचं आणि हातानं खुर्चीखाली काही तरी चासपून बघायचं, त्यामुळं दिवार मला नीट बघताच आला नाय.
मी म्हणलं, तो मीच होतो.
काय शोधत होतास?
सायकलची चावी.
मायला, गपचुप उद्याच्या शोची तिकटं काढून आणलास तर तुझ्या गाई सोडतो. अमिता बच्चनसाठी दंड माफ. मातर कुठंही बोंब मारायची नाय.
मग काय दुसर्‍या दिवशी फिर से दिवार. अगदी शान से. ...
- प्रा. हरी नरके
................

Wednesday, October 11, 2017

माझी मुलगी - प्रमिती


आज जागतिक कन्यादिनाच्या निमित्ताने सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुली, आई, वडील यांनी उत्स्फुर्त अनुभवकथन केले. अनेकदा उपस्थितांचे डोळे पाणावले. यानिमित्ताने माझी मुलगी प्रमिती हिच्या बालपणापासुनच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत होत्या. त्यातल्या या काही-
पालकांना आपल्या मुलांना पुण्यातल्या नामवंत शाळेत प्रवेश कसा मिळवायचा ही फार मोठी चिंता असते. असं म्हणतात की, लग्नाची तारीख ठरवायच्या आधी शाळाप्रवेशाची व्यवस्था करून मगच लग्न केलेलं बरं.
प्रमितीच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न मात्र तिचा तिनंच लिलया सोडवला. तिला मराठी माध्यमाच्या नामवंत शाळेत घालायचं म्हणून आम्ही ती एक वर्षांची असतानाच पुणे शहरात, कोथरूडला राहायला गेलो. घराजवळच अभिनव विद्यालय ही नामवंत शाळा होती.
एकदा आम्ही तिघे, प्रमिती, तिची आई व मी एका लग्नाला गेलो होतो. सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र फडके यांच्या मुलीचं सईचं लग्न होतं. लग्न लागल्यानंतर जेवायला थोडा वेळ होता. मंगल कार्यालयाच्या शेजारीच अण्णासाहेब उर्फ चिं.स. लाटकर यांचा बंगला होता. ते आम्हाला त्यांच्या घरी चहाला घेऊन गेले. प्रमिती तेव्हा सव्वा दोन वर्षांची होती. अण्णासाहेब तिला आपल्या मांडीवर घेऊन बसले होते. तिला त्यांनी नाव विचारलं. काय करतेस, कोणत्या शाळेत शिकतेस असंही विचारलं. त्यावर ती म्हणाली, मी अजून लहान असल्यानं शाळेत जात नाहीये. पण जून महिन्यापासून शाळेत जाणार आहे. ते म्हणाले, कोणत्या शाळेत जाणारेस? त्यावर ती पटकन म्हणाली, अभिनव विद्यालय. ते म्हणाले, का बरं तीच शाळा का? तर ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही? ती पुण्यातली बेस्ट शाळा आहे. माझा मित्र अनिरुद्ध त्याच शाळेत जातो. ती शाळा माझ्या घरापासून जवळ आहे. मी ठरवलंय, त्याच शाळेत जायचं.
अण्णासाहेब खुष झाले. म्हणाले, तुला अभिनवमध्ये प्रवेश दिला. तू माझ्या शाळेची ब्रॅंड अ‍ॅंबॅसिडर होणार. तोवर आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की त्या शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब लाटकर हेच अध्यक्ष होते. आम्ही सारे प्रचंड खुष झालो.
पण तरीही एक गंमत झालीच.
मी अधुनमधून अण्णासाहेबांना फोन करून प्रवेशाची आठवण करायचो. प्रवेशफॉर्मची चौकशी करायचो. ते म्हणायचे तू कशाला चिंता करतोस? मी शब्द दिलाय ना. सगळं नीट होईल.
