Friday, August 19, 2011

अण्णा हजारे आणि आपण


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला माध्यमे,मध्यमवर्ग,तरुणाई,आणि विरोधी पक्षांनी अभुतपुर्व पाठींबा दिलेला आहे.दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्ष आणि सामाजिक चळवळीतील काही समाजगट अण्णांच्या आंदोलनाबाबत विरोधी/साशंकही आहेत.संसद,विद्यमान राज्यघटना,प्रचलित कार्यपद्धती आणि लोकशाही यांनाच या आंदोलनामुळे काही धोका होईल काय अशी त्यांना काळजी वाटते.अण्णांच्याभोवती असणारे काही प्रतिगामी लोक आणि शक्ती यांच्यामुळे ती बळावली असावी. एक अपुर्व सामाजिक घुसळण होत आहे. अण्णांनी आजवर कधीही जातीव्यवस्थेतुन उद्भवणा-या सामाजिक समस्यांवर भुमिका घेतलेली नाही असाही आक्षेप घेतला जातो.मात्र आण्णांच्या आजवरच्या राळेगणचा विकास, माहीती अधिकार कायदा,बदलीचा कायदा,ग्रामसभांना अधिकार आदि कामांबद्दल सर्वदुर आदरभावनाही असताना दिसते.आजची राजकीय व्यवस्था कमालीची किडलेली आहे.आजच्या संसदेतील {अपवाद वगळता}सर्व
खासदार निवडणुकीत वारेमाप पैसा उधळुन निवडुन आलेले आहेत.त्यांनी कोणीही बहुधा निवडणुक खर्चाची मर्यादा पाळलेली नसुन त्याबाबतची त्यांची प्रतिद्न्यापत्रे अक्सर खोटी आहेत,असे जनतेला अनुभवाने वाटते.भ्रष्टाचार,महागाई,बेकारी आदिंनी जनता त्रस्त आहे.भ्रष्टाचारविरोधी द्रुतगती न्यायालये स्थापण करणे,निवडणुक सुधारणा कायदा आणणे,रोजच्या जीवनात निर्धाराने भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी जनमानसिकता तयार करणे,असे उपाय त्यावर योजावे लागतील.प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा आणि ईमानदारीचाही.आज कोणत्याही राजकिय पक्षाची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ईच्छाशक्ती दिसत नाही.त्यांनी देशातील जनतेची ताकद "अंडरईस्टीमेट" केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण तरुणांची काहीतरी करण्याची ईच्छाशक्ती,समकालीन राजकारणाची तीव्र नफरत,नेत्यांचे भ्रष्ट वर्तन, मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.लोकभावनेचा आदर करुनही केवळ भाबडेपणाने हा महाभयंकर प्रश्न सुटेल असे मानता येत नाही.अण्णांच्यामागे असणारे काही बेरकी/प्रतिगामी लोक कोण आहेत याचाही विचार झाला पाहिजे.त्यांचा आणखी काही छुपा अजेंडा तर नाही ना याचाही शोध घेतला जाणे चुकीचे म्हणता येणार नाही.संसदेला ओव्हरटेक करण्याऎवजी किंवा संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे.राजकीय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये नफरत वाढु देणे परवडणारे नाही.त्यातुन विभुतीपुजक/सरंजामी भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे होईल. ती लोकशाहीची म्रुत्युघंटा असेल.
मात्र ज्या संसदेला आण्णा वेठीला धरीत आहेत अशी सत्ताधारी ओरड करीत आहेत तेथील खासदार तरी काय प्रकारचे आहेत?ते जर खरेच स्वच्छ असते तर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नसता.त्यामुळे ह्या खासदारांच्या हातात देश सुरक्षित आहे असे मानणे भाबडेपणाचे होईल.ज्या गटांना आण्णांच्या आंदोलनाबाबत शंका आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की चतुर सत्ताधारी आपल्याला आण्णांच्या विरोधात वापरुन तर घेत नाहीत ना? कारण एरवी याच सत्ताधा-यांचे जातवार जनगणना,दलित अत्त्याचार,महिला आरक्षणात ओबीसी कोटा ठेवणे याबाबतचे वर्तन कोणते प्रामाणिक आहे?आज अनुसुचित जाती/जमाती उपघटक योजनेचा निधी सरळसरळ दुसरीकडे वळवला जातो.,ओबीसी जातवार जनगणनेबाबत संसदेत दिलेले वचन सरकार पाळत नाही, महिला आरक्षणात ओबीसी महिलांना कोटा द्यायला सरकार तयार नाही,दलित अत्त्याचारांना रोखण्यात सरकार अजिबात गंभीर नाही.त्यामुळे आपण स्वता:ला ह्या सरकारला वापरु द्यायचे काय?याचाही विचार केला पाहिजे.सरकारच जर राज्यघटनेशी प्रामाणिक नसेल तर त्यांचा सध्याचा दावा कसा खरा माणणार?भारतीय जनता फार मोठ्या प्रमाणात आण्णांसोबत  असताना आपण या कोट्यावधी जनतेपासुन फटकुन राहिलेच पाहिजे काय?
सरकारच्या सापळ्यात अजिबात न अडकता आणि जनतेपासुन फटकुनही न राहाता आपण निर्णय घेतला पाहिजे. तथापि आण्णांच्या भोवतीच्या प्रतिगामी कोंडाळ्यालाही शरण न जाता चळ्वळीने आण्णांच्या आंदोलनाबाबत फेरविचार करावा असे मला वाटते.आपली भुमिका स्वतंत्र जरुर असावी परंतु ती विरोधातच असावी की आपली मुद्दे पुढे रेटणारी असावी याचीही चर्चा झाली पाहिजे.कारण ही लढाई फार मोठी आहे.लांबपल्ल्याची आहे.आपण समाजत "ब्रांड" व्हायचे की लोकशाही मार्गाने आपला अजेंडा राबविणारे हे आपल्या भुमिकेवर अवलंबुन राहणार आहे.

Friday, August 12, 2011

आरक्षण:शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणीAdmagnet-X
आरक्षण - शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी
प्रा. हरी नरके
Friday, August 12, 2011 AT 07:39 AM (IST)

बहुचर्चित "आरक्षण' चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी बुधवारी हा चित्रपट पाहिला आणि आपली भूमिका मागे घेतली. या कार्यकर्त्यांचा विरोध का मावळला, याविषयी... संधी मिळाली तर मागासवर्गीयही उत्तम गुणवत्तावान होतात; यश प्राप्त करू शकतात, असाच संदेश "आरक्षण' चित्रपटाने दिला आहे. एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची ही कहाणी आहे. जातीय तेढ, सामाजिक फाळणी किंवा आरक्षणाला विरोध, असे त्याचे स्वरूप नाही. हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत असला तरी त्याला प्रदर्शनपूर्व विरोध खूप झाला. चित्रपट न्यायालयात गेला. चळवळीतील काहींनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याला विरोध केला. शेवटी बुधवारी हा चित्रपट विरोधकांनी पाहिला आणि हिरवा झेंडा दाखविला.

प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्‍नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. "आरक्षण'मध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि घटनात्मक हक्कांना बाधा आणणारे आरक्षणविरोधी चित्रण असल्यास त्याला शांततामय मार्गाने विरोध करू, अशी भूमिका राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगांनी, तसेच समता परिषदेचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी घेतली होती. प्रकाश झा यांनी या मंडळींसाठी खास खेळाचे आयोजन केले होते. भुजबळांसह सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महिला व बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार समीर भुजबळ, रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, कृष्णकांत कांदळे, डॉ. जब्बार पटेल आदींसमवेत मीसुद्धा हा चित्रपट पाहिला. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर काही दृश्‍ये आणि प्रसंग काढण्याच्या अटीवर भुजबळांनी विरोध मागे घेतला. "आरक्षण हे घटनात्मक वास्तव असून, शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास आरक्षण जबाबदार आहे का, याचा शोध मी चित्रपटातून घेतला आहे,' असे झा या वेळी म्हणाले.
