डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असेच संपुर्ण नाव लिहावे असा फतवा उप्र सरकारने काढला आहे.
कायदेशीर व नैतिकदृष्ट्या त्यात अयोग्य काहीच नसले तरी आत्ताच 2019 च्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांना हा साक्षात्कार का झालाय?
नाव भले रामजी असेल पण राम नाईकांमधला राम, तुलसी रामायणातला राम आणि भीमराव रामजींमधला राम हे एकच होते? आहेत?
एकच असतील तर मग या रामजीपुत्राला 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश का नाकारण्यात आला होता? त्यासाठी 5 वर्षे त्यांना संघर्ष-सत्याग्रह का करावे लागले होते?त्यांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाला सर्व धर्माचार्यांनी प्राणपणाने विरोध का केला होता?
त्यांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम अॅंड कृष्ण ला सनातन्यांचा विरोध नव्हता काय?
ते नेहमीच बी.आर. आंबेडकर अशी सही करीत असत.
त्यांनी इंग्रजीतल्या मूळ संविधानाच्या आठव्या भागावरही रोमन लिपीत बी.आर. आंबेडकर अशीच सही केलेली आहे.
सही बघूनच संपुर्ण नाव लावायचे असेल तर महात्मा फुले, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचे फक्त संपुर्ण नाव लिहायचे नी त्यांची उपाधी गाळायची हे योग्य होईल का? समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख यापुढे फक्त संपुर्ण नावाने करा असा कोणी फतवा काढला तर तो जसा चुकीचा ठरेल तसेच हे आहे.
संपुर्ण नावच हवे तर मग नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, राम नाईक, मोहन भागवत, रामनाथ कोविंद, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यातले कोण कोण पुर्ण नाव लावतात? लावायचे?
खुद्द उप्रचे मामु तरी त्यांचे संपुर्ण नाव लावतात काय?
देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाची एक ओळख आहे. ती का बदलायची?
एस.एम. जोशी, जी.ए.कुलकर्णी, पु.ल. देशपांडे ही नावं जर उद्या संपुर्ण लिहिली तर जनतेला पटकन ओळखू येतील?
नावात कशाला घुसायचं? नावात काय आहे? असंही म्हणायचं नी नावाचं राजकारण करायचं ही खोड चांगली नाही.
यावर वादंग व्हावे, हा इश्य़ु गाजावा अशीही त्यांची रणनिती असावी.
आपणही बजेटवर बोलत नाही, मुलभुत समस्यांवर बोलत नाही, फक्त अस्मितेच्या आणि नावांच्या मुद्द्यांवर शक्ती खर्च करतो. हे तरी कितपत योग्यय?
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment