Tuesday, January 30, 2018

शेतकरी गांधीजी--प्रा.हरी नरके

महात्मा गांधी माणसांमध्ये जसे रमत तसेच ते पुस्तकांमध्येही रमत असत.पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेला त्यांनी भेट दिली तेव्हा तिथली प्राचीन हस्तलिखितं बघून ते हरखून गेले. पाली, अवेस्ता, अरेबिक, महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत आदी भाषांमधली हजारो प्राचीन हस्तलिखितं बघताना ते त्यांची तन्मयतेनं माहिती घेत होते. जाताना त्यांनी संस्थेच्या शेरेबुकात संस्थेच्या या मौलिक कार्याचा गौरव केला.
विशेष म्हणजे गांधीजींनी या शेरे पुस्तकात आपला व्यवसाय " शेतकरी" असा लिहिलेला आहे.
गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. कट्टर धार्मिक हिंदू होते.
ते बदलले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे.
दुसर्‍या गोलमेज परिषदेला लंडनला जाण्यापुर्वी त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली.
गांधीजी हे मुळात राजकारणातले चाणक्य. त्यामुळे त्यांनी जाणीवपुर्वक बराच वेळ बाबासाहेबांकडे दुर्लक्ष केलं. भेटीची नियोजित वेळ संपली तसे बाबासाहेब जायला निघाले. तेव्हा कुठे गांधीजींनी "तुम्ही कधी आलात?" असं बाबासाहेबांना विचारलं.
दोघांच्यात अतिशय कडवट चर्चा झाली.
तोवर गांधीजी बाबासाहेबांना ’ब्राह्मण’ समजत होते.
"तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरीजनांसाठी काम करतोय," असं गांधीजी म्हणाले.
बाबासाहेब त्यावर ताडकन म्हणाले, "केवळ आधी जन्माला आलो या भांडवलावर बरेच लोक अशा गमजा मारीत असतात. महात्मा येतात नी जातात. लोकांच्या जीवनात मात्र काहीही परिवर्तन होत नाही. धूळ तेव्हढी हलते. गांधीजी मी या देशात उपरा आहे. मला मातृभुमी नाही."
त्यावर गांधीजी हादरले.
बाबासाहेब स्वत: दलित समाजातले आहेत हे त्यांना तेव्हा कळलं.
रात्री ते आपले सचिव महादेवभाई देसाई यांना तसं म्हणालेही.
महादेवभाईंच्या डायरीत हे सारं त्यांनी लिहून ठेवलंय.
त्यानंतर मात्र गांधीजींच्या मनातली अढी गेली.
1932 साली त्या दोघांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला.
1942 साली बाबासाहेबांनी "गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले?" हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी या दोघांवर टिकेचे आसूड ओढले.
मात्र गांधीजींनी हा राग मनात ठेवला नाही.
पुण्यातल्या बॅ. बाबासाहेब जयकरांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा घटना परिषदेत आणले.
देशाचे कायदा मंत्री केले.
घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी या संधीचं सोनं केलं. भारताला एक महान संविधान दिले.
आज ते दोघे हयात असते तर जो कडवटपणा या दोघांच्या अनुयायांमध्ये दिसतो तो दिसला नसता असं मला प्रामाणिकपणानं वाटतं.
त्यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. पण मतभेद म्हणजे वैर नव्हे. गांधी- आंबेडकर एकमेकांचे विरोधक होते पण दोघेही आत्मपरीक्षण करणारे होते. त्यामुळे ते मोठे होत गेले. असामान्य नेते बनले.
"ज्यांच्यासाठी करिशी यात्रा,
तेच परतले भिऊन तमाला,
नकोस परतू तुही परंतु,
चाल एकला तू चाल"

गांधी म्हटलं की अर्धवट माहितीच्या आधारावर काही लोक पिसाळून उठतात.
आपण हे ठरवलं पाहिजे की आपल्याला जवळचा कोण?
घटनाविरोधी नथूराम की घटना लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवणारे गांधीजी?
-प्रा.हरी नरके