जागतिकीकरणामुळे झालेले शिक्षणाचे बाजारीकरण, कोचिंग क्‍लासेसचे वाढते महत्त्व आणि आरक्षणाबाबतचे सामाजिक ताणतणाव या कथानकावर चित्रपट उभा राहतो. प्रभाकरन (अमिताभ बच्चन) हा ध्येयवादी शिक्षक एका नामवंत खासगी महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आनंदोत्सव केल्यामुळे उच्चवर्णीय मुले भडकतात. तणाव निर्माण होतो. हातघाईची वेळ येते. महाविद्यालयातील आरक्षणविरोधी लॉबीला मानवतावादी प्रभाकरन अडचणीचे वाटत असल्याने ते कटकारस्थान करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. उपप्राचार्य मिथिलेश सिंग (खलनायक मनोज वाजपेयी) प्राचार्य बनतात. ते खासगी कोचिंग क्‍लासेस चालवत असतात. अमिताभचे घरच त्यांनी बळकावलेले असते. ते परत मिळविण्यासाठी अमिताभची ससेहोलपट आणि त्यांचा शैक्षणिक आदर्शवाद यांची टिपिकल हिंदी मसाला चित्रपटाची सगळी भट्टी वापरण्यात आली आहे.
गुंतागुंतीच्या प्रश्‍नांचे सुलभीकरण, आदर्शवादी मांडणी, मनोरंजनाची फोडणी आणि आरक्षण या ज्वालाग्राही प्रश्‍नाचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून केलेला वापर, या चित्रपटात बघायला मिळतो. दीपक (सैफ अली खान) हा मागासवर्गीय युवक प्रभाकरनच्या मदतीमुळे अभ्यासात टॉपर आहे. परंतु त्याला नोकरीत डावलण्यात येते. शेवटी प्रभाकरन त्याला आपल्या महाविद्यालयात नोकरी देतात. आरक्षण प्रश्‍नावरून निर्माण झालेल्या संघर्षात दीपक गप्प बसू शकत नाही. ज्या उच्चवर्णीय मुलांना प्रवेशात अडचणी येतात, त्यांच्याशी त्याचा थेट सामना होतो. प्रभाकरनशी वाद होतात. महाविद्यालय सोडावे लागते. प्रभाकरनची मुलगी पूर्वी (दीपिका पदुकोण) दीपकच्या प्रेमात असते. परंतु वडिलांच्या बाजूने ती उभी राहते आणि आरक्षणाच्या प्रश्‍नावरील मतभेदामुळे ते दोघे दुरावतात.

शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे मोफत अभ्यासवर्ग प्रभाकरन म्हशींच्या गोठ्यात चालवतात. दीपक, पूर्वी आणि त्यांचे मित्र मदतीला पुढे येतात. त्यामुळे खासगी कोचिंग क्‍लासेसचा धंदा बसतो. मग कटकारस्थाने आणि संकटांची मालिका व शेवटी नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळण घेऊन गोड शेवट, अशी मांडणी आहे. आरक्षण प्रश्‍नावरील काही प्रचलित गैरसमज भडकपणे मांडले जातात. त्यांची धारदार उत्तरेही दिली जातात. काही प्रसंग आणि समूहदृश्‍ये प्रभावी आहेत. काही दृश्‍ये व संवाद वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह ठरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यावर चर्चा, वादविवाद होऊ शकेल. झा यांनी खासगी क्षेत्रात येऊ घातलेले आरक्षण रोखण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे काय, त्यांनी कोचिंग क्‍लासेस आणि बाजारीकरणाचे खापर आरक्षणावर फोडणे अनुचित नाही काय, त्यांनी आरक्षण या प्रश्‍नाच्या गाभ्यालाही हात न घालता एक टिपिकल हिंदी मसालापट बनवून सरधोपट मार्गाने या प्रश्‍नांचे गांभीर्य कमी केले आहे काय, असे प्रश्‍न उद्‌भवू शकतात. झा यांच्याशी प्रतिवादही होऊ शकेल. तो केलाही पाहिजे. परंतु त्यांनी एका समकालीन प्रश्‍नाला हात घालण्याचे (टिपिकल हिंदी मसाला पद्धतीने का होईना) धाडस केल्याचे गुण त्यांना द्यावेच लागतील. चित्रपटाची हाताळणी खूप लाऊड आहे. संवाद मात्र धारदार आणि टाळ्या घेणारे आहेत. कष्टाचे महत्त्व उच्चवर्णीयांनी कष्टकऱ्यांनाच सांगावे यातला उपरोध नेमका टिपला आहे. एकूण काय, तर एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवरील टिपिकल हिंदी मसाला कहाणी म्हणजे "आरक्षण' होय.
टीव्हीवरील प्रोमो पाहून हा चित्रपट आरक्षणविरोधी असावा, असे वाटत होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर गैरसमज दूर झाला. काही दृश्‍ये आणि प्रसंगांमध्ये सुधारणा करण्याची तयारी झा यांनी दाखविल्याने समता परिषदेने विरोध मागे घेतला आहे.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री Saturday, August 6, 2011

फ्यासिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन- भाग २

प्रा. हरी नरके
पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते विविध आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. खेडेकर केवळ आंदोलनं करून थांबले नाहीत तर त्यांनी विविध पुस्तकांमधून आंदोलनाएवढय़ाच कडवट टीकेचं सत्र कायम राखलं आहे. खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.
