Saturday, July 18, 2020

लोकशाही प्रबोधन व्यासपीठ-मतदार जागृतीसाठी जागर






हे छायाचित्र ऎतिहासिक आहे. ते एका अनोख्या लढ्याचे छायाचित्र आहे. त्यात डावीकडून उजवीकडे दिसत आहेत, विद्या बाळ, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, प्रा. हरी नरके, आणि कोल्हापूरचे काही स्थानिक मान्यवर. निळू फुले बोलत असतानाचे हे छायचित्र असल्याने ते यात दिसत नाहीत. आणखी दोघे यात दिसत नाहीत. एक आमीर खान आणि दुसरे डॉ. नरेंद्र दाभोलकर.


१९९० च्या दशकात वरील मान्यवरांसोबत आम्ही काही लोकांनी देशातील सार्वत्रिक निवडणूकीच्या तोंडावर मतदार जागृतीसाठी उभारलेल्या जागराचे हे छायचित्र आहे. मी "लोकशाही प्रबोधन व्यासपीठा"च्या उपक्रमात सहभागी होणारा सर्वात ज्युनिअर माणूस. बाकीची सारीच दिग्गज आणि ग्लॅमर असलेली माणसे होती. मला लिंबूटिंबूला त्यांनी सोबत कसे काय घेतले माहित नाही.

आमचा दौरा औरंगाबादपासून सुरू झाला. तिथली सभा तुफान गाजली. तुडुंब गर्दी होती. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांनी भरपूर कव्हरेज दिले. त्यांनतरचे आमचे मुक्काम, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर आणि समारोप मुंबईत.चढत्या श्रेणीत गर्दी आणि प्रतिसाद वाढत गेला. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या समारोपाच्या सभेला अभिनेता आमीर खान उपस्थित होता.

सभेत आमचे काय बोलायचे ते आधीच ठरलेले असायचे. काय बोलायचे नाही यावरही आम्ही ठाम होतो. कोणत्याही उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव घ्यायचे नाही. कोणावरही थेट नावाने हल्ला करायचा नाही. संसदीय भाषाच वापरायची. किस्से, अनुभव, संविधानातले मुद्दे असे भरपूर यायचे. लोक जबरदस्त दाद द्यायचे. एक तुफान झिंग असायची. रोजचा प्रयोग जणू हाऊसफुल्ल आणि सुपरहिट असायचा.

संयमाने बोलायचे. जातीयवाद्यांपासून सावध रहा, संविधानावर विश्वास नसलेल्या प्रतिगामी शक्तीला पराभूत करा, सेक्युलर मुल्ये, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर विश्वास असलेल्यांनाच आपली मते द्या. मतचा अधिकार विकू नका. भ्रष्ट, जातीयवादी, धर्मांधांना पाडा. फुले-शाहू- आंबेडकर-गांधी यांची मुल्ये मानणारेच निवडा. उन्माद, विंध्वंस, बाहुबलवाल्यांना चुकुनही मते देऊ नका. इ.इ.

प्रवास, सभा, निवास, प्रसिद्धी ही सारी व्यवस्था नरूभाऊ सांभाळायचे. त्यांच्याइतका उत्तम संघटक, व्यवस्थापक मी कार्पोरेटमध्येही आजवर बघितलेला नाही. अतुलनीय कौशल्ये.


सभेचे अवघ्या ५ मिनिटात स्वागत, प्रास्ताविक ते करायचे. ते स्टेजवर बसायचेच नाहीत. फोनाफोनी, व्यवस्था,पत्रकार यांच्यासाठी ते पुढच्या कामाला लागायचे. मग माझी बारी असायची. मी ओपनिंग बॅट्समन असल्याने चांगला २५ ते ३० मिनिटे बोलायचो. तसे ठरलेलेच होते. माझ्यानंतर अमरापुकर, त्यानंतर निळूभाई आणि सर्वात शेवटी डॉ. लागू बोलायचे. ते तिघेही प्रत्येकी ५ ते १० मिनिटेच बोलायचे. एकुण दीडेक तासात सभा संपायची. मग आम्ही सगळे स्टेजवरून प्रवेशद्वारावर जायचो.

हातात झोळ्या घेऊन उभे राहायचो. लोकांना माईकवरून आवाहन केलेल जायचे, तुमच्याकडचा अधेली, पावली, रुपया आम्हाला सहभाग म्हणुन द्या. लोक जे पैसे आमच्या झोळीत टाकायचे त्यातून सभेचा खर्च, आमचा प्रवास खर्च, स्थानिक निवास, भोजन खर्च निभवायचा. आमच्यापैकी कुणीही मानधन घेत नसे. मी दररोज कधी निळूभाऊ, तर कधी अमरापूरकर, कधी नरूभाऊ यांच्या रुममध्ये राहायचो.