आणि आम्हाला कळलं की येत्या सोमवारी शाळा सुरू होतेय. प्रवेश प्रक्रिया केव्हाच पुर्ण झालीय. मी अण्णासाहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, अरे येत्या सोमवारी आमची मराठी माध्यमाची शाळा सुरू होणारे. इंग्रजी माध्यमाला अद्याप अवकाश आहे. तुला इंग्रजी माध्यमात मुलीला घालयचंय ना? मी म्हणालो, नाही. तिला मराठी माध्यमात घालयचंय. ते म्हणाले, अरे बाबा तू मराठी साहित्यिक आहेस ना? सगळे मराठी साहित्यिक मराठीवर भाषणं जरूर ठोकतात पण आपल्या मुलांना न चुकता इंग्रजी माध्यमात घालतात.
आता मराठीचे प्रवेश संपलेत. तू तिला इंग्रजी माध्यमातच घाल.
मी मराठीसाठी अडून बसलो.
अण्णासाहेबांनी खुप प्रयत्न केले पण जागाच शिल्लक नव्हती. माझ्या नातीला प्रवेश हवाय. एक जागा कराच असं त्यांनी मुख्याध्यापिकेला सांगितलं.
मी दररोज सकाळी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. एके दिवशी मुख्याध्यापिकेचा अण्णासाहेबांना फोन आला. एका मुलीच्या पालकांची बदली कलकत्त्याला झाल्यानं ते प्रवेश रद्द करायला आलेत. तुमच्या नातीला पाठवा.
मी 240 च्या स्पीडनं प्रमितीला घेऊन शाळेत पोचलो.
लगेच तिची प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. त्यांनी विचारलेल्या पहिल्याच प्रश्नावर ती म्हणाली, तुम्हाला थोडक्यात उत्तर हवंय की सविस्तर?
त्या म्हणल्या आधी थोडक्यात सांग नी बरोबर आलं तर मग सविस्तर सांग.
सगळीच धमाल....
आणि प्रमितीला अभिनव मराठी माध्यमामध्ये बालवर्गात प्रवेश मिळाला....

* ती दीड वर्षांची असताना फादर दिब्रिटो आमच्या घरी आले होते. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं आणि तुझं नाव काय? असं विचारलं. तिनं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडं बघू लागली. ते म्हणाले, काय झालं? बाळ, माझं काही चुकलं का?
ती म्हणाली, तुमच्यात दुसर्‍यांना नाव विचारायची पद्धत असते मग स्वत:चं नाव सांगायची पद्धत का नसते? मी एक बघितलंय, मोठी माणसं दरवेळी बाळ तुझं नाव काय हाच प्रश्न का विचारतात? त्यांना बाकीचं काहीच का विचारता येत नाही?
ते चमकले. म्हणाले, माझं नाव दिब्रिटो. यापुढे मी लहान मुलाला पहिला प्रश्न तुझं नाव काय असा कधीही विचारणार नाही.
ती म्हणाली, या नावाचा अर्थ काय?...
असे तिचे प्रश्न संपतच नसत.
* ती लहान असताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गोविंद नामदेव, सुषमा देशपांडे, सदाशिव अमरापूरकर, डॉ. जब्बार पटेल, अतुल पेठे असे अनेक ख्यातनाम अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आमच्या घरी येत असत. आम्ही त्यांच्या घरी जात असू. यातनंच बहुधा अभिनेत्री व्हायचं बीज तिच्यात रूजलं असावं.
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या प्रवेश परीक्षेत आणि पदवी परीक्षेत ती पहिली आली.
ललित कलाच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकरमॅडम मला नेहमी म्हणायच्या, "सर, तुमची मुलगी उद्याची स्मिता पाटील आहे बघा."
"तू माझा सांगाती" ही मालिका तिच्या व्यक्तीगत प्रयत्नांनी तिनं मिळवली. अल्पावधीत अनेक जाणकारांची पसंती तिच्या अभिनयाला मिळाली.