(भाग २)
फुले-अांबेडकरी चळवळी कब्जात घेण्याचा खेडेकरांचा एक ‘ब्लूिपट्र’ आहे. त्यांचा हा छुपा अजेंडा विवेकी कार्यकर्त्यांना सहज ओळखता येतो. स्वत:चे मनोगत ते नकळत सांगून जातात. ‘‘असे कलाकार स्वत:चा माल खपवण्यासाठी बहुजन समाजाच्या मालासोबत आपल्या मालाची भेसळ करतात. धान्य, तेल, खाद्यपदार्थ, तूप, मसाले अशा खाद्यपदार्थाच्या भेसळीपेक्षा विचारांची भेसळ अत्यंत घातक असते. असे नाटकी कलाकार अत्यंत क्रूर असतात व या क्रूरपणाशी प्रामाणिक असतात. हा अत्यंत हलकट क्रूरपणा हाच अशा नाटकी लोकांचा स्वार्थी स्वभाव झालेला असतो. त्यामुळे नाना प्रकारची नाटकं निर्माण करून असे कलाकार श्रोत्यांना झुलवतात, पेटवतात, त्यांच्याशी समरस होतात.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ६)
मुळात खेडेकरांनी ही टीका समरसतावाद्यांवर केलेली आहे. तथापि ती खेडेकरांनाही चपखलपणे लागू पडते. खेडेकर सांगतात, ‘‘प्रतिचळवळी ओळखणे अत्यंत अवघड असते. तसेच अनेकदा तिची ओळख होईपर्यंत ती आपल्याच चळवळींवर स्वार झालेली असते.. प्रतिचळवळी या मूळ चळवळी संपवण्यासाठी असतात. प्रतिचळवळ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, निर्दयपणे, सातत्याने, संघटितपणे, निराश न होता राबविली जाते.. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती अमलात आणली जाते.. चळवळीत प्रवेश मिळाल्यावर नेतृत्व ताब्यात घेणे व प्रतिचळवळीचा विचार मूळ चळवळीच्या आदर्शाच्या माध्यमातून पसरवणे.. चळवळ हायजॅक केल्यावर म्हणजेच ताब्यात घेतल्यावर तिच्यावर पूर्ण प्रतिचळवळीचा ताबा प्रस्थापित करणे अशी वाटचाल आहे.’’ (बहुजनांच्या सत्तांतरांचा संघर्ष, पृ. २६, २७)
संघपरिवार आणि प्रतिगामी शक्तींचे हे डावपेच आहेत असे सांगणारे खेडेकर स्वत:च त्यांचा वापर करताना दिसतात हे पुराव्याने सिद्ध करता येते. इथेच तर चळवळीचा त्यांच्याशी वाद आहे. बहुजन समाजातीलच मराठेतर नेत्यांना संपवण्याचे खेडेकरांचे मनसुबे आहेत. ते लिहितात, ‘‘आम्ही मराठा तितुका मिळवावा आणि गुणदोषांसह स्वीकारावा असे धोरण स्वीकारले आहे.. या संबंधाने आमच्याशिवाय कुणीही चर्चा करायला तयार नाही.. अस्तित्वात असणाऱ्या जातींची अस्मिता जागृत करून बहुजन समाज निर्माण करावा लागतो.. मराठा अस्मिता ही जगातील मानव समूहातील सर्वश्रेष्ठ अस्मिता आहे.. कुणबी मराठा समाज एकसंध असता तर त्यांना बिगर मराठा नेतृत्वाच्या पाठीमागे लाचार होऊन धावण्याची वेळच आली नसती. शिवसेना असो की भाजप, ज्या राजकीय पक्षाचे नेतृत्व बिगर कुणबी मराठय़ांच्या तालाने चालत असते, तिथे कुणबी मराठय़ांचे हित सुरक्षित कसे राहील?’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ६, २४, २६)
मराठाप्रेमाची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे.
खेडेकरांची स्पष्ट मागणी आहे की ‘‘मराठय़ांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओबीसीमध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इत्यादी सवलती त्वरित द्याव्यात’’ (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ३३) बहुजनातील छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, प्रा. हरी नरके यांचा त्याला अडसर होत आहे या समजुतीपोटी खेडेकर त्यांना बहुजनद्रोही व ब्राह्मणांचे हस्तक ठरवून त्यांच्यावर आगपाखड करतात. खेडेकर म्हणतात, ‘‘शिक्षण संस्था व साखर कारखाने मराठा जातीतील लोकांपेक्षा जास्त कुणबी, लेवा कुणबी, माळी, तेली, वंजारी, धनगर, आगरी समाजांच्या ताब्यात आहेत.’’ (मराठा आरक्षणाचा खून बापट आयोग, पृ. ५३) प्रत्यक्षात राज्यातील सुमारे ९५ टक्के साखर कारखाने आणि सुमारे ५५ टक्केपेक्षा जास्त शिक्षण संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. जे खेडेकर स्वत: कुणबी असूनही कुणब्यांच्याही बाबतीत खोटे लिहितात ते कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ नाहीत काय?
खेडेकर म्हणतात, ‘‘मराठा समाजाच्या मनात जातीयता कधीच नव्हती. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मराठय़ांनीच भरघोस मतांनी निवडून दिले. हे दोघे व त्यांचे भक्त मराठा समाजाचा द्वेष करतात. मराठा विरोध हे त्यांचे अस्तित्व आहे. ओबीसी, एससी, एसटी व ब्राह्मण संघटित होऊन मराठा समाजाविरोधात अभद्र युती करून सामाजिक विष पेरीत आहेत. मराठा समाजास एकटे पाडून त्यांचा टोकाचा द्वेष करायचा ही भुजबळ, मुंडे यांची राजनीती आहे. ओबीसी समूहातील या जात्यंधांनी मराठा विरोधाची बोथट झालेली धार अत्यंत धारदार बनविली. त्यासाठी फुले-आंबेडकरांचा विचार विकृत बनवला. त्यातून ब्राह्मणालाच एकटे पाडून मुळासकट गाडून टाकण्याचा फुले विचारच गाडण्यात आला. आणि मराठा विरोधालाच समाजात रुजविण्यात आले. यातून ‘मराठा विरुद्ध मराठेतर’ असा बामणी कावा ओबीसी समाजाने स्वीकारला. ‘मराठा तेवढा अडवावा, मातीत पुरून गाडावा’, ‘मराठा अडवा, मराठा जिरवा’ असे नवे नारे जन्मास आले.’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५०, ५१) असा कांगावा खेडेकर करतात.
चोराच्या उलटय़ा बोंबा ही म्हण त्यांना चपखलपणे लागू पडते. खेडेकर ब्राह्मण समाजाची बदनामी करत असतील तर बहुजनांनी कशाला मध्ये पडायचे? असा प्रश्न काही जण विचारतात. वास्तवात ब्राह्मणांना विरोध हा खेडेकरांचा फक्त ‘पवित्रा’ असला तरी त्यांचा खरा विरोध ओबीसी, दलितांना आहे हे ओळखता आले पाहिजे. प्रगत ब्राह्मण समाज स्वतच्या लढाया लढायला सक्षम आहे. समर्थ आहे. त्यांची वकिली इतरांनी करण्याची गरज नाही. प्रश्न आमच्या दलित-ओबीसींच्या अस्तित्वाचा आहे. भारतीय समाज पुढील चार गटांत विभागला गेला आहे. (१) उच्चवर्णीय ब्राह्मण, भूमीहार, बनिया; (२) सत्ताधारी जाती गुजर, रेड्डी, पटेल, जाट, मराठा; (३) ओबीसी, भटके विमुक्त; (४) दलित अन् आदिवासी. या चार गटांतील सामाजिक विभागणी समजून घेणे, त्यांच्या उत्थानासाठी, हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी झटणे हा गुन्हा ठरत नाही. तथापि िहदुत्ववादी जसे मुस्लीमविरोधाची आवई उठवून ‘िहदू सारा एक’ म्हणत असतात आणि दुसरीकडे दलित, ओबीसी, भटके, आदिवासी यांच्या आरक्षण, जातवार जनगणना अशा कार्यक्रमांना विरोधही करीत असतात. त्याच धर्तीवर ‘ब्राह्मण आपला शत्रू’ असे म्हणत ओबीसींना साथीला घेऊन त्यांच्याच ताटातील घास अलगद काढून घेण्याचा डाव खेडेकर खेळत असतील तर हे राजकारण ओबीसी-दलितांना समजावून सांगणे हे आमचे कर्तव्यच आहे. मॉरिस जोन्सची परिभाषा वापरून सांगायचे तर फुले-आंबेडकरी चळवळीत आज आधुनिकता, परिवर्तन, सदाचार आणि परंपरा यांची गतिशील ऊर्जा कार्यरत आहे. तिला फॅसिझमची कीड लागू द्यायची काय?
