पिफमध्ये महिला चळवळीवरचे अतिशय प्रभावी चित्रपट-
डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे संदर्भ-
या वर्षीच्या पिफमध्ये चळवळीवरचे अतिशय प्रभावी असे विविध चित्रपट बघता आले.
विशेष म्हणजे यातले काही चित्रपट तर जागतिक चित्रपट स्पर्धेत होते.
120 बीट्स पर मिनिट, दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
दि आर्ट ऑफ लव्हिंग, दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
नॉक्टरनल टाइम्स, दिग्दर्शक- प्रियनंदनन, केरळ, भारत,
या तीन चित्रपटांवर आपण आज बोलूयात.
1990 च्या ज्या काळात गे, एच.आय.व्ही., एड्स, एलजीबीटी यासारख्या विषयावर बोलणे निषिद्ध मानले जात होते त्याकाळात पॅरिसमध्ये "अॅक्ट अप" नावाचा एक गट या विषयावर कायदे व्हावेत, औषद कंपन्यांनी औषदे निर्माण करावीत, लोकप्रबोधन व्हावे, म्हणून प्रखरपणे लढत होता.
त्याची थेट आणि आक्रमक कहाणी हा चित्रपट मांडतो. या चित्रपटाला गोव्यात इफ्फीमध्ये सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला होता.
अतिशय महत्वाचा विषय, आक्रमकपणे मांडणारा हा चित्रपट काहीसा पथनाट्याच्या अंगाने जातो. खुप जास्त बोलतो.
शेवटची 20 मिनिटे मात्र अतिशय हृद्य आहेत.
दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का यांचा " दि आर्ट ऑफ लव्हिंग," हा पोलंडचा चित्रपट भन्नाट आहे.
मिशलीन विश्लोका या पोलंडच्या बंडखोर महिला लेखिकेच्या जीवनावर तो आधारित आहे.
तिने महिला हक्कांसाठी चर्च आणि सरकारशी फार चिवटपणे झुंज दिली.
महिलांचे सुखी लैंगिक जीवन, शारिरिक सुख, ऑरगॅझम, आजार, कौटुंबिक हिंसा, कुटुंब नियोजन यासाठी ही महिला लढत राहिली.
तिने याबद्दल लिहिलेले पुस्तक छापायला सरकार परवानगी देत नव्हते. ती नानाप्रकारे प्रयत्न करीत राहिली.
तिने या सेन्सॉरशिपवर कशी मात केली आणि तिच्या या पुस्तकाने देशात कशी क्रांती घडवून आणली याची रंगतदार कहाणी हा चित्रपट सादर करतो.
मिशलीन विश्लोका एकाला विचारतात, "तुम्ही कुठून आलात?"
त्यावर तो आपल्या गावाचं नाव सांगतो.
त्या तडफेने सुनावतात, "विसरू नका, तुम्ही आईच्या योनीतून आलेले आहात."
मळ्याळममधले प्रतिभावंत दिग्दर्शक प्रियनंदनन यांचा चित्रपट "नॉक्टरनल टाइम्स," हा तर थेट डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत प्रेक्षकाला नेऊन भिडवतो.
जो चित्रपट महाराष्ट्र किंवा कर्नाटकात तयार व्हायला हवा होता तो केरळमध्ये तयार झालाय.
अतिशय गुंतवून ठेवणारी थरारकथा हा चित्रपट उलगडत जातो.
सरकार व पोलीसांचे क्रौर्य, दमनशक्ती, जंगलांची कत्तल, निसर्गाचा विनाश, आदिवासींचे भीषण शोषन, जाती व धर्माच्या नावाने घडवल्या जाणार्या दंगली,कत्तली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणारी गावकर्यांची पिळवणूक यांची सुन्न करणारी कथा ज्या कलात्मक आणि थरारक पद्धतीने या चित्रपटात समोर येते त्यातून गलबलायला होते.
हिंदु-मुस्लीम दंगली, वैरं, सरकार-पोलीस यांच्याकडून आदिवासींवर होणारे अन्याय, कोला कंपन्यांकडून होणारी पाण्याची अमाप लूट हा दिग्दर्शक कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे चित्रभाषेत मांडतो. हा चित्रपट भेदक आहे. सुन्न करणारा आहे.
अंगावर येणारा इतका थेटपणा अनेकांना पेलवत नाही. काहींना तो प्रचारी वाटू शकतो. मला मात्र तो खूपच भावला. आरपार भिडला.
सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, मराठी नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी हा चित्रपट बघायलाच हवा. त्यावर चर्चा व्हायला हवी. मौनाचा कट उधळायला हवा.
- प्रा. हरी नरके- Prof Hari Narke
PIFF 2018-7
Dr. Jabbar Patel
Makarand Sathe
Abhijeet Ranadive
Satish Alekar
Samar Nakhate
No comments:
Post a Comment