Tuesday, July 21, 2020

कोरोना लस निर्मितीचा प्रवास- Saniya Bhalerao


ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि फेज २ क्लिनिकल ट्रायल्स संदर्भातला एक १३ पानाचा रिसर्च पेपर वाचला जो ‘द लॅन्सेट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. “द लॅन्सेट” हे जगातील मेडिकल सायन्सच्या सर्वोत्तम जर्नल्सपैकी एक. या जर्नलमध्ये नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाने एस्ट्राझिनका या फार्मास्युटिकल कंपीनीसोबत काम करत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्स संदर्भात आणि परिणामकारकतेबाबत एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि दोन या क्लिनिकल ट्रायल्सचे डिडेल्ड रिपोर्ट्स त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये दिले आहेत. मागच्या लेखात मी सांगितलं होतं की व्हॅक्सिन तयार होणं आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्स याची प्रोसेस काय असते ते. उगाच इथे तिथे छापून येणाऱ्या बातम्या, व्हॅक्सिन कधी येणार या बाबत उलट सुलट चर्चा आणि त्यातून पसरणारा गैरसमज कमी व्हावा त्याकरिता हा लेख. (लॅन्सेट मध्ये चायना मधल्या एका कंपनीच्या व्हॅक्सीनच्या फेज २ ट्रायल्सच्या प्रॉमिसिंग रिझल्ट्सबद्दल सुद्धा छापून आलं आहे.)

सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छिते की हे व्हॅक्सिन विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांची नावं. ही नावं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या रिसर्च फिल्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. कारण हे लोक आमचे हिरो आहेत. यातल्या काही शात्रज्ञांचे रिसर्च पेपर्स कितीदा तरी वाचले आहेत. यांच्या रिसर्च पेपर्सना करोडो सायटेशन्स असतात आणि कित्येक वर्षांपासून हे लोक शांतपणे पडद्यामागे बसून आपलं काम करत आले आहेत आणि म्हणून यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं. ऑक्सफर्ड विद्यापिठामधील प्रोफेसर सारा गिलबर्ट, प्रोफेसर अँड्रयू पोलार्ड, जेन्नर इन्टिट्यूटचे डायरेक्टर प्रोफेसर एड्रियन हिल, जेन्नर इन्टिट्यूटमधील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर टेरेसा लॅम्बे हे या संशोधनाच्या मुख्य टीमला लीड करता आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून कित्येक नावाजलेले शास्त्रज्ञ या टीमचा भाग आहेत.

आता आपण ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या रिझल्ट बद्दल बघूया. तेवीस एप्रिल ते एकवीस मे या काळात फेज १ आणि फेज दोन या क्लिनिकल ट्रायल्स साधारण १०७७ पेशंट्सवर केल्या गेल्या. रिसर्च पेपर मधल्या मेथेडॉलॉजीमध्ये न पडता आपण त्यांना मिळालेल्या फाईंडिंग्ज बघूया. मी मागच्या लेखात सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हॅक्सिनचा डोस दिल्यावर कोरोना व्हायरसला व्हॅक्सिन किती प्रमाणात न्यूट्रलाइज करू शकतं यावरून ते व्हॅक्सिन कोरोना व्हायरसला रोखण्यात किती प्रमाणात प्रभावी ठरतं हे आपल्याला कळतं. यासाठी 'न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स' बघितला जातो. हे व्हॅक्सिन दिल्यानंतर नुसतेच अँन्टीबॉडीज नाही तर टी सेल रिस्पॉन्स देखील मोजल्या जातो. एलायझासारखे ऐसे (चाचणी) या करिता वापरले जातात. कोरोना झाल्यावर त्याविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीजची गरज असते आणि जर कधी आपल्याला परत कोरोना झाला तर हे 'टी सेल्स' लक्षात ठेवून परत त्याच अँटीबॉडीज बनवायची ऑर्डर देतात. म्हणून ह्युमोरल इम्युनिटी जी हे अँटीबॉडीज तयार करते आणि सेलूयलर इम्युनिटी जी 'टी सेल्स' तयार करते या दोन्हीही अत्यंत गरजेच्या आणि व्हॅक्सिन दिल्यावर हे दोनीही रिस्पॉन्स मेजर करणं आणि त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं.ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे दोनीही फॅक्टर लक्षात घेऊन सर्व चाचण्या केल्या आहेत. तर सार्स कोव्ह २ (कोरोना व्हायरस) च्या विरुद्ध मिळालेला न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स हा सिंगल डोस करिता ९१ टक्के ( ३५ पैकी ३१ सब्जेक्टस्) होता आणि डबल डोस करिता १०० टक्के ( ३५ पैकी ३५ सब्जेक्टस्) होता. बूस्टर डोस दिल्यानंतर सर्व या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या सर्व माणसांमध्ये १०० टक्के न्यूट्रलाइजिंग रिस्पॉन्स आढळून आला.

हा रिसर्च पेपर पूर्ण वाचल्यावर थोडक्यात इंटरप्रिटेशन असं आहे की ChAdOx1 nCoV-19 हे जे ऑक्सफर्ड विद्यापीठाचं कोरोना व्हॅक्सिन आहे, ते स्वीकारार्ह सेफ्टी प्रोफाइल दाखवते आहे. तसंच या व्हॅक्सिनचे होमोलॉगस बुस्टिंग ( म्हणजे व्हॅक्सिनचे एका पाठोपाठ काही काळाने दिले जाणारे डोसेस) अँटीबॉडी रिस्पॉन्स वाढवतो आहे म्हणजे व्हॅक्सिनची परिणामकारकता वाढवतं आहे. हे व्हॅक्सिन ह्युमोरल आणि सेलूयलर असे दोनीही इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स दाखवतं आहे आणि त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या फेज ३ ट्रायलसाठी हे एक पोटेन्शियल कँडिडेट ठरलं आहे.