* मी सार्वजनिक जीवनात गेली 35-40 वर्षे कार्यरत आहे. सतत दौरे करूनही वेळेअभावी अनेकांची निमंत्रणं मला स्विकारता येत नाहीत. एक कार्यकर्ता सलग तीनचार वर्षे फोन करायचा. पत्र लिहायचा. पण मला त्याच्या कार्यक्रमाला जाणं जमलं नव्हतं. यावर्षी त्याचा फोन आला तेव्हा मी संकोचून त्याला म्हटलं, काळजी करू नको, यावर्षी मी तुला नक्की वेळ देतो. सांग कुठली तारीख हवी?
त्यावर तो म्हणाला, त्याचं कायय नरकेसर, यावर्षी तुमची तारीख नकोय. तुमच्या मार्फत आम्हाला प्रमितीताईंची तारीख हवीय. तुम्ही तेव्हढं जमवून द्याच.
* जवळचे मित्र मला गंमतीनं म्हणतात, आता यापुढे प्रमितीचे बाबा म्हणून तुला तुझी ओळख सांगावी लागेल. तयारी ठेव बाबा. त्यांना काय माहित अशा गुणी आणि बुद्धीमान पण चोखंदळ मुलीचा बाप असणं किती भाग्याचं असतं ते!
- प्रा. हरी नरके

Sunday, October 8, 2017

प्रा.मु.ब.शहासर- उत्तम वक्ते

धुळ्याचे प्रा.मु.ब.शहासर हे उत्तम वक्ते होते. राष्ट्र सेवा दल आणि राजवाडे संशोधन मंदिर या दोन संस्थांसाठी ते खुप झटले. ते नामवंत शिक्षक होते.
मी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिकत असताना विविध आंतर महाविद्यालयीन वादविवाद-वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यात प्रवरानगरला सर मला परीक्षक होते. त्याच स्पर्धेत 35 वर्षांपुर्वी सर्वप्रथम राधाकृष्ण मुळी, यमाजी मालकर यांची भेट झाली. मैत्री जुळली. मुळी यांनी त्या उत्स्फुर्त स्पर्धेत आचार्य अत्रे यांच्यावर केलेलं भाषण आजही एव्हढ्या वर्षांनी माझ्या लक्षात आहे.
त्या स्पर्धेनंतर मी शहासरांना भेटून वक्तृत्व, वाचन आणि आवाज यांच्या सुधारणांबद्दल विचारलं. राष्ट्र सेवा दलात असलेले मु.ब. शहासर उंच, गोरे, रूबाबदार, बघताच प्रभाव पाडील असं व्यक्तीमत्व. फर्डे वक्ते. ते मला शांतपणे म्हणाले," हे बघ, वक्तृत्व ही एक कला असली तरी माणसाचं रंगरूप हे जन्मानं मिळतं आणि वक्त्याच्या दिसण्याचा त्याच्या वक्तृत्वावर फार मोठा परीणाम होतो. तुझा रंग एव्हढा काळाभोर आहे की तुझा प्रभाव पडणार नाही. तुझ्या भाषणांकडे लोकांचं लक्षच जाणार नाही. आता तु्झा चेहरा... कधी आरश्यात बघितलायस? .... तर तात्पर्य असं की तू वक्ता बणण्याच्या फंदात अजिबात पडू नकोस. हा नाद सोड." सर बोलत गेले आणि मी खचत गेलो. कुठून झक मारली आणि यांना भेटलो असं झालं. प्रवरानगरहून परत येताना खुप चिडचिड झालेली.
पण मग नंतर मी असा विचार केला की शहासर कदाचित सदहेतूनंही बोलले असतील. मला उचकवावं, पेटवावं हाही हेतू असेल त्याच्यामागे. आता आपण किमान बरा वक्ता नक्कीच व्हायचं. झपाटून वाचायचं. अण्णा म्हणजे प्रा. गं. बा. सरदार यांना भेटून मी त्यावर चर्चा केली. अण्णा म्हणाले, " तू अजिबात खचू नकोस. ते शहांचं व्यक्तीगत मत आहे. मला ते पटत नाही. तुझ्या एखाद्या मुद्द्यानं ते दुखावले असतील. विसरून जा. परत भेटले तर मनात कटुता ठेवू नकोस. मला खात्रीय त्यांना आपलं मत बदलावं लागेल. माणसाला वेगळं मत जरूर असावं. पण विद्यार्थ्यांपुढे ते अशा पद्धतीनं मांडणं मला तरी गैर वाटतं. असं बघ, अजातशत्रू वगैरे हे खरं नसतं. नॉनकमिटल राहणं सोयीचं आणि फायद्याचं असेलही, पण भुमिका घेणं महत्वाचं आहे. सगळी नाटकं करता येतात पण तळमळीचं नाटक नाही करता येत. तुझी ग्रामीण नाळ, वाचन, मेहनत, तुझी ओरिजनॅलिटी तुला खुप पुढे घेऊन जाईल." अण्णांच्यामुळे माझी उमेद वाढली. अशाच शुभेच्छा पु.ल., बाबासाहेब पुरंदरे यांनीही दिलेल्या. बाकीचे पण अनेकजण उत्तेजन द्यायचे. विशेषत: विनायकराव कुलकर्णी, एसेम अण्णा, ग.प्र.प्रधान पाठीशी होते.  सततची मेहनत आणि मित्रांशी सतत वादविवाद यातनंही उर्जा मिळायची. त्याचकाळात चंद्रकांत कुलकर्णी, भूषण गगराणी, अभिराम भडकमकर, सदानंद दाते, विकास आबनावे आणि आणखी कितीतरी मित्र मिळत गेले.
पुरस्कारामागून पुरस्कार मिळत गेल्यानं आत्मविश्वास वाढत गेला. माझ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.तु.पवार यांनी " हरी, तुला हव्या तेव्हढ्या स्पर्धा कर, फक्त नापास होणार नाहीस याची काळजी घे," असा सल्ला दिला.
आज मागं वळून बघताना गंमत वाटते की त्या अवघ्या 3 वर्षांमध्ये मी 133 वादविवाद, वक्तृत्व, उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. बक्षीसं काय कुणाला तरी मिळायचीच. बहुधा माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे, तडाखेबंद आणि कळकळीच्या बोलण्यामुळे असेल पण त्याकाळात कधी पहिलं, कधी दुसरं तर कधी तिसरं, पण बक्षीस न घेता परत आलो असं घडलं नाही. बाय द वे शहांच्या वेळी प्रवरानगरलाही मला तिसरं बक्षीस मिळालेलं होतं बरं का. पुढच्या वर्षी तर प्रवरानगरचं पहिलं बक्षीस मला मिळालेलं. तर असो.
मध्यंतरी धुळ्याच्या शरद पाटलांनी कापडण्याच्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला बोलावलेलं होतं.
बघतो तर काय स्टेजवर साक्षात प्रा. मु. ब. शहासर होते. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, "सर आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का!" ते खुष झाले.
संयोजक मला म्हणाले, "एक अडचण आहे. नियोजित अध्यक्ष आजारी असल्यानं येऊ शकत नाहीयेत. तर मु. ब. सरांना करूया का अध्यक्ष?"
मी म्हणलो, " जरूर करा."
शहासर तयार झाले. मात्र त्यांनी अट घातली, म्हणाले," मी हरी नरकेच्या आधी बोलणार."
शहासर उत्तमच वक्ते होते. ते छानच बोलले. मुद्देसूद. अभ्यासपुर्ण.
प्रवरानगरचा प्रसंग त्यांच्या लक्षात होता.
त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात आवर्जून केला.
म्हणाले, "मी प्राध्यापक म्हणून अनेक वक्ते घडवले. हरी नरकेला मी प्रवरानगरला परिक्षक होतो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, हा पोरगा चमकणार. मी त्याला तिकडे बक्षीस देऊन तसं भाकीतही केलं होतं. काय हरी, तुझ्या लक्षात आहे ना? असणारच म्हणा. ज्याअर्थी आता स्टेजवर मला भेटल्याभेटल्या नमस्कार करून, तू म्हणालास, " सर, आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का! त्याअर्थी तुही माझं ऋण मानतोस! ..."