Tuesday, January 23, 2018

जेव्हा डेव्हीडच गोलिथ बनतो-स्वित्झरलंड एक सुंदर, निसर्गसंपन्न देश. सुखी माणसाचा सदरा घातलेले लोक.
तिथलं डेव्हीड आणि जेसी हे अतिशय गोड असं तरूण जोडपं.
सुखात. मजेत. प्रेमात डुंबलेलं.
जेसी गरोदर असल्याचं समजल्यावर एक जबाबदार आणि जगातला सर्वोत्कृष्ठ बाप होण्याच्या स्वप्नांनं डेव्हीडला झपाटून टाकलंय.
एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना एक गुंड जेसीवर हल्ला करतो. डेव्हीड त्याला रोखतो. पण तो आडदांड गुंड त्या दोघांनाही मारहाण करतो. आपण जेसीचं संरक्षण करू शकलो नाही या अपराधभावानं डेव्हीड घायाळ होतो. खिन्नसा राहू लागतो.
आपण शक्तीमान व्हायला हवं, आपल्या पत्नीला आणि जन्माला येणार्‍या बाळाला संरक्षण पुरवू शकलो पाहिजे या ध्यासापोटी तो व्यायामशाळेत जाऊ लागतो. खूप व्यायाम करू लागतो आणि त्याचबरोबर स्टीरॅाइड घेऊ लागतो. त्याची ताकद वाढत जाते. गमावलेला आत्मविश्वास परत येतो.
मात्र शरिरातली रग वाढू लागताच ती बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागते.
छोट्याछोट्या गोष्टींमुळे त्याचा क्षोभ होऊ लागतो. त्याचे स्वत:वरचे नियंत्रण हरवू लागते.
जेसीच्या हे परिवर्तन लक्षात येते. ती त्याला त्या जाळ्यातून प्रेमाने सोडवते.
परंतु पुन्हा एक निमित्त घडते आणि तो येरे माझ्या मागल्या करू लागतो.
बायबलमध्ये डेव्हीड हा एक भला माणूस आहे तर गोलिथ एक दुर्जन.
आजच्या काळात डेव्हीड या एका भल्या माणसाचंच रूपांतर सदहेतूपोटी आणि समकालीन परिस्थितीमुळे गोलीथमध्ये होतंय का?
ज्या बायको-मुलासाठी डेव्हीडला शक्तीमान बनायचं असतं, तेच त्याला दुरावतात काय?
त्याची आक्रमकता, संतापीपण त्याच्यात पाशवी, अमानवी असं काही तरी भरू लागतात, ते त्याला नकोय.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीतला संघर्श हा चित्रपटातला सरधोपट मार्ग सोडून दिग्दर्शक इथे नवा मार्ग हाताळतो.
जेव्हा सज्जन, प्रसन्न आणि गोड अशा डेव्हीडला बायको-मुलाच्या संरक्षणापुरतीच ताकद हवी आहे.
मात्र शक्तीच्या आराधनेतून डेव्हीड इच्छा नसतानाही दुष्टाव्याला कसा बळी पडत जातो हे बघताना आपल्या मनाला वेदना होतात. खरा प्रश्न निर्माण होतो तो इथेच.
हा ताण, हा नैतिक पेच सुटतो का? असल्यास कसा? नसल्यास का नाही?
डॉमिनिक लोचेर हे ताज्या दमाचे अतिशय ताकदीचे दिग्दर्शक आहेत.
त्यांनी कथा, पटकथा, संवाद यांचं सादरीकरण आणि दिग्दर्शन अशा प्रतिभेनं, जाणतेपणानं व उर्जेनं केलंय की हा चित्रपट खर्‍या अर्थानं जागतिक भाषेतला बनून जातो.
त्याला सबटायटलची गरजच राहत नाही. लोचेर यांनीच पटकथा लिहिलीय.
ही कथा केवळ जेसी-डेव्हीडची न राहता जगातल्या तमाम भल्या लोकांची कथा बनून जाते.
छायाचित्रण इतके सुंदर आणि ताकदीचे आहे की प्रत्येक फ्रेम बोलत जाते. चित्रभाषाच सगळा आशय सांगून जाते.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna_Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
गोलिथ, दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड.
Goliath, Directed by  Dominik Locher, Switzerland.
धन्यवाद डॉमिनिक लोचेर.
-प्रा.हरी नरके

कलंदर गायिकेचा बहारदार प्रवास - जॅम
कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवलेले गुणी फ्रेंच दिग्दर्शक टोनी गॅटलीफ हे सर्वोत्तम संगितमय चित्रपटांसाठी विख्यात आहेत. त्यांचा प्रसन्न शैलीतला, दर्जेदार गितांची बहार उडवून देणारा ताजा आणि धमाल चित्रपट आहे "जॅम."
जॅम ही एक हसरी ग्रीक युवती आहे. तिला देखणा गळा लाभलेला आहे. तिची आई उत्तम गायिका होती. ही मुलगी जिथे जाते तिथे आनंद निर्माण करते. सतत हसतखेळत जगणार्‍या या तरूणीवर एक कामगिरी सोपवली जाते. इस्तंबूलला जाऊन जहाजाचा एक तुटलेला पार्ट तिला नव्यानं बनवून आणायचा असतो.
प्रवासात तिला अ‍ॅव्हरिल ही 19 वर्षीय उदास, दु:खी, अडचणीत सापडलेली मुलगी भेटते. ती निर्वासीत आहे. फ्रान्सवरून आलीय. तिच्याकडे पैसे नसतात आणि तुर्कस्थानात तिच्या ओळखीचेही कोणी नसते, जॅम तिला सोबत घेते. दोघींची सहजच मैत्री जमते.
दोघींचा हा प्रवास म्हणजे अडचणी, संकंटं, धावपळ आणि केवळ धमाल.
 जॅमनं अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी वेळोवेळी केलेला संगिताचा वापर, तिचा हजरजबाबीपणा, तिच्या नकला, नृत्य, गमतीजमती हा अखंड सुखाचा वर्षाव असतो. मानवी जीवनप्रवासाचं अफलातून प्रतिक म्हणजे हा बहारदार चित्रपट.
लोकसंगितावर आधारलेली यातली सुमधूर गाणी ही भारतीयांसाठी मेजवानीच होय.
जॅमची भुमिका करताना अभिनेत्री डेफनी पटाकिया हिनं अभिनयगुणांची जी उंची गाठलीय ती थक्क करणारी आहे.
या भुमिकेला अनंत शेड्स आहेत. त्यातल्या प्रत्येकात ती समरसून काम करते.
चार्ली चॅप्लीनच्या तोडीची आजच्या काळातली ही मुलगी आहे. तिला उज्ज्वल भवितव्य आहे.
ती बंडखोर आहे आणि प्रसंगी शत्रूशी दोन हात करणारीही.
तिच्यावर सोपवलेली कामगिरी ती फत्ते करते का?
तिच्या मैत्रिणीचं रहस्य काय असतं?
जॅमच्या हुकुमशाहीवृत्तीच्या आजोबांनी जॅमच्या आईला गायला बंदी घातलेली असते. ती आजोबांचा सूड कसा घेते?
पिफमध्ये मी पाहिलेला सर्वाधिक प्रसन्न चित्रपट जॅम.
अनेक महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजतोय. पिफमध्येही हा पुरस्कारांमध्ये बाजी मारेल अशी आशा होती.
तिच्याबरोबर गप्पा मारणं हा मस्त अनुभव होता. मुलगी खूपच टॅलेंटेड आहे. खुप पुढे जाईल.
निर्मितीमुल्ये अर्थातच एकदम भारी.
आयुष्य कसं जगावं याचा वस्तूपाठ देणारा हा भारीच सिनेमा आहे. संधी मिळाली तर पाह्यल्याशिवाय राहू नका.
"जॅम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स, Djam, Directed by Tony Gatlif, France, 2017. 97 Minutes.
-प्रा.हरी नरके