सगळ्यात आधी हाय रिस्कमधल्या लोकांना जे समाजासाठी आपल्या तब्येतीची काळजी न करता काम करत आहेत, तसेच पासष्टवर्षांपेक्षा जास्तं वय असलेले लोक, यांना इम्युनाईज केलं पाहिजे असं इथे म्हटलं आहे. त्यामुळे आता हाय रिस्कमध्ये असणारे लोक म्हणजे हेल्थ केअर प्रोफेशनल्स, वृद्ध लोक, नर्सेस अशा सगळ्यांवर ट्रायल्स घेणं सुद्धा सुरु आहे. एकदा का फेज ३ ट्रायल्सचे सर्व रिझल्ट आले की मग लहान मुलांवर सुद्धा ट्रायल्स घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करणं हे महत्वाचं. द लॅन्सेट या जर्नलच्या एडिटोरियलमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की, "व्हॅक्सिन त्वरित बाहेर यावं या करिता ही जी काही रेस चालू आहे ती दिसते आहे. आपल्या सगळ्यांनाच एक उपाय हवा आहे पण या सगळ्यामध्ये हे विसरून चालणार नाही की उपाया बरोबरच सेफ्टी ही सर्वोच्च महत्वाची बाब आहे"

आता नेहेमीचा प्रश्न : मग हे व्हॅक्सिन आपल्याकडे कधी येईल?

आता पर्यंत आपण पाहिलं की या व्हॅक्सिनचा प्रवास कसा चालू आहे ते. ते परिणामकारक आहे हे आता आपल्याला कळलं आहे. आता त्याचा डोस किती पाहिजे, त्याची इफिकसी लेव्हल किती आहे अशा चाचण्या फेज ३ मध्ये पार पडतील. सेफ्टी स्टडीज होतील. जेव्हा फेज ३ ट्रायल्स पूर्ण होतील आणि सर्व पॅरामीटर्स वर हे व्हॅक्सिन खरं उतरेल तेव्हा या व्हॅक्सिनच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळेल. सिरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड बरोबर करार केलेला आहे त्यामुळे फेज ३ ट्रायल्स यशस्वी रित्या पार पडल्या की व्हॅक्सिन निर्मिती सुरु होईल. शास्त्रज्ञ, टेक्निशियन्स, ते सर्व लोक जे स्वतः व्हॉलेंटियर म्हणून क्लिनिकल ट्रायल्स साठी भरती झाले आहेत.. हे सर्व जण आपापल्या भूमिका निभवता आहेत. आपण सुद्धा सुजाण आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका निभावू. कोरोना संदर्भातल्या अर्थहीन बातम्या, फॉवर्ड्स पुढे न पसरवणं, पेशंट्सच्या प्रति अनुकंपा बाळगणं आणि न घाबरता शास्त्रीय दृष्टीकोनातून खबरदारी घेत जगणं.. हे करूया.

क्लिनिकल ट्रायल्स कशा गरीब लोकांवर घेतल्या जातात, कसे अत्याचार होतात असं काही लोकांना वाटतं पण फेअर क्लिनिकल ट्रायल्स सुद्धा होत असतात आणि एथिकल फार्मा प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने फॉलो केल्या जाव्यात याचा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या क्लिनिकल ट्रायल्स हा एक उत्तम नमुना आहे. कोरोना सारखा आजार ज्याने आज सगळ्या जगाला वेठीस धरलं आहे त्यावर व्हॅक्सिन बनतं आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. नागरिक म्हणून यात आपण काहीतरी काँट्रीब्युट करावं अशी भावना ठेवून कित्येक जण ऑक्सफर्डच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये व्हॉलेंटिअर म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांना काय वाटलं या प्रोसेसमध्ये या व्हिडीओज च्या लिंक सुद्धा देते आहे. अजून एक गमतीचा भाग हा की यामधला एक व्हॉलेंटिअर भारतीय वंशाचा होता. आपल्याकडच्या एका न्यूज चॅनेलने त्याचा व्हिडीओ घेतला. त्यामध्ये पत्रकाराने त्या माणसाला विचारलं की तुला काय वाटतं मग कधी हे व्हॅक्सिन येईल? मीडिया कन्क्ल्युजनला येण्यासाठी इतकी घाई का करतं आहे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. यात जो व्हॉलेंटिअर होता तो अतिशय समजूतदार असल्याने त्याने फेज तीन ट्रायल्स पूर्ण झाल्या की हे सांगता येईल असं म्हटलं ते उत्तम केलं पण कोणाला काय विचारायचं निदान कोरोना सारख्या पँडेमिकबाबत बातमी देताना याचं तारतम्य मीडियाने बाळगलं पाहिजे. त्यामानाने रवीश कुमार यांनी याच माणसाचा घेतलेला इंटरव्ह्यू हा जास्त सेन्सिबल वाटला. या दोनीही व्हिडीओजच्या लिंक सुद्धा शेअर करते आहे. आदर पुनावाला यांच्या इंटरव्ह्यूची लिंक देते आहे. ती पण जरूर बघा. आपल्याला जे ऐकायचं आहे त्यापलीकडे जाऊन ऐका. त्यातला मूळ मुद्दा समजावून घ्या. ऑक्सफर्डने विद्यापीठाने यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घेऊन एक छोटा व्हिडीओ काल पब्लिश केला आहे. त्याची लिंक सुद्धा देते आहे. पारदर्शकता काय असते. विज्ञानाला आणि त्यावर काम करणाऱ्या माणसांना किती अनन्य साधारण महत्व असतं ये यानिमित्ताने आपल्याकडच्या लोकांना कळेल आणि कदाचित आपल्याकडे यावर काम करणाऱ्या लोकांना निदान चिमूटभर का होईना पण मान आपल्याला देता येईल. यात व्हिडिओ आहेत जे पाहून गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. पोस्ट पब्लिक आहे. शेअर करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, स्वतः वाचा, माहिती पडताळा आणि मगच शेअर करा.

