पतंगराव कदम राज्यमंत्री असताना फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समित्यांचे उपाध्यक्ष होते. मी सदस्य सचिव असल्यानं नियमित भेटीगाठी व्हायच्या.
ते बोलायचे अगदी मोकळं ढाकळं. राजशिष्टाचाराचं कोणतंही ओझं न बाळगता अगदी हसतहसत सांगलीकडच्या लहेजात अधिकार्यांशीही ते बोलत असत. थेट मुद्द्यावर य्रेत.
एकदा माझं भाषण त्यांना आवडलं तर म्हणले, " आ लगा लईच जंक्शान बोल्लासकी मर्दा."
आमच्या एक प्रधान सचिव फारच तुसड्या होत्या. एका बैठकीत पतंगराव त्यांना म्हणाले, "तुमचं बिट्या कायमच तिरकं चालणार्या औताच्या बैलासारखं असतंया. वाईच सरळ बी चालावं माण्सानं."
एका फाईलवर त्या सही करीत नव्हत्या. पतंगराव त्यांना म्हणाले," अवो मॅडम, वाईच इचार करा जावा. सावित्राबाईच्या कामाला नायी म्हणतासा, ती माय जाली नस्ती तर तुम्ही आज मंत्रालयाऎवजी ढोरामागं फिरत बसला असता. करा जावा सई."
ते पहिल्यांदा राज्य मंत्री झाले तेव्हा सर्वप्रथम एका नेत्याला भेटायला गेले.
पाच किलो पेढे, एक हजार रूपयांचा भलामोठा पुष्पगुच्छ आणि काश्मीरी शाल घेऊन.
नमस्कार झाला. हारतुरे झाले.
पतंगराव चुळबूळ करायला लागले, त्यांना एका कार्यक्रमाला जायची घाई होती.
शेवटी न राहवून ते म्हणाले, "सायेब, इथलं झालं असलं तर आम्ही निघावं का म्हणतो मी?"
साहेब म्हणाले, "मग निघा की, का थांबला आहात? तुमचं काम तर दहा मिनिटांपुर्वीच झालेले आहे. तरीही तुम्ही का थांबला आहात मला माहित नाही."
पतंगरावांचा हिरमोड झाला. त्यांना वाटलं होतं, साहेब निदान सरकारी खर्चाचा चहा तरी देतील.
पण साहेब होते, विधान परिषदेचे सभापती, अगदी अस्सल पुणेरी!
............प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment