Friday, September 16, 2011

समतेसाठी च़ळवळीची गरज

समतेसाठी च़ळवळीची गरज
सर्वप्रथम, भय्या पाटील यांनी नमूद केल्याप्रमाणे, जर हरी नरके यांचे लेखन संदर्भ सोडून बाष्कळ, द्वेषमूलक आणि थिल्लर असेल तर एका मोठय़ा संघटनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने त्याची दखल घेऊन प्रत्युत्तर देण्याचे खरे तर कारण दिसत नाही. (खरे तर प्रा. नरके यांचे लेखन हे खेडेकरांच्या विचारधारेशी संबंधित असल्याने त्यावर त्यांनीच प्रतिक्रिया देणे योग्य ठरले असते.) हरी नरके यांनी बामसेफ आणि मराठा सेवा संघाला सोडले आणि लगोलग ब्राह्मणी छावणीने त्यांना (ते बेअक्कल असल्याने आणि नरकेंनी त्यांच्यावर किती टीका केली आहे आणि करत आहेत तिकडे दुर्लक्ष करून.. त्याला बेदखल ठरवून) लगोलग पदरात घेतले असेही त्यांनी सुचवले आहे. परंतु मग त्यांना सामाजिक जातीय तिढा अद्याप समजलेला नाही असे नाइलाजाने म्हणावे लागते. दुसरे असे की खेडेकरसाहेबांना जसा हवे ते लिहिण्याचा अधिकार आहे, तसाच आणि तेवढाच अधिकार त्यांच्या वा अन्य कोणाच्याही लेखनावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो नरकेंनी बजावला असेल तर त्यावरही टीका करण्याचा आपणास अधिकार आहे आणि तो आपण बजावला आहे. परंतु यात मूळ वादाचे केंद्रिबदू बदलवण्याचा प्रयत्न नाही काय? मूळ टीका ही खेडेकरांच्या जातीयवादी भूमिकेबाबत आणि वंशसंहाराला उत्तेजन दिले आहे त्याबाबत आहे. त्याबाबत पाटील यांनी मौन पाळून अप्रत्यक्षरीत्या त्याचे समर्थनच केले आहे, असे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसते.
प्रा. नरके यांनी बामसेफ व मराठा सेवा संघाची साथ सोडली. मला असे वाटते की आपण ज्यांच्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी बुद्धी राबवत आहोत, त्यांचे छुपे हेतू वेगळेच आहेत हे समजले तर विवेकी भूमिका घेत दूर जाणे योग्य की मेंदू विकून आहे तेथेच ठिय्या मांडणे योग्य? शाम सातपुते हे संघ स्वयंसेवक आहेत, भा.ज.प.चे नगरसेवक होते हे लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मग हाच न्याय आपल्याबाबत लावला तर? म्हणजे आपण स्वत: एके काळी संघाचे स्वयंसेवक होता आणि आता नाही.. हे आपल्यातील वैचारिक परिवर्तनच नव्हे काय? प्रा. नरकेंना आपण मोठे केलेत की त्यांनीच तुम्हाला मोठे केले याबद्दलही विधान केले असते तर बरे झाले असते.
पुढचे असे की, दादोजी कोंडदेवाचे सत्य स्वरूप समोर आणले की पुरोगामी आणि वाघ्या कुत्र्याबद्दल लिहिले तर प्रतिगामी.. (मूलनिवासी नायकमधील लेख.. बातम्या) हा कसला न्याय आहे? आपण नरकेंच्या गार्गी ते सावित्री या गाजलेल्या भाषणाबद्दल लिहिले आहे. महावीर सांगलीकर व मी या भाषणाला उपस्थित होतो. खरे तर कोणाही बहुजनीयाला अभिमान वाटेल असे ते भाषण होते. गार्गी-मत्रेयीबद्दल (आणि त्या दोघीही बहुजनीयच होत्या हे आपणास माहीत नाही हे आपले दुर्दैवच नव्हे काय?) ते जेमतेम ५-१० वाक्ये बोलले आणि नंतर अगदी झाशीच्या राणीवरही, केसरीकारांवरही यथायोग्य टीका करत त्यांनी सावित्रीबाईंची महत्ता सिद्ध केली. आपण या भाषणाला उपस्थित नव्हता. मी आणि सांगलीकर होतो. पण हे भाषण भांडारकरमध्ये झाले याबाबतच रोष आहे. तेही कसलीही माहिती नसता. एक जातीविशिष्ट चष्मा घातला की जे होते, तेच आपण केले आहे. नरकेंनी पूर्वी लेनप्रकरणी भांडारकर संस्थेवर संतप्त टीका केली हे आपले म्हणने मान्य करत मी विचारतो की दोष संस्थेचा असतो की त्यात कार्य करणाऱ्या लोकांचा? आणि त्या संस्थेतील नेमका कोण दोषी होता हे आजतागायत आपणास उमगले नसता त्याची जाण होऊन त्या संस्थेतच विधिवत मार्गाने जाऊन बहुजनीय विद्वत्तेची महत्ता वाढवणे, त्यात सहभागी होत बहुजनोपयोगी संशोधन योग्य की त्या संस्थांपासून फटकून राहणे योग्य?
आणि भय्या पाटील.. बाबासाहेबांनीच आम्हाला (बहुधा तुम्ही अनुपस्थित असावेत) शिकवले आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला समान दर्जा आहे.. मग तो कोणत्याही जात/धर्म/वर्गीय असो. ब्राह्मणांचा विरोध करायचे म्हणजे नेमके काय हे आपण आम्हाला शिकवावे. त्यांना कसे जाळून-कापून मारायचे हेही सांगितले असते तर बरे झाले असते. एखाद्या जातीचे वा विचारधर्माचे लोक ठार मारले म्हणजे तो विचार संपतो हा अलौकिक विचार आपली संघटना मांडत आहे याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपण म्हणता ते वास्तवात आणायचे असेल तर सर्वप्रथम घटना दुर्लक्षित करावी लागेल. बाबासाहेबांचे नाव घेता कामा नये. गतइतिहासात धर्मपुरोहित ते सत्ताधाऱ्यांनी जी काही पापे केली त्याबद्दल फक्त धर्मपुरोहितांबाबत बोलावे.. सत्ताधारी मात्र वगळावेत असे तात्त्विक/बौद्धिक आरक्षण आपणास हवे आहे असे दिसते.. म्हणजे इतरांनी आपल्या न्याय्य हक्कांबाबत बोलले तर ते मात्र भटाळले.. आणि तुम्ही म्हणता तसे वागले.. बोलले तर मात्र बहुजनीय हा खाक्या कसा चालेल? चालणार नाही.. चालत नाही याची जाण आल्याने हा आपला उद्रेक आहे. माझी आपणास संपूर्ण सहानुभूती आहे. जेवढा असा उद्रेक आपण वाढवत राहाल, तेवढेच बहुजन शहाणे होत जातील. तुम्ही बदला हे सांगायचा अधिकार अर्थातच मला वा कोणाला नाही.. तुम्ही श्रेष्ठ आहात.. शक्तिशाली आहात हे माहीतच आहे. तुम्ही म्हणाल तो इतिहास.. बाकी सारी बकवास.. . हे आपले धेयवाक्यही मी तरी माझ्या हृदयात कोरून ठेवले आहे. पण फक्त प्रतिवाद करता येतील असे ऐतिहासिक प्रश्न उपस्थित करा ही विनंती.
आपलं म्हणणं आहे की, बहुजनीय स्त्रियांची पराकोटीची बदनामी ब्राह्मणांनी केली आहे. कोणत्या पुराणात नेमकं काय लिहिलं आहे याचे संदर्भ न देता (जणू काही कोणीच पुराणे वाचलेच नाहीत असा आव आणत) बेधडक विधानं करणं हे काही योग्य नाही. धर्मामधील सांकेतिकता आणि त्यांचे होणारे कथात्मक रूप हे समजलेले दिसत नाही म्हणून हा वृथा आरोप आहे. ज्या कोणी काही शतकांपूर्वी असे लेखन समजा केले असेल तर त्यावरील टीका/प्रबोधन समजता येऊ शकते, पण त्याचा बदला अखिल विशिष्ट समाज दोषी ठरवत आजच्या वर्तमानात कसा घेतला जाऊ शकतो? जे चूक आहे ते पुराव्यांनिशी उघड करणे हे श्रेय की उगाचच कसलाही संदर्भ न देता खेडेकरांच्या लेखनाचे अंध समर्थन करणे योग्य?