रेफरन्ससाठी लिंक्स देते आहे:

1) https://www.youtube.com/watch?v=HiLdEaSOJN4
2) https://www.youtube.com/watch?v=wPTv11qWuIQ
3) https://www.youtube.com/watch?v=-szt0u2X0WI
4)https://www.youtube.com/watch?v=LwqfZwkJtSg
5)https://www.youtube.com/watch?v=mj3kOL83mvA
6)https://www.youtube.com/watch?v=7MjBuyO_OcA
7)https://youtu.be/AbSSuz-DhFc

©सानिया भालेराव
२१/७/२०२०
#oxfordcovidvaccine
https://www.facebook.com/saniya.bhalerao


Sunday, July 19, 2020

निसर्गाचे सोयरे सावतोबा आणि आधुनिक महाराष्ट्राची नाममुद्रा



रिंगणचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले त्यावेळी उपस्थित असलेले प्रा.सदानंद मोरे, सचिन परब, प्रा. अभय टिळक





महाराष्ट्राच्या मध्ययुगीन जडणघडणीत संतांच्या योगदानाचा तर आधुनिक जडणघडणीत समाजसुधारकांच्या योगदानाचा सर्वाधिक वाटा आहे. वारकरी चळवळ ही महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली चळवळ आहे. आज देशातल्या ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राची स्वत:ची ठसठसीत अशी नाममुद्रा आहे आणि तिची निर्मिती करण्यात वारकरी चळवळ अग्रभागी राहिलेली आहे.
मराठा सत्तेच्या निर्मितीमागे सावता- नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकोबा यांच्या विचारांचा अभेद्य किल्ला होता हे न्या.म.गो.रानडे यांनी आपल्या "राईज ऑफ मराठा पॉवर" या ग्रंथात सप्रमाण मांडलेलं आहे.


"संत साहित्याची सामाजिक आणि राजकीय फलशृती"  प्रा.गं.बा. सरदार यांनी आपल्या दोन ग्रंथांमध्ये विशद केलेली आहे. संत सावता दर्शन या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, "अवघियापुरते वोसंडले पात्र! अधिकार सर्वत्र आहे येथे" अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्वावर ज्ञानदेव - नामदेवांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात भागवत धर्माची - वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते. तरीदेखील त्यांच्या तत्वनिरूपणात आणि भक्तीपर वांड्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे.



किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभलेली आहे. ह्या मध्ययुगीन संत मंडळाच्या काळात धर्म हाच कौटुंबिक व सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून ज्यांना ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्व व अपप्रवृत्ती नष्ट करून त्याला नवे वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी त्यांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली. मराठी संत मंडळाच्या कार्याचे मूल्यमापन करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे."


संत सावता महाराज यांचा जन्म इ.स. १२५० सालचा होता. त्यांना अवघे ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी इ.स.१२९५ मध्ये या जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्रीय  संत मंडळात ते ज्येष्ठ होते. संत निवृत्तीनाथ, इ.स.१२६८ते १२९६, ज्ञानदेव-१२७१ ते १२९३, नामदेव- १२७० ते १३५०, हा पहिल्या पिढीतील वारकरी संतांचा जीवनप्रवास बघता संतशिरोमणी सावता महाराज हेच सर्वात आधीचे होते यात वाद नाही.


साहित्यिक योगदानाचा विचार करताना जरी सावता महाराजांचे अवघे ३७ अभंग आज उपलब्ध असले तरी केवळ संख्या न बघता त्यांची वांड्मयीन महत्ता लक्षात घेणे गरजेचे ठरते.


ज्या सोप्या, सहज, प्रवाही भाषेत त्यांनी लिहिले ते बघता ही भाषा आजची वाटते. सुमारे ८०० वर्षांपुर्वीची भाषा आजची वाटावी ही फार मोठी बाब आहे. पुढच्या काळात तुकोबा म्हणाले होते, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!" अशा शब्दात व्यक्त होत निसर्गाशी एकरूप होणारे तुकोबा हे सावतामहाराजांचे पुढच्या काळातले महत्वाच्रे वारस ठरतात.


"कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी
मोट, नाडा, विहीर, दोरी, अवघी व्यापिली पंढरी,
सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा"


या शब्दात त्यांनी हिरवेगार शेत साहित्यात आणि समाजजीवनात अजरामर करून टाकले. निसर्गाशी जगण्याचं असं अविभाज्य नातं निर्माण करणारे सावता महाराज त्यामुळेच आजचे कवी ठरतात. त्यांची ही हिरवीकंच संवेदना आजची संवेदना बनते.


शेतात राबणारे आणि निर्मितीचे डोहाळे लागलेले त्यांचे हात मातीशी दोस्ती करणारे हात आहेत.
"आम्हा हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा,
शांति शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली
सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा
स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात"


या पद्धतीने आपले काम हेच आपल्या मुक्तीचे, आनंदाचे, मोक्षाचे साधन आहे हा त्यांनी मांडलेला विचार तर अगदी आधुनिक विचार आहे. पाश्चात्य जगात कालपरवा सांगितला गेलेला "वर्क इज वर्शीप" हा विचार सावता महाराजांनी आठशे वर्षांपुर्वी मांडावा यातनं त्यांचं द्रष्टेपण आणि काळाच्या पुढे असण्याचा जीवनहेतू स्पष्ट होतो.


मध्ययुगीन भारतात जातीयतेची बजबजपुरी माजलेली होती. अशा काळात बलुतेदार-अलुतेदार, कारू नारू समाजातून आलेल्या संतांना त्याचा काच सोसावा लागत होता. ती वेदना त्यांच्या शब्दातून प्रगट ना होती तरच नवल.


"माझी हिन याती,"
"भली केली हीन याती,"


"सावता म्हणे हीन याती" या शब्दांमधून ही जातीपातीची समाजव्यवस्था ते टिपतात. मात्र ते सतत तक्रार करीत बसत नाहीत.


