Friday, July 3, 2020

मुंबई, ठाणे, कल्याण व नाशिकमध्ये गरिब वस्त्यांमध्ये कार्यरत बौद्ध भगिनींचे इमेलद्वारे आलेले पत्र-










आचरणशील " आदर्श बौध्द " म्हणजे आमचे आदरणीय नरके सर !


जयभीम, नरके सर!
              चळवळीच्या अनुषंगाने आपली भाषणे ऐकण्याचा, ग्रंथसंपदा वाचण्याचा व काही प्रसंगी भेट घेण्याचाही योग आला. पुराव्यानिशी मांडलेले तुमचे तर्कशुद्ध युक्तीवाद व प्रत्यक्ष भेटीतील पारदर्शक वागणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. खरे तर तुमचे युक्तीवाद ऐकून आम्ही अनेकांना बदलवण्याचा प्रयत्न केला. त्यात कधी यश आले तर कधी अपयश, हा भाग वेगळा.

               बौद्ध समाजातील दारु पिऊन महिलांना मारहाण करणाऱ्या पुरूषांविषयी तुम्ही २६ जून २०२० च्या फेसबुक पोस्टमध्ये योग्य तेच म्हटले आहे. महिला म्हणून हे दु:ख आम्ही वर्षानुवर्षे सहन करीत आहोत. आमच्या या दु:खाची जाणीव स्वत:ला बौद्ध म्हणविणाऱ्या काही व्यक्तींना होऊ नये, याचे खूप वाईट वाटले. जे आपल्या समाजातील महिलांच्या दु:ख- वेदनांबाबत योग्य भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही.

भले त्यांनी कितीही मोठ्याने गौतम बुद्ध, महात्मा फुले, डाॅ आंबेडकर यांच्या नावाचा गजर केला तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ज्यांना दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करावेसे वाटते त्यांना स्त्रियांना भिक्खूसंघाचे दार सताड उघडे करणाऱ्या गौतम बुद्धांचे, क्रांतीज्योती सावित्रीमाईंना घडविणाऱ्या महात्मा फुलेंचे व हिंदू कोड बिलासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या डाॅ आंबेडकरांचे अंत:करण कधीच समजू शकणार नाही.
       

नरके सर, दिलगिरी व्यक्त करुन आपण आमच्या दृष्टीने आणखी मोठे झाला आहात.                     
     

शेवटी एकच सांगावेसे वाटते. जगाला व हरी नरकेंनाही फसवणे सोपे आहे. परंतु स्वत:ला फसवणे कठीण व अयोग्यदेखील असते. ही जाणीव सर्वांना होवो, अशी मंगल कामना !

    १) रजनी कांबळे.
    २) अश्विनी मून.
    ३) शीला भगत.
    ४) शर्मिला होवाळ.
   ५) शालिनी वज्रचित्त.
    ६) राजश्री कांबळे.
    ७) निवेदिता बच्छर.

No comments:

Post a Comment