Saturday, March 3, 2018

'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल'

https://www.bbc.com/marathi/india-43262034
'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल'

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, याबाबतचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषा अभिजात नाही, असं मत व्यक्त करणारा लेख आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर अनेक जाणकारांनी आणि वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनीही त्यांची अभ्यासपूर्ण मतं नोंदवली आहेत. पाहूयात काही निवडक प्रतिक्रिया:

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून इंटरनेटवर सक्रिय असलेले सुचिकांत वनारसे यांनी दिलेली प्रतिक्रिया :

'कुवलयमाला' या १२०० वर्षांपूर्वीच्या अभिजात ग्रंथात मराठी माणसे भांडकुदळ आहेत, असा उल्लेख आहे. बहुधा हा उल्लेख अभिजात दर्जासाठी भांडणाऱ्या आम्हा मराठीप्रेमींसाठीच असावा. चिन्मय धारूरकर यांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया -

भारत सरकारने आतापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामीळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हालचाली सुरू झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. तुम्ही म्हणाल, 'भारत सरकार कोण आपल्या मराठीला अभिजात दर्जा देणार? आपली मराठी आहेच अभिजात!' तर हा झाला पोकळ अभिनिवेश!

गेल्याच महिन्यात संस्कृती मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी अभिजात मराठीबाबतचा साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांचा शिफारस करणारा अहवाल आल्याचे लोकसभेत सांगितले. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी मराठी ही जगातील ६व्या क्रमांकाची समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे, असे परवाच 'बेळगाव तरुण भारत'मध्ये आवर्जून नमूद केलेले आहे. तिच्या प्राचिनत्वाचे पुरावे देणारे राजाराम शास्त्री भागवत, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, दुर्गा भागवत आदी सारेच लोक स्वार्थी, भाबडे, धोरणी, उत्सवी आणि खोटारडे लोक होते किंवा आहेत काय?

प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे. १९३२ साली प्रसिद्ध विद्वान श्री. पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील ३ नावे आहेत हे सिद्ध केलं आहे. त्यानुसार 'गाथासप्तशती' हा महाराष्ट्री प्राकृतातील अर्थात मराठीतीलच ग्रंथ आहे.

गाथासप्तशती तिसऱ्या शतकातील ग्रंथ आहे, त्यानंतर श्रवणबेळेगोळचा शिलालेख, नंतर संतसाहित्य असा मराठीचा प्रवास सर्वांना परिचित आहे; मग मधल्या सात-आठशे वर्षात कोणते ग्रंथ निर्माण झाले, असे ते विचारतात. हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरीभद्र, उद्योतन सुरी असे अनेक मराठी लेखक मधल्या काळात झालेले आहेत. अभिजात अहवालामध्ये या संदर्भग्रंथ, हस्तलिखितांची प्रमाणे दिलेली आहेत.

त्यांनी निधीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. लेखात ते निधी मिळत नाही, असाही दावा करतात आणि मिळाला तरी लोक पैसे खातात असे ठासून थेट विधान केलेले आहे. आपल्याकडे संशोधन करू शकतील असे मनुष्यबळ नाही, तज्ज्ञ नाहीत, तसे अभ्यासू विद्यार्थी नाहीत हे त्यांचे तर्कट तर 'आमच्या काळात अतिशय दर्जेदार शिक्षक असायचे' या पठडीतले आहे. म्हणजे मराठी लोक काहीच करू शकत नाहीत, ते जन्मजात नालायक आहेत असे म्हणायचे आहे का?

अभिजात दर्जा मिळाल्यावर मराठीचे भले होईल का, असा धारूरकर यांना प्रश्न पडतो. हे म्हणजे पौष्टिक अन्न खाऊन, व्यायाम करून मला फायदा होईल का, मी आजारी तर पडणार नाही ना.. अशा धाटणीचा प्रश्न आहे. आणि तरीही आजारी पडलो तर उगाच पौष्टिक खाण्यासाठी पैसे खर्च केले, उगाच एवढा व्यायाम केला असे म्हणण्यासारखे आहे.
....................................
महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे (पठारे समितीचे) समन्वयक प्रा. हरी नरके लिहितात :