"आमुचि माळीयाची जात, शेत लावू बागाईत," अशा सकारात्मक पद्धतीने प्राप्त परिस्थितीतही ते आनंद शोधतात.


"झणी उतरा निंबलोण" "प्रेमे वनमाळी चित्ते धरू," "उगाच वणवा लागे देही", अशा शुद्ध मराठमोळ्या रचना हे त्यांचे वैशिष्ट्य.


"नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची" या भुमिकेतून त्यांनी काळाच्या मर्यादा पडलेल्या असतानाही इथल्या उच्चवर्णीय दांभिकतेवर कोरडे ओढलेले दिसतात.


तुकोबांच्या रचनांवर सावता महाराजांच्या शब्दकळेचा प्रभाव पडलेला असावा.
"नामाचिया बळे न भिऊ सर्वथा,


कळीकाळाच्या माथा सोटे मारू" ही सावतोबांची रचना आणि "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" ही तुकोबांची रचना समोरासमोरा ठेऊन बघावी किंवा "बरे झाले देवा
कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मोकलिलो" हे तुकोबांचे प्रांजळ उद्गार  आणि "नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची
जरी असता ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म" हा सावतोबांचा कबुलीजबाब एकत्रित पाहावा.



"प्रपंची असूनी परमार्थ साधावा
वाचे आठवावा पांडुरंग" ही सावतोबांची मांडणी कष्टकरी समाजाला आपलीशी वाटणे स्वाभाविक होते.
नामदेवांनी नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी म्हटलं. तर सावतोबांनी "वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगी" म्हटलं. हा प्रभावही महत्वाचा ठरावा.



खरंतर ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकोबा यांच्या जशा समग्र रचना उपलब्ध आहेत तशा अन्य संतांच्या नाहीत. काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या असाव्यात ही चरित्रकारांची भिती मला बरोबर वाटते.
सावतोबा, नामदेव, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, जोगा परमानंद, जगमित्र नागा, बंका महार, चोखा मेळा, कर्म मेळा, जनाबाई, अशा विविध कष्टकरी आणि निर्माणकर्त्या समाजातून आलेल्या संतांनी फुलवलेले सर्जनाचे मळे बघितले की ही मराठमोळी माती श्रीमंत कशी आणि का झाली याचा उलगडा होतो.



ज्ञानदेव जरी ब्राह्मण असले तरी ते बहिष्कृत होते आणि एकनाथसुद्धा "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली ?" असा रोकडा प्रश्न विचारून प्रस्थापितांना आव्हान देणारेच होते.
सामान्य माणसाचे जगणे श्रीमंत व्हावे, समृद्ध व्हावे, समाधानी व्हावे यासाठी चाललेली ही धडपड होती. ती पाहिली की अठराव्या-एकोणीसाव्या शतकात महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ, न्यायमुर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, सर रा.गो.भांडारकर, प्रार्थना समाज, लोकहितवादी, आगरकर, कर्वे आणि पुढे विनोबा, गांधी, साने गुरूजी यांची वाटचाल नेमकी कोणत्या प्रकाशात होत होती त्याचा उलगडा करता येतो.



महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना नेमकी कोणती प्रेरणा त्यामागे होती याचा दस्तऎवज म्हणजे "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" हा ग्रंथ होय. तुकाराम हनमंत पिंजण या संत तुकोबांच्या वंशजांचे नातेवाईक असलेल्या अभ्यासकाचे याबद्दलचे टीपण अतिशय मौलिक आहे. ते म्हणतात, त्याकाळात महात्मा जोतीराव फुले आणि त्यांचे सगळे सहकारी संत कबीर यांच्या बिजक या ग्रंथाचे जाहीर वाचन करीत असत आणि त्यावर चर्चा व चिंतन-मंथन होत असे. महान बौद्ध दार्शनिक अश्वघोष यांनी लिहिलेल्या "वज्रसुची" या ग्रंथावरचा सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांचा "जातीभेद विवेकसार" हा ग्रंथ १८६५ साली जोतीरावांनी प्रकाशित केलेला होता. तुकोबांच्या साहित्याने तर जोतीराव भारावलेलेच होते.
अशा परिस्थितीत जोतीरावांच्या सत्यशोधक समाज निर्मितीमागे संत चळवळीच्या योगदानाचा अतिशय गडद प्रभाव असणं स्वाभाविक होतं.


सत्यशोधक समाजातले सगळे प्रमुख सहकारी हे वारकरी कुटुंबातून आलेले होते. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या काही वर्षांचे अहवाल आपण जर नजरेखालून घातले तर आपल्याला कळेल की त्यातले ९० टक्क्यांहून अधिक साथीदार हे वारकरी होते.


"जोतीबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास" असे उद्गार एका वृद्ध वारकर्‍याने का काढले होते त्याचा प्रसंग "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" मध्ये आलेला आहे.


"एकदा आळंदीचे वारीस आम्ही काही मंडळी जात होतो. महात्मा जोतीराव फुले यांच्या व्याख्यानासाठी मारूतराव नवले, भाऊ पाटील डुंबरे, बिरमल व मी असे चौघेजण आम्ही महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत चाललो होतो. थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढे आम्ही बोलत बोलत चाललो होतो. इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीहून परत येत होता.


म्हातारा पुण्याकडे चालला होता. दुपारची वेळ होती. अतिशय भूक व तहान लागल्यामुळे तो धापा टाकीत चालला होता. कसे तरी दिघीस जावे असा त्याचा विचार होता. पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्या जवळ गेलो. आमच्या सोबतचे एक वारकरी हसून त्याला म्हणाले, "वारकरीबुवा, तुम्ही आता म्हातारे झालात, आता वारी कशाला करता? जा वैकुंठाला."