Monday, January 22, 2018

मधू दंडवते एक भला माणूस-

मधू दंडवते राजकारणाच्या घाणीत राहूनही अतिशय भला माणूस. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मी त्यांच्या निवडणुक प्रचाराला त्यांच्या मतदार संघात कोकणात गेलेलो होतो. तिकडे नारायण राणेंची प्रचंड दहशत होती. त्या निवडणुकीत दंडवते पराभूत झाल्याचे खूप वाईट वाटले होते. एकदा नानांचा [मधू दंडवते]
फोन आला. नाथ पैंच्या नावानं आपण महोत्सव घेतोय. तू अवश्य ये.
मी होकार दिला.
रेल्वेचं तिकीट पोस्टानं घरी आलं.
त्यात माझं वय 65 वर्षे लिहिलेलं होतं.तेव्हा मी अवघा तिशीत होतो. मी नानांना फोन केला, तर ते म्हणाले, अरे आपल्या चळवळीत माणसाचं नाव व्हायला वयाची किमान पन्नाशी ओलांडावी लागते. तुझं नाव मी किमान पंधरा वर्षे ऎकतोय. मला वाटलं तू 65 वर्षांचा नक्कीच असशील.
रेल्वेत तिकीट चेकरनं मला वयाबाबत विचारलं. मी माझं ओळखपत्र दाखवलं आणि मधू दंडवतेसायबांची ही चूक असल्याचं त्याला सांगितलं. तो हसला, म्हणाला, असू द्या. त्यांच्यामुळेच ही कोकण रेल्वे झालीय. दुसरा कोणी असता तर मी नियमाप्रमाणं तुम्हाला फाईन मारला असता पण मधुभाई एकदम जंटलमॅन माणूसाय. बिनधास्त राव्हा.
कार्यक्रमाला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मधुकरराव चौधरी, नलिनी पंडीत, मेधा पाटकर असे अनेकजण आलेले.
कार्यक्रम छानच झाला. परतताना नलिनीबाईंच्या घरी एक दिवस मुक्काम केला.
एकदा निवडणुक प्रचाराला नाना पुण्याला आलेले. मी सोबत होतो. घोरपडीच्या सभेत मीही बोललो. माझी ओळख सांगताना माझ्या महात्मा फुल्यांवरील पुस्तकांचा सुत्रसंचालकानं उल्लेख केलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर एक गरीब म्हातारा मला भेटला.म्हणाला, महात्मा फुले तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना सांगा माझे घेतलेले 500 रूपये परत करा.
मी हादरलो. महात्मा फुल्यांना जाऊन 100 वर्षे होऊन गेलेली.
म्हातार्‍याला चहा पाजला. शांतपणे नीट विचारपूस केली तेव्हा खरा मामला कळला. राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे म्हातार्‍यनं अर्ज केलेला होता. तिथल्या एका कर्मचार्‍यानं 500 रूपये लाच घेऊनही त्या म्हातार्‍याचं काम केलेलं नव्हतं. त्या कर्मचार्‍यालाच म्हातारा महात्मा फुले समजत होता. म्हातार्‍याला महामंडळाच्या कार्यालयात घेऊन गेलो. म्हातार्‍यानं लाचखोराला बरोबर ओळखलं.
महामंडळाचे प्रमुख अधिकारी दैठणकरसाहेब यांच्या मदतीनं त्या कर्मचार्‍याकडून 500 रूपये म्हातार्‍याला परत करायला लावले. शिवाय दैठणकरसाहेबांकडून म्हातार्‍याचं कर्ज प्रकरणही मंजूर करवून मार्गी लावलं.
देवेगौडा पंतप्रधान असताना नाना केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सेवा दलाच्या एका कार्यक्रमाला पुण्यात पुनम हॉटेलात आलेले होते. मीही एक वक्ता होतो. नानांशी छान गप्पा झाल्या. केंद्रीय नियोजन आयोगाने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच त्यांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि घरकुलाचे प्रश्न सुटतील हे मी नानांना बोललो. ते म्हणाले, तू दिल्लीला ये. आपण तरतूद करू.
मी नानांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली. स्वत: नानांच्या हाताने माझे नाव लिहिलेलं व त्यांच्या सहीचं अपॉंईंटमेंट दिल्याचं पत्र आलं.
आम्ही दिल्लीला जाऊन नियोजन भवनात नानांना भेटलो.
त्या दिवशी नानांचा मूड बिनसलेला होता. दुसर्‍या कुठल्यातरी कारणानं ते वैतागलेले होते. मला बघताच म्हणाले, मला तुझा मुद्दा पटलेला आहे. आय एम कन्विन्स्ड. तू पंतप्रधान देवेगौडांना भेट. त्यांच्याकडून आदेश घेऊन ये. मी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करतो.
नाना, प्लीज तुम्हीच आम्हाला मदत करा. पीएमओत आमची ओळख नाही. असं मी त्यांना म्हणताच ते उखडले. मला ते जमणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला निराश केलं.
त्यावेळी म.टा.चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी नितीन वैद्य आणि श्री सुरेंद्र मोहन व विरोधी पक्षाच्या एका खासदारानं आम्हाला पंतप्रधानांची वेळ मिळवायला मदत केली.
पंतप्रधान देवेगौडा बथ्थड होते. त्यांना भटकेविमुक्त, त्यांचे प्रश्न यांचे काडीचेही ज्ञान नव्हते. त्या दिल्ली भेटीत फारसं भरीव असं काहीच हाताला लागलं नाही. तिकीटाचे पैसे फुकट खर्च झाले. मी संतापून नानांना तसं पत्रं लिहिलं. नानांनी पत्राची पोचही दिली नाही.
नाना का चिडले? त्यांना शक्य असूनही त्यांनी दुबळ्या भटक्या विमुक्तांसाठी आपले अधिकार का वापरले नाहीत? आणि शक्य नव्हतं तर आम्हाला दिल्लीचा हेलपाटा आणि खर्च का करायला लावला?
याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत.
मात्र त्यानंतर मी नानांच्या प्रचाराला कधीही गेलो नाही.
काहीही असो. पण नाना एक भला माणूस होते यात शंकाच नाही!
-प्रा.हरी नरके

Sunday, January 21, 2018

कत्तलखाण्यात बहरलेले प्रेम-
ही कल्पना ज्यांना सुचली असेल त्यांना सॅल्युट. एक आधुनिक पद्धतीचा कत्तलखाणा आहे. तिथे काम करणारे दोघेजण काही आजारपणांनी, अपंगत्वाने ग्रस्त आहेत.
त्यांना दररोज रात्री सारखीच स्वप्नं पडतात.
एका गर्द जंगलात एक हरीण जोडपे काही तरी शोधत फिरते आहे. प्रेम करते आहे.
कत्तलखाण्यातल्या या दोघांना मानसोपचारतज्ञांचे उपचार घेताना हे समजते. दोघांना एकत्र आणणारी एकच जागा स्वप्नभुमी.
एक नितांतसुंदर, अभिजात प्रेमकथा.
विषय स्थानिक असूनही जागतिक, हाताळणी अगदी अभिनव, कथा,पटकथा अगदी बांधीव, संवाद मोजके पण अर्थपुर्ण, अभिनय वास्तववादी तरीही कमालीचा संयत, दिग्दर्शन हळुवार, काव्यमय, प्रेक्षकांना बिटवीन दि लाईन आणि बियाँड दि लाईन दाखवणारे, कॅमेरा अफलातून, असं सारं जुळून आलेली भन्नाट अनुभव देणारी कहाणी, "ऑन बॉडी अ‍ॅंड सोल,"
प्रत्येकानं अवश्य पाहावा असा श्रेष्ठ चित्रपट. On Body and Soul, Director- Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी.
-प्रा.हरी नरके

