Sunday, October 15, 2017

चांदोबा

शाळेशेजारच्या कटींग सलूनमध्ये सकाळ,प्रभात,केसरी ही वर्तमानपत्रं यायची. पहिली दुसरीत असताना मी मोठ्यानं वाचायचो. ते काका स्वत: निरक्षर होते, पण गिर्‍हाईकांसाठी ते पेपर घ्यायचे.मी मोठ्यानं वाचत असल्यानं त्यांनाही बातम्या समजायच्या.एखाद्या दिवशी मी गेलो नाही तर ते चौकशी करायचे. एकदा ते म्हणाले, असं करू, तू दररोज येऊन दुपारच्या सुट्टीत मला पेपर वाचून दाखवायचा त्याच्या बदल्यात मी तु्झ्या कटींगचे पैसे घेणार नाही. हे अगदी भारी जमलं. कटींगच्या वाचलेल्या पैशातून मी चांदोबा घ्यायचो. एका रद्दीच्या दुकानात जुने चांदोबा वजनावर मिळायचे. तिथे काही जुनी पुस्तकंही मिळायची.राजपुत्र ठकसेन, हिमपरी आणि सात बुटके, शेपटीचा शाप, विक्रम आणि वेताळ असली तेव्हा विकत घेतलेली पुस्तकं छान कव्हर घालून त्यावर नाव, सही करून ठेवलेली. दीपावलीचा पहिला दिवाळी अंक तिथेच मी विकत घेतला. आजही तो जपून ठेवलेला आहे. ग्रंथालयांना पुस्तकदुकानात सवलत मिळते म्हणून चौथीत असताना मी घरातल्या ग्रंथसंग्रहाला अभिनव ग्रंथालय असं नाव दिलं. त्याचा एक रबरी शिक्का बनवून घेतला. त्यातून खरेदी केलेला पहिला समग्र लेखक म्हणजे राम गणेश गडकरी. नारायण पेठेतल्या रम्यकथा प्रकाशनाच्या मेहेंदळेंनी तेव्हा आगावू नोंदणी केल्यास हा संच निम्म्या किंमतीत दिला होता.
तर हा गडकरी संच खरेदी करायचा म्हणून नेहमीच्या दोन नोकर्‍यांव्यतिरिक्त जादा काम काय करता येईल याचा शोध चालू होता. आजुबाजूच्या शेतांच्या बांधावर मस्त गवत वाढलेलं असायचं. एकदा माझी मावशी आमच्याकडं आलेली असताना तिला म्हणलं, येतेस का आपण गवताचे भारे कापून नेऊन बाजारात विकूया. भरपूर कमाई होईल.ती आली. तिचा भारा मोठा असल्यानं त्याचे बारा आणे आले. माझा अगदीच लिंबूटिंबू असल्यानं चार आणे आले. आता हे पैसे साठवायचे आणि नारायण पेठेत जाऊन गडकरी समग्र संच घ्यायचा. घरी गाडग्या मडक्यांची उतरंड असायची.त्यात कडधान्यं आणि इतर कायकाय ठेवलेलं असायचं. मी त्यातल्या मधल्या गाडग्यात पैसे साठवायचो.
तर घरी आल्यावर आईला मोठ्या कौतुकानं सांगितलं, गवताचे पैसे आल्याचं. तिला गडकरी कोण हे काय माहित नव्हतं,पण पुस्तकं लिहितो म्हणजे असेल कोणीतरी मोठा माणूस. तिला ते चार आण्याचं नाणं दाखवावं म्हणून चड्डीच्या दोन्ही खिशात शोधलं. शर्टाचा खिसा उलटा करून बघितला. चार आणे काही सापडेनात.मला खूप रडू यायला लागलं. मावशी म्हणाली, जाऊ दे,रडू नकोस. हे माझ्याकडचे घे. पण मला माझ्याच कमाईचे चार आणे हवे होते. मी परतपरत शोधत राहिलो.
परत पैसे हरवल्याचा प्रचंड संताप आला.विनोदी प्रकार म्हणजे, चार आणे ते काय पण मी त्यासाठी वेडापिसा होऊन घराच्या भिंतीवर स्वत:चं डोकं आपटलं. चांगलंच टेंगूळ आलं. पण एक फायदा झाला. डोकं आपटतच डोक्यावरची टोपी खाली पडली आणि चार आण्याचं नाणं खानकन आवाज करीत टोपीतून बाहेर आलं.
सापडले, सापडले, माझे चार आणे सापडले, म्हणून किती उड्या मारल्या असतील त्याची गणतीच नाही.
पहिलीत असताना बालभारतीचं पुस्तक नव्वद पैशांना मिळायचं.आईनं एक रूपया दिला होता. उरलेले 10 पैसे जपून आण म्हणुन बजावलं होतं.
मी ते 10 पैसे खुप जपून ठेवले होते.
शेवटचा तास खेळाचा होता. शाळेच्या वाळूच्या ढिगावर आम्ही पोरांनी एव्हढ्या उड्या मारल्या, कायकाय खेळ केले की तास संपल्यावर लक्षात आलं आपले 10 पैसे गायब झालेत. वाळूत खुप शोधलं, पण उपयोग झाला नाही. त्यादिवशी खुप रडलो. आईनंही खुप मारलं.
पैसे हरवल्याची आठवण कायम राहावी यासाठी स्वत:ला शिक्षा करायची म्हणून खेळात माझं मन रमेनासं झालं.
तिथून पुढं इतर मुलं खेळत असायची तेव्हा मी वाचत बसायचो. 1969 साली त्या दिवशी खेळणं जे बंद झालं ते कायमचं. त्यानंतर मी कधीही कसलाही खेळ खेळलो नाही. मला कोणताही खेळ येत नाही. अगदी गोट्या, विटीदांडू, लंगडी, कबड्डी, खोखो, क्रिकेट कोणताही नाही.
-प्रा.हरी नरके 

No comments:

Post a Comment