खेडेकर सांगतात, ‘‘मराठा जातीपेक्षा गावातील, माळी, वंजारी, तेली निश्चितच श्रीमंत आहेत.. ओबीसींचे सगळे फायदे धूर्तपणे फक्त माळ्यांनीच ओढून नेले.’’ (बापट आयोग, पृ. ५०, ५१) यावरचा उपाय म्हणून मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, माळ्यांना ओबीसीतून बाहेर काढावे, कुणब्यांना ओबीसीत स्वतंत्र गट बनवून वेगळे आरक्षण द्यावे. अनुसूचित जातीचे सगळे आरक्षण बौद्ध पळवतात. सबब मातंग, चर्मकार, ढोर, भंगी यांचे आरक्षणासाठी स्वतंत्र गट करावेत असे सल्ले खेडेकर देतात. (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५४) खेडेकरांचा हा कार्यक्रम बहुजन समाजाच्या ऐक्याचा कार्यक्रम आहे काय? मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिले की िहदुत्चवादी त्यावर तुटून पडतील आणि िहदू-मुस्लीम भांडण लागले की दलित-आदिवासी, ओबीसी-भटके अजेंडय़ावरून आपोआप गायब होतील. हा खेडेकरांचा डाव आहे. ‘‘अत्यंत नीच पातळीवर जाऊन मराठा समाजाची िनदानालस्ती करणारे, स्वत:ला फुले-शाहू-आंबेडकरांचे जिवंत एकमेव वारसदार असल्याचे दावा करणारे हरिभाऊ नरके हे सुमारे गेले चार वर्षे मराठा जातीचा ओबीसीत समावेश करणे कसे अन्यायी आहे यावर राज्यात व राज्याबाहेर भाषणे देत आहेत.’’ (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५३) अशी टीका खेडेकर करतात. मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक मुद्दे दुबळ्या ओबीसी-भटक्यांना समजावून सांगणे ही हरि नरके यांची कृती मराठा समाजाची िनदा-नालस्ती कशी ठरते ते खेडेकरच जाणोत. घटनात्मक पातळीवरील मतभेद मांडायचे नाहीत काय? मतभेद मांडणे म्हणजे शत्रू होणे असते काय? त्यासाठी ठेचून काढू, संपवून टाकू अशा धमक्या देणे हा चळवळीत साथ देणाऱ्यांचा हा विश्वासघात नाही काय? इथे कुठे आला ब्राह्मण? आम्ही जिवंत राहण्याची धडपड करणे हीही तुम्हाला ब्राह्मणी खेळी वाटत असेल तर ती तुमची गरसमजूत आहे. आमचा मात्र तो हक्क आहे. ब्राह्मणवादी संघटनांच्या अजेंडय़ाशी आम्ही सहमत होणे कदापिही शक्य नाही. आजही त्यांना कुळकायदा रद्द करायचा आहे. आरक्षण आणि जातवार जनगणनेला त्यांचा विरोध आहे. आजही जे ज्ञानगंडाने मातलेले आहेत, परशुराम ज्यांचा आदर्श आहे, हिटलर ज्यांना अनुकरणीय वाटतो, त्यांच्याशी आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. त्यांचे आणि खेडेकरांचेच एकमत आहे. कारण खेडेकर म्हणतात परशुराम हा मराठा होता. (पृ. ३७) एवढेच नाही तर त्यांचे असेही प्रतिपादन आहे की ‘‘मराठय़ांच्या वीर्यसंकरातून आज जगातील मानववंश वाढलेले आहेत.. वैद्यकीय व शास्त्रीयदृष्टय़ा मराठय़ांचा संकर होऊन निर्माण झालेला आजच्या ब्राह्मण समाजाचा बाप मराठाच आहे हे जगत्सत्य आहे.’’ (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) यावरून मराठा आणि ब्राह्मण हे एकच आहेत आणि त्यांच्यातील भांडणं ही भाऊबंदकीच आहे असे खेडेकरांचे मत आहे. असे असेल तर या भांडणाशी दलित-ओबीसींचा कुठे संबंध येतो?
मराठाप्रेमाची तुमची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे. तुम्हाला जे थारा देत नाहीत ते सारे ‘बहुजनविरोधी’ या तुमच्या खेळी आता मराठा समाजाच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत. अण्णा हजारे यांच्याबद्दल सर्वदूर आदरभावना आहे. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. त्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका होऊ शकते. परंतु खेडेकर त्यांना चक्क वेडसर ठरवतात. ते म्हणतात, ‘‘मराठा अस्त्र आण्णा हजारे यांच्या हाती लागले. आता या अस्त्राचाही वापर संपत आला आहे. ते आता कोणत्याही क्षणी नेहमीसाठी टाळेबंद होईल आणि प्रसिद्धीचा हव्यास मेंदूत जास्तच भिनला असल्यास एखादे दिवशी आत्महत्या करेल वा अपघातात मरेल!’’ (बहुजन हिताय, पृ. ३८) या शब्दात अण्णांच्या मृत्यूची अपेक्षा करणे मराठा धर्माला शोभते काय?
खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
खेडेकरांना पसा न देणाऱ्या मराठय़ांबद्दल खेडेकरांनी किती आगपाखड करावी? ‘‘९० टक्के श्रीमंत-साक्षर, सत्ताधीश, मराठा समाज स्मशानाची वाटचाल करीत आहे. गेल्या २० वर्षांत याच मराठा समाजाने ‘मराठा सेवा संघाची’ वाट न चालता वाट लावली आहे. हाच समाज प्रामुख्याने ब्राह्मणांचा रक्षणकर्ता बनलेला आहे.’’ (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४५) ‘‘शिकलेली माणसं जेवढी गांडू-भेकड असतात, तेवढी अशिक्षित नसतात.’’ (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. १०) असा शेरा मारून खेडेकर पुढे म्हणतात, ‘‘लता मंगेशकर ही गोवन मराठा कुटुंबातील जगप्रसिद्ध गायिका होताच ब्राह्मणांनी तिचे ब्राह्मणीकरण करून टाकले.’’ (पृ. १३) लोकप्रतिनिधींबद्दल खेडेकर म्हणतात, ‘‘आपले लोकप्रतिनिधी न्यायालय म्हटले की, गांडीत शेपूट घालतात, एवढी भारतात न्यायालयांची दहशत आहे.’’ (पृ. २०) ‘‘इतर समाजाच्या पावत्या राजरोसपणे फाडणारे आमचे उच्चपदस्थ ढोंगी बांधव, मराठा सेवा संघाचे नाव घेतले की एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहरा करतात, याची खंत वाटते.’’ (कुणबी मराठा पंचसूत्री, पृ.१७) या सर्व मजकुरावरून काय सिद्ध होते? सबसे बडा रुपय्या! नोकरीत असताना खेडेकरांच्या ठाणे येथील सरकारी बंगल्यावर आयकर विभागाची धाड पडली होती.