लागूंना प्रायव्हसी लागे. बाकी सारे म्हणजे सार्वजनिक मामला. रात्री उशीरापर्यंत गप्पांच्या मैफिली सजायच्या....

प्रवासात पुन्हा गप्पाच गप्पा. तो आठवडा जादूभरला होता. या भल्या आणि ख्यातनाम लोकांनी मला मायेने वागवले. मी चिमुकला होतो. पण त्यांचा सार्‍यांचा माझ्यावर जीव होता. राजापूरच्या सभेत मी घातलेला निळा शर्ट बघून डॉ. लागू मला म्हणाले, " वा, किती छानय तुझा शर्ट. एकदम फ्रेश. कुठून घेतलास हरी?"
मी इतका हरखून गेलो, मोहरलो की तो प्रसंग माझ्या आयुष्यतला मी कायम काळीजतळाशी जपलेला प्रसंग आहे.

पुढे काही वर्षांनी तो शर्ट फाटला तरी मी पुढे तो कायम जपून ठेवला. आजही तो शर्ट मला डॉ. लागूंच्या त्या अभिप्रायाची आठवण देतो. सुखावतो. डॉ. लागूंची अभिरूची फार उच्च दर्जाची होती. ते उगीच कशालाही चांगलं असं तोंडदेखलं म्हणणारे नव्हते.

ते तिघेही माझ्या भाषणाला मनापासून दाद द्यायचे. परिणामी मी प्रत्येक सभेत नवं बोलायचो. अधिक पकड घेणारं बोलायचो. निळूभाऊ माझ्यावर कायम वडीलांसारखी पाखर घालायचे. या दौर्‍याने हेच बंध अमरापूरकरांशी जुळले. डॉ. लागू तसे काहीसे महानगरी, अंतर ठेऊन वागणारे.


पण तेही यानंतर माझ्याबाबतीत बदलले. वर्तमानपत्रातले स्थानिक कार्यक्रम वाचून माझ्या भाषणाला पुण्यात कुठे कुठे यायचे. एकदा असेच ते स्वारगेटच्या गणेश कला क्रीडाला केवळ मला ऎकायला आले. पण संयोजक ब्राह्मणद्वेष्टे होते. त्यांनी डॉ. लागूंना खोटेनाटे सांगून परत पाठवले आणि नंतर मला मोठ्या ऎटीत सांगितले, आम्ही त्या बामणाला पिटाळून लावला. मला अतिशय वेदना झाल्या. मी त्यांना झापडले. त्यानंतर मी आयुष्यात कधीही त्या संयोजक संस्थेच्या स्टेजवर गेलो नाही. त्यांनी मला भरपूर बदनाम करून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला पण मी बधलो नाही. मी डॉ. लागूंची घरी जाऊन माफी मागितली.


एकदा अचानक डॉ. लागू पी.के. चित्रपट बघायला आलेले असताना थिएटरवर भेटले. माझ्यावर रागावले. घरी का येत नाहीस? म्हणून ते माझ्यावर चिडले होते. संगिताला सांगत होते, मी सहजासहजी कोणाला वेळ देत नाही, आणि हा भला माणूस माझ्याकडे यावा असे मला वाटते तर हा येतच नाही. परवा तु याला घेऊन येच.


या दौर्‍याच्या विलक्षण आठवणी आहेत. आमच्या राजापूरच्या सभेवर हल्ला होणार होता. आमच्या प्रत्येक सभेत काहीतरी घडायचेच. कुठे वीज गायब केली जायची. कुठे हॉटेलात ऎनवेळी आमचे रिझर्व्हेशन विरोधी उमेदवाराच्या दबावापोटी रद्द केले जायचे. प्रवासात तर धमाल व्हायची. कित्येक अपघात, थरार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटोसाठी, सहीसाठी रुसवे फुगवे! सवडीने सारे लिहायला हवे. नोट्स आहेत. डायरीही आहे.


आज आम्हा पाचजणातले चौघे या जगात नाहीत. किती भली आणि कळवळ्याच्या जातीची माणसं होती ती! त्यांच्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला हे जादूभरले दिवस अनुभवता आले.
हे छायाचित्र मला सुनंदाताई अमरापूरकरांमुळे आज उपलब्ध झाले. त्यांच्या नगरच्या घरातल्या भिंतीवर ते लावलेले आहे. ताई, तुमचे खूपखूप आभार.


-प्रा. हरी नरके, १८/७/२०२०

No comments:

Post a Comment