ऑस्कर पुरस्कार-चित्रपटज्या चित्रपटाला Academy Awards Best Foreign Language Film, USA ऑस्कर पुरस्कार मिळाला तो "दि सिक्रेट इन देयर आईज,"
आणि ऑस्कर मानांकन मिळाले तो "वाईल्ड टेल्स," हे गाजलेले चित्रपट यावर्षीच्या Piff मध्ये दाखवण्यात आले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी
Pune International Film Festival successful
या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या 1008 चित्रपटांमधून निवड केलेल्या 14 चित्रपटांचा समावेश जागतिक स्पर्धा विभागात केलेला होता.
याशिवाय विविध विभागात आणखी 130 चित्रपट दाखवण्यात आले.
या महोत्सवाला सुमारे सात हजार चित्रपट रसिक आठवडाभर उपस्थित असल्याची माहिती महोत्सवाचे प्रमुख डॉ.जब्बार पटेल यांनी दिली.
विविध माध्यमांचे प्रतिनिधी, निमंत्रित, प्रायोजक, चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, कलावंत व इतर सदस्य, हेही उपस्थित होते.
या महोत्सवासाठी पुण्यातील विविध ठिकाणच्या 10 थिएटर्समध्ये चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक ठिकाणी दररोज चार चित्रपट दाखवण्यात आले.
या दहा थिएटर्सची एकुण आसन संख्या 2897 इतकी आहे. प्रत्येकाने दररोज चार चित्रपट पाहिले असे समजले तरी आठ दिवसात मिळून एकुण सुमारे ऎंशी हजार प्रेक्षकांनी जागतिक चित्रपटांचा आनंद लुटला.
जगातल्या सुमारे 110 देशातील चित्रपट या महोत्सवात असतात असे सांगितले गेले.
2016-17 याकाळात निर्माण झालेले, जगातल्या 25 देशातील उत्कृष्ठ चित्रपट हा महोत्सव प्रत्येक रसिकाला दाखवायची सोय करतो.
मला स्वत:ला 21 देशातले ताजे चित्रपट बघता आले.

यात ज्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार Academy Awards Best Foreign Language Film, USA, मिळालाय तो "दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे, अर्जेंटिना, हा चित्रपट होता.
तसेच ऑस्कर मानांकन मिळवलेला "वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना, हाही चित्रपट होता.
जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडले गेलेले आणि पुरस्कार मिळवलेले उत्तम चित्रपट पिफमध्ये दाखवले गेले.
कान्स, बर्लिन, व्हेनिस, झ्युरिच, शारजा, हॅंबर्ग, लोकार्नो, युरोपियन, मिलान, टोरॅंटो, म्युनिक, टोकियो, मामी, इफ्फी व इतर अनेक जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवातील चित्रपट यात होते.

जगभरातील प्रतिभावंत दिग्दर्शक-निर्माते गेले दोनेक वर्षे नेमके कोणते चित्रपट निर्माण करीत होते त्याचा आलेख यातून आपल्याला मिळतो.
भारतीय चित्रपट आणि जगभरचे चित्रपट यांची तुलना करता येते.
नवे प्रयोग बघता येतात.
जागतिक चित्रभाषेची अभिरूची समजते.

या महोत्सवातून प्रेक्षकांच्या अभिरूचीचा दर्जा उंचावला जातो.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेकजण वर्षभर राबत असतात.
त्यात प्रामुख्याने डॉ.जब्बार पटेल, प्रा.समर नखाते, मकरंद साठे,Makarand Sathe प्रा.सतिष आळेकर, अभिजित रणदिवे, श्रीनिवास संथानम व इतरांचा मोलाचा वाटा असतो.Abhijeet Ranadive,Satish Alekar,Samar Nakhate

महिला चळवळीवरचे प्रभावी चित्रपट
पिफमध्ये महिला चळवळीवरचे अतिशय प्रभावी चित्रपट-
डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे संदर्भ-
या वर्षीच्या पिफमध्ये चळवळीवरचे अतिशय प्रभावी असे विविध चित्रपट बघता आले.
विशेष म्हणजे यातले काही चित्रपट तर जागतिक चित्रपट स्पर्धेत होते.
120 बीट्स पर मिनिट, दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
दि आर्ट ऑफ लव्हिंग, दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
नॉक्टरनल टाइम्स, दिग्दर्शक- प्रियनंदनन, केरळ, भारत,
या तीन चित्रपटांवर आपण आज बोलूयात.