खेडेकरांचेच मत आहे की, ‘‘१०० टक्के वैयक्तिक स्वार्थाशिवाय ९९ टक्के मराठा समाज एकत्र येत नाही.’’ (पृ. १८) स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठीच तर हे जातीप्रेमाचे ढोल वाजवले जात आहेत. लोकांचे मतपरिवर्तन करता येत नसेल तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा, हे फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे सूत्र असते. अफवा, कुजबूज तंत्र, उलटसुलट विधाने, धरसोड आणि घुमजाव ही सगळी फॅसिस्टांची वैशिष्टय़े खेडेकरांच्या पुस्तकात ठासून भरलेली आहेत. एकीकडे खेडेकर एकूण एक ब्राह्मण पुरुष जाळायची आणि कापायची भाषा करतात आणि त्याच वेळी ते आपले हे पुस्तक एका ब्राह्मणालाच अर्पण करतात. सच्चे शिवप्रेमी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेल्या शिवरायांच्या गौरवपूर्ण सेवेबद्दल त्यांना व इतर चारजणांना सन्मानपूर्वक हे पुस्तक अर्पण करीत असल्याची पानभर नोंद पृ.३ वर खेडेकर करतात. खेडेकर म्हणतात, ‘‘ब्राह्मण अधिकारी मला स्वयंस्फूर्तीने आजही सर्वार्थाने मदत करतात हे मुद्दाम नमूद करतो.’’ (पृ.१६) खेडेकरांची संघटना जर ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या पशावर चालत असेल तर ते कसले ब्राह्मण विरोधक? ब्राह्मण विरोधाची ही निव्वळ आवई उठवून खेडेकर ओबीसी-भटक्यांना फसवू पाहात आहेत. प्रत्यक्षात ‘ते ब्राह्मणांना शिव्या देतात हा फार मोठा गरसमज असल्याचीही’ कबुली खेडेकरच देतात. पुढे ‘‘ब्राह्मण अधिकारी अरिवद इनामदार व जयंत उमराणीकर यांच्यापासून मराठा अधिकाऱ्यांनी काही शिकावे, त्यात मराठय़ांचेच कल्याण आहे’’ असाही सल्ला द्यायला ते विसरत नाहीत (पृ.१६) दुसरीकडे मराठा अधिकारी मात्र खेडेकरांना आíथक मदत करीत नाहीत, अशी त्यांची खरी तक्रार आहे. ‘‘मराठा अधिकाऱ्यांना संघटनेसाठी पसे मागितले तर ते देत नाहीत. परंतु त्याच वेळी अनेकजण हप्ते जमा करण्यात क्रमांक एकवर आहेत.’’ (पृ. २०/२१) एवढेच सांगून ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणतात, ‘‘मराठा संघटनांचा वापर हे मराठा अधिकारी स्वत:चे काळे धंदे लपविण्यासाठी कवच म्हणून करतात.’’ (पृ. २१) मराठा अधिकारी काळे धंदे करतात, हप्ते घेतात हा खेडेकरांचा जाहीर आरोप आहे. मराठा अधिकाऱ्यांना तो मान्य आहे काय? खेडेकरांची संघटनाच या काळ्या धंद्यांना संरक्षण पुरवते असा कबुलीजबाब ते देऊन जातात. लेखक विश्वास पाटील यांना खेडेकरांनी मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले होते. पाटील त्यापूर्वी संघपरिवाराच्या समरसता मंचच्या साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. खास मर्जीतील असूनही खेडेकरांनी पाटलांवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्यांना चक्क शिवरायांचे विरोधक ठरवले आहे. संभाजी राजांवर महाकादंबरी लिहिणारे विश्वासराव शिवरायविरोधी कसे, हा प्रश्न विश्वास भक्तांना पडू शकेल. तथापि खेडेकरांच्या तोफेपुढे कुणाचीही खैर नाही. ‘‘विश्वास पाटील, भुजंगराव िशदे, प्रताप दीघावकर, शामसुंदर िशदे, ज्ञानेश्वर फडतरे, रवींद्र िशदे, विश्वास भोसले हे सारे मराठा अधिकारी अत्यंत मतलबी व शिवरायविरोधी आहेत. मराठा अधिकारी नोकरी, कमाई, पोस्टिंग, प्रमोशन, स्वार्थ अशा बाबींसाठी ‘मराठा’ जातीचे दाखवून सर्वच पातळ्यांवर सर्वच फायदे घेत आहेत. दुर्दैवाने अपवाद वगळता कुणीही समाजासाठी व स्वत:च्याच रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांसाठी उष्टय़ा हाताने कावळाही मारीत नाहीत अथवा फुकट कुणाच्या करंगळीवर मुतत नाहीत.’’ (पृ.१६) असा दावा ते करतात. मराठा समाजातील सर्व मंडळींना मराठापणाचा लाभ मिळतो. खेडेकर याबाबतची स्पष्ट कबुली देताना म्हणतात, ‘‘आज जे जे मराठे कोणत्याही पदावर पोहोचलेले दिसतात, त्यात ते मराठा असल्याचा वाटाच सर्वात मोठा आहे!’’ ( पृ.३२) ‘‘केवळ मराठा याच एकमेव गुणवत्तेवर जन्मभर नोकरी करणारे अधिकारी कधी कुणाच्या कल्याणासाठी कुणाच्या करंगळीवर मुतेलेले नाहीत’’ असे नमूद करून खेडेकर पुढे असेही म्हणतात की, ‘‘अनेक मराठा ज्येष्ठ आयएएस व आयपीएस अधिकारी शब्दातून सहानुभूती दाखवतात. माझा बाप मेल्यासारखे माझे सांत्वन करतात, पण प्रत्यक्ष आíथक व इतर सहभाग शून्य!’’ या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की खेडेकरांना ही मंडळी पूर्वीसारखी आजकाल पुरेशी आíथक मदत करीत नाहीत. जे खेडेकरांना व्यक्तिगत मानसन्मान देतात, भरघोस अर्थसहाय्य पुरवितात तेच तेवढे ‘‘सच्चे शिवप्रेमी! सच्चे मराठे! बाकी सारे खराटे!’’ असे खेडेकरच म्हणतात. (पृ. २५) ‘खेडेकरप्रेम म्हणजेच शिवप्रेम! खेडेकर म्हणजेच समाज’ असे समीकरणच पुस्तकांच्या पानापानांवर मांडले गेले आहे. ‘खेडेकर साहब अंगार है, बाकी सब भंगार है!’ अशी त्यांच्या अनुयायांची घोषणाच असते. हे अनुयायी खेडेकरांना युगपुरुष मानतात. त्यामुळे खेडेकर या युगातील कायदे आपल्याला लागू होत नाहीत असे मानतात.
‘‘राजकारणी मराठय़ांना शिवाजी हे निवडणुकीत विजय मिळवून देणारे पात्र वाटत नाही.’’ (पृ.३१) असे खेडेकर सांगतात. इतर कुणाची महाराजांना ‘पात्र’ म्हणायची हिंमत झाली नसती. खेडेकरांचे महाराजांवर ‘विशेष’ प्रेम असल्याने त्यांना तो अधिकारच असणार. खेडेकरांनी शिवरायांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. मराठा राजकीय नेत्यांवर खेडेकरांचा भलताच ‘जीव’ असावा! त्यांच्यावर तोंडसुख घेताना खेडेकरांनी त्यांना लावलेली विशेषणे, त्यांचे केलेले गुणवर्णन मुळातूनच वाचायला हवे. खेडेकर म्हणतात, ‘‘शिवाजीराव देशमुख, आर.आर. पाटील, पतंगराव कदम हे व इतर सर्वच मराठा नेते आजही शिवरायांना ‘अक्करमासे’ मानतात. शिवरायांची बदनामी होण्यास जास्त हातभार यांनीच लावला आहे.’’ (पृ.३०) बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसेपाटील यांच्यावरही खेडेकरांच्या या पुस्तकात प्रखर टीका आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतचा पुढील उल्लेख एक नमुना म्हणून बघता येईल. ‘‘विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:च्या घरचा कार्यक्रम असल्यासारखी स्वतची जाहिरात केली. हे सर्व पाहिल्यावर शिवरायांच्या ऐवजी हर्षवर्धन पाटील यांच्याच पुतळ्याचे अनावरण विधानभवनात करणे योग्य झाले असते, असे सर्वच पाहुण्यांसह उपस्थित हजारो शिवप्रेमी रयतेस वाटले. एवढा निर्लज्जपणा पोसणारे आमचे नेते.’’ (पृ.२७) खेडेकर या शब्दांत पाटलांवर तुटून पडतात. पाटलांनी त्यांना केलेल्या आजवरच्या मदतीची अशा प्रकारे ते परतफेड करतात!
‘‘शिवाजी हे सार्वजनिक चावडीसारखे झाले आहेत. फायद्यासाठी प्रत्येकाचेच, पण करण्यासाठी कोणाचेच नाहीत.’’ (पृ.२९) अशी तक्रार करून खेडेकर विधिमंडळावर हल्ला करताना राज्याच्या विधिमंडळानेच शिवरायांचा घोर अपमान केलेला आहे असा आरोप करतात. ते म्हणतात, ‘‘महाराष्ट्राचे विधिमंडळ व स्वत: महाराष्ट्र शासनच शिवरायांच्या बदनामीत सहभागी आहेत. हा बेशरमपणाचा कळस आहे. असे विधानमंडळ व शासन संपवण्यासाठी शिवप्रेमींनी विचार करून कृती करावी.’’ (पृ.२९, ३०) खेडेकर विधिमंडळाविरुद्ध दंड थोपटतात आणि थेट आव्हान देतात, ‘‘विधिमंडळाने माझ्यावर हक्क भंग टाकावा.’’ (पृ.२९) महाराष्ट्र विधिमंडळ हे आव्हान स्वीकारेल काय? असा सामान्यांचा प्रश्न आहे. सार्वभौम विधिमंडळाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा खेडेकरांना ‘वरदहस्त’ असल्याचे बोलले जाते. तशी लोकभावना आणि मीडियात चर्चा आहे. यासंबंधात काही बिघाड किंवा तणाव निर्माण झाला आहे काय हे समजायला मार्ग नाही. कदाचित ‘कात्रज घाट पॉलिसी’ही असेल. या पुस्तकात आर. आर. पाटील यांचे वाभाडे काढण्यात आलेले आहेत. ‘‘दंगा व जाळपोळ केल्याशिवाय पोलीसही समाजाशी चांगुलपणाने वागत नाहीत. त्यांना लाथा घालणाऱ्यासमोरच मराठा पोलीस माथा टेकतात. मराठा पोलीस अधिकारी अत्यंत खोटे वागतात. मराठा पोलीस कार्यकर्त्यांचा विश्वासघात करतात. अत्यंत घातक व फसवा माणूस एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील आहे. गाडगेबाबांचा फसवा चेहरा वापरून सर्वच फसव्या व असामाजिक भानगडीत एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील अग्रेसर आहे. एक नंबरचा ढोंगी माणूस याला साथ देऊन मराठा समाजाचे अनंत नुकसान करणारे मराठा पोलीस मराठा समाजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.’’ (पृ.२२, २३) अशी आगपाखड करून खेडेकर म्हणतात, ‘‘हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट येथे जेम्स लेन प्रकरणात सरकार पराभूत होण्यास एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे पोपटलाल आर. आर. पाटील. अशा ढोंगी आर. आर.सारख्या नालायकांना आम्ही भरचौकात नंगे करू शकत नाही, हीच मराठा समाजाची खरी खंत आहे.’’ (पृ.१३) आर. आर. पाटील व सांगली जिल्ह्य़ातील इतर मंत्र्यांवर खेडेकरांचा आणखी एक गंभीर आरोप आहे, ‘‘आय.एस.आय., तालिबान, नक्षलवादी, माओवादी, एलटीटीई अशा क्रूर संघटनांपेक्षा महाभयानक असणाऱ्या, ज्याच्यावर तडीपारीचे अनेक गुन्हे आहेत अशा सांगलीच्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडेला आर. आर. पाटील गुरू मानतात. सांगलीतील सर्वच प्रमुख मंत्री, राज्यकर्ते, श्रीमंत व सत्ताधीश मराठे जाहीरपणे भिडेच्या पायावर डोके ठेवतात.’’ (पृ.५३) आर. आर. पाटील यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत अशी जाहीर भूमिका खेडेकर घेतात. ते म्हणतात, ‘‘संभाजी ब्रिगेडने आबांना जागतिक उंची दिली. भांडारकरला अज्ञानातून भेट देऊन झालेली चूक आबांनी पुढे जमेल तशी सुधारली आणि महाराष्ट्रात व केंद्रात शासनव्यवस्थेत वाटेकरी झाले. हे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत.’’ (प्रसारमाध्यमातील दहशतवाद, पृ.१५) हे सगळेच आरोप अतिशय गंभीर आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर ते करण्यात आलेले असल्याने त्याबाबतची वस्तुस्थिती जनतेला कळेल काय?
महाराष्ट्रात मराठा व कुणबी समाजाची एकत्रित लोकसंख्या ३० ते ३१ टक्के असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान आहे. या कर्तबगार समाजाचे प्रबोधन करण्यासाठी कोणी पुढे येत असेल आणि त्यांना आपले सहकार्य हवे असेल तर ते देऊ केले पाहिजे या भावनेने मी स्वत: गेली अनेक वर्षे खेडेकरांच्या संघटनांच्या स्टेजवर गेलो आहे. ‘जातीयवादी संघटनांच्या कार्यक्रमाला जाऊ नये’ अशी भूमिका असूनही ‘मराठा समाजाचे प्रबोधन महाराष्ट्राच्या भल्यासाठी अनिवार्य असल्याच्या भावनेपोटी’ मी हा अपवाद केलेला होता. त्यापायी पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत आणि नेत्यांकडून बोलणीही खाल्ली होती. मात्र मी या संघटनांचा किंवा वामन मेश्रामांच्या बामसेफचा कधीही सदस्य नव्हतो. त्यांच्या संघटनात्मक कामकाजात माझा कधीही सहभाग नव्हता. या मंडळींनी कधी प्रवासखर्च दिला तर ठीक, नाहीतर स्वखर्चाने मी त्यांच्यासाठी व्याख्याने दिली आहेत. मानधनाचा तर कधी सवालच नव्हता. मी उदरनिर्वाहासाठी त्यांच्यावर कधीही अवलंबून नव्हतो. अन्यथा लाचार आणि हीनदीन बनावे लागले असते. जसजशी ताकद वाढत गेली तसतसे खेडेकरांचे रूप पालटत गेले. ते आणि मेश्राम एकत्र आले. दोघांचाही खाक्या एकचालकानुवíतत्वाचा. सुलभीकरण, आक्रमकता, प्रेषितपणाचा साक्षात्कार, िथकटँकमधील सहकाऱ्यांना कस्पटासमान मानणे, विचारवंत, अभ्यासकांची मुद्दाम टिंगल करणे याचा या दोघांनी धडाकाच लावला. दादोजी कोंडदेव आणि भांडारकर प्रकरणाच्या प्रसिद्धीची हवा आणि ‘मूलनिवासी नायक’ या वृत्तपत्राची भडक पत्रकारिता यांच्या जोरावर आकाशात भरारी घेणाऱ्या या दोघांनी बहुजन समाजातील ओबीसी समाज घटकांना वाऱ्यावर सोडून द्यायचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा विषय ओबीसी-भटके विमुक्त समाजातील कोणीही कार्यकर्ते, अभ्यासकांना विश्वासात न घेता अचानक आणला गेला. आक्रमकपणे हा अजेंडा ‘एकमेव’ म्हणून राबवायला सुरुवात झाली. बहुजन समाजाच्या नावावर मिळालेली राजकीय सत्ता एकाच जातीच्या हाती एकवटलेली असताना, ओबीसी आरक्षणातून ओबीसींच्या ताटात पडलेला पंचायत राज्यातील राजकीय सत्तेचा पहिलावहिला घासही पळविण्याची पद्धतशीर मोहीम आखण्यात आली. सगळे ओबीसी-भटके विमुक्त कार्यकर्ते भयभीत झाले. अशा प्रकारे बहुजनांमध्ये पहिली फूट खेडेकर-मेश्रामांनी पाडली. आरक्षण हा प्रतिनिधित्व देण्याचा, सामाजिक न्यायाचा कार्यक्रम असताना या दोघांनी त्याला ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम बनवला. हे वर्तन घटनाविरोधी होते. खेडेकरांच्या शिवराज्य पार्टीने विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांची डिपॉझिटे जप्त झाली. त्यामुळे ‘बहुजन समाज म्हणजे हागणदारी’ अशी टीका खेडेकर करू लागले. बहुजनातले महापंडित शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, लक्ष्मण गायकवाड अशा अनेकांना जाहीरपणे अपमानित करण्यातच त्यांना पराक्रम वाटू लागला. ‘मराठा म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते सर्व’ (बहुजन हिताय, पृ. ७) असे म्हणणारे खेडेकर अचानक छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशा बहुजन नेत्यांना विषमतावादी, ब्राह्मणांचे हस्तक असे म्हणून हिणवू लागले. सर्व मराठेतरांना टार्गेट करण्याचा सपाटा लावण्यात आला. फुले-आंबेडकरी चळवळ म्हणजेच मराठा सेवा संघ आणि सेवा संघ म्हणजेच चळवळ, असे समीकरण बनविण्यात आले. (बहुजन हिताय, पृ. ८) मराठा व कुणबी, बहुजन, फुले-अांबेडकरवाद हा सगळा आपला मतदारसंघ आहे असे मानणाऱ्या खेडेकरांनी पुढे मराठेतरांचे खच्चीकरण सुरू केले. या मतदारसंघातून संभाव्य स्पर्धकांची हकालपट्टी करण्याचे मनसुबे रचण्यात आले.
मुस्लीम जातीयवादी आणि धर्माध नेत्यांची (मुल्ला मौलवींची) संघपरिवाराशी, िहदुत्ववाद्यांशी युती आहे असे खेडेकरांचे प्रतिपादन आहे. (बहुजन हिताय, पृ. १७) बहुजन िहदूंच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण तयार करण्याचे काम या दोघांच्या संगनमताने केले जाते असा खेडेकरांचा आरोप आहे. दुसरीकडे आमचा अनुभवही असाच आहे की, खेडेकरांनी ‘सरसकट सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने संघाऐवजी सर्वच ब्राह्मणांना टार्गेट करायला सुरुवात केली. शिवीगाळ, हल्ले आणि दणक्यांचे उदात्तीकरण सुरू झाले आणि तिकडे ब्राह्मण अधिवेशनांची गर्दी वाढू लागली. इकडे चिकित्सा, वादविवाद, चर्चा याऐवजी दमबाजी, अरेरावी, कमरेखालची भाषा यांनाच अग्रक्रम मिळू लागला. अशा स्थितीत या मंडळींच्या कार्यक्रमांना जाणे अशोक राणा, गणेश हलकारे, रावसाहेब कसबे, डॉ. आ. ह. साळुंखे आदींना बंद करणे क्रमप्राप्त झाले. साळुंखे सरांनी तर जाहीरपणे संबंध तोडले. यातून या फॅसिस्ट शक्तींनी बहुजनात स्पष्ट विभाजनच घडवून आणले. ओबीसी-भटके विमुक्त यांना आणि विवेकी मराठा व कुणबी समाजालाही खेडेकर-मेश्रामांपासून फारकत घेणे अनिवार्य बनले. स्वनेतृत्वाच्या प्रस्थापनेसाठी कत्तली व दंगलींचा त्यांचा विद्यमान अजेंडा बघून बहुजन चळवळ अचंबित झाली. त्यांचा आजवरचा हा छुपा अजेंडा आता स्पष्टपणे उघडा पडलाय. शिवधर्म, शिवराज्य पार्टी, भारत मुक्ती मोर्चा यातून राजकीय सत्ता मिळविण्यासाठी आक्रमकता, त्यासाठी कत्तली, दंगलींचे समर्थन असा हा प्रवास सुरू आहे. सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीच्या काळातील पतन ज्यांना माहीत आहे, त्यांनी इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे. असल्या आततायी, अतिरेकी आणि आत्मघातकी डावपेचांनी बहुजन चळवळ बदनाम होते, क्षीण होते हे लक्षात घेतले पाहिजे. बहुजनांचे विभाजन करणारे हे राजकारण नाकारले पाहिजे. फॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी आणि व्यक्तिगत वैमनस्य बाळगणाऱ्या असतात.
खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
मार्टीन निमोलर नावाच्या जर्मन कवीची एक मौलिक कविता आहे. हिटलरच्या नाझी सनिकांनी जेव्हा उच्छाद मांडला होता तेव्हाची. निमोलर म्हणतो, ‘‘जेव्हा नाझी कम्युनिस्टांसाठी आले तेव्हा मी शांत राहिलो, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. जेव्हा त्यांनी येऊन समाजवाद्यांना पकडले तेव्हा मी गप्प राहिलो, कारण मी काही समाजवादी नव्हतो. जेव्हा ते कामगार नेत्यांना घेऊन जात होते तेव्हा मी चूप होतो, कारण मी काही कामगार नेता नव्हतो. जेव्हा ते ज्यूसाठी आले तेव्हाही मी चूपच होतो, कारण मी काही ज्यू नव्हतो. जेव्हा ते आले आणि त्यांनी मलाच पकडले तेव्हा माझ्या मदतीला यायला कोणीही शिल्लक नव्हते.’’
तेव्हा अशी वेळ चळवळींवर यायची नसेल तर गडय़ा आपली फुले-आंबेडकरी लोकशाहीच बरी! हिटलर आपल्याला परवडणारा नाही. दुरून डोंगर साजरे! हिटलर हा शुद्ध रक्त, वंशश्रेष्ठत्व व आर्यत्व यांचा पुरस्कर्ता होता. फुले-आंबेडकरी चळवळ प्रामुख्याने स्त्री-शुद्र-अतिशुद्रांची (महिला, ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती यांची) आहे. तिला हा वंशश्रेष्ठत्वाचा उच्चवर्णीय ताठा परवडणारा नाही. हिटलर हा संघपरिवाराचा आणि खेडेकरांचाही आदर्श असावा यातच सगळे आले!
harinarke@yahoo.co.in
(लेखक पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक असून ते गेली ३० वर्षे फुले-आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांची या विषयावरील आजवर ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

Monday, August 1, 2011

जातीप्रश्न आणि संवाद


"स्वातंत्र्योत्तर काळातही म्हणजे १९८० सालात मंडल आयोगाची स्थापना होईपर्यंत भारतातील जातिसंघर्षाचं सांस्कृतिक परिमाण ब्राह्मण्यविरोध हेच होतं, राखीव जागा आणि जमिनीचं फेरवाटप हा आर्थिक-सामाजिक कार्यक्रम होता.१९९० नंतर मात्र ब्राह्मणेतर जातिसमूहांच्या एकजूटीची विविध जातनिहाय विभागणी होऊ लागली. हे तुकडीकरण एकविसाव्या शतकात अधिक विस्तारत गेलं. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु होते का, ह्या प्रश्नाची उकल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. ह्या समितीवर फक्त ब्राह्मण आणि मराठे या दोनच जातीच्या विद्वानांची नियुक्ती सरकारने केली अशी टीका महात्मा फुले यांच्या विचाराचे अभ्यासक, हरी नरके यांनी केली. त्यांच्यामते ब्राह्मण आणि मराठे यांच्यासमवेत अन्य जातींच्या विद्वांनांचाही या समितीत समावेश करायला हवा होता. मराठा समाजाला स्ट्रॅटेजिक पाठिंबा आपण देऊ पण सत्तेच्या वाटपात आपण मराठा समाजाशी स्पर्धा करू असंच माळी समाज अर्थातच हरी नरके सांगू पाहात आहेत." --श्री.सुनिल  तांबे{नथुराम विभुती?दादोजी कोंडदेव व्हीलन?}तरुण विचारवंत आणि ख्यातनाम पत्रकार श्री.सुनिल तांबे यांच्या लेखातील ऊतारा वर दिला आहे.माझे मित्र श्री.तांबे हे संयमी आणि सहिष्णु लेखक आहेत.कोणाही लेखकाच्या जातीचा अकारण उल्लेख करणे हे सद्भिरुचिला धरुन आहे असे मानले जात नाही. तांबेंनी मात्र किती सहजपणे माझी जात काढलीय. हेच जर त्यांच्याबाबतीत अन्य कुणी केले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय राहिली असती?खरे म्हणजे मी ऊपस्थित केलेला प्रश्न त्यांना कळलाच नाही.यानिमित्ताने मी एकुण ३ प्रश्न उपस्थित केले होते.
