Tuesday, September 29, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गौरवगाथा मालिका निरोपाच्या वळणावर - प्रा. हरी नरके


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, साहित्य आणि जीवन म्हणजे धगधगता अंगार. ते एकमेव असे महापुरूष आहेत की ज्यांच्या वाट्याला कोट्यावधी सामान्य लोकांचे तुफान प्रेम आलेले आहे, पण त्याचवेळेला त्यांच्याबद्दलची अढी मनात असलेलाही फार मोठा जनसमुदाय अस्तित्वात आहे. मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणार्‍या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गौरवगाथा महामानवाची" या लोकप्रिय मालिकेचे (बायोपिकचे) बघताबघता ३२५ एपिसोड पुर्ण झाले. विविध सामाजिक स्तरातील  (लिंगभाव, वर्ग व जातीय भेदभाव विसरून) प्रेक्षकांचे अमाप प्रेम या मालिकेला लाभले याचा मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मला आनंद आणि अभिमान वाटतो. यापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळालेल्या काही मराठी मालिका असतील. याच्यापेक्षाही जास्त समाजमान्यता  मिळालेल्या काही मोजक्या बायोपिकही असू शकतील. 


टिपीकल मध्यमवर्गीय सासूसुनेचा विषय नाही, कटकारस्थाने, निर्बुद्ध करमणूक नाही, टिव्हीच्या मुख्य प्रवाहाला सुखावणारी, तिचा दळभद्री अनुनय करणारी मांडणी नाही तरिही लोकप्रियता, समाज प्रबोधन, विद्वतमान्यता आणि वादंगरहितता यात अव्वल असलेली आजवरची एकमेव मराठी मालिका असावी गौरवगाथा.


दशमी क्रिएशनचे मित्रवर्य नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी या विषयावर मालिका करण्याचे ठरवले तेव्हा अनेक जाणत्यांनी अशा अस्मितापुर्ण, ज्वलंत किंबहुना सदास्फोटक विषयावर कशाला हात पोळून घेताय असा सज्जड इशारा दिलेला होता. कितीही अडचणी आल्या तरी मालिका पुर्ण करायचीच असा आमचा गौरवगाथा टिमचा निर्धार होता. तो आज सफल होतोय याचे नक्कीच समाधान आहे. बाबासाहेब हा महाकाव्याचा विषय आहे. यावर चारपाच वर्षे चालेल अशीही मालिका करणे शक्य आहे. नव्हे सोयीचेही आहे. मात्र तरिही अतिशय गोळीबंद अशी फक्त २०० एपिसोडचीच मालिका करायची असे ठरवून आम्ही कामाला सुरूवात केली. चां.भ.खैरमोडे यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या  चरित्राच्या १२ खंडांवर प्रामुख्याने ही मालिका आधारित असली तरी  बाबासाहेबांच्या साहित्य व भाषणांचे २२ खंड आणि बाबासाहेबांवर लिहिली गेलेली किमान १५०० पुस्तके आम्ही या मालिकेसाठी धुंडाळली. या रिसर्चचा सुयोग्य वापर केला. या सार्‍या साहित्यावर आधारलेला हा मालिकामय महाप्रकल्प आज शेवटाच्या जवळ पोचला आहे. आजवर अनेक स्पीडब्रेकर आले.  कारणपरत्वे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, संवादलेखक आणि इतर अनेकांमध्ये बदल झाले.  मात्र दशमीची वरील त्रिमुर्ती, अक्षय पाटील, सोहम देवधर, पटकथाकार शिल्पा कांबळे, प्रसिद्धीप्रमुख वैभव छाया, स्टार प्रवाह वाहिनीचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर आणि मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मी, ३२५ एपिसोड सोबत होतो. आहोत. मालिका संपेपर्यंत राहू.

मालिका म्हटले की वेळेची लगीनघाई असते. रविवार वगळता सोमवार ते शनिवार दररोज एपिसोड सादर व्हायलाच हवा असा दट्ट्या असल्याने इच्छा असूनही परिपुर्ती साधता येत नाही. सादरीकरणात काही उणीवा, त्रुटी, काही दोष राहून जातात. कोणतीही मालिका ही पब्लिक प्रॉपर्टी असते. त्यामुळे तिच्यावर बोलण्याचा, लिहीण्याचा, टिका करण्याचा प्रत्येक प्रेक्षकाला/नागरिकाला अधिकार असतो. तो अधिकार काहींनी अवश्य बजावला, त्यासाठी त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो. त्यातनं आम्हाला अधिकाधिक सुधारणा करता आल्या.

