Wednesday, December 1, 2021

अ.भा. मराठी साहित्य संमेलन कायम वादग्रस्त का ठरते? - प्रा. हरी नरके


१९९६ साली आळंदीला भरलेल्या संमेलनाचा मी कार्याध्यक्ष होतो. विश्वनाथ कराड स्वागताध्यक्ष होते. शांताबाई अध्यक्ष तर लताबाई उदघाटक होत्या. मी तेव्हा मसापचा पदाधिकारी म्हणून महामंडळात काम करीत होतो. अशाप्रकारे मी महामंडळ नी आयोजक संस्था अशा दोन्ही ठिकाणी काम करीत असल्याने वाद न होता संमेलन पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही वाद झालेच. संमेलन मिळावे म्हणून अहमदनगरचे यशवंतराव गडाख नी मित्रवर्य अरुण शेवते प्रयत्नशील होते. मी मसापवर पुणे जिल्ह्यातून निवडून गेलेलो असल्याने मला आळंदीच्या बाजूने मत द्यावे लागले. त्यातनं नगरकर चिडले नी सलोख्याचे संबंध त्यांच्याबाजूने कटू झाले.

प्रकाशक म्हणून सुगावाच्या विलास वाघ यांचा सन्मान व्हावा यासाठी मी आग्रही होतो तर मसापचे जोगळेकर व्हीनस प्रकाशनाच्या पाध्येंसाठी अडून बसले होते. संमेलनात विलास वाघांचा सन्मान झाला.

दलित, आदिवासी, ग्रामीण अशा सगळ्या प्रवाहांना सामील करून घ्यावे यासाठी मी झगडत होतो, तर महामंडळाचे शंकराचार्य आपले सोवळे सोडायला तयार नव्हते. आजही त्यात बदल झालेला नाही. नेमाडे, पठारे अशा दिग्गजांना संमेलनाला बोलवावे यासाठी महामंडळ उदासीन होते. आजही असते. आपापल्या साहित्य संस्थेच्या मतदारांना संमेलनात स्टेजवर मिरवता यावे याचीच दक्षता घेण्यात सर्व गर्क असतात. बहुतेकांना उत्तम बडदास्त हवी असते, भरपूर मानधन हवे असते, गाड्याघोड्या, राहण्याची थ्रीस्टार व्यवस्था हवी असते. हा खर्च करायचा कोणी? त्यासाठी पकडा राजकारणी किंवा शिक्षण संस्था, त्याने सगळे खर्च नी साहित्यिकांची सरबराई करायची. हे लेखकराव मात्र परतफेड म्हणून राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नये असे बोलणार! हा खर्चिक मामला आटोक्यात येणे नाही. निवडणुका जशा खर्चिक झाल्या तशा भ्रष्ट झाल्या. साहित्य संमेलनाचे डोलारे मोठे झाले नी या भपक्यात साहित्यव्यवहार अंग चोरून बसू लागला.

त्यामुळे ४०० निमंत्रितांमध्ये अवघे ४ दर्जेदार नी उरलेली सुमारांची सद्दी म्हणून तेच ते वक्ते व कवी असे वर्षानुवर्षे चालुय. ज्यांना संधी मिळते ते आपल्या गुणवत्तेवर खूष असतात. ज्यांना मिळत नाही ते चडफडतात नी पुढच्या वर्षी तरी मला बोलवा म्हणून महामंडळाकडे वशीला लावतात. साहित्य आणि सांस्कृतिक व्यवस्था आहे तशीच राहते. ती बदलण्याची कुणालाच पडलेली नाही. आतातर ती उमेद कायमचीच हरवली गेलीय.

कोकण मराठी साहित्य परिषदेला मान्यता मिळावी म्हणून मी जंगजंग पछाडूनही हट्टी गं. ना. जोगळेकरांमुळे यश आले नाही. ज्यांच्यासाठी मी भांडलो व महामंडळ या मुख्य प्रवाहाशी पंगा घेतला त्याची मधुभाई व कोकण साहित्य परिषदेनेही जाणीव ठेवली नाही.

एकेका कवी आणि वक्त्यासाठी आग्रही राहून त्यांना निमंत्रित केले, पण ज्यांना बोलावता आले नाही ते संतापले नी माझ्यावर कायमचे डुख धरून बसले. ज्यांना बोलावले तेही आपल्या केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपण संमेलनाला निमंत्रित केले गेलोत अशी समजूत करून घेऊन आमची ओळख विसरले.

एकूण हा सारा थँक्सलेस उद्योग असतो. बहुसंख्य साहित्यिक आत्मकेंद्री, अप्पलपोटे नी आत्ममग्न असतात. (अपवाद असतात, आहेत...)

आळंदीत मुख्य मंदिराच्या अजान वृक्षाखाली महिलांना प्रवेश नव्हता. तिथला फलक काढून टाकावा व स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून मी आळंदीतल्या महामंडळ बैठकीत अडून बसलो. तेव्हा एकट्या पूर्वाध्यक्ष नारायण सुर्वेंनी मला पाठींबा दिला, बाकी सारे महिलांच्या विरोधात होते, अगदी महामंडळातील महिला प्रतिनिधीही!

मी बहिष्काराचे हत्यार उचलल्यावर ठराव मंजूर झाला, बोर्ड काढला गेला. पण कुणीही प्रमुख महिला तिकडे फिरकल्या नाहीत, कारण आपण विधवा होऊ अशी त्यांना भीती होती. ज्या आधीच विधवा होत्या किंवा अविवाहित त्याही घाबरून तिकडे बसायला आल्या नाहीत. काही भगिनींना दादापुता करून तिकडे नेले व बंदी मोडून काढली. पण आज तिकडे महिलाबंदीचा बोर्ड नसला तरी महिला जात नाहीतच.

संमेलनात कार्यक्रम, भोजन, व्यवस्था चांगली ठेवूनही काही रुसलेच.

एकूण काय? असे लक्षात आले की संमेलन वादग्रस्त बनवणे ही माध्यमांची गरज असते. मनोरंजन करण्यासाठी, वाद घडवून आणले जातात, सुपाऱ्या देऊन कोंबडे झुंजवले जातात. आयोजक आणि महामंडळ त्याला आता पुरेसे सरावलेले असतात. त्यांना त्याचे फारसे कौतिक राहिलेले नाही.

प्रचंड लोकप्रियता आणि अफाट प्रसिद्धी यांचे बायप्रॉडक्ट म्हणजे हे वाद असतात. ते व्हायलाच हवेत यासाठी व्यवस्था काम करीत असते. १९९६ नंतर २५ वर्षे मी मसाप, महामंडळ नी साहित्य संमेलन यांचा नाद सोडला.

पर्यायी म्हणून भरणारे विद्रोही साहित्य संमेलन वगैरे हे बारक्या, संकुचित आणि अतिरेकी कंपूचे प्रसिद्धीचे व रोजगारहमीचे उद्योग असतात, ते तर महामंडळापेक्षाही अधिक जातीयवादी नी टोळीबाज असतात. आहेत.

एकूणात गेली १४४ वर्षे हे व तेही (विद्रोही वगैरे) संमेलन घालमोडया दादांचेच राहिले आहेत.

-प्रा. हरी नरके,

१/१२/२०२१

No comments:

Post a Comment