Saturday, March 31, 2018

पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश -


डॅा. आनंदीबाई गोपाळ जोशी - डॅा. रखमाबाई सावे - राऊत

आनंदीबाई गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती.

त्यांचा बालविवाह. नवरा विधूर.वयाने मोठा. विक्षिप्त. बायकोला शिकवण्याचा अट्टाहास असलेला. आनंदीला वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी मुलगा झाला होता. तो लगेच वारला. वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॅाक्टर व्हायचं या जिद्दीने त्या पेनसिल्व्हानियाला गेल्या. त्यांनी 2 वर्षीय वैद्यकीय पदवी घेतली. तो दिवस होता11 मार्च 1886.

त्यांना कोल्हापूर दरबारने लगेच नोकरी दिली. परतीसाठी तिकीटाची व्यवस्था केली.
बाई भारतात आल्या त्याच गंभीर आजारी असलेल्या अवस्थेत.
कल्याण त्यांचं माहेर.

टिबीनं ग्रस्त असताना त्या एका वैद्याकडून उपचार घेण्यासाठी पुण्यात आल्या.
बाईंवर गंडे-दोरे-ताईत-अंगारे-धुपारे- मांत्रिकाचे उपचार केले गेले.

एकही पेशंट न तपासता अवघ्या साडेतीन महिन्यात बाई 27 फेब्रूवारी 1887 ला गेल्या तेव्हा त्या 22 वर्षांच्या होत्या.
तांत्रिकदृष्ट्या त्या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर असल्या तरी एकही पेशंट न तपासता गेलेल्या.

त्यांच्या मृत्यूनंतर पुण्यातल्या एका वर्तमानपत्राने बाई डॅाक्टर झालेल्याच नव्हत्या असे लिहिले. त्यांच्या पदवीवर शंका घेतली. यथावकाश खुलासा झाला. आजचासारखा चारपाच वर्षांचा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केलेला नव्हता. तसे त्यांचे रितसर शिक्षणही फारसे झालेले नव्हते. त्या मॅट्रीकही नव्हत्या. मात्र त्यांनी 2 वर्षीय वैद्यकीय पदवी/पदविका घेतलेली होती.

रखमाबाई सावे - राऊत यांचा जन्म आनंदीबाईंच्या आधीचा. 22 नोव्हेंबर 1864 चा.

त्यांचंही लग्न बालपणी झालं. वडील वारल्यानं त्यांच्या आईनं पुनर्विविवाह केलेला होता. सावत्र वडील जे. जे. हॉस्पीटलमध्ये नामवंत डॅाक्टर होते. त्यांचे अनेक वैद्यकीय ग्रंथ अभ्यासक्रमाला लावण्यात आलेले होते.
नवर्‍याने त्यांना नांदायला बोलावले. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे होते. डॅाक्टर व्हायचे होते.

त्यांनी नांदायला जायला नकार दिला. नवरा दादाजी कोर्टात गेला. ब्रिटीश कोर्टाने मनुस्मृतीच्या आधारे निकाल दिला. बाई नांदायला जा. नाहीतर तुरूंगात पाठवू. बाई म्हणाल्या, मी तुरूंगात जाते, निदान सुटल्यावर डॅाक्टर होता येईल.

रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्याची केस भारतभर तर गाजलीच पण पाश्चात्त्य जगही हादरले. लंडनला महिलांनी रखमाच्या पाठींब्याच्या सभा घेतल्या.

शेवटी कोर्टाबाहेर समझोता झाला. दादाजीने पैसे घेऊन घटस्फोट दिला.

बाई शिकायला ब्रिटनला गेल्या. आक्टोबर 1890 मध्ये त्यांनी लंडन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. 5 वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण केला. स्कॉटलंडमधून वैद्यकीय पदवी घेतली.

7 सप्टेंबर 1895 ला त्या भारतात परत आल्या.

मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू लागल्या. पुढे सुरत, राजकोट येथेही त्यांनी समर्पितपणे काम केले.

लग्न न करता वयाच्या 91 व्या वर्षापर्यंत त्या वैद्यकीय सेवा करीत राहिल्या.
25 डिसेंबर 1955 ला त्या गेल्या.

दोघींची जिद्द, परिश्रम, ज्ञानलालसा यांना तोड नाही. दोघीही महानच होत्या.

पदवी/पदविका, 2 वर्षांचा कोर्स, 5 वर्षांचा कोर्स यांच्या तपशीलात न जाता जिद्दीनं शिकलेल्या आनंदीबाई आणि रखमाबाई या दोघींनाही पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सचा मान मिळायला हवा.

-प्रा.हरी नरके

Friday, March 30, 2018

रामजीपुत्राला काळाराम मंदिरात प्रवेश का नव्हता?डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असेच संपुर्ण नाव लिहावे असा फतवा उप्र सरकारने काढला आहे.
कायदेशीर व नैतिकदृष्ट्या त्यात अयोग्य काहीच नसले तरी आत्ताच 2019 च्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांना हा साक्षात्कार का झालाय?

नाव भले रामजी असेल पण राम नाईकांमधला राम, तुलसी रामायणातला राम आणि भीमराव रामजींमधला राम हे एकच होते? आहेत?

एकच असतील तर मग या रामजीपुत्राला 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश का नाकारण्यात आला होता? त्यासाठी 5 वर्षे त्यांना संघर्ष-सत्याग्रह का करावे लागले होते?त्यांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाला सर्व धर्माचार्यांनी प्राणपणाने विरोध का केला होता?
त्यांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम अ‍ॅंड कृष्ण ला सनातन्यांचा विरोध नव्हता काय?

ते नेहमीच बी.आर. आंबेडकर अशी सही करीत असत.
त्यांनी इंग्रजीतल्या मूळ संविधानाच्या आठव्या भागावरही रोमन लिपीत बी.आर. आंबेडकर अशीच सही केलेली आहे.
सही बघूनच संपुर्ण नाव लावायचे असेल तर महात्मा फुले, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचे फक्त संपुर्ण नाव लिहायचे नी त्यांची उपाधी गाळायची हे योग्य होईल का? समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख यापुढे फक्त संपुर्ण नावाने करा असा कोणी फतवा काढला तर तो जसा चुकीचा ठरेल तसेच हे आहे.

संपुर्ण नावच हवे तर मग नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, राम नाईक, मोहन भागवत, रामनाथ कोविंद, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यातले कोण कोण पुर्ण नाव लावतात? लावायचे?
खुद्द उप्रचे मामु तरी त्यांचे संपुर्ण नाव लावतात काय?

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाची एक ओळख आहे. ती का बदलायची?
एस.एम. जोशी, जी.ए.कुलकर्णी, पु.ल. देशपांडे ही नावं जर उद्या संपुर्ण लिहिली तर जनतेला पटकन ओळखू येतील?

नावात कशाला घुसायचं? नावात काय आहे? असंही म्हणायचं नी नावाचं राजकारण करायचं ही खोड चांगली नाही.

यावर वादंग व्हावे, हा इश्य़ु गाजावा अशीही त्यांची रणनिती असावी.

आपणही बजेटवर बोलत नाही, मुलभुत समस्यांवर बोलत नाही, फक्त अस्मितेच्या आणि नावांच्या मुद्द्यांवर शक्ती खर्च करतो. हे तरी कितपत योग्यय?

-प्रा.हरी नरके

Thursday, March 29, 2018

गंगाधर पानतावणे-

गंगाधर पानतावणेसर- -प्रा.हरी नरके

गंगाधर पानतावणेसरांनी गेली 50 वर्षे अस्मितादर्श त्रैमासिक एकहाती पेलले होते. अनेकांना त्यांनी लिहते केले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेकांना बोलते केले. अनेकांच्या पुस्तकांवर त्यांनी परीक्षणे प्रकाशित केली. दोनतीन पिढ्या त्यांनी घडवल्या.

अस्मितादर्शचा अंक नियमितपणे यायचा. जाहीराती नसताना अंक काढणे खरंच अवघड. आजवर सामाजिक चळवळीतील अनेकांनी वर्गण्या नेल्या, एकदोन अंक आले की पुढे अंक बंद. अस्मितादर्श हा एकमेव अपवाद.
माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर धुळ्याच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला सरांनी मला बोलावलं होतं.

औरंगाबादच्या त्यांच्या घरी "श्रावस्ती"वर अनेकदा भेटीगाठी झालेल्या. ते आजारी असताना तीनचारदा त्यांना भेटायला गेलो होतो. बर्‍याच गप्पा होत असत.

सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीवर होते. त्यांना मी बाबासाहेबांच्या खंड 18 च्या तिन्ही भागांची संदर्भ सूची तयार करण्याबाबत विनंती केली. त्यांनी भाग 1 व 2 ची सूची बनऊन दिली.

एका ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाला नागपूरला मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचा फार मोठा ताफा उपस्थित होता. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांवर त्याच आठवड्यात नक्षली हल्ला झालेला होता. स्टेजवर प्रवेशासाठी फोटो लावलेले पोलीस आयुक्तांच्या सहीचे ओळखपत्र घेणे सक्तीचे करण्यात आलेले होते.

सिक्युरिटीवाल्यांनी सरांकडे प्रवेशपत्र नसल्याने व स्टेजवर खुप गर्दी असल्याने सरांची बसण्याची व्यवस्था स्टेजवर केली नाही. त्यांना पहिल्या रांगेत बसावे लागले. त्याबद्दल सर माझ्यावरच रागावले. तो राग ते कधीही विसरले नाहीत. स्वत:च्या मानसन्मानाबाबत ते अतिशय सजग असत.

त्यांचे रागलोभ फार तीव्र होते. एखाद्यावर नाराज झाले की त्याला कायमचे ब्लॅकलिस्ट करून टाकायचे.

माझी आजवर 40 पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातल्या एकावरही अस्मितादर्शमध्ये एक ओळही सकारात्मक छापून आली नाही. खंड 21 वर कडक टिका करणारे लेख त्यांनी छापले. मात्र वारंवार विनंती करूनही आमचा खुलासा त्यांनी छापला नाही. बाबासाहेबांच्या साक्षेपी पत्रकारितेवर त्यांचे संशोधन होते. बाबासाहेब दोन्ही बाजूंना स्थान देत असत. पानतावणेसरांनी मात्र अस्मितादर्शमध्ये कधीही दुसरी बाजू छापली नाही.
आपला-परका याबाबतची त्यांची निवड काटेकोर असायची.

एक मनस्वी वक्ता, लेखक, संपादक, प्राध्यापक म्हणून त्यांचे मौलिक योगदान कायम स्मरणात राहील. खुप आठवणी आहेत.

-प्रा.हरी नरके

Saturday, March 17, 2018

संभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा !

 
संभाजी महाराजांचा शहिद दिन तारखेनुसार का पाळला जात नाही?
इंग्रजी कालगणनेनुसार येणाऱ्या तारखेला शिवजयंती साजरी करावी, असं म्हणणारी मंडळी संभाजी महाराजांचा मृत्यूदिन मात्र तिथीनं पाळला जावा, असा आग्रह का धरत असावेत?
‘मनुच्या नियमानुसार संभाजींची हत्या झाली’, ‘संभाजींच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या जातात’, ‘गुढीपाडवा बहुजनविरोधी सण आहे’ असा डांगोरा पिटायचा असेल तर याला पर्याय नाही.

1. दसरा आणि होळी या दोन सणांव्यतिरीक्त फार सणवारांचे उल्लेख ऐतिहासीक साधनांमध्ये क्वचितच आढळतात. तरी गुढी पाडव्याचा उल्लेख शिवचरित्रात एकदा सापडतो. शिवाजी राजांच्या निकटवर्तींयापैकी एक निराजीपंत गुढीपाडवा साजरा करण्यासाठी घरी गेले, असा उल्लेख आहे. म्हणजे संभाजीराजांच्या हत्येपुर्वी गुढीपाडवा साजरा होत होता. संतसाहित्यात गुढ्या उभारण्याचे उल्लेख आहेत.

2. संभाजीराजांच्या हत्येसंदर्भांत ‘आलमगीर विजय’ म्हणजेच ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथांची साक्ष काढायला हरकत नसावी. याचा लेखक ईश्वरदास नागर हा राहणार मुळचा पाटण, गुजरातचा. औरंगजेबाचा मुख्य न्यायाधीश शेखुल इस्लाम याचा कारकुन होता हा ईश्वरदास. शेखुल इस्लाम नेहमी औरंगजेबासोबत असे. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा,’ या न्यायानं साहजिकच ईश्वरदासही नेहमी त्याच्या धन्याबरोबर असायचा. या ईश्वरादासानं 1696 मध्ये औरंगजेबाची नात सैफुन्निसा हिला ब्रह्मपुरीच्या (ता. मंगळवेढे, जि. सोलापुर) छावणीत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या कामगिरीबद्दल औरंगजेबानं ईश्वरादासाला मनसब देऊन गौरविलं. थोडक्यात ईश्वरदास हा औरंगजेबाच्या जवळच्या वर्तुळात होता. या ईश्वरदासाच्या ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथाच्या हस्तलिखीताची प्रत लंडनच्या ब्रिटीश म्युझियमध्ये आहे. एकूण 339 पानांचा हा ग्रंथ फारसी भाषेत आहे.

3. फारसी भाषेचे तज्ज्ञ सेतुमाधवराव पगडी यांनी या ग्रंथाची नक्कल मिळवली होती. या ग्रंथाचं भाषांतर करताना पगडींनी केलेली नोंद अशी – संभाजीराजांची कैद आणि त्यांची निर्घृण हत्त्या यासंबंधी ईश्वरदासाने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या अभ्यासकांना नवीन वाटतील. “औरंगजेबासमोर उभे केल्यानंतर संभाजीराजांनी त्याच्यासमोर आपली मान लवविली नाही. इखलासखान आणि हमीदुद्दीनखान यांनी पुष्कळ समजावूनही काही उपयोग झाला नाही. औरंगजेबानं त्याचा बक्षी रुहुल्लाखान याला आदेश केला, की संभाजीला विचार – ‘तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्तीचा ठावठिकाणा कुठं आहे? बादशाही सरदारांपैकी कोण-कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबध ठेवीत होतं?’ संभाजी गर्विष्ठ होता. माहिती देण्याचं नाकारुन त्यानं बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चारले. त्याची निंदा-नालस्ती केली, असं ईश्वरदास लिहितो. यावर औरंगजेबानं आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून (आंधळा करुन) त्याला नवीन दृष्टी द्यावी (वठणीवर आणावं). त्याप्रमाणं करण्यात आलं. गर्विष्ठ संभाजीनं डोळे काढल्यापासून अन्नत्याग केला. काही दिवस उपास घडल्यावर ही बातमी औरंगजेबाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेनं त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपुरापर्यंत मिरविण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकविण्यात आले,” असं ईश्वरदासनं नमूद केलं आहे.

4. औरंगजेबाची कारकिर्द म्हणजे केवळ राजकारणाचा भाग होता, अशा प्रचाराची आपल्याकडे लोकप्रिय 'फॅशन' आहे. ती अनैतिहासीक आहे. कैद्यांना धर्मांतराच्या अटीवर सोडणं हे इस्लामी व्यवहार-धर्मशास्त्राच्या हनफी परंपरेला धरुन होतं. इनायतुल्लाखान हा औरंगजेबाचा चिटणीस-पत्रलेखक. इनायतउल्लाखानच्या ‘अहकामे आलमगिरी’ (आलमगिरीचा आदेश) या ग्रंथात औरंगजेबाची पत्रं आहेत. हा फारसी ग्रंथाचं हस्तलिखीत उपलब्ध आहे. इच्छुकांनी जरुर त्याचं वाचन करावं. सन 1702 ते 1707 या काळातल्या औरंगजेबाच्या या आज्ञापत्रांमध्ये काफिरांचा (हिंदू) नायनाट, मंदिरांचा विध्वंस, मूर्तिपुजकांची हकालपट्टी, चोर (मराठे), गाव-किल्ल्यांची नामांतरे, धर्मांतरे याचे संदर्भ उदंड आहेत.

5. मुस्लिम राज्यकर्त्यांनी विशेषतः बाबर आणि औरंगजेबानं हनीफ परंपरेचा उपयोग सर्वाधिक करुन घेतला. शिवरायांचे सेनापती प्रतापराव गुजर यांची दोन मुलं औरंगजेबाच्या तावडीत सापडली. तेव्हा इ.स. 1700 च्या 27 मे रोजी औरंगजेबानं निरोप पाठवला. ‘अगर इरादा ये इस्लाम दाश्ताबाशद निज्दे शहाजादा मुहंमद बेदारबख्त महादुर बफिरस्तंद, इल्ला दर कैद दारंद’ (इस्लाम ग्रहणाचा बेत असल्यास राजपुत्र बेदार बख्त बहादुर याजपाशी पाठविण्यात येईल, नाही तर कैदेत ठेवावे.) प्रतापराव गुजर यांच्या खंडोजी व जग्गनाथ या दोन मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केलं. 13 जुलै 1700 रोजी हे दोघं खटाव (सातारा) तालुक्यातल्या औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाले. धर्मांतरानंतर ते ‘खंडूजी अब्दु-रहीम’ आणि ‘जगन्नाथा अब्दु-रहमान’ बनले.

धर्मवेडापायी धर्मांतरं घडवून आणल्याची कैक उदाहरणं मोगलांच्या राजवटीत आहेत. इनाम, संरक्षण, संपत्ती, जहागिरी किंवा जगण्याच्या मिषानं ही धर्मांतरं झाली आहेत. स्वतः औरंगजेबाला धर्मांतरं घडवण्यात, शरियत कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रचंड रस होता. संभाजीपुत्र शाहू कैदेत असताना त्याला मुस्लिम होण्याची सूचना औरंगजेबानं केली होती. (तसा औरंगजेब दरबारच्या बातमीपत्रात स्पष्ट उल्लेख आहे.) मात्र शाहुंनी धर्मांतरास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याचा आदेश औरंगजेबानं दिला.

6. औरंगजेब धर्मवेडा असल्याचं खरं असलं तरीही संभाजी राजांनी धर्मांतर करावं म्हणून औरंगजेबानं त्यांचा छळ केल्याचा उल्लेख मात्र सापडलेला नाही. संभाजीराजांना ठार मारायचे, हा औरंगजेबाचा निर्धार पक्का होता. शिवाजीराजांचा हा पराक्रमी अंश संपवल्यानंतर मराठेशाही नेस्तनाबूत होईल आणि दक्षिण भारतावर कब्जा करता येईल, अशी त्याची धारणा त्यामागं होती. संभाजीराजांना मुसलमान करण्याच्या फंदात औरंगजेब पडल्याचं आढळत नाही.

7. प्रत्यक्षात मात्र धर्मांतर नाकारणाऱ्या संभाजी राजांची ‘धर्मवीर’ अशी प्रतिमा रंगवणाऱ्या अनेक आख्यायिका रुढ झाल्यात. ईश्वरदासाच्या फारसी ग्रंथावरुन असं स्पष्टपणे म्हणता येतं, की संभाजीराजांच्या धर्मांतराचा प्रश्नच उपस्थित झालेला नाही.

8. “औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीत कोणतीही शिक्षा शराला (इस्लामी धर्मशास्त्र) अनुसरल्याशिवाय दिली नाही. केवळ संतापाच्या भरात किंवा बेभान होऊन त्यानं कोणालाही ठार मारण्याची आज्ञा केली नाही,” असं औरंगजेबाच्या अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे. संभाजीराजांनी शरणागती पत्करण्याऐवजी कैदेत असूनही औरंगजेबाचा अपमान केला. त्याची बेईज्जती केली.

शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हां हां म्हणता ताब्यात घेता येईल, या आशेनं आलमगीर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड साधनसामुग्री, सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याचे हे मनसुबे संभाजीराजांनी पार उधळून लावले. याचा संताप औरंगजेब आणि त्याच्या सरदारांना असणार. यातून संभाजीराजांची क्रुर हत्त्या झाली. त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली गेली ती मराठ्यांवर जरब बसवण्यासाठी.

प्रत्यक्षात यामुळं मराठे आणखी पेटून उठले. संभाजीराजांच्या बलिदानानंतर म्हाताऱ्या आलमगीरला दख्खन जिंकता आलं नाही. तो त्यानंतर 16 वर्षांनी महराष्ट्रातच मेला.

8. संभाजीराजांना "धर्मवीर" ठरवून मुस्लीम द्वेष पसरवणाऱ्या आणि इतिहासात गाडलेल्या औरंगजेबाचं भूत मानगुटीवर बसवून आजच्या भारतीय मुस्लिमांविरोधात उभं ठाकणाऱ्या हिंदूत्त्ववाद्यांनाही सद्बुद्धी मिळो.
Sukrut Karandikar- यांच्या लेखाचा सारांश- @सुकृत करंदीकर,17 मार्च 2018, पुणे.
..........................
लीळाचरित्रात गुढीला हा शब्द येतो.
"सर्वज्ञे म्हणीतले: "हाति गुढीला निका दिसे:"
यातील गुढीला या शब्दाचा अर्थ : वर आच्छादन घातलेला, शृंगारलेला, असा वि.भि.कोलते देतात.
पाहा- लीळाचरित्र, संपा. वि.भि.कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, 2 री आवृत्ती, आक्टोबर, 1982, उत्तरार्ध, 336,पृ. 550


Friday, March 16, 2018

कट प्रॅक्टीस नी देवऋषी प्याकेज--- प्रा.हरी नरके

ओ दादा, त्यो लेता मंगेशकर दवाखाना कुठं हाय वो?
लता मंगेशकर नाय ओ, दीनानाथ मंगेशकर दवाखानाय तो. असंच नदीच्या काठाकाठानं जावा, डाव्या हाताला हाय बगा.

