Monday, April 20, 2015

रोश विरूद्ध स्टानले आडम्स - श्रेष्ठ दर्जाचा अनुवाद
        प्रिय डा. सदानंद बोरसे,                                     दि.२० एप्रिल, २०१५
आपण अनुवादीत केलेले "रोश विरूद्ध स्टानले आडम्स " हे पुस्तक नुक्तेच वाचले. मूळ पुस्तक अतिशय अस्वस्थ करणारे आहे. त्याचा तुम्ही केलेला मराठी अनुवाद इतका श्रेष्ठ दर्जाचा झालेला आहे की, हे पुस्तक अस्सल मराठी वाटावे, किंबहुना प्रत्यक्षाहूनही अनुवाद उत्कठ असे म्हणावे इतका तो सरस आहे. १४२ पृष्ठांच्या या पुस्तकात अनुवादात खटकावी अशी एकही खोड काळजीपुर्वक शोधूनही सापडू नये, काढता येऊ नये, हे तुमचे कौशल्य मन:पुर्वक दाद द्यावे असेच आहे. तुमचा अनुवाद साक्षेपी, अचूक आणि अर्थबहूल आहे. एका अधिकार्‍याने जागतिक पातळीवरील बलाढ्य औषध कंपनीविरूद्ध दिलेला हा एकाकी लढा मन सुन्न करून टाकणारा आहे. लेखक श्री स्टानले आडम्स यांनी दाखवलेल्या धाडसाचे, त्यांनी त्यासाठी परिणामांची क्षिती न बाळगता सोसलेल्या अपार यातनांचे अत्यंत संयमित भाषेतील हे चित्रण वाचून भलेपणावरचा विश्वास वाढला. तुमचा अनुवाद वाचकाला पकडून ठेवतो. पुस्तक एकदा हातात घेतले की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवताच येत नाही. शेवटचे पृष्ठ संपले तरी पुस्तक मात्र संपत नाही अशी या पुस्तकाची किमया आहे. कलाकृत्तीचा उत्तम अनुवाद हे अनुवादकाचे नवसर्जनच असते. मराठी व  इंग्रजी भाषेवरील तुमचे प्रभुत्व आणि विषयाचे सखोल ज्ञान नी मनीची अपार तळमळ यांच्या त्रिवेणी संगमातून हे अभिजात पुस्तक जन्माला आलेले आहे.


तुम्ही पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे "स्टानले आडम्स यांचे मूळ पुस्तक १९८० सालच्या आसपास  प्रसिद्ध झाले असले, तरी आज सुमारे तीन दशकानंतरही त्यातील संदर्भ तितकेच लागू ठरतात, किंबहुना अधिकच सार्थ ठरतात. आपल्यावर होणार्‍या अन्यायाची वा अत्याचाराची पुसटशी जाणीवही असू नये, अशा रितीने सामान्य माणसाला वेठीला धरणार्‍या या ’औषधसत्ते’ विरूद्धचा हा लढा सार्‍यांसाठीच जागल्याची भुमिका वठवणारा ठरावा." माणसाला जीवदान देणारी औषधे धंदेवाईक कंपन्या जेव्हा अव्वाच्या सव्वा किंमतीत विकून आजारी माणसाला हिंस्त्रपणे लुटू लागतात, तेव्हा त्या कंपनीत काम करणार्‍या एखाद्या उच्चपदस्थ स्टानलेने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिवाच्या आकांताने लढा द्यावा, त्यासाठी प्राणप्रिय पत्नी गमवावी, अमानुष तुरूंगवास भोगावा हे सारे अंगावर काटा आणणारे आहे. वाचताना आपल्याला एव्हढा त्रास होतो तर त्यातून जाताना या भल्या माणसाला किती वेदना झाल्या असतील. सध्याची औषध सत्ता रोग्यांवर इतकं योजनाबद्ध अमानुष जाळं टाकून त्याला लुटत असेल हे एरवी खरेही वाटले नसते. एव्हढे भोगूनही ह्या माणसाच्या मनात जगाबद्दल चीड नाही, उलट "आपल्यासाठी भांडणारे, आपली बाजू निर्धाराने लावून धरणारे खूप मित्र आजूबाजूला आहेत, हे पाहून मला खूप दिलासा मिळाला," असेच ते म्हणतात.[पृ.७२]  आजच्या जागतिकीकरणाच्या बाजारूवृत्तीच्या काळात सुरू असलेली अनेक क्षेत्रातील लूट पाहिली की खचून जायला होते. निराशेने मन विषन्न होते. अशावेळी अशी पुस्तके उभारी देतात. या अंधारभरल्या जगात मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी जगाच्या पाठीवर दूर कुठेतरी कुणीतरी जीवाची बाजी लाऊन लढत असते हे पाहिले की "ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रिती" याची प्रचिती येते. जगण्यावरची श्रद्धा वाढते. "तुम्ही अन्यायाशी टक्कर देता तेव्हा तुम्हाला जीवघेणे वार सोसावेच लागतात, याचा अर्थ तुम्ही गप्प राहून सगळं मुकाट पाहात राहावं, असा बिल्कूल नाही. उलट तुम्ही अधिक जागरूकतेनं हा लढा द्यायला हवा" हे अल युरोपिओचे संपादक जिआनलुइजी मेलेगा यांचे उद्गार खूप मनोबल वाढवणारे आहेत.[पृ.६६] त्यांनी स्टानलेची मुलाखत आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित केली म्हणुन त्यांना आपले संपादकाचे पद गमवावे लागले होते.
पस्तीस वर्षांपुर्वीच्या या पुस्तकाची प्रस्तुतता आजही कायम आहे, नव्हे दिवसेंदिवस ती वाढते आहे. माझ्या मते ह्या पुस्तकातला काही भाग पाठ्यपुस्तकात यायला हवा. हे खरे संस्कार करणारे साहित्य आहे. अवघ्या १९ प्रकरणांच्या या गोळीबंद लेखनात आत्मगौरव टाळून लेखकाने ज्या तटस्थपणे लेखन केले आहे ते थक्क करणारे आहे. या ग्रंथाचा जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांपर्यंत जावे यासाठी मराठी अनुवादाचे कोणत्याही प्रकारचे स्वामित्वमूल्य न घेण्याचा स्टानले यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. "आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या प्रकाशात आयुष्याची वाटचाल करा" या वचनाने सुरू होणारे हे पुस्तक संपले तरी मनावर हीच मोहर उमटवून जाते. "गुडघे टेकणार्‍या लाचार जिण्यापेक्षा मान ताठ ठेवणारा मृत्यू लाख पटींनी चांगला" हा विचार प्रकाशाची पेरणी करणारा आहे. हे पुस्तक वाचकाची झोप उडवतं. त्याला आरपार हादरा देतं.


तुमच्या अप्रतिम अनुवादातून व्यक्त होणारी विषयाबाबतची तळमळ हलवून सोडणारी आहे. तुमची ही मिशनरी वृत्ती वाचकाला औषध सत्तेविरूद्ध जागृत करते. स्टानले, तुम्ही आणि राजहंस च्या या जागल्याच्या भुमिकेबद्दल तुम्हा सार्‍यांना मन:पुर्वक धन्यवाद.

दोन बारिकसे मुद्रणदोष , पृ.२४ वर, "सापडडलेले" आणि पृ.२६ वरील वरून तिसर्‍या ओळीत, "हिशेब अत्यंत तिकडे असून" असे झालेय त्याऎवजी "तोकडे" हवे, हे पुढील आवृत्तीत दुरूस्त करावेत ही विनंती.
अस्वस्थ करते, अनेक दिवस मनात रूंजी घालते ते चांगले पुस्तक, असे मी मानतो. तुमच्या या पुस्तकात ती उर्जा आहे. या महत्वाच्या दस्तावेजाचा मराठीत अनुवाद करून मराठीची अभिजातता तुम्ही आणखी समृद्ध केल्याबद्दल तुम्हाला खूपखूप धन्यवाद.

आपला स्नेहांकित,
प्रा.हरी नरके