पाटील यांच्या प्रतिक्रियेत जी काही टीका आहे, ती स्वागतार्ह असली तरी ती व्यक्तिगत आहे, प्रा. नरकेंना बदनाम करणारी आहे. प्रा. नरकेंनी त्यांची साथ सोडली, मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून वगरे.. हे यामुळे समाजाला तरी समजले हे या लेखाचे फलित आहेच. प्रा. नरके यांनी त्यांच्या लेखात खेडेकरसाहेबांच्या साहित्याची समीक्षा केली आहे आणि कोणताही समीक्षक समीक्षा करताना मूळ लेखकाच्या लेखनातील समीक्षार्ह भाग अवतरणात देतो तसा दिलेला आहे. खेडेकरांचे साहित्य योग्यच आहे असा भय्या पाटील यांचा विश्वास असल्याने व तो त्यांनी उपरोक्त लेखात व्यक्त केला असल्याने व त्याबाबत मूळ लेखकास कसलाही खेद नसल्याचे व्यक्त केले असल्याने मग प्रश्न हा निर्माण होतो की मग हे प्रत्युत्तर मुळात आहे कशासाठी? नरके कसे भटाळले आहेत, त्यांच्या भूमिकेत कसा बदल झाला आहे, त्यांनी खाकी चड्डी कशी घातली आहे वगरे.. वगरे.. सांगत नरकेंचे व्यक्तिगत शिरकाण करणे हा जर या लेखाचा हेतू असेल तर तो योग्य आहे काय?
प्रतिपक्षाला छोटा दाखवून, बदनाम करून आपण मोठे होत नसतो. मूलनिवासी नायक या वृत्तपत्रांतून ब्रिगेडच्या सहयोगी संघटनेच्या मुखपत्राने गेली ८-९ महिने अशीच द्वेषाची गरळ सातत्याने प्रा. नरकेंविरुद्ध ओकली आहे.. त्यातून त्यांचे मित्रही सुटलेले नाहीत. याबाबत एक सामाजिक चळवळ चालवणारी म्हणून समजणारी संघटना आणि त्याचे प्रवक्ते अवाक्षर न काढता तीच द्वेषाची परंपरा चालवत आहेत आणि आम्ही त्याला फुले-आंबेडकरवादी समजू शकत नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
काही आडमुठे ब्राह्मण स्वत:ला सावरकरवादी/ नथुरामवादी/ सनातन प्रभातवादी वगरे समजत एका ब्राह्मण महात्म्याचा जयघोष करत सामाजिक रोष निर्माण करत आहेत तसेच.. आणि त्याहीपेक्षा भयंकर कृत्य करायला प्रेरित करणारी विधानं भय्या पाटील आणि त्यांचे स्वत:ला समतावादी समजणारे नेतेही आज अगदी जाहीरपणे करत आहेत.. याचे कोणाही मस्तक धडावर असलेल्या सुद्न्याला आश्चर्य वाटेल आणि खेदाने, शरमेने खाली मान झुकेल. चळवळींचा मृत्यू होतो तो असा आणि तिच्या अंताचे पाप यासारख्या समाजद्रोही लोकांकडे जाते. सारे विचारवंत या चळवळीपासून दूर का पळत आहेत, त्याचे कारण यात आहे. हुकूमशाही कोणालाही मान्य असू शकत नाही.. ज्यांना मान्य आहे त्यांनी बहुजनीय चळवळीत राहिले काय आणि समाजद्रोही संघटनांत राहिले काय.. फलित एकच आहे!
चळवळ समतेसाठी आहे.. नव्या विषमतेसाठी नाही.. नव्या मनुवादासाठी नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.
संजय सोनवणी,
sanjaysonawani@gmail.com  

[साप्ताहिक लोकप्रभा, दि.२३ सप्टे.२०११ वरुन साभार}