कोणतेही मोठे वादंग (कॉन्ट्रोव्हर्सी) न होता ही मालिका शेवटाजवळ पोचली, या मालिकेने इतर भाषांमधील बाबासाहेबांवरील मालिकांचे दरवाजे उघडले, एका मौलिक तथापि उपेक्षित/वर्जित विषयाकडे जाणत्यांचे लक्ष वेधले, एक दर्जेदार मालिका यावर होऊ शकते याचे तगडे प्रात्यक्षिक सादर केले याचे सार्थक शब्दात न मावणारे आहे.

१७ मे २०१९ ला बुद्धजयंतीच्या दिवशी ही मालिका सुरू झाली. लॉकडाऊनचा चार महिन्याचा काळ वगळता २०२०च्या ऑक्टोबर मध्यापर्यंत (धम्मचक्र प्रवर्तनदिनापर्यंत) ही मालिका चालेल असा अंदाज आहे. 


बाबासाहेबांच्या साहित्य आणि लेखणाचे खंड प्रकाशित करायला वसंत मून यांच्या निधनानंतर कोणीही पुढे यायला तयार नसताना, वीस वर्षांपुर्वी त्याकामासाठी मी माझी टेल्कोतली भरपूर पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडून मंत्रालयात गेलो. सरकार मला त्या कामाचे दरमहा रुपये दोन हजार एव्हढे मानधन देत असे. बाबासाहेबांच्या लेखण आणि भाषणांचे खंड १७ ते २२ चे अकरा ग्रंथ तसेच आवृत्ती संपलेले आणखी बारा ग्रंथ मी प्रकाशित करू शकलो, गौरवगाथा या महामालिकेच्या माध्यमातून मराठी भाषक महिला, ओबीसी, अल्पसंख्यक, शेतकरी, कामगार, बहुजन, श्रमिक आणि बुद्धीजिवी अभिजन या संमिश्र वर्गापर्यंत बाबासाहेबांचे जीवनकार्य आमच्या तोकड्या कुवतीनुसार आम्ही पोचवू शकलो याचे अतिव समाधान वाटते.

- प्रा. हरी नरके, 

२९/९/२०२०

Monday, September 21, 2020

नामांतर आंदोलनाचे दिवस - प्रा. हरी नरके



आज २२ सप्टेंबर. बरोबर ३८ वर्षांपुर्वी याच दिवशी माझी ठाणे सेंट्रल जेलमधून सुटका झाली होती. नामांतर आंदोलन सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे मला अटक झाली होती. सुमारे महिनाभर तुरूंगात राहिल्यानंतर २२ सप्टेंबर १९८२ ला रात्री १२ वाजता माझी सुटका झाली. हे आहे ठाण्याच्या तुरूंग अधिकार्‍यांच्या सहीशिक्क्याचे मुंबई-पुणे प्रवासाचे एसटीच्या लाल डब्याचे तिकीट.त्यावेळी मुंबई सेंट्रल -पुणे प्रवासभाडे २४ रूपये होते.

माझा जन्म १ जून १९६३ रोजी निरक्षर शेतमजूर वडील आणि मोलकरीण आईच्या पोटी झोपडपट्टीत झाला. आमच्या झोपडपट्टीतली मुलं पुणे महानगर पालिकेच्या शाळेत जायची. आमच्या झोपडीत मात्र शिक्षणाची कोणतीही परंपरा नव्हती. माझ्या आईच्या एका मैत्रिणीने आईला सारखी भुनभून लावली म्हणून आईनं मला शाळेत घातलं. या शांतामावशीमुळे मी शिकू शकलो. आई म्हणायची, "त्या शांताचा एक नातेवाईक हाये बाबासायब म्हणून. त्यो तिला म्हणतो, समद्या पोरास्नी साळंत घाला. आता शिकुन काय बालिस्टर होणारे का? नुसते वाया जायचे आइतखाऊ धंदे. पन जाऊ दे, ती म्हनते तर. नायतरी इकडं ते कबरस्तानातलं काम झालं की काय करणारे त्यो दिवसभर?  

कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या पारश्यांच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत होतो. तेव्हा मला महिन्याला पाच रुपये पगार मिळायचा. कबरस्थान नावाला", आहे खरी ती बागच. अतिशय सुंदर, शांत, टवटवीत. पुणे मनपाच्या मुंढव्याच्या शाळेत जून १९६९ पासून मी जाऊ लागलो. मी १९७९ साली एस.एस.सी. झाल्यावर  टेल्कोच्या होस्टेलमध्ये राहायला गेल्याने मला कबरस्तानातली नोकरी सोडावी लागली. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा महिन्याचा पगार होता साठ रूपये. 

माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. 

मला कांबळेगुरूजी नावाचे शिक्षक होते. त्यांच्या घरात मी बाबासाहेबांचा फोटो बघितला. या बाबासाहेबांमुळेच आपल्याला शांतामावशीच्या सांगण्यावरून आईने शाळेत घातले म्हणून मी माझ्या झोपडीत त्यांचा फोटो लावला. तेव्हा मी चौथीत होतो. आमच्या झोपडीत देवादिकांचे खंडीभर फोटो होते. बाबासाहेब आणि पुढे महात्मा फुले यांचे फोटो आले नी लवकरच देवादिकांच्या फोटोंना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

जून १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफ.टि.ए. म्हणून टेल्कोत शिकायला गेलो. मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात १९७९ ते १९८१ अशी २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. याकाळात मी फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. 

१९८० साली गुजरातमध्ये राखीव जागाविरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, राजेंद्र, सुनंदन, वर्षा, वंदना, अनंत, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही विद्यार्थी दर्पणचं काम करायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर "अभिरूप न्यायालय" नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही सर्वजण त्या त्या शाळेतले प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने या नाटकाने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. त्याचकाळात आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर चर्चा, वादविवाद, भाषणं करायचो. कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. 

आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. टेल्कोतील आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. 

१९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्या बाजूने बोललो. आम्ही अगदी पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती या झोपडपट्टीत राहात होतो. 

तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा "किर्लोस्कर" मासिकात लिहिलेले होते. 

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात सवर्णांकडून भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी विद्यापीठ नामांतर आंदोलन फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित होते. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळल्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा-देशाचा बनला. त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. लॉन्गमार्चमध्येही मी सामील झालो होतो. माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली. त्यामागे एसेम जोशी, डॉ. बाबा आढाव, डॉ. नीलम गोर्‍हे आदींची प्रेरणा होती.

निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली. 

त्यामुळेच लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. 

१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. 

तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने, माझे बरेच तुरूंग बघून झाले.)

बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि बोलभांड, वाचाळ. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी   तुरुंगात ठेवले. हे दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक शिक्षणाचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर ह्या मुंबईच्या ग्रुपशी माझी दोस्ती झाली.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी ज्यांचा आधीच उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.

या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. 

१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.

कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. 

तुरूंगांत मला  माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ-जन्माने नाही, तर बाय चॉईस-विचाराने, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.

ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.

तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना-क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.

त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. 

जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला "बावन्नपत्ती" म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबाएव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.

दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

नामांतरातल्या तुरुंगवासामुळे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे असे माझे मत बनले. तुरूंगातल्या शिक्षणाला कुमार सप्तर्षी "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा असा अनुभव घ्यायला हवा. जगण्याकडे बघण्याची आणि जगण्याचीही इयत्ताच त्यानं बदलून जाते. गरजा एकदम कमी होऊन जातात. मानापमानाच्या, इगोच्या वायफळ जगातून तुमची सुटका होते. खरा भारत आणि भारतीय माणसं यांचं उघढंवाघढं दर्शन होतं. जेलमध्ये जातानाचे तुम्ही आणि बाहेर पडणारे तुम्ही यात जमीन अस्मानाचं अंतर पडतं.

- प्रा. हरी नरके


संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२

सोबत- तुरूंग अधिकारी, ठाणे मध्यवर्ती कारागृह, यांच्या सही शिक्क्याचे प्रवासासाठी मुंबई-पुणे एस.टी.साठीचे प्रमाणपत्र

पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.


