Wednesday, April 14, 2021

भारतभाग्यविधाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रा. हरी नरके

 

डॉ. बाबासाहेबांच्या राजकीय योगदानाची चर्चा करताना ती दोन पातळ्यांवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले राजकारण आणि दुसर्‍या पातळीवर सर्वच भारतीयांसाठी आणि अंतिमत: मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते. बाबासाहेबांचे महिला, इतर मागासवर्गिय, कामगार, शेतकरी आदींच्या मुक्तीचे राजकारण तुलनेने दुर्लक्षित राहते. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्पृश्यतेचा प्रश्न राजकीय पातळीवर नेला आणि त्यांच्यासाठी राजकीय हक्कांची मागणी केली. संविधानात ते मिळवूनही दिले. सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिक्षण, सरकारी नोकर्‍या आणि पंचायत राज्य ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे दलितांचे मुक्तीदाता हा त्यांचा पैलू अनेकदा प्रखरपणे मांडला जातो, ठळकपणे पुढे येतो. आंबेडकरवादी जनसमुह लक्षावधींच्या संख्येने त्यांच्या अभिवादनाला पुढे येतो, मात्र मध्यमवर्गीय, पांढरपेशे, बुद्धीजिवी आणि इतर मागास जातींचे लोक बाबासाहेबांना नाकं मुरडत दूर राहतात. 

डॉ. बाबासाहेबांना नियतीने त्यांच्यावर सोपविलेल्या व्यापक जबाबदारीची जाणीव होती. खोतीविरोधी शेतकरी परिषदेत ते म्हणाले होते, "माझा जन्म सर्व साधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मीदेखील मजूरवर्गापैकी एक असून इम्प्रूमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरांप्रमाणे मलादेखील बंगल्यात रहाता आले असते, पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधूंकरता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही."

त्यांनी आपला पहिला राजकिय पक्ष, " स्वतंत्र मजूर पक्ष" स्थापन केला तेव्हा तो सर्वांसाठी खुला होता. त्याला त्यांनी "दलित पक्ष" असे नाव दिले नाही. मूकनायक आणि बहिष्कृत भारतचा वाचकवर्ग मर्यादित असल्यामुळेच पुढे त्यांनी "जनता" हे नविन वर्तमानपत्र काढले. ते सर्वांसाठी असावे म्हणून संपादकपदी दलितेतराची नियुक्ती केली. आयुष्याच्या शेवटी त्यांना सगळ्यांसाठी असलेल्या  आर.पी.आय.ची स्थापना करायची होती. त्यांना त्यातून दलित, आदिवासी, ओबीसी, महिला यांच्या एकजुटीवर आधारलेले भारतीय राजकारण करायचे होते. ते म्हणतात, "मला जातीचे बहुमत नकोय, मला विचारांचे बहुमत हवेय."

 २७ जानेवारी १९१९ रोजी साऊथबरो आयोगासमोर आपली साक्ष नोंदवताना डॉ. बाबासाहेबांनी सर्वच भारतीयांसाठी प्रौढ मत अधिकाराची मागणी केली. सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी सर्वप्रथम करणारे बाबासाहेब होते हे लोकांना माहित नसते. सायमन आयोग आणि गोलमेज परिषदेत त्यांनी ही मागणी लावून धरली. भारतीय संविधानात मताधिकारासाठी शिक्षणाची अट घालावी असा काही सदस्यांचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेबांनी त्याला ठामपणे विरोध केला. शाळेच्या जगातील साक्षरता महत्वाची असली तरी जगाच्या शाळेतले सामान्य लोकांचे " सामुहिक शहाणपण" आणि भारतीय राजकीय साक्षरता लक्षात घेता सर्वांना मताधिकार दिला जाण्याची गरज त्यांनी लावून धरली. महत्वाचे म्हणजे महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार असावा याला त्यांचाही पाठींबा होता. ज्यांनी शुद्रांना शिक्षण नाही आणि गुणवत्ता नाही असे सांगून मताधिकार नाकारला होता, ज्यांनी मंडल आयोगाला कडाडून विरोध केला होता, त्याच सनातनी, जातीयवाद्यांच्या मागे ओबीसी आज उभे आहेत. 