1990 च्या ज्या काळात गे, एच.आय.व्ही., एड्स, एलजीबीटी यासारख्या विषयावर बोलणे निषिद्ध मानले जात होते त्याकाळात पॅरिसमध्ये "अ‍ॅक्ट अप" नावाचा एक गट या विषयावर कायदे व्हावेत, औषद कंपन्यांनी औषदे निर्माण करावीत, लोकप्रबोधन व्हावे, म्हणून प्रखरपणे लढत होता.
त्याची थेट आणि आक्रमक कहाणी हा चित्रपट मांडतो. या चित्रपटाला गोव्यात इफ्फीमध्ये सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला होता.
अतिशय महत्वाचा विषय, आक्रमकपणे मांडणारा हा चित्रपट काहीसा पथनाट्याच्या अंगाने जातो. खुप जास्त बोलतो.
शेवटची 20 मिनिटे मात्र अतिशय हृद्य आहेत.

दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का यांचा " दि आर्ट ऑफ लव्हिंग," हा पोलंडचा चित्रपट भन्नाट आहे.
मिशलीन विश्लोका या पोलंडच्या बंडखोर महिला लेखिकेच्या जीवनावर तो आधारित आहे.
तिने महिला हक्कांसाठी चर्च आणि सरकारशी फार चिवटपणे झुंज दिली.
महिलांचे सुखी लैंगिक जीवन, शारिरिक सुख, ऑरगॅझम, आजार, कौटुंबिक हिंसा, कुटुंब नियोजन यासाठी ही महिला लढत राहिली.
तिने याबद्दल लिहिलेले पुस्तक छापायला सरकार परवानगी देत नव्हते. ती नानाप्रकारे प्रयत्न करीत राहिली.
तिने या सेन्सॉरशिपवर कशी मात केली आणि तिच्या या पुस्तकाने देशात कशी क्रांती घडवून आणली याची रंगतदार कहाणी हा चित्रपट सादर करतो.
मिशलीन विश्लोका एकाला विचारतात, "तुम्ही कुठून आलात?"
त्यावर तो आपल्या गावाचं नाव सांगतो.
त्या तडफेने सुनावतात, "विसरू नका, तुम्ही आईच्या योनीतून आलेले आहात."

मळ्याळममधले प्रतिभावंत दिग्दर्शक प्रियनंदनन यांचा चित्रपट "नॉक्टरनल टाइम्स," हा तर थेट डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत प्रेक्षकाला नेऊन भिडवतो.
जो चित्रपट महाराष्ट्र किंवा कर्नाटकात तयार व्हायला हवा होता तो केरळमध्ये तयार झालाय.
अतिशय गुंतवून ठेवणारी थरारकथा हा चित्रपट उलगडत जातो.
सरकार व पोलीसांचे क्रौर्य, दमनशक्ती, जंगलांची कत्तल, निसर्गाचा विनाश, आदिवासींचे भीषण शोषन, जाती व धर्माच्या नावाने घडवल्या जाणार्‍या दंगली,कत्तली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणारी गावकर्‍यांची पिळवणूक यांची सुन्न करणारी कथा ज्या कलात्मक आणि थरारक पद्धतीने या चित्रपटात समोर येते त्यातून गलबलायला होते.
हिंदु-मुस्लीम दंगली, वैरं, सरकार-पोलीस यांच्याकडून आदिवासींवर होणारे अन्याय, कोला कंपन्यांकडून होणारी पाण्याची अमाप लूट हा दिग्दर्शक कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे चित्रभाषेत मांडतो. हा चित्रपट भेदक आहे. सुन्न करणारा आहे.
अंगावर येणारा इतका थेटपणा अनेकांना पेलवत नाही. काहींना तो प्रचारी वाटू शकतो. मला मात्र तो खूपच भावला. आरपार भिडला.

सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, मराठी नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी हा चित्रपट बघायलाच हवा. त्यावर चर्चा व्हायला हवी. मौनाचा कट उधळायला हवा.
- प्रा. हरी नरके- Prof Hari Narke
PIFF 2018-7
Dr. Jabbar Patel
Makarand Sathe
Abhijeet Ranadive
Satish Alekar
Samar Nakhate

समृद्ध चित्रभाषा
समृद्ध चित्रभाषा,ताजेपणा, समकालीन विषय आणि जागतिक दर्ज्याची निर्मितीमुल्ये
आवडलेले चित्रपट- Pune International Film Festival- Piff 2018
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018