Tuesday, September 15, 2020

मागासांमध्ये फूट पाडण्यासाठीच क्रिमी लेयर तत्व लागू केले - प्रा.हरी नरके


सध्या अनु. जातींना विदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्याची शिष्यवृत्ती देताना आपल्या राज्याने क्रिमी लेयर तत्व लागू केल्याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. मी गेली २० वर्षे या विषयावर लिहून लिहून थकलो. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावतीने मी ही कैफियत मांडत आलो ते तमाम ओबीसी झोपलेले आहेत. घोरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी अशी चर्चा अघोरी ठरते. महानगरांच्या भर चौकातील अरण्यरूदन ठरते. (ओबीसीतले बहुसंख्य पत्रकार, साहित्यिक, प्राध्यापक, अधिकारी, राजकीय नेते आपली जात लपवतात. मौन धारण करतात आणि सुमडीत वरच्या वर्गात घुसायचा आटापिटा करतात.)

मी गेली दोन दशके हे सांगत आलोय की आजच क्रिमीलेयरविरूद्ध आवाज ऊठवा नाहीतर उद्या हे क्रिमीलेयर अनु. जाती व जमातींच्या बोकांडी बसेल. पण अपवाद वगळता कोणीही मदतीला आले नाही. एक मोठा अपवाद म्हणजे माझ्या या विषयावरच्या शोधनिबंधाचे मन:पुर्वक स्वागत करण्यात प्रा. राम बापट अग्रभागी होते. त्यात मी नेहरूंवर सडकून टिका केलेली असतानाही बापटसरांनी कौतुकात हात आखडता घेतला नाही. ही असते इंटीलेक्च्युअल ऑनेस्टी आणि इंटीग्रिटी.

खरंतर क्रिमीलेयरच्या चर्चेला आता फार उशीर झालाय. अर्थात कधीच न बोलण्यापेक्षा उशीरा का होईना बोलणे, लिहिणे याचे मी स्वागतच करतो. ह्या विषयावर भल्याभल्यांचा गोंधळ उडालेला आहे. गरिबांचे भले होत असेल तर काय चुकले असले बालीश युक्तीवाद हे भाबडे लोक करीत असतात. फक्त गरिबांना मिळावे हे फक्त या कटाचे दाखवण्याचे दात आहेत. खायचे दात आहेत ते मागास समुहांमध्ये फूट पाडण्याचे.

या देशातील उच्चवर्णिय बुद्धीजिवी, साहित्यिक, विचारवंत, माध्यमकर्मी, न्यायाधिश, प्रशासक, राजकीय नेते, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी जी विषयपत्रिका ठरवतात, ती सामान्य माणसांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कितीही वेळा ते पराभूत झाले तरी चिवटपणाने पुन्हापुन्हा लढत राहतात. थोडीशी फट दिसली की लगेच आपला अजेंडा, मुद्दा पुढे सरकवतात. हे उच्चवर्णिय बुद्धीजिवी अपार ढोंगी आहेत. कमालीचे दांभिक आहेत. बौद्धिक भामटेगिरी हा यांचा मुख्य पेशा आहे. ( यालाही अपवाद आहेत, असतात..)

ओबीसी आरक्षण लागू झाले तेव्हापासून उच्चवर्णिय विचारवंत, प्राध्यापक हे ओबीसींना धनदांडगे म्हणून हिनवत असतात. त्यांच्यामते प्रत्येक ओबीसीकडे हजारो एकर जमिनी असतात नी सगळेच ओबीसी कोट्याधिश भांडवलदार असतात.

"क्रिमी लेयर” हे या उच्चवर्णिय विचारवंतांचे पाप आहे. कटकारस्थान आहे.

हे सारे उच्चवर्णिय-विचारवंत-भुरटे खुल्या गटासाठी मोदी सरकारने निवडणूकीच्या तोंडावर आरक्षण दिले तेव्हा मिठाची गुळणी धरून गप्प बसले होते. शूद्रांना काही मिळाले की यांचे पोट दुखते. यांचे द्यायचे माप वेगळे असते नी घ्यायचे माप वेगळे असते. माझा त्यांना प्रश्नाय. तुम्हाला ओबीसीतील गरिबांचा एव्हढा पुळका आहे तर मग तुमच्या उच्चवर्णातील गरिबांची बाजू तुम्ही का घेत नाही? उच्चवर्णात जे गरिब आहेत त्यांना फायदा मिळावा म्हणून खुल्या गटाला ( ओपन कॅटेगिरी ) क्रिमीलेयर लावण्याची मागणी तुम्हीलोक का करीत नाही? खुल्या गटातले अतिश्रीमंत सरकारी कोट्यातून कोट्यावधी रूपये वाचवून  शिकतात, (आय.आय.टी, आय.आय.एम, इ.)  आणि भारताला नाकं मुरडीत, शिव्याशाप देत रातोरात परदेशात पळून जातात. खुल्या जागांवरील शासकीय शिक्षणाचा लाभ फक्त  गरिबांनाच मिळावा यासाठी तिथेही क्रिमी लेयर आणावे अशी माझी मागणी आहे. तिथे मात्र हे भामटे "क्रिमीलायर"ची भुमिका बजावतात.

ओबीसी किती तुफान जागृत आहेत त्याचा एक अनुभव सांगतो.

एका नगरपालिकेच्या अध्यक्षांनी मला  भाषणाला बोलावले होते. तिथे मी ही क्रिमीलेयर नावाची भानगड काय आहे ते भाषणात समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात ते ओबीसी नगराध्यक्ष म्हणाले, "तिच्यमारी आज कळली ही बला काय आहे ते! गेली ४० वर्षे म्या राजकारणात हाये. गेल्या आठवड्यातच कालीजमधले मप्ल्यावाले चिरंजीव म्हनले का ब्वा, अशानि असं. तं मी म्हणलं की काय आडचणच नाय ब्वा. लगेच पीआय सायबनांला मोबाईल ठोक्ला का ब्वा, तेव्हडं सर्तिफिकाट पाठवा म्हून. ते आप्ले दोस्त. देतो म्हनले तेज्याबाला." 

असंय की महाविद्यालयात नॉन क्रिमीलेयरचे सर्टीफिकेट मागितले की पोरं पोलीस चौकीबाहेर रांगा लावतात. " नॉन क्रिमीनल" चे सर्टीफिकेट मागण्यासाठी. जे पासपोर्टसाठी लागते. गुन्हेगार नसल्याचे सर्टीफिकेट.

क्रिमीलेयर आणण्याच्यामागे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान होते, आहे. अशी सामाजिक फूट पाडली की वंचित, विपन्न ओबीसी एकटे पडतील आणि या उच्चवर्णीय बुद्धिजिवींचे कायमचे आश्रित राहतील हा हेतू यामागे आहे. 

वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी कोण लढते? ज्यांना शिक्षण मिळालेय, ज्यांना रोजीरोटीसाठी काहीतरी आधार आहे आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या जाणिवा विकसित झालेल्या आहेत असे त्यात्या समाजातले कार्यकर्ते, नेते लढतात. तेच या समुहाची वैचारिक आणि बौद्धिक उंची वाढावी यासाठी झटतात. प्रबोधनाचा आणि परिवर्तनाचा अग्नी तेवत ठेवतात.

तेव्हा त्यांना ओबीसींपासून तोडण्यासाठी, ओबीसी चळवळ कमकुवत करण्यासाठी हे हत्त्यार वापरले गेलेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर १९९३ रोजी ओबीसींना क्रिमी लेयर [संपन्न वर्ग] तत्व लावावे असा आदेश मंडल निकालात दिला. 

त्या आदेशानुसार  न्या. राम नंदन प्रसाद यांची समिती केंद्राने नेमली. समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने ८ सप्टेंबर १९९३ ला लागू केल्या. त्यावेळी क्रिमी लेयरची वार्षिक उत्पन्न मर्यादा रू.१ लाख ठरवण्यात आली.दर तीन वर्षांनी वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात ही मर्यादा वाढवावी अशी या समितीची शिफारस होती. तिच्यानुसार गेल्या २७ वर्षात एकुण नऊ वेळा ही उत्पन्न मर्यादा वाढायला हवी होती. पण ती चारदाच वाढवण्यात आली. नऊ वेळा ती वाढतीतर आज ती २० लाखावर गेली असती.

मला सांगा, ज्या ओबीसी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख १ रूपया आहे त्यांनी आपल्या मुलांमुलींना जिथली फी वार्षिक दहा लाख किंवा अधिक आहे तिथे कसे शिकवावे? म्हणजे त्यांनी आपल्या पोराबाळांना, बाळींना शिकवूच नये अशीच यामागे व्यवस्था आहे.