अमेरिकेसारख्या देशातही महिलांना मताधिकारासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला होता. भारतीय महिलांना मताधिकार आणि समान कामाला समान दाम ही व्यवस्था बाबासाहेबांनी त्वरित केली पण म्हणून किती महिलांना याची जाणीव आहे? कितीजणी आठवणीने त्यांना अभिवादन करतात? बाबासाहेबांना विसरणं ही कृतघ्नता नाही का माताभगिनींनो?

डॉ. आंबेडकरांनी १५ आगष्ट १९३६ रोजी मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. अस्पृश्यता निवारणाचा लढा जरी अस्पृश्य श्रमजिवी जनतेला स्वतंत्रपणे लढावा लागणार असला तरी आर्थिक लढ्यात मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी - कामगार वर्गाचे हितसंबंध एकजीव असल्याची पक्षाची राजकीय भुमिका होती. हा लढा लढताना जात - पात - धर्म - प्रांत हे सारे भेद मनात न आणता " मजूर तेव्हढे एक ही वर्गभावना" मनात ठसवून आपला पक्ष काम करील असे  त्यांनी जनता पत्रातून स्पष्ट केले होते.

संतती नियमनाच्या लोक चळवळीचा रात्रंदिन ध्यास-

कुटुंबनियोजनाची सर्वांनाच सक्ती करायला हवी हा निवडणूक जाहीरनामा १९३७ साली फक्त या एकाच पक्षाचा होता. सत्तेवर येता आले नाही तरी बाबासाहेबांनी कुटूंब नियोजनासाठी अशासकीय विधेयक आणले. १० नोव्हेंबर १९३८ ला त्यावर विधीमंडळात चर्चा झाली. "जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा " असतो. लोकसंख्येचा वाढणारा भस्मासूर देशाला परवडणारा नसून भारतीय नागरिकांनी एक किंवा दोन अपत्यांवरच थांबले पाहिजे आणि मुलामुलींचे उत्तम पालनपोषण केले पाहिजे असे या विधेयकात बाबासाहेबांनी म्हटलेले होते. छोटे कुटुंब असणारांना पुरस्कार आणि सवलती दिल्या जाव्यात मात्र मुलामुलींचे लटांबर जन्माला घालणारांना तुरूंगवासाची कठोर शिक्षा करण्यात यावी असेही त्यांचे मत होते. देशात त्यावेळी दुसरा कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष या विषयावर बोलायला तयार नव्हता. त्यावेळचे राष्ट्रीय काँग्रेस, हिंदु महासभा, मुस्लीम लिगसह कम्युनिष्ट हे सर्वच बाबासाहेबांचा द्रष्टेपणा ओळखायला कमी पडल्याने व त्यांनी बिलाला विरोध केल्याने हे विधेयक फेटाळले गेले. १९५२ सालच्या निवडणूकीतही बाबासाहेबांनी हा विषय त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात मांडला होता. देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे असल्याने प्रत्येक पतीपत्नीने एकाच अपत्यावर थांबायला हवे असे डॉ. बाबासाहेबांनी १९३८ मध्येच सांगितले होते. आज भारताची लोकसंख्या सुमारे १३७ कोटी आहे. जगातली अवघी २ टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली १८ टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. १९३० च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले राजकीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी १० नोव्हेंबर १९३८ रोजी पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर केले. [ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, ४, भाग ३, पृ.४०२४ ते ३८ ] स्वतंत्र मजूर पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातले आमदार पी. जे. रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते. पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा, सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा, शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या, मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या, स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या, प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल. गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे. भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा "राष्ट्रीय गुन्हा " ठरवला पाहिजे, हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.

प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला यांची सरळ आकडेवारीच देतात. हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला. परिणामी ते फेटाळले गेले. ८३ वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते. समाजस्वास्थकार प्रा. र. धो. कर्वे आणि उद्योगपती जे. आर. डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर समाजजागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी लगेच १० डिसेंबरला [ १९३८ ] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला. 

डॉ. बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र-

१०३ वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर " स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया " हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.

शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.

बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात ८० टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले ६० टक्के लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.

शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.

शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.

शेतीला २४ तास आणि ३६५ दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.

शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.

असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी १०३ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब १०३ वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते. गेले पाच महिने देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन करीत आहेत पण त्यांच्याकडे बघायला केंद्रातील सरकार तयार नाही.

मुंबई प्रांताचे आमदार असताना ओ.बी.एच. स्टार्ट कमिटीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी १९३० साली सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गालाही कायदेशीर मान्यता व संरक्षण दिले जाण्याची शिफारस केली होती. अनु. जाती व जमाती यांच्यासोबतच ओबीसी हा अंगमेहनती कष्टकरी वर्ग असल्याने त्यालाही घटनात्मक सवलती द्यायला हव्यात असा त्यांनी आग्रह धरला. ओबीसींना जरी अस्पृश्य मानले गेले नसले तरी हजारो वर्षे शूद्र म्हणून अपमानित जीवन जगावे लागलेले आहे. शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता आणि मानवी अधिकार यापासून वंचित राहावे लागलेले होते. तेव्हा या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुल्यांनंतर झटणारे बाबासाहेबच होते. राज्यघटनेच्या ३४० व्या कलमाच्या निर्मितीद्वारेही त्यांनी ह्या घटकाला हक्क मिळवून दिले. मात्र ओबीसी समाज अज्ञानामुळे किंवा जातीय मानसिकतेमुळे असेल पण बाबासाहेबांपासून कायम फटकून राहिला. त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनाम दिला त्यामागे ५ कारणे होती. त्यातले एक कारण केंद्राने ओबीसी आयोग स्थापन केला नाही हे होते. 

स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार यांना आपला मुक्तीदाता आणि आपल्याला गुलाम करणारे यांच्यातला भेद उशीरा का होईना पण कळू लागला आहे.  ज्यादिवशी त्यांना भारत भाग्यविधाता बाबासाहेब हेच आपले खरे सोयरे होते हे समजेल तोच सुदिन असेल.

- प्रा. हरी नरके

Saturday, March 6, 2021

विदर्भातील पाच जिल्ह्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले-

 आरक्षणाची मर्यादा ५०% च्या वर गेल्याने विदर्भातील पाच जिल्ह्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले- प्रा. हरी नरके


विदर्भातील वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर व गोंदीया या पाच जिल्ह्यातील पंचायत राज्यातील आरक्शणाची मर्यादा १ ते ९ टक्क्यांनी ओलांडली गेल्याने ते ताबडतोब रद्द करून तेथे खुल्या जागांमधून निवडणुक घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने परवा दिले.

१. वाशिम,( ५ ते ६ टक्के ज्यादा,)  २. भंडारा (१ ते २ टक्के,)  ३. अकोला (८ ते ९ टक्के,)  ४.नागपूर व ५. गोंदीया  (६ ते ८ टक्के,)  

इतर मागास वर्गियांना पंचायत राज्यात १९९४ पासून घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आलेले २७ टक्के राजकीय आरक्षण आणि आधीपासूनचे अनु.जाती/जमातींचे आरक्षण हे मिळून जर ५० टक्यांच्या वर जात असेल तर ते ताबडतोब रद्द करण्यात आल्याचे हा निकाल सांगतो.

न्यायालय म्हणते आरक्षण देण्याची तरतुद घटनेत असली तरी तो मुलभूत हक्क नाही. सरकारला ते देता येते याचा अर्थ दिलेच पाहिजे असे बंधन नाही. तशी तरतूद आहे म्हणजे तो हक्क बनत नाही.

१९९४ पासून गेल्या २७ वर्षात पंचायत राज्यातील या आरक्षणाचे सुमारे ५ लाख ओबीसी लाभार्थी असले तरी ओबीसी आरक्षण जेव्हा धोक्यात येते तेव्हा यातला एकही जण लढायला पुढे येत नाही. अशा स्वार्थी आणि आप्पलपोट्या लोकांसाठी आपण का लढावे असा प्रश्न मला अनेकदा पडतो. जे मुर्दाडच आहेत ते जिवंत असले काय आणि नसले काय? काय फरक पडतो?