तो गृहस्थ त्या म्हातार्‍याची चेष्टा करीत होता. म्हातारा तर बेशुद्ध पडलेला होता. तो बिचारा काय बोलणार?
महात्माजीस त्याची दया आली. त्यांनी त्याला मांडीवर घेतले. आम्हाला पाणी आणायला पिटाळले. नवले व मी पळत गेलो. दूर एक विहीर दिसली.



तेथे गेलो. विहीरीवर व आमच्याजवळही पाणी काढायला भांडे नव्हते. नवल्यांच्या पागोटीला माझे उपरणे बांधून ते विहीरीत सोडले. व ते पाण्यात भिजवून पळत घेऊन गेलो. ते पिळून थोडे पाणी म्हातार्‍याच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाजले.


थोड्या वेळाने म्हातारा शुद्धीवर आला. महात्माजींनी त्याला शिदोरीतून थोडी भाकरी काढून दिली. म्हातारा गहिवरला.
महात्माजीस म्हणाला, "बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास."
म्हातारा महात्माजींच्या पाया पडू लागला.



महात्माजी म्हणाले, "वारकरी बाबा, मी जी तुमची अल्प सेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून, उद्या मलाही तुमच्यासारखे म्हातारे व्हायचे आहे, तेव्हा ती मी माझ्याचसाठी केली आहे."


बरोबरचे गृहस्थ व इतर जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करीत निघून गेले. आम्ही महातार्‍याला रस्त्याने लावून दिले आणि आपल्या उद्योगाला पुढे निघून गेलो."
 हा अनुभव आहे सत्यशोधक तात्यासाहेब धोंडीबा रोडे यांचा. ते महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी व सहकारी होते.


हा मूळ लेख आपण
"आम्ही पाहिलेले महात्मा फुले", महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१९ , पृ. ७४व ७५ यात वाचू शकाल.
जोतीराव नियमितपणे आळंदी व देहूला जात असत. त्याच्या अनेक आठवणी या ग्रंथात आलेल्या आहेत.
जोतीरावांनी रूढी,परंपरा, जातीव्यवस्था, लिंगभाव यांच्यावर कठोरपणे आसूड ओढले. त्यांची समाज क्रांतीची भाषा बघून अनेकांचा असा समज होतो की ते वारकरी चळवळीच्या वा६यालाही उभे राहत नसतील. प्रत्यक्षात जोतीराव आणि अनेक सत्यशोधक यांच्या वैचारिक जडणघडणीवर संत साहित्याचा, विशेषत: सावतोबा, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकोबा यांच्या विचारांची अमीट छाप होती.


"जोती म्हणे" या नाममुद्रेने जोतीरावांनी लिहिलेले क्रांतिकारक अखंड = अभंग, हे तर या परंपरेचे, हा सामाजिक - वैचारिक वारसा पुढे नेणारे फार महत्वाचे विचारधन आहे.







 - प्रा. हरी नरके
मित्रवर्य सचिन परब यांच्या आग्रहाखातर रिंगणसाठी लिहिलेला खास लेख

Saturday, July 18, 2020

लोकशाही प्रबोधन व्यासपीठ-मतदार जागृतीसाठी जागर






हे छायाचित्र ऎतिहासिक आहे. ते एका अनोख्या लढ्याचे छायाचित्र आहे. त्यात डावीकडून उजवीकडे दिसत आहेत, विद्या बाळ, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, प्रा. हरी नरके, आणि कोल्हापूरचे काही स्थानिक मान्यवर. निळू फुले बोलत असतानाचे हे छायचित्र असल्याने ते यात दिसत नाहीत. आणखी दोघे यात दिसत नाहीत. एक आमीर खान आणि दुसरे डॉ. नरेंद्र दाभोलकर.


१९९० च्या दशकात वरील मान्यवरांसोबत आम्ही काही लोकांनी देशातील सार्वत्रिक निवडणूकीच्या तोंडावर मतदार जागृतीसाठी उभारलेल्या जागराचे हे छायचित्र आहे. मी "लोकशाही प्रबोधन व्यासपीठा"च्या उपक्रमात सहभागी होणारा सर्वात ज्युनिअर माणूस. बाकीची सारीच दिग्गज आणि ग्लॅमर असलेली माणसे होती. मला लिंबूटिंबूला त्यांनी सोबत कसे काय घेतले माहित नाही.

आमचा दौरा औरंगाबादपासून सुरू झाला. तिथली सभा तुफान गाजली. तुडुंब गर्दी होती. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांनी भरपूर कव्हरेज दिले. त्यांनतरचे आमचे मुक्काम, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर आणि समारोप मुंबईत.चढत्या श्रेणीत गर्दी आणि प्रतिसाद वाढत गेला. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या समारोपाच्या सभेला अभिनेता आमीर खान उपस्थित होता.

सभेत आमचे काय बोलायचे ते आधीच ठरलेले असायचे. काय बोलायचे नाही यावरही आम्ही ठाम होतो. कोणत्याही उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव घ्यायचे नाही. कोणावरही थेट नावाने हल्ला करायचा नाही. संसदीय भाषाच वापरायची. किस्से, अनुभव, संविधानातले मुद्दे असे भरपूर यायचे. लोक जबरदस्त दाद द्यायचे. एक तुफान झिंग असायची. रोजचा प्रयोग जणू हाऊसफुल्ल आणि सुपरहिट असायचा.

संयमाने बोलायचे. जातीयवाद्यांपासून सावध रहा, संविधानावर विश्वास नसलेल्या प्रतिगामी शक्तीला पराभूत करा, सेक्युलर मुल्ये, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर विश्वास असलेल्यांनाच आपली मते द्या. मतचा अधिकार विकू नका. भ्रष्ट, जातीयवादी, धर्मांधांना पाडा. फुले-शाहू- आंबेडकर-गांधी यांची मुल्ये मानणारेच निवडा. उन्माद, विंध्वंस, बाहुबलवाल्यांना चुकुनही मते देऊ नका. इ.इ.