१]दादोजी कोंडदेव वादात संभाजी ब्रिगेड ही तक्रारदार संस्था असुनही महाराष्ट्र सरकारने सदर समितीवर ब्रिगेडच्या ५ सदस्यांची नेमणुक करणे न्यायतत्वाला धरुन होते काय?जगात कोठेही फिर्यादीलाच न्यायाधिस नेमण्याची पद्धत आहे काय?
२]सदर शाषकिय समितीवर मराठा समाजाचे बहुमत राहील अशी व्यवस्था करणे म्हणजे "म्याच फिक्सिंग" करणेच नव्हते काय?हे सर्वजण ईतिहासकार तरी होते काय?नाही. त्यातील बरेचसे ब्रिगेडचे कार्यकर्ते होते.त्यांची नियुक्ती नैतिकद्रुष्ट्या कितपत उचित होती?
३]राज्यात शेकडो ईतिहासकार असताना सरकारने फक्त मराठा व ब्राह्मण या दोनच समाजातील लोकांची निवड समितीवर करणे हा जातीयवाद नव्हता काय?शिवाजी महाराज आणि दादोजी ज्या दोन समाजांचे होते नेमक्या त्याच दोन समाजातील सदस्यांची नियुक्ती करुन सरकारने या प्रश्नाला जातीय रुप दिले नाही काय?
या तीनही प्रश्नांना बगल देवुन तांबेंनी चर्चा कश्याची करावी हा त्यांचा प्रश्न आहे.मी आयुष्यभर दलित-आदिवासी-भटके-विमुक्त,ओबीसी चळवळीत काम करीत आलो आहे.तांबेंना ते माहित नसते तर एकवेळ ठिक होते.मी कधीही एका जातीपुरती भुमिका घेतलेली नाही.तरीही तांबेंनी असा ऊल्लेख करावा याच्या वेदना झाल्या.
तांबे जातीय ध्रुवीकरणासाठी मंडल आयोगाला जबाबदार धरतात.हाही काही पुरोगामी विचारवंतांचा लाडका सिद्धांत आहे.खरे म्हणजे मंडलवर असे दुषित पुर्वग्रहातुन आणि आकसापोटी लिहिण्याऎवजी कधीतरी खुलेपणाने चर्चा केली पाहिजे.आमची तयारी आहे.प्रश्न आहे तो असा की,आपल्या ठाम मतांना केवळ हट्टीपणाने चिकटुन राहायचे की खुलेपणाने आपले विचार तपासणीसाठी खुले करायचे?

म्हणे चित्रपटांचा परिणाम होतच नाही


श्री.मुकेश माचकर हे ज्येष्ट पत्रकार आहेत.त्यांनी माझ्या फेसबुकवरिल लेखणाची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.त्यांनी माझ्या लेखणातील सामाजिक कळकळ लक्षात न घेता अत्यंत असहिष्णुतेने टिका केलेली आहे. ती करण्याचा त्यांना अधिकारच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण एकमेव आणि घाऊक रखवालदार आहोत असे माणणा-या माचकरांनी माझ्यावरचा राग बिचा-या विचारवंतांवर काढायाची गरज नव्हती."त्यामुळेच ईथे विचारवंतांचाही सुकाळ आहे", "....विचारवंतांनी चिकाटीने हेच काम केले पाहिजे.नाहीतरी त्यांची गरज काय आणि उपयोग तरी काय?" ह्या माचकरांच्या अनाहुत सल्ल्याबद्दल आभार.विचारवंतांबद्दल असुया असायला हरकत नाही.एव्हढे वर्तमानपत्री लिहुनही आपल्याला कोणी विचारवंत मानित नाही याबद्दलची त्यांची खंत अश्याप्रकारे बाहेर पडली हे बरे झाले.यापुढे समाजाने विचारवंत कोणाला मानायचे आणि विचारवंताची समाजाला गरज आहे की नाही याबाबतचा "परवाना"माचकरांकडुन घेतला पाहिजे.विचारवंतांनीही आपले काम काय असते हे समजुन घेण्याची शिकवणी माचकर क्लासला  लावावी.व्याकरण आणि शुद्धलेखनाचे पोलिसिंग १३७ वर्षांपुर्वी विष्णुशास्त्री चिपळुणकर करित असत.ही फौजदारकी आता माचकरांनी स्वताच्या शिरावर घेतलेली दिसते.सामाजिक अद्न्यान,मध्यमवर्गिय तोरा,असहिष्णुता आणि अनुदारता यात ते चिपळुणकरांचे वारस शोभतातच मुळी. ज्यांची नजर आणि अभिरुची ऊच्चभ्रु आहे त्यांना सामाजिक वास्तावातील गुंतागुंत समजणे अवघडच आहे. भारतात प्रत्येक गोष्टीमागे ३ ड्रायव्हींग फ़ोर्स असतात.१,जात.२,वर्ग.३,लिंगभाव. जे ९१ कोटी लोक जातीव्यवस्थेचे बळी आहेत,त्यांच्या नजरेने या प्रश्नाकडे पाहिल्याशिवाय त्याची तिव्रता समजणार नाही.
चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम जे पत्रकार नाकारतात त्यांचीही समाजाला गरज असतेच.जो माझा अन्यत्र् प्रकाशित झालेला लेख माचकरांना झोंबलाय त्यातच मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट पुरस्कार केलेला आहे.ते बहुजन समाजाचे शक्तीवर्धक आहे.{हे समजुन घेण्यासाठी मी माचकरांच्या क्लासची शिकवणी लावली नव्हती हे अम्मळ चुकलेच.} घटनेच्या कलम १९ मधील ही तरतुद अनिर्बंध नाही.अनुसुचित जाती,जमातींच्या हिताआड काही येत असेल तर त्याचा विचार होवु शकतो.राज्यघटनेतील कलम १४,१५,१६,व१७ आणि३३९यांची माचकरांना प्राथमिक माहिती असायला हरकत नव्हती. माचकरांच्या या लेखात अंतर्गत विसंगती ईतक्या आहेत की त्य सर्वांवर लिहिणे विस्तारभयास्तव अवघड आहे.लोकांनी काय पाहावे/पाहु नये हेच सेंसोर बोर्ड ठरवते हेही माचकरांना माहित नसावे? ते मान्य असेल तर मग जे सेंसोर ठरवते ते घटनात्मक अश्या आणि सेंसोरपेक्षाही वर असलेल्या राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने ठरवायला ते कसा नकार देवु शकतात?शोषितांच्याबद्दल नफरत हीच ज्यांची ओळख आहे आणि त्याच तो-यात जे वावरतात त्यांच्याकडुन सामाजिक न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.