अभिजात मराठीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीमध्ये ख्यातनाम भाषा वैज्ञानिक प्रा.कल्याण काळे, प्रा.श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. आनंद उबाळे, प्रा.मधुकर वाकोडे, श्री. परशुराम पाटील असे तज्ज्ञ आहेत. आम्ही सुमारे दहा वर्षे भांडारकर संस्थेत आणि अन्यत्र चौफेर अभ्यास करून 436 पृष्ठांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. तो सरकारने छाननी व तपासणीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला. साहित्य अकादमीने नियुक्त केलेल्या जागतिक पातळीवरील सर्व भाषा वैज्ञानिकांनी हा अहवाल तपासला आणि त्याला लेखी मान्यताही दिली.

1932 साली ल.रा.पांगारकर यांनी लिहिलेल्या मराठी साहित्याचा इतिहास या ग्रंथात महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचंच आधीचं रूप आहे हे सप्रमाण मांडलेलं आहे. याशिवाय राजाराम शास्त्री भागवत यांच्या 1885 व 1887 च्या मर्‍हाठ्यासंबंधी चार उद्गार व मराठीची विचिकित्सा या दोन ग्रंथात तसेच प्राचीन महाराष्ट्र या डॉ. श्री.व्यं.केतकर यांच्या 1927 च्या ग्रंथात याचे विपुल संदर्भ आलेले आहेत. विदुषी दुर्गा भागवत यांनी असे म्हटले आहे की, प्राचीन महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा असल्याचे राजाराम शास्त्रींनी सिद्ध केलेले आहे.

अक्षीचा इ.स. 1012 चा देवनागरीतील मराठी शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे. नाणेघाटातील 2200 वर्षांपूर्वीचा ब्राह्मीतील शिलालेख हा आजपर्यंत सापडलेला सर्वांत प्राचीन मराठी (महाराष्ट्री) शिलालेख आहे.

ओडिया भाषेला हा दर्जा मिळून चार वर्षे झाली. त्याआधी पाच भाषांना हा दर्जा मिळाला होता. उडियाविरूद्ध मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती मा. न्यायालयाने गुणवत्तेवर फेटाळली. भाषातज्ज्ञांचा शब्द शेवटचा असेल, असे या निकालात न्यायालयाने नमूद केले. मराठीबाबत अहवाल साहित्य अकादमीच्या भाषा वैज्ञानिकांनी एकमताने मान्य केलेला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी.

मराठीचे भले व्हावे, गोमटे व्हावे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. आम्ही अहवालात राजारामशास्त्री भागवत, ज्ञानकोशकार डॉ. श्री.व्यं.केतकर, दुर्गा भागवत, के.एस.अर्जुनवाडकर, डॉ. ए.एम. घाटगे, डॉ. अशोक केळकर, ल.रा.पांगारकर अशा असंख्य मान्यवरांचे संदर्भ दिलेले आहेत.

या ऋषितुल्य मान्यवरांनी केलेल्या मराठीच्या सेवेची अवहेलना होता काम नये, त्यांची टर उडवली जाऊ नये याची दक्षता घ्यायला हवी.

अभिजात दर्जामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल. मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल. मराठी माध्यमाच्या शाळांची दर्जावाढ, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती, वाचन संस्कृतीचा विकास, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ, मराठीच्या 52 बोलींचे संशोधन, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किमतीत उपलब्ध करून देणे आणि यांसारखे इतर अनेक उपक्रम यांना अभिजातमुळे बळकटी येईल.

वैचारिक मतभेद असू शकतात. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण मतभेद संशोधनाची शिस्त आणि ज्ञानपरंपरा यांच्या चौकटीत मांडले जावेत. समितीने केलेल्या संशोधनावरच शंका घेणे आणि सदस्यांवर हेत्वारोप करणे हे टाळायला हवे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या लेखावर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. कुणाल जोशी लिहितात की कन्नड आणि तामिळ लोकांनी अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भाषेच्या विकासासाठी पैसा लागतो, असंही ते लिहितात.

तर राजेंद्र भोसले लिहितात की अभिजात की आधुनिक या वादात पडण्यापेक्षा मराठीचा दैनंदिन जीवनात वापर करणं जास्त आवश्यक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics
इतिहाससाहित्यभाषा

No comments:

Post a Comment