Sunday, July 19, 2020

निसर्गाचे सोयरे सावतोबा आणि आधुनिक महाराष्ट्राची नाममुद्रा



रिंगणचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले त्यावेळी उपस्थित असलेले प्रा.सदानंद मोरे, सचिन परब, प्रा. अभय टिळक





महाराष्ट्राच्या मध्ययुगीन जडणघडणीत संतांच्या योगदानाचा तर आधुनिक जडणघडणीत समाजसुधारकांच्या योगदानाचा सर्वाधिक वाटा आहे. वारकरी चळवळ ही महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेली चळवळ आहे. आज देशातल्या ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राची स्वत:ची ठसठसीत अशी नाममुद्रा आहे आणि तिची निर्मिती करण्यात वारकरी चळवळ अग्रभागी राहिलेली आहे.
मराठा सत्तेच्या निर्मितीमागे सावता- नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकोबा यांच्या विचारांचा अभेद्य किल्ला होता हे न्या.म.गो.रानडे यांनी आपल्या "राईज ऑफ मराठा पॉवर" या ग्रंथात सप्रमाण मांडलेलं आहे.


"संत साहित्याची सामाजिक आणि राजकीय फलशृती"  प्रा.गं.बा. सरदार यांनी आपल्या दोन ग्रंथांमध्ये विशद केलेली आहे. संत सावता दर्शन या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, "अवघियापुरते वोसंडले पात्र! अधिकार सर्वत्र आहे येथे" अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्वावर ज्ञानदेव - नामदेवांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात भागवत धर्माची - वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते. तरीदेखील त्यांच्या तत्वनिरूपणात आणि भक्तीपर वांड्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे.



किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभलेली आहे. ह्या मध्ययुगीन संत मंडळाच्या काळात धर्म हाच कौटुंबिक व सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून ज्यांना ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्व व अपप्रवृत्ती नष्ट करून त्याला नवे वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी त्यांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली. मराठी संत मंडळाच्या कार्याचे मूल्यमापन करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे."


संत सावता महाराज यांचा जन्म इ.स. १२५० सालचा होता. त्यांना अवघे ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी इ.स.१२९५ मध्ये या जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्रीय  संत मंडळात ते ज्येष्ठ होते. संत निवृत्तीनाथ, इ.स.१२६८ते १२९६, ज्ञानदेव-१२७१ ते १२९३, नामदेव- १२७० ते १३५०, हा पहिल्या पिढीतील वारकरी संतांचा जीवनप्रवास बघता संतशिरोमणी सावता महाराज हेच सर्वात आधीचे होते यात वाद नाही.


साहित्यिक योगदानाचा विचार करताना जरी सावता महाराजांचे अवघे ३७ अभंग आज उपलब्ध असले तरी केवळ संख्या न बघता त्यांची वांड्मयीन महत्ता लक्षात घेणे गरजेचे ठरते.


ज्या सोप्या, सहज, प्रवाही भाषेत त्यांनी लिहिले ते बघता ही भाषा आजची वाटते. सुमारे ८०० वर्षांपुर्वीची भाषा आजची वाटावी ही फार मोठी बाब आहे. पुढच्या काळात तुकोबा म्हणाले होते, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!" अशा शब्दात व्यक्त होत निसर्गाशी एकरूप होणारे तुकोबा हे सावतामहाराजांचे पुढच्या काळातले महत्वाच्रे वारस ठरतात.


"कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी
मोट, नाडा, विहीर, दोरी, अवघी व्यापिली पंढरी,
सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा"


या शब्दात त्यांनी हिरवेगार शेत साहित्यात आणि समाजजीवनात अजरामर करून टाकले. निसर्गाशी जगण्याचं असं अविभाज्य नातं निर्माण करणारे सावता महाराज त्यामुळेच आजचे कवी ठरतात. त्यांची ही हिरवीकंच संवेदना आजची संवेदना बनते.


शेतात राबणारे आणि निर्मितीचे डोहाळे लागलेले त्यांचे हात मातीशी दोस्ती करणारे हात आहेत.
"आम्हा हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा,
शांति शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली
सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा
स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात"


या पद्धतीने आपले काम हेच आपल्या मुक्तीचे, आनंदाचे, मोक्षाचे साधन आहे हा त्यांनी मांडलेला विचार तर अगदी आधुनिक विचार आहे. पाश्चात्य जगात कालपरवा सांगितला गेलेला "वर्क इज वर्शीप" हा विचार सावता महाराजांनी आठशे वर्षांपुर्वी मांडावा यातनं त्यांचं द्रष्टेपण आणि काळाच्या पुढे असण्याचा जीवनहेतू स्पष्ट होतो.


मध्ययुगीन भारतात जातीयतेची बजबजपुरी माजलेली होती. अशा काळात बलुतेदार-अलुतेदार, कारू नारू समाजातून आलेल्या संतांना त्याचा काच सोसावा लागत होता. ती वेदना त्यांच्या शब्दातून प्रगट ना होती तरच नवल.


"माझी हिन याती,"
"भली केली हीन याती,"


"सावता म्हणे हीन याती" या शब्दांमधून ही जातीपातीची समाजव्यवस्था ते टिपतात. मात्र ते सतत तक्रार करीत बसत नाहीत.


"आमुचि माळीयाची जात, शेत लावू बागाईत," अशा सकारात्मक पद्धतीने प्राप्त परिस्थितीतही ते आनंद शोधतात.


"झणी उतरा निंबलोण" "प्रेमे वनमाळी चित्ते धरू," "उगाच वणवा लागे देही", अशा शुद्ध मराठमोळ्या रचना हे त्यांचे वैशिष्ट्य.


"नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची" या भुमिकेतून त्यांनी काळाच्या मर्यादा पडलेल्या असतानाही इथल्या उच्चवर्णीय दांभिकतेवर कोरडे ओढलेले दिसतात.


तुकोबांच्या रचनांवर सावता महाराजांच्या शब्दकळेचा प्रभाव पडलेला असावा.
"नामाचिया बळे न भिऊ सर्वथा,


कळीकाळाच्या माथा सोटे मारू" ही सावतोबांची रचना आणि "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" ही तुकोबांची रचना समोरासमोरा ठेऊन बघावी किंवा "बरे झाले देवा
कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मोकलिलो" हे तुकोबांचे प्रांजळ उद्गार  आणि "नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची
जरी असता ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म" हा सावतोबांचा कबुलीजबाब एकत्रित पाहावा.



"प्रपंची असूनी परमार्थ साधावा
वाचे आठवावा पांडुरंग" ही सावतोबांची मांडणी कष्टकरी समाजाला आपलीशी वाटणे स्वाभाविक होते.
नामदेवांनी नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी म्हटलं. तर सावतोबांनी "वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगी" म्हटलं. हा प्रभावही महत्वाचा ठरावा.



खरंतर ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकोबा यांच्या जशा समग्र रचना उपलब्ध आहेत तशा अन्य संतांच्या नाहीत. काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या असाव्यात ही चरित्रकारांची भिती मला बरोबर वाटते.
सावतोबा, नामदेव, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, जोगा परमानंद, जगमित्र नागा, बंका महार, चोखा मेळा, कर्म मेळा, जनाबाई, अशा विविध कष्टकरी आणि निर्माणकर्त्या समाजातून आलेल्या संतांनी फुलवलेले सर्जनाचे मळे बघितले की ही मराठमोळी माती श्रीमंत कशी आणि का झाली याचा उलगडा होतो.



ज्ञानदेव जरी ब्राह्मण असले तरी ते बहिष्कृत होते आणि एकनाथसुद्धा "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली ?" असा रोकडा प्रश्न विचारून प्रस्थापितांना आव्हान देणारेच होते.
सामान्य माणसाचे जगणे श्रीमंत व्हावे, समृद्ध व्हावे, समाधानी व्हावे यासाठी चाललेली ही धडपड होती. ती पाहिली की अठराव्या-एकोणीसाव्या शतकात महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ, न्यायमुर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, सर रा.गो.भांडारकर, प्रार्थना समाज, लोकहितवादी, आगरकर, कर्वे आणि पुढे विनोबा, गांधी, साने गुरूजी यांची वाटचाल नेमकी कोणत्या प्रकाशात होत होती त्याचा उलगडा करता येतो.



महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना नेमकी कोणती प्रेरणा त्यामागे होती याचा दस्तऎवज म्हणजे "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" हा ग्रंथ होय. तुकाराम हनमंत पिंजण या संत तुकोबांच्या वंशजांचे नातेवाईक असलेल्या अभ्यासकाचे याबद्दलचे टीपण अतिशय मौलिक आहे. ते म्हणतात, त्याकाळात महात्मा जोतीराव फुले आणि त्यांचे सगळे सहकारी संत कबीर यांच्या बिजक या ग्रंथाचे जाहीर वाचन करीत असत आणि त्यावर चर्चा व चिंतन-मंथन होत असे. महान बौद्ध दार्शनिक अश्वघोष यांनी लिहिलेल्या "वज्रसुची" या ग्रंथावरचा सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांचा "जातीभेद विवेकसार" हा ग्रंथ १८६५ साली जोतीरावांनी प्रकाशित केलेला होता. तुकोबांच्या साहित्याने तर जोतीराव भारावलेलेच होते.
अशा परिस्थितीत जोतीरावांच्या सत्यशोधक समाज निर्मितीमागे संत चळवळीच्या योगदानाचा अतिशय गडद प्रभाव असणं स्वाभाविक होतं.