 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला,
1. Free and Easy, Dir. Geng Jun, China,
"फ्री अ‍ॅंड इझी," दिग्दर्शक श्री जेंग जून, चीन, या श्रेष्ठ चिनी चित्रपटासह
अतिशय दर्जेदार आणि श्रेष्ठ चित्रपट
2. The Longing, Dir. Joram Lursen, Netherland,
"दि लॉन्गिंग," दिग्दर्शक - जोरम ल्युर्सेन, नेदरलॅंड,
3. Goliath, Dir. Dominik Locher, Switzerland,
"गोलिथ," दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड,
4. The Nothing Factory, Dir. Pedro Pinho, Portugal,
"दि नथिंग फॅक्टरी," दिग्दर्शक- पेद्रो पिन्हो,पोर्तुगाल,
5. More, Dir. Onur Saylak, Turkey,
"मोर," दिग्दर्शक- ओनुर सायलॅक, तुर्कस्थान,
6. Zama, Dir. Lucresia Martel, Argentina,
"झामा," दिग्दर्शक- लुक्रेशिया मार्टेल, अर्जेंटिना,
7. Djam, Dir. Tony Gatlif, France,
"दिजाम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स,
8. Women of the Weeping River, Dir. Sheron Deyoc, Philippines,
"वुमेन ऑफ दि विपिंग रिव्हर," दिग्दर्शक- शेरॉन डेयोक, फिलिपाईन्स,
9. Nacturnal Times, Dir. Priyanandanan, Keral, India,
"नॉक्टरनल टाइम्स," दिग्दर्शक- प्रियनंदन, केरळ, भारत,
10. The Quartette, Dir. Miroslav Krobot, Check Republic,
"दि क्वार्टेट," दिग्दर्शक- मिरोस्लाव क्रोबोट, झेक रिपब्लिक,
11. I'm A Killer,  Maciej Pleprzyca, Poland, 
"आय एम अ किलर," दिग्दर्शक- मॅसिज प्लेप्रझिका,पोलंड,
पाहण्याची संधी मला मिळाली.

उद्घाटनाची फिल्म 12. Men Don't Cry,Dir. Alen Drlijevic, Bosnia,
"मेन डोंट क्राय," दिग्दर्शक- अलेन डरलिजेविक, बोस्निया,
यांसह जागतिक सिनेमातील खालील उत्तम चित्रपट मला मनापासून आवडले.

13.The Square, Dir. Ruben Ostlund, Sweden,
"दि स्क्वेयर," दिग्दर्शक- रूबेन ओस्टलुंड, स्विडन,
14. The Son of Snow, Dir. Robert Wichrowski, Poland,
"दि सन ऑफ स्नो," दिग्दर्शक- रॉबर्ट विचरोव्हस्की, पोलंड,
15. Burning Birds, Dir. Sanjieeva Pushpakumara, Shrilanka,
"बर्निंग बर्डस," दिग्दर्शक- संजीव पुष्पकुमार, श्रीलंका,
16. On Body and Soul, Dir. Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी,
17.Secret Ingredient, Dir. Gjorce Stavreski, Macedonia,
"सिक्रेट इनग्रेडीएंट," दिग्दर्शक- गोर्स स्टावरेस्की, मॅसेडोनिया,
18. Paradise, Dir. Andrei Konchalovsky, Russia,
"पॅराडाईज," दिग्दर्शक- आंद्रे कोचालोव्हस्की, रशिया,
19. Claire's Camera, Sangsoo Hong, Korea [South]
"क्लेयर्स कॅमेरा," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
20. The Art of Loving, Dir. Maria Sadowska, Poland,
" दि आर्ट ऑफ लव्हिंग," दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
21. Asphyxia, Dir. Fereydoun Jeyrani, Iran,
"अस्फिक्षिया," दिग्दर्शक- फेरेदोन जयरानी, इराण,
22. Gabriel and the Mountain, Dir. Felipe Barbosa, Brazil,
"गॅब्रियल अ‍ॅंड दि माऊंटन," दिग्दर्शक- फिलिप बारबोझा, ब्राझिल,
23. The Day After, Dir.Sangsoo Hong, Korea [South]
 "दि डे आफ्टर," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
24. 120 Beats Per Minute, Dir. Robin Campillo, France,
"120 बीट्स पर मिनिट," दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
25. Wild Tales, Dir. Damian Szifron, Argentina,
"वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना,
26. Spoor, Dir. Agnieszka, Holland,
"स्पूर," दिग्दर्शक- अग्नीस्का, हॉलंड,
27. The Secret in Their Eyes, Dir. Juan Jose Campanella, Argentina,
"दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे कॅंपानेला, अर्जेंटिना,
28. Ciao Ciao, Dir. Song Chuan, China,
" सिया सिया," दिग्दर्शक- सांग चुआन, चिन,
....................

Free and Easy 
चिनमध्ये अतिशय कडक सेन्सॉरशिप असल्यानं सरकारविरूद्ध ब्र शब्दही उच्चारता येत नाही. अशा स्थितीत ज्या सुचकपणाने "फ्री अ‍ॅंड इझी" हा चित्रपट कम्युनिस्ट सरकारचा बुरखा फाडतो त्याला तोड नाही.