८ सप्टेंबर १९९३ ला रू.१ लाख,

९/३/२००४ ला रू.२. ५ लाख

१४/१०/२००८ ला रू. ४.५ लाख

१६ मे २०१३ ला रू. ६ लाख

१/९/२०१७ ला रू. ८ लाख

२०१७ पासून ही मर्यादा रू. ८ लाख आहे.

याचा अर्थ असा की कुटुंबात जर कमावणारे तीन जण असतील आणि त्यांचा पगार दरमहा २३ हजार रूपये असेल तर त्यांच्या मुलामुलींना शिक्षण,नोकर्‍या वा इतर कोणतेही आरक्षण कोट्यातून मिळणार नाही. त्यांना खुल्या गटातून स्पर्धा करावी लागेल.

ऑक्टोबर २०१५ मध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगाने ही उत्पन्न मर्यादा रु. १५ लाख करावी अशी शिफारस केलेली आहे. मात्र आपण ओबीसी आहोत असे भांडवल दर निवडणुकीत वापरणार्‍या पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी ओबीसी आयोगाचे ऎकलेले नाही.

मुलत: भारतात शोषण, पक्षपात आणि भेदभावाची तीन मुख्य केंद्रं आहेत. जात, वर्ग, लिंगभाव. या तिन्हींवर एकत्रितपणे मारा करणारे दोनच महपुरूष या देशात झाले, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून घडलेली भारतीय समाजरचना ज्यांना शिक्षण, प्रगती, उन्नती यांची संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर अनेकवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरलेले आहे.

आपल्या समाजव्यवस्थेत जातनिहाय व्यवसाय ठरवून दिलेले होते. ही व्यवस्था किमान २५०० वर्षे या देशात होती. व्यवसाय हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे "गरीब -श्रीमंत" कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योग धंदे हे स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसी यांनाच करावे लागतात. याउलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले, बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे तथाकथित उच्चवर्णांचे लोक करतात. 

जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आरक्षणाचा आधार जातच राहाणार.

पैसा, गरिबी, श्रीमंती ही दररोज बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे. वयाच्या १८ पर्यंत मुलं अज्ञान, मायनर मानली जातात. सुमारे २५ वर्षे वयापर्यंत ती शिकत असताना त्यांचे स्वत:चे काहीच उत्पन्न नसते. त्यांच्या पालकांचे मात्र काहीना काही उत्पन्न असते. पण ती मुलं जर वेगळी, स्वतंत्र  राहात असतील तर तीही गरिबच ठरू शकतात. उद्या अगदी अंबानी, अदानी, प्रेमजी, बिर्ला, हिंदुजा, गोदरेज, सर्वपक्षीय राजकीय नेते,.... यांची मुलं आम्ही वेगळे राहतो, आमचे उत्पन्न शून्य आहे, सबब आम्हाला आर्थिक आधारावरील आरक्षण मिळायला हवे असा दावा करतील तर तो  कायद्याच्या परिभाषेत मान्यच करावा लागेल.

राज्यघटनेत आरक्षणाला जात, जमात, वर्ग हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड १ ते १२, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

आपल्या घटनेत अनु. जाती, अनु.जमाती आणि इतर मागास वर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे. ओबीसींमध्ये एखादी जात समाविष्ट करायची असेल तर त्याची २३ गुणांची एक सुची असते. त्यातले १२ गुण सामाजिक मागासलेपणाला, ८ गुण शैक्षणिक मागासलेपणाला व ३ गुण आर्थिक मागासपणाला दिलेले असतात. २३ पैकी किमान १२ गुण मिळाले तरच ती जात ओबीसीत समाविष्ट केली जाते. ही पद्धत मंडल आयोगापासून अनेक वर्षे होती. आता तीही फाट्यावर मारण्यात आलीय. असो.

क्रिमी लेयरचे आर्थिक निकष अव्यवहार्य-

आरक्षणामुळे शिक्षण व नोकरी मिळते त्यामुळे जरी आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.

मात्र सध्या सर्वत्र उच्चवर्णीयांनी लबाडीने आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलन असे समीकरण बनवलेले आहे. आले बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंक श्रेष्ठींच्या मना!

फुले-शाहू-बाबासाहेबांमुळे आलेले जाती, लिंगभावावर आधारित आरक्षण मिळाले नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना काडीमात्र तरी स्थान मिळाले असते का?

आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, जमीन, हवा, पाणी, उर्जा, संपत्ती यांची मालकी ही ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय या त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप बदलले का? आजही देशातले ९९%+ विवाह जातीतल्या जातीत होतात. लग्नं जातीत, संघटना जातीच्या, धर्मशाळा, कितीतरी बॅंका आणि आणखी काय जातीचे पण क्रिमीलेयर आर्थिक निकषांवर हवे, हा दुटप्पीपणा नाही का?

आजही सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एकाच  वर्णाच्या हाती आहे. परवा पृथ्वीराज चव्हाण मंदिरातल्या सोन्यावर बोलताच हिंदुत्ववादी किती चवताळले. दान देतात सर्व हिंदू मात्र त्याची मालकी एकट्या भिक्षूकांकडे! हा आहे वैदीकांचा न्याय! आजही बहुसंख्य राजसत्ता पहिल्या दोन वर्णाच्या हाती आहे तर अर्थसत्ता, शेयरमार्केट, कारखाने, व्यापार तिसर्‍या वर्णांच्या हाती आहे. 

शूद्र, अतिशूद्र आणि महिलांच्या हाती आहे फक्त घंटा! या जातकेंद्री व्यवस्थेला वैदीक विचारवंतांचा आक्षेप नाही. हे मनूने दिलेले आरक्षणच आहे. ते आजही हवेच. सामाजिक आरक्षणाला मात्र वैदीक सर्व ताकदीनिशी विरोध करणार. धर्माधिकारी नेमताना त्यांची गुणवता तपासणारी विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेला सर्व हिंदूंना स्त्री-पुरूषांना बसू द्या अशी मागणी बाबासाहेबांनी १०० वर्षांपुर्वी केली होती. ती आजही मान्य झालेली नाही. ती नियुक्ती मात्र आजही जातीवरच ठरते, असे का?

ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.प. न.प. मनपा यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर तत्व लावलेले नाही हे किती लोकांना माहित आहे? तसेही राजकीय आरक्षण, निवडणुकीतले हे आरक्षण आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा हे जाणतेभामटे करतील काय?

अनु. जाती, अनु. जमाती ठरवताना जात किंवा जमात हा निकष असल्याने क्रिमीलेयर तत्व अनावश्यक ठरते.  ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ती जात ओबीसी ठरल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे असे सांगितले जाते. मुळात ही कल्पना पहिल्यांदा १९७१ साली सत्तानाथन आयोगाने मांडली. (1971, Sattanathan Commission ) १९९२ पासून विविध न्यायालयांनी ती उचलून धरली. अशोककुमार ठाकूर, २००६, नागराजन २००७ आणि प्रमोशन २०१८ दाव्यांमध्ये एस.सी.एस.टी. ना क्रिमीलेयर लावण्याची मागणी झाली. मोका बघून न्यायालयांनी आणि सरकारांनी ती पुढे सरकावली. 

दरम्यान जागतिकीकरणाने अनु. जाती, जमाती व ओबीसी समुहांमध्ये पुरेशी फट आणि फूट पडलेली आहे. आपल्याच समाजघटकातील नव्याने निर्माण झालेल्या शहरी मध्यमवर्गीय, महानगरी उच्च मध्यमवर्गीय युवकयुवतींचे चर्चेचे विषय बघा. त्यांना या समुहातील अतिगरिब, गरिब आणि कनिष्ट थरांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. वर्ग बदलला की वर्गीय हितसंबंध बदलतात. वर्गजाणीवा बदलतात. हितसंबंध इतके प्रबळ असतात की आमच्यातली ही नवी पिढी अतिशय आंग्लाळलेली, क्लबवाली आणि परधार्जिणी बनलीय. चड्डीचर्चेतून फुरसत मिळाली तर ते क्रिमीलेयरकडे वळतील. खरंतर ज्यानं त्यानं आपल्या चड्ड्या धुवाव्यात. प्रत्येक फुले-आंबेडकरवाद्याने स्त्रीवादी असायलाच हवे. जातीनिर्मुलन, स्त्रीपुरूष समता आणि वर्गविहीन समाज यांच्याशी आपली बांधिलकी असायलाच हवी. विषय संपला. 

एका शासकीय पाहणीनुसार देशाच्या १३७ कोटी लोकांपैकी ४३ कोटी लोक आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम आहेत की त्यांनी आयकर भरायला पाहिजे.