प्रवास, सभा, निवास, प्रसिद्धी ही सारी व्यवस्था नरूभाऊ सांभाळायचे. त्यांच्याइतका उत्तम संघटक, व्यवस्थापक मी कार्पोरेटमध्येही आजवर बघितलेला नाही. अतुलनीय कौशल्ये.


सभेचे अवघ्या ५ मिनिटात स्वागत, प्रास्ताविक ते करायचे. ते स्टेजवर बसायचेच नाहीत. फोनाफोनी, व्यवस्था,पत्रकार यांच्यासाठी ते पुढच्या कामाला लागायचे. मग माझी बारी असायची. मी ओपनिंग बॅट्समन असल्याने चांगला २५ ते ३० मिनिटे बोलायचो. तसे ठरलेलेच होते. माझ्यानंतर अमरापुकर, त्यानंतर निळूभाई आणि सर्वात शेवटी डॉ. लागू बोलायचे. ते तिघेही प्रत्येकी ५ ते १० मिनिटेच बोलायचे. एकुण दीडेक तासात सभा संपायची. मग आम्ही सगळे स्टेजवरून प्रवेशद्वारावर जायचो.

हातात झोळ्या घेऊन उभे राहायचो. लोकांना माईकवरून आवाहन केलेल जायचे, तुमच्याकडचा अधेली, पावली, रुपया आम्हाला सहभाग म्हणुन द्या. लोक जे पैसे आमच्या झोळीत टाकायचे त्यातून सभेचा खर्च, आमचा प्रवास खर्च, स्थानिक निवास, भोजन खर्च निभवायचा. आमच्यापैकी कुणीही मानधन घेत नसे. मी दररोज कधी निळूभाऊ, तर कधी अमरापूरकर, कधी नरूभाऊ यांच्या रुममध्ये राहायचो.

लागूंना प्रायव्हसी लागे. बाकी सारे म्हणजे सार्वजनिक मामला. रात्री उशीरापर्यंत गप्पांच्या मैफिली सजायच्या....

प्रवासात पुन्हा गप्पाच गप्पा. तो आठवडा जादूभरला होता. या भल्या आणि ख्यातनाम लोकांनी मला मायेने वागवले. मी चिमुकला होतो. पण त्यांचा सार्‍यांचा माझ्यावर जीव होता. राजापूरच्या सभेत मी घातलेला निळा शर्ट बघून डॉ. लागू मला म्हणाले, " वा, किती छानय तुझा शर्ट. एकदम फ्रेश. कुठून घेतलास हरी?"
मी इतका हरखून गेलो, मोहरलो की तो प्रसंग माझ्या आयुष्यतला मी कायम काळीजतळाशी जपलेला प्रसंग आहे.

पुढे काही वर्षांनी तो शर्ट फाटला तरी मी पुढे तो कायम जपून ठेवला. आजही तो शर्ट मला डॉ. लागूंच्या त्या अभिप्रायाची आठवण देतो. सुखावतो. डॉ. लागूंची अभिरूची फार उच्च दर्जाची होती. ते उगीच कशालाही चांगलं असं तोंडदेखलं म्हणणारे नव्हते.

ते तिघेही माझ्या भाषणाला मनापासून दाद द्यायचे. परिणामी मी प्रत्येक सभेत नवं बोलायचो. अधिक पकड घेणारं बोलायचो. निळूभाऊ माझ्यावर कायम वडीलांसारखी पाखर घालायचे. या दौर्‍याने हेच बंध अमरापूरकरांशी जुळले. डॉ. लागू तसे काहीसे महानगरी, अंतर ठेऊन वागणारे.


पण तेही यानंतर माझ्याबाबतीत बदलले. वर्तमानपत्रातले स्थानिक कार्यक्रम वाचून माझ्या भाषणाला पुण्यात कुठे कुठे यायचे. एकदा असेच ते स्वारगेटच्या गणेश कला क्रीडाला केवळ मला ऎकायला आले. पण संयोजक ब्राह्मणद्वेष्टे होते. त्यांनी डॉ. लागूंना खोटेनाटे सांगून परत पाठवले आणि नंतर मला मोठ्या ऎटीत सांगितले, आम्ही त्या बामणाला पिटाळून लावला. मला अतिशय वेदना झाल्या. मी त्यांना झापडले. त्यानंतर मी आयुष्यात कधीही त्या संयोजक संस्थेच्या स्टेजवर गेलो नाही. त्यांनी मला भरपूर बदनाम करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला पण मी बधलो नाही. मी डॉ. लागूंची घरी जाऊन माफी मागितली.


एकदा अचानक डॉ. लागू पी.के. चित्रपट बघायला आलेले असताना थिएटरवर भेटले. माझ्यावर रागावले. घरी का येत नाहीस? म्हणून ते माझ्यावर चिडले होते. संगिताला सांगत होते, मी सहजासहजी कोणाला वेळ देत नाही, आणि हा भला माणूस माझ्याकडे यावा असे मला वाटते तर हा येतच नाही. परवा तु याला घेऊन येच.


या दौर्‍याच्या विलक्षण आठवणी आहेत. आमच्या राजापूरच्या सभेवर हल्ला होणार होता. आमच्या प्रत्येक सभेत काहीतरी घडायचेच. कुठे वीज गायब केली जायची. कुठे हॉटेलात ऎनवेळी आमचे रिझर्व्हेशन विरोधी उमेदवाराच्या दबावापोटी रद्द केले जायचे. प्रवासात तर धमाल व्हायची. कित्येक अपघात, थरार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटोसाठी, सहीसाठी रुसवे फुगवे! सवडीने सारे लिहायला हवे. नोट्स आहेत. डायरीही आहे.