दवाखान्यात चाल्ले जणु. काय बरंगिरं नाय का?
समदं ठनठनीत हाय. तिकडं भरती चाल्लीय नव्हं?
भरती? कशाची?

देवऋषी लोकं, बुवा, बापू, म्हाराज, लई पोस्टी खाली हायत म्हणं.
ते च्यायनलवाले तिकडंच जाऊन राह्यले बघा.

नगं नगं, त्यांचा संमंध नको बाबा. लई बाराची असत्याती च्यायनलवाले. आता बघा कोण्ताबी च्यायनल लावा, वास्तूशास्त्र नायतर राशीभविस्य चालू अस्ताय का नाय? आनी तरी पन आमच्याच बिजनेसवर टिका करत्याती. ही गद्दारी नाय?

मी काय म्हणतो, तुमी एखांदा लेक लिवा की दादा. जशी जनरिक काय ती औषादं सस्तात असतात, तसं परत्येक दवाखान्यात देवऋषी लोकं, बुवा, बापू, म्हाराज सस्तात उपच्यार करतील. काय हारकत हाय?

ह्यो आंदसरधा कायदा झाल्यापास्नं मायला, पोलीसं सांभाळा, दाक्तरला कट द्या. झालंच तर ते आंदसरधावाले हायतच.
त्यांचं लई बरंया. काम ना धाम, मोकार पब्लीसिटी. तीबी फुकटात. वर आनि आवार्डं अस्तायच.

मपल्यावाला एक पाईंटचा डायरेक्ट मुद्दाय.
मायला, दवाखाना आमचा, पेशंटबी आमचा. झालंच तर डाक्तर नी देवऋषीबी आमचा. मी काय म्हन्तो, सिव्या द्यायला तुमाला फकस्त हिंदूच कसे काय दिस्तात वो? त्ये त्ये काय आंदसरधावाले नस्तात काय म्हण्तो मी?

मपलं एक प्याकेज हाय. परत्येक दवाखान्यात एक मंदिर अस्ताय का नाय? त्याच्या बाजूला नरेंद्रमाहाराज कोकनवाले डिपारमेंन काढ्यायचं. एक खोली पोलीस आन आंदसरधावाले यांना बी द्यायची. परतेकाचं परसेंटेज आधीच फिक्स करायचं. नंतार भुनभुन नको. कट प्रॅक्टीस हायच तर आता प्याकेजबी घ्या मायला.

आन परत्येक दवाखान्यात एखांदी खोली डाक्टर लोकांनाबी द्यायला आमची हारकत नाय बरंका!

नाह्य तरी आपल्या सौंस्कुरतीत म्हनलेलंच हाय बरं का एक तीळ सात जनांनी वाटून खावा म्हनूनशानी.... एका देवऋशामुळं किती लोकान्ला रोजगार मिळून राह्यला बघा तरी राव. एक पेशंट, एक आंदसरधावाले, एक डाक्तर, एक पुजारी, एक दवाखानावाले, चारपाच वकीलवाले, पाचसाहा पोलीसवाले, साताट च्यायनलवाले आणि कोरटवाले बघा किती मायंदाळ रोजगाराला, पोटापाण्याला लागले. हाये का नाय पुण्य़ाचं काम?

चाय आन पकोड्यामंदी एव्हढं रोजगार हाय का? आता तरी कबूल करा राव हाच हाय खरा आन राष्ट्रीय रोजगार!
-- प्रा.हरी नरके

Thursday, March 15, 2018

36 खंडातलं आत्मचरित्र लिहून अवचटांनी केला विश्वविक्रम
डॉ. अनिल अवचट म्हणजे व्यक्तीचित्रांचे बादशहा.
एखादा नामवंत छायाचित्रकार ज्या नजाकतीनं उत्तम छायाचित्र टिपतो
तसं अतिशय मार्मिक व्यक्तीचित्र अवचट रेखाटतात.
त्यांचं व्यक्तीचित्रांचं 36 वं पुस्तक वाचतोय.
"जिवाभावाचे"
सुनंदाला आठवताना हा या पुस्तकातला मास्टरपीस.
डॉ. सुनंदा अवचट या अतिशय कर्तबगार महिला होत्या.
त्यांचा झपाटा, सामान्यांविषयीचा कळवळा, अफाट कार्यनिष्ठा यांना सलाम.
आजारपणानं त्या अकाली गेल्या.
त्यांचं स्मरण नेहमीच खुप बळ देतं. उर्जा देतं.

अवचटांनी चितारलेल्या व्यक्तीचित्रात स्वाभाविकपणे अवचट दिसतातच.
एका अर्थानं ते त्यांचं आत्मचरित्र असतं.
या अर्थानं 36 खंडातलं आत्मचरित्र लिहून त्यांनी विश्वविक्रम केलाय.
अवचटांच्या आत्मचरित्राचे शतक पुर्ण होणर बहुधा.
व्यक्तीचित्रांचे हे 36 खंड सोडले तर अन्य सहासात महत्वाची पुस्तकंही त्यांनी लिहिलीत.
माणसं, हमीद, वाघ्यामुरळी, धागे उभे आडवे, संभ्रम, कोंडमारा, गर्द,.
स्वत:विषयी पासून गेले 36 खंड ते सलग आत्मचरित्रच लिहित आहेत.

-प्रा.हरी नरके

Wednesday, March 14, 2018

युपी बिहार निकाल- फॅसिस्टांच्या शेवटाची सुरूवात?गेली 4 वर्षे देशातील दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांक यांना राजकीय जीवनातून संपुर्ण वगळतच नव्हे तर खतम करत वर्चस्ववादी सत्तेच्या रथाचे घोडे बेफाम उधळलेले आहेत.

दाखवायला लॉग इन आयडी विकासाचा आणि पासवर्ड मात्र जाती वर्ण वर्चस्ववादी हिंदुत्वाचा हे मोदी भागवत राजचे असली स्वरूप आहे. हे सरकार म्हणजे मोगलाई नी उत्तर पेशवाई यांच्या अंधारी काळाचं कुख्यात मिश्रण होय. इतर सरकारं भ्रष्ट होती. वाईट होतीच पण निदान त्यांच्यापुढचं संकल्पचित्र लोकशाहीचं होतं. फॅसिस्टांचं नव्हतं.

आमच्या लिहिण्या बोलण्यावर मोदीराजसारखी आणिबाणी वगळता कधीही  बंधनं नव्हती. पगारी ट्रोल आज हिंस्त्रपणे अंगावर येतात.

मतं मागताना मोदी आपण ओबीसी असल्याचं आवर्जून सांगतात. पण गेल्या चार वर्षात या ओबीसीद्रोही पंप्र नमोंनी ओबीसी जणगणनेचे आकडे मात्र दाबून ठेवलेत.

ओबीसी मेला पाहिजे हा मोदीसरकारचा अग्रक्रमाचा विषय आहे.  शेतकरी नष्टच झाला पाहिजे ह्याला यांची पसंती. तुघलकी नोटाबंदी, गाय गोमय हे यांचं बोधचिन्ह. सदैव परधर्म द्वेष हा यांचा ऑक्सीजन. यांना आरक्शण नकोय. दलित-आदीवासी कल्याणाचा कार्यक्रम नकोय. ललित मोदी, मल्ल्या, चोक्शी, नीरव मोदी ही यांच्या काळाची महान अपत्यं.

देशभर दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांक यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्व बाबतीत मातीत घालण्याचे कट कारस्थान खुलेआम चालूय.

स्त्री-शूद्र अतिशूद्रांना संपवून देशात पुन्हा त्र्यैवर्णिक सत्ता प्रस्थापित करण्याकडे मोदी-शहा-योगी-भागवत सुसाट निघालेत. हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. कालबाह्य, जीर्ण, अवैज्ञानिक आणि असहिष्णु मुल्यव्यवस्था हा यांचा आदर्श आहे.

सारे डावपेच बुद्धीभेदाच्या जोरावर आखले जाताहेत नी खेळवले जाताहेत. 99% माध्यमे विकली गेलीत. प्रशासन दारातल्या पाळीव प्राण्याचे काम निष्ठेने करतेय. न्यायव्यवस्थेवर न भुतो एव्हढा दबाव आहे.

लोकशाहीचे कंबरडे मोडण्याच्या स्थितीत आहे. भंगड साधू नी कुपोसित साध्वी यांनी उच्छाद मांडलाय. द्वेष आणि त्वेषाने भरलेली मुक्ताफळे रोज कानी पडताहेत. यांचे जुनाट मानसिकतावाले प्रचारक स्त्री-शूद्रांच्या गुलामीवर फुललेली कालबाह्य व्यवस्था पुन्हा आणायची स्वप्ने रंगवताहेत.

आधुनिकीकरणाचे हे सारेच शत्रू. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचे हे मारेकरी. यांनी निवडणुका जिंकल्या त्या विकास, सुशासन, भ्रष्टाचारमुक्त नी काळा पैसारहित भारत घडवण्याच्या आवया उठवून. लोक भुलले. प्रत्यक्षात मात्र हेच कार्यक्रम नेमके गायब आहेत. शेणातले किडे फक्त गप्पा मारू शकतात, शाखा चालवणं नी देश चालवणं यात फरक असतो.

सीबीआय, ईडी, आयटी या सार्‍या वेठबिगारांना कामाला लावून स्वातंत्र्याच्या 65 वर्षात केलेला सगळा लोकशाहीवादी प्रवास पुसून टाकण्याचे षड्यंत्र वेग घेतेय.

आजच्या पोटनिवडणुकांतील निकालांनी उच्च जाती वर्ण वर्चस्ववादी सत्तेच्या शेवटाची सुरूवात झालीय असे म्हणायचे काय?

की याही स्थितीत 2019 ला देशातली लोकशाहीच नष्ट करण्याची कारस्थानं यांचे फॅसिस्ट चिंतन झरे आखणार नी राबवण्यात यशस्वी होणार?

लोकशाहीवादी शक्तींनी बेसावध न राहता डोळे उघडे ठेवून जागे राहायला हवे. आपले शत्रू नी सच्चे मित्र ओळखायला हवेत. प्रश्न अस्तित्वाचाच आहे. जिवंत राहिलो तरच संविधान वाचवता येईल. हुकुमशाहीची वाटचाल रोखता येईल.