( विकास किसनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार व इतर रिट पिटीशन सिव्हील ९८०/२०१९ व इतर

निकाल दि. ४ मार्च, २०२१ बेंच- न्या. ए.एम.खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. अजय रस्तोगी ) 


-प्रा. हरी नरके,

०६/०३/२०२१


Saturday, February 27, 2021

मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं?

 मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं?

27 फेब्रुवारी : मराठी भाषा दिनानिमित्त...

साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.

मोदी सरकारच्या मराठीबद्दलच्या अनास्थेमुळे व उदासीनतेमुळे मराठीला मिळू शकणारा अभिजात दर्जा गेली सात वर्षे रखडला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली चौदा वर्षे आपण अहोरात्र झटतो आहोत. पठारे समितीने लिहिलेला मराठीचा अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला... त्यालाही सात वर्षे उलटून गेली. केंद्रातील नेत्यांच्या मराठीद्वेषामुळे ही घोषणा रखडलेली आहे. मनमोहन सिंह यांच्या काळात सहा भाषांना हा दर्जा दिला गेला. मोदी सरकार संस्कृतलॉबीच्या दबावाखाली काम करत असल्याने त्यांनी एकाही भारतीय भाषेला हा दर्जा दिलेला नाही. ही नीती लोकभाषाविरोधी आहे.

एक वेळ पैशांचे सोडा... पण मायमराठीचा होणारा सन्मान रोखला गेला याचा खेद प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवा. अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. ज्या भाषेतले साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असते तिला अभिजात दर्जा मिळतो. मराठी अमृतातेही पैजा जिंकणीरी असल्याची ग्वाही 700 वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर देऊन गेलेत. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे. स्वतःचे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्यभाषा आहे. मराठीतले कोशवाङ्‌मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोशवाङ्‌मय आहे.

कोणताही माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एक प्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते. शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगती यांसाठी त्यानं बहुभाषकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्याने इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही... परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणून त्याला तिची लाज वाटत असेल... तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्लीशमधून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मितीसाठी आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धिजीवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने मराठीचे बोट सोडले... त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.

साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.

17 वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीने एकमताने केलेली लेखी शिफारस मोदी सरकारने गेली सहा वर्षे दुर्लक्षित केली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय मागे गेले आहेत. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचे 25 वर्षांचे धोरण, मराठीसक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा यांबाबतीत तडजोड होता कामा नये. 
 
1907मध्ये ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्वेक्षण केले. तो म्हणतो की, जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते, नष्ट होते. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, साने गुरूजी, जी.ए. कुलकर्णी, उद्धव शेळके, बा.सी. मर्ढेकर, व्यंकटेश माडगूळकर, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे अशा अनेकांमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऐवज देऊन तिला खूप श्रीमंत केलेले आहे.

‘एक होता कावळा नि एक होती चिमणी...’ ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली 800 वर्षांपूर्वी. लीळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.

महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत (विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा) यांनी 1885मध्येच दाखवून दिले होते. ‘मराठ्यासंबंधी चार उद्गार’ हा त्यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा ‘मराठीची विचिकित्सा’ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. 

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे की, जुनी महाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे. 1927मध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडांत लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. 1932मध्ये पांगारकरांनी दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्री, महारठ्ठी, मर्‍हाठी, मराठी या वेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची प्राचीन, मध्यकालीन व अर्वाचीन रूपं आहेत.

गाथा सप्तशतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले;  हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावता महाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरकार ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडसे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, बेडेकर, दिलीप चित्रे यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे ‘जैविक नाते’ महत्त्वाचे आहे. 

मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, ‘गाहा सत्तसई’ (गाथा सप्तसती) गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या. सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे-जिथे राज्य होते तिथे-तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपूर्ण भारतावर तर राज्य होतेच... शिवाय पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.

मूल लहान असताना, रांगत असताना पीएच्‌.डी. करू शकेल का? नाही. मग कोणतीही भाषा बालवयातच ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि विवेकसिंधू  यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपूर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती... तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती. संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करत होते? संस्कृतलाच ना? ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती. गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची-समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारुडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की, मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे.

मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे... त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी पाचशे कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ; वाचन संस्कृती वाढणे; ग्रंथालये संवर्धित केली जाणे; मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे; मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे या सगळ्यामुळे मराठीचा दर्जा आणखी सुधारण्यास खूप मदत होईल. विशेषतः बृहन्‌महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनाला यातून अर्थबळ पुरवता येईल. मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल... त्यामुळे मराठीचा हा सन्मान महत्त्वाचा आहे.

- प्रा. हरी नरके
harinarke@gmail.com

(लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.)

Tags: भाषा हरी नरके अभिजात भाषा साहित्य Marathi  https://kartavyasadhana.in/view-article/prof-hari-narke-on-classical-language-status-to-marathi?fbclid=IwAR1k7g_BN8vzuEeMYJkVo0mDtc65HT3fMjlOvKm-tB6Vy_LHs9-1Y_-guxY

Thursday, January 28, 2021

महात्मा फुले समग्र वाड्मय हा ग्रंथ लवकरच उपलब्ध करून देणार- प्रा. हरी नरके
वाचकांकडून सर्वाधिक मागणी असलेली "महात्मा फुले समग्र वाड्मय, सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, युगपुरूष महात्मा फुले," आदी पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याला मी प्राधान्य देणार आहे. याशिवाय बरीच नविन पुस्तके प्रकाशित करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल. नुकतीच राज्य शासनाने महात्मा फुले ग्रंथ  समितीवर सचिव म्हणून माझी नियुक्ती केलेली असून मी नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी कामाला ताबडतोब सुरुवातही केलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात ही समिती संपुर्ण निष्क्रीय होती. त्यामुळे तो बॅकलॉगही भरून काढावा लागणार आहे. तशी आव्हाने तर बरीच आहेत. पण मला तक्रारींचा पाढा वाचत बसणे, रडगाणी गाणे यात बिल्कुल रस नाही. कितीही अडचणी असल्या तरी माझी बांधिलकी कामाशी आहे. आऊटपुट म्हणजेच रिजल्टशी आहे. सगळ्या सोयीसुविधांमध्ये तर कुणीही काम करील. जिथे कमी तिथे आम्ही. प्रतिकूलतेवर मात करून काम करण्यात तर खरी मजा आहे.

१. फुले-शाहू-आंबेडकर अशा शासनाच्या तीन स्वतंत्र ग्रंथ समित्या असून अद्याप उरलेल्या दोन समितीच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत. या तिन्ही समित्यांचे कार्यालय एकत्र असते. फोर्टमधील एका जुन्या इमारतीत सुमारे तीनेकशे चौ. फूट जागेत तिन्ही सचिव व समितीचे कर्मचारी आणि सगळे मौलिक दस्तऎवज यांची व्यवस्था असते. कार्यालयीन जागा तर अपुरी आहेच पण कर्मचार्‍यांच्या बहुतेक जागाही रिक्तच आहेत. मंजूर पदांमधील फक्त एक लिपिक व एक शिपाई एव्हढेच मनुष्यबळ तिन्ही समित्यांकडे उपलब्ध आहे. 

२. गेले अनेक महिने कार्यालयाचा इंटरनेट आणि फोन बंद आहे. 

३. लॉकडाऊनच्या काळात कार्यालय बंद होते तेव्हा वाळवीने अनेक नवीकोरी पुस्तके खाऊन टाकलीत.

४. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतात. मुबलक गैरसमजही असतात. त्यामुळे तक्रार म्हणून मी हे लिहित नाहीये तर कोणत्या अडचणीत काम करावे लागते ह्याची कल्पना तुम्हाला असावी म्हणूनच केवळ हे नमूद केलेले आहे. त्याच्याकडे अन्यथाबुद्धीने बघू नये.

५. काहीकाही मंडळींचा तर असा गैरसमज असतो की सचिवपदाला, लाल दिव्याची गाडी, बख्खळ मानधन, मुंबईत राहायला बंगला असे कायकाय असते. 

६. तर असले काहीही नसते. 

७. या पदाचे मानधन किती प्रचंड असते याची तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून सांगतो. तिन्ही सचिवांना मिळून दरमहा नेमके किती मानधन मिळते? सध्या सरकारी चतुर्थश्रेणीतील एका कर्मचार्‍याला (एका शिपायाला) जेव्हढा दरमहा पगार मिळतो त्यात या तिघां सचिवांचे महिन्याचे सगळे मानधन निघते. 

८. प्रवास आणि निवासाची व्यवस्था तुमची तुम्हीच करायची असते. शासन ती जबाबदारी घेत नाही.

९. समिती पुस्तके प्रकाशित करते.पण समितीकडे एकही संशोधन सहाय्यक, संपादन सहाय्यक, मुद्रीत शोधक नसल्याने सचिवालाच पुस्तकाचे सगळे काम करावे लागते.

१०. ह्या समित्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडे असल्या तरी पुस्तकांची छपाई व विक्री उद्योग विभागाकडे असते. त्यामुळे त्यावर सचिवाचे कोणतेही नियंत्रण नसते.

अर्थात हे सगळे असे असले तरी हे प्रश्न सुटोत वा ना सुटोत, तुम्हाला पुस्तकं लवकरात देण्याची हमी मात्र मी देतो.

आपल्या शुभेच्छा/ सदिच्छा मात्र सोबत असू द्याव्यात.

प्रा. हरी नरके, 

२८/१/२०२१


Friday, January 15, 2021

भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके

भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके

संजय सोनवणी हे चतुरस्त्र लेखक आहेत. ज्या ताकदीने ते वैचारिक ग्रंथ लिहितात त्याच ताकदीने ते कादंबर्‍याही लिहितात. काही लेखक ललित लेखन उत्तम करतात पण ते वैचारिक साहित्यापासून दूर असतात. तर काही याच्या उलटही असतात. या दोन्हींवर मांड असणं म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन दोन्ही हातांनी लढण्याएव्हढे अवघड काम आहे. त्यांची नवी ऎतिहासिक कादंबरी वाचली. 


ही कादंबरी पानिपताच्या लढाईत गायब झालेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर आहे. ती एकदा हातात घेतली की पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. गतिमान कथानक, अनेक पातळ्यांवरची गुंफन, कलात्मकता आणि इतिहासावरची पकड यांच्यामुळे ही कादंबरी गारूड करते. यातला काळ १७६१ चा आहे. लेखकाचा इतिहासाचा अभ्यास इतका मजबूत आहे की तो काळ, त्यावेळचे समाजजीवन, पेशवाईतली सत्तेची साठमारी, अनागोंदी, नाना फडणवीसची कुटील राजनिती, निष्ठुरता याचे लेखकाने घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.  


सोनवणी हे चित्रशैलीचे लेखक आहेत. जणू त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे  प्रत्ययकारी, कलात्मक आणि पकड घेणारे रहस्य  ते आपल्याला उलगडवून दाखवतात. पानिपतच्या लढाईत भाऊ मारले गेले असेच मानले जाते. तरिही भाऊसाहेबांचे अनेक तोतये नंतर उपटले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यात आली, हे आपल्याला माहित असते. इथे मात्र वेगळेच घडते. ते विस्मयकारी असूनही विश्वासार्ह आहे. रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकांना गुंतवून ठेवते. वाचनियता, कलात्मकता आणि ऎतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर ही कादंबरी फार उंचीवर जाते. 

कादंबरीत घडोघडी वाटा, वळणे आणि उड्या यांची मजा आहे. तरिही विेषयांतर नाही. अपघात आणि धक्के असले तरी त्यामुळे रसभंग न होता वाचक अधिकच गुंतत जातो.

एक अफलातून कादंबरी असेच " भाऊ परतौनी आला" चे वर्णन करावे लागेल. अवघ्या १२४ पृष्ठांमध्ये जी जादूभरली सफर सोनवणी वाचकांना घडवतात ती बहारदार आहे.