आज आम्हा पाचजणातले चौघे या जगात नाहीत. किती भली आणि कळवळ्याच्या जातीची माणसं होती ती! त्यांच्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला हे जादूभरले दिवस अनुभवता आले.
हे छायाचित्र मला सुनंदाताई अमरापूरकरांमुळे आज उपलब्ध झाले. त्यांच्या नगरच्या घरातल्या भिंतीवर ते लावलेले आहे. ताई, तुमचे खूपखूप आभार.


-प्रा. हरी नरके, १८/७/२०२०

Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

Saturday, July 11, 2020

CBSE ने संविधानिक अभ्यासक्रम पुन्हा समाविष्ट करावा-



एका बाजूला या पुरोगामी महाराष्ट्रातील आम्ही काही विवेकवादी साहित्यिक आणि कलावंत मंडळी संविधानिक मुल्यव्यवस्थेचे संवर्धन करण्यासाठी त्यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करावा म्हणून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून विनंती करत आहोत !! तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या (Central Board of Secondary Education) सीबीएससीने अभ्यासक्रमातून चक्क संविधान मूल्यव्यवस्था रुजविणारा अभ्यासक्रमच वगळला आहे !! याला काय म्हणावे ?? या मोहिमेला राज्यभरातून साहित्यिक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा उत्स्फुर्त पाठींबा वाढतो आहे आणि सामान्य जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.संविधानिक मूल्यांचा शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्याबाबत राज्य शासनाने ठोस धोरण ठरवून केंद्र शासनालाही त्याबाबत आग्रह धरला पाहिजे. त्यासंबंधीचे पत्र आम्ही सीबीएससीच्या धुरिणांना पाठवत आहोत. या संदर्भात आपली सहमती तर कळवाच पण आपण काय केले पाहिजे या संदर्भातील आपल्या संकल्पना आणि सूचना आम्हास कळवा.

Friday, July 10, 2020

इ. १२ वी ला संविधान शिक्षणाचा ५० गुणांचा पेपर कम्पलसरी करावा

मुख्यमंत्र्यांना पत्र -
भारतीय राज्यघटनेचे संस्कार उद्याचे नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांत व्हावे म्हणून आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना इ. १२ वी ला संविधान शिक्षणाचा ५० गुणांचा पेपर कम्पलसरी करावा, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी संविधान प्रशिक्षण कार्यक्रम व्हावा अशी विनंती करणारे पत्र आम्ही मुख्यमंत्री यांना दिले आहे.या विषयाला तुमचा पाठींबा असेल तर कमेंटमध्ये लिहा.



Thursday, July 9, 2020

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके




Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके

मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. 1930 साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो.

1930 ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्ध धर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडे सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडे घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. हे राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.

राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार-
भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानेही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम 1934 ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाबाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह-
बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे 1935 ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा हे ग्रंथ इथंच आकाराला आले. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही.

History of Rajgruha | राजगृहाचा इतिहास काय आहे? कोणत्या घटना राजगृहाशी निगडित आहेत? WEB EXCLUSIVE
By : एबीपी माझा वेब टीम |

अधिक माहितीसाठी : Rajgruha history of rajgriha pune dr babasaheb ambedkar hari narke  Updated : 11 Jul 2020 12:09 AM (IST)

https://marathi.abplive.com/videos/news/what-is-the-history-of-rajagriha-which-incidents-are-related-to-rajruha-web-exclusive-788330


प्रा.हरी नरके यांची मुलाखत- By: मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 Jul 2020 08:46 PM (IST)

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०



Tuesday, July 7, 2020

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध  करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी " पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.


कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्य बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.


१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)


बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.


या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)



- प्रा. हरी नरके,
७/७/२०२०

संदर्भासाठी पाह- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१







Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Sunday, July 5, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर













डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था : संस्थेकडे जगातला सगळ्यात मोठा प्राचीन हस्तलिखितांचा खजिना- प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान  प्राच्यविद्या पंडीत, स्कॉलर आणि बौद्ध साहित्याचे विद्वान संशोधक असल्याने त्यांना सर रा.गो. भांडारकर यांच्याविषयी आदर होता. भांडारकर हे मुंबई विद्यापीठाचे दुसरे भारतीय कुलगुरू होते. ते संस्कृत स्कॉलर, इतिहासकार व बौद्ध साहित्याचे जाणकार होते. थोर बौद्ध विद्वान राहुलजी सांकृत्यायन, धर्मानंदजी कोसंबी यांनी जगभरातून जमवलेले प्राचीन बौद्ध ग्रंथ व हस्तलिखिते यांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेकडे आहे. बाबासाहेबांनी भांडारकर संस्थेला भेटी दिलेल्या असून त्यांच्या सह्या संस्थेच्या भेट पुस्तकात आहेत. त्यांच्या भेटीची एक आठवण,        " समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या महत्वाच्या ग्रंथात थोर आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सन्मित्र विजय सुरवाडे यांनी प्रकाशित केलेली आहे. बाबासाहेबांचे निकटवर्ती भास्करराव भोसले यांनी लिहिलेल्या या आठवणीत दोन गोष्टींची नोंद महत्वाची आहे. (१) संशोधनपर लेखनासाठी बाबासाहेब भांडारकर संस्थेच्या दस्तऎवजांचा उपयोग करीत. (२) बाबासाहेबांना या संस्थेच्या कामाबद्दल कौतुक आणि आस्था होती.

भोसले लिहितात, " (बाबासाहेबांची) मोटार भांडारकर रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये जात होती. मी लगेच तिकडे मोर्चा वळवला व मोटारीतून डॉ.साहेबांसहीत उतरलेल्या माझ्या मित्रमंडळीत सामील झालो. डॉ. साहेबांना काही जुन्या प्रती चाळावयाच्या होत्या. पैजवन नावाच्या राजाचा उल्लेख कितीवेळा व कोणकोणत्या प्रतीत कोणत्या अर्थाने आला आहे, याचा त्यांना तलास लावावयाचा होता.

ते काम झाल्यावर आम्ही बाबासाहेबांसोबत मोटारीत बसलो. डॉ.साहेब आम्हाला म्हणाले, " पहा, जगाला विसरून हे लोक विद्याव्यासंगात निमग्न आहेत. सर्व्हन्टस ऑफ इंडीया सोसायटीचे लोकही याच प्रकारचे!"


त्यांना (बाबासाहेबांना) ब्राह्मण लोकांतील चांगल्या गुणांबद्दल आदर होता. विरोधकांच्या चांगल्या गुणांबद्दल आदर असणे लोकशाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत जरूरीचे आहे, असा बाबासाहेबांच्या बोलण्याचा निष्कर्ष भोसले यांनी काढलेला आहे. आमच्या काही मित्रांना भांडारकर संस्थेबद्दल काही  वाजवी कारणांनी अढी आहे. त्यामुळे तिथल्या पाली व संस्कृतमधील प्राचीन बौद्ध साहित्याबद्दल त्यांना माहिती घ्यावीशी वाटत नाही, हे विद्याव्यासंगाला घातक आहे.


रा.गो. भांडारकर हे प्रार्थना समाजाचे होते. ते पुरोगामी होते. त्यांचा जीवन आदर्श संत तुकाराम हा होता. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मध्ये तिनदा भांडारकरांचा गौरव केलेला आहे. पृ.४८, २६२ व ३३८ वर ते उल्लेख तुम्हाला वाचायला मिळतील. बाबासाहेब भांडारकरांना किती मानत होते, ही माहिती घेण्यासाठी आम्ही राज्य शासनातर्फे बाबासाहेबांचे जे साहित्य प्रकाशित केलेले आहे त्यातला " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक" हा मोठ्या आकारातील खंड अवश्य वाचा.


राज्यशासनातर्फे पाच प्रतिनिधी भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर नेमले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ. आ. ह. साळुंखे, मुस्लीम समाजातील संस्कृत विद्वान गुलाम दस्तगीर, डॉ. सदानंद मोरे, सुचेता धडफळे व मला शासनाने या संस्थेवर नेमले. " आंबेडकर आणि मार्क्स " या महाग्रंथाचे लेखक, सगळ्या डाव्यांचे महागुरू आणि माझे मार्गदर्शक डॉ. रावसाहेब कसबे यांनी या संस्थेच्या अधिकार मंडळावर अनेक वर्षे काम केलेले आहे.


या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना संस्थेकडुन मानधन म्हणुन कोणतीही रक्कम दिली जात नाही. मी काही वर्षे भांडारकरचा उपाध्यक्ष होतो तरी मला भांडारकरकडुन एक रुपयाही मिळालेला नाही. आपण संस्थेकडुन माहिती अधिकारात ही माहिती घेऊ शकता.


ज्यांना माझा चेहरा आवडत नाही अशा अतिडाव्या आणि अतिउजव्या दोघांनीही फक्त माझ्या एकट्याच्याच नावाने शंख केलेला आहे. उरलेल्या चार बहुजन विद्वानांच्या भांडारकर संस्थेसोबत काम करण्याबद्द्ल ( जे मलाही आदरणीय आहेत ) संपुर्ण मौन बाळगलेले आहे.


त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्याबद्दलचा तीव्र आकस.


साळुंखेसर व  कसबेसरांनी वयाच्या सत्तरीनंतर बहुतेक सर्वच संस्थांवरून निवृत्ती स्विकारली. डॉ. सदानंद मोरे व मी आजही या संस्थेच्या नियामक मंडळावर काम करतो.


आम्हाला विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पात रस आहे. या संस्थेकडे अरबी, अवेस्ता, पाली, जैन महाराष्ट्री, संस्कृत व महाराष्ट्री प्राकृत या भाषांमधली ३० हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. एव्हढी मौलिक आणि प्राचीन हस्तलिखिते जगात दुसर्‍या कोणत्याही संस्थेकडे नाहीत. संस्थेच्या " महाभारत" व "हिंदु धर्माचा इतिहास" या खंडांना जागतिक मान्यता मिळालेली आहे.


ज्यांना धर्मशास्त्र, इतिहास, भाषा, संस्कृती यांच्या अभ्यासाचे मोल कळते ते या संस्थेबद्द्ल अतिशय आदराने बोलतात.


संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ भांडारकरने सर्वप्रथम १९२६ मध्ये प्रकाशित केलेला आहे, हे माझ्या किती मित्रांना माहित आहे?

ज्यांच्या मनात भांडारकर संस्थेबद्दल काही वाजवी कारणांनी आक्षेप आहेत त्यांनी शांत डोक्याने संस्थेच्या प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनपर कामांची माहिती घ्यावी व आपला गैरसमज दूर करावा असे मी नम्र आवाहन करतो... संस्थेत काम करणार्‍या काही व्यक्तींवर तुमचा राग असू शकतो. पण तिबेट, ब्रह्मदेश, भुतान, श्रीलंका, चीन, जपान अशा देशांमधून धर्मानंद कोसंबी, राहूल सांकृत्यायन यांनी प्रचंड मेहनतीने जमवलेल्या प्राचीन बौद्ध ग्रंथांवर राग ठेवू नका. माझ्या ज्या अल्पशिक्षित मित्रांना प्राचीन बौद्ध साहित्याच्या संशोधनातले फारसे कळत नाही त्यांना मी याबाबत दोष देणार नाही, त्यांचा राग मी समजू शकतो.


-प्रा. हरी नरके, ५/७/२०२०


टीप- जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची भयंकर बदनामी केलेली असून मी त्या लेखनाचा व लेनचा तीव्र निषेध करतो.


संदर्भासाठी पाहा- १. "समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर", संपादक विजय सुरवाडे, लोकवाड्मय गृह, कॉ. भुपेश गुप्ता भवन, मुंबई, २००३, पृ. १२३/१२४

२. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक", महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०, पृ.४८/२६२/३३८