-प्रा.हरी नरके
दैवी देणगी असलेले सर्वोच्च साहेब -"अरे तू आठवल्यांचा नारायण ना? मागच्या वर्षीच्या प्रशिक्षण शिबिरात मी तुला पोळ्या विभागात पाहिलं होतं. छानय. कसं वाटलं तुला संघटनेचं शिबिर?"
नारायण उडालाच. एका अ.भा. संघटनेच्या द्वितीय वर्ष प्रशिक्षण शिबिरात तो सहभागी झालेला होता. त्याला एका खास गटाबरोबर संघटनेच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेण्याची संधी देण्यात आलेली होती. 
गेल्या वर्षीच्या शिबिराच्या काळात आपली ड्युटी पोळ्या विभागात असताना सर्वोच्च साहेब शिबिराची धावती पाहणी करीत तिकडून गेलेले होते. 
आपण किती किरकोळ व्यक्ती. पण साहेबांची किती अफाट स्मरणशक्ती. एक यत्कश्चित पोरगापण त्यांच्या वर्षभर लक्षात होता. 
वा, क्या बात है! धन्य धन्य ते सर्वोच्च साहेब नी कृत कृत्य आपण!
त्या गटात असलेल्या दहाच्या दहा जणांना सर्वोच्च साहेब नावानिशी ओळखत होते. आपण पाहणी केली त्यावेळी मागच्या वर्षी ते कोणत्या विभागात कार्यरत होते त्याची अचुक माहिती सर्वोच्च साहेब सांगत होते. प्रचंड कार्यमग्न असतानाही त्यांनी या दहाजणांच्या भेटीसाठी दहा मिनिटे काढली होते. त्यातही वेळ वाचवण्यासाठी समोरच्या फायली बघत त्यावर सह्या करीत ते बोलत होते.
ते दहाही जण नंतरचे आख्खे वर्ष हवेत होते.
ही नक्कीच दैवी देणगी असणार. सर्वांची अचुक माहिती सर्वोच्च साहेबांना असावी हा साक्षात चमत्कारच होय. गेल्या वर्षी कोण कुठे होता याचा बिनचुक तपशील. साक्षात ईश्वरी अवतार असणार!
तिसर्‍या वर्षी नारायणकडे साहेबांना भेटणार्‍या दहा जणांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.
प्रत्येकाचे नाव,गाव, शिक्षण, गेल्या वर्षी सर्वोच्च साहेब फेरी मारताना तो कोणत्या विभागात कार्यरत होता याची बिनचुक माहिती असलेल्या दहा फायली तयार करायच्या होत्या.
त्या फाईलींना 1 ते 10 क्रमांक द्यायचे होते.
भेटीसाठी निवडण्यात आलेल्या त्या दहा जणांनाही 1 ते 10 क्रमांक देण्यात आलेले होते.
कडक शिस्तीचा भाग म्हणून त्यांनी त्यांना देण्यात आलेल्या त्या क्रमांकाच्या खुर्चीवरच बसायचे होते.यात अजिबात हयगय होता कामा नये असे त्यांना बजावण्यात आलेले होते.
ते नवे दहाजण ठरल्याप्रमाणे स्थानापन्न झाले.
सर्वोच्च साहेब आले, त्यांनी समोर ठेवलेल्या फायली वाचत वाचत पहिल्याला प्रश्न केला,
" अरे तू देवधरांचा वसंत ना? गेल्या वर्षी मी राऊंड घेत होतो तेव्हा तुला मी पाणी भरताना बघितले होते. छानय. कसं वाटलं तुला संघटनेचं शिबिर?"
दरम्यान देवधरांचा वसंत एव्हाना पार हवेत गेलेला होता.
सर्वोच्च साहेबांनी पहिल्या फाईलवर सही केली नी ते दुसर्‍या फाईलकडे वळले.
एव्हाना नारायणला सर्वोच्च साहेबांच्या अफाट, दैवी अशा स्मरणशक्तीचे रहस्य कळून चुकले होते.
[आगामी पुस्तकातून---]
-प्रा.हरी नरके
.................................


Tuesday, March 13, 2018

हिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती -डॉ.बाबासाहेब आंबेडकर


हिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती -डॉ.बाबासाहेब आंबेडकर

त्रिपुरा काय जिंकला जणू सारे जगच जिंकले असे ढोल वाजवणार्‍या सुनील देवध्ररांनी आणि त्यांच्या मित्र/भक्त/अनुयायी/समर्थकांनी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कम्युनिझमबद्दलची भाषणे उद्धृत करायचा सपाटा लावलेला आहे.

कम्युनिझमबद्दल तुमची काय मते असतील ती मांडा. उगाच बाबासाहेंबांच्या आड दडून जणुकाही बाबासाहेब हिंदुत्वाचे समर्थक होते असा भ्रम पसरवू नका.
त्याच बाबासाहेबांनी तुम्हा हिंदुत्ववाद्यांबद्दल काय लिहिलेले आहे तेही एकदा नजरेखालून घालावे म्हणून त्यांच्या खास माहितीसाठी--

"हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल.
समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे.
हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे.
म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये."

[ पाहा- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, 1946 ]

- प्रा.हरी नरके


Sunday, March 11, 2018

कुमार केतकर- हाडाचे पत्रकार


कुमार केतकर- हाडाचे  पत्रकार, आक्रमक पण व्यासंगी संपादक व मैदानी वक्ता-

35 वर्षांपुर्वीची गोष्ट. रूईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नियोजित वक्तृत्व आणि उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत कुमार केतकरांची प्रथम भेट झाली. ते स्पर्धेचे परीक्षक होते नी मी स्पर्धक.
मला प्रथम क्रमांकाचा करंडक मिळाला होता.

पुरस्कार वितरण समारंभानंतर दादर रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही दोघेही पायी चालत बोलत, गप्पा मारत गेलो होतो. त्यावेळचा त्यांचा आपुलकीचा, सहजपणाचा आत्मिय स्वर आज 35 वर्षांनी सुद्धा तसाच ओला आणि आत्मिय आहे.

त्यांना म.टा., लोकसत्ता अशा अनेक मोठ्या वर्तमानपत्रांच्या संपादकाच्या खुर्चीत बसलेले असतानाही अतिशय साधेपणानं वागताना बघितलंय.
झरा आहे मुळचाच खरा.

अफाट व्यासंग, आक्रमक वक्तृत्व, व्यापक आणि विशाल सहिष्णु वृत्ती, सर्वांशीच वागताना असलेला ओलावा हे त्यांचे दुर्मिळ गुण. पक्की वैचारिक निष्ठा असलेला आणि भुमिका घेणारा विचारवंत.
आपल्या मतांशी मात्र कायम ठाम. वैचारिक आवडी-निवडी टोकदार.

एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत होतो. वादाचा मुद्दा निघाला नी आमचे दोघांचे आवाज तापले. आणिबाणी, मंडल आयोग, ओबीसी राजकारण हे आमच्यातले मतभेदाचे मुद्दे.  एकमताच्या, सहमतीच्या जागा मात्र शेकडो. दोघांचाही चढा सूर लागला. दोघेही अतिशय तावातावने बोलत होतो. आपापले मुद्दे घट्ट धरून होतो.
मॅनेजरला वाटले आमचे कडाक्याचे भांडण चाललेय. तो आम्हाला समजवायला लागला. जाऊ द्या सर. भांडण नका करू.

आम्ही दोघेही हसू लागलो. नी एकाच आवाजात म्हणालो, तुम्ही चिंता करू नका. आम्ही एकत्र जेवन करून मग एकत्रच बाहेर जाणार आहोत.
त्याला समजेनाच की आमचे काय चाललेय ते. आम्ही आपापल्या मुद्द्यांवर ठाम होतो पण आमच्यातली दोस्ती पण घट्ट होती.

नागपूरला एका शिबिरात मी त्यांच्यावर कडक टिका केली. तर संयोजकांनी मला चिठ्ठी दिली, ते आपले पाहुणे आहेत, जास्त टिका करू नका. मी ती चिठ्ठी जाहीरपणे वाचून दाखवली तर केतकर उभे राहिले नी म्हणाले, आयोजकांनी काळजी करू नये, त्यांना खर्पूस टिका करू द्या, मी त्यांना तेव्हढेच तिखट उत्तर देईन. तुम्ही आमच्यात पडू नका. आम्ही जिवलग मित्र आहोत. पण भरपूर भांडत असतो. असे शेकडो अनुभव.

प्रमिती "तू माझा सांगाती" मध्ये काम करीत होती तेव्हा ते आवर्जून आणि नियमितपणे ती मालिका बघायचे आणि तिचे काम का आवडते यावर तिला सविस्तर सांगायचे.

देश वैचारिक असहिष्णुतेच्या अंधारातून जात असताना  संसदेच्या वरिष्ठ सभागृहात केतकर नक्कीच त्याविरुद्ध जोरदार आवाज उठवतील. हा बुलंद आणि समाजशील आवाज संसदेत घुमेल याचा मनस्वी आनंद वाटतो.

-प्रा.हरी नरके

Friday, March 9, 2018

पतंगराव कदम


पतंगराव कदम राज्यमंत्री असताना फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समित्यांचे उपाध्यक्ष होते. मी सदस्य सचिव असल्यानं नियमित भेटीगाठी व्हायच्या.
ते बोलायचे अगदी मोकळं ढाकळं. राजशिष्टाचाराचं कोणतंही ओझं न बाळगता अगदी हसतहसत सांगलीकडच्या लहेजात अधिकार्‍यांशीही ते बोलत असत. थेट मुद्द्यावर य्रेत.
एकदा माझं भाषण त्यांना आवडलं तर म्हणले, " आ लगा लईच जंक्शान बोल्लासकी मर्दा."
आमच्या एक प्रधान सचिव फारच तुसड्या होत्या. एका बैठकीत पतंगराव त्यांना म्हणाले, "तुमचं बिट्या कायमच तिरकं चालणार्‍या औताच्या बैलासारखं असतंया. वाईच सरळ बी चालावं माण्सानं."
एका फाईलवर त्या सही करीत नव्हत्या. पतंगराव त्यांना म्हणाले," अवो मॅडम, वाईच इचार करा जावा. सावित्राबाईच्या कामाला नायी म्हणतासा, ती माय जाली नस्ती तर तुम्ही आज मंत्रालयाऎवजी ढोरामागं फिरत बसला असता. करा जावा सई."

ते पहिल्यांदा राज्य मंत्री झाले तेव्हा सर्वप्रथम एका नेत्याला भेटायला गेले.
पाच किलो पेढे, एक हजार रूपयांचा भलामोठा पुष्पगुच्छ आणि काश्मीरी शाल घेऊन.
नमस्कार झाला. हारतुरे झाले.
पतंगराव चुळबूळ करायला लागले, त्यांना एका कार्यक्रमाला जायची घाई होती.
शेवटी न राहवून ते म्हणाले, "सायेब, इथलं झालं असलं तर आम्ही निघावं का म्हणतो मी?"
साहेब म्हणाले, "मग निघा की, का थांबला आहात? तुमचं काम तर दहा मिनिटांपुर्वीच झालेले आहे. तरीही तुम्ही का थांबला आहात मला माहित नाही."
पतंगरावांचा हिरमोड झाला. त्यांना वाटलं होतं, साहेब निदान सरकारी खर्चाचा चहा तरी देतील.
पण साहेब होते, विधान परिषदेचे सभापती, अगदी अस्सल पुणेरी!
............प्रा.हरी नरके

मेरा पांडुरंग नही दुंगी-

मेरा पांडुरंग नही दुंगी- प्रा.हरी नरके
10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या.
पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या.

ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तार करून पुण्याला बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, "आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवूया."

त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं.

अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रॅंडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती.
सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या.

इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला.
पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या.

पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते.

सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले.

मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते.
सावित्रीबाई तिथं धावून गेल्या.

पांडुरंग गायकवाड 11 वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला.
एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं.

सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. 7 वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते.
मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता.

67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते.
त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो.

सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, "मेरा पांडुरंग नही दुंगी."
मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला.

पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला.
पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण.

सलग 50 वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता देह थकला होता.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रूग्णसेवेचं काम करता करता गेल्या.

राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले.
या सामाजिक शहीदांसाठीही आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा.
-प्रा. हरी नरके

रंग माणसांचे

एका कार्यक्रमानंतर एक चाहते भेटले.
म्हणाले, "सर, ओळखलत का? मी अमुकतमूक. माझं अमुकतमूक पुस्तक वाचलंत का? कसं वाटलं?"
"चांगलं लिहिलंय तुम्ही. हात लिहिता ठेवा. भरपूर वाचा. खुप पुढे जाल. माझ्या शुभेच्छायत."
तो त्याच्यासोबतच्या मित्रांना म्हणाला, "सरांची शाबासकी म्हणजे काय साधी गोष्ट नाय. सर म्हणजे साहित्यातली अथॉरिटीय."
..............
स्थळ तेच.
दहापंधरा मिनिटांनी दुसरे एक सज्जन भेटले. त्यांचाही तोच प्रश्न. " सर, माझा कवितासंग्रह कसा वाटला?"
"अहो, तुमच्या कविता तशा बर्‍यायत. पण तुम्ही पुस्तक प्रकाशनाची थोडी घाई केली असं वाटतं.
थोडं थांबायला हवं होतं. चांगल्या कविता वाचा. भरपूर अनुभव घ्या. एक दिवस नक्कीच चांगली कविता लिहाल तुम्ही."
त्याचा चेहरा पडला.
तो थोडं पुढं जाऊन मला ऎकू येईल अशा आवाजात सोबतच्या मित्रांना म्हणाला," अरे याला कवितेतलं काय घंटा कळतंय? माझ्या कविता अशा ऎर्‍यागैर्‍या नथ्थू खैर्‍याला थोड्याच कळणारेत? त्यासाठी कवितेतलं समजण्याची प्रतिभा हवी. जान हवी.
आणि दुसरं असं की मुदलात हा काय समीक्षक हाय का? मी काय म्हणतो, ह्याची लायकीच नाय माझ्या कवितांवर बोलण्याची!"
.............

कौतुक केलं की तुम्ही कोण, तुमची लायकी काय हे कोणीच विचारत नाहीत. तुम्ही मोठे. थोर्थोर.
मात्र उणीवा सांगितल्या, सौम्य टिका केली तर लगेच फणा काढून सारेच विचारतात, तुमची लायकी काय? तुम्हाला साहित्यातलं काय घंटा कळतं?
रंग माणसांचे!
- प्रा.हरी नरके

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार?
खा. गोपाळ शेट्टींचं मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहावर प्रश्नचिन्ह--

सत्ताधारी पक्षाच्या मुंबईच्या एका खासदारांनी आंतरजातीय विवाहाला विरोध करणारं खाजगी विधेयक लोकसभेत मांडलंय.  त्यांनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुलींनी आईवडीलांच्या पसंतीनुसारच विवाह केला पाहिजे. ते ठरवतील त्याच्याशी लग्न करायचं तर मुलीचं वय18 चालेल.मात्र जर मुलींना स्वतंत्रपणे, आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं असलं, आपल्या आवडीनिवडीनुसार लग्न करायचं असलं तर मात्र लग्नाचं कायदेशीर वय वाढवून 21 वर्षे करावं.

प्रेमविवाहांबद्दल ते किती तुच्छतेनं बोलत होते.

मुलं - मुली 18 वय पुर्ण करताच मतदार होतात. राज्याचं नी देशाचं सरकार निवडतात.
पण लग्नासाठी मात्र मुलीचंही वय 21 हवं असं म्हणणार्‍या या खासदारांना निवडून देऊन चुक तर केली नाही ना?
त्यांच्या अकलेचं खोबरं झालंय का?

आता खाणं पिणं, लेणं नेसणं याबरोबरच आमचं लग्नाचंही स्वातंत्र्य यांना हिरावून घ्यायचंय.

काय चाललंय काय?
कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार  कोण ठरवणार?

युवकहो, तुम्हाला हे मान्य आहे?

-प्रा.हरी नरके

..........................

[संदर्भ- एबीपी माझा वाहिनीवरील बातमी व खासदार महोदयांचा बाईट]
http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-legal-consultant-rama-saroday-on-girls-age-issue-519599
नवी दिल्ली : पालकांच्या संमतीशिवाय मुलींच्या लग्नाचं वय 21 करा : भाजप खासदार गोपाळ शेट्टी
Updated 08 Mar 2018 08:48 PM
महिला दिनादिवशीच मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी मुलींच्या सज्ञानतेवर आणि आंतरजातीय विवाहांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.आई-वडिलांच्या समंतीशिवाय लग्न करायचं असल्यास मुलींसाठी ...]

Wednesday, March 7, 2018

पुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरकेपुणे हे पुतळ्यांचे शहर. जितके पुतळे या एका शहरात आहेत तेव्हढे जगातल्या कोणत्याही शहरात असणं शक्य नाही. या पुतळ्यांवर राम नगरकर एक कार्यक्रम करायचे.
पुण्याच्या मंडईला आचार्य अत्र्यांनी महात्मा फुल्यांचे नाव दिले. त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. धमाल म्हणजे या दोघांनीही 1880 च्या दशकात ही मंडई बांधायला कडाडून विरोध केलेला होता.
मंडईपेक्षा शाळा आणि दवाखाने जास्त गरजेचे आहेत असे फुले म्हणत होते तर सदाशिव- शनवार पेठांच्या जवळ मंडई नको, त्यामुळे शांतताभंग होईल, अस्वच्छता माजेल असे टिळक म्हणत होते.
इंग्रज सरकारने दोघांचेही ऎकले नाही. मंडई बांधली. एकदा आमची सहल या मंडईत गेली होती, तेव्हा आमचे शिक्षक सांगत होते, मुलांनो, ही आहे पुण्याची मंडई. ती जोतीराव फुल्यांनी नी बाळ गंगाधर टिळकांनी बांधली. म्हणून एकाचे नाव दिलेय नी दुसर्‍याचा पुतळा उभारलाय.

पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी 1925 साली पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला. रावबहादूर आपटे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी विरोध केला. सत्ताधारी पक्षाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे सदस्य गणपतराव नलावडे, बाबुराव फुले यांनी या ठरावाला विरोध केला. ठराव फेटाळला गेला. महात्मा फुल्यांची बदनामी करणारी 3 पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यावर लेखक म्हणून गणपतराव नलावड्यांचे नाव असले तरी त्याचे घोस्ट रायटर वेगळेच होते.
कोल्हापूरला फुले पुतळा उभारा असे हिनवले गेले.
महात्मा फुले पुतळ्याचा ठराव आणून पुणेकरांची बदनामी केली असा ठपका ठेऊन जेध्यांचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
हा संदर्भ लक्षात ठेऊन 1969 साली माळीनगर साखर कारखान्याने पुणे मनपा मुख्यालयातला पुतळा भेट दिला.
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात.
पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा बसवायला कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी विरोध केल्याने तयार असलेला पुतळा चार वर्षे मुर्तीकाराच्या स्टुडीओत पडून होता.

. अलका सिनेमागृहाच्या जवळच्या चौकात पुर्वी राधेचा पुतळा होता. ती खुप ऎटीत उभी असायची. तिच्या मागे सेनापती बापटांचा पुतळा उभा केला गेला. राधेची अशी जिरली की ती म्हणाली, मला इथून हलवा, म्हणून बहुधा तिचा पुतळा तिथून हलवला गेला.

. तिथून जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा अर्धपुतळा आहे. शास्त्रीबुवा पट्टीचे लेखक. किती दणकट अहंकार. निबंधमलेत त्यांनी भविष्य वर्तवले होते, मि. जोती फुले यांचा टिचभरसुद्धा पुतळा कोणी उभा करणार नाही. काळाचा महिमा बघा, महात्मा फुल्यांचा पुर्णाकृती पुतळा 31 मे 1969 ला पुणे मनपा मुख्यालयात उभारण्यात आला. नी खुद्द शास्त्रीबुवांचा मात्र टिचभर पुतळा त्यांनी स्थापन केलेल्या शाळेने उभारलेला आहे.
. सारसबागेच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. मूठ आवळलेल्या अवस्थेत. जणू तो सांगतोय, जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडा.

. शिवाजीनगर कोर्टाच्या शेजारी कपाळाला हात लावलेला कामगाराचा पुतळा आहे. जणू तो सांगतोय, वाडवडील म्हणायचे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यांचं ऎकलं नाही. आणि ही अवस्था आली.
. पुणे रेल्वे स्टेशनसमोर महात्मा गांधींचा पुतळा आहे. तो वेगाने चालताना, बहुधा पळताना दाखवलाय. जणु तो म्हणतोय, नेहमीप्रमाणे रेल्वे लेट आली. आता बस पकडायची तर पळतच जायला हवं.

. अभिनव महाविद्यालयाच्या चौकात वसंत दादांचा पुतळा आहे. हातात काठी आहे. जणू म्हणतोय, मी त्यांनाच पुढचा सीएम करणार होतो. पण पाठीत खंजीर खुपसला ना त्यांनी. आलोच जरा पाठीला बाम लावून.
. त्या मागच्या चौकात बाबुराव सणस उभे आहेत. जुन्या जवाहर हॉटेलकडे लक्ष ठेवून. जणू म्हणताहेत, बारीक लक्ष ठेवावं लागतं पोरांकडं. नेम नाही कायकाय उद्योग करतील.

. स्वारगेटच्या चौकात केशवराव जेधे आणि शनिवार वाड्यापुढे काकासाहेब गाडगीळ उभे आहेत. जणू म्हणताहेत, जेधे -गाडगीळ जोडी फुटली नी पुण्यातून काँग्रेस संपली.
. शनिवारवाड्यापुढे थोरले बाजीराव घोड्यावर उभे आहेत. आता या शनिवारवाड्यात काही दम राहिला नाही. माझ्या मस्तानीला यांनी पाबळला हाकललं. मीही निघालो तिकडे असे म्हणताहेत जणू.

