Tuesday, January 23, 2018

जेव्हा डेव्हीडच गोलिथ बनतो-



स्वित्झरलंड एक सुंदर, निसर्गसंपन्न देश. सुखी माणसाचा सदरा घातलेले लोक.
तिथलं डेव्हीड आणि जेसी हे अतिशय गोड असं तरूण जोडपं.
सुखात. मजेत. प्रेमात डुंबलेलं.
जेसी गरोदर असल्याचं समजल्यावर एक जबाबदार आणि जगातला सर्वोत्कृष्ठ बाप होण्याच्या स्वप्नांनं डेव्हीडला झपाटून टाकलंय.
एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना एक गुंड जेसीवर हल्ला करतो. डेव्हीड त्याला रोखतो. पण तो आडदांड गुंड त्या दोघांनाही मारहाण करतो. आपण जेसीचं संरक्षण करू शकलो नाही या अपराधभावानं डेव्हीड घायाळ होतो. खिन्नसा राहू लागतो.
आपण शक्तीमान व्हायला हवं, आपल्या पत्नीला आणि जन्माला येणार्‍या बाळाला संरक्षण पुरवू शकलो पाहिजे या ध्यासापोटी तो व्यायामशाळेत जाऊ लागतो. खूप व्यायाम करू लागतो आणि त्याचबरोबर स्टीरॅाइड घेऊ लागतो. त्याची ताकद वाढत जाते. गमावलेला आत्मविश्वास परत येतो.
मात्र शरिरातली रग वाढू लागताच ती बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागते.
छोट्याछोट्या गोष्टींमुळे त्याचा क्षोभ होऊ लागतो. त्याचे स्वत:वरचे नियंत्रण हरवू लागते.
जेसीच्या हे परिवर्तन लक्षात येते. ती त्याला त्या जाळ्यातून प्रेमाने सोडवते.
परंतु पुन्हा एक निमित्त घडते आणि तो येरे माझ्या मागल्या करू लागतो.
बायबलमध्ये डेव्हीड हा एक भला माणूस आहे तर गोलिथ एक दुर्जन.
आजच्या काळात डेव्हीड या एका भल्या माणसाचंच रूपांतर सदहेतूपोटी आणि समकालीन परिस्थितीमुळे गोलीथमध्ये होतंय का?
ज्या बायको-मुलासाठी डेव्हीडला शक्तीमान बनायचं असतं, तेच त्याला दुरावतात काय?
त्याची आक्रमकता, संतापीपण त्याच्यात पाशवी, अमानवी असं काही तरी भरू लागतात, ते त्याला नकोय.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीतला संघर्श हा चित्रपटातला सरधोपट मार्ग सोडून दिग्दर्शक इथे नवा मार्ग हाताळतो.
जेव्हा सज्जन, प्रसन्न आणि गोड अशा डेव्हीडला बायको-मुलाच्या संरक्षणापुरतीच ताकद हवी आहे.
मात्र शक्तीच्या आराधनेतून डेव्हीड इच्छा नसतानाही दुष्टाव्याला कसा बळी पडत जातो हे बघताना आपल्या मनाला वेदना होतात. खरा प्रश्न निर्माण होतो तो इथेच.
हा ताण, हा नैतिक पेच सुटतो का? असल्यास कसा? नसल्यास का नाही?
डॉमिनिक लोचेर हे ताज्या दमाचे अतिशय ताकदीचे दिग्दर्शक आहेत.
त्यांनी कथा, पटकथा, संवाद यांचं सादरीकरण आणि दिग्दर्शन अशा प्रतिभेनं, जाणतेपणानं व उर्जेनं केलंय की हा चित्रपट खर्‍या अर्थानं जागतिक भाषेतला बनून जातो.
त्याला सबटायटलची गरजच राहत नाही. लोचेर यांनीच पटकथा लिहिलीय.
ही कथा केवळ जेसी-डेव्हीडची न राहता जगातल्या तमाम भल्या लोकांची कथा बनून जाते.
छायाचित्रण इतके सुंदर आणि ताकदीचे आहे की प्रत्येक फ्रेम बोलत जाते. चित्रभाषाच सगळा आशय सांगून जाते.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna_Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
गोलिथ, दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड.
Goliath, Directed by  Dominik Locher, Switzerland.
धन्यवाद डॉमिनिक लोचेर.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment