प्रसिद्ध विचारवंत आणि माझे गुरू डॉ. य.दि.फडके हे हिंदी मसाला, मारधाड सिनेमे अतिशय आवडीनं बघायचे. ते मुळात एक रहस्यकथालेखक होते हे अनेकांना माहित नसेल. शाळेत असताना मलाही असल्या हिंदी सिनेमांची प्रचंड आवड होती. अनेकदा परवडत नसूनही अनंत, श्रीनाथ, अलंकार, अपोलो, लक्ष्मीनारायण, नटराज, राहुल,गुंजन,सोनमर्ग, वैभव अशा थिएटर्समध्ये जाऊन सिनेमे टाकायचो. काहीकाही सिनेमे तर लागोपाठ दोनतीन वेळा बघायचो. त्याकाळात अमिताभ खुपच आवडायचा. त्याचे दिवार, जंजीर, त्रिशूल, कभी कभी, मजबूर, शोले, आनंद, अभिमान, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अॅंथनी, परवरीश असले रग्गड सिनेमे तेव्हा पाहिलेले. आत्ता त्यातले काही फुक्कट दाखवले तरी बघण्याच्या लायकीचे वाटत नाहीत हा भाग वेगळा.
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मालकांच्या गाई चारायला नेल्या की मजुरीचा 1 रूपया मिळायचा. गाई कुरणात सोडल्या की त्या तिकडे रमायच्या. दिवार बघायचा मोह न आवरल्यानं काम सोडून म्हणजे गाई कुरणात सोडून पार श्रीनाथला सायकलवर गेलो आणि सिनेमाला बसलो. आणि दिवारमधला तो फेमस डायलॉग आला. "पीटर अभी ये ताला तुम्हारी जेब से चाभी निकालकर ही खोलुंगा!"
आणि का कुणास ठाऊक मला माझ्या सायकलच्या चावीची आठवण आली. सगळे खिसे चासपून झाले. चावी काही सापडेना. मी जाम अस्वस्थ झालो. चावी कशी काय हरवली? आता घरी कसं जाणार? तिकडे गाईंनी कायकाय उद्योग केले असतील माहित नाही. पडद्यावर सिनेमात अंधार पडला की मी हळूच खुर्चीवरून खाली उतरून चावी खुर्चीखाली तर पडली नाही ना हे हातानं तपासायचो. असं अनेकदा करूनही चावी काही सापडेना. मी शोधणं काही थांबवीना. सिनेमातलं पार लक्षच उडालं.
शेवटी सिनेमा संपल्यावर पार्कींगमध्ये धावत जाऊन आधी सायकल तपासली तर काय, चावी सायकलच्या कुलुपातच राहिलेली.
चावी शोधण्यात सिनेमा गेला याचा खुप राग आलेला.
कुरणात जाऊन बघतो तो गाईंचा पत्ता नाही. जाम टरकलो. गाई हरवल्या तर आपली नोकरी जाणार, मालक कदाचित पोलीसातही देतील.
इकडेतिकडे शोधल्यावर एका गुराख्यानं सांगितलं, तुझ्या गाई शेजारच्या शेतात शिरल्या होत्या म्हणून त्या शेतमालकानं कोंडवाड्यात नेल्यात गाई. धावतपळत कोंडवाड्यात गेलो. तिथल्या माणसानं सांगितलेला दंड भरणं मला शक्यच नव्हतं.
खुप गवावया केली. हातापाया पडलो.
तो म्हणाला, गाई चरत असताना तुझं लक्ष कुठं होतं?
म्हणलो, मी सिनेमाला गेल्तो.
तो म्हनला, कोन्त्या?
दिवार.
काय बोलतोस? कोन्त्या थेटरला?
श्रीनाथ.
आयला, मी पण होतो श्रीनाथला.
अरे माझ्या शेजारी तुझ्यासारखंच दिसणारं कोणतरी एडपट बसलं होतं. पडद्यावर अंधार पडला की ते बेनं खाली उतरायचं आणि हातानं खुर्चीखाली काही तरी चासपून बघायचं, त्यामुळं दिवार मला नीट बघताच आला नाय.
मी म्हणलं, तो मीच होतो.
काय शोधत होतास?
सायकलची चावी.
मायला, गपचुप उद्याच्या शोची तिकटं काढून आणलास तर तुझ्या गाई सोडतो. अमिता बच्चनसाठी दंड माफ. मातर कुठंही बोंब मारायची नाय.
मग काय दुसर्या दिवशी फिर से दिवार. अगदी शान से. ...
- प्रा. हरी नरके
................
No comments:
Post a Comment