[क्रमश:]
-प्रा.हरी नरके
.......................

च्या-प्रा.हरी नरके


सूर्य मावळत होता. रंगपंचमीमुळं बहुधा फारच लालजर्द होता. एस.टी.चा लालडबा चहा नास्त्यासाठी थांबला.
एक आजी हॉटेलच्या काऊंटरवर चहाची चौकशी करीत होत्या.
"अरे सायबा, च्या कितीला हाय?"
"वीस रूपये."
"अरं बापरं, माह्याकडं तर दहाच रूपयं हायती. जरा कटींग देतोस का साह्यबा? लई तल्लफ आलीया बघ."
"जमणार नाही. चल निघ पुढं. भिकारी साले."
"अरं ये साह्यबा नीट बोल, म्या भिकारी नाय. गरीब असलो तरी भिकारी नाय बग. म्या काय तुला फुकाट मागितल्याला नाय."
एक तरूणी शेजारी उभी होती. ती म्हणाली, "आजी माझ्याकडे आहेत पैसे. मी देते तुम्हाला चहा घेऊन."
"नको बाळा, असं फुकाटचं खाल्यापिल्यालं अंगाला लागत नस्तंय बघ. तुला वाटलं यातच समदं आलं बघ बाळा. माजे आशीरवाद हायती तुला. मी म्हातारीकोतारी असलो तरी माजं हातपाय धडधाकट हायती. अरे हॉटेलवाल्यासायबा, मी तुझी फरशी पुसून देतो नायतर भांडी घासून देतो पटाकक्यानं. त्याचं दहा रूपयं तरी देशील ना? मग इस रूपया व्हतात बग माज्याकडं."
" सांगितलं ना एकदा, जमत नस्तया. निघ म्हणलं ना."
" बरं असू दे बाबा. नाय तर नाय. कल्याण होवू दे तुझ्या लेकराबाळाचं."
"काय झालं बगा, की माह्याकडं 100 च रूपयं व्हतं.. एसटीवाला आजवर पन्नास घ्यायचा. आज त्यानं पाऊनशे घेतले. त्यो तरी काय करणार? म्हागाईला आग लागलीया. माजी लेक आजारी हाय पुण्याला. तिला भेटायला चाललो म्या. आता मोकळ्या हातांनी कसं जावावं? सोन्यासारकी 2 नातवंडं हायती. खायला घेतलं 15 रूपयाचं त्यांन्ला. उरलं दहाच."
"माझा पोरगा ढाण्या वाघ होता बगा. सैन्यात होता. लगीन जमल्यालं होतं. पाक तिकडं लई लांब होता बघा कामावर. उरीला. मागल्या वर्साला दुस्मानाची गोळी लागली नी गेला बघा.
मी त्याची आईय. फुकटाचं कसं खायचं?"
"एस.टी.वाले पण महाग ठिकाणीच का गाडी थांबवतात?"
"आजी, हायवेच्या पलिकडच्या हॉटेलमध्ये दहा रूपयाला मिळतो बघा चहा. मी आणून देऊ का तुमच्यासाठी?"
"पोरी, जपून जा बरं का. गाड्या लई जोरात येत्याती बग."
त्या मुलीनं रस्ता ओलांडून जाऊन आजीसाठी चहा आणून दिला....
आजी म्हणाली, "बाळा, तुझं लई कल्याण होईल बघ. तुला चांगली लेकरं व्हत्याल. मोटी माडी बांधशीला तू..."
मग मीही रस्ता ओलांडून गेलो. तिकडचा चहा घेतला. छानच होता.
पण त्यानं त्याचे 20 रूपये घेतले.
-प्रा.हरी नरके

Tuesday, March 6, 2018

वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके

https://unishivsandesh.blogspot.in/2018/03/blog-post_6.html प्रा. आलोक जत्राटकर
वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके
इतिहास अधिविभागात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. ३ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या समकालीनांसमवेत वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद कधीही बाळगले नाहीत, हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन (समानता आणि मतभिन्नता- एक अभ्यास)’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. इतिहास अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.
प्रा. नरके यांनी डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन असणारे समतुल्य नेते यांच्यातील सहसंबंधांचा अत्यंत व्यापक परिप्रेक्ष्यातून वेध घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महान नेते होते व आहेत. तथापि, अलीकडील काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर या इतिहासपुरूषांचे इतक्या मोठ्या प्रमाणात दैवतीकरण करण्यात येत आहे की त्यांची चिकित्सा करता येणेही मुश्कील होऊ लागले आहे. अनुल्लेख (Conspiracy of Silence) आणि अतिदैवतीकरण (Conspiracy of Glorification) या दोन्ही बाबी एखाद्या महान व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्वाविषयी झाकोळ निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरतात. त्यांचे अनुयायी आणि विरोधक या दोहोंकडून त्यांचा वेळोवेळी वापर करण्यात येत असतो. ऐतिहासिक संशोधनामध्ये पुरावे, दस्तावेजांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या कार्याची मोकळेपणी चिकित्सा करण्याची, तसेच त्याविषयी मोकळेपणाने, निर्भयपणाने मांडणी करण्याची आवश्यकता असते. मात्र, आज नेमक्या त्याच बाबी धोक्यात आल्या आहेत. स्वतः बाबासाहेबांनी आपले तरुण चरित्रकार धनंजय कीर यांना आपल्यासारख्या सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीचे चरित्र लिहीण्यासाठी परवानगी मागण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. चरित्र लिहील्यानंतर प्रसिद्ध होण्यापूर्वी वाचून दुरुस्ती करणे म्हणजे ती लादलेली सेन्सॉरशीप असेल, असे म्हणून त्यालाही नकार देऊन आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविणारे बाबासाहेब हे सच्चे संशोधक असल्याचे यातून स्पष्ट होते.
प्रा. नरके पुढे म्हणाले, बाबासाहेब आणि त्यांचे समकालीन असे म्हटले की, सर्वप्रथम त्यांचे आणि महात्मा गांधी यांच्या संबंधांचा विचार पुढे येतो. या दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी मोठ्या होत्या. त्या काळावर त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटविलेली आहेच. पण या दोघांच्याही मोठेपणात, दोघांच्याही विकासात त्यांचा परस्परांचा अत्यंत मोलाचा वाटा होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तीच बाब काँग्रेस अर्थात तत्कालीन काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि मौलाना आझाद यांच्या आंबेडकरांशी असलेल्या संबंधाच्या बाबतीतही होते. घटना समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यासाठी बॅ. जयकरांच्या रिक्त जागेवर त्यांना निवडून आणण्यास गांधींनी सांगितले आणि काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध निवडून दिले. तत्पूर्वी, १९४२मध्ये बाबासाहेबांनी ‘गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले?’ हा ग्रंथ लिहील्याने काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी नाराजी स्वाभाविक होती. तथापि, घटना समितीसमोर भाषण करताना बाबासाहेबांनी सर्व सदस्यांना असे आवाहन केले की, आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या गटाचे नेते आहोत, पण आता आपण आपले सारे गटतट विसरून, सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ या आणि येथून पुढे शतकानुशतके भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी घटना एकदिलाने निर्माण करू या. बाबासाहेबांच्या या आवाहनाने समस्त काँग्रेसजन चकित झाले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेचे स्वागत केले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे घटना समितीत काँग्रेसचे ८२ टक्क्यांहून अधिक बहुमत असूनही त्यात विरोधकांनाही स्थान देण्याचे औदार्य त्यांनी दाखविले. त्याचप्रमाणे हजरजबाबी युक्तीवाद करून आपल्या विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून देऊन मतपरिवर्तन घडवून आणण्याचे बाबासाहेबांचे कौशल्यही वादातीत होते, याची प्रचिती घटना समितीत वेळोवेळी आलेली आहे. त्यामुळेच भारताच्या बहुविधतेच्या संस्कारांचे जतन करण्याच्या भूमिकेतून परंपरा व परिवर्तन यांचा मेळ घालणारी राज्यघटना स्वतंत्र भारताला लाभली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
बाबासाहेबांच्या समकालीन संदर्भांचा अभ्यास करीत असताना स्त्री-पुरूष समता, सृजनशील ज्ञाननिर्मिती व कौशल्य विकास, कृतीशील जातिनिर्मूलन, चिकित्सा आणि लोकशाही मूल्यांची जोपासना या पंचसूत्रीचा आधार अभ्यासकांनी घेण्याची आवश्यकता प्रा. नरके यांनी प्रतिपादन केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या समकालीनांचा विचार करताना दलितमुक्ती चळवळीतील नेते-कार्यकर्ते, काँग्रेसमधील नेते, ‘हिंदुराज्या’ची मागणी करणारे समकालीन नेते, तत्कालीन स्त्रीवादी विचारवंत आणि बौद्ध धम्माच्या अनुषंगाने बाबासाहेबांशी विचारांचे आदानप्रदान करणारे विचारवंत अशा विविधांगांनी त्यांचा वेध घेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन परिस्थितीत चर्चेची, वादविवादांची जी पृष्ठभूमी होती, ती सद्यपरिस्थितीत किती स्थिर, किती अस्थिर झालेली आहे, या अनुषंगानेही चर्चा होणे आवश्यक आहे. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी परिचय करून दिला. सह-समन्वयक डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी अधिविभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. सुरेश शिपूरकर, प्रा. व्यंकाप्पा भोसले, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. कविता गगराणी यांच्यासह अनेक संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, 6 March 2018

Sunday, March 4, 2018

या मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय?


मराठी अभिजात नाही, तिच्या आधुनिकतेचा आदर करा या मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय?

असे लेख लिहिणारे हे तथाकथित भाषा वैज्ञानिक हे संस्कृतचे पीएच.डी. वाले आहेत. इंग्रजीची गुलामी करीत तिचे गोडवे गाणारे हे महाभाग मराठीच्या अभिजात दर्जाला विरोध करून मराठीच्या समृद्धीला, श्रीमंतीला हसत आहेत. यांचा खरा विरोध अभिजात दर्जाला नाही, मराठी भाषेलाच आहे. त्यांना मराठीचा द्वेष वाटतो. मराठीचं बरं झालंलं यांना कसं खपेल? ते मराठीला हलकी समजतात. मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर ती संस्कृतच्या पंक्तीला बसेल हे यांना नकोय. आम्ही संस्कृत भाषेचा आदर करतो, पण या कर्मठ, सनातनी आणि आकसपुर्ण वृत्तीची आम्हाला चीड आहे.