चिनी राजसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता मिळून तिथल्या सामान्य माणसांचे अपार शोषन कसे करतात,तिथली खेडी कशी ओस पडलेली आहेत, ग्रामीण भागातले कारखाने कसे उद्ध्वस्त झालेले आहेत याची अतिशय दर्जेदार कथा हा चित्रपट दाखवतो. यातली सगळी पात्रं लो टोनमध्ये बोलतात. अतिशय संथ, एखाद्या प्रायोगिक नाटकासारखा हा चित्रपट अप्रतिमरित्या सादर केलेला आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018 चा सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार The Best International Film Award in PIFF-2018 
"फ्री अ‍ॅंड इझी" या श्रेष्ठ चिनी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री जेंग जून यांच्यासोबत 
World Competition The Best Film Award " Free and Easy," China, 
with Director - Geng Jun

Wednesday, January 3, 2018

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची दोन्ही चित्रे अस्सलबरहुकुम आहेत.
18 वर्षे झाली आम्ही सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात तेव्हा खंत वाटते.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा काचेच्या भल्यामोठ्या अस्सल कृष्णधवल निगेटिव्हवरील ग्रुपफोटो जुना आणि अस्पष्ट झालेला असल्याने आमच्या समितीतर्फे त्यावरून जसेच्या तसे रंगित तैलचित्र तयार करून घ्यायचे ठरवले.
चित्रकारांबरोबर अनेक बैठका झाल्या. त्यांनीही जीव ओतून सुरेख तैलचित्र [ हुबेहुब कृष्णधवल निगेटिव्हनुसार ] तयार केले.
3 जानेवारीला नायगावच्या [ सावित्रीबाईंचे माहेर ] जयंती कार्यक्रमात ते प्रकाशित करायचे ठरवले. नानाविध अडचणींमधून वाट काढावी लागली. त्यावेळच्या एका उपसचिवाने खूप खोडे घातले. त्यासाठी त्याने कागदोपत्री चक्क लबाड्याही केल्या. मुख्यसचिव अरूण बोंगिरवारही आपल्या प्रशासनाच्या चुकीच्या बाजूनेच उभे राहिले.
खुप झटापट झाली. बड्यांशी झुंजावे लागले.
तीनच दिवस शिल्लक असताना योग्य तो निर्णय झाला. त्यातले दोन दिवस शासकीय मुद्रणालयाला सुट्टी होती.
मात्र संचालक मित्रांनी अपार मेहनत केली आणि तिसर्‍या दिवशी अस्सल तैलचित्र प्रकाशित झाले.
त्या आधी सावित्रीबाईंची दोन काल्पनिक चित्रे प्रसिद्ध झाली होती. एकामागे सदभावना होती तर एकामागे पत्नीप्रेम!
एकाने सावित्रीबाईंचे चरित्र लिहून त्यावर पहिले चित्र छापले.
एकदा एका कार्यक्रमाला त्यांच्या गावात गेलो असताना त्यांनी दुसर्‍या दिवशी घरी चहाला बोलावले.
चहा पोहे द्यायला त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी त्यांना प्रथमच भेटत होतो.
तरिही त्यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्याचा भास होत राहिला. तो ओळखीचा वाटत राहिला.
घरी आल्यावर हे पुस्तक परत पाहिले आणि सगळा उलगडा झाला!
दुसरे तैलचित्र बनवणारे चित्रकार माझ्या ओळखीचे होते, पण त्यांनी एखाद्या सरदारपत्नीचे काढावे असे "वजनदार तैलचित्र" रंगवलेले होते.
18 वर्षे झाली आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे मुळाबरहुकुम अस्सल तैलचित्र प्रकाशित करून, तरिही लोक अजुनही ती जुनीच आणि चुकीची तैलचित्रे वापरतात तेव्हा खंत वाटते.
अस्सल गोष्टी रुजायला किती वेळ लागतो आपल्या देशात!
माझं असे मत आहे की संशोधनाची कोणतीही शिस्त न पाळता, केवळ आंधळी भक्ती आणि जातीप्रेम यातून त्या विद्वानांकडून ही चूक झाली असणार.
......................
निळ्या साडीतले तरूण सावित्रीबाईंचे तैलचित्र अधिकृत आहे. ते मुळच्या अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून काढलेले आहे.
ते विलास चोरमले, अभिनव चित्रकला महाविद्यालय, पुणे, यांनी काढलेले आहे.
लाल काठाच्या साडीतले तैलचित्र हे त्यावरूनच परंतु वयस्कर सावित्रीबाईंचे तैलचित्र आहे.
ते सुधीर काटकर, जे.जे. मुंबई, यांनी काढलेले आहे.
ते पुण्यात फुलेवाड्यात व नायगावला सावित्रीबाई फुले स्मारकात लावलेले आहे.
-प्रा.हरी नरके- Hari Narke

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ही दोन्ही चित्रे काल्पनिक -


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ही दोन्ही चित्रे काल्पनिक आहेत. चुकीची आहेत. कृपया ती वापरू नयेत.
- प्रा.हरी नरके