मी तसा फाटक्या तोंडाचा. शहासरांना प्रवरानगरला खरा प्रसंग काय घडला होता, त्याची आठवण करून द्यावी असा खुप मोह झाला. पण आवरला.
म्हणतात ना, ज्याचा शेवट चांगला... सरांच्या विचारात बदल झालाय तर आता जुनं उकरून कशाला काढा?
चुकतात कधीकधी मोठ्या माणसांचे अंदाज! मी माझ्या भाषणात एव्हढंच म्हटलं, "सर, प्रवरानगरला काय घडलं, ते तुम्हाला आणि मला माहित आहे. तुमचं व्हर्जन तुम्ही सांगितलंत. एकच विनंती, निदान यापुढे तरी केवळ दिसण्यावरून कोणाला ठोकू नका. अहो, आपले संत चोखामेळा सांगून गेलेत, " उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा...."
भाषण संपवून मी खाली बसल्यावर शहासर माझा हात आपल्या हातत घेत मला म्हणाले, "आज तू जोरदार बोललास. पुढं ते मला Sorry" म्हणाले.
संयोजक बघतच राहिले. शहासर एकीकडे छान बोललास असंही म्हणताहेत अणि त्याच वेळी Sorry ही म्हणताहेत. एकुण हे काय प्रकरण आहे बुवा?
विनम्र आदरांजली.
- प्रा. हरी नरके

Saturday, October 7, 2017

तो बच्चे की जान लोगे क्या?

.............शाळेत असताना एक शिकलो होतो, गुरूजी म्हणायचे, दारू फार वाईट. चला दारू नष्ट करूया. निम्मी मी पितो, उरलेली तुम्ही प्या. हाच जुमला मी वापरला आणि काँग्रेसमुक्त भारत करून दाखवला. 95% काँग्रेसवाले माझ्या पक्षात घेतले. उरलेल्यांना तुरूंगात टाकले. संपली ना काँग्रेस! ही वचनपुर्ती नाही? ...............
आजकल बहुत जादती हो रही है. ये सरासर नाइन्साफी हैं. एक आदमीके खिलाफ पुरा सोशल मिडीयाँ टूट पडा हैं. आणि आजवर बाजू घेणारे सगळे भक्त अचानक बिळात जाऊन लपून बसलेत.
कायतर म्हणे तुम्ही निवडणुकीत यांव आश्वासनं दिली होती, नी त्यांव आश्वासनं दिली होती, मारो गोली यार. निवडणुकीतली आश्वासनं ही काय पुरी करण्यासाठी असतात? इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, "गरीबी हटाव" केलं त्यांनी वचन पुरं?
मी देवा ब्राह्मणांसमोर सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, त्यातरी मी कुठे पुर्‍या केल्या? हा ट्रॅकरेकॉर्ड तुम्हाला माहित असतानाही तुम्ही माझ्या शब्दांना भुललातच ना? मुळात निवडणुकीतल्या आश्वासनांवर जे विश्वास ठेवतात ते भोटच.
दरवर्षी एक कोटी नविन नोकर्‍या निर्माण करीन म्हणालो होतो, तशा गेल्या वर्षी लाखभर नोकर्‍या निर्माण केल्याही. 100% काम करूनही तुमचे प्रश्न कायमच? मग ठरवलं एक कोटीची फिगर पुर्णच करायची. 8 नोव्हेंबर 2016 ते 7 आक्टोबर 2017 या अवघ्या 11 महिन्यात केल्या मग एक कोटी नोकर्‍या कमी! गेला लोकांचा रोजगार. बसलेत शंख करीत.
अहो, पंधरा लाखांचं काय घेऊन बसलात? एका वर्षात मुकेश, गौतम, अजिम, बालकृष्ण हजारोच नव्हे लाखो कोटींनी श्रीमंत झाले. अवघ्या एका वर्षात 100 उद्योगपतींची संपत्ती 25% नी वाढली. मित्रों, ही किमया कोणाची? या 100 जणांना अच्छे दिन कोणी आणले? अर्थात मीच! 130 कोटी लोकांना काय आणि 100 लोकांना काय अच्छे दिन आलेच ना?
काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळे झाले. मी ठरवलं घोटाळ्यांचं मूळ कारणच नष्ट करायचं. कोळसाच नाही तर घोटाळा कुठुन होणार? तर लगेच लागले बोंबलायला हे कॉमन मॅन. काय तर म्हणे लोडशेडींग करू नका. अरे ज्यांना अंधाराचा अनुभवच नसेल त्यांचा काय डोंबलाचा उजेड पडेल? 
म्हणे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल स्वस्त होऊनही आपल्या देशात महागले, देशाचा जीडीपी कमी झाला, महागाई वाढली, सगळी भंकस. विरोधकांचे हे आरोप खोटे आहेत. तुम्ही 2 रूपये कमी करायला लावून देशाच्या विकासाचा पैसा 2% नी तुम्ही कमी केलात. देशभक्ती अशी हवी की स्वत:हून म्हटलं पाहिजे, 80 च काय 100 रूपये लिटर करा पेट्रोल. विकासाला पैसा हवा तर महागाई होणारच.
त्या एल्फिन्स्टन पुलावर 23 माणसं काय मेली तर तुम्ही लगेच बुलेट ट्रेनबद्दल बोंब ऊठवलीत. माणसं मेल्याशिवाय लोकसंख्या आटोक्यात कशी येणार? तसं मलाही दु:ख झालं. मी तसं ट्विटही केलं. लवकरच राज्यांच्या निवडणुका आल्यात ना!
जीडीपीला काय चाटायचेय? महागाई झाल्याशिवाय शेतकरी जमिनी कशाला विकतील? मग आम्ही पार्टीसाठी जमिनी कशा खरेदी करणार?
पेस्टीसाईडमुळे शेतकरी मेले हा काय माझा दोषय? आणि त्यांचं काय तसेही ते लहर आली की सतत आत्महत्त्या करीतच असतात हो.
जीएसटी लागू करण्याची डेरिंग कोणी केली? तर व्यापारी लागले बोंबलायला. त्यांचं मात्र ऎकायलाच हवं. शेवटी इलेक्षनफंड तेच देणार आहेत. मग काय केली ना जीएसटीत कपात?
पुर्वी 70-80 माणसं मंत्रीमडळात असायची. काय करायचीय ही भारूडभरती? मी अवघ्या अडीच माणसांवर कारभार सोपवला. झाली की नाही बचत? शौरी काय नी सिन्हा काय त्यांच्या नावात फक्त यशवंत! बाकी फक्त शंखध्वनी. सच्ची कामयाबी तो हमारे मुठ्ठीमें बंद हैं!
शाळेत असताना एक शिकलो होतो, गुरूजी म्हणायचे, दारू फार वाईट. चला दारू नष्ट करूया. निम्मी मी पितो, उरलेली तुम्ही प्या. हाच जुमला मी वापरला आणि काँग्रेसमुक्त भारत करून दाखवला. 95% काँग्रेसवाले माझ्या पक्षात घेतले. उरलेल्यांना तुरूंगात टाकले. संपली ना काँग्रेस! ही वचनपुर्ती नाही?
उटसुटके बच्चे को रुलाओ मत यार! भक्तोंको ज्यादा उकसावो मत. आदेश आते ही सब के सब बिळ के बाहेर आ जायेंगे! याद रखो!
-प्रा.हरी नरके

Monday, October 2, 2017

हमो-
"हरी तुझी जात कोणती रे?" प्रसिद्ध साहित्यिक ह.मो.मराठे मला विचारत होते. आजवर आडवळणानं अनेकांनी हा प्रश्न विचारलेला होता. पण असा थेट प्रश्न आणि तोही एका मोठ्या संपादक, लेखकाकडून प्रथमच विचारला जात होता. हमोंनी हा प्रश्न विचारावा हे मला आवडलेले नव्हते.
ह.मो. यांच्याशी माझा किमान 30 -35 वर्षांचा परिचय होता. मैत्री होती. माझ्या लग्नाला ते आवर्जून आले होते.