परंतु त्यातले फक्त १०% लोकच आयकर भरतात. उर्वरित ९०% लोक आयकर चोरतात. त्या देशात आरक्षणालाही क्रिमीलेयरचा आर्थिक मुलामा देणे ही फसवणूक होय.

विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची आहे म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे. व्यक्ती म्हणून तो दिलेला नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेला आहे. आर्थिक आधारावरचे क्रिमीलेयर हे व्यक्तीकेंद्रीत असल्याने समतेच्या तत्वाचा भंग होत आहे. क्रिमीलेयर घटनाविरोधी आहे. ते रद्द करायला हवे.

- प्रा.हरी नरके


Wednesday, September 9, 2020

डॉ.बाबासाहेबांनी अशी वाचवली मुंबई! ■ प्रा हरी नरके ■



संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापुर्वी मुंबई कोणाची? गुजरातची की महाराष्ट्राची? हा वाद पेटला असताना, तमाम बुद्धीजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र, अशी भुमिका मांडत होते. तेव्हा भारतरत्न  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच, असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले. त्यांनी १९४८, १९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणार्‍या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणार्‍या मंडळींची बोलतीच बंद झाली.


आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे. अशावेळेला मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ताकदीचे संशोधन, पुराव्यांचे बळ,साधार-तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येणार आहे.मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूयात.

बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.

१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?

३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?

४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?

५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?

८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?

९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऎतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भुगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबई मधला काही काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, १९४१ च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या ५१ टक्के होती. आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यापासून सार्‍या भारतातून लोक रोजगार,व्यापार,उदीम यासाठी मुंबईत आले. वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगिज, ब्रिटीश, फ्रेंच, डच मुंबईत स्वत:हून आले तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटीशांनी त्यांना " मध्यस्थ-दलाल" म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटीशांनी गुजराती व्यापार्‍याबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. १६७१ सालचा म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटीश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार, गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गुदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमिन देण्यात आली. व्यापारात करसवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले.

तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्य खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?

मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?

ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून?

कामगार शक्ती कुठली आहे?

आणि म्हणून वीज,पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच.

अशा रितीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनचा तुम्ही वाचायला हवा.

पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तीवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणार्‍या बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच ती बाबासाहेबांचीसुद्धा ठेवायला हवी.

......................................

Pls reffer-

1. Maharashtra as a linguistic province

2. Thoughts on linguistic States
3. Need for checks and balances

दै.सामना,सर्व आवृत्त्या, बुधवार, दि.९ सप्टेंबर २०२०,पृ.४

http://epaper.saamana.com/imageview_40044_146445_4_71.html

http://epaper.saamana.com/


Tuesday, September 8, 2020

बाबासाहेबांनी अशी वाचवली मुंबई! ■ प्रा हरी नरके ■




◆ आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे. अशावेळेला मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ताकदीचे संशोधन, पुराव्यांचे बळ,साधार-तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येणार आहे. ◆मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूयात.

बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.

१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?

३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?

४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?

५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?

८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?

९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऎतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भुगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबई मधला काही काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, १९४१ च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या ५१ टक्के होती. आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यापासून सार्‍या भारतातून लोक रोजगार,व्यापार,उदीम यासाठी मुंबईत आले. वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगिज, ब्रिटीश, फ्रेंच, डच मुंबईत स्वत:हून आले तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटीशांनी त्यांना " मध्यस्थ-दलाल" म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटीशांनी गुजराती व्यापार्‍याबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. १६७१ सालचा म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटीश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार, गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गुदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमिन देण्यात आली. व्यापारात करसवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले.

तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्य खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?

मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?

ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून?

कामगार शक्ती कुठली आहे?

आणि म्हणून वीज,पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच.

अशा रितीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनचा तुम्ही वाचायला हवा.

पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तीवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणार्‍या बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच ती बाबासाहेबांचीसुद्धा ठेवायला हवी.

■■■■■■■■■■■■■■■■■


Saturday, September 5, 2020

राष्ट्रपती असताना राधाकृष्णन यांनी स्वत:चा वाढदिवस "शिक्षकदिन" घोषित केला

 

५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत व स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहिलेले म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता. स्वातंत्र्य चळवळीपासून ते कायम फटकून राहिले.

आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या [उपराष्ट्रपती] पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राधाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.

ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे - तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याच्या नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, 

Repost