हे सध्या केरळमध्ये कासारगौड विद्यापीठात चाकरी करतात आणि विद्यापीठांनी भाषांचे भले होत नाही अशी अक्कल आपल्याला शिकवतात. मग द्याना विद्यापीठाचा राजीनामा.
हे मिठाला जागणारे लोक नाहीत. यांनी केरळच्या मल्याळम भाषेला मिळालेला अभिजात दर्जा चुकीचा आहे असे म्हटलेय. हे कृतघ्न लोक आहेत.

हे कसले डोंबलाचे आधुनिक नी भाषा वैज्ञानिक यांना उडीया भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची 4 वर्षे जुनी घटना माहितही नाही.
ह्यांना अक्षीचा मराठी देवनागरी शिलालेख श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे याची खबरही नाही.
ह्यांचा हा दांभिक युक्तीवाद कसाय माहितीय?

हे म्हणजे, इंग्रजांनी भारतीयांना म्हणायचे तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढू नका. तुमच्या गुलाम राहण्यानेच तुम्हाला आदर मिळेल.
हे म्हणजे, डॅाक्टरांनी पेशंटला म्हणायचे, तू बरे व्हायचा प्रयत्न करू नकोस, तू आजारी राहिलास तरच तुला आदर मिळेल.
हे म्हणजे, अंबानींनी तुम्हा आम्हाला सांगायचे पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नकोस, तू गरीब राहिलास तरच तुला आदर मिळेल.

हे म्हणजे स्वत: आय.आय.टी. मधून जनतेच्या पैशावर पीएच.डी. करायची नी निरक्षरांना सांगायचे शिकू नका, तुम्ही अडाणी राहिलात तरच तुम्हाला आदर मिळेल.
स्वत: बंगल्यात राहणारे हे विद्वान झोपडीवाल्याला सांगताहेत, चांगल्या घराचं स्वप्न बघू नकोस, तू कायम झोपडीत राहिलास तरच तुला आदर मिळेल,

हे म्हणजे, आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा नी मग इतरांना सांगायचे अभिजातने नुकसान होते, मग सोडा ना संस्कृतचा अभिजात दर्जा.
हे म्हणजे संत ज्ञानेश्वरांना, एकनाथांना नी तुकारामांना सांगणार मराठीत ग्रंथरचना करू नका तरच तुमची भाषा श्रेष्ठ होणार,

तुम्ही मराठीला ज्ञानभाषा बनवूच नका, मराठी माध्यमातून शिकू किंवा शिकवू नका, तुम्ही आमची कायम भाषिक गुलामी करा म्हणजे मग तुम्हाला आदर मिळेल.
शिक्षक विद्यार्थ्याला असे सांगतात काय? बाबा, अजिबात अभ्यास करू नकोस, तू नापास झालास तरच सन्माननीय ठरशील, पास झालास तर मात्र तुझा अनादर केला जाईल?

हे म्हणजे, ज्येष्ठांना आदर मिळत नसतो, फक्त लहानांनाच आदर मिळतो अशी फुसकी सोडण्यासारखे आहे. भारतीय संस्कृती वडीलधार्‍यांचा आदर करायला शिकवते की अपमान करायला शिकवते? बघा काय भाषिक कोलांटउड्या मारताहेत हे डोंबारी, भाषा वैज्ञानिकपणाचे कातडे पांघरूण.
यांना मुळातच मराठीबद्दल जन्मजात आकस आहे. हे वर्चस्ववादी लोक आहेत, मराठीने यांची कायम बटकी राहावे यासाठीच यांचे हे उद्योग चालूयत.

हे षडयंत्र वेळीच ओळखा. मराठीचा अभिजात दर्जा अंतिम टप्प्यात असताना एव्हढी वर्षे गप्प राहिलेले हे लोक हेच टायमिंग का निवडत आहेत? कारण मराठीला मिळणारा लक्षावधींचा पाठींबा बघून यांच्या पोटात दुखू लागलेय. मराठी माणसाचा बुद्धीभेद करणे, त्यांचे मनोबल खच्ची करणे यासाठीचे हे कटकारस्थान आहे. यांचा हेतू शुद्ध असता तर आजवर हे गप्प का होते? एव्हढ्या भाषांना अभिजात दर्जा मिळाला तेव्हा का विरोध केला नाहीत? मल्याळमला सुद्धा अभिजात दर्जा मिळाल्यावर हे विरोध करताहेत, तो मिळताना का गप्प होतात? मल्याळमला विरोध करणारा लेख तिथल्या वर्तमानपत्रात लिहा, नाही केरळमधून तुमची गठडी वळली तर बघा. दक्षिणी भाषांवाले असली थेरं खपवून घेत नाहीत. तुमचे हे लाड फक्त मराठीवालेच खपवून घेतात म्हणून मराठीचा अपमान करण्याची तुम्हाला हिम्मत होते.

नाहीतरी केरळात किंवा महाराष्ट्रात राहायचा यांना काय नैतिक अधिकार आहे असा प्रश्न सामान्य माणूस विचारतोय.

आहो,  तथाकथित भाषा वैज्ञानिकांनो, आम्हाला चांगले माहितीय, तुका म्हणे ऎशा नरा मोजूनी माराव्या पैजारा.......

- प्रा.हरी नरके

Saturday, March 3, 2018

मराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-

तमीळ, संस्कृत, तेलुगु,कन्नड या चार भाषांना अभिजात दर्जा मिळेपर्यंत भाषेच्या प्राचीनतेची अट 500 ते 1000 वर्षे होती.
पण आपल्याला दर्जा मिळाला, आता इतरांना तो मिळू नये यासाठी क्न्नडवाल्यांनी पुढाकार घेतला. या चौघांनी संगनमताने केंद्र सरकारवर दबाव आणून हा काळ वाढवून 1500 ते 2000 वर्षे करायला लावला.

मराठीच्या द्वेषातून केलेला हा बदल होता.

आधुनिकतेचा आदर करायला सांगणारे हे दांभिक कुर्‍हाडीचे दांडे तमीळ, संस्कृत, .....यांना अभिजात दर्जा मिळाल्यापासून त्यांचा अनादर करू लागले काय? अभिजात साहित्याचा लोक आदर करतात की अनादर? ज्येष्ठांना आपण मान देत नाही काय? शब्दच्छल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, लोकांचा बुद्धीभेद करणे हाच यांचा धंदा.

अभिजातने फायदा होतच नाही उलट नुकसानच होते अशी खोटी आवई उठवणार्‍यांना आमचा सवाल आहे की मग तमीळ, संस्कृत...चा अभिजात दर्जा काढून घ्या अशी मागणी गेल्या 15 वर्षांत तुम्ही का केली नाही? मराठीला दर्जा मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच बरी तुम्हाला तोट्याची, आदराची आठवण झाली?
यांनाच उद्देशून संत एकनाथांनी चपराक लगावली होती. "संस्कृतवाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली?"

अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीचे भले झालेले ज्यांना बघवत नाही अशा या मराठीद्रोहींचे, आप्पलपोट्यांचे हे कारस्थान हाणून पाडणे गरजेचे आहे.
-प्रा.हरी नरके

'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल'

https://www.bbc.com/marathi/india-43262034
'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल'

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, याबाबतचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषा अभिजात नाही, असं मत व्यक्त करणारा लेख आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर अनेक जाणकारांनी आणि वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनीही त्यांची अभ्यासपूर्ण मतं नोंदवली आहेत. पाहूयात काही निवडक प्रतिक्रिया:

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून इंटरनेटवर सक्रिय असलेले सुचिकांत वनारसे यांनी दिलेली प्रतिक्रिया :

'कुवलयमाला' या १२०० वर्षांपूर्वीच्या अभिजात ग्रंथात मराठी माणसे भांडकुदळ आहेत, असा उल्लेख आहे. बहुधा हा उल्लेख अभिजात दर्जासाठी भांडणाऱ्या आम्हा मराठीप्रेमींसाठीच असावा. चिन्मय धारूरकर यांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया -

भारत सरकारने आतापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामीळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हालचाली सुरू झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. तुम्ही म्हणाल, 'भारत सरकार कोण आपल्या मराठीला अभिजात दर्जा देणार? आपली मराठी आहेच अभिजात!' तर हा झाला पोकळ अभिनिवेश!

गेल्याच महिन्यात संस्कृती मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी अभिजात मराठीबाबतचा साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांचा शिफारस करणारा अहवाल आल्याचे लोकसभेत सांगितले. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी मराठी ही जगातील ६व्या क्रमांकाची समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे, असे परवाच 'बेळगाव तरुण भारत'मध्ये आवर्जून नमूद केलेले आहे. तिच्या प्राचिनत्वाचे पुरावे देणारे राजाराम शास्त्री भागवत, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, दुर्गा भागवत आदी सारेच लोक स्वार्थी, भाबडे, धोरणी, उत्सवी आणि खोटारडे लोक होते किंवा आहेत काय?

प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे. १९३२ साली प्रसिद्ध विद्वान श्री. पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील ३ नावे आहेत हे सिद्ध केलं आहे. त्यानुसार 'गाथासप्तशती' हा महाराष्ट्री प्राकृतातील अर्थात मराठीतीलच ग्रंथ आहे.

गाथासप्तशती तिसऱ्या शतकातील ग्रंथ आहे, त्यानंतर श्रवणबेळेगोळचा शिलालेख, नंतर संतसाहित्य असा मराठीचा प्रवास सर्वांना परिचित आहे; मग मधल्या सात-आठशे वर्षात कोणते ग्रंथ निर्माण झाले, असे ते विचारतात. हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरीभद्र, उद्योतन सुरी असे अनेक मराठी लेखक मधल्या काळात झालेले आहेत. अभिजात अहवालामध्ये या संदर्भग्रंथ, हस्तलिखितांची प्रमाणे दिलेली आहेत.

त्यांनी निधीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. लेखात ते निधी मिळत नाही, असाही दावा करतात आणि मिळाला तरी लोक पैसे खातात असे ठासून थेट विधान केलेले आहे. आपल्याकडे संशोधन करू शकतील असे मनुष्यबळ नाही, तज्ज्ञ नाहीत, तसे अभ्यासू विद्यार्थी नाहीत हे त्यांचे तर्कट तर 'आमच्या काळात अतिशय दर्जेदार शिक्षक असायचे' या पठडीतले आहे. म्हणजे मराठी लोक काहीच करू शकत नाहीत, ते जन्मजात नालायक आहेत असे म्हणायचे आहे का?

अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठीचे भले होईल का, असा धारूरकर यांना प्रश्न पडतो. हे म्हणजे पौष्टिक अन्न खाऊन, व्यायाम करून मला फायदा होईल का, मी आजारी तर पडणार नाही ना.. अशा धाटणीचा प्रश्न आहे. आणि तरीही आजारी पडलो तर उगाच पौष्टिक खाण्यासाठी पैसे खर्च केले, उगाच एवढा व्यायाम केला असे म्हणण्यासारखे आहे.
....................................
महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे (पठारे समितीचे) समन्वयक प्रा. हरी नरके लिहितात :

अभिजात मराठीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीमध्ये ख्यातनाम भाषा वैज्ञानिक प्रा.कल्याण काळे, प्रा.श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. आनंद उबाळे, प्रा.मधुकर वाकोडे, श्री. परशुराम पाटील असे तज्ज्ञ आहेत. आम्ही सुमारे दहा वर्षे भांडारकर संस्थेत आणि अन्यत्र चौफेर अभ्यास करून 436 पृष्ठांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. तो सरकारने छाननी व तपासणीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला. साहित्य अकादमीने नियुक्त केलेल्या जागतिक पातळीवरील सर्व भाषा वैज्ञानिकांनी हा अहवाल तपासला आणि त्याला लेखी मान्यताही दिली.

1932 साली ल.रा.पांगारकर यांनी लिहिलेल्या मराठी साहित्याचा इतिहास या ग्रंथात महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचंच आधीचं रूप आहे हे सप्रमाण मांडलेलं आहे. याशिवाय राजाराम शास्त्री भागवत यांच्या 1885 व 1887 च्या मर्‍हाठ्यासंबंधी चार उद्गार व मराठीची विचिकित्सा या दोन ग्रंथात तसेच प्राचीन महाराष्ट्र या डॉ. श्री.व्यं.केतकर यांच्या 1927 च्या ग्रंथात याचे विपुल संदर्भ आलेले आहेत. विदुषी दुर्गा भागवत यांनी असे म्हटले आहे की, प्राचीन महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा असल्याचे राजाराम शास्त्रींनी सिद्ध केलेले आहे.

अक्षीचा इ.स. 1012 चा देवनागरीतील मराठी शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे. नाणेघाटातील 2200 वर्षांपूर्वीचा ब्राह्मीतील शिलालेख हा आजपर्यंत सापडलेला सर्वांत प्राचीन मराठी (महाराष्ट्री) शिलालेख आहे.

ओडिया भाषेला हा दर्जा मिळून चार वर्षे झाली. त्याआधी पाच भाषांना हा दर्जा मिळाला होता. उडियाविरूद्ध मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती मा. न्यायालयाने गुणवत्तेवर फेटाळली. भाषातज्ज्ञांचा शब्द शेवटचा असेल, असे या निकालात न्यायालयाने नमूद केले. मराठीबाबत अहवाल साहित्य अकादमीच्या भाषा वैज्ञानिकांनी एकमताने मान्य केलेला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी.

मराठीचे भले व्हावे, गोमटे व्हावे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. आम्ही अहवालात राजारामशास्त्री भागवत, ज्ञानकोशकार डॉ. श्री.व्यं.केतकर, दुर्गा भागवत, के.एस.अर्जुनवाडकर, डॉ. ए.एम. घाटगे, डॉ. अशोक केळकर, ल.रा.पांगारकर अशा असंख्य मान्यवरांचे संदर्भ दिलेले आहेत.

या ऋषितुल्य मान्यवरांनी केलेल्या मराठीच्या सेवेची अवहेलना होता काम नये, त्यांची टर उडवली जाऊ नये याची दक्षता घ्यायला हवी.

अभिजात दर्जामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल. मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल. मराठी माध्यमाच्या शाळांची दर्जावाढ, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती, वाचन संस्कृतीचा विकास, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ, मराठीच्या 52 बोलींचे संशोधन, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किमतीत उपलब्ध करून देणे आणि यांसारखे इतर अनेक उपक्रम यांना अभिजातमुळे बळकटी येईल.

वैचारिक मतभेद असू शकतात. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण मतभेद संशोधनाची शिस्त आणि ज्ञानपरंपरा यांच्या चौकटीत मांडले जावेत. समितीने केलेल्या संशोधनावरच शंका घेणे आणि सदस्यांवर हेत्वारोप करणे हे टाळायला हवे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या लेखावर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. कुणाल जोशी लिहितात की कन्नड आणि तामिळ लोकांनी अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भाषेच्या विकासासाठी पैसा लागतो, असंही ते लिहितात.

तर राजेंद्र भोसले लिहितात की अभिजात की आधुनिक या वादात पडण्यापेक्षा मराठीचा दैनंदिन जीवनात वापर करणं जास्त आवश्यक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics
इतिहाससाहित्यभाषा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी

आंतर राष्ट्रीय महिला दिना निमित्त- पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके
सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते. संगिता ही त्या पिढीची प्रतिनिधी. या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-

--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्‍यामार्‍या करण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज आमच्या वाट्याला आलीच नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालंच नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ मी कळत्या वयात मनात बांधलेली.

वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा मी ठाम निश्चय केलेला होता. विद्यापीठ नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तेव्हा तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही संपुर्ण वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला चक्क नकार दिला.

पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र माझ्या मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.

लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे दोघात बलदंड प्रेम हवं. या प्रेमामुळंच शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण पुढं चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते.

उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं.
लग्नाआधीच हरीनं पिंपरीत छोटी सदनिका घेतली होती. माझ्या सासरी तेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच गॅस बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं.

त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं त्याला कष्टाची गोडी होती. मात्र भीक, लाचारी आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना अकाली गेले होते. त्यामुळे आणि प्रचंड गरिबीमुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या.

फक्त पुस्तकं विकत घेण्याचं व्यसन वगळता आम्हाला दुसरं कोणतंही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची छोटी सदनिका आणि पुढे कोथरूडला दोन बेडरूमचं घर असा प्रवास केला.
सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा, पुणे इथं काम करते.

प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं होतं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले.
अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरूही झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्यानं ते निवांत होते. आम्ही हादरलो. तिला मराठी शाळेत घालून आम्ही तिचं नुकसान करू नये असं अण्णांना मनापासून वाटत होतं. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.

हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनांच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्‍यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिनं पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असं मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला मात्र बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एन्जॉय केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले.

आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्यानं जायची. काही नाटकं तिनं अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन रंगमंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तिनं एकटीनं हिमाचल, पंजाबचा प्रवास केलेला होता.
चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात हजारो पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो."

राष्ट्र सेवा दलाची वार्षिक शिबिरं ती चुकवायची नाही. तिथं एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची "सत्यशोधक" या नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिनं तालमीही केल्या. मात्र पुढं ललित कलाच्या वर्गांमुळं तिला ते नाटक सोडणं भाग पडलं. सत्यशोधक खूप गाजलं. पर्ण पेठेनं तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळं तिही पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती.
हा प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचं नाव सुचविलं, तेव्हा या योगायोगाची मला गंमत वाटली.
दहावीनंतर पुढं काय करावं याबाबत प्रमितीचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनंच घ्यावा असं आम्ही तिला सांगितलं होतं. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व अफाट स्पर्धा बघता जोडीला आणखी एखादा आधार असावा असं तिलाही वाटत होतं. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकॉम यांचाही विचार करित होती. हरीनं भारतीय प्रशासन सेवेचं क्षेत्रही सुचवुन ठेवलं होतं. तिनं फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला.

दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी आमच्या मुलीनं मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश आलं नाही तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण ललितलाच जायचं यावर प्रमिती ठाम होती.

तिनं कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची ललितला निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्‍या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुपच फरक पडलाय. तिचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय.

तिला कष्टाचं महत्व कळावं, घामाचे पैसे मिळवताना काय वाटतं, हा अनुभव यावा यासाठी तिनं विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत तिनं स्वत:चं शिक्षण घेतलं.

मितुची पिढी अतिशय प्रॅक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे.
ती जिथं जाईल तिथं तिनं आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावं एव्हढीच आमची अपेक्षा आहे.

हरीला सामाजिक चळवळीत आणि लेखन-संशोधनात रस होता, आहे.
मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडं जावं असं मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवलं तेव्हा ते उखडले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीनं हे क्षेत्र निवडलं याचा मला आनंद आहे. तिचं आवडीचं क्षेत्र तिनंच निवडलं हे महत्वाचं आहे.

तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिनं स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावं. कितीही स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिनं जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही संकुचित विचार करून तिचं निवडीचं क्षेत्र छोटं करू नये असं आम्ही तिला सांगितलेलं आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल.
तिनं चांगला माणूस बनावं एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--

माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर मी घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं पहिलं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीनं, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्यानं वारंवार स्पर्धेत उतरतच होतेच.

या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, आपल्या समाजात तेव्हा असलेला गैरसमज.

त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळं अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी मी वाद घातल्याचं मला आठवतं. तेव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.

शाळा संपली. पण पुढं काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचंच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच.

बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईनं हुशारीनं एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकॉम. जेणेकरून "इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पत्रकारिता" म्हणून बाबाही खूश होणार होता आणि "अभिनयाच्या जवळपास जाणारंच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती.

त्यानुसार मी ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या क्राऊडशी मॅचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळं तिथंही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीनं अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं.

या सर्व घडामोडींची सर्वात जवळची साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.

निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्हती. लेखी परीक्षा आणि मग शॉर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफॉरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन कॅटेगरीतूनच प्रवेश मिळवायचा असं आपलं धोरण जाहीर केलं होतं. बरं त्यामागं भक्कम विचारसरणी असल्यानं मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत ओपनमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले.

ललितला आल्यानंतर अभिनयाकडं, नाटकाकडं बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल.

सतिश आळेकरसर, प्रविण भोळेसर, समर नखातेसर, राजीव नाईकसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचं मला जाणवतं.

शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथं आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले.

याकाळात मी माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या. फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही.

पण आता मात्र मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना जी नाटकाची भाषा दुर्बोध व त्यामुळं कंटाळवाणी वाटते ती मी अगदी सहज समजून घेऊ शकते. माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणं, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज मराठी माध्यमामुळं प्रगल्भ होत गेली.

अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मॅक्झीम गॉर्कीचं द लोअर डेप्थ, विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कॉकेशिअन चॉक सर्कल इ. नाटकांत कामं केली. दी कॉकेशिअन चॉक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदूमध्ये त्याची छान परिक्षणं आली. संदेश कुलकर्णीसर, अनिरूद्ध खुटवडसर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा सखोल अभ्यासही करता आला.

"संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमा अंतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मला मिळाली.

मीही चार संहिता लिहिल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून मला पुढच्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. शिदोरी भक्कम झाली.

आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर वैचारिक, कथा, कादंबर्‍या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते. ही रसद आयुष्यभर पुरेल.

आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन लवकरच बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचं आहे.
....................................
Sangita Hari Narke -March 1, 2014 ·
"माहेर," मार्च २०१४, पृ.५२ ते ५४