काही जात्यंधांनी कादंबरी न वाचताच सोनवणींना ट्रोलिंग केले होते. सोनवणींची दृष्टी नितळ, निरामय आणि निर्वैर आहे. त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे विकृतच असले पाहिजेत. सोनवणी माझे इयत्ता आठवीपासूनचे वर्गमित्र आहेत.  गेल्या वीसेक वर्षात मी त्यांची शंभरेक पुस्तकं वाचली. त्यांचे संशोधन, निर्भिडपणा, लढाऊबाणा, शोधाच्या स्वतंत्र वाटा आणि विषयांची विविधता केवळ स्तिमित करणारी आहे. त्यांचा अवाका आणि झपाटा बहुपेडी आहे. त्यांच्या "असूरवेद"  व  "आणि पानिपत" यासारख्या कादंबर्‍या तर मराठीच्या लेण्या आहेत. 

कादंबरीची गुणवत्ता, वाचकावर गारूड करण्याची ताकद, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदरभाऊ चांदगुडे यांची देखणी निर्मितीमुल्ये, संतोश धोंगडे यांचे कमाल मुखपृष्ठ आणि अवघी रुपये १६० इतकी रास्त किंमत यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांनी अवश्य संग्रही ठेवायला हवे. अवघ्या महिन्यापुर्वी ती प्रकाशित झालीय. सर्व पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

पुस्तकासाठी संपर्क- ९८९०९५६६९५, प्राजक्त प्रकाशन, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे, ४११ ००२,

-प्रा. हरी नरके,

१५/०१/२०२१

Tuesday, January 12, 2021

शहाजी राजे, राजवाडे, अभेद आणि अभ्यंकर- प्रा. हरी नरके

 
शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक होते अशी मांडणी इतिहासाचार्य राजवाड्यांनी १०० वर्षांपुर्वी केली. जयराम पिंडे या समकालीन कवीने शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिलेले होते. त्याला राजवाड्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहिली. राजवाड्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्या अभ्यासापुढे नतमस्तक व्हावे लागते. सारे आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात घालवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील किती लोक इतिहास संशोधनाला वाहून घेणार आहेत? जयरामच्या पुस्तकाचे नाव आहे, "राधामाधवविलासचंपू" पुस्तक अवघे ७६ पृष्ठांचे आहे. राजवाड्यांची मौलिक प्रस्तावना मात्र त्याच्या तिप्पट म्हणजे २०१ पृष्ठांची आहे. अफाट आणि दणकट काम. शहाजीराजांच्या पदरी असलेल्या ७० गुणी व प्रतिभावंत सल्लागारांची माहिती राजवाड्यांनी या प्रस्तावनेत दिलेली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे राजांना ही स्वराज्यसंकल्पना सुचली असावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. 


यातील २७ क्रमांकावर गंगाधर अभेद यांची माहिती देताना राजवाड्यांनी कमाल केलेली आहे. राजवाडे भाषाशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी दिलेली ही व्युत्पत्ती विनोदीच म्हटली पाहिजे.

राजवाडे लिहितात, "अभेद गंगाधर- एकोजीरजा संभाजी राजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर. अभ्यंकर हे आडनाव चित्पावन दिसते." (पृ.२२) अभेद आणि अभ्यंकर यांचा संबंध नाही हे राजवाड्यांना नक्कीच माहित होते. तरिही शहाजींच्या दरबारात चित्पावन सल्लागार होते हे दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास होता का? स्वराज्यसंकल्पनेच्या श्रेयात वाटेकरी कोणकोण होते हे दाखवण्यासाठी ही मोडतोड होती का? असा बादरायणी अभिनिवेश इतिहासलेखनात असावा काय?

राजवाड्यांची ही प्रस्तावना प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी.

- प्रा. हरी नरके, १२/०१/२०२१

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा

 
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा (प्रमिती नरके) खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; वाचा तिची जीवनकहाणी

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नरके आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

ही प्रमितीची पहीली मालिका नाही. या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती. त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवलीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवलीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली. तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात. त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘डोह ’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी नकारात्मक भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

BY PRAJAKTA PANDILWAD JANUARY 9, 2021 0 https://mulukhmaidan.com/pramiti-narke-marathi-actress-real-life-story/

https://mulukhmaidan.com/?s=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87