करियरच्या सुरूवातीला साप्ताहिक साधनेत नोकरी करणारे, "नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’’, एक दिवस : एक माणूस, पोहरा, बालकांड, अशी सरस पुस्तकं लिहिणारे, किर्लोस्कर, लोकप्रभा, घरदार, मार्मिक, पुढारी यांचे संपादक राहिलेले मराठे मी जवळून बघितलेले होते. नि:ष्पर्ण वृक्षावर ही मराठीतली अतिशय दणकट कलाकृती. लोकप्रभाला त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. घरदारने तर अल्पावधीत जोरदार मुसंडी मारली. त्यांची शैली वेगवान आणि प्रसन्न होती. लोकप्रभानं हमोंच्या लोकप्रियतेत खूप मोठी वाढ झाली. काही स्पर्धक संपादकांनी डुख धरून त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही घटनांबद्दल त्यांच्यावर चिखलफेक सुरू केली, हे सारं मी पाहात होतो.
मी शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेला ते परीक्षक होते. मला त्यांनी पहिले पारितोषिक दिले होते. स्पर्धा संपल्यावर त्यांनी मला किर्लोस्करवर भेटायला ये असे सांगितले.
मी गेलो. ते खूप जिव्हाळ्यानं विचारपूस करीत राहिले. परत परत भेटी होत राहिल्या. गप्पा रंगत गेल्या. खरंतर ते खूप मोठे संपादक -लेखक आणि मी एक किरकोळ विद्यार्थी होतो. ते माझ्याशी अतिशय आपुलकीनं वागत असत. त्यांनी किर्लोस्करमध्ये एका अंकात ज्योत्स्ना भोळे, माधव गाडगीळ आणि मी अशा तिघांवर एकत्रितपणे लिहिलं होतं. ती दोन उत्तुंग माणसं आणि मी एक छोटासा पोरगा. मी झोपडपट्टीत चालवित असलेली बालवाडी, माझी चालू असलेली इतर सामाजिक कामं, वादविवाद- वक्तृत्व स्पर्धांमधली बक्षिसं, माझी कबरस्थानातली नोकरी, झोपडपट्टीतील घरात मी जमवलेली शेकडो पुस्तकं असं बरंच त्यांनी कौतुकानं लिहिलेलं होतं. माझ्याबद्द्लच्या किर्लोस्करमधील हमोंच्या त्या लेखनात समता प्रतिष्ठानचा उल्लेख नसल्याबद्दल डॉ. अनिल अवचट बरेच नाराज झालेले होते. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.
लोकप्रभाचे संपादक असताना हमोंच्या कौटुंबिक आयुष्यात काही वादळं आली. काही वर्तमानपत्रांनी त्यांना खूप झोडपलं. हमों खूप दुखावले गेले. तो राग त्यांनी कायम जपून ठेवला. तोवर प्रागतिक विचारांचे असलेले ह.मो. चक्क जातीच्या गडाला शरण गेले. एका जातीच्या नावानं काम करणार्‍या संघटनेचे गडकरी झाले. विद्वेषाच्या विरोधात अशी टॅगलाईन घेऊन एका जात संघटनेचं जोशात नेतृत्व करू लागले. पुस्तिका लिहून प्रकाशित करू लागले. तिथून हमोंचा आलेख घसरत जातीय झाला.
त्यांचे मला अनेकदा फोन येत. मी खूप लिहावं म्हणून फोनवरून व पत्रांद्वारे ते मला आग्रह करीत. भेटले की खूप बोलत.  ’महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन’ या माझ्या पुस्तकावर त्यांनी जिव्हाळ्यानं आणि विस्तारानं लिहिलं. माझ्या इतरही पुस्तकांवर ते लिहित राहिले. त्यांचे एसेमेस नियमितपणानं येत असत. अलिकडेच त्यांचा एक एसेमेस आला नी नंतर लगेच फोन आला. हरी, अरे तुला माहित आहे का तुझ्या नावानं व्हाट्स अ‍ॅपवर एक पोस्ट फिरतेय. लताबाईंबद्दलची. तुच लिहिलेयस का तुझ्या नावावर कोणीतरी हा उद्योग केलाय? ती पोस्ट मीच लिहिलेली आहे असं सांगताच ते त्यात भर घालणारी बरीच माहिती मला सांगत बसले. एक चौकस पत्रकार त्यांच्यात कायम दडलेला असे. समोरच्याकडून आपल्याला हवी ती माहिती ते खुबीनं काढून घेत. तिचा आपल्या लेखनात वापर करीत. त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी मला सप्रेम भेट दिलेली आहेत. मी त्यांच्या लेखणाचा चाहता आहे हे माहित असल्यानं माझ्या प्रतिक्रिया समजून घेण्यात त्यांना रस असायचा. सर, दर्जेदार लिहिलंय तुम्ही असं मी म्हटलं की खुलायचे, मात्र जमलं नाही सर, असं म्हटलं की "असं म्हणतोस? आता काय वय झालं रे आमचं", असं म्हणून दुसरा विषय काढायचे.

ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे होते. त्यांचं लेखन दर्जेदार असल्यानं तेच निवडून येतील अशी परिस्थिती होती. त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आणि स्वत:च्या प्रचार पत्रकात त्यांनी काही जातीय मुद्दे उपस्थित केले. साहित्यविश्व त्यांच्या विरोधात गेलं. हमो पडले. निवडून आलेले साहित्यिक खरंतर हमोंच्या तुलनेत दुय्यम होते. हमोंनी स्वत:च्या हातांनी पराभव ओढून आणला असंच म्हणावं लागेल. तेव्हा एका वाहिनीवरील चर्चेत मला त्यांच्यासमोर त्यांच्या विरोधात बोलावं लागलं. पण त्यांनी राग धरला नाही.
पुढं मराठीच्या अभिजात दर्जासाठी मी केलेलं काम ऎकून, वाचून महाराष्ट्र साहित्य परिषदेतील बैठकीत त्यांनी जाहीरपणे त्या कामाचं कौतुक केलं. फोनवरही त्याबद्दल ते माझ्याशी बरंच शाबासकी देणारं बोलले.
खाजगी गप्पातील काही ’ऑफ द रेकॉर्ड’ संदर्भ सार्वजनिक लेखनाद्वारे त्यांनी मुद्दाम प्रसिद्ध करून माझ्या एका साहित्यिक मित्राला अडचणीत आणल्यापासून मी त्यांच्यापासून सावध राहू लागलो. आजारपणांनी हमोंची घसरण आणि चिडचिड वाढतच गेली. ते अधिकाधिक जातीय होत गेले. विद्वेशकारी लिहू लागले. दरम्यान त्यांच्या लेखनातला सकस वाड्मयीन दर्जा त्यांना सोडून गेलेला होता.

एका प्रतिभावंत संपादकाची - लेखकाची अशी ही उतरती वाटचाल दु:खद होती.
गेल्यावर्षी दसर्‍याला पुस्तकपेठेच्या उद्घाटनाला ते आले होते. बर्‍याच गप्पा झाल्या. त्यांना लवकर घरी जायचं होतं, पण रिक्षा मिळेना. आनंद अवधानींनी आपल्या गाडीतून त्यांना घरी सोडलं. मीही सोबत होतो. मला आपलं घर दाखवून, हरी, येत जारे माझ्या घरी गप्पांना, असं ते म्हणाले. पण जाणं झालं नाही. तीच त्यांची शेवटची भेट ठरली.
तरूणपणी प्रागतिक असलेल्या मोठ्या कल्पक संपादकाची, ताकदीच्या लेखकाची आयुष्याच्या उत्तरार्धात झालेली ही जातीय गडावरची वाटचाल चटका लावणारी ठरली. ही शोकांतिका वयाची, व्यक्तीगत जीवनातल्या बदलत्या परिस्थितीची की कायापालट होत असलेल्या सामाजिक पर्यावरणाची?
- विनम्र आदरांजली.
-प्रा.हरी नरके