सत्यशोधक समाजातले सगळे प्रमुख सहकारी हे वारकरी कुटुंबातून आलेले होते. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या काही वर्षांचे अहवाल आपण जर नजरेखालून घातले तर आपल्याला कळेल की त्यातले ९० टक्क्यांहून अधिक साथीदार हे वारकरी होते.


"जोतीबाबा, तू मला ज्ञानेश्वर भेटलास" असे उद्गार एका वृद्ध वारकर्‍याने का काढले होते त्याचा प्रसंग "आम्ही पाहिलेले महात्मा फुले" मध्ये आलेला आहे.


"एकदा आळंदीचे वारीस आम्ही काही मंडळी जात होतो. महात्मा जोतीराव फुले यांच्या व्याख्यानासाठी मारूतराव नवले, भाऊ पाटील डुंबरे, बिरमल व मी असे चौघेजण आम्ही महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत चाललो होतो. थोड्या अंतरावर म्हणजे दिघी गावच्या पुढे आम्ही बोलत बोलत चाललो होतो. इतक्यात एक म्हातारा साधू वारकरी आळंदीहून परत येत होता.


म्हातारा पुण्याकडे चालला होता. दुपारची वेळ होती. अतिशय भूक व तहान लागल्यामुळे तो धापा टाकीत चालला होता. कसे तरी दिघीस जावे असा त्याचा विचार होता. पण चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. तो पडला हे पाहून आम्ही सारे पळत त्याच्या जवळ गेलो. आमच्या सोबतचे एक वारकरी हसून त्याला म्हणाले, "वारकरीबुवा, तुम्ही आता म्हातारे झालात, आता वारी कशाला करता? जा वैकुंठाला."



तो गृहस्थ त्या म्हातार्‍याची चेष्टा करीत होता. म्हातारा तर बेशुद्ध पडलेला होता. तो बिचारा काय बोलणार?
महात्माजीस त्याची दया आली. त्यांनी त्याला मांडीवर घेतले. आम्हाला पाणी आणायला पिटाळले. नवले व मी पळत गेलो. दूर एक विहीर दिसली.



तेथे गेलो. विहीरीवर व आमच्याजवळही पाणी काढायला भांडे नव्हते. नवल्यांच्या पागोटीला माझे उपरणे बांधून ते विहीरीत सोडले. व ते पाण्यात भिजवून पळत घेऊन गेलो. ते पिळून थोडे पाणी म्हातार्‍याच्या तोंडावर शिंपडून थोडे त्याला पाजले.


थोड्या वेळाने म्हातारा शुद्धीवर आला. महात्माजींनी त्याला शिदोरीतून थोडी भाकरी काढून दिली. म्हातारा गहिवरला.
महात्माजीस म्हणाला, "बाबा तू मला ज्ञानेश्वर भेटलास."
म्हातारा महात्माजींच्या पाया पडू लागला.



महात्माजी म्हणाले, "वारकरी बाबा, मी जी तुमची अल्प सेवा केली ती तुमच्यासाठी केली नसून, उद्या मलाही तुमच्यासारखे म्हातारे व्हायचे आहे, तेव्हा ती मी माझ्याचसाठी केली आहे."


बरोबरचे गृहस्थ व इतर जमलेले वारकरी महात्माजींची स्तुती करीत निघून गेले. आम्ही महातार्‍याला रस्त्याने लावून दिले आणि आपल्या उद्योगाला पुढे निघून गेलो."
 हा अनुभव आहे सत्यशोधक तात्यासाहेब धोंडीबा रोडे यांचा. ते महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी व सहकारी होते.


हा मूळ लेख आपण
"आम्ही पाहिलेले महात्मा फुले", महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१९ , पृ. ७४व ७५ यात वाचू शकाल.
जोतीराव नियमितपणे आळंदी व देहूला जात असत. त्याच्या अनेक आठवणी या ग्रंथात आलेल्या आहेत.
जोतीरावांनी रूढी,परंपरा, जातीव्यवस्था, लिंगभाव यांच्यावर कठोरपणे आसूड ओढले. त्यांची समाज क्रांतीची भाषा बघून अनेकांचा असा समज होतो की ते वारकरी चळवळीच्या वा६यालाही उभे राहत नसतील. प्रत्यक्षात जोतीराव आणि अनेक सत्यशोधक यांच्या वैचारिक जडणघडणीवर संत साहित्याचा, विशेषत: सावतोबा, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकोबा यांच्या विचारांची अमीट छाप होती.


"जोती म्हणे" या नाममुद्रेने जोतीरावांनी लिहिलेले क्रांतिकारक अखंड = अभंग, हे तर या परंपरेचे, हा सामाजिक - वैचारिक वारसा पुढे नेणारे फार महत्वाचे विचारधन आहे.







 - प्रा. हरी नरके
मित्रवर्य सचिन परब यांच्या आग्रहाखातर रिंगणसाठी लिहिलेला खास लेख